Pages

Tuesday, 1 October 2013

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस

..ट्रेकर या प्राण्याबद्दल लोकांचे गैरसमजंच जास्त. २४ तास ट्रेकिंगच्या विचारात - ट्रेकमित्रांमध्ये रमलेला, वीकएंडला घरच्यांना सोडून एकटा उंडारणारा. अन् धम्माल मज्जा मारणारा. 

...पण, खरं सांगू हा 'गरीब बिच्चारा' एकीकडे 'व्यवसाय/नोकरी आणि कुटुंब', अन् दुसरीकडे 'सह्याद्रीची हाक' अश्या परस्परविरोधी मागण्यांनी नेहेमीच गांजला असतो. त्यातंच हल्ली ‘नवीन’ किल्ले बघायचे असतील तर मुंबई-पुण्यापासून खूप लांबचा प्रवास अटळ झालेला. काय करावं...

...अन् मग एके दिवशी ट्रेकर्सनी शोधली ‘सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस’!!! याच स्पेशल एक्सप्रेसची ठळक वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच:

१. ऑफिस संपवून शुक्रवारी रात्री एका इंडिकामधून प्रस्थान. इंडीकाची 'शोभा जाणं' वगैरे प्रकार नसल्याने, सॅकचा भार घ्यायला कॅरियर असतंच.


२. प्रवासात हायवेवर फाजील साहस नाही, या नियमाचं पालन केलं जातं.

३. अमुक ठिकाणी खादाडी, तमुक ठिकाणी ढाब्यावरचं रुचकर भोजन अश्या रुढींचं अचूक पालन केलं जातं. गडावरचं टाक्यातले किंचित कण असलेले पाणी पिणारे हेच ट्रेकर्स ढाब्यावर कधी पाणी विकत घेतात. भोजनानंतर दर दीडेक तासानं मसाला दूध किंवा आल्याचा चाय हव्वाच नाही का..


४. चर्चेला विषय एकंच: झालेले-होऊ घातलेले ट्रेक्स हाच. अर्थातच, ऑफिसचा विषय हा फाऊल समजण्यात येतो..

५. क्वचित, रस्त्यात दिसणारे फासेपारधी, रस्त्यावर टाकलेले बाभळीचे काटे भेदरवतात..

६. कधी 'ये रात भीगी भीगी', 'तूम जो मिल गये हो', 'अभी ना जाओ छोड के', 'पल पल दिल के पास', 'माना जनाब ने पुकारा नही', 'ओ साथी रे' पासून, ते 'तरुण आहे रात्र अजुनी', 'अताशा असे हे' पर्यंत - अवीट गीतांचे सूर प्रवासात भरून राहतात... भारून टाकतात...

७. सह्याद्रीत अंतर्भागात तरस, उदमांजर, साळींदर, हरणं, ससे हमखास दर्शन देतात.
*** एकदा हरिश्चंद्रगडाच्या रस्त्यावर तरस आमच्या गाडीसमोर दौडत राहिला. हा पहा व्हिडीओ:: http://www.youtube.com/watch?v=jOi0Jf-eT7I&feature=youtu.be
(Video credit: Aniruddha Kotkar)

८. काही क्षण 'कातील' असतात. हवेत सणसणीत गारवा असतो. मैलोनमैल कोणी दिसत नसताना, गाडी रस्त्याच्या मध्ये थांबवायची. गाडीचा आवाज थांबला, की शांततेत तो आवाज कित्ती मोठ्ठा येत होता याची जाणीव होते. आता दूरवरून एखाद्या राउळात घुमणारे टाळ-मृदुंग हलकेच कानी पडू लागतात. अश्या वेळी डांबरी रस्त्यावर पाठ टेकवून आभाळातल्या आकाशगंगेचं सौंदर्य अनुभवणं, यासारखं सुख ते काय! तर कधी एखाद्या भन्नाट गडाचा भव्य आकार चंद्रप्रकाशात उजळला असतो...


९. रात्री ३ वाजता पोहोचल्यावर मुक्कामाची जागा शोधणे, हे कर्म कठीण असलं; तरी दर वेळी भन्नाट जागा गवसतात.


१०. सक्काळी ट्रेकसाठी मंडळी फ्रेश!!!! इंडिकाकडे कोण्या स्थानिकाला लक्ष ठेवायची विनंती करून कूच करायचं..


११. सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस फक्त पठारी किंवा कोकणातल्या एकांड्या किल्ल्यांसाठीच वापरण्यात येते. घाटवाटा अन् तंगडतोड डोंगररांगा स्पेशल ट्रेकसाठी तडजोड नाही. दिवसाभरात अधाश्यासारखं जास्तीत जास्त किल्ले, मंदिरं बघत हुंदडायचं. अर्थात अजिबात न उरकता, पण वायफळ टाईमपास न करता..

१२. अटळ असलेल्या सूर्यास्ताबरोबर सह्याद्रीला अलविदा करून दुरांतो एक्सप्रेसनं परतीचा प्रवास सुरू करायचा.. सह्याद्री अजूनही अंधारात एक एक खुबी उलगडून दाखवत असतो...


१३. शरीर थकलं असतं, ते जाणवत नाही, पण मन मात्र खरंच जड झालेलं असतं.. होणारच, काही हरकत नाही. दरम्यान, पुढच्या दुरांतो एक्सप्रेस ट्रेकच्या चर्चा अन् बुकिंग जोरात चालू झालेलं असतं...


विशेष सूचना:: अर्थातचं, पूर्वतयारी - पूर्वानुभवाच्या रिझर्वेशनशिवाय ही सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस पकडणं, हे धोक्याचं!!!

- © Discoverसह्याद्री (साईप्रकाश बेलसरे)

No comments:

Post a Comment