Pages

Saturday, 21 March 2015

ध्यास अज्ञाताचा.. शोध कल्हाटचा..

***आंदर मावळात गवसलं कल्हाटचं अपरिचित कातळकोरीव लेणं ***



ऐसपैस डोंगररांगा आणि दुर्घट कडेकपारी…
मैलोनमैल तुडवत निघालो, कातळ, गडद आणि देवराई…

मास वैशाखाचा, श्वास फुललेला, शोष पडलेला घशाला…
त्रास जीवाला, सोस कशाला हा उन्हां-तान्हांत हुंदडण्याचा…

जोश तरीही भटक्यांचा, अन हौस अनवट स्थळांची…
कोडं मात्र उलगडत नाही, तिथली संस्कृती कोणत्या काळाची… 


दरडवणारा मार्ग संपता, कधी गवसावी ओसाड लेणी… 
कातळशिल्पांना स्पर्श करिता, वाटे जीव लाविला इतका कोणी… 

अन मग, कधी वाटते…
आस ही कसली…
शोध हा कसला…
खरंतर - हा ध्यास अज्ञाताचा…
हा ध्यास विस्मृतीत दडलेल्या संस्कृतीचा…
                                     
… अश्या अज्ञाताच्या ध्यासाने झपाटून 'सह्याद्रीवारी' चालू होती. सध्या हुंदडत होतो तळेगावजवळच्या भामनेर - आंदरमावळ - नाणेमावळ - पवनमावळ अश्या वळणवेड्या नद्यांच्या खोऱ्यात. गजबजलेल्या सहलीच्या ठिकाणांपल्याड मावळातल्या आडवाटेचा एखादा दुर्ग, लेणी, घाटवाटा, राऊळं, देवराया धुंडाळणं-शोधणं चालू होतं. ध्यास एकंच, भटकंती करताना या खोऱ्यात हरवलेल्या कुठल्याश्या जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणा गवसतील का. आंदरमावळातली बहुतांशी गिरीस्थळे बघून झाली, असं वाटायला लागलं. अन, अनपेक्षितरित्या एक रत्न गवसलं.
       
झालं असं, की आमच्या भामनेरच्या भटकंतीचा ब्लॉग वाचून, फेसबुकवर एक मेसेज आला आंदरमावळातल्या 'श्री संभाजी धनवे' यांचा, "...तासूबाईला आलात. गडदची लेणी पाहिलीत. गडदच्या पलिकडे आमच्या कल्हाटगावची लेणी पाहिलीत का तुम्ही. तिथल्या लेण्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी." आंदर मावळात कधीच न ऐकलेल्या-वाचलेल्या अपरिचित लेण्यांची माहिती मिळाल्यावर, अजिब्बात चैन पडेना. पुढच्या काही तासांत भल्या पहाटे संभाजीच्या घरी कल्हाटच्या धनवेवाडीत पोहोचलोदेखील…
             
... आंदरमावळात प्रवेश करताना नदीच्या पल्याड सलग धावणारी तासूबाई रांग, लांबचलांब कातळटप्पा आणि माथ्याजवळच्या पवनचक्क्या खुणावत होत्या.

           
कल्हाटच्या धनवेवाडीला संभाजीच्या घरासमोर गाड्या लावल्या. संभाजी आणि त्याच्या कुटुंबियांच्या अगत्याने फार फार भारावून गेलो. खरंच, सह्याद्रीप्रेमामुळे जुळलेलं मैत्र! 

टाटा मोटर्समधला साकेत, तळेगावचा अमेय, धनवेवाडीचे संभाजी आणि त्याचे भाऊ बाबाजी, सुखदेव, भास्कर असे सगळे जण एकत्र येतात काय, आणि आडवाटांवरची भटकंती करतात काय… खरंच, सह्याद्रीतल्या अज्ञाताचा ध्यास!


   
निघण्यापूर्वी शेजारच्या शेताडीतून हरभऱ्याची हवी तशी गड्डी बनवून चरत निघालो. 


समोरच्या झाडीत मुक्त विहरणाऱ्या 'स्वर्गीय नर्तका'च्या (Paradise-flycatcher, एक पक्षी) दर्शनाने दिलखुष झालं. 

        
कल्हाट गावापल्याड 'तासूबाई'चं राऊळ आणि त्याची थरारक घळ ओळखीची होती. 

     
अर्थात, आज शोध घ्यायचा होता, कल्हाट गावाशेजारच्या अजस्त्र कातळकड्याच्या पोटातल्या गडद गुहांचा. कल्हाटच्या या गुहा नैसर्गिक की इथे काही जुनी खोदाई आहे का, अशी जबरदस्त उत्सुकता दाटून आलेली.    


कल्हाटच्या गुहांपाशी थेट चढाई करणं अवघड आहे. त्यामुळे, मोठ्ठ्या वळश्याच्या वाटेचा 'द्राविडी प्राणायाम'  करणं भाग होतं. पायथ्यापासून गडदगुहा न्याहाळत थेट पलीकडच्या (पश्चिमेच्या) उभ्या दांडावरून चढाई करू लागलो.
            
उभ्या दांडावरच्या वाटेने धाप लागू लागली. पण, माथ्याजवळचा भर्राट वारा, दोस्तांबरोबर गप्पाष्टक आणि कुरकुरणाऱ्या पवनचक्क्यांच्या दृश्याने मज्जा येत होती.      

माथ्यावर पोहोचल्यावर कल्हाटच्या गुहा आमच्या उजवीकडे कातळाच्या पोटात होत्या. म्हणून, उजवीकडे खडकाळ टप्प्यांवरून निघालो. इथल्या रानातल्या गुराख्यांची आणि गिरिजनांची तहान भागवणारा झरा, गुरांना पाणी पिता यावं म्हणून केलेली खोदाई कवतिकाने न्याहाळली.      

झऱ्याच्या जवळून एक घळ दरीकडे उतरताना दिसली. कल्हाटच्या गुहा या माथ्यापासून ५० मी खाली कातळकड्याच्या पोटात असल्याने, त्या पातळीत पोहोचण्यासाठी या घळीतून खाली उतरू लागलो. काटेरी झुडुपे आणि दगड-धोंड्यांमधून कसरत करावी लागत होती. कातळमाथा ओलांडून अलगद उतरणारी कोवळी सूर्यकिरणे आणि वाकलेल्या झाडाच्या फांदीवरची उजळलेली चैत्रपालवी असं सुरॆख दृश्य!


घळीतून उतरत लेण्यांच्या पातळीत उतरल्यावर डावीकडे भव्य कातळकडा दरडावू लागला. इथंवर आलोय, तर खरंच इथे ‘अज्ञात’ काही गवसावं – खरंच कातळकोरीव लेणी सापडली, तर काय धम्म्माल येईल, असं मनोमन वाटलं...

सुरुवातीलाच होता निसटता ट्रॅव्हर्स. पुसटशी कातळपट्टी आणि ७५ अंशात झुकलेला कडा. खाली खोलखोल दरीत गच्च झाडोरा. एक क्षण नजर अक्षरश: ग-र-ग-र-ली.
अश्या क्षणी थंड डोक्याने एकावेळी एका पावलाचा विचार करत, शांतपणे मार्गक्रमण करायचं.

आणि, सामोरं आलं ते 'अज्ञात'….
ज्याच्या ध्यासाने आम्ही इथंवर आलेलो...
आमच्यासमोर उलगडू लागली होती जगाला अल्पपरिचित अशी कल्हाटची लेणी.
इथे काय काय गवसणार, याची उत्सुकता दाटली होतीच.

समोर दिसली एक कातळखोदीव खिडकी. उंचावर होती. कातळ चढून मगंच असेल प्रवेश?

प्रत्यक्षात ही होती दोन ठिकाणी उघडी असलेली गुहा. उजवीकडची दरड चढून गेलो. सोप्पी चढाई.

कातळात खोदलेली आणि दोन बाजूंनी उघडणारी प्रशस्त गुहा. गुहेची खोदाई, सपाटी साध्याच दर्जाची. पण, एक अपरिचित लेणी गवसल्याचा जबरदस्त आनंद आमच्या टीमला झालेला. 

उघड्यावर खोदलेली आयताकृती कोरड्या टाक्यापासून पुढे निघालो.

सहज मागं वळून बघितलं, तर कल्हाटच्या कातळकड्यांचं आणि लेण्यांचं सुरेख चित्र उलगडलं होतं. 

इथल्या लेण्यांविषयी एक मात्र जाणवलं,
की लेणी खोदण्यासाठी कातळाची निवड फारशी योग्य दिसत नाही. काळाठिक्कर कठीण बेसॉल्ट खोदाईला अवघड, म्हणून गंधकयुक्त ठिसूळ खडकांच्या टप्प्यामध्ये मातीच्या थरांमध्ये (green bole) लेणी खोदली आहेत. कातळाची निवड आणि लेणीखोदाई तंत्र - दोन्ही साधारण दर्जाचे!

आता समोर आली, खोलवर खोदत नेलेली आयताकृती मोठ्ठाली कोरडी टाकी. आणखी एक निरीक्षण म्हणजे, ही विशिष्ट पत असलेला कातळ निवडल्याने, खोदलेल्या टाक्यांना कुठेच पाण्याचा झरा नाहीये.
   
टाकी आतून जोडलेली…

माथ्यावर कमी उंचीचं छत ठेवलेलं. तर, मध्यभागी जोडटाकी विभागणारी भिंत शाबूत. अश्या पद्धतीची टाकी बघता, ही लेणी बहुदा लेणीखोदाई तंत्र लुप्त होण्याच्या काळातले - १००० ते १२०० वर्षांपूर्वीची असू शकतील.

पुढं निघाल्यावर कातळाच्या कुठल्या विशिष्ट थराची- दर्जाची निवड लेणी खोदाईसाठी केलीये, ते परत एकदा ठळक दिसलं.

आता समोर होता तीन छोट्या खोल्या असलेला विहार समूह. आधी मोकळा हॉल आणि आत खोदलेले तीन विहार - साधारणतः दिसणारी शिलालेख किंवा दागोबा अशी चिन्हं नव्हती.

आखड उंचीचं प्रवेशद्वार आणि अगदी साध्या खोदाईचे तीन विहार होते.

पायापाशी कातळात एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली. हे माणसानं खोदलेलं नसून बेसॉल्ट खडकातले 'रोपी लाव्हा' अश्मरचना होती.

आत्तापर्यंत दिसलेल्या लेणीखोदाईनं आनंद झाला होताच.
पण, तो आनंद द्विगुणित करणारं आणि अचंबित करणारं असं काहीतरी संभाजीनं आम्हाला दाखवलं. सहज दिसणार नाही, अश्या कातळावर खोदलेलं एक फुटभर  व्यास असलेले एक मुख-शिल्प. (संभाजीनं दाखवलं नसतं, तर हे शिल्प खरंतर अज्जिबात दिसलं नसतं. )

कानात मोठ्ठ्या रिंगसारखी कर्णफुले, तर माथ्याजवळ गोल महिरप, मोठ्ठे बंद डोळे-नाक-जाड ओठ. खरंच, एक अमूल्य ठेवा!!!
कसलं हे शिल्प?
जुनी देवता, की यक्षिण की इतर काही? थोडी निरीक्षणे अशी…
एक म्हणजे, या शिल्पाची खोदाई मुख्य लेण्यांच्या दालनात न करता, कुठेतरी दूरवर उघड्यावर आहे. म्हणजे, या लेणी खोदवण्याचा आणि धर्मप्रचार करण्याचं प्रयोजन नसावं.
दुसरं म्हणजे, स्थानिक लोक या मूर्तीचे पूजन करत नाहीत, म्हणजे हे शिल्प दोन-चारशे वर्षांपूर्वी खोदलेली स्थानिक देवता नक्कीच नाही.

लेणी बघून मन अग्गदी तृप्त झालेलं…
परतीच्या वाटेवर ट्रेक्सच्या - लेण्यांच्या गप्पा परत रंगलेल्या…
रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना परत खटपट आणि धडधड झाली...
संभाजीसारखा नवीन सह्याद्रीमित्र भेटलेला… त्याच्या अगत्याने भारावून गेलेलो…

पण, काही अनुत्तरीत कोडी सुटेनात…
… साधी टूल्स वापरून लेणी खोदायचे अपार कष्ट घेऊन इथेच या डोंगरात ही लेणी का खोदवली असतील?
… कार्ले-बेडसे लेण्यांच्या मानाने अर्वाचीन असूनही कातळाची निवड आणि लेणी खोदाई तंत्र सामान्य दर्जाचे का?
… बाजूच्या नाणेमावळात बौद्ध लेणी आहेत, तरीही इथे कुठेच विशिष्ठ धर्माची चिन्हं कशी नाहीत?
… कुठले हे शिल्प, कधीची ही लेणी.. या पाऊलखुणा कोणाच्या, हे कोडंच!
… आजच्या या अडचणीच्या 'आडवाटा', असतील का कोणे एके काळी 'वहिवाटा'?

खरंच,
आम्हांला आस ही कसली…शोध हा कसला…खरंतर - हा ध्यास अज्ञाताचा…
हा ध्यास विस्मृतीत दडलेल्या संस्कृतीचा…


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: संभाजी धनवे, साकेत गुडी, मिलिंद लिमये, अमेय जोशी, साईली पलांडे-दातार
२. छायाचित्रे साभार: साकेत गुडी, अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे
३. स्थान: http://wikimapia.org/#lang=en&lat=18.857478&lon=73.650670&z=15&m=b&show=/32780329
४. माझ्या अल्प माहितीनुसार या लेण्यांचा कोणी तज्ज्ञ अभ्यासकांनी अभ्यास आधी केला नाहीये. त्यामुळे तज्ज्ञांकडून या लेण्यांबद्दल अधिक माहिती मिळाली, तर खूप आवडेल.
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असूनजबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे२०१५. सर्व हक्क सुरक्षित.

23 comments:

  1. Replies
    1. अमोल,
      ब्लॉगवर स्वागत..
      प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. धन्यवाद!

      Delete
  2. अरे काय सणसणीत टाकी आहेत ही. फार बेस्ट. नेहमीप्रमाणे वाचून आनंद जाहला.
    -(पुढील पोस्टची वाट पाहणारा) पंक्या

    ReplyDelete
    Replies
    1. पंकज,
      ट्रेक्ससाठी ऑफबीट ठिकाणं शोधताना, अशी लेणी गवसल्याचा आनंद मोठ्ठाच...
      मस्त वाटलं तुझी comment वाचून..
      धन्यवाद!!!

      Delete
  3. साई भन्नाट रे... मस्त माहिती देतोयस...

    ReplyDelete
    Replies
    1. अमित,
      धन्यवाद...
      सुदैवाने आसपास अपरिचित जुनी ठिकाणं आहेत.
      मलाच ट्रेक्स करताना आणि ब्लॉग्ज लिहिताना धाप लागतीये...

      Delete
  4. साई, मन:पूर्वक अभिनंदन!…! असाच अभ्यासपूर्ण भटकत राहा आणि लिहीत रहा.
    पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. अजयकाका,
      दिग्गज ट्रेकर गुरुवर्यांनी कवतिक केलं की फार छान वाटतं.
      (अर्थात, तुमच्या कामापुढे आमची चाल 'रांगण्याची' आहे, याची पूर्ण कल्पना आहेच.)
      धन्यवाद!!!

      Delete
  5. वा छान !! मस्त वर्णन केले आहे. छायाचित्रे फार उत्तम.

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक सर,
      खूप खूप धन्यवाद...
      छायाचित्राचं श्रेय अमेय आणि साकेत यांनादेखील...

      Delete
  6. वा मस्त झालाय ब्लॉग साई ... नेहमी प्रमाणेच एक नवीन जागा दाखवलीस भटकायला ... तू नवीन काहीतरी शोधाव आणि आम्ही तुला follow करत तिथ जाव ... धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत::
      धन्यवाद मित्रा..
      नवीन काहीतरी गवसलं, की त्याचा आनंद असतोच.
      त्याचा ब्लॉग वाचून कोण्या भटक्याला तिथे जावून यावसं वाटणं, यात खरं ब्लॉग लिहिण्याच्या प्रयत्नांचं चीज होतं.
      त्यामुळे, या अनवट जागांना भेट दिल्याबद्दल धन्यवाद!!!

      Delete
  7. ​वाह: साई !​
    सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन. खूप खूप धन्यवाद एक अल्पपरिचित लेण्यांची ओळख करून दिल्याबद्दल.
    ​झक्कास 'फोटूग्राफी'......नेहमी प्रमाणेच :)

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश,
      फोटूग्राफी श्रेय अमेय - साकेतला.. लेण्यांची ओळख करून देण्याचं श्रेय संभाजीला..
      मी फक्त निरोप्या!
      प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
      धन्यवाद!!!

      Delete
  8. नेहमीप्रमाणेच जबरदस्त…
    एवढा अनमोल खजिना किती सुंदर पद्धतीने मांडला आहेस…
    फोटोज सुद्धा तेवढेच झकास…
    ह्या अनवट अपरिचित लेण्यांची माहिती जगासमोर आणल्याबद्दल तुझे आभार मानावे तितके थोडे आहेत… तेवढेच आभार "श्री. संभाजी धनवे" ह्यांचेही…
    तुझ्या लेण्यांच्या शोध असाच अविरत राहू दे… आणि असेच सुंदर लिखाण घडत जावो… म्हणजे आम्हाला ही अशीच सह्य-मेजवानी वाचायला मिळेल…
    एकंदरीत बढीया…
    जबरी…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      तुला माहितीच आहे, ट्रेक्स सध्या कमीच होताहेत.
      पण, आंध्रा खोऱ्यातली वारी करत असताना, सुदैवाने संभाजीने ही लेणी सुचवली.
      मावळात असं अजून काय काय दडलंय, कोणास ठावूक..
      आणि, जे थोडकं आपण जाऊन बघतोय - म्हणजे लेणी-घाट-दुर्ग-राऊळ-देवराया - त्याचा पूर्ण अर्थ समजत नाही, ही हूरहूर नक्कीच आहे.
      मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून..
      धन्यवाद!!!

      Delete
  9. क्या बात है….भन्नाट भटकंती. आणि Discover सह्याद्री नावाला पुरेपूर जागणारी !!

    फेसबुकमुळे आपली नाळ कुठे जोडली जाऊ शकते ह्याचं सर्वोत्तम उदाहरण. अवचितपणे हाती गवसलेला संभाजी आता नेहमीच लक्षात राहील !!!

    ReplyDelete
    Replies
    1. ओंकार:
      धन्यवाद दोस्ता.. :)
      एकेक मावळ - घाट - दुर्ग - लेणी - देवराया - राऊळ अशी अपरिचित जागांची खाण आहे आपल्याकडे. त्यामुळे, खरंतर, "Discover सह्याद्री" थीमचा आवाका - वेग - खोली फारसं झेपत नाहीये.. धाप लागतीये..
      खरंय तू म्हणतोय ते, फेसबुकमुळे 'भामा खोऱ्या'चा लेख आंदरमावळातल्या संभाजीपर्यंत पोहोचला आणि सुदैवाने लग्गेच वेळ काढून गेलो. तिथे खरंच, लेणी गवसणं याचा आनंद कित्त्ती मोठ्ठा!!!
      खूप खूप धन्यवाद!!!

      Delete
  10. Wah ! Sai ! Punha ekda solid discovery ! Jiyo ! Mast lihiles.. keep it up

    ReplyDelete
    Replies
    1. यो दोस्ता,
      खूप खूप धन्यवाद....
      सुदैवाने पुण्याजवळ आडवाटांवर एकसे बढकर एक भन्नाट ठिकाणं लपलीयेत..
      कधी वेळ काढतोयस?

      Delete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
  12. मावळ तालुक्यात 10-12 लेणी सहज असतील. त्याचीच माहिती शोधत होतो.तुमचा ब्लाॅग वाचून छान वाटले.उत्तम माहितीबद्दल धन्यवाद 🙏😊

    ReplyDelete