Pages

Sunday, 22 June 2014

विस्मृतीत हरवलेली उकसण - पाल लेणी





एकदा का सह्याद्री ट्रेकिंगची चटक लागली, की भलेभले गंडतात. मग दरवेळी मोठ्ठा ट्रेक अगदीच शक्य नसला, तरी 'दुधाची तहान दुधानेच भागवण्या'साठी (म्हणजे ट्रेकिंगचा निखळ आनंद देणारी) जवळची अल्पपरिचित ठिकाणं शोधायची. कुठल्याश्या त्रोटक १-२ ओळींच्या संदर्भावर आडवाटा  पकडायच्या. तिथे गेल्यावर या अनवट जागा खरंच सापडतील का, असं चक्र डोक्यात चालू असतं. सुदैवानं सह्याद्रीत अश्या ठिकाणांचं रत्नभांडार आहे.

'उकसण आणि पाल लेणी' धुंडाळताना...
गेल्या वर्षी अश्याच एका भटकंतीत अल्पपरिचित अश्या आंदरमावळातल्या 'काम्ब्रे लेण्यां'चा रसास्वाद घेतला, तेंव्हाच कामशेत जवळपासच्या 'उकसण आणि पाल लेण्यां'बद्दल ऐकलं होतं. पुणे - मुंबई महामार्गाजवळ असूनही, थोडक्या अभ्यासकांपलीकडे परिचित नसलेल्या या लेण्यांना भेट देण्याचा योग आज जुळून आला.

कामशेतपासून उत्तरेला नाणेमावळात शिरलो, तेंव्हा काळे ढग दाटून आलेले. धाड-धाड-धाड-धाड करत जाणा-या ट्रेनचे हादरे रेल्वे क्रॉसिंगपल्याड कारमध्ये सुद्धा जाणवले. पुढं पुलाखालून जाणारं 'इंदायणी'चं पाणी वारीसोबत पंढरपूरच्या प्रवासासाठी निघालेलं. काम्ब्रे आणि गोवित्रीगावच्या शेताडीत थोडकी भाताची रोपं उगवली होती. समोर वडिवळे धरणाची भिंत दिसू लागल्यावर डावीकडचा कोंडेश्वर-जांभिवली रस्ता न घेता, उजवीकडचा चढावरचा उकसण गावचा रस्ता घेतला.

वडिवळे धरणावर पावसाची खट्याळ भूरभूर सुरू होत होती. वारा फोफावला, अन ढग लगबगीने न बरसताच विखुरत गेले.


समोर डोंगराच्या पायथ्याशी उकसण गाव सुंदर जागी वसलेलं दिसलं. या निसर्गदृश्यात 'आजच्या काळची लेणी' - खाजगी बंगले रिसोर्ट खुपत होते. याच डोंगरात लपलेल्या 'प्राचीन लेणी' शोधायला आम्ही आलो होतो.


धरणाच्या भिंतीजवळून पुढे आल्यावर उजवीकडे 'उकसण'कडे न जाता स्वागत-खांबांपासून उजवीकडे 'पाल' गावचा कच्चा रस्ता पकडला. आता गाडीचा वेग मंदावला - चढामुळे, अन त्याहीपेक्षा समोर खास 'पोझ' देणा-या खंड्याच्या जोडीमुळे. 


नि:संशय प्राचीन - पाल लेणी
समोर होता डोंगराचा डावीकडे उतरलेला सौम्य दांड, एक घळ आणि उजवीकडे मोठ्ठा कातळटप्पा. गाडी लावून, घळीतून चढणा-या वाटेकडे निघालो. वरच्या वडेश्वरच्या वाडीकडून येणा-या गावक-यांकडून "गुहा इथेच जवळ आहेत", हे ऐकून उत्साहाने निघालो. रानफुलांच्या साथीने नाणे-मावळातली शेतं आता मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहत होती. 


डावीकडे उंचावर झुडुपांच्या आड दडलेली, कातळाच्या पोटातली अंधारी जागा डोकावली, अन आम्ही अक्षरश: पळतच जवळ पोहोचलो. कधी एकदा ही लेणी सापडताहेत, असं आम्ही अधीर झालो होतो.


अन, समोर जे काही आलं, ते पाहून आम्ही अवाकंच!!



मुळातली डोंगराच्या पोटातली नैसर्गिक पोकळी, खोलवर खोदत नेल्याचं स्पष्ट दिसत होतं. अंकाई (मनमाड) जवळची गोरखनाथ गुहा अशीच असल्याचं आठवलं.


गुहेत ध्यानस्थ होते, इसवी सन पूर्व दुस-या शतकातले एक साधक - साकेत गुडी!!!


गंमतीचा भाग सोडला,
तर ही लेणी खरंच प्राचीन आहेत. लेण्यांमधल्या खोदाई निरखून पाहू लागलो.खोदीव पाय-या, पल्याडचा ताशिव चौथरा, पाण्याचे ६ फूट खोल कोरडं टाकं, त्यावरची कोरीव चौकट आणि हे काय..... त्याच्यावरती होता
चक्क एक शिलालेख!!!!!

या शिलालेखाबाबत अभ्यासकांमध्ये एकमत नाही.
- ह. धी. संकालिया आणि शोभना गोखले यांच्या मते, पाण्याच्या टाक्याच्या खोदाईसाठी केल्या गेलेल्या दानाचा उल्लेख या शिलालेखात आहे. लेखाची सुरुवात होते "नमो अरिहंतान"च्या नमोकाराने होते. त्यामुळे, इसवी सन पूर्व पहिल्या किंवा दुस-या शतकाइतका पुरातन हा ब्राम्ही शिलालेख महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जैन लेख आहे. हा लेख या परिसरात बौद्धांच्या सोबत जैन साधक-व्यापारी यांचं वास्तव्य होतं, हे सिद्ध होतं. (संदर्भ: डॉ. श्रीकांत प्रधान. दैनिक सामना. २४-०८-२००३)
- साईली पलांडे-दातार यांच्या मते मात्र हा जैन साधक-व्यापारी यांच्या संदर्भातला नसून, बौद्ध लेख आहे.

काहीही असो...
शिलालेखाच्या ब्राम्ही अक्षरांना अलगद स्पर्श केला. कोरीव अक्षरांची जाणीव झाली. आपण एका प्राचीन जागी आहोत, आणि पूर्वजांच्या पाऊलखुणा धुंडाळतोय, याचं कवतिक मनात दाटून आलं. 



उर्वरित भागातली लेण्याची खोदाई साधी आहे. पावसाळ्यात इथे पाणी साठत असेल. उजवीकडे अग्गदी छोटासा विहार आहे.


प्राचीन व्यापारी वाटा - त्यासोबतचा धर्मप्रचार आणि एकांतजागी साधना यासाठी अश्या लेण्या खोदवल्या असाव्यात.


पहा पाल लेण्यांचं दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=purfhbWQAD4 

उकसण लेणी आहेत तरी नक्की कुठे
पाल लेणी गवसल्यामुळे धम्माल मजा आली होतीच. आता वेध लागलेले याच डोंगरात असलेल्या, पण पलीकडे उकसण लेणी शोधण्याचा. माथ्यावरून ईशान्येला हलक्या चढावरून गेल्यावर डोंगरमाथा उजवीकडे ५० मी वर ठेवून आडवं गेलं, की उकसण लेणी सापडतात.



आम्ही कुठल्याच माहितीअभावी लेणी शोधात असल्याने लेणी शोधायला चांगली तासभर वणवण झाली. अर्थात, त्यामुळेच मिळाली काही भन्नाट दृश्ये:




दिशाशोधनाचे बर्रेच फंडे मारून झाले होते. 'लेणी कुठे खोदावीत', याबद्दल लेणी-खोदाई करणा-याने विचार केला नसेल, इतका विचार करून झाला. आणि, आता लेणी नाहीच सापडली तर...?
उकसण गावात जाऊन परत यावे का..
अरे इथे रानात कोणीच का नाही भेटत वाट विचारायला..
या लेण्यासाठी परत यावे लागणार का...
वगैरे.. वगैरे...


'सब्र का मिठा फल' - उकसण लेणी गवसली.
सहज गोष्टी मिळाल्या तर त्याची किंमत काय... म्हणून प्रयत्नानंतर अखेर डोंगरमाथ्याखाली ५० मी  कातळात कोरलेलं एक चौकोनी लेणं डोकावलं. अक्षरश: वाकडं-तिकडं किंचाळून आनंद व्यक्त करण्यात आला.

सूसाटलोच. अजून ३ गुहा उलगडू लागल्या.


आणि आम्ही पोहोचलो उकसण लेण्यापाशी. सणसणीत लेणी.


डावीकडे वर चढायला जरा अडचणीचं चौकोनी लेणं. त्याच्या उजवीकडे एकदम चिंचोळं लेणं.


पाल लेण्यासारखं इथेही नैसर्गिक गुहेला खोदून आतवर नेलेलंय.


२ मी उंच - ३ मी रुंद - ८ मी लांब अश्या तासून काढलेल्या प्रवेशमार्गावरून गेल्यावर आत साधी गुहा आहे.




लेण्याजवळची शांतता अन निसर्ग बघता, साधनेसाठी काय सुंदर एकांतस्थळ निवडलंय, असं वाटून गेलं.


पहा उकसण लेण्यांचं दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=25N6FThp9ps

कितीही आवडलं, तरीही परत येणं भाग होतं.
मनात नानाविध विचार दाटून आलेले...
कलाकृतीच्या बाबतीत सरस अश्या कित्येक इतर लेण्यांपेक्षा उकसण - पालची लेणी आपल्याला का जास्त भावली...
इथल्या लेण्यांमध्ये राहून कसली साधना हे साधक करत असतील... काय गवसत असेल त्यांना...


दुर्गम भागातल्या डोंगर-कातळात लेणी खोदण्याचा हा उपक्रम कित्येक शतकं कसा काय चालू राहिला...
बौद्ध आणि जैन विचारप्रवाहाचा पुढे मर्यादित प्रचार का झाला असेल, आणि हिंदू संस्कृती या भागात कशी फुलत गेली असेल...


साध्या छोट्या अनुभवांनी जगणं समृद्ध करणा-या सह्याद्रीबद्दल विलक्षण कृतज्ञता वाटली. सह्याद्रीनं लगेचच पावती दिली.




खरंच, सह्याद्रीतलं ट्रेकिंग म्हणजे एक विलक्षण 'ध्यास' आहे.
कधी येतो शिवचरित्रामुळे अंगावर शहारा..
एखाद्या धारातीर्थांवर ऐकू येतात त्यागाची अन पराक्रमाची गीते...
कधी गावक-यांच्या साध्या निर्व्याज प्रेमानं गहिवरतो...
दोस्त-मंडळींबरोबर थट्टा-विनोदात वाटांवर हरवतो...
कधी विलक्षण भूरचनेनं थक्क होऊन जातो...
वैशाखवणव्यात चिकाटीने केलेल्या ट्रेकबद्दल मिळतो रानमेव्याचा बोनस...
कधी बहरलेल्या लोभस जैव-वैविध्याची असते साथ...
जुन्या राउळातून कधी ऐकू येतात कोण्या भोळ्या भाविकांची आर्जवं...
कधी धुंडाळतो उभ्या कातळामध्ये कोरून काढलेल्या लेण्या...
विस्मृतीत दडलेल्या इतिहासाच्या या पाऊलखुणांचं कोडं काही सुटत नाही...
अन, सह्याद्रीचा ध्यास ट्रेकर्सना वीकांताला (Weekend) घरी बसू देत नाही.


© www.DiscoverSahyadri.in, 2014
 
ऋणनिर्देश: 
- फोटोज - साकेत गुडी,  DiscoverSahyadri
- लेणी माहिती संदर्भ: डॉ. श्रीकांत प्रधान (दैनिक सामना. २४-०८-२००३), साईली पलांडे-दातार

35 comments:

  1. लेण्यांची अतिशय जबरी शोध मोहिम... आणि तेवढ्याच ताकदीचा अभ्यासपूर्ण लेख... दुर्दैवाने आम्ही तुमच्या ह्या मोहिमेला जॉइन होऊ शकलो नाही... पण पुढच्या वेळेस जाऊ तेव्हा तुम्हालाच वाटाड्या म्हणून घेउन जाऊ.. लगे रहो साईं-भाई... जबरदस्त लेख...

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      मन:पूर्वक धनुर्वाद!!! :)
      साधं सोप्पं वर्णन आहे रे.
      लोकांसाठी नगण्य अश्या आडवाटेच्या ठिकाणांमधलं सौंदर्य तुला भावलं, हे वाचून छान वाटलं. :)
      पुढच्या वेळी नक्की जाऊ Discoverसह्याद्री साठी...

      Delete
  2. लिखाण फ़ार छान आहे. वाचुन मजा आली.

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक काळे सर: खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद :) :)

      Delete
  3. Wowwwww....mast discovery Sai saheb.....surekh varnan

    ReplyDelete
    Replies
    1. कुणाल..
      खूप खूप धन्यवाद!!!
      आपला एकत्र ट्रेकचा योग लवकर जुळून यावा, ही इच्छा!! :)

      Delete
  4. Apratim Exploration Saheb...!
    Yaychi khoop ichha asun, kahi karnan mule join nahi karu shaklo tumhala :-(
    Next time nakki :-)

    ReplyDelete
    Replies
    1. निनादराव::
      खूप खूप धन्यवाद!!!
      हो ना, या एक्प्लोरेशन मध्ये तुम्हांला प्रचंड मिस करण्यात आलं..
      चहाला भेटूच उद्या-परवा.. :)

      Delete
  5. साईं..तुझ्या भटकंती एकदम हटक्या नि डिस्कवर केल्यासारख्या.. मस्त मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. यो..
      अरे या अल्पपरिचित जुन्या हरवलेल्या जागांबद्दल आपल्याला प्रेम.. ते साध्या-सोप्या शब्दात मांडलंय..
      प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!! :)

      Delete
  6. Ek number Sai...!! Majhya awadatya caves ahet hya...! Tujhya lihinyachya shailichya tar khupach premat ahe mi.. Apratim ... Ani eka samvedanasheel trekkerchya manatala dusarya trekker la bhavel asa ahe... I really appreciate your passion for exploring these lesser known destinations... Keep it up... Ekatra hi kahi explorations karna due ahe ...akkhya Fadtad groupcha.. .. Mast photographs ...Tujha uksan chya leni madhun kadhalela photo khup awadla...apratim frame ahe ti...

    ReplyDelete
    Replies
    1. +साईली::
      किती छान प्रतिक्रिया!!
      फोटो क्रेडीट साकेतला सुद्धा आहे...
      मस्त वाटलं. खूप धन्यवाद!!! :)
      हो ना, काही महत्त्वाच्या मोहिमा घडून यायला पाहिजेत.....
      बाय द वे, घाटवाटा ट्रेक्स लेखांपेक्षा लेण्यांबद्दल लिहिताना जास्त टेन्शन असतं, आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी असल्यामुळे. ;)

      Delete
  7. साई ... तुझ्या लिखाणाची शैली खूपच लाघवी आहे ... आडवाटेवरचे निसर्ग शिल्प खुले करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद ...

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत, मन:पूर्वक धन्यवाद...
      आडवाटेला अनवट गोष्टी सापडल्या, ही सह्याद्रीची कृपा :)
      जाउच कधीतरी एकत्र ट्रेकला...

      Delete
  8. zakkas bhatakanti ani tyach barobar zakkas photos pan. nakki jayla pahije

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंद:
      खूप खूप धन्यवाद :) :)
      आपण नक्की जाऊ परत.. दत्तू बरोबर काही plan ठरू शकतो..

      Delete
    2. +मिलिंद आणि +साई : लवकरंच हि मोहीम फत्ते करू … __/\__

      Delete
  9. हा तुमचा उपक्रम स्तुत्य,
    अनुभव दिव्य,
    छायाचित्र बोलकी आणि नेमकी,
    शब्दांकन रमवणारे, सर्वांसाठी मांडलेत याकरता विशेष मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. Aniruddha Abhyankar:
      ब्लॉगवर स्वागत... :)
      खूप छान वाटली प्रतिक्रिया वाचून...
      अनवट जागेचं वर्णन ट्रेकर दोस्तांना सांगावं आणि त्यांना या ठिकाणी पोहोचणं सोप्पं जावं, असं साधं-सोप्पं वर्णन लिहिलंय. तुम्हाला ते आवडलं, हे वाचून विशेष आनंद झाला.. :)

      Delete
  10. Replies
    1. kaka:
      धन्यवाद :) :)
      ब्लॉगवर स्वागत... :)

      Delete
  11. सुन्दर ठिकाण आणि त्याहून त्याला साजेसे लिखाण... खुप छान माहिती दिली आहेस मित्रा...

    ReplyDelete
    Replies
    1. अमित:
      खूप छान वाटली प्रतिक्रिया वाचून...
      धन्यवाद :) :)
      आपला एकत्र ट्रेकचा योग कधीतरी जुळून यावा, ही इच्छा!! :)

      Delete
  12. ​​नेहमी प्रमाणेच अप्रतिम !​ खूप सुंदर ​!

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश:
      खूप छान वाटली प्रतिक्रिया वाचून...
      धन्यवाद :) :)
      खरंच, या ब्लॉगमुळे कळत-नकळत कित्ती ट्रेकर्स आणि सह्याद्रीप्रेमींबरोबर जोडले जातोय, असं जाणवलं तुमची प्रतिक्रिया वाचून...

      Delete
  13. Your love for Sahyadri and trekking is awesome and the penship compelling!!

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Pradeep,
      Welcome to the blog..
      Nice to read your comment.. Thanks a lot for your kind words.. :)

      Delete
    2. मी पाले गावा जवळ राही ला आहे मी पण 1/ 2 लेंणि जवल च्या डोगरत पहिल्या आहेत कधी आलात तर करा फोन 9970709148 \ 8087681887

      Delete
  14. खरंच सह्याद्रीत अश्या अनेक अज्ञात लेण्या आहेत ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत किंवा काही माहीतही नाहीत. नेहमीच्या लेण्या सोडून या लेण्या अनुभवण्याचा आनंद निराळाच. त्यात या लेण्यांची माहिती उत्कृष्ट लिखाणाने मिळाली तर जाण्याची ओढ आणखीनच ताणली जाते ...

    ReplyDelete
    Replies
    1. अभिजीत:
      खूप छान वाटली प्रतिक्रिया वाचून...
      मुळात आवर्जून लेण्यांची भटकंती करणारे कमी. Discover सह्याद्री या ब्लॉगच्या थीममध्ये शक्यतो डॉक्युमेंटेड नसलेल्या लेण्यांबद्दल थोडकी महिती लिहिण्याचा प्रयत्न आहे.
      मन:पूर्वक धन्यवाद :) :)

      Delete
  15. अप्रतिम! घर बसल्या नवं सापडल्याचा आनंद! ओम गुगली नमः!शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद, सर!
      तुमच्यासारख्या दिग्गज ट्रेकर्सनी आमच्या साध्यासुध्या ट्रेक्सची वर्णने वाचली, याचा आनंद किती मोठ्ठा!!!

      Delete
  16. ओघवती सहज भाषा व सुंदर प्रकाशचित्रे.एकंदर लेख झकास..👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. शेखर, खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद!!! :)

      Delete
  17. Apratim, mi hi recently visit keli! Ekhada lekh Kondeshwar ani Dhak var houn jaude! :)

    ReplyDelete