Pages

Friday, 4 April 2014

आडदांड - नाणदांड

खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह



दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)

खरं सांगू, आम्हां ट्रेकर्सच्या मनातसुद्धा असाच एक ‘जिप्सी’ खोलवर दडलेला असतो. एरवी पोटापाण्यासाठी ‘नस्त्या उठाठेवी’ करतानाही, ‘सख्या सह्याद्री’ची ओढ स्वस्थ बसू देत नाही. अन्, कोणे एके दिवशी - वळणवेड्या रानवाटांची, रानफुलांच्या घमघमाटाची, रौद्र कातळभिंतींची, भारावून टाकणा-या दुर्गरचनेची, तंगडतोड माळरानांची, पूर्वजांच्या उत्तुंग कर्तृत्वाची गाथा सांगणा-या कोरीव लेण्यांची, कुण्या पाखरांच्या मोहक शीळांची, दाट अंधाऱ्या रानव्याची – ‘रानभूल’ मनी दाटून येते... गेल्या आठवड्यात असंच काहीसं झालं, अन् बेत शिजू लागला सह्याद्रीच्या आडवाटांच्या ट्रेकचा...

...‘फार दिवस ट्रेकला जाऊ दिलं नाही, तर या प्राण्याला (अस्मादिकांना) आवरणं मुश्कील होतं’, हे ऑफिसमधल्या अन् घरातल्या बॉसनी भोगलेलं असल्यानं ट्रेकसाठी सुट्टी लग्गेच मंजूर झाली. बहुतांशी ट्रेकर दोस्त संसारी कामांमध्ये अडकल्याने एकटा मिलिंद या ट्रेकला येऊ शकणार होता. छोट्या तुकडीनं भटकंती करण्याचे संभाव्य धोके गृहीत धरले. ट्रेकमध्ये पायथा – मध्य – शेवट अश्या ठिकाणी पाणी अन् वस्ती असेल, पण सह्याद्रीची अफलातून दृश्यं अन् तंगडतोड चाल असेल, अश्या अटी लादून घेतल्या. संदर्भपुस्तकं – गुगल मॅप्स - करायच्या ट्रेक्सची यादी यांचं रवंथ केल्यावर ट्रेक कुठल्या भागात अन् कसा असावा, हे हळूहळू स्पष्ट होवू लागलं.

लोणावळ्याच्या दक्षिणेला तेलबैला – घनगड – सुधागड असे नितांतसुंदर अन् ट्रेकर-प्रिय दुर्ग आहेत. या मुलुखात तथाकथित विकासाच्या रेट्यामुळे निसर्गाला ओरबाडून उभारलेली खाजगी पर्यटनस्थळे आली, अन् इथली दुर्गमता हरवू लागली. असं असलं, या मुलुखातल्या पायथ्याची कोकणपट्टी अन् सह्याद्रीच्या घाटमाथ्याला जोडणा-या काही जुन्या ‘घाटवाटा’ (दुर्गम पाऊलवाटा. डांबरी रस्ते नव्हेत) ट्रेकचा रसदार अनुभव देणार, या विश्वासावर आम्ही कूच केलं.

काळाच्या ओघात हरवलेली सह्याद्रीच्या कुशीतली ‘खडसांबळे लेणी’
भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत खोपोली – पाली रस्त्यावर आमची कार दौडत होती. तेजोनिधि लोहगोल गगनराज भास्कराच्या दिव्य तेजाने दूरवर तेलबैल्याच्या जुळ्या भिंती झगमगत होत्या.
ठाकूरवाडीपाशी पाठीवर सॅक चढवल्या. १०० मी उतरून खडसांबळे गावाजवळ नदी पार करून मागं वळून बघितलं, अन् थबकलोच.. उत्तरेला जवळच सुधागडच्या पहाडाशी लगट करत खोलवर धावलेली सह्याद्रीची मुख्य रांग, अन् पाठीमागच्या चिंचोळ्या खो-यात उठवलेल्या तेलबैल्याच्या खड्या कातळभिंती – असं देखणं दृश्य!

खडसांबळे गावापासून पाऊणेक तास अंतरावर लेणी लपली आहेत. थोडक्या चढाईनंतर पदरातून आडवं गेलो. उजवीकडे उतरणा-या डोंगरसोंडेला वळसा घालून पल्याड जंगलात कुठेतरी लेणी कोरली असणार होती. दिशाशोधनाचे फंडे वापरत, घनगडकडे जाणा-या नाळीच्या वाटेची दिशा डावीकडे सोडली.

ओढ्याच्या पात्रापलीकडे शेकडों फुलांनी घमघमणां-या करवंदीच्या जाळ्या होत्या. कधी बघितल्या नसतील, इतक्या १५ फूट उंचीच्या.

वैराण माळावरची आडवी वाट तुडवत सोंडेला वळसा घालून दाट रानात शिरलो. अखेरीस उभ्या कड्याच्या पोटात लेण्याची जागा दिसली. झाडो-यातून सूर्याची कोवळी किरणं अलगद उतरत होती.

इ.स. पूर्व दुस-या शतकात खोदलेले हे लेणं हीनयान बौद्ध शैलीतले (बुद्धाची पूजा ‘स्तूप’ चिन्हरुपाने करणारे) आहे. काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी मुंबई मराठी मिशनचे रेव्हरंड अॅबट यांनी १८८९ साली शोधून काढली. खडसांबळे लेण्यांना ‘पांडवलेणी’ किंवा पायथ्याच्या गावच्या नावावरून ‘नेणावलीची लेणी’ अश्या नावानी देखील ओळखतात. कातळात कोरून काढलेल्या प्रशस्त दालनात २१ विहार अन् एक स्तूप आहे. या लेण्याच्या पश्चिमेला अर्ध्या किमी अंतरावर दुर्गम जागी अजून १० विहार आहेत.
(संदर्भ: सांगाती सह्याद्रीचा)

लाल मुरुमाच्या स्तरात कोरल्या असल्याने लेणी फारंच भग्नावस्थेत आहेत आणि खोदाईची सफाई साधी आहे.
एखादं कोरीव पाण्याचं टाकं दिसलं खरं, पण साधारणत: अन्य लेण्यांमध्ये दिसणारी पाण्यानं भरलेली टाकी किंवा शिलालेख असंही काही दिसेना. कातळाची योग्य पत नसल्याने अन् पाण्याच्या अभावाने या लेण्या किती वापरल्या गेल्या असतील यात शंका वाटली.

म्हणून, कालांतराने कोरलेली भाजे - कार्ले अशी लेणी उंचावर कातळाची योग्य पत निवडून खोदली असावीत. लेण्यांच्या तोंडापाशी दगडांचा खच पडलेला.

बेचक्यात असल्यानं वारं नाही. अख्ख्या दालनात वटवाघळाच्या विष्ठेचा सडा पडलेला. त्यामुळे मुक्कामाचा बेत आखायला अयोग्य ठिकाण. पण, पुढची काही शतकं सह्याद्रीत लेणी खोदण्याचा जो भव्य उपक्रम चालू राहिला, त्यातला पहिल्या काही प्रयोगांपैकी एक - म्हणून इतक्या आडवाटेला जाऊन आम्ही ही लेणी धुंडाळली अन् खडसांबळे गावात परतलो.

तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अफाट दर्शन घडवणा-या ‘नाणदांड घाटा’ची चढाई
प्राचीन बंदर चौलपासून सह्याद्री घाटमाथ्यावर चढणा-या जुन्या घाटवाटांपैकी तीन व्यापारी घाटवाटा - नाणदांड घाट, नाळेची वाट अन् घोणदांड घाट या खो-यात आहेत, तर त्यांचे संरक्षक दुर्ग कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला अन् घनगड असे दिग्गज. सर्वात जलद चढणारी अन् वापरातली असली, तरी ‘नाळेची वाट’ चिंचोळ्या झाडीभरल्या घळीतून चढताना घामटं काढतो.

आम्ही मात्र उत्तरेला सुधागडपासून खोलवर आत गेलेल्या सह्याद्रीच्या भिंतीचं अन् तेलबैल्याच्या कातळभिंतींचं अनोखं दर्शन घेण्यासाठी लांबची ‘नाणदांड घाटा’ची वाट घेतली. उन्हांचा ताव अन् आर्द्रतेनं जीव कासावीस होणार, हे गृहीत धरलंच होतं. पण पदरातून कातळावरून अन् गवताळ टप्प्यांवरून तासभर आडवं चालताना सागाच्या वाळकी पानं अचानक सैरभैर उधळू लागली, निळ्याशार आभाळात ढग दाटू लागले, शेतात राब जाळण्यासाठी पानं उतरवलेल्या झाडांची भूंडी खोडं लावू लागली अन् घिरक्या घालणा-या ससाण्याची वा-याच्या तडाख्यामुळे धडपड सुरू झाली. माथ्यावर ढगांनी सावली धरलेली, तर समोर सुधागड ते तेलबैल्याचं सुरेख ‘वसूल’ दृश्य..

‘नाणदांड घाटा’ची सुरुवात सापडताना थोडी खटपट करावी लागली. वाटाड्याच्या मदतीची गरज भासली नसली, तरी दिशाशोधनाचे तंत्र – मंत्र – यंत्र वापरून खो-याच्या उजव्या बाजूला चढणारी वाट घेतली. माथ्याकडचा कातळकडा अन् घळ लक्षवेधक होती. फेब्रुवारी असूनही झरे वाहते होते. भुंगे अन् मधमाश्यांची लगबग, आभाळातल्या ढगांचे मनोहारी लाटा अन् फुलांनी पेटलेल्या पलाशवृक्षांमुळे रानात जिवंतपणा होता.
हळूहळू चढत दाट जंगलातून डोंगरधारेजवळ जाऊ लागली. दक्षिणेची झाडीभरली घळ अन बलदंड कातळ लक्षवेधी होते. पण, घाटांच नाव 'नाणदांड' असल्याने वाट घळीतून जाता, दांडावरून जाणार असे फंडे मारण्यात आले.

माथ्याकडून उतरलेल्या दांडावरचा मोठ्ठा कातळटप्पा हे ‘नाणदांड’ चढण्यासाठी अचूक दांड ओळखायची खूण.

झुडूपी रानातून आडवं जात, पुढे कारवी अन् घसा-यावरून उभं चढून  गेलोनाणदांड सोंडेवरच्या कातळटप्प्यावर पोहोचेस्तोवत चांगलीच धाप लागली. खडसांबळे गावापासून निघून अडीच तास झालेले, अन् घाटाच्या निम्म्या उंचीवर झाडो-रात सॅक्स टेकवल्या.


भिरभिरणा-या ढगांच्या सावलीत पाऊण तासाची विश्रांती अन् पौष्टिक जेवण गरजेचंच होतं. प्रत्येक पावलागणिक उभी होत जाणारी दांडाची उभी वाट चढल्यावर, कारवीतून जाणारी बारीक आडवी वाट धम्माल होती.
 

प्रत्येक पावलागणिक तेलबैल्याच्या जोडभिंती, सुधागडाचे तट-कडे अन दूरवर डोकावणारा पालीजवळचा  सरसगड असं मोठ्ठं लोभस दृश्य बघून थरारत होतो.  नाणदांड घाट आमच्यावर प्रसन्न झाला.

अन् सामोर आलं घाटमाथ्यावरचं केवणी गावाचं पठार. वणव्यात करपलेल्या माळामागे केवणी गाव अन् उठवलेला घनगड हे राकट दृश्य समोर होतं. गावकरी किती दुरुन पाणी आणतात, हे कळूनही केवणी गावात समोर आलेल्या पाण्याच्या कळशीचं अगत्य नाकारणं शक्य नव्हतं. केवणीच्या पठारावरून घनगडकडे जाताना खिंडीतून सह्याद्रीच्या रंगमंचावर दिसत होते तेलबैला - सुधागड अन् घनगड यांच्यासारखे कसलेले कलाकार.

सोबतीला तालेवार सोबत होती कोकणात कोसळलेल्या असंख्य रेखीव डोंगरधारा अन् घळी.

गवताळ माळावर दडलेली परीसंस्था (इकोसिस्टीम)

झाडावर बहरलेली ऑर्कीड्स, त्यावरून अवचित तरंगत जाणारा महाभृंगराज असं किती किती कवतिक सांगू आमच्या सह्याद्रीचं...

सह्याद्री - घनगडाचा कातळमाथा - ढग - ऊनसावली - गवत - गुराखी यांच्या कॅलिडोस्कोपचा अनोखा आकृतीबंध सामोरा होता. अंगावर एक सुखद शहारा आला. कितीतरी वेळ तिथे बसून राहिलो.

रात्रीच्या मुक्कामास एकोले गावच्या मारुती मंदिरात आसरा घेतला. पुनवेच्या टिपूर चांदण्यात गर्रम तांदळाची भाकर, पिठलं, कांदा अन् लाल मिरचीचा ठेचा यांची लज्जत काही औरच.

उतरायला ‘अंधारबन’ नावाची निबिड अरण्याची घाटवाट
आदल्या दिवशी घनगडच्या एका अंगाने परिक्रमा झाली होती. दुस-या बाजूच्या सह्याद्रीचं दर्शन घेण्यासाठी दुस-या दिवशी भल्या पहाटेचं निघालो. गाडीच्या मदतीने ८ – १० किमी दक्षिणेला पिंप्री गावाजवळील कुंडलिका नदीच्या अत्यंत  देखण्या दरीपाशी पोहोचलो.

करकरीत कड्यांच्या दर्शनाने अक्षरश: थरारून गेलो. सह्याद्री-देवतेला मनोमन दंडवत केला.

पिंप्री पाझर तलावापाशी पोहोचलो, तर पाण्यावर धुक्याचे ढग रेंगाळले होते.

आजचा पल्लादेखील मोठ्ठा होता. वीर नावजी बलकवडे यांच्या स्मारकापासून कुंडलिका दरीचं अन् अंधारबन-नावजी अश्या सुळक्यांचं सुरेख दर्शन झालं.

कोवळ्या सूर्यकिरणांची ऊब हवीहवीशी वाटत होती.

पिंप्री गावापासून तब्बल दोन तास ‘अंधारबन’ जंगलाची आडवी चाल होती. कधी ओढ्यांच्या घळीतून, तर कधी पाचोळ्यातून सह्याद्रीच्या संवेदनशील टप्प्यांमधून दमदार पण सुखद चाल होती.

निसर्ग अभ्यासकांसाठी उत्तम अश्या या रानात कमीत कमी १५ प्रकारच्या पक्ष्यांनी आम्हांला साद घातली असेल. या रानाला स्वार्थी जगाची दृष्ट लागू नये अशी सह्याद्रीचरणी प्रार्थना अन् इथल्या निसर्गात कृपया ढवळाढवळ करू नये, अशी पर्यटकांकरता कळकळीची विनंती!

रानातून बाहेर पडल्यावर सूर्यकिरणांनी डोळे दिपले. घनगडच्या दक्षिण बाजूचं दूरदर्शन घेत हिर्डी गावचं लांबचलांब पठार तुडवलं, अन् शंकराच्या देवळापाशी थंड पाण्याच्या कुंडापाशी गावक-यांशी हितगुज केलं.

हिर्डी गावापासून साधारणतः ट्रेकर्स भिरा गावाकडे उतरतात. आम्ही मात्र गाडीपाशी परत येण्यासाठी कमी वापरातल्या वाटेनं नागशेत गावाकडे निघालो. उभ्या उताराच्या टप्प्यांवरून परत एकदा खडसांबळे लेणी डोकावली, अरे आणि मागे हे केवणी पठार, तो तेलबैल्याचा माथा अन् आमचा सखा घनगड.

तासाभराच्या उतराईनंतर धनगरवाड्यापाशी विसावलो. संत्री – चिक्की – खजूर यांच्या संजीवनीने परत एकदा उत्साहात निघालो अन् अंधारबन घाटाची उंची उतरली.

पिंप्री गावापासून अंधारबन जंगल – हिर्डी पठार आणि उरलेला घाट उतरायला साडेचार तास चाल झाली होती.

पाठीमागच्या सह्याद्रीच्या भिंतीचं वैभवाचं कवतिक करत असतानाच, सामोरं आलं एक निसर्गआश्चर्य. नागशेतच्या अलीकडे नदीच्या पात्रात खोल रांजणखळगे अन् कोंडजाई देवीचं स्थान. स्थानिक भाविक कोंडजाईला साकडं घालत होते.

शेवटचे दोन तास नदीच्या पात्रातून पश्चिमेला जात, खडसांबळे लेण्यांच्या डोंगराला वळसा घातला. नदीच्या पात्रापाशी धुणं धुणा-या पोरी, उन्हाने त्रासलेल्या म्हशी, उगीच इकडे तिकडे बागडणारे बगळे, नदी पात्रातल्या वाळूवर डोळा ठेवणारे कंत्राटदार, बहरलेला पळस, भान हरपून मनसोक्त क्रिकेट खेळणारी पोरं यांच्या बाजूने सणसणीत तापलेल्या बैलगाडी वाटेने आम्ही चिकाटीने किती चाललो याची मोजदातचं नाही, अन् सुधागडच्या पायथ्याला ठाकूरवाडीला कसं(बसं) पोहोचलो, ही वेगळी कथाच आहे.

खो-यातली गावं रस्त्यांनी जोडलेली नाहीत. म्हणून पाऊलवाटेवरून बाईक हातात घेवून जाणारा एक तरूण आम्हांला म्हणला, आरं बाबा, असली चाल तुम्ही लोकंच करा.. आमच्यानं नाही व्हायची. तुम्हांला काय सरकारी अनुदान मिळतं का..

त्याला काय अन् कसं समजवावं, की अरे ‘एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...’

टीप: तांत्रिक चढाई कुठेही नसली, तरी जबरदस्त चाल अन् आडवाटा यामुळे हा ट्रेक फक्त ट्रेकर्ससाठी आहे. सह्याद्री जैविकदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने इथे जबाबदारीने ट्रेकींग करावे, ही कळकळीची विनंती.
- © साईप्रकाश बेलसरे, २०१४

फोटोज: मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे 
पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा, ११ एप्रिल, २०१४   

37 comments:

  1. जिप्सी ... वाह काय नाव दिलाय ... नेहमी प्रमाणेच उत्तम लेख आणि जबराट फोटोज ... बरीच माहिती व गुगल maps शेअर केल्याबद्दल धन्यवाद ... आणि हो अंधारबन कायम अंधारातच राहो हि ईश्वर चरणी पुन्हा एकदा प्रार्थना ....

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत::
      अरे हो, इथल्या सह्याद्रीचं येत्या १० वर्षात काय होईल, याची खरं तर भीतीच वाटते…
      पुढच्या ट्रेकर्सना मदत व्हावी, या हेतूनं माहिती लिहायचा प्रयत्न केला…
      खूप खूप धन्यवाद :) :)

      Delete
  2. अत्यंत भन्नाट मार्ग.. भन्नाट फोटो.. भन्नाट वर्णन! फिदा... !!

    ReplyDelete
    Replies
    1. हेम::
      शतश: धन्यवाद!!!
      सह्याद्रीप्रेमामुळे ट्रेक वर्णन तुला आवडला असणार, हे नक्की :) :)

      Delete
  3. अत्यंत भन्नाट मार्ग.. भन्नाट फोटो.. भन्नाट वर्णन! फिदा... !! >> same here !! and yes tumhiloks vry lucky tharlaat to get so clear weather.. Best PHotos ! kahi photo tar khup avadale !! Kip it up ! Hope to c u soon

    ReplyDelete
    Replies
    1. यो::
      आम्हांला खरंतर उन्हाचा आणि आर्द्रतेचा मेजर त्रास होईल, असं वाटलं होतं… पण, आजपर्यंतच्या ट्रेकिंगमधलं लय भारी वेदर मिळालं… त्यामुळेच, ट्रेक तर करू शकलो आणि स्वर्गीय फोटोज मिळाले….
      खूप खूप धन्यवाद :) :)
      लवकरच भेटू…. :)

      Delete
  4. Kyaa baat hai!!!!
    Ek se badhakar Ek photos aani tyala sajesa Varnan.

    ReplyDelete
    Replies
    1. Yogesh:: दोस्ता, खूप खूप धन्यवाद!!! :) :)

      Delete
  5. Jabardast trek ani tevadhech damdaar varnan - sahittikachya todiche. Suryodayacha photo mhanje ek number!

    ReplyDelete
    Replies
    1. आता लेख वाचायला बरा वाटतो, पण
      खडसांबळे लेणी - नाणदांड शोधताना काय काय कन्फ्युजन झालं, आणि वाटा स्वत: शोधण्यात कशी मज्जा आली…
      काय एकसे बढकर एक दृष्यं मिळाली, पण फोटोज साठी किती छळलं तुला…
      नागशेत वरून ठाकूरवाडीला कसं आणि किती किती चाललो...
      हे आणि असे या ट्रेकचे अनुभव खरंच भारी!!! :)

      Delete
  6. तुझ्याच स्टाईल मध्ये सांगायचं तर…
    ओघवत्या रसाळ वर्णनाने चिंब भिजलेला… वैशाखवणवा ल्यायलेला असूनही डोळ्याला कमालीची प्रसन्नता देणा-या सुरेख फोटोंनी सजलेला आणि सह्याद्रीच्या दुर्गमतेला नतमस्तक होऊन वाहिलेला एक अफलातून लेख…
    तैलबैला सुधागडचं प्रतिबिंब अन पहिलाच "डोंगरयात्रा" फोटो… एकच शब्द… "जियो !!!!"

    ReplyDelete
    Replies
    1. Onkar:: खूप खूप धन्यवाद, इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल…
      या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे काही अत्यंत दिव्य दृश्यं अनुभवला मिळाली…:)
      लेख लिहितानाची भावना "सह्याद्रीच्या दुर्गमतेला नतमस्तक होऊन वाहिलेला" तुझ्यापर्यंत पोहोचतीये, म्हणून खूप आनंद वाटतो… :) :)

      Delete
  7. वाह… वाह… वाह… साक्षात सरस्वतीने पुन्हा तुमच्या जिभेवर उन्हाळी शिबिराचे क्लासेस उघडलेले दिसत आहेत … खतरनाक…
    मी मागे सुद्धा म्हणालो होतो कि माझ्या माहितीतले सर्वोत्तम दोनचं "ट्रेखक" (ट्रेक - लेखक) आहेत ज्यांचे ब्लॉग्स मनापासून वाचायला आवडतात…
    दणदणीत लिखाण आणि उत्तम फोटोज… खास करून सूर्योदयाच्यानंतर चा तैलबैला चं पाण्यामधलं करकरीत reflection…
    सोबतीला मिलिंद-सर असल्यावर … तर अजूनचं झकास … ब… ढी… या… मजा आली...
    बाय-द-वे… तुमची "जिप्सी" 4x4 (4WD) :) ... असताना तुम्ही दोघेच कसे काय गेलात? :) :D

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा… तुझी कमेंट वाचून खूप आनंद वाटला …
      सरस्वतीच्या क्लासचं माहित नाही, पण सह्याद्रीची शिकवणी नक्कीच लावली आहे..
      अरे, फोटोंचा दर्जा बघून मी आणि मिलिंद सुद्धा चकित झालो आहोत.. वातावरण - टायमिंग अचूक मिळालं…
      "जिप्सी" 4x4 (4WD) ला मिलिंद-सर एकटेच - नसलेल्या दोघांची कसर भरून काढतात…

      खूप खूप धन्यवाद!!!!! :)

      Delete
  8. Atishay sundar trek varnan, ani photo ahet. Blog warun nakkich interesting route watat ahe. Thank you share kelyabaddal. Asech ajun treks share karave!!! ~ Kirti Kelkar - Sahyadri Books

    ReplyDelete
    Replies
    1. Kirti ji::
      ब्लॉगवर स्वागत!!!
      प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद :) :)
      तुमचा Sahyadri Books उपक्रम उपयुक्त आहे… मी ट्रेकिंगची ५-६ पुस्तकं घरबसल्या मिळवली असतील.

      Delete
  9. ​अप्रतिम… आणि फक्त अप्रतिमच !

    ​अफलातून छायाचित्रण आणि सुंदर कसदार लेखणी. वाह काय मेळ आहे !​
    ​तुमचं लिखाण वाचायला खरच खूप आवडतं. याआधीचे तुमचे 'एका अपरिचित किल्ल्याचा शोध: 'दुर्ग अनघाई', 'तोरण्याचं हरवलेलं दुर्गस्थापत्य गवसतं, तेंव्हा...', 'स्वप्नवत सह्यभ्रमंती::: चावंड - ढाकोबा - दुर्ग - आहुपेघाट - गोरखगड - सिद्धगड -नारीवली घाट - भीमाशंकर (पूर्वार्ध)', 'रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!', 'जावळी मुलुखातली भन्नाट भटकंती::: “येता जावली, जाता गोवली” चा अर्थ शोधताना...', 'मला आवडते वाट (आड)वळणाची...' हे लेख वाचले. ट्रेक्स संबंधी बरच लिखाण मी वाचत असतो, पण आतापर्यंत वाचलेल्यात तुमचे लेख मनापासून आवडले. खासकरून तुमचा 'रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!' हा लेख खूपच आवडला, कारण यात ट्रेक बरोबरच एका अभेद्य गडाची अतिदुर्गम चोरवाट शोधली आहे, जी मला अजून तरी माहित नव्हती. तुमची हरकत नसल्यास तुमच्याबरोबर एकदातरी ट्रेक नक्की येईन.

    - योगेश सुर्यकांत राऊत

    ReplyDelete
    Replies
    1. सह्याद्रीमित्र योगेश,
      ब्लॉगवर सहर्ष स्वागत :) थोड्या उशिरा उत्तराबद्दल क्षमस्व!!!

      मनापासून अनुभवलेल्या धम्माल ट्रेक्सचे किस्से ट्रेकर दोस्तांना सांगणे आणि त्यांच्या ट्रेक्ससाठी रेफरन्स म्हणून वापरता यावेत, अश्या छोट्याश्या हेतूने लिहिलेले हे भटकंती वृतांत!!!

      सह्याद्रीच्या प्रेमामुळेच तुम्हाला माझ्या साध्यासोप्या लिखाणाबद्दल आपुलकी वाटली असेल… तुम्ही वेळ काढून काही लेख वाचलेत आणि इतकं भरभरून कौतुक करताय… खूप खूप धन्यवाद!!!

      ट्रेकला कधीतरी नक्की जाता येईल. मोबाईल # दिलात, तर थेट बोलू…

      Delete
    2. फारच उशिरा प्रत्युत्तराबद्दल क्षमा असावी.
      ​माझा मोबाईल # +९१ ९८९२९ ४०००४
      whats app ला भेटूच !​

      Delete
  10. काय चाबूक वर्णन. काही फोटो, विशेषतः पॅनोरमा फारच कातिल...

    ReplyDelete
    Replies
    1. पंकज:
      या ट्रेकमध्ये मूळात फार भारी व्ह्यूज आहेत. त्यात वेदर अशक्य भारी मिळालं,
      त्यामुळे साध्या कॅमेराने फोटू काढले असूनही बरे आलेत...
      खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून...
      धन्यवाद :)

      Delete
    2. ​साई,
      समद्या ब्लॉगमंदी तुमचं फोटू ​फक्कड असत्यात. कंचा कॅमेरा वापरतासा, आमाला बी सांगा राव :-) :D

      Delete
    3. योगेशभाऊ:
      कश्यापाई गरीबाची थट्टा करून ऱ्हायले.. :)
      jokes apart, छान वाटलं प्रतिक्रिया वाचून..
      साध्या point n' shoot camera (Nikon S9100)ने दणदण शेकडो फोटू काढतो. आणि, ब्लॉगसाठी ५ पैसेसुद्धा कुठलंही processing करत नाही. मला वाटतं, कधीकधी सुदैवाने सुरेख फ्रेम्स मिळून जात असतील... :)

      Delete
    4. वाह खरच खूपच छान!
      एखाद्या professional 'फोटूग्राफ़र' ला पण जमणार इतक्या सुरेख frames आहेत.

      Delete
  11. केवळ अप्रतिम ☺☺👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. महेश,
      मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून..
      खूप खूप धन्यवाद!

      Delete
  12. करवंदीच्या जाळ्यांत उगवलेले पुषगुच्छ अगदी मोहवून टाकणारे आहेत. वरुन पाचवा फोटो अगदी आवडला. डोंगर आणी झाडी-झुडो-याचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं आहे पाण्यात. अपरिचित लेण्यांची माहिती आवडली. पलाशवृक्ष बरेच दिवसांनी मला तरी पहायला मिळाले.
    अठरा क्रमांकाचा फोटो फार सुंदर आलाय. डोंगराचा शिवलिंगाप्रमाणे दिसणारा सुळका आणि त्याच्या पार्श्वभूमीला भरुन आलेल्या आभाळाचा सुरेख काळासावळा रंग अप्रतिम देखणा दिसतोय.
    गवताळ माळावर दडलेली परीसंस्था (इकोसिस्टीम): हा फोटो ही मस्त अप्रतिम आहे. एखादं तांबूस सोनेरी रंगाचं व्हेल्व्हेटचं कापड पसरलेलं असावं असं वाटतंय.
    “रात्रीच्या मुक्कामास एकोले गावच्या मारुती मंदिरात आसरा घेतला. पुनवेच्या टिपूर चांदण्यात गर्रम तांदळाची भाकर, पिठलं, कांदा अन् लाल मिरचीचा ठेचा यांची लज्जत काही औरच” – अगदी झकास मेन्यु. तों.पा.सु.

    अंधारबन नाव सार्थक करणारं वन आहे.
    भन्नाट फोटोज आणि भन्नाट वर्णन...

    ReplyDelete
    Replies
    1. किती सुंदर प्रतिक्रिया...
      ब्लॉगमधलं नेमकं काय आवडलं, हे वाचून खूप मस्त वाटलं.
      मन:पूर्वक धन्यवाद :) :)

      Delete
  13. Boss you rock. खूप खूप सुंदर लिखाण! No words.

    ReplyDelete
    Replies
    1. सह्याद्रीतला एक भन्नाट ट्रेक,
      म्हणून लेखात थोडंसं ते सारं झिरपलं असेल...
      मन:पूर्वक धन्यवाद :) :)

      Delete
  14. अफलातुन वर्णन केलंयस. ट्रेकचे फोटो पाहून आणि वर्णन वाचुनही नविन ट्रेकर्सला मार्ग सापडेल. गाढवलोट ऐवजी डेर्याचाही option चांगला झाला असता असं मला वाटतंय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दिलीप! :)
      ट्रेकर दोस्तांना जावेसे वाटावे पण स्पूनफीडिंग नको, असं लिहायचा प्रयत्न होता.
      खरंय.. नाणदांडसोबत नाळेची वाट/घोणदांड/डेऱ्या जास्त योग्य! हा ट्रेक केला, तेंव्हा डेऱ्याघाट माहितीच नव्हता. :)

      Delete
  15. सगळेच अगदी अप्रतिम आहे

    ReplyDelete
  16. Dear Sai..Beautifully written.We completed Ekole-Kevni-Ghondand-Khadsamble-Sudhagad -Nandand-Kevni-Ekolye trek yesterday.(26th and 27th November).As we had included Sudhagad as well it became a Injection trek.However we all thoroughly enjoyed it.Especially Nand dand ghat which has dense forest cover. With this we have completed all 3 kevni ghats.Thanks for a insight full blog. Your writing brings out the deep respect and love for the sahyadris which our community shares.

    ReplyDelete
  17. Comment is from daughters account as my blogger account is from her account.Comment is from Amit Marathe:-)

    ReplyDelete
  18. khup cha chan photo ani likhan apartim asha ghatvata chi olkh tum cha kadun cha saravana hotea ani tum cha sandesh sarvani trek kart astana kalji ghavit ani nisargat dhwaladhawal karunayit

    ReplyDelete