Pages

Tuesday, 19 February 2013

‘तोरण्या’चं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...

कधी वाटतं, दोन-चार दिवस फुरसत काढून, निवांत एखाद्या जुन्या-जाणत्या गडावर शोधयात्रा काढावी..
..वा-यां-वादळांत टिकाव धरून राहण्यासाठी गडावरच्या शिबंदीची, पाण्याची, चोरवाटांची, संरक्षणाची कशी व्यवस्था असेल, याचे आडाखे बांधावेत..
..माचीवरच्या कारवीतून, तिरपांड्या घसा-यावरून घुसत जाताना जीव मेटाकुटीला यावा, अन् अवचितंच पहा-यासाठी खोदलेली विवरं सापडावीत...
..खो-यात उतरणारी दुर्घट वाट सुगम करावी, अन् झाडीत दडलेलं देवीचं ठाणं गवसावं..
..एखादं बुजलेलं वैशिष्ट्यपूर्ण टाकं तास न् तास खपून श्रमदानानं मोकळं करावं, अन् टाक्यावरच्या कोरीव कामानं अचंबित व्हावं..
..आपल्या राजाच्या दूर दृष्टीचं मनापासून कवतिक करावं.. अभ्यासू संशोधकाबरोबर इतिहासाच्या स्मृतीगंधात घमघमणा-या दुर्गावशेषांना समजून घ्यायचा प्रयत्न करावा..

असा संकल्प करायचाच काय तो अवकाश, अन् नेमकं सग्गळं सग्गळं जुळून आलं. आवतण आलं एका आगळ्यावेगळ्या दुर्गसंशोधन मोहीमेकरता. विशेष म्हणजे, या मोहिमेत दिग्गज दुर्गप्रेमी - ‘डोंगरयात्रा’कार आनंद पाळंदे आणि उष:प्रभा पागे यांचं मार्गदर्शन मिळणार होतं. त्यातंच बेत होता तोरण्यासारख्या ताकदीच्या दुर्गावरील अपरिचित स्थापत्य शोधण्याचा! त्यामुळे खरोखरंच ‘दुग्धशर्करायोग’ जुळून आलेला..

...संध्याकाळी ५:३०च्या दरम्यान वेल्हे गावाशेजारचा ओढा पार केला. त्यापुढची खडी चढण पार करून, कातळाच्या सपाटीवर पोहोचलो. इथवर येईस्तोवरच हाफहूफ झालं होतं. मावळतीकडे लगबगीनं धावणा-या सूर्यकिरणांपैकी काही उनाड किरणं अजूनही - तोरण्याचा कातळमाथा, डावीकडे सुसरीगत सुस्तावलेली झुंजारमाची आणि असंख्य डोंगरवळया यामध्ये रमली होती. जाणा-या आडव्या वळणाच्या वाटेनंतर, अरुंद धारेवर पहिला आणि शेवटचा मावळा यांनी एकमेकांना साद घातली. कारण आता वाट होती खडकावरील पायऱ्यांची अन् डगडगत्या कठड्याजवळची. दरीत वेल्ह्याचे दिवे लुकलुकू लागले होते. कड्याच्या पोटातला आडवा रस्ता पार केला. वेल्ह्यापासून तोरण्याच्या पहिल्या म्हणजेच ‘बिनीच्या दरवाज्या’ला पोहोचायला २.५ तास लागले होते. गड विलक्षण उंच. जेम्स डग्लसनी तोरण्याचं कौतुक केलंय, “If Sinhgad is Lion's Den, then Torna is 'Eagle's Nest’”. पुढचा ‘कोठीचा दरवाज्या’ची बांधणी बघून तर थक्क व्हायला होतं, कारण या उंचीवर तुफानी वारा, वादळं, बरसणारे मेघ यामध्ये हे सगळं स्थापत्य कसं शाबूत राहिलं, हाच प्रश्न पडतो. तटबंदीजवळच्या तोरणजाईचं दर्शन घेऊन, गडाच्या माथ्यावर ‘मेंगाई’ देवीच्या राऊळी आस-यास पोहोचलो..

..शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळातली इतिहासाची पानं उलटली, तर एक सोनेरी पान आहे तोरण्याचं! तीन-चारशे वर्षांच्या पारतंत्र्यातून तोरण्याची सुटका केली, अवघ्या १७ वर्षाच्या शिवबानं – ते ही रक्ताचा एक थेंबही न सांडता. हा आनंद लगेचंच द्विगुणीत झाला तोरण्यावर गवसलेल्या धनराशीमुळे. या राशीचा उपयोग करून राजांनी समोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर बांधून घेतला तालेवार ‘राजगड’! असे उत्कट क्षण अनुभवलेल्या तोरण्यावर आज मात्र नि:शब्द दिवस-रात्री, माजलेलं रान अन् पदोपदी ढासळलेले तट-अवशेष – इतकंच आहे. अर्थात तोरण्यानं जो काही तग धरलाय, तो केवळ शिवरायांच्या आठवणीच्या शिदोरीवरचं, हे मात्र नक्की!

बुधला माचीवर अपरिचित दुर्गावशेषांचा शोध
..दुस-या दिवशी सकाळी गड धुक्याच्या दुलईत गुरफटला होता. उन्हं चढायच्या आतंच गडावरच्या हरवलेल्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी, आम्ही नैरुत्येला ‘बुधला माची’कडे निघालो. आज विशेष आकर्षण होतं, ‘कापूर टाकं’ नावाच्या ‘गूढ’ टाक्याचा शोध!


‘कोकण दरवाजा’च्या ढासळू लागलेल्या बुरुजांपासून बाहेर पडलो, अन् समोर पसरलेला अवाढव्य बुधला माचीचा विस्तार सामोरा आला.


जुन्या काळात तेल साठवायला ‘बुधले’ असंत. माचीवरचा समोरचा सुळका तेलाच्या उपड्या ठेवलेल्या बुधल्यासारखा दिसतो, म्हणून त्याचं नाव ‘बुधला’. माचीवर विखुरलेले पुसट अवशेष शोधूनच काढावे लागतात... घसा-यावरून अन् दरीच्या काठावरून जाणा-या फसव्या वाटेनं जात, हत्तीमाळ बुरुज – तीन टाकी – वेताळ – चिणला दरवाजा - उजवीकडे वाळणजाई दरवाजा, वाळणजाई देवीचं ठाणं अन् पाण्याचं टाकं शोधून काढलं.


वाळणजाई दरवाज्यापासून ‘बुधला’ सुळका अन् त्यामागे ‘विशाळा’ नावाचं टेपाड कारवीच्या झुडपांमागे दिसत होते. कारवीतून वाट काढत परत वर बुधला सुळक्यापाशी चढलो. बुधल्याच्या मागील बाजूस पसरलेल्या माचीवर काही दुर्गावशेष आमची वाट बघत होते. बुधला सुळक्याला प्रदक्षिणा घालणं सोप्पं होतं, पण त्यापुढची वाट गच्च कारवी, घसारा, ढासळते दगड यामुळे बुजली होती.


मागं नजर टाकली, तर तोरण्याच्या बालेकिल्ल्यापासून आम्ही खूपंच दूर आलो होतो. आणि अर्थातच ज्याच्यासाठी इथंवर आलो, त्या दुर्लक्षित कापूर टाक्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो.

कापूरटाके.. नव्हे, कापूर ‘लेण्या’चा शोध
भोर संस्थान काळातील सेवेकरी श्री कोकाटे यांनी पाळंदेकाकांना या कापूर टाक्याबद्दल माहिती दिली होती, ‘बुधला माचीच्या उत्तर पोटात, विशाळा टेपाडाच्या उत्तरेला कापूरटाके शोधावं लागेल’. म्हणूनंच आम्ही सर्व तयारीनिशी शोधमोहिमेला आलेलो होतो. कुदळी-खुरपी वापरून कारवीचं झुडपांचं गचपण ढकलायचं, अन् घसा-यावर पाऊल ठेवण्यापुरतं पावठ्या बनवायच्या, असं कितीतरी वेळ झगडल्यावरही खरंतर गचपणाशिवाय आसपास काहीच दिसत नव्हतं.. आणि अखेरीस, उष:प्रभा पागेंच्या अनुभवी नजरेला मात्र ‘ते’ गवसले! ढासळणा-या उभ्या डोंगरउताराच्या पोटात एक कोरीव कपार दिसली. वाटलं, ‘अरे हे ‘ते’ टाकं? ‘कापूर टाकं’??’

दर्शनी भागात अगदीच थोडा कातीव भाग साधारण ३.५ मी. व २ मी. लांबी-रूंदीचा, पण जवळजवळ दगड-मातीनं गच्च भरलेला, कातळात आत आत कोरत नेलेला. आता मुळात टाकंच जिथे दिसेना, तर त्याचा आवाका विस्तार कसा आहे आणि इथं असं काय विशेष, याची काहीच कल्पना येईना. मग दोन-अडीच तास खपून, कुदळीनं टाक्याच्या मुखाजवळची माती-दगड उपसली अन् टाक्यात उतरायचा मार्ग खुला केला.


बुजलेल्या टाक्याच्या कपारीतून, कातळाच्या आत कोरत नेलेल्या भागात सरपटत उतरत गेलो. आजमितीला टाक्यात फक्त गाळ साचत गेला असला, तरी आत होतं थंड आणि गोड पाणी. कोरलेल्या कातळाखालूनंच डावीकडे चिखलातूनच सरकत गेलो, तर टाक्याचा आतल्या विस्ताराचा थोडाफार अंदाज येवू लागला.. इंग्रजी ‘एल’ आकाराच्या ह्या टाक्याची, लहान बाजू बाहेरून ४ मी आणि टाक्याच्या आतून ९ मी लांब आहे. ‘एल’ आकारातली मोठ्ठी बाजू बाहेरून १० मी आणि टाक्याच्या आतून १३ मी लांब आहे. उंची ३ मी आहे. कातळछताला आधारासाठी सुबक असे ५ कोरीव खांब कोरलेले दिसले. खांबांच्या ‘आरपार’ आधारतुळया वैशिष्ट्यपूर्ण अश्या उलट्या नागासारख्या होत्या. हे टाकं अश्या पद्धतीने का बांधले असेल, याबद्दल काहीच आडाखा बांधता येईना.. पुढं खूप संशोधनाअंती आनंद पाळंदे यांनी असा निष्कर्ष काढला, की हे केवळ नेहेमीसारखं पाण्याचं ‘टाकं’ नसून, तेराव्या शतकातील ‘शैव पंथीयांचं राहण्याचं ठिकाण’ – ‘लेणं’ असावं.
(संदर्भ पुस्तक: ‘दुर्ग तोरणा’, आनंद पाळंदे)

केलेलं खोदकाम बुजू नये याकरता खणलेल्या जागेवर आम्ही कारवीचे जाडजूड नि लांबच लांब बुंधे टाकले. आज आम्ही केलेलं काम ‘तोरण्या’च्या संवर्धनाकरता कार्य करणा-या ‘दुर्गरसिक’, ‘मराठी इतिहास मंडळ’ अन् ‘गिरीकुजन’ या संस्थांच्या कार्यास ‘हात’भार लागावा, म्हणून केले होते.

घोडेजिनाच्या बुरुजावरून सह्याद्रीचं विराट दर्शन
कापूरलेण्यापासून पुढे बुधला माचीच्या प्रदक्षिणेस निघून, कानंद खिंडीवर डोकावणा-या घोडेजिनाच्या बुरुजाशी पोहोचलो. समोर दूरवर डोंगररांगाच पसरल्या होत्या. मधुमकरंदगड आणि महाबळेश्वर तर ओळखता आलेच, पण त्याच्या उजवीकडच्या बुटक्या कावळ्यामुळं वरंधा घाटही ओळखू आला...आणि पश्चिमेकडे मढे घाट, उपांढ्याचा घाट, फडताळ-सिंगापूर-बोरोटा-बोचेघोळीच्या नाळांच्या जागा दिसल्या. कोकणदिवा शिखरांच्या दाटीतही लक्षवेधक होता. सह्यधारेवरून नजर फिरत ती अखेर स्थिरावली दुर्गदुर्गेश्वर रायगडावर! शेजारीच लिंगाण्याचे उत्ताल टोक स्वत:मध्येच हरवून गेले होते. एका आगळ्याच विश्वात गेलो...

सात मुखवटे शिल्प
(टीप: प्र.चि. कोणी काढले आहे, ते माहित नाही. बहुदा, आंतरजाल/ संदर्भ पुस्तक: ‘दुर्ग तोरणा’, आनंद पाळंदे)

कुदळ नि खुरप्यांनी वाट मोकळी करत, कड्याच्या काठाशी गंगालजाई नावाच्या तळ्यापाशी पोहोचलो. काठाशी एका खडकात - गंगालजाई देवतेचं ठाणं. सात कोरीव मूर्तींपैकी मध्यभागी मुकुटधारी मुख्य देवता आणि तिच्या डाव्या-उजव्या बाजूला तीन देवतांचे मुखवटे, खोदीव वेण्या दिसत होत्या. ह्या मूर्ती ‘सप्तमातृका’ असाव्यात की ‘साती आसरा’ (अप्सरा/ जलदेवता) असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे. मात्र ऐतिहासिक कागदपत्रात ‘श्री गंगालजाई’ देवतेच्या पूजेसाठी केलेल्या खर्चाची नोंद सापडली आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती नेमकी कोणत्या देवतेची, याबद्दल अजूनतरी खात्री नाही.

(संदर्भ पुस्तक: ‘दुर्ग तोरणा’, आनंद पाळंदे)

मेंगाई परिसरात खुपलेली गोष्ट
ऊन्हाचे चटके बसू लागले, तसं पाठपिशव्या लटकवून बालेकिल्ल्यात परतलो. खोकड टाक्याच्या थंडगार पाण्यानं तृप्त झालो. मेंगाईच्या देवळाजवळचे दिवाणखान्याचे अवशेष, वीरगळ, सतीशीळा व थडी पाहिली. मेंगाईच्या देवळाच्या आसपास पॉलिथिलीन पिशव्या, पत्र्याची रिकामी डबडी, कागद, प्लॅस्टीक, खरकटे अन्न असा रग्गड कचरा साचला होता. वाटलं, ‘ज्याप्रमाणे किल्ल्याला भेट देताना आपली निखळ सौंदर्याची अपेक्षा असते, तसाच इतरांसाठी स्वच्छ अन् पवित्र ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक ट्रेकरने का घेऊ नये..’.

चित्तवेधक झुंजारमल माचीची भ्रमंती
गडाच्या पूर्वभागात असलेली अत्यंत चित्तवेधक अशी झुंजारमल माची पाहण्यास निघालो.


गडावर जिथून प्रवेश करतो त्या कोठीदरवाज्यापासून झुंजारमल माचीपर्यंत व तेथून परत बालेकिल्ल्यापर्यंत गडाला तटबंदी आहे. हनुमान बुरुजापासून प्रथमच झुंजारमल माचीचं दर्शन झालं. तसंच पुढे गेल्यावर ढालकाठीच्या जागेपासून भेल बुरुजावर आलो, अन् झुंजारमल माची, मागचा ‘चिंबळा’ नावाचा उंचवटा आणि मागं दिसणा-या त्या दृश्यानं खुळावलोच!

खरोखरच, झुंजारमल माची दुर्गस्थापत्यशास्राची कमाल आहे. एका अरुंद चिंचोळ्या धारेवर बेलाग अशा या माचीत अस्सल मराठमोळं रांगडेपण अन बेडरपण दिसलं. झुंजारमाचीच्या उतरण्याची जुनी दिंडी कालांतरानं (बहुदा गुरं जाऊ नयेत म्हणून) चिणली आहे. नवी वाट अंमळ कठीणच आहे. हनुमान बुरुजाच्या अलीकडून तटावरून लोखंडी शिडीनं उतरून, बारीक वाटेनं दिंडीच्या भुयारी मार्गाच्या आपण येतो. इथून खालचा कडा पूर्वी दोरानंच उतरावा लागे. पण आता ‘दुर्गरसिक’ या संस्थेनं लोखंडी वायर लावून वाट जराशी सुघट केली आहे. काळजीपूर्वक माचीवर उतरलो. निसर्गानं मुळातच दुर्गम केलेली ही माची, अभेद्य तटबंदीनं अधिकच बेलाग बनली आहे. दर्या पाताळ्वेरी खोल गेलेल्या. नजरेच्या टप्प्यात ने येणार्या. पाहताक्षणी हृदयाचा ठोका चुकावा अशा तटबंदीच्या पोटातल्या दोन चोरदिंड्या बघितल्या अन् गडकर्त्यांच्या दूरदृष्टीला खरोखरीच दाद द्यावीशी वाटली..


मेंगाईच्या देवळाकडं परतताना, डाव्या हाताला सफेली बुरुज़, माळेचा बुरुज, फुटका बुरुज व लक्कडखाना लागला. तटा-तटावरून मेंगाईच्या देवळात आलो. सूर्यास्त होताना रायगडामागे दिनमणी गेला, तरी आकाशात बराच वेळ विविध रंग घुटमळत राहिले. चंद्र उजळला.

पढेर दांडाजवळ टेहेळणीच्या ‘विवरां’च्या शोधात
तोरण्याच्या शोधमोहीमेच्या शेवटच्या दिवशी एक अत्यंत मोलाचं स्थापत्य शोधायचं होतं. म्हणून पुन्हा एकदा बुधला माचीकडे निघालो. तीन टाक्यांपासून डावीकडे वळून, भगत दरवाज्यातून बाहेर पडलो.

‘भगत दरवाज्यातून बाहेर पडून, उजवीकडं गेल्यास कड्याच्या पोटात खोदीव विवरे आहेत.’ अशी माहिती भोर संस्थान काळातील सेवेकरी श्री कोकाटे यांनी पाळंदेकाकांना दिली होती. आणि हीच विवरे शोधण्याकरता भगत दरवाज्यातून ५० मी उतरून, पढेर दांडास डावीकडे ठेवून कातळकड्याच्या पोटातून चाललो होतो. समोर बुधला माचीच्या रडतोंडी बुरुजापासून निघालेली डोंगरधार थेट राजगडाच्या संजीवनी माचीला भिडली होती. (याच रांगेवरून अनेक ट्रेकर्स राजगड ते तोरणा ही ६-७ तासांची खडतर डोंगरयात्रा करतात.)


कुदळीच्या सहाय्याने कारवी बाजूला सारत, वाट काढत, पुढं होत होतो. तीव्र उताराचा पट्टा नि घसारा यामुळे चालणे अडचणीचं होतं, पण सुदैवानं वाट धोकादायक नव्हती. कुदळीनं छोट्या छोट्या पावठ्या बनवायच्या, आणि हंटर बुटांच्या टाचांनी पावठ्या दाबत पुढं सरकायचं, म्हणजे आधार मिळायचा असा एकंदर बेत! अक्षरश: ‘इंच इंच लढवू’ च्या आवेशानं पुढं सरकत होतो. भगत दरवाज्यानंतर, उजवीकडे आडवे जात दोन दांड पार केले होते. पण कातळाच्या पोटात काहीच मिळाले नव्हते. आता तिसरा दांड पार केला. समोर कातळात एक कपारीसारखा भाग दरडीवर दिसला. मी डावीकडे दरड चढून शोधत होतो, तोच आदित्य उजवीकडून ओरडला, ‘हे बघ, हे इथं विवर!’

समोरची दरड चढून सारेच वर गेलो, अन् अनपेक्षित सामोरं आलं. ‘अफलातून, वाह्!’ असे उद्गार निघत राहिले. आणि मानवनिर्मित विवर दृष्टीपथात आलं. प्रवेशद्वार जेमतेम १/२ मी. लांबी-उंचीचं होतं. काळ्याकुट्ट अंधारातून ८-१० मी सरपटत आत गेलो. जमिनीवर बारीक रेती होती. डोक्यावरचा छताचा कातळ जमिनीपासून जेमतेम १ मी. असेल. विवरात डावीकडं नि उजवीकडे खोल्या होत्या. वटवाघळांच्या कुबट वासानं मात्र अगदी नकोसं झालं. त्यामुळे बाहेर स्वच्छ हवेत ताजेतवाने अन मोकळे वाटले. पुढं आणखी एक दांड ओलांडल्यावर, आणखी दोन कोरीव विवरं मिळाली. उजवीकडचं विवर आधीसारखंच, पण डावीकडल्या विवरात चक्क थंडगार पाणी मिळालं - अगदी फ्रिझच्या पाण्यालाही सर येऊ नये असं! थंडगार पाण्यानं मरगळलेल्या गात्रांना संजीवनी मिळाली. पाळंदेकाकांना विचारलं, ‘या विवरांचं प्रयोजन काय असावं?’ ते म्हणाले, ‘ही विवरं, म्हणजे गडाच्या संरक्षणासाठीच्या चौक्या असणार.. कड्याच्या पोटातली जागा निवडून ही विवरं खोदली आहेत. सोबत पाण्याचीही सोय केली आहे...’

तोरण्याबरोबर जडलेलं अनोखं मैत्र
बालेकिल्ल्यात परतून, श्री मेंगाईच्या पायी पडून मोहिमेची सांगता केली. तोरण्यानं आमची परीक्षा बघितली, पण आमच्या दुर्गप्रेमाची खात्री पटल्यावर खास दडवलेल्या सग्गळ्या वास्तू उलगडून दाखवल्या. वेल्ह्यातून निघताना पाय जड झाले. सहजच मागं वळून पाहिलं, तर आभाळात घुसलेला तोरणा कणखर तरीही ओळखीचा वाटला. त्याचं प्रचंडपण, कठीणपण, रांगडेपण, बेडरपण, राकटपण, मर्दानीपण-लोभस वाटत होते. त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांच्या अंतरीचा -मृदुपणाचा निर्झर खळाळताना जाणवत होता...आणि याच संजीवनीनं पुन:पुन्हा ‘तोरण्याकडे मी खेचला जाईन हे निश्चित होतं!!!

- Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)

महत्वाच्या नोंदी:
१. भटकंतीचा हा अनुभव मे १९९६ सालचा आहे. दुर्दैवानं खूपंच कमी प्रकाशचित्रे उपलब्ध आहेत.
२.वर्णन केलेली तोरण्यावरची ठिकाणं बघायला, उन्हाळ्यात गवत व गचपण कमी झाल्यावर, २-३ दिवसांची मोहिमंच काढावी लागेल. अनेक ठिकाणं सापडायला अवघड आहेत. सोबत भरपूर पाणी व वाटा बनवायला खुरपी/ चाकू घेतलेला बरा.


4 comments:

  1. Replies
    1. ब्लॉगवर स्वागत!
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  2. Hi Saiprakash,

    I like to read your blogs specially those written on "Search of caves".
    Yesterday I was on a trek with my friend for Siddhagad fort(Murbad). we started our ascent from Borwadi village. After reaching siddhagad village on Plateau of siddhagad, we went to ganesh temple where old cannon was placed. Then we started our trek for Ballekilla, we came across big Water tank, Huge cave(lena) 15ft*15ft and three tunnels (Vivar). All these structures were on same height with some distance between them. The opening of the tunnel next to the water tank is closed with mud, the other two are accessible. Just above the third tunnel are 15-20 carved steps for ascending after which the way is full of loose soil, due to which we abandoned the ascent. We crawled inside the tunnel for 20ft, after which there was a slight turn on left and then turning to right. we didn't go further as the way ahead was full of Bats and there waste, mainly the floor was not dry further. I have hear of the Baba's cave but I didn,t find it on my way. Then we came down, while going to Siddhawadi I saw 2 boys in front of cave entrance in middle of the mountain and then I realized that we went on wrong way.The place where we have went was on left side of Baba's cave and little higher. I have read your blog on Siddhagad, but these structures were not mentioned in it, not even I found any reference on web. The villagers are familiar with it. I think the tunnels must be interconnected, I would like to know if you have any information on this.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार ट्रेकर दोस्ता!
      तुम्हांला जुन्या अनघड जागांच्या भटकंतीचे ब्लॉग्ज आवडले, हे वाचून आनंद झाला.
      सिद्धगडवरच्या लेणी-विवारांबाबत भन्नाट माहिती लिहिलीये, जी मला माहिती नव्हती.
      तुम्ही नाव न लिहिल्याने संपर्क करता येत नाही.

      Delete