Pages

Tuesday, 25 March 2014

घोरवडेश्वर:: प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'



… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी!!!


घोरवडेश्वरला जाण्यासाठी पुणे-लोणावळे लोहमार्गावरील बेगडेवाडी (शेलारवाडी) स्थानकापाशी उतरायचं, किंवा पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाट्याच्या टोलनाक्याच्या अलिकडे  दोनेक कि.मी. वर घोरवडेश्वरचा पायथा गाठायचा. ’गारोडी’, ’गरोडी’ किंवा 'शेलारवाडी लेणी' या नावाने देखील ओळखला जाणारा हा डोंगर. दक्षिणेला पायथ्यापासून १५० मी.(५०० फूट) उठावलेल्या डोंगरमाथ्यावर झेंडा फडकताना दिसतो. डावीकडे उंच टेपाड अन उजवीकडे जरा बुटकं टेपाड अश्या जोडशिखरांचा हा डोंगर म्हणजेच आपलं गन्तव्य.


वाटेवरून दिसतो मस्त नजारा..
माथ्यावर पोहोचायला आपापल्या आवडीनुसार २-३ वाटा आहेत. काहींना कमानीतून द्वारपाल नंदीमहाराजांच्या आज्ञेने चढणारा पायर्‍यांचा सोपान रुचतो. तर काहींना थेट खिंडीचा रोख धरून पाऊलवाट तुडवायला आवडतं. गिर्यारोहकांच्या सरावाचे कातळ अन अर्धवट खोदलेल्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूनं झाडीतून उभी वाट चढते. तर बहुतेकांना अमरजाईच्या देवळाअलीकडची धोपट वाट बरी वाटते. निसर्गमित्र संस्थेच्या प्रयत्नामुळे थोडकी झाडं जगली आहेत. जमलं तर माथ्याजवळच्या झाडांसाठी पाण्याचा एखाद कॅन घेऊन चढू लागायचं. खुणेच्या पिंप्रीच्या झाडाजवळून वीस-पंचवीस मिनिटांत आपण माथा गाठतो.


माथ्यावरून सभोवतालच्या परिसराचा अप्रतिम नजारा दिसतो.

पश्चिमेला बघताना इंद्रायणी अन पवना नद्यांच्या खो-यांना विभागणा-या डोंगररांगेतले दिग्गज लोहगड-विसापूर-भातराशी-तळेगावचा CRPF चा डोंगर लक्ष वेधतात.


हीच रांग पुढे घोरवडेश्वर, देहूरोडची अय्यप्पा टेकडी अन निगडीची दुर्गा टेकडी असे पल्ले गाठते. वायव्येला कुंडेश्वर - तासूबाई शिखरं,  उत्तरेला भंडारा - भामचंद्र लेणी, तर दक्षिणेला पुरंदर - कानिफनाथ - सिंहगड - राजगड - तोरणा असे तालेवार डोंगर खुणावतात.


ऋतूचक्राची कमाल..
घोरवडेश्वरच्या डोंगराचं रुपडं खरं पालटतं ते मॉन्सूनच्या आगमनानंतर. कळाकळा आग ओकणा-या सूर्यनारायणाच्या दाहातून आसमंताची सुटका झालेली असते. एरवी उंच आभाळात भाव खाणारे ढग आता मात्र घोरवडेश्वरच्या माथ्याला ढुशा देवू लागतात. वाटतं - एखाद्या ढगाच्या पुंजक्यावर आरूढ होऊन विहंगासम मुक्तपणे विहरावं...


उजाड, ओसाड, ओका-बोका दिसणारा अवघा डोंगर हिरवागार होतो. झर्‍यां-ओढ्यांतून, नदी-नाल्यांतून ’पर्जन्य-चैतन्य’ खळाळत सुटतं. वृक्ष-लता, पशु-विहंग अवघे आनंदतात. पावसाचा 'संजीवनी’ स्पर्श झाला, की उन्हामुळे अन वणव्यानं रापलेल्या कांतीची ’कात’ टाकून देऊन डोंगरउतार रोमारोमांतून फुलू लागतात.

प्राचीन घाटवाट-दुर्ग-लेणी अश्या पाऊलखुणा शोधताना.. 
हा डोंगर श्री घोरवडेश्वराच्या देवस्थानामुळे सुपरिचित असला, तरी ही मुळात हिनयान बौद्ध लेणी (म्हणजे मूर्तीपूजेऐवजी बुद्धाची चिन्हरूपाने पूजा करणा-यांची) आहेत. नालासोपारा सारख्या प्राचीन बंदराकडून कोकणपट्टी पार करून पांथस्थ कोंडाणे लेण्यात विश्रांती घेत असतील. द्वारपाल राजमाची किल्ल्याच्या परवानगीनं कोकण दरवाजा किंवा बोरघाटाने घाटमाथा गाठून कार्ले-भाजे-बेडसे अश्या निसर्गरम्य लेण्यात मुक्काम करत असतील. लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना अश्या दुर्गाचं संरक्षण असल्याने व्यापार अन धर्मप्रचारात अडथळा येत नसेल. पुण्याच्या दिशेनं प्रवास करताना घोरवडेश्वर-भंडारा-भामचंद्र अशी बौद्ध लेणी दिमतीला असतील... प्राचीन काळच्या व्यापारी वाटा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात दुर्ग आणि पांथस्थांच्या विश्रांतीसाठी अन धर्मप्रचारासाठी खोदलेली कातळकोरीव लेणी अश्या नेहमीच्या ’घाटवाट-दुर्ग-लेणी’ जोड्या शोधताना मजा वाटते.




हीनयान बौद्ध लेण्यांचं वैभव..
खिंडीच्या पूर्वेला (डावीकडे) वळल्यावर दोन विहार आहेत.


कातळात कोरलेल्या विठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती आपण ओळखतो. पायापाशी नव्याने ठेवली आहे तुकोबारायांच्या सुबक मूर्ती.


या विहाराच्या वरील बाजूस पावठ्या अजून एका दुर्गम विहारापाशी नेतात.


खिंडीत पुरातत्व खात्याच्या निळ्या फलकापासून पुढं सरकलं की सामोरं येतं एक अप्रतिम निसर्गदृश्य! भन्नाट वार्‍यानं मन मोहरून जातं. अगदी क्षितिजापर्यंत नजर जाते. खालची छोटी छोटी शेतं, नाजूक, अवखळ निर्झर, गर्द झाडोरा सारं सारं डोळे भरून पाहावं नि तृप्त व्हावं. सारा परिसर हिरवागार झालेला. धबधबे, कधी धुके नि हिरवा गालिचा…

पलीकडच्या दरीचं सौंदर्य देहभान हरपून पाहिलं की हलकेच पावलं पुढे पडतात. डोंगरातील कातळ मन मोहवतो. 

खिंडीतून पश्चिमेला (उजवीकडे) गेल्यावर कातळात थोड्या उंचावर दोन विहार अन कोरीव कोनाडे दिसतात. पाण्याच्या पोढी (टाके) पासून आपण येतो मुख्य चैत्यगृहापाशी पोहोचतो. लेण्यांचा दर्शनी भाग कोसळल्यामुळे, बाहेरून जाड भिंत बांधली आहे.


हे शैलगृह प्रशस्त आयताकृती आहे. जमीन समतल आहे. पूर्वीच्या ’दागोबा’च्या जागी उत्तर काळात ’श्री घोरवडेश्वरा’ची स्थापना करण्यात आली आहे. शैलगृहात ७ खोल्या असून डावीकडील एका खोलीच्या दारावरील ब्राम्ही शिलालेखानुसार, ‘धेनुकाकट’ या वसाहतीतील इसमाने हे लेणे खोदवले. कार्ले येथील लेखांमध्येदेखील असाच उल्लेख आढळतो. ’धेनुकाकट’ हे लेणी समूहाच्या परिसरातील बौद्ध-ग्रीक व्यापार्‍यांच्या तत्कालीन वसाहतींचे नाव होते, असे अनुमान काढतात.
(संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)

’श्री घोरवडेश्वरा’च्या अंधार्‍या देवालयात (शैलगृहात) आता वीज आली आहे. इथलं देवस्थान जागृत मानतात. महाशिवरात्रीच्या उत्सवास खूपच गर्दी असते.


बाहेर विसावलो की चाफ्याचं झाड व टपोरी फुलं श्रमपरिहार करतात. पुढील लेण्यांकडे वळावं तो कातळावरची निसटती वाट पुढे झुडुपांतून ठळक होत जाते. पाण्याची दोन टाकी व एक निवासी विहार पाहून, आपण येऊन थबकतो कातळ-कोरीव पावठ्यांपाशी! थोडक्या अवघड वाटेनं सरळ गेलं, तर पायथ्याचं टाकं अन कातळाआड दडलेला भन्नाट विहार थक्क करतो. अफलातून जागा!!!


मागं फिरलो, की उभ्या कातळावरील पावठ्या वरील अंगाच्या लेण्यांपाशी घेऊन जातात. या वाटेवर पावसाळ्यात पाणी व शेवाळे असल्याने, पर्यटकांनी जपून जावे.


सामोरं येतं आणखी एक महत्त्वाचे कातळकोरीव सभागृह. शैलगृहाबाहेर नंदी, तुळशीवृंदावन व दीपस्तंभाची स्थापना करण्यात आली आहे


या समतल शैलगृहात एकूण चार खोल्या आहेत. हे देखील आयताकृती शैलगृह आहे. दर्शनी भागातील म्हणजे डावीकडून तिसर्‍या खोलीत ’श्री घोरवडेश्वरा’चेच स्थान आहे. 


या खोलीच्या दाराजवळ व पायापाशी असे ब्राह्मी लिपीतील लेख आहेत.  (या लेखाचा उजवीकडील भाग नव्या लोखंडी दरवाज्याच्या सिमेंटमुळे लुप्त पावला आहे.) ‘(शके) १३६१ सिद्धार्थी संवत्सरे श्रावण शुद्ध’ या लेखात इ.स. १४३९ (१५ वे शतक) मध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला जेंव्हा या लेण्यांचे ‘रुपांतर’ करण्यात आले, त्याचा उल्लेख आहे. (संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)
खांबविरहीत या शैलगृहाला खोल्यांच्या भिंतीवर कोरलेल्या अर्धअष्टकोनी स्तंभांच्या जोड्यांवरील कोरीव-खोदीव, ओबड-धोबड हत्ती व सिंहांनी पेलले आहे. (येथे अजिंठा किंवा अंकाई लेण्यांमधील शिल्पं आठवतात.) स्तंभांचे पाय जलकोशासारखे आहेत.
लेणी पाहून, सरळ जाणा-या पायवाटेने पुढं उतरून खिंडीत पोहोचता येतं. डोंगरावर पूर्वेला दुर्गम जागी एक विहार पहायला चांगलीच खटपट करून पोहोचावे लागते.


पश्चिम डोंगरावर एक, वायव्य उतारावर एक गुहाटाके, उत्तर उतारावर एक, माथ्यावर एक, पश्चिम उतारावर एक आणि पूर्वेकडे दोन अशी विपुल टाकी आढळतात.

-------------------------------
हल्लीच सापडलेली घोरवडेश्वरची अग्निजन्य गुहा (Lava Cave)
टाईम्समध्ये मध्यंतरी बातमी आलेली, की घोरवडेश्वरला एक अग्निजन्य गुहा सापडलीये आणि निखील पवार, आमोद काटीकर, सुधा वद्दाडी, सुमित्रा शिंदे, शरद राजगुरू, सचिन जोशी, संजय एकसंबेकर यांनी या गुहेचं संशोधन केलंय. (मूळ शोधनिबंध इथे.)

पण, ही गुहा नक्की कुठे याची काहीच माहिती उपलब्ध नव्हती. मग, अमेय आणि मी परवा शोधत जाऊन या गुहेला भेट देवून आलो.

पोहोचायचं कसं: बेगडेवाडीच्या बाजूने घोरवडेश्वरच्या माथ्यावर चढून, एकदम पल्याडच्या (दक्षिण टोकाला) पोहोचायचं. उजवीकडे गहुंजे गावाकडे उतरणाऱ्या मळलेल्या वाटेवर ५० फूट उंची उतरली, की एक छोटी पाऊलवाट डोंगरमाथ्यापासून उतरणाऱ्या घळीकडे/ बेचक्याकडे निघते. २ मिनिटात डावीकडे गुहा नजरेसमोर येते.


स्थानवर्णन: उभ्या कातळाच्या पोटातल्या गुहेत शिरल्यावर उजवीकडे अग्निजन्य गुहेची पोकळी २० मी लांब, १.५ मी उंच आणि ३ मी रुंद पसरलीये. आत एखादा प्राणी नाही ना यासाठी आवाज टाकून विजेरी घेऊन प्रवेश केला. ६.६ कोटी वर्षे जुनी असलेली ही गुहा.  पायापाशी ओलावा असलेली माती. वाकून चालत गेल्यावर गुहा आत शिरत गेल्यावर चिंचोळी होत जाते.
             

           

             

               

                 

               

               

                   



कशी बनली ही गुहा: लाव्हारस प्रवाह वाहताना थंडावताना कधी एखादी लांब पोकळी राहून गेलेली असते. कालांतराने डोंगरउतारावरची माती धुपून जाणं आणि वाहत्या पाण्यामुळे अशी एखादी विवर-गुहा दृष्टीक्षेपात पडू लागते. सह्याद्रीतल्या अग्निजन्य बेसॉल्ट खडकात अशी विवरे विपुल आढळतात.

----------------------------------


असे हे अप्रतिम ठिकाण घोरवडेश्वर - ‘लेणे’ म्हणून अपरिचित आहे. येणारे लोक ‘श्री घोरवडेश्वरा’चे दर्शन घेतात, पण लेणी मात्र दुर्लक्षित करतात. पुणे परिसरात चतु:शृंगी डोंगर, पाताळेश्वर, भंडारा डोंगर, येरवडा (गांधी स्मारक) येथील साधी शैलगृहे अभ्यासकांसोबत पर्यटकांनीही पाहिली पाहिजेत. कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांप्रमाणे येथे उत्तुंग कृती नसेल कदाचित. पण प्राचीन अन् प्रेक्षणीय म्हणून या लेण्यांचे महत्त्व कुठेच कमी नाही.
                     
प्राचीन लेण्याशी जडलेलं 'मैत्र'
इथे जायला निमित्त लागत नाही, ऋतू-काळ-वेळेचं गणित सांभाळायची गरज नाही...

…कधी उल्कापात बघायला माथ्यावरच्या कातळावर रात्र काढायची..
…कधी सलग रोज कित्येक दिवस घोरवडेश्वरला गेलो, तर ठराविक आडवळणावर तोच तो रानससा दचकून धूम ठोकायचा…
.. कधी सभोवतालच्या परीसरातल्या बदलांची भीती वाटते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, दुपदरी मुंबई हायवे, लष्करी तळामध्ये छात्रांच्या इमारती, बिर्ला शाळा, तळेगावच्या इमारती, सोमाटणे फाट्यावरची विशाल गणेशमूर्ती अन टोलनाका, गहुंजेचं क्रिकेट स्टेडीयम, हिंजवडीचं आय. टी. पार्क अशी आसपास गर्दीच गर्दी…
…टळटळीत उन्हात माथ्यावरच्या करवंदीच्या जाळीत हिरवीगार करवंदं दाटलेली. रोज फक्त एकंच टप्पोरं करवंद पिकायचं.  मोठ्ठ्या कवतिकानं त्या एकाच करवंदाचा आस्वाद घ्यायचा..
.. कधी महाशिवरात्रीनंतरचा  बेताल कचरा, तर प्रेमी युगुलांचा सुळसुळाट त्रस्त करतो..
…कधी करियरसाठी कित्येक महिने लांब जाताना, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून घोरवडेश्वरला 'अलविदा, फिर मिलेंगे' करायचं…
.. कधी उन्हाळ्यात एखाद्या वणव्याने आख्खा डोंगर करपताना विलक्षण हळहळ वाटते..
…कधी इंजिनीयरींच्या पी.ल.मध्ये माथ्यापल्याडच्या टाक्याजवळ सतरंजी पसरून अभ्यासात बुडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण निस्तब्ध शांततेची भीती वाटून गाशा गुंडाळून तडक निघालो… 
.. कधी एका साहसवीराने लेण्यांपर्यंत बाईक चढवलेली आठवते.
…कधी आईनं बांधून दिलेले दोन घास दोस्तांबरोबर खायचे, अन फालतू जोक्सवर खिदळत बसायचं..
… कधी सामोरी येते समृद्ध वसुंधरा - आपल्या उदरी दडवलेल्या बीजांमधून नवीन जग साकारणारी..

दोस्तांबरोबर अन जिवलगांबरोबर घालवलेल्या अश्या कित्येक कित्येक क्षणांची, साध्या-सोप्या आठवणींची हुरहूर आता मनात रुंजी घालत राहते.




खरंच, या डोंगराशी काहीतरी अनोखं 'मैत्र' जुळलंय!!!


---------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. काही छायाचित्रे: अमेय जोशी
२. भौगोलिक स्थान: लिंक
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
५. अग्निजन्य गुहा शोधण्यासाठी या ब्लॉगची मदत झाली. धन्यवाद!!!
६. ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

15 comments:

  1. Apratim Sumit,... lokancha Ghorwadeshwar kade pahanyacha drushtikon agadi maafak asel, pan tu Ghorwadeshwar cha he asa assal nisarga saundarya dakhaun tyanchya drushtikon tu badalshil he nakki... Baki, Sahyadrichya lahaan sahaan dongar mathyanwarcha tuza titakach prem afalaatun...tyabaddal tula salaam!!... Photos kaatil aahet....mast...

    ReplyDelete
    Replies
    1. फारूक, सह्याद्री भटकंती खरंतर आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे.
      काळाच्या ओघात 'सो-कॉल्ड' विकासाच्या तडाख्यापुढे सह्याद्री टिकून राहो..
      सह्याद्री कसदार अनुभव देत राहो…
      दोस्तांसोबत भटकायच्या धम्माल संधी जुळून येत राहोत, अशी इच्छा!!!
      खूप खूप धन्यवाद :) :)

      Delete
  2. अगदीच अफाट लेख… परिपूर्ण माहिती आणि झकास फोटोज… खास करून घोरावडेश्वर हून सिंहगडाचा फोटो तर लाजवाब…
    Map वरचं अचूक Marking बघितल्यावर… तुझ्या घोरावडेश्वरच्या आत्तापर्यंत किती फेऱ्या झाल्या असतील ह्याचा अंदाज येतो… ब्लॉग-पोस्ट "टायटल" खऱ्या अर्थाने योग्य टाकलंस…
    मागच्याच आठवड्याच्या आठवणी ताज्या झाल्या…
    खरंच पुन्हा पुन्हा जावंसं वाटतंय… अर्थात वेगवेगळ्या ऋतूत… पुन्हा घेऊन चला आम्हाला…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:

      एक्स्पर्टची दाद मोलाची!!! :)

      अरे, घोरवडेश्वर आमच्या रुटीनमध्ये इतकं भिनलंय, की एखाद्या मित्राला भेटायचं तर हॉटेलमध्ये न भेटता पटकन वीकेंडला घोरवडेश्वरला भेटायचं ठरतं.

      तू इतक्या दिग्गज ट्रेकर्सना आमच्या घोरवडेश्वरला आवर्जून घेऊन आलास… बारकाईनं आणि रसिकतेनं दाद दिलीस (विशेषत: त्या २-३ अनवट विहारांना), याचा आनंद मोठ्ठा आहे.

      खूप खूप धनुर्वाद!!!

      Delete
  3. Sai mast re ... mi ghoradeshwar la ek donda geloy pan aata ha blog vachlyawar kaltay ki khup kahi baghyche rahilay ... tuja barobar ghoradeshwar tar nakki awadel ... kadhi bolawtoys ... aani ho nantar newalechi jaal misal nakki bar ka

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत:
      खूप धन्यवाद :) :)
      अरे, अग्गदी कधीही ठरवूयात घोरवडेश्वर + नेवाळे.. :)
      पींग कर कधीपण… मी आठवड्यातून एकदा जातोच.

      Delete
  4. मस्तच लेख. फोटोही तितकेच सुंदर. शेवटचं मुक्तक आवडलं

    ReplyDelete
    Replies
    1. अपर्णा,
      ब्लॉगवर स्वागत...
      खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून...
      धन्यवाद! :)

      Delete
  5. वाह यार,

    तुझा नवीन काहीच लेख नसल्याने (टोमणा .. अस्सल मराठमोळा )या लेखाकडे पुन्हा आलो. पण लेख पुन:पुन्हा वाचण्यासारखा अन बघण्यासारखा.. डोंगरावरच्या टाक्या सारखा .. घोरवडेश्वर खरच अति परिचयात अवज्ञा या ओळीचं उदाहरण .. पुन:पुन्हा पाहण्यासारखं .. एकदा जाऊ या .. आम्हा येरूंना सुद्धा दाखवा हे सारे ..

    ReplyDelete
    Replies
    1. अनिकेत,
      खूप मस्त वाटतं तुझ्या प्रतिक्रिया वाचून..
      (गेल्या एका महिन्यात नवीन ब्लॉग स्फुरला नाहीये, हे खरंय!)
      वर्षानुवर्षे या डोंगरावर जाताना - त्या त्या वेळच्या priorities मुळे मनात घोळणारे विचार आणि सोबत येणारे दोस्त यामुळे नुसत्या डोंगर भटकंतीपलीकडे काही तरी मैत्र जुळलंय...
      चला जायचं का या वीकेंडला... तुमच्यासाठी कायपन, कधीपन...

      Delete
  6. Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

    Giaonhan247 chuyên dịch vụ mua vòng tay pandora từ dịch vụ order hàng mỹ hay nhận mua nước hoa pháp từ website nổi tiếng hàng đầu nước Mỹ mua hàng ebay ship về VN uy tín, giá rẻ.

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लेख आहे आपण वस्तूनिष्ठ माहिती जशास तसे सांगितले आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपला सुंदर अनुभव आहे आपण व्यक्त केला आहे गेली बारा वर्षापासून मी दररोज या डोंगरावर येत असतो आपण केलेले घोरावडेश्वर डोंगर याचे वर्णन अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  8. खूप सुंदर लेख आहे आपण वस्तूनिष्ठ माहिती जशास तसे सांगितले आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपला सुंदर अनुभव आहे आपण व्यक्त केला आहे गेली बारा वर्षापासून मी दररोज या डोंगरावर येत असतो आपण केलेले घोरावडेश्वर डोंगर याचे वर्णन अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete
  9. खूप सुंदर लेख आहे आपण वस्तूनिष्ठ माहिती जशास तसे सांगितले आहे प्रत्येक ऋतूमध्ये आपला सुंदर अनुभव आहे आपण व्यक्त केला आहे गेली बारा वर्षापासून मी दररोज या डोंगरावर येत असतो आपण केलेले घोरावडेश्वर डोंगर याचे वर्णन अप्रतिम आहे. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete