Pages

Sunday, 26 February 2017

राजगडच्या वीरांच्या घाटवाटा...

सुपेनाळ आणि गोप्या घाट

दुर्गराज 'राजगड'च्या सगळ्यात जवळच्या घाटवाटांचं दर्शन घेत होतो. उन्हं उतरंडीला लागलेली. ऊर धपापत होतं - सुपेनाळ आणि गोप्या घाटांच्या चढाई-उतराईने, झुकलेल्या सूर्यकिरणांनी उजळलेल्या आमच्या राजगड-तोरण्याच्या करकरीत दृश्याने आणि वेळवंडीच्या खोऱ्यातल्या अज्ञात वीरांच्या स्मारक-वीरगळांच्या दर्शनानेही! ट्रेकरदोस्तांसाठी ट्रेकची ही संक्षिप्त टिपणे...

                                 
घाटवाटांचा अंदाज यावा, म्हणून कच्चा नकाशा...

               
ट्रेकआधी:
भल्या पहाटे निघून भोरपासून पुढे धुक्यात हरवलेल्या आळसावलेल्या नीरा देवधर जलाशयाच्या बाजूने जात, वरंध घाटातील द्वारमंडप (धारमंडप) गाठला. वरंध घाटाचा रस्ता सोडून उजवीकडे सांगवीचा रस्ता घेतला.

         
पश्चिमेला वरंध घाटातील कावळ्यादुर्ग, त्याचा न्हावी सुळका,  वाघजाई आणि समोर उत्तरेला दुर्गराज राजगड आणि तोरणा कोवळ्या उन्हांत न्हाहत होते. भाटघर-येसाजी कंक जलाशयाचे पाणी चमकत होते. शिळिंब मागे टाकून कुंड गावाजवळ थबकलो. कुडकुडत थर्मासमधला गरमागरम आल्याचा चहा आणि उपीट अशी न्याहारी करताना, घाटवाटांच्या स्थाननिश्चितेच्या गरमागरम चर्चेला ऊत आला. समोर शिवथर खोऱ्यात उतरणाऱ्या शेवत्या-मढे-उपांड्या-आंबेनळी-गोप्या-सुपेनाळ या घाटवाटा नक्की कुठे यावर छाती ठोकून पैजा मारल्या गेल्या. रानांत हुंदडायला निघालेल्या गाई-शेरड्यांना हाकत, उजवीकडचा भोरला रस्ता सोडला. डावीकडे डांबरी रस्त्यावरचा उभा उतार उतरला. सांगवी गावाच्या अलिकडे पोल्ट्री फार्मपाशी गाडी लावली. पाठपिशवी चढवून ट्रेकला सुरुवात झाली. वाटा शोधण्याची खुमखुमी, म्हणून वाटाड्या घेतला नाही. वेळ सकाळचे ९.
                
सुपेनाळ:
  • घाटमाथ्यावरचे गाव: सांगवी, तालुका भोर, जिल्हा पुणे
  • कोकणातले गाव: शिवथर, जिल्हा रायगड
  • स्थानवैशिष्ट्य: देशावरच्या वेळवंडी खोऱ्यातल्या सांगवीतून कोकणातल्या शिवथरला उतरणारी - सर्वात जवळची वाट
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: वाटेत कातळात क्वचित खोदीव खोबण्या. राजगडावरून शिवथरघळीला जायला मुख्यत: गोप्या घाट मुख्य वाट असली; तरी जवळची म्हणून सुपेनाळीचाही थोडका वापर केला जात असावा.
  • वाटेत पाणी: नाही
  • ऋतू: नाळेची वाट असल्याने पावसाळा टाळून गेलेलं बरं
  • निवारा: सांगवी/ बोपे गावात
  • उतराई: ३०० मी (घाटाच्या पदरापर्यंत)
  • वेळ: १.५ तास
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा: 
सांगवीच्या शेताडीत बांधलेल्या बैलांच्या अंगावर उड्या मारत, बगळ्यांची उगाच लगबग चाललेली. सांगवीमधून पंधरा मिनिटात झुडूपी रानातून चालत सह्यधारेपाशी पोहोचलो. तीन बाजूंनी सह्यमाथ्याने वेढलेल्या शिवथर खोऱ्याचे आणि आडव्या-तिडव्या पसरलेल्या झाडीभरल्या दऱ्यांचे खोलवर दर्शन झालं. सह्याद्री माथ्यापासून ३०० मीटर उभ्या कातळकड्यांच्या गर्द झाडीभरला पदर - सपाटी होती. शिवथरघळीसाठी पदरातून अजून ३०० मीटर उतराई आहे.

               
गूगलमॅप्सचा अभ्यास करून आपण ट्रेकला जातो. पण, अरुंद नाळेतली सुपेनाळेची जागा गूगलमॅपवर सपशेल झाकली जाते. अग्गदी सुदैवानेच तिथे एक मामा भेटले आणि सुपेनाळेची अचूक वाट कळली. दगडांचा ढिगारा ही पहिली खूण आणि समोर सर्वात अलीकडे दिसणारी अस्पष्ट घळ म्हणजे सुपेनाळेची सुरुवात.

     
घाट उतरायला सुरुवात केली. वाजले होते सकाळचे ९:३०.
उभ्या अरुंद निसरड्या पावठीवरून जात, नाळेकडे वाटचाल सुरू केली.

       
ट्रॅव्हर्स मारून सुपेनाळ गाठायची होती. मुख्य नाळेची उतराई कशी असेल, याची उत्सुकता लागलेली.

         
सुपेनाळेचे प्रथम दर्शन. गुगल नकाशात अजिब्बात न दिसणारी, लपून गेलेली.

         
नेहेमीची गोटेआळीतील उतराई सुरू. हळूहळू तीव्र उतार.

     
सुपेनाळेतून आता डोकावू लागलं शिवथर खोरं. अजस्त्र डोंगरांवरून धबाबा आदळणाऱ्या दावणीचा व्हिरा (धबधबा), बामणव्हिरा (धबधबा) या धबधब्यांच्या जागा जाणवत होत्या.

         
सुपेनाळ अशी कित्ती उतरत जाणार याचा पत्ता लागेना. पावसाळ्यात इथे काय रौद्र दृश्य असेल, याची कल्पना करवेना. सुपेनाळ कुठेतरी वाहता ओढा सोडून डावी-उजवीकडच्या दांडावरून उतरणार, याची खात्री होती.

                   
नाळेतली उजवीकडे निसटणारी बारीक वाट घेऊन, ५० मी उतरलो आणि लक्षात आलं, ही वाट परत नाळेच्या प्रवाहात घेऊन आलीये. सुपेनाळेच्या पेपरातला "ड" गटातला - आऊट ऑफ सिलॅबस - प्रश्न आला. मिलिंदची खोलवरून हाक आली, "वाट नाही रे, दणदणीत फॉल आहे इथून धबधब्याला. आता?"

             
मुळात आपण उतरतोय, हीच सुपेनाळ आहे ना.. इथंपासून प्रश्न डोक्यात! अर्थात, गावातल्या मामांनी नाळेची वाट नक्की सांगितली असल्याने, आम्ही उतरताना कुठेतरी वाट चुकलो होतो हे नक्की! आल्या पावली उलटं फिरून, परत चढू  लागलो. 'रीवर्क' आल्यावर कष्ट ठळकपणे जाणवू लागले. मगाशी जिथून नाळ सोडून उजवीकडची पायवाट घेतलेली, तिथे चढून येईपर्यंत घामटं निघालं. बारकाईने बघितल्यावर २० मी उतरल्यावर, डावीकडे जाणारी मळलेली वाट खुणावत होती. सुपेनाळेचं "ड" गटातलं गणित सुटू लागलं होतं.

       
नाळेच्या प्रवाहातून उतरणं टाळून, डावीकडच्या दांडावरून उतरणारी मळलेली पण छोटीशी वाट गवसली. वाटेतल्या कातळात खोबण्या खोदलेल्या.

         
तीव्र उतार आणि उन्हांचा ताव चांगलाच जाणवत होता. पण, समोरचं भन्नाट दृश्य उतराईचे कष्ट विसरायला लावत होतं!

               
अवघड जागी वाट खचू नये म्हणून, गावकऱ्यांनी आधारासाठी दगड रचलेले.

                       
सांगवी गावातून निघून सुपेनाळेची ३०० मी उतराई करून, पदरात पोहोचायला दीड तास लागलेला. वाट शोधण्याची खुमखुमी पणाला लागलेली आणि शिवथर खोऱ्याच्या अफाट पॅनोरमाने आम्ही खूष! वाजलेले १०:५०.

               
पदरातून वर माथ्याकडे बघितल्यावर सुपेनाळ नक्की कशी उतरलो, हे अंदाजेच सांगणं शक्य होतं. त्यातल्या त्यात कमी उंचीच्या भागातून उजवीकडे उतरलेली सुपेनाळ, अग्गदीच झाकोळली गेली होती.

                 
पदरातल्या गच्च झाडोऱ्यातून आता पश्चिमेला आडवं निघालो. आम्ही तळात शिवथर गाठणार नव्हतो. पदरातूनच गोप्या घाट चढणार होतो. "सह्याद्रीची वाडी" असं काव्यात्मक नावाच्या वाडीत पोहोचलो. वेळ ११:१०.

       
विश्रांती, थोडका खाऊ आणि गप्पा यामुळे ट्रेकर्स तरतरीत झाले. वेळ ११:३०.

                   
गोप्या घाट:
  • घाटमाथ्यावरचे गाव: कुंबळे/ बोपे, तालुका भोर, जिल्हा पुणे
  • जवळचा दुर्ग: राजगड, तोरणा
  • कोकणातले गाव: शिवथर, जिल्हा रायगड
  • स्थानवैशिष्ट्य: दुर्गराज राजगडापासून कोकणात शिवथरघळीपाशी उतरायला सर्वात जवळची घाटवाट
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: घाटमाथ्यापाशी पाण्याचे खोदीव टाके आणि गद्धेगाळ; घाटाजवळ बोपे गावी असंख्य वीरगळ
  • वाटेत पाणी: घाटमाथ्यापाशी पाण्याचे खोदीव टाके
  • ऋतू: बारा महिने कधीही. मात्र, पावसाळ्यात घाटमाथ्याजवळ वेळवंडीचं पात्र पार करणं अवघड/ अशक्य होवू शकते.
  • निवारा: कुंबळे/ सांगवी/ बोपे गावात
  • चढाई: ३०० मी (घाटाच्या पदरापासून)
  • वेळ: १.५ तास
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा:
गोप्या घाटाची सुरुवात सापडणे फार अवघड नव्हते. सह्याद्रीची देखणी टोके खुणावत होती. गोप्या 'घाट'वाट असल्याने, कमीत कमी उंचीची खिंडीतून वाट असणार असा अंदाज बांधला.                              

                 
सह्याद्रीच्या वाडीपासून पश्चिमेला पठार गाठलं. झाडीभरल्या गोप्या घाटाचं सुरेख दर्शन झालं.

                     
गच्च झाडोऱ्यातून निवांत वळणं घेत चढत जाणारी वाट. ठिकठिकाणी दगडं बसवून फरसबंदी केलेली. दगड-धोंडे-झुडुपांमधून जाताना मिट्ट शांतता. वारं बिलकूल नाही. आर्द्रतेने घामटं निघालं. अधूनमधून सावली-उन्हांच्या लपाछपीतून उजळलेली पानं.

       
घाटाच्या चढाईच्या दरम्यान दोन-तीनदा गावकरी भेटले. आजच्या जगात बहुतांशी घाटवाटा मोडत चालल्या असताना, गोप्या घाटातला गावकऱ्यांचा वावर सुखावून गेला. दगडांवर स्थानिक मुलांनी खडूने लिहिलेली नावं मनोरंजक होती.

           
हळूहळू गोप्या घाटाची घळ अरुंद होत गेली. झाडोरा थोडका कमी झाला. घळीच्या उभ्या दरडी, गवताच्या झुंबाडे आणि लख्ख मळलेली वाट.

               
घाटमाथा जवळ येऊ लागला. शिवथर खोऱ्याचं आणि सह्यरांगांचं विस्तृत दर्शन झालं.


रखरखीत उन्हांत खुरट्या झुडुपांमधून उभ्या चढाची वाट. घामेजलेले ट्रेकर्स माथ्याकडच्या कातळउंचीचा अंदाज घेत होते.

           
अवघ्या वाटेवर दगडांचा खच. धस्सक-फस्सक करत चढताना धाप लागली.

       
गोप्या घाटाची खिंड आता खुणावू लागली.


आणि, अखेरीस समोर आली गोप्या घाटाच्या माथ्यावरची घनगर्द झाडीची कॅनोपी...


घाटमाथ्याच्या थंड वाऱ्याने सुखावलो. डावीकडे झाडाला एक उभट आकाराचा दगड वैशिष्ट्यपूर्ण होता. बारकाईने पाहिलं, तर तो चक्क कोरलेला 'गद्धेगाळ' (ass-curse-stone) असावा. माथ्यावर शिवलिंग असू शकेल. कोरीवकाम फिकट झालेलं. शिलालेख नाही. 'दिलेलं दान जो कोणी हिरावू पाहील त्याला भीती घालणारे शिल्प म्हणजे गद्धेगाळ'. हे शिल्प गद्धेगाळच असेल ना? आणि, असेल तर ते इथे गोप्या घाटात का असेल? गोप्या घाटाचं संरक्षण आणि जकातीच्या वसुलीचा हक्क राखणारा हा 'गद्धेगाळ' असेल का? कुणास ठाऊक!!!

         
अजून एक आश्चर्य आमची वाट पाहत होतं. खिंडीतून उजवीकडे थोडक्या उंचीवर चढणारी वाट घेऊन गेली, पाण्याच्या खोदीव टाक्यापाशी. टाक्यातलं थंSSड पाणी पिऊन ट्रेकर्स तृप्त! राजगडाच्या जवळच्या घाटात या सगळ्या ऐतिहासिक खुणा गवसणं, अपेक्षितच होतं म्हणा!

                   
सावलीत दोन घास खाऊन विश्रांती घेतली. उत्तरेला उतार उतरून बोपे गावच्या हद्दीत आलो. वेळवंडीवरच्या येसाजी कंक जलाशयाचं पाणी पावसाळ्यात बोपे गावापर्यंत येतं. पावसाळ्यात हे पाणी पार करणे अवघड असल्याने गोप्या घाटाचा मार्ग ट्रेकर्ससाठी बंद होऊ शकतो. जलाशयाच्या कोरड्या उजाड पात्रातून आता पूर्वेला सांगवीकडे निघालो. 

           
बोपे गावच्या हद्दीतल्या मारुतीच्या जुन्या - आता जीर्णोध्दारीत - राऊळापाशी पोहोचलो. 


गोप्या घाटाचा परिसराने इतिहासाच्या आठवणी ऊरात कश्या जपल्यात, हे सांगणाऱ्या पाच-पन्नास वीरगळीचा वारसा राऊळासमोर होता.      

             
राजगडच्या कुशीतल्या, वेळवंडी खोऱ्यातल्या, बोपे गावतली ही शौर्याची स्मारके कोण्या अज्ञात वीरांची असावीत!!!        


              
ट्रेकच्या अखेरच्या टप्प्यात आता येसाजी कंक जलाशयाचं रेंगाळलेलं पाणी बाजूला ठेवत पूर्वेला सांगवीकडे निघालो. 

                
निवडूंगाच्या काट्यांमध्ये उमललेलं ऑर्किड सुखावून गेलं. 

            
उजवीकडच्या टेपाडावरील झापावर थंडगार पाणी रिचवून, आता झाडीभरल्या खिंडीकडे निघालो. आघाडीला होता खंबीर ट्रेकभिडू - मिलिंद लिमये!            

कारवीचा बहर दोन महिन्यांपूर्वी ओसरलेला. कारवीचा चिकट रस-गंध आमचे कपडे आणि सॅकवर बराच वेळ रेंगाळत राहिला होता.

मागे वळून पाहिल्यावर, वेळवंडी खोऱ्यापलिकडे प्रचंड पसरलेल्या दुर्ग तोरणा नजरेत मावेना...


झुकलेल्या सूर्यकिरणांनी उजळलेल्या आमच्या दुर्गराज राजगडाच्या करकरीत दृश्याने सुखावलो...       

चढ चढून झाडीभरल्या खिंडीत पोहोचलो. ट्रेक आटोक्यात आलेला. सांगवीगाव १५ मिनिटं अंतरावर होतं.

दुर्गराज राजगडच्या सगळ्यात जवळच्या घाटवाटांचं दर्शन घेण्याच्या ट्रेकमध्ये खूप काही गवसलेलं आणि अनुभवलेलं. ६ तास आणि १० किमी चाल करून, सुपेनाळ आणि गोप्या या सुरेख घाटवाटांचा ट्रेक झालेला. वेळवंडी खोऱ्यातून दिसणारं - संजीवनी माची-बालेकिल्ला-सुवेळा माची असं - राजगडचं अनुपम सौंदर्य दीठीत साठवत वाटा तुडवल्या. उभ्या उतराईची पण कातळात सपशेल लपलेल्या देखण्या सुपेनाळेची उभी उतराई, शिवथर खोऱ्याचा अफाट पॅनोरमा, उष्म्याने दमवणारी गोप्याघाटाची निवांत वहिवाट, गोप्या घाटाच्या ऐतिहासिक खुणा - माथ्यावरचा गद्धेगाळ(?) आणि पाण्याचे खोदीव टाके, टाक्यातलं थंSSड पाणी, बोपे गावच्या राऊळात दुहेरी शाळुंका शिवलिंग आणि वीरांच्या शौर्याची स्मृती जागवणारे पाच-पन्नास कोरीव वीरगळ, झाडावरचे ऑर्किड्सचे झुबके आणि निखळ रानव्यातून रानवाटांवरून भटकतानाचा प्रसन्न अनुभूती... सारंच अनुपम, अद्वितीय, अफलातून आणि अविस्मरणीय!!! खिंडीतल्या झाडोऱ्यात घमघमणाऱ्या कारवीचा गंध अनुभवत निवांत पहुडलो... राजगडच्या घाटवाटांनी तृप्त केलेले...        
                      


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. कृतज्ञता: मित्रवर्य निनाद बारटक्के. "सुपेनाळ" या अनवट घाटवाटेच्या माहिती आणि मार्गदर्शनाबद्दल. अन्यथा हा ट्रेक कधीच नसता केला.
२. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

26 comments:

  1. Jabardast Mitra.....Khoop mast lihile aahe..Aata amcha yog kadhi yeto te pahayche :-) :-)

    ReplyDelete
  2. छानच साई....

    ReplyDelete
  3. साईदा, दर्जेदार लिखाण- नेहमी प्रमाणे, नवीन मांडणी झ्याक जमलीय.
    सह्यभक्तांना जे मुक्त हक्क देतो ना ह्या ओळी मला फार आवडतात.
    फोटो सुरेख👌

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर व तपशीलवार माहिती असलेला लेख. फोटो सुरेख!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. :)
      ट्रेकरदोस्तांना या वाटा बघाव्याश्या वाटाव्यात, पण वाट शोधण्याची मजाही राहावी,
      अश्या पद्धतीने नकाशा रेखाटन आणि मोजकी माहिती लिहिण्याचा प्रयत्न आहे.

      Delete
  6. नेहमीप्रमाणे दर्जेदार लेख."वाटा शोधण्याची खुमखुमी, म्हणून वाटाड्या घेतला नाही".हे खुप आवडले, थोडा अभ्यास करून स्वत: वाट शोधण्याचे कष्ट घेण्यात जी मजा आहे. ती वाटाड्यामागे झापडं लावून गप्पा मारत जाण्यात मुळीच नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद..
      अग्गदी खरी गरज असेल तिथे वाटाड्या हवा, त्याच्याकडून वेगळी माहिती मिळतेच.
      पण, कॅल्क्युलेटर-गुगलच्या जमान्यात वाटेचं कोडं स्वत: सोडवण्यापेक्षा, वाटाड्या घेऊन आपण पटकन निसटू पाहतोय का, हा विचार हवा...

      Delete
  7. जबरी...
    इसपु २००९ साली मुसळधार पावसात गोप्या घाट केला होता त्याच्या आठवणी ताज्या झाल्या...
    'ड' गटातला आऊट ऑफ सिलॅबस चा प्रश्न : हे गणित जमून गेलंय...
    नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन...
    निनादरावांकडून माहिती मिळाली म्हणजे चुकण्याचा प्रश्नचं नाही...
    मॅप मधील रेखीव मराठी हस्ताक्षर एकदम झकास... आणि मॅप हि झकास...
    सुपेनाळेचं सूप जमून आलंय...

    ReplyDelete
    Replies
    1. वाह, पावसात गोप्याघाटाची मज्जा काही औरच असणार..
      अति जास्त माहिती देण्यापेक्षा, डोंगरयात्रा टेम्प्लेटसारखं ट्रेकर्ससाठी मोजकीच गरजेची नकाशा रेखाटन आणि माहिती लिहिण्याचा प्रयत्न आहे.
      निनाद्रावनी छानच ट्रेक सुचवला.
      धन्यवाद :)

      Delete
  8. साई मस्त ब्लॉग! या दोन घाटवाटांची विस्तृत माहिती दिल्याबद्दल आभार. घाटमाथ्यावरचे गाव आणि पायथ्याचे गाव व दिलेली इतर टिपणे उपयुक्त

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. :)
      ट्रेकरदोस्तांना या वाटा बघाव्याश्या वाटाव्यात, पण वाट शोधण्याची मजाही राहावी,
      अश्या पद्धतीने नकाशा रेखाटन आणि मोजकी माहिती लिहिण्याचा प्रयत्न आहे.

      Delete
  9. छान मुद्देसूद टप्प्याटप्याची मांडणी एकदम मस्त... घटवाटा करून आल्याचा अनुभव आला. :)

    ReplyDelete
  10. साई काय भन्नाट लिहिला आहेस आणि माहिती तर अप्रतिम दिली आहेस

    फोटो आणि माहिती वाचून थोडे-फार कष्ट घेता ह्या वाट नक्कीच करता येतील

    तुझा ब्लॉग होमवर्क म्हणून खूप उपयोगी आहे.


    अजून मला घाट वाटांचा चस्का नाही लागलाय पण तुझ्या ब्लॉग मधून सुंदर सफर घडून येते

    ReplyDelete
  11. मस्तच साई दादा , ल व क र च जावं लागनार

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. साई म्हणजे हुकमाचा एक्का...
    तुझ्या भटकंती वरच्या लिखाणाकडे बिनदिक्कत जाता येतं...तिथे चांगलंच असतं!

    अनेक शुभेच्छांसह 👍

    ReplyDelete