Pages

Sunday, 20 January 2013

लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)

...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...


...छत्रपती शिवरायांचा लाडका - दुर्गदुर्गेश्वर रायगड हे आपल्या महाराष्ट्राचं ‘शक्तिपीठ’ आहे. पण रायगडाचं दुर्गमत्व, त्याचा रानवा, इथला इतिहास, या मातीतली साधी माणसं आणि खुद्द शिवरायांना भुरळ पडावी - असं या पहाडात विशेष काय - या सगळ्याची ओळख होण्यासाठी, रायगडाला ‘रोप वे’ नी भेट देऊन फारसा उपयोग नाही. आणि म्हणूनच आम्ही मार्ग निवडला - रायगडाभोवती फेर धरलेल्या डोंगरांच्या दाटीतून आणि दुर्गम घाटवाटांवरून भटकंती करण्याचा! उभ्या कातळकड्यांना भेदून झेपावलेल्या धबधबे/ ओढ्यांमधून चढणा-या बिकट वाटांना ‘नाळे’ची वाट म्हणतात. त्यामुळे अर्थातच या वाटा सोप्या नाहीत. रायगडाजवळ बोचघोळ, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढे, उपांडे अश्या उदंड घाटवाटा आहेत. आमच्या भटकंतीच्या मार्गावर नैसर्गिक शिवपिंडीस्वरूप सुळक्याला - 'लिंगाण्या'ला प्रदक्षिणाच घडणार होती. बेत होता, लिंगाण्याच्या उत्तरेकडील ‘बोराटा नाळे’च्या दुर्घट वाटेनं चढायचं, माथ्यावरच्या ‘रायलिंग पठारा’ वरून रायगड आणि लिंगाण्याचं दर्शन घ्यायचं आणि उतरताना लिंगाण्याच्या दक्षिणेकडच्या ‘सिंगापूर नाळे’च्या वाटेनं उतरल्यावर लिंगाण्याला प्रदक्षिणा पूर्ण करायची... पण, असं म्हणतात ना, की ‘शिवलिंगा’स संपूर्ण प्रदक्षिणा घालू नये. आम्ही तेच करायला गेलो आणि कदाचित म्हणूनच आमची भटकंती चांगलीच खडतर निघाली!



...उन्हं कलता कलता रायगडाच्या पायथ्याशी, काळ नदीच्या खो-यातल्या ‘पाने’ गावात आम्ही दाखल झालो. दुस-या दिवशी बोराटा नाळेची वाट दाखवायला वाटाड्या मिळेल का अशी विचारणा केली, तर गावकरी हादरलेच. ‘‘बोराट्याचं नावंच काढू नका. अहो कसलं काय, वाटंच नाहीये. हे एवढं पुरुषभर गवत. अन त्यातच दरडी कोसळल्यामुळे नाळेत मोठाले धोंडे... पूर्ण वाट मोडलीये. आम्ही जाऊच देणार नाही तुम्हाला बोराट्याच्या नाळेनं..’’ आता हे म्हणजे आम्हाला अगदीच अनपेक्षित होतं. तासभर विनंती करूनही, कोणीच वाट दाखवायला तयार होईना. शेवटी - "हट्टानं पेटून, बोराटा नाळेच्या बंबाळ्या रानात घुसणं शक्य नाही", हे आम्हाला पटवून घ्यावं लागलं. ‘‘तुम्ही चांगल्या घरची पोरं. आता घाटावर जायचंच असेल, तर घ्या या किसनला सांगाती आणि जा ’निसणी’च्या वाटेनं...’’ ट्रेकर्सना अपरिचित अश्या ‘निसणी’च्या वाटेच्या नावानं आम्ही कान टवकारले. एकीकडे ‘बोराटा नाळे’च्या वाटेनं हुलकावणी दिल्याची हुरहूर, तर दुसरीकडे ही नवी ‘निसणी’ची वाट कशी असणार याची उत्सुकता मनात दाटली होती...


...मुक्कामाचं ‘पाने’ गाव अगदी कोकणात असूनही, दुस-या दिवशी सकाळी थंडीनं हुडहुडी भरली. गरमागरम चहाचे घुटके घेत, पाने गावच्या तिन्ही बाजूंनी आभाळात झेपावलेल्या सह्याद्रीचं कवतिक डोळ्यांत साठवत होतो.


शाळेच्या ओवरीवरचा मुक्काम आवरून, पाठपिशव्या चढवल्या अन् लिंगणवाडीतल्या ’किसन शेलार’ या वाटाड्यासोबत ‘निसणी’च्या वाटेवर निघालो.


पाने गावाच्या पूर्वेकडे कधी शेताडीतून, कधी काळ नदीच्या कोरड्या पात्राजवळून, तर कधी झुडपी पठारांवर अशी वाटचाल सुरु केली.

इथल्या डोंगररांगा अन् द-या कश्या अस्ताव्यस्त पसरल्या आहेत, हे कळण्यासाठी कल्पना करू की एखाद्या पक्ष्यासारखं आभाळातनं खाली डोकावलं, तर हा भूप्रदेश इंग्रजी ‘एम्’ च्या आकाराचा दिसेल. या ’एम्’ च्या डावीकडे आहेत असंख्य घळी अन् त्यातली सगळ्यात बुटकी घळ आहे निसणीच्या वाटेची. ’एम्’ च्या उजव्या टोकापाशी वसलाय लिंगाणा सुळका. म्हणजे लिंगाण्याला खेटून चढणा-या बोराटा नाळेऐवजी दूरवरच्या निसणीच्या वाटेनं चढल्यामुळे आम्हाला किती मोठ्ठा वळसा पडणार होता, याची कल्पना यावी...



...लिंगाणा सुळका अगदी डोक्यावर आल्यानंतर किसनभाऊंनी डावीकडे रानात घुसणारी वाट पकडली.

पायथ्याच्या एकांड्या झापापासून वाट उभ्या चढावरून पदरातल्या झाडीपाशी पोहोचली.

उत्तर भिंतीवरचा उभा चढ, धारेवरचा घसारा आणि मानेवर तळपू लागलेलं ऊन यामुळे थकवा वाटू लागला, पण अभिनं सोबत आणलेल्या संत्र्या-मोसंबीमुळे तरतरी आली. निसणीच्या घळीच्या थोडं अलिकडे कातळात कोरलेल्या ४ – ५ पावठ्या पाहून, ही वाट जुनी असावी असं वाटलं.


भोवतालचे घळीचे कातळ उंचावत आणि जवळ येत गेले.


मोठाल्या धोंड्याशेजारून वाट वाट ‘निसणी’पाशी पोहोचली. इथं काही वेगळं साहस असेल, ही अपेक्षा फोल ठरली, अन् निसणीचा ३० फुटाचा खडकाळ घसारा पार करून आम्ही घाटमाथ्यावर पोहोचलो. किसनभाऊंच्या मते, या वाटेवरचे कदाचित आम्ही पहिलेच ट्रेकर्स असू. वाट अगदीच मळलेली नसली, तरी पारध्यांच्या आणि आदिवासींच्या वहिवाटाची. पाने गावातून पाठीवरच्या बोजांसकट निसणीची घाटवाट चढून सह्याद्रीचा माथा गाठायला पूर्ण तीन तास लागले होते.


...आता काय, तासाभरात मुक्कामाचं ‘मोहरी’ गाव गाठू, हा भ्रम मोडून काढला - पुढच्या ४-५ तासांच्या खडतर चालीनं! अर्थात दिवस डिसेंबरचे आणि घाटमाथ्यावर उन्हाचा काहीच त्रास नाही. भणाणणारा वारा, रानफुलांच्या जाळ्या, मध्येच डोकावणारे झरे अन त्यातलं शंखनितळ पाणी, क्वचित कुठेतरी आदिवासींनी वसवलेलं शेताचं खळं, कुठं रानोमाळ विखुरलेल्या गुरांमध्ये रमलेला गुराखी आणि समोर गुडघाभर उंच वाढलेल्या गवतातून सळसळ धावणारी पाऊलवाट असं झ्याक वातावरण!

तासाभरात ‘चांदर’ नावच्या आदिवासी पाड्यावर पोहोचलो. पुणे जिल्ह्यातलं एक अतिदुर्गम गाव, जिथं वीज-पाणी नाही. आहे फक्त अठरा विश्वं दारिद्य! गावक-यांनी आपुलकीनं स्वागत केलं. आमच्या भल्या मोठ्या पाठपिशव्या बघून खदाखदा हसले.


गावातल्या प्राथमिक शाळेत जेमतेम ५ विद्यार्थी! त्यातल्या २ चिमुरड्या मुली तर आणखी दूरवरच्या कुठल्याशा पाड्यावरून रानां-डोंगरांतून दोन तास चालून शाळेत येतात. शाळेतल्या मुलांना आमच्याकडची थोडी फळं दिली. त्यांच्या चेह-यावरच्या आनंदाला खरंच तोड नव्हती. गंमत म्हणजे शाळेतल्या मुलांनी ती फळं अशी छातीपाशी जपून ठेवली, दोन हातांनी गच्च धरून! मला तर शहरातली मुलं आठवली, जी आईवडिलांकडून हट्टानं दहा रुपयांची नोट खेचून घेऊन वेफर्सचं पाकिट विकत घेतात.. अन् पुढच्याच क्षणी ते वेफर्स एकट्याने बकाबक खाऊन परत - ‘आपल्याला कसं काहीच मिळत नाही’, असा आविर्भाव! मास्तर म्हणाले, ‘‘इथली पोरं आहेत हुशार, पण बाहेरच्या जगाशी अगदी काहीच संबंध नाही. मुळात यांच्या जगण्याचे, अन् पोटापाण्याचे प्रश्न इतके वेगळे आहेत. इथं म्हणजे निसर्गाच्या तालावर जगायचं, अन् त्याच्याच तालावर तरायचं...’’ आम्ही अंतर्मुख झालो...



...पुढंची वाटचाल सुरु केली. मगाशी या भूप्रदेशाचं वर्णन करताना, ज्या ‘एम्’ आकाराच्या डोंगर-द-यांचं वर्णन केलं, त्याच्या मध्यभागच्या खिंडीच्या दिशेनं निघालो. वळणावळणांच्या पाऊलवाटांवरून, सह्याद्रीच्या अस्पर्शित डोंगरद-यांमधून, ओढ्यांच्या खोल ‘कोंडी’ जवळून, दाट झाडो-यांतून, तर कधी उभ्या घसरंडीवरच्या कारवीतून अशी वाटचाल करत खिंडीजवळ आलो. उभ्या चढावर मान खाली घालून चढताना माकडांच्या किचकिचाटानं दचकलो. आम्ही आलेलं त्यांना अजिबात खपलं नव्हते. पण किसनरावांच्या कुत्र्यानं भुंकून भुंकून माकडांना रोखून धरलं आणि आम्ही पटकन खिंडीपल्याड मोहरी गावच्या हद्दीत पोहोचलो.

पण मोहोरी गावात पोहोचायला अजून २०० मी. दरी उतरायची, अन् ३०० मी. दरी चढायची आहे, हे पाहून खरं तर आम्ही खचलोच. सकाळपासनं ६ तासांच्या चालीनंतर आता गरज होती थोडी विश्रांती आणि पोटपूजेची! दरीच्या पोटापाशी एक अफलातून ओढ्यापाशी अभि-मिलिंदनी बनवलेल्या फक्कड सँडविचचा फन्ना उडवला. इथंच आमचे वाटाडे - किसनरावांना निरोप दिला. मोहोरी गावच्या शेवटच्या ३०० मी. चढावरून उजवीकडे दरीपल्याड रायगड उन्हांत तळपताना दिसत होता. वाटेतल्या भैरीच्या राऊळापर्यंत वाट रमतगमत चढली, पण पुढच्या छातीवरच्या उभ्या चढानं घामटं काढलं.


त्यातंच, उतारावरचं झाडं न् झाड, गवताचं पातं न् पातं गावक-यांनी खुडलेलं. अखेर तब्बल आठ तासांच्या चालीनंतर आम्ही मोहोरी गावात पोहोचलो. ट्रेकर्सना अपरिचित अशी एक नवी निसणीची वाट चालल्यानं खूप भारी वाटलं. या भूभागांत ठळक खाणाखूणा नाहीत. स्वत: वाटा शोधणे जरा अवघड गेलं असतं. ही वाट फक्त अस्सल ट्रेकर्ससाठी आणि सह्याद्रीच्या भक्तांसाठीच आहे.


...मोहोरी गावच्या पश्चिमेला एक विलक्षण ‘कवतिक’ दडलंय, ते म्हणजे ‘रायलिंग पठार’. ज्या इंग्रजी ’एम्’ आकाराच्या या भूप्रदेशातून आम्ही दिवसभर भटकलो, त्याच्या अगदी उजवीकडच्या पायापाशी ‘रायलिंग पठार’ वसलंय अशी कल्पना करता येईल. रायलिंग पठाराबद्दल आम्ही इतकं काही वाचलं-ऐकलं होतं, की मोहरी गावात सॅक्स ठेवून आम्ही सुसाटलोच. स्वतः फिरून बघितल्यामुळे, उत्तरेकडे अन पूर्वेकडे पसरलेल्या द-या, घळी, झाडोरा अन कातळमाथ्यांची चांगलीच ओळख पटत होती.


पाठीवरचं ओझं घेऊन, तास न् तास अन् उन्हां-तान्हांतून चढउतार करण्याचा ’अट्टाहास’ का करावा, याचं बिनतोड उत्तर मिळालं ‘रायलिंग’ टोकावर! एक थरारक, अप्रतिम निसर्गदृश्य... जेमतेम हजार फूटांवर लिंगाण्याचा रौद्र सुळका, पल्याड खोलवर काळ नदीचं खोरं आणि मागं उठावलेला रायगडाचा विराट पहाड!




साक्षात शिवलिंगास्वरूप भासणा-या लिंगाण्याच्या काळ्याकभिन्न सुळक्याचं दर्शनंच थरकाप उडवणारं! एकावर एक कातळाचे थर, घसरड्या गवताचे टप्पे, कुठं अवघड जागी कोरलेली पाण्याची टाकी अन् गुहा, यामुळे लिंगाण्यावरची नजर हटतच नाही. तीव्र उतारावरच्या घसा-यामुळे अन् जबरदस्त दृष्टीभयामुळे लिंगाणा आरोहण आव्हानात्मक कातळारोहणाशिवाय शक्य नसलं, तरी त्याच्या रांगड्या सौंदर्यावर कैक ट्रेकर्स भुलले आहेत. अर्थात, निसर्गाच्या या अद्भूत लेण्याचं खरं कौतुक शिवरायांनी केलं, इथे एक दुर्गम दुर्ग उभारून...


पल्याडच्या काळ नदीच्या खो-यात विलक्षण गूढ संधिप्रकाश दाटलेला. पाठीमागे सणसणीत दिसणा-या रायगडाच्या माथ्यापाशी टेकू पाहणारा सूर्य! असं वाटलं, की दिवसभर तळपून थकलेल्या सूर्याला विसावण्यासाठी, त्याच्या तोडीस तोड रायगडमाथाचं हवा!. अंधार दाटू लागला, म्हणून अगदी नाईलाजानं ‘रायलिंग पठारा’ला अलविदा केलं.


रात्रीच्या मुक्कामासाठी ‘मोहोरी’ गाव तितकंसं प्रसन्न वाटलं नाही, म्हणून अंधार पडता पडताच पलीकडच्या दरीतल्या ‘सिंगापूर’ गावात पोहोचलो. पाय सणसणीत दुखत होते, पण मुक्कामासाठी गावातल्या शाळेची जागा बघून खूपच प्रसन्न वाटले. गावातले मांढरे नावाचे एक दादा आपणहून मदतीला आले. शाळेमागे एका अवघड जागेजवळच्या झ-यावरून पाण्याचा हंडा भरून आणला. दिवसभरच्या १०-१२ तासांच्या खडतर चालीनंतर -सूप, पुलाव, कोशिंबीर अन नंतर चहा असा भरपूर अन रूचकर आहार आवश्यकच होता. आपण स्वयंपूर्ण राहून डोंगरयात्रा करण्याचा आनंद काही औरच.

गावक-यांकडून सिंगापूर सारख्या दुर्गम जागीही आधुनिकतेचं वावटळ कसं घोंघावू लागलंय, गरीब शेतक-यांच्या जमिनींवर धनिकांचा कसा डोळा आहे, इथं डांबरी रस्ते - डॅम - बंगले बांधण्याचे प्रयत्न कसे चालू आहेत, हे सगळं ऐकून काळजाचा ठोका चुकला. दुर्गम भागात प्रगती होऊ नये असं नाहीये म्हणायचं; पण प्रगतीसाठी सह्याद्रीच्या अस्पर्शित भागात अॅम्बी व्हॅली, लवासासारखी खाजगी पर्यटनस्थळं बांधायची, जंगलं तोडून रस्ते-बंगले-सुसाटणा-या गाड्या-हॉटेल्सची गजबज जमवायची म्हणजे ‘प्रगती’ अशी व्याख्या असेल, तर खरंच नको असली प्रगती...

रात्री आकाशगंगेतल्या लख्ख चांदण्या, घाटमाथ्यावरचा वारा अन् आपुलकीनं गप्पा मारायला आलेले गावकरी दोस्त, असा जब-या माहोल जमला. दिवसभराची दमवणूक कुठंच्या कुठे पळून गेलेली.. ट्रेकची रंगत अन् झींग अशी वाढतंच चाललेली...

(पूर्वार्ध)

वाचा उत्तरार्ध इथे:: लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)

7 comments:

  1. Mastach jhalay.. :)) Nehemi pramane.. he warnan nivval shabdatit ahe..
    भणाणणारा वारा, रानफुलांच्या जाळ्या, मध्येच डोकावणारे झरे अन त्यातलं शंखनितळ पाणी, क्वचित कुठेतरी आदिवासींनी वसवलेलं शेताचं खळं, कुठं रानोमाळ विखुरलेल्या गुरांमध्ये रमलेला गुराखी आणि समोर गुडघाभर उंच वाढलेल्या गवतातून सळसळ धावणारी पाऊलवाट असं झ्याक वातावरण!

    ReplyDelete
  2. Saiprakash Belsare2 January 2014 at 07:18

    यतिन, सह्याद्री कितीही फिरला, वर्णिला; तरीही दरवेळी नवीन अनुभूती देणार हे निश्चित!!!

    माझ्या अनुभव कथनाच्या छोट्याश्या प्रयत्नाबद्दल, मनापासून व्यक्त केलेला अभिप्राय वाचून छान वाटलं.

    सह्याद्रीवरच्या प्रेमामुळेच लेख तुला आवडला असणार आहे. धन्यवाद!!

    ReplyDelete
  3. जबरी लिहिलंस… निसणी च्या वाटेची माहिती सुंदर लिहिलीस… एकंदरीतच दोन्ही भाग व्यवस्थित जमलेले आहेत… सह्याद्रीतल्या खेड्यातचं अशी प्रेमळ माणसं भेटतील… शहरात नाही… <>… खरंच हा एक खूप मोठा विरोधाभास आहे… हे वाक्य मनाला खूप टोचून गेलं…
    एकंदरीतचं ब… ढी… या…

    ReplyDelete
  4. जबरी लिहिलंस… निसणी च्या वाटेची माहिती सुंदर लिहिलीस… एकंदरीतच दोन्ही भाग व्यवस्थित जमलेले आहेत… सह्याद्रीतल्या खेड्यातचं अशी प्रेमळ माणसं भेटतील… शहरात नाही… {[<>]}… खरंच हा एक खूप मोठा विरोधाभास आहे… हे वाक्य मनाला खूप टोचून गेलं…
    एकंदरीतचं ब… ढी… या…

    ReplyDelete
  5. Saiprakash Belsare22 January 2014 at 05:56

    दत्तू:
    तुझ्यासारख्या दर्दी घाटवाटा-ट्रेकरची दाद खूपंच मोलाची!!!
    या आडवाटा फक्त दर्दी ट्रेकर्सना धुंडाळण्यासाठी राखीव राहाव्यात अन् विकासाच्या नावाखाली इथे 'लवासा' होवू नये, अशी मनोमन इच्छा!!!

    ReplyDelete
  6. Mitra amzing lihil ahes. Ajacha sakli loksatta madhe tuza lekh pahile ani mag ha blog. Itake diwas he blog ka nahi gavala hyach vaiit vatal. Bhatkantichya anek sundar blog paiiki ek ahe ha. Anek anek Dhanyavad. Hi vat karanarach

    ReplyDelete
    Replies
    1. मन्या:
      ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत!!! :)
      अग्गदी मनापासून अनुभवलेले क्षण असल्याने, ते काही वर्षांनंतर वाचतानाही परत अनुभवता यावेत, अन् दोस्तांपर्यंत पोहोचवावेत, म्हणून हा लिखाणाचा खटाटोप..
      खूप धन्यवाद :)

      Delete