Pages

Friday, 27 February 2015

रौद्रविराट सह्याद्री… सर्वांगसुंदर सह्याद्री…

*** जावळीतला कामथेघाट - महादेव मुऱ्हा - चंद्रगड - ढवळे घाट - महाबळेश्वर ऑर्थरसीट टोक असा रौद्रविराट आणि सर्वांगसुंदर ट्रेक ***

(फोटो साभार: निनाद बारटक्के)

अजस्त्र कातळकडे…
बेलाग दुर्गम दुर्ग…
सोनेरी गवताळ मुऱ्हे…  
घनदाट आहे अरण्य… 
गूढ असे हे खोरे…
किती साधे गिरीजन… 
दरडवणाऱ्या दऱ्या… 
आणि निसरड्या घाटवाटा… 
सह्यवेडे सोबती… 
फोटूग्राफी - खादाडी - हास्यकल्लोळ…
तासन-तास चढउतार… 
अवचित मिळते मग, थंड पाण्याची संजीवनी… 
चोहोबाजूंनी वेढणारी - आपलंसं करणारी - भुलवणारी………… आहे ही 'जावळी'!  
---------------------------------------------------------------------------------------------------------------------                                   
'येता जावली, जाता गोवली', 
इतकं आक्रमक लिहिलं होतं चंद्रराव मोरेनं शिवरायांना (म्हणजे, जावळीत आलात, तर अडकलात म्हणून समजा), ते केवळ जावळीच्या दुर्गम मुलुखाच्या बळावरंच!!!
प्रत्यक्षात राजे जावळीत 'गोवले' गेले नाहीत, पण तिथे ते 'रमले' मात्र नक्कीच!!!
         
जावळीत पूर्वी एकदा ट्रेकला जाऊन आल्यावर (वाचा: जावळीतला मंगळ-चंद्र-ढवळे घाट असा भन्नाट ट्रेक), आम्हांलाही चंद्रराव मोरेचे शब्द पटू लागले. जावळीतल्या दऱ्या - खोरी - मुऱ्हे साद घालू लागले. आणि, 'जावळीत गोवलं' जाण्यासाठी नव्याने तयारी करू लागलो….  

…. फक्त नकाशा उलगडला, तरी 'जावळीत गोवलं' जाणं सुरू झालं होतं. रायरेश्वर - कोळेश्वर (की कोल्हेश्वर) - महाबळेश्वर अश्या डोंगररांगांनी लक्ष वेधलं. सह्यधारेपासून पूर्वेला कित्येक किलोमीटर पसरत गेलेल्या या माथ्यांवर घनदाट झाडी; तर पश्चिमेला तब्बल हजार मीटर खोल अजस्त्र कडे कोसळले आहेत. केवळ आणि केवळ याच रौद्रविराट आणि सर्वांगसुंदर सह्यकड्याचं मनसोक्त 'दर्शन' घेण्यासाठी आम्ही ट्रेकचा बेत आखला.
… 'कामथे घाटा'तून आभाळात घुसलेल्या रायरेश्वरच्या पश्चिम टोकाचं - नाखिंद्याचं - दर्शन घ्यायचं…
… कामथी नदीच्या खोऱ्यातून 'महादेव मुऱ्हा' नावाच्या थोरल्या पठाराचे चढ-उतार पार करून ढवळी नदीच्या खोऱ्यात उतरायचं…  
… ढवळे खोऱ्यातल्या चंद्र्गडावरून रायरेश्वर आणि कोळेश्वराचं रौद्रविराट पॅनोरमा बघायचा…
… सर्वांगसुंदर ढवळे घाटाच्या चढाईनं कोळेश्वर आणि महाबळेश्वरच्या पश्चिमकडयांपाशी नतमस्तक व्हायचं, एकतर असा धम्माल ट्रेकरूट, आणि सोबतीला १४ सह्यप्रेमी ट्रेकर्स...

घनदाट झाडीभरल्या कामथे घाटातून नाखिंदा दर्शन
… ट्रेकची सुरुवात करायची होती रायरेश्वराच्या उत्तर कुशीतल्या 'कुदळी बुद्रुक' गावाजवळून. खाजगी वाहनाने रात्री प्रवास करताना ट्रेकर्सच्या नव्या-जुन्या ओळखी, ट्रेकचे किस्से आणि पार्श्वसंगीत म्हणून म्युझिक प्लेयरवरची रिमिक्स गाणी, असा बख्खळ दंगा! वरंध घाटामार्गे कुदळीला पोहोचायला रात्रीचे ३ वाजले. लांब पल्ल्याच्या ट्रेकआधी दोन तासांची तरी झोप महत्त्वाची होती. इतक्या आडवेळेला जाऊनही पोळ मामांनी मुक्कामासाठी घरात स्वागत केलं. 'टाईमर गंडलेल्या' कोंबड्याच्या आरवण्याला स्पर्धा म्हणून आमच्यातल्या काही लोकांनी घोरण्याची विलंबित लय पकडली...

... ट्रेकचा पहिला दिवस. ट्रेकर्सच्या इंजिनाला मोठ्ठ्या ट्रेकपूर्वी गरम करण्यासाठी, उत्तमरावांनी थर्मासमधून आणलेला 'अमृत-तुल्य' चहा दिला आणि तरतरी आली. पोळमामांचे आभार मानून पाठीवर सॅक्स चढवल्या. डावीकडे दक्षिणेला रायरेश्वरचा पहाड उंचावला होता. समोर मावळतीला झाडीभरल्या उतारांमधली सर्वात कमी उंचीची जागा - 'अस्वलखिंड' डोकावत होती. इथूनंच कोकणात कामथे खोऱ्यात उतरण्यासाठी 'कामथे घाटा'ची सुरुवात होणार होती.
         
आता वाट या दरीतल्या मुख्य ओढ्याच्या बाजूनं चाललेली. ओढ्यात अजूनही पाणी ठिकठिकाणी रेंगाळलेलं. दोहोबाजूला  धुपून गेलेले काठ आणि प्रवाहामुळे झाडाच्या उघड्या पडलेल्या मुळ्या पाहून पावसाळ्यात इथला प्रवाह कसा रोंरावत जात असेल, याची कल्पना येत होती.
          
शेताडीमध्ये रानडुकरांचा त्रास बख्खळ. डुकरांना हुसकावण्यासाठी वाऱ्याच्या तालावर आपोआप बडवलं जाणारं हे डबड्याचं डिझाईन.    
             
आता सुरू झाली दाट झाडीच्या टप्प्यांमधून चढणारी निवांत वाट, जानेवारी असूनही खळाळणारा झरा, हवेत मंद गारवा आणि एखाद पक्ष्याची शीळ… असा सुरेख माहोल.
     
कुदळीपासून पाऊण तासात अस्वलधोंडीपाशी पोहोचलो. कित्येक दिवस वाट पाहायला लावलेला ट्रेक खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचा आनंद द्विगुणीत झाला होता सोबतच्या दिग्गज दर्दी ट्रेकर्समुळे…  
          
अस्वलखिंडीपासून मळलेली वाट आता पश्चिमेकडे ओढ्याच्या दगडां-धोंड्यांतून आणि गच्च झाडोऱ्यातून वाट सुसाट उतारावरून घरंगळू लागली…घाटमाथ्यावरचं कुदळी गाव ते कोकणातलं कामथे गाव या संपूर्ण घाटवाटेवर दिशादर्शक बाण आणि वनखात्याचे रचलेले दगड असल्याने वाट चुकायची शक्यता नाही.   
         
दाट झाडीतून क्षणभरंच रायरेश्वरचं नाखिंदा टोक आणि अस्पष्ट नेढं दिसलं. लवकरंच नाखिंद्याचं जवळून घाटमाथ्यावरून दर्शन घडो, असं मनोमन वाटलं.
(फोटो साभार: नितीन तिडके)

उभ्या डोंगरउतारांवर रानाचे मस्त टप्पे होते. कामथे घाटातून कोकणात उतरणारा मुख्य जल्लौघ पार केला. कामथे नदीच म्हणायची ती. पावसाळ्यात पाण्याचा लोंढा कसा सुसाटत असेल, याची कल्पनाही करवत नव्हती. 
                                                  
कामथे नदीच्या घळीच्या डावीकडून - दक्षिण बाजूने सोंडेवरून वाट थेट कोकणात उतरते. माथ्यापासून १०० मी उतरल्यावर प्रथमंच दाट झाडीतून थोडं मोकळ्यावर आलो. कातळकडे - झाडीचे टप्पे - कामथे घाटाची घळ आणि सह्यमाथा उजळवणारी सूर्यकिरणे अश्या नजऱ्याने ट्रेकर्स खूष!!!  


गवताळ माळांवरून उभे उतार उतरणारी वाट अजून दक्षिणेला सरकत, सोंडेवरून तासाभरात पायथ्याशी पोहोचली. पाठीमागे सहज वळून पाहिलं, तर आमच्या सह्याद्रीचं विराट दृश्य पाहून अंगावर सुखद शहारा आला. सर्वात उंच असलेल्या रायरेश्वराच्या नाखिंदा टोकाच्या उत्तरेची 'अस्वलखिंड' आणि झाडीभरल्या सोंडेवरून उतरणारा कामथे घाटाचा नजारा डोळ्यांत नजरेत सामावेना…
रायरेश्वराचे विराट पश्चिमकडे भान हरपून पाहतंच रहिलो…. वाटलं, 
रौद्रविराट सह्याद्री… सर्वांगसुंदर सह्याद्री…  मज प्रियसखा सह्याद्री!!!

साधारणत: अडीच-तीन तासात घाटवाट उतरली होती. घाटमाथा सोडल्यावर थेट पायथ्यापाशी 'बाल्डीचं पाणी' हा इतकाच आधार. (ही पाण्याची जागा आम्हांला सापडली नाही.)
डोंगरउतारावर होती कामथेच्या माडाच्या वाडीची टुमदार कौलारू घरं. वाडीत घुमणाऱ्या अभंगांनी मोठ्ठ प्रसन्न वाटलं.
        

महादेव मुऱ्ह्यावरून मंगळगड आणि रायरेश्वर खुणावताना… 
आता आम्हांला जायचं होतं 'महादेव मुऱ्ह्याला'. वडघर - बोरघर अशी डांबरी रस्त्यावरून चाल करताना, पाठीमागे सह्याद्री भिंत, हवेत दमटपणा आणि माथ्यावर सूर्य तळपू लागलेला.   
                
पल्याड डोकावला जावळीत लपलेला ढाण्या - मंगळगड. तापलेल्या उन्हांत करपलेल्या चढाचा मंगळगड बेलाग दिसत होता. शिवारात सगळ्या झाडांच्या फांद्या-पानं उतरवलेली… याचा वापर होतो, शेतातले तण जाळून पुढच्या पिकासाठी शेत तयार करण्यासाठी. 'राब जाळणं' म्हणतात याला.  
     
... बोरघरच्या दक्षिणेला महादेव मुऱ्हां उंचंच उंच दिसत होता. बुद्धविहारापासून मळलेली वाट होती. गवताळ उभ्या दांडावरची चढण खरं तर आता जीवावर आलीये. पण, जानेवारी असूनही एका वळणावर मिळालं झऱ्याचं गारेगार पाणी. पायगाडीची इंजिनं तात्पुरती सुखावतात, पण त्यानंतरच्या उभ्या चढावर दुपटीने घामटं निघू लागला. सह्यदर्शनाच्या आणि फोटूच्या निमित्ताने दम खात, एका लयीत ४०० मी चढ चढून तासाभरात मुऱ्ह्यावर पोहोचलो.  

मुऱ्हां म्हणजे भलं मोठ्ठ पठार. सावलीच्या झाडाखाली आडवं पडून, सोनेरी गवताळ महादेव मुऱ्ह्यावरून सुरेख दृश्य समोर दिसत होतं. उत्तरेला वरंध घाट, कावळ्यागड,  समोरचा मंगळगड आणि अस्ताव्यस्त सह्यरांगा. 
              
मुऱ्ह्यावरच्या वस्तीजवळ एक आजा भेटला. त्यानं अवघं आयुष्य महादेव मुऱ्ह्यावर काढलेलं, इथलं ऋतूचक्र अनुभवलेलं. आजाने आपुलकीनं पाणी दाखवलं, मुऱ्ह्यावरचा महादेव दाखवला. इथलं जगणं सोप्पं अजिबात नाही, पण किती ही साधी माणसं..
वाटलं, इतक्या सोयी असताना, शहरातली आपली आयुष्यं किती 'कॉम्प्लेक्स' करून घेतलीयेत, किती कुरकुरतो आपण...  
            
झाडाखाली महादेवाचं कातळातून झिरपणाऱ्या ओलाव्यातून एका खळग्यात ओंजळभर पाणी जमा होत होतं. छो-ट्या-श्या पेल्यानं ते कळशीत भरत बसायचं. आणि, त्यासाठी हंड्यांची रांग…. २०१५ मध्येही, आमच्या वाड्या-वस्त्यातली ही अवस्था अस्वस्थ करून गेली.…

महादेव मुऱ्ह्यावरून ढवळी खोरं आणि कोळेश्वर दर्शन…   
झाडाखाली सारवलेल्या अंगणात शिदोरी सोडली. प्रत्येकाच्या डब्याचा रसास्वाद घेऊन तृप्त झालो. अश्या जेवणानंतर 'योगनिद्रा' हवीच की नाही. (असूदेत, योगनिद्रेत काही ट्रेकर्स घोरले म्हणून काय झालं!)
           
उन्हं कलू लागली, अन महादेव मुऱ्ह्याला निरोप देण्याची वेळ आली. आता आम्हांला दक्षिणेला 'ढवळी' नदीच्या खोऱ्यात उतरायचं होतं. नागमोडी वळसे घेत वाट आता महादेव मुऱ्ह्याच्या टोकापाशी आली. समोर उलगडलं होतं 'ढवळे खोरं'. ढवळी नदीच्या पात्रामागे जावळीतला बेलाग दुर्ग - चंद्रगड; आणि चंद्रगड बुटका वाटावा अश्या अजस्त्र उंचीच्या रायरेश्वर - कोळेश्वर - महाबळेश्वर पहाडांचे पश्चिमकडे उन्हांत तळपत होते.
अश्याच नजऱ्यांसाठी तर हा ट्रेक आखलेला, म्हणून परत एकदा वाटलं,
रौद्रविराट सह्याद्री… सर्वांगसुंदर सह्याद्री… मज प्रियसखा सह्याद्री!!!



ढवळी नदीचं विस्तृत पात्र दगड-गोट्यांनी भरलं होतं. उद्याच्या चढाईसाठी चंद्रगड साद घालत होता.
      
महादेव मुऱ्ह्याच्या आणि चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या ढवळे गावात मुक्कामाला पोहोचलो. गावात अखंड हरिपाठाचा सप्ताह चालू होता. गावजेवण होतं. आम्ही रात्रीचं जेवण बनवायच्या तयारीला लागणार, तोवर 'पाहुण्यांनी प्रसादाचं जेवण घेतलंच पाहिजे', असा प्रेमळ आग्रह झाला. मुंबईला कामासाठी असलेल्या स्मार्ट तरूण पोरांनी सगळ्या कामाचा ताबा घेतलेला. जेवणाचं नियोजन अत्यंत शिस्तबद्ध… आणि भात - रस्सा भाजी - बुंदी असं जेवण - वाह, लाजवाब!    

गावाबाहेर शाळेच्या ओवरीत आणि बुद्धविहारात मुक्काम केला.
मित्रवर्य दत्तूने भन्नाट तेल मालिश करून दिलं. स्पेशल ट्रीटमेंट!
… रात्री स्वप्नंही पडत होती - डोंगरचढाईची, गवताळ माळांची, कातळकड्यांची, तहानेने जीव व्याकुळ होण्याची, दोस्तांसोबतच्या हास्य-विनोदांची, जावळीच्या दुर्ग - वाटांची…            
                 
चंद्रगडावरून रायरेश्वर-कोळेश्वर-महाबळेश्वरचा रौद्रविराट पॅनोरमा
… दिवस दुसरा. आज चंद्रगड चढून, तिथूनच पुढे ढवळे घाट चढून महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट टोकापाशी पोहोचायचं होतं. पल्ला मोठ्ठा होता. सकाळी मस्त ब्रेकफास्ट आणि स्पेशल चाय झाला. हावरटपणा म्हणून परत एकदा फोडणीस पोहे टाकले गेले. हॉर्नबील, नीलपंख, खंड्या अश्या पक्षीमित्रांनी विचारपूस केली. पण, ट्रेकर्सचा पाय काही केल्या निघेना ढवळेगावातून. आजच्या दिवशीचा ट्रेकरूट ऐकून, जुन्या जाणत्या मोरे आजोबांनी 'बिगी बिगी निघा रं पोरं हो…. नाहीतर ढवळे घाटात मुक्काम करायला लागेल...' असा प्रेमळ सल्ला दिला.

सकाळच्या कोवळ्या उन्हांत दमदार चाल सुरू झाली. गच्च झाडोऱ्यातून हलकेच झिरपणारी कोवळी किरणं हवीहवीशी वाटत होती… आजचं पहिलं लक्ष्य होतं 'चंद्रगड'. जुन्या ट्रेकच्या आठवणी जाग्या होत होत्या. ढवळे गावापल्याड कोळीवाड्यातून उजवीकडे वाट हलकेच चढू लागली. मोकळवन लागल्यावर समोरच्या चंद्रगडाचे कातळटप्पे बेलाग दिसत होते. माथ्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या धारेवरून उभी चढणारी वाट दमवणार होती, हे निश्चित!

आता वाट चढू लागली दाट झाडीतून. झाडावरच्या 'ॐ नम: शिवाय' लिहिलेल्या पाट्यांमुळे योग्य वाटेवर असल्याचा दिलासा मिळत होता.

दाट झाडीतून चढत वांझव्हिऱ्यापाशी (कोरडा ओढा) आलो. समोर 'चंद्रगडावर स्वागत' अशी पाटी.

आता सुरू झाली उभी-उभी वाट… बुळबुळीत गवत आणि घसाऱ्यावरची. मागे डोकावलं, तर दाट झाडीमधला वांझव्हिरा झपाट्याने खोल खोल खाली जातोय.
         
उंची गाठू लागल्यावर महादेव मुऱ्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता ढवळी नदीचं खोरं उलगडू लागलं.
       
चंद्रगडचा कातळमाथा जवळ येऊ लागला. कललेल्या झाडाखाली कोवळ्या उन्हांत उजळलेल्या पाऊलवाटेची सुरेख फ्रेम. फोटू काढण्याचं निमित्त करून धाप टाकायची आणि परत एकदा उभ्या चढाची घसाऱ्याची वाट, असा प्रकार चाललेला.
     
चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचण्याआधी सोप्प्या श्रेणीचा कातळकडा. चंद्रगडाची वाट सापडण्यास अवघड नाही. तांत्रिकदृष्ट्या अवघड  नाही. पण, अगदी धोपट सोप्पीसुद्धा नाही. त्यामुळे, नवीन ग्रुप्सना गाईड घ्यावासा वाटला, तरी त्यात कमीपणा वाटायची गरज नाही.
          
जावळीच्या चंद्रगडाचं दुर्गमत्व आणि अवघड जागी कातळात शिवपिंड आणि नंदी कोरून शिव-पूजन करणाऱ्याची अनामिक शिव-भक्ती बघण्यासाठी - सह्याद्रीवर प्रेम करणारे सह्याद्रीभक्त सोबत असणं, असा दुर्मिळ योग आला होता.

निमुळत्या कातळमाथ्यावरचे दुर्गस्थापत्य - टाकी - प्राकारतट - पायऱ्या - जोती पाहत आम्ही उत्तर टोकाकडे निघालो. उत्तरटोकापाशी अप्रतिम थंड गोड पाण्याचं टाकं आहे. इथेच कुठेशी पहाऱ्याची गुहा आहे, असा उल्लेख वाचलेला. पण, ती गुहा मात्र सापडली नाही.

                               
चंद्रगडाच्या माथ्यावरून जे काही सह्याद्रीचं रूप सामोरं येतं….  
त्याचं वर्णन करणं अ-श-क्य आहे.  
               
ही खरंतर प्रत्येक सह्यप्रेमीने अनुभवायची जागा आहे.

नि:शब्द होवून आसमंत डोळ्यांत - ऊरात सामावून घ्यायचा.

आणि मग, सह्याद्री आणि त्याचं खऱ्या अर्थाने कवतिक आणि चीज करणारे शिवराय यांना मनोमन दाद द्यायची:
रौद्रविराट सह्याद्री… सर्वांगसुंदर सह्याद्री…  मज प्रियसखा सह्याद्री!!!
                         
सर्वांगसुंदर ढवळे घाटामध्ये कोळेश्वर-महाबळेश्वरच्या पश्चिमकडयांपाशी नतमस्तक होताना…
खरंतर जड पायांनीच चंद्रगडला निरोप दिला...
उतराई करताना चढाईपेक्षा वेगळा नजारा असल्यामुळे, चढाईच्या वेळी न जाणवलेल्या दऱ्या आता धमकावत होत्या…  बिचकवत होत्या…
             


चंद्रगड पाहून झाल्यावर आता ट्रेकचा शेवटचा आणि रोमहर्षक टप्पा सुरू झाला - सह्याद्रीतल्या अ-प्र-ति-म 'ढवळे घाट' नावाच्या घाटवाटेचा!!!
साधारणत: ढवळे घाटासाठी ट्रेकर्स ढवळे गावातून जी वाट घेतात, ती चंद्रगडाला उजवीकडे ठेवत लांबचलांब वळसा घालत घनदाट अरण्यामधून आडवी वाटचाल करते. पण आम्ही चंद्रगड दर्शनानंतर पुढे ढवळे घाटाने वाटचाल करणार होतो. त्यासाठी ढवळे गावाकडे उतरून, चंद्रगडाला वळसा घालण्यापेक्षा आम्ही - थेट ढवळे घाटात उतरवणारा एक शॉर्ट-कट घेतला.
         
उतरताना चंद्रगडाचा माथ्याजवळचा कातळकडा उतरला, की डावीकडे पूर्वेला एक निसटती पावठी जाते. वाट फारशी वापरत नाही.
             
खिंडीतून पुनश्च चंद्रगड - रायरेश्वर - कोळेश्वरचे सुरेख दर्शन….
      
आम्ही निवडलेली वाट शॉर्ट-कट असल्याने, ती 'धोपट वाट' नक्कीच नाही. घसारा तीव्र तीव्र कोसळलेला… हाती येईल ती काठी - दगड - कारवी - झाडाचा बुंधा त्याचा आधार घेऊन धस्सक - फ़स्सक करावं… तरीही पायाला पकड मिळाली नाही, तर सपशेल बूड टेकवून घसरगुंडी करावी… इतकं करूनही भल्याभल्यांचे पाय सटकत होते.  ऊन - धुराळा माजलेला… मध्येच, एका झुडूपावरून कसलेसे कण उधळलेले, त्यामुळे सटासट शिंका येऊ लागलेल्या… पायावर अशक्य ताण येऊ लागलेला…
             
एरव्ही अश्या वेळी ट्रेकला खरंतर वैतागंच यायचा.
पण आमच्या सोबत होते दिग्गज ट्रेकर राजूकाका. त्यांनी 'शांती-नि-केतन'ची शाळा सुरू केली. भन्नाट किस्से, अनुभव, आपल्या शब्दकोषातसुद्धा नसलेले 'वरीजिनल' शब्द-कोट्या आणि त्याच्यावर निरुपण…. यामुळे ती उभ्या नाळेची वाट, लूज धोंडे अशी तासभराची अडचणीची वाट कधी पार पडली, कळलंही नाही…
(टीप: 'शांती-नि-केतन'ची शाळा म्हणजे काय, हे समजण्यासाठी राजूकाकांबरोबर ट्रेकला जाण्याशिवाय पर्याय नाही. हाह.. हाहा..)

चंद्रगड सोडल्यापासून दीड तासाचा शॉर्ट-कट संपवून अखेरीस ढवळे-घाटाच्या मुख्य पाऊलवाटेला लागलो. घाटाची अजून तब्बल ४ तासांची चढाई बाकी होती. चिक्की - खजूर - मोसंबी असा अल्पोपहार करून, थोडकी विश्रांती झाली.
      
जवळंच, वाटेतल्या एका वारुळाच्या आकारात ट्रेकर्सना दुर्ग राजगडाची आकृती जाणवली. खरंच, 'दृष्टी तशी सृष्टी'…. नाही का!

आता, चंद्रगडाला आणि सह्याद्रीला जोडणाऱ्या सोंडेला बिलगून, घनदाट अरण्यातून निवांत चढणारी वाट होती. ओढ्या-नाल्यांच्या सोबतीने सुरेख मळलेली वाट होती. मुख्य सह्याद्रीरांगेला समांतर असं आपण चढत जातो. नंतर सापळखिंडीपासून ट्रॅव्हर्स घेत वाट सह्याद्रीधारेच्या जवळ जाऊ लागते. उभ्या दांडावरून चढून मग धम्माल आडवी वाट बहिरीच्या ठाण्यापाशी घेऊन जाते.

स्वत: इथला भूगोल, इथली वाट समजावून घेणं आणि त्यानुसार वाट उलगडत जाणं, यात एक मजा आहे. गाईडशिवाय ढवळे घाटाचा ट्रेक करणं अशक्य नाही. पण, अभ्यास कच्चा असेल, तर भरकटायला होणार हे नक्की!

आता आम्हांला काही ठिकाणी वाटेवर दगड बसवून फरसबंदी बनवलेली दिसली.


'गाढवधोंडी'पाशी पोहोचलो. कधीतरी काही घटना घडते, आणि एखाद्या ठिकाणाला स्थानिक नाव पडतं. पूर्वी पावसाळ्यात अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यासोबत इथून गाढवं वाहून गेली, म्हणून या खडकाला 'गाढवधोंड' म्हणायचं.

वाट आता उभी होवू लागली. समोर माथ्याजवळची धार आणि 'सापळखिंड' जाणवू लागली.

या दाट रानात दडलेली जुन्या अजस्त्र आकाराच्या वृक्षांची संपत्ती पाहून मोठ्ठं समाधान वाटलं. पण, त्याचवेळी वाटेवर ठिकठिकाणी असलेला प्लास्टिक कचरा पाहून ट्रेकर ग्रूप्सबद्दल तीव्र नाराजीदेखील वाटली.
                 
१० - १५ वर्षांपूर्वी आत्तापेक्षा थोडी वेगळी वाट होती म्हणे. चंद्रगड आणि सह्याद्री यांना जोडणाऱ्या सोंडेच्या कुशीतून हळूहळू चढत, माथ्याजवळ 'सापळखिंड' गाठत असत. इथून एक वाट सावित्री खोऱ्यात करंजे-दाभीळ गावांकडे निसटत असे. सापळखिंडीपासून धारेवरची थरारक वाट सह्याद्रीधारेवर बहिरीच्या ठाण्यापाशी नेत असे. मध्यंतरी, दरड कोसळून ही वाट बंद पडल्याने, आता सापळखिंडीपाशी पोहोचता येत नाही. म्हणजेच, आता ढवळे घाटात येण्यासाठी सावित्री खोऱ्यातल्या करंजे-दाभीळ गावांकडून येता येणार नाही, असे वाटते.

नवीन वाट थोडी लांबची, पण सोपी झालीये. सापळखिंडीपाशी न पोहोचता ५० मी खालून वाट आडवं जाऊ लागली.
       
कारवीच्या गच्च रानातून आडव्या वाटेची मज्जा आम्ही अनुभवत होतो.


क्वचित झाडी मोकळी झाली, तर चंद्रगडाचा बेलाग माथा, पाठीमागे महादेव मुऱ्हा, तर त्यामागे मंगळगड डोकावत होते.

आडवी वाट संपली, आणि वळसा घेऊन उभ्या दांडावरून उंची गाठायची होती. डावीकडे सह्यधारेचं रौद्र दर्शन अग्गदी जवळून होत होते. ह्याच कड्याच्या छाताडावरून जाते एक निसटती आडवी वाट. काही क्षणात त्या तो थरार आम्ही अनुभवणार होतो…

खडकाळ उतरंडीच्या पायऱ्यावरून धापा टाकत चढाई चालू झाली.

क्षणभर थबकून मागे बघितलं, तर मंगळगड - महादेव मुऱ्हा - चंद्रगड - जननीचा दुर्ग - रायरेश्वर अश्या जावळीच्या अफलातून मुलुखाचं देखणं दर्शन घडत होतं.
(फोटो साभार: निनाद बारटक्के)
           
उभ्या दांडावरच्या चढाईमुळे एकदम उंची गाठली गेली. सह्यधारेची उंची गाठल्यावर, आता एक ट्रॅव्हर्सचा थरार आमची वाट पाहत होता. काही मिनीटांपूर्वी जो थरारक कडा समोरून बघितला होता, त्याच कड्याच्या छाताडावरून ट्रॅव्हर्स होता. तब्बल १५ मिनिटं ती घसरडी - निसटती - दरडवणारी आडवी वाट चालत होतो. अश्या क्षणी,  शांत डोकं ठेवून, उगा इकडे-तिकडे न बघता आणि अजिबात न रेंगाळता एक एक पाऊल टाकत राहणे,  हे तंत्र ट्रेकर्सनी साधावं लागतं.

अखेरीस, आम्ही पोहोचलो 'ढवळे घाटा'तल्या एका महत्त्वाच्या टप्प्यापाशी - घाटाचा देव बहिरीच्या ठाण्यापाशी.  पाठीमागे किंचित टेकडीसारखे वाटणारे 'कोळेश्वर पश्चिम टोक' (ज्याला काही लोक सुळका पॉईंटसुद्धा म्हणतात) आणि कोळेश्वर पठार खुणावत होतं. या टोकाची जागा मोक्याच्या जागी आहे. पाचगणीमधून देखील हे टोक दिसू शकतं. बहिरीच्या ठाण्यापासून पूर्वेला उतरत जाणारी वाट अडीच - तीन तासात कृष्णा खोऱ्यात 'जोर' गावात जाते.

तर, मूर्तींसमोरची वाट चढते महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट टोकाकडे. ५० मी अप्रतिम दाट झाडी - कारवीमधून आधी पोहोचलो पाण्याच्या टाक्यांपाशी. आख्ख्या घाटात फक्त इथेच पाणी आहे. ढवळे घाटातली ही ३ कोरीव टाकी आणि जवळच्या खोदीव पायऱ्या बघता, हा घाट नि:संशय महत्त्वाचा असणार…

थंडगार पाण्याने सं-जी-व-नी मिळाली. विश्रांती - फोटूग्राफी - खादाडी - हावरटपणा - हास्यकल्लोळ असा ब्रेक घेतला.

ढवळे घाटातील शेवटच्या तासाभराच्या टप्प्यात अफलातून दृश्यं मिळणार होती.
महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट टोकाकडून उतरत गेलेल्या धारेवरून वाट जाते. पाण्याच्या टाक्यांपासून ५० मी उभी चढाई करून, धारेवर पोहोचलो. उत्तरेला मंगळगड - जननीचा दुर्ग - महादेव मुऱ्हा - रायरेश्वर नाखिंदा - कोळेश्वर असं विलक्षण पॅनोरमा दृश्य समोर होतं.
(फोटो साभार: निनाद बारटक्के)

तर, उत्तरेला महाबळेश्वरच्या पश्चिमकड्यांचं आणि प्रतापगडाचं दृश्य होतं.  
(फोटो साभार: निनाद बारटक्के)

मावळत्या दिनकराची किरणं महाबळेश्वरच्या पश्चिम कड्यांना उजळवत होती. एकावर एक लाव्हाचे थर, काळाकभिन्न बेसॉल्ट, भुऱ्या रंगाचे गवताचे टप्पे आणि घिरक्या घेणारा एखादा बेडर पक्षी…
(फोटो साभार: निनाद बारटक्के)

सोपा कातळटप्पा चढून, ऑर्थरसीट टोकापाशी ट्रेक संपवताना सूर्यास्त समीप आला.

(फोटो साभार: निनाद बारटक्के)
     
रौद्रविराट सह्याद्री… सर्वांगसुंदर सह्याद्री…  
मन विलक्षण प्रसन्न झालेलं… जावळीतला 'कामथेघाट - महादेव मुऱ्हा - चंद्रगड - ढवळे घाट - महाबळेश्वर ऑर्थरसीट टोक' असा भन्नाट ड्रीम ट्रेक अनुभवलेला… सह्यमित्रांशी सुरेख दोस्ती झालेली… अप्रतिम अनुभव गाठीस जोडलेले… परतीच्या प्रवासाला निघालो.
पण ट्रेकमध्ये ऐकलेलं बोरघरच्या गावकऱ्यांचं एक वाक्य अजूनही मनात रुंजी घालत होतं…

बोरघरमधून महादेव मुऱ्हा ओलांडून पल्याडच्या खांडजला चाललेल्या एका मामांना कुतुहलाने विचारलं होतं, "आता झालेत की रस्ते, गाड्या पण आल्या. आणि, तुम्ही कशाला या रानवाटा तुडवताय?"
आणि मग आला ट्रेकमधला एक साक्षात्कार 'मोमेंट'. ते मामा म्हणाले,
"अरे पोरा, ही आहे माझ्या 'बापाची' वाट! कितीही रस्ते - वाहनं - विमानं येऊदेत. पण, माझ्या बापाची रानातली वाट मीच चालू ठेवायला पाहिजे, नाही का!"
शुद्ध अंत:करणापासून बोललेले सच्चे शब्द अग्गदी काळजाला भिडले…

… खरंच, आपण ट्रेक्स करतो, राजांचे दुर्ग - किल्ले बघतो, लेणी - मंदिरं बघतो, सह्याद्रीवर प्रेम करतो;
ते कदाचित याच भावनेतून, नाही का…
मनोमन म्हणलं,
… बाप आमचा सह्याद्री …  … आनंददाता सह्याद्री …
… इतिहासपुरुष सह्याद्री … … जीवनदाता सह्याद्री …
… रौद्रविराट सह्याद्री …  … सर्वांगसुंदर सह्याद्री … 
मज प्रियसखा सह्याद्री!!!


------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. टीम: 
पुरुषोत्तम अभ्यंकर, राजा लोकरे, निनाद बारटक्के, नितीन तिडके, जितेंद्र बंकापुरे, कौस्तुभ दातार, निरंजन भावे,  संजय अमृतकर, महेंद्र सिंग, अनुप अचलेरे, गणेश पाटणकर, तुषार कोठावदे, योगेश अहिरे, साईप्रकाश बेलसरे  
२. छायाचित्रे: निनाद बारटक्के, नितीन तिडके, साईप्रकाश बेलसरे
३. अनेकदा हुलकावणी दिलेल्या ह्या ट्रेकरूटवर ट्रेक घडवून आणल्याचं क्रेडीट दत्तू आणि निनाद्राव याचं… त्रिवार _/\_  
४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories. 
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून हा ट्रेकरूट करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित. 
- @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.

11 comments:

  1. Yes. Great trek done by you all. Congrats for such achievements and really appreciate your summary of trek with most beautiful photographs.

    Thanks for reminding my old challenging memories of same trek done by me in 1986 SOLO without much more knowledge of trekking/adventure as a entry into Shiv-Fort visit yatra for 32 forts in 30 days.

    I did this same trek without Nakhinda tok - Aswale khind -- Kamathe ghat section as it was going to exhaust another 2 days which was not planned in my itinerary. That time I was in Air Force and could not able to risk of absentism as it is a great offence in defence.

    Now again on the eve of Shivpunayatithi 2015, I have decided to complete the same trek as mentioned by you SOLO if nobody accompany me during this hot hot april summer at 53.

    So hope that we will meet again and exchange our experiences in person.

    Hope that in future you will continue such challenging treks

    Thanking you

    Regards

    JayHind Jay Shivaraya.

    ReplyDelete
    Replies
    1. जयंतजी:
      ब्लॉगवर स्वागत :)
      प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!
      तुमच्या ट्रेक्ससाठी (आणि ट्रेकला समविचारी ट्रेकर सोबती मिळोत) अश्या शुभेच्छा!!!

      Delete
  2. वाह… as ujjwal… जबरदस्त लेखन… बरेच बारकावे शोधून टिपलेस… छान…
    ह्या ट्रेक ला महिन्याभरा-आधीपासून च्या प्लानिंग ला तुझ्या ऑफिस पाशी भेटलो…
    तुझ्या आणि निनाद्रावांच्या one of the dream treks मध्ये सामील करून घेतलेस…
    १२३५ वेळा धनुर्वाद…
    सर्व गोष्टी जुळून आल्या… ट्रेक यथासांग पार पडला…
    खास दिग्गज लोकांबरोबर ट्रेक करण्यातली मजाच वेगळी…
    एकंदरीत… बढीया…
    धनुर्वाद __/\__

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      जावळी हा प्रकारंच भारीये, त्यात सोबत एक एक अवली ट्रेकर्स...
      मला कित्तीतरी वेळा ठरवून हुलकावणी दिलेला ट्रेक तू आणि निनाद्रावानी मनावर घेतला,
      कामथे आणि महादेव मुऱ्हा हे पेंडिंग; तर चंद्रगड - ढवळे घाट अति प्रिय.. त्यांना परत भेटीचा योग आला.
      उर्वरित प्रदक्षिणा योग कधी येतोय बघू....
      मन:पूर्वक धनुर्वाद __/\__

      Delete
  3. व्वाह !! मस्त वर्णन ..अगदी तपशीलवार .....दमदार तंगडतोड ट्रेक ....काळजाला भिडणारं ''साक्षात्कार मोमेंट ''......एकदा आपल्या संगती अशा ट्रेकला भाग्य लाभू देत.

    ReplyDelete
    Replies
    1. राजेशजी:
      ब्लॉगवर स्वागत :)
      तुमचं सह्याद्रीप्रेम जाणवतंय, कारण तुम्हालाही "अरे पोरा, ही आहे माझ्या 'बापाची' वाट!”
      हे वाक्य भावलेलं दिसतंय... :)
      नक्की जाऊ ट्रेकला एकत्र...
      प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!!

      Delete
  4. मस्त लिखाण, मस्त छायाचित्रे !!

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक सर,
      जावळीची जादू काही औरंच आहे. आत्ताच, परत कधी जाऊ असं वाटायला लागलंय...:)
      खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून..

      Delete
  5. Trek ch varnan ekadam apratim kel aahe ani photography hi ekdam mast aahe
    janu kahi ha trek amhi svataha anubhavat aaho......me he ya trek chya pratikshet aahe...

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर स्वागत मित्रा!
      ट्रेकर दोस्तांना कट्ट्यावर नुकत्याच ट्रेकचं वर्णन सांगावं, त्या ट्रेकला कसं जाशील हे समजावून सांगावं, त्यांनी ट्रेक केलाय त्यांना पुन:प्रत्यय यावा, अश्या हेतूने केलेलं लिखाण आहे.
      तुम्हाला आवडलं - आनंद वाटला. धन्यवाद!

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete