Pages

Thursday, 24 July 2014

अरण्य-दुर्ग(म)-वाटा






मुडागडची पाज - मुडागड - काजिर्डे घाट - शिवगडची पाज 
(* अरण्य-दुर्ग(म)-वाटा  =  कोल्हापूरचे अरण्यदुर्ग - दुर्गम घाटवाटा - अरण्यवाटा)
  
मे महिन्यातलं ऊन अग्गदी मनस्वी तापलेलं…
आभाळात विखुरलेले चुकार ढग मॉन्सून येण्याच्या तुता-या वाजवत नुस्तेच गडगडाट करताहेत
सावली म्हणून तर या ढगांचा उपयोग नाहीच, पण आर्द्रतेने आणि तहानेने जीव अधिकंच व्याकूळ होत चाललेला…
थकव्याने आता पाय लटपटताहेत…
पण एकापाठोपाठ एक येणारे उभ्या डोंगरधारेवरचे घसरडे चढ-उतार काही केल्या संपत नाहीयेत…
'आता पुरे' म्हणायची - जरा विसावायची शक्यताच नाही, कारण अजून एक चिंचोळा उभा कातळटप्पा धमकावत असतो...
कधी बाजूच्या भुसभूशीत उतरंडीवर रेलत रेलत कसरत करावी, तर कधी हाती धरलेली कारवीची काटकी तुटून हाती यावी... 
अचानक - कुण्या एकाचा पाय घसा-यावरून किंचितसाच सरकतो, अन दगडाचा एक ढलपा गडगड-गडगड-धाडधाड-धाडधाड करत सुसाटतो... बापSSरे, दोबाजूस अक्षरश: काही इंचांवर  कोसळलेल्या द-यांची 'जाणीव' बराच वेळ होत राहते...
कोल्हापूरचे अरण्यदुर्ग, दुर्गम घाटवाटा आणि अरण्यवाटांवरचा थरार अजूनही मनी रुंजी घालतोय… 
...............................................................................................................................................
 

   
दुर्गम अरण्यट्रेक खुणावतोय…    
     … अजय ढमढेरेकाका आणि जितेंद्र बंकापुरे (ऊर्फ दत्तू) मित्र मंडळाने अगत्याने एका सणसणीत ट्रेकचं आवतण धाडलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांच्या पश्चिमेला सह्याद्री घाटमाथ्याजवळ लपलेले -  निबिड अरण्य, वन्यजीव, मुडागड-गगनबावडा-शिवगड हे अरण्यदुर्ग, दुर्गम अरण्यवाटा आणि कोकण-घाटमाथा जोडणा-या दोन-चार घाटवाटा धुंडाळण्याचा बेत होता. मोहीम भन्नाट होती, शंकाच नाही... 

     … अजयकाका आणि दत्तू यांच्या नेतृत्त्वाखाली, ट्रेकर मंडळींच्या प्रयत्नातून आणि कित्येक दिवसांच्या नियोजनानंतर 'ट्रेक उभा राहिला'. खाजगी गाडीने निघाली ११ जणांची पलटण. रात्रभर प्रवास. हायवेवरचा चहा, प्रवासातली माऊथऑर्गनवरची अवीट गोडीची गाणी आणि धम्माल रंगलेलं गप्पाष्टक. कोकरूड घाटामार्गे मलकापूर आणि पुढे अणुस्करा घाट गाठला. झोप जेमतेम तासभराची, रस्त्याशेजारच्या पारावर. उजाडता उजाडता निघालो. मे महिना असूनही, मिळालेलं ढगाळ वातावरण आणि आसपासचा रानवा बघून आम्ही खूष. इतिहास नोंदवतो की याच अणुस्कुरा घाटाच्या पाऊलवाटेने उतरून शिवाजीराजे मलकापूरहून राजापूरला कोकणमोहिमांसाठी गेले असावेत. हल्ली काही वर्षांपूर्वीच 'अणुस्करा घाटवाटे'चा गाडीरस्ता तयार झाला आहे.

     …पाचल - मूर अशी गावं मागे टाकत अखेरीस प्रदीर्घ प्रवासानंतर ट्रेकचं आरंभस्थळ - कोकणातले 'काजिर्डे' गाव गाठले. साधं टुमदार गाव. तुडुंब भरलेली विहिर. कौलारू मंदिर आणि अगत्याने चौकशी करणारे गावकरी. सह्याद्रीची माया लाभलेली. पूर्वेला सह्याद्री माथा ७०० मी उठवलेला, पण अजूनतरी आम्हांला अतिशय अपरिचित - धूसर भासत होता.. डोंगरसोंडांवरच्या झाडीचा गर्द हिरवा रंग दीठि सुखावून गेला. उजवीकडे आग्नेयेला दिसणारं घाटमाथ्याचं सर्वोच्च टोक म्हणजे 'दुर्ग मुडागड' आणि त्याची पश्चिमेला उतरलेली धार म्हणजे 'मुडागडची पाज' नावाची दुर्गम घाटवाट.

मुडागडच्या अरण्यवाटांच्या शोधात.. 
     काजिर्डे गावातून पूर्वेला शेताडीतून सह्याद्रीकडे निघाल्यावर, डावीकडे एक अजस्त्र धोंडा बाजूला ठेवला. 'म्हातारधोंड' नाव म्हणे त्याचं. वाघोटण नदीसोबत समोर पूर्वेला जाणारी पाऊलवाट 'काजिर्डे घाटा'ची. तर, उजवीकडच्या धारेवरून चढणारी अडचणीची वाट 'मुडागडच्या पाजे'ची.



     या भागाचं भूराजकीय महत्त्व असं, की इथे आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पन्हाळा तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा राजापूर तालुका यांना जोडणारी ऐतिहासिक घाटवाट म्हणजे ‘काजिर्डे घाट’. या घाटाच्या रक्षणासाठी किंचित दक्षिणेला निबिड अरण्यात ‘मुडागड’ हा किल्ला बांधण्यात आला होता. मुडागडपासून पश्चिमेला खोऱ्यात उतरणा-या उभ्या धारेवरून चढणारी ‘मुडागडची पाज’ ही अतिशय अडचणीची वाट. कोल्हापूर भागात घाटवाटांना ‘पाज’ असं म्हणतात. तर अश्या या अरण्यातली ‘मुडागडची पाज’ चढून ‘मुडागड’ बघायचा आणि मग उत्तरेला ‘काजिर्डे घाटा’ने परत कोकणात उतरायचं, असा ट्रेकच्या पहिल्या दिवशीसाठी खणखणीत बेत होता.


     एका दिवसात दोन घाटवाटा आणि एक अरण्यदुर्ग चढाई - उतराई करून परत यायचं होतं. नेहेमीच्या ट्रेक्समध्ये शक्यतो स्वत: वाटशोधन करता यावं, असा आग्रह असतो. पण, इथल्या बंबाळ्या रानात फार हट्ट करण्यात अर्थ नसतो. 'पांडुरंग राणे' - ७५ वर्षांचा तरुण - वाट दाखवायला तयार झाले होते. गावात अन्य कोणास मुडागडच्या वाटा ठावुकी नाहीत. नुकताच ट्रेक सुरू होत होता. घमघमणा-या पांढ-या कुड्याचा आणि करवंदीच्या जाळ्या रसास्वाद घेत, मुडागडच्या पाजेची उभी चढण चढू लागलो.
     मुडागडकडून कोकणात उतरणा-या सोंडेला पुढे दोन फाटे आहेत. यापैकी काजिर्डे गावाकडे वाघोटण नदीच्या खो-यात उतरणा-या धारेने आम्ही चढाई करत होतो. तुरळक झाडं सोडली, तर बाकीची धार रखरखीत होती. पण आसपासच्या सोंडा आणि दरीमधला रानवा मात्र झक्क होता. पॅनोरमा दृश्य एकदम वसूल!!!




काजिर्डे गावातून तासभर चाल झालेली. अर्थात, खरी उभी आणि आव्हानात्मक चढाई दूर होती.
     तासभर चढाईनंतर थोडकी विश्रांती हवीच. अजून काही ट्रेकच्या चालीकरता 'ह्रिदम'मध्ये आलो नसल्याने, अडखळत सुरुवात होती. पण, ताकद मिळण्यासाठी 'हापूस आंब्या'चा खुराक म्हणजे भलतेच लाड चाललेले.
     वाट आता विलक्षण उभी होत गेली होती. मुडागडच्या मुख्य सोंडधारेपाशी पोहोचण्यापूर्वी एका खडकाळ टप्प्याला उजवीकडून आडवा वळसा घातला.

आता सुरू झाला मुडागडच्या पाजेचा 'थरार'.. 
धारेच्या माथ्यावर पोहोचलो, तर ऊर धपापत होतं. आणि चढाई आता रंगतदार टप्प्यांत पोहोचली होती.
     'मुडागडची पाज' या वाटेचं सर्वात उग्र अस्त्र म्हणजे, गडावर पोहोचण्याआधी उभ्या धारेवरचे एकापाठोपाठ तीन उंचवटे. एकतर इथे पोहोचेपर्यंत आपली विलक्षण दमछाक झाली असते. तीव्र चढ, घसारा, वाळकी झुडुपं, चिंचोळा मार्ग आणि खोलवर कोसळलेल्या दऱ्या असा रौद्र माहोल.
पहिला उंचवटा चढला, की शेजारची दरी खोलवर दिसते. पटकन फोटू घ्यायचा, अन पुढे व्हायचं.
     धपापत्या ऊराने दम खाताना पाठीमागे वळून बघितलं, तर काजिर्डे गावापासून कसा कसा प्रवास केला ते सारं डोळ्यांसमोर उलगडतं.
     पहिल्या उंचवट्याच्या माथ्यावर दरीच्या काठावरून वळसा घेणारी अरुंद वाट थरारक होतीच. अर्थात, दिग्गज ट्रेकर्सना अश्या टप्प्यांवर शांत राहून कशी वाटचाल करायची हे उमगलं असतं.

     विश्रांतीला आता अजिब्बात फुरसत नाही. अवघड धारेवरचा पहिला उंचवटा पार पडतोय, तर समोर दुसरा उंचवटा उभा! पहिल्या उंचवट्यापेक्षा अधिक उभ्या घसरड्या चढणीचा… अति दमवणुकीमुळे आता भल्याभल्यांच्या अक्षरशः झोकांड्या जाऊ लागल्या. :)
मुडागडाच्या पाजेवरचे चढ-उतार करताना मला तर ते इयत्ता सातवी स्कॉलरशिप परीक्षेतलं रटाळ गणित आठवलं. एक पाल ताशी २ किमी वेगाने ६ फूट चढते, ३ फूट उतरते, परत ८ फूट चढते… वगैरे वगैरे. (गणित रंजक असावं, या आज्ञेचं पालन हे असं!) आता ही पाल कश्यासाठी चढ-उतार करते, हे जसं कोडं सुटत नाही तसं आम्हांलाही मुडागडाच्या पाजेवर किती चढतोय, किती परत उतरतोय.. कशाचा काही पत्ता नाही. कुठे आलोय, कसली चढाई-उतराई करतोय काही झेपेना. अपुरी झोप - आहार - ऊन - आर्द्रता - चढाई या सगळ्यांचा तडाखा बसत होता.
     दुस-या टप्प्यावरून उतरताना अक्षरश: रखरखीत घसा-यावरून घसरगुंडी होती. आधारासाठी धरायला कारवीची काटकीसुद्धा नाही.  मान खाली घालून तंद्रीमध्ये सावकाश उतरतलो. 
     आणि हे काय, पुढचा अजून एक उंचवटा तयार आहेच. बिनीच्या तुकडीने बारीक पावठ्या हेरत शिताफीने हा टप्पा सर केला. धम्माल चढाईची मजा होतीच, पण तहानेने-दमवणूकीमुळे जीव हैराण झालेला.
तीन उंचवट्यांवरची चढाई-उतराई झाल्यावर समोर मुडागडचा झाडीभरला माथा खुणावू लागला. 
कातळधारेवरून चढल्यावर उजवीकडे अरुंद बारीक आडवी वाट काही केल्या संपेना.
     अखेरीस तीन तासांच्या खडतर चढाईनंतर 'मुडागडची पाज' सर झाली. वाट अडचणीची आणि वापरत नाही. केवळ आडवाटेच्या ट्रेक्सची खुमखुमी म्हणून अश्या वाटा धुंडाळायच्या. माथ्यावरून कोकण आणि वाघोटण  नदीचं खोरं उलगडलं.

अरण्यात 'सपशेल' हरवलेला 'मुडागड':
     कोकम सरबताने तात्पुरती संजीवनी मिळाली. मुडागडावर पोहोचलो खरे, पण 'गडपण' सिद्ध करणा-या गोष्टी कुठेकुठे दडल्या असाव्यात, याचा पत्ता लागेना.

इतिहास सांगतो:
करवीरचे छत्रपती शाहू महाराजांनी या परिसराला ‘शिवारण्य’ म्हणून राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केलेलं. कुठूनसे परदेशातून रानहत्ती आणून इथे सोडले होते. त्यांच्यासाठीचा हा हत्ती तलाव. पश्चिमेला कड्याच्या दिशेने प्राणी जाऊ नयेत, म्हणून चर खणला आहे.
(संदर्भ साभार: दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे – भगवान चिले)
गडावर बख्खळ दाट झाडी माजलेली आहे.
झाडी क्वचित मोकळी झाली, की सह्याद्री घाटमाथ्याचं आणि चौफेर रानव्याचं सुरेख दर्शन होतं.
     लोभी जगापासून, भस्म्या झालेल्या जमिन माफियांकडून आणि बेताल पर्यटकांपासून सह्याद्रीच्या या टप्प्यांचं रक्षण होवं, ही अतिशय मन:पूर्वक सदिच्छा!!! 
     गडाच्या माथ्यावर एके ठिकाणी भगवा ध्वज, तर कुठे कुठे थोडके ताशीव दगड दिसले.

     पाण्यासाठी जीव व्याकुळलेला. जवळ थोडकं पाणी असलं, तरी पाण्यापाशी थांबून जेवण करू असं ठरवलेलं. पण, आम्हांला कल्पना नव्हती की गडावर आणि जवळपास काही किमी अंतरावर पाणी कुठ्ठेच नाही. पाण्यासाठी अजून तब्बल तीन तास - केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर - वणवण करावी लागणार आहे, याची कल्पना नव्हती हेच बरं झालं..


     किल्ल्याचे तुटपुंजे गर्द झाडो-यात कुठेसे दडलेले गडाचे अवशेष शोधणं, हे कर्म कठीण होवून बसलंय.

     गडाचा पुसटसा इतिहास उपलब्ध आहे.
हा गड कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण १७४८ च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात तेव्हा वितुष्ट आले होते. त्यावेळी तुळाजीने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला आळा घालण्यासाठी करवीरकर यसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला. १८३९ च्या पत्रामध्ये ज्योतीराव चव्हाण यांची मुडागडच्या सुरक्षेकरता नेमणूक झाल्याची नोंद आहे.
(संदर्भ साभार: ट्रेकक्षितीज संकेतस्थळ)



     संरक्षक तटबंदीच्या उरलेले थोडके अवशेष आणि इतिहासातली असलेली नोंद हे या डोंगराला 'दुर्ग' म्हणून सिद्ध करायला पुरेसे आहेत, अन्यथा मोहवणा-या घनदाट अरण्यात हरवलेला, इतिहासात एक पुसटशी नोंद नोंदवलेला आणि शोधूनही न सापडणारे अवशेष असलेला - असा हा वनदुर्ग - मुडागड!

पाण्याच्या शोधात असह्य वणवण
     गडाच्या उत्तरेला अतिशय उभ्या उतारावरून १५ मिनिटं उतरल्यावर, पाणी  शोधण्यासाठी परत एकदा वणवण करून अर्धा तास वेळ आणि अशक्य प्रमाणात शक्ती घालवली. पाणी नाहीच मिळालं!!!
     उत्तरेला काजिर्डे घाटाकडे जाताना पाणी मिळेल, या आशेवर खरडत-खरडत चालू लागलो. छोट्या जांभ्या दगडांचा 'सडा' (हो, याला सडा असंच म्हणतात.) पार करून, वाट रानात शिरली.
     देखण्या गर्द जंगलातून उत्तरेकडे जात, मंद उताराची वाट दोन तासांच्या चालीने पडसाली गावाकडे  घेऊन गेली. वाटेत काही ठिकाणी दिशा दर्शनासाठी खुणेचे पांढरे बाण दिसले. जंगलाच्या नीरव शांततेत अधूनमधून अनोख्या पक्ष्यांच्या कॉल्समुळे ट्रेकर्स खूष.
     अखेरीस तो पाण्याचा झरा गवसला. आख्ख्या रानातला हा एकमेव पाणीसाठा. पाणी थोडकं उरलेलं. किंचित गाळमिश्रित, पण थंड. त्यामुळे गाळून घेतलं. गाईड राणेमामांनी जुनी आठवण सांगितली - याच झ-यापाशी त्यांनी निवांत बसलेला गवा बघितलेला.

     घरून प्रत्येकाच्या माऊलीने-गृहलक्ष्मीने बांधून दिलेली शिदोरी सोडली. ह्याच्याकडची पिठलं-भाकरी, त्याच्याकडचं लोणचं, दही, कुणाकडचा साजूक तुपातला शिरा आणि हो बटाट्याच्या काच-यांशिवाय ट्रेकचं मेन्यूकार्ड पूर्ण कसं होणार… यथेच्छ खादाडी अन १० मिनिटं विश्रांतीनं मंडळी तरतरीत झाली.   



काजिर्डे घाटाची निवांत देखणी वाट 
     सकाळी कोकणातून निघाल्यापासून 'मुडागडची पाज' या घाटाने चढाई करून, मुडागड बघितला होता.
(टीप: साधारणत: ट्रेकर्स मुडागड करण्यासाठी कोल्हापूरहून निघून कळे आणि बाजारभोगावमार्गे  पडसाळी गाव गाठतात. गाईड घेऊन मुडागड दर्शन करण्यासाठी पाच तास लागतात.)

     तब्बल दोन तास अरण्यवाटा तुडवून आता उतराईसाठी ऐतिहासिक अश्या काजिर्डे घाटाकडे आम्ही निघालो. घनदाट जंगल्यातल्या चालीनंतर अचानक झाडीपल्याड उलगडलं पायथ्याचं खोरं, निवांत पहुडलेलं पडसाली गाव आणि धरण.



     पडसाळी गाव आणि धरण उजवीकडे ठेवून, शेताडीच्या बाजूने आम्ही काजिर्डे घाटाची वाट पकडली. घाटाच्या देवीला राणेमामांनी एक डहाळी वाहिली आणि एक रुपया वाहिला. घाटात ईडा-पीडा टळो, जनावरापासून रक्षण व्हावं, म्हणून घाटदेवीला वंदन करायचं…   
     डोंगराच्या दरडी मागे पडल्या आणि बेचक्यातून बाहेर आलो. समोर परत एकदा उलगडलं - कोकणाच्या बाजूचं वाघोटण नदीचं खोरं. अप्रतिम पॅनोरमा.
     समोर दक्षिणेला मुडागडचा गर्द झाडीचा माथा, मुडागड पाजेची अरुंद धार आणि त्यावरच्या तीन उंचवट्यांवरचा थरार असं सारं डोळ्यांसमोर आलं. काजिर्डे घाट अपेक्षेपेक्षा अग्गदीच सोप्प्या उतरणीचा निघाला. निवांत वळणं-वळणं घेत काही ठिकाणी बांधून काढलेली निवांत प्रशस्त बैलगाडीवाट.  
     तासाभरात काजिर्डे घाट उतरून पहिल्या दिवसाच्या ट्रेकची सांगता केली. पण, काजिर्डे घाटातून दिसणारं मुडागडचं लोभस रूप डोळ्यांसमोरून हलत नव्ह्तं.
     शहरातल्या तुटकपणाची सवय झाली असते आपल्याला. काजिर्डे गावच्या गावकऱ्यांचा पाहुणचार आणि अगत्य खूपंच भावलं. कोरा चहा एकदम फक्कड होता. आमचे गाईड राणेमामा यांना योग्य मानधन देवून, मुक्कामासाठी दाजीपूर अभयारण्याच्या दिशेनं कूच केलं. वाऱ्याच्या तालावर झाडं डोलत होती. लक्षावधी काजव्यांनी लखलखत होती. अरण्यवाटांवर 'जमलेल्या' पहिल्या दिवसाच्या ट्रेकची दृश्यं आठवत, ट्रेकर्सनी परत एकदा गप्पाष्टक जमवलं.… 
    
घनदाट अरण्यातली शिवगडची पाज/ कुर्ली घाट 

     दुस-या दिवशी दाजीपूर अभयारण्यातल्या शिवगड किल्ल्यालगतची एक घाटवाट शोधायची होती. गरमा-गरम चहाचे घोट घेत, मे महिन्यातल्या सकाळची मजा घेत ट्रेक्सच्या गप्पा परत एकदा रमल्या.
     मॉन्सूनची वर्दी देणारे ढग डोंगरांशी सलगी करत, पावसाची पोकळ आश्वासने देत होते. ऊन्हं चढू लागली, तसे हे ढग गायब!
     गावातल्या घरांच्या भिंती नेच्याच्या पानांनी आच्छादलेल्या, म्हणजे अग्गदी एअर-कंडीशण्ड. एखाद्या बुलबुल पक्ष्याची आपल्या पिलाला खाऊ भरवण्यासाठी लगबग चाललेली. त्याला मोठ्ठ्या प्रमाणात मिडीया कव्हरेज मिळालं. SLR पाजळले गेले. 
     ट्रेकचा आजचा लांबचा पल्ला विसरून खादाडी आणि गप्पांमध्ये ट्रेकर्स रमलेले. शेवटी वैतागून कोंबडोबांनी आरवून आरवून 'आवरा आता' असा  सपाटा लावला...
आणि अखेरीस ट्रेकर्सनी कूच केलं.
     थोडकी चाल झाली असेल-नसेल, तर वाटेत मिळाली अवीट गोडीची जांभळं. एक-एक जांभूळ तोडून गोळा करणं, इतका धीर कोणाला धरवतोय. जांभळं आवडलं, सहज हात फिरवला की हातामध्ये पाच-पंचवीस जांभळं जमा किंवा त्या झाडाची एखाद फांदी तोडून जांभूळांचा तोबरा भरत चालत रहायचं…
     दाजीपूर गवा अभयारण्यात परवानगी काढून 'हडक्याची सरी' नावाची वाट चालत आणि काही प्रमाणात गाडीने जाता येते. अभयारण्याचा खूप मोठ्ठा हिस्सा 'पाट्याचा डंग' नावाच्या प्रतिबंधित क्षेत्र आहे. अभयारण्यात पश्चिमेला 'शिवगड' नावाचा दुर्ग आहे. त्याच्या बाजूने उतरणा-या 'कुर्ली घाट' नावाच्या वाटेचा शोध घेत होतो.
     सह्याद्री धारेपाशी आल्यावर ईशान्येला 'पाट्याचा डंग'चं प्रतिबंधित जंगल खुणावतं, तर दरीपल्याड गगनगिरी महाराजांचा अभयारण्यातला आश्रम समोरंच दिसतो. आश्रमाजवळचा 'झांझेचं पाणी' नावाचा बारमाही पाणवठा पांथस्थांना महत्त्वाचा.
थोडं वायव्येला पाहिलं, की तळकोकणाकडे झेपावणा-या सोंडा आणि दूरवर पसरलेल्या डोंगररांगा दिसतात.
     सह्याद्री घाटमाथ्याच्या पठारापासून पश्चिमेला किंचित सुटावलेला 'शिवगड' दुर्ग हाकेच्या अंतरावर दिसला. शिवगड म्हणजे हे राधानगरी तालुक्याचं पश्चिम टोक, आणि पल्याड कोकणात चमकत होतं वैभववाडी तालुक्यातलं कुर्ली धरणाचं पाणी.

     पूर्वी तळकोकणात बंदरांकडे उतरणा-या फोंडा घाटासारख्या व्यापारी घाटवाटांवर लक्ष ठेवणारा - शिवगड आणि गडाच्या अग्गदी जवळून उतरणारी 'शिवगडची पाज' किंवा 'कुर्ली घाट' ही वाट आमच्या समोर होती. कुर्ली घाट कितपत वापरात असेल, हे माहित नसल्याने मनात जरा धाकधूक होतीच.

     थोडका चढ चढून गेलं, की शिवगडवरचे मोजके अवशेष बघता येतात. तटबंदी, बुरुज, उगवाई देवीचं ठाणं, एखाद टाकं सोडलं, तर गडावर फारंसं काही उरलं नाही.       
     शिवगडला डावीकडे ठेवत आम्ही आडव्या वाटेने 'कुर्ली घाटा'ने उतरू लागलो. वाट अगदी झक्कास मळलेली होती. शिवगडकडून कोकणाकडे उतरलेल्या सोंडेवरून वाट सावकाश उतरत होती. वाटेत काही ठिकाणी पुसट  कोरलेल्या पाय-या किंवा कातळात कुठेतरी कोरीव टाकं असावं, असं वाटून गेलं.
     अप्रतिम दाट अरण्यातून उतरणारी वाट शिवगडला वळसा घालून, उतरत गेली. मे महिन्याच्या उकाड्याने आणि आर्द्रतेने मात्र हाल झाले. अवघ्या रानात पाणी नाही. कुठे झऱ्यात थोडकं खराब पाणी मिळालं. पाखरं-वानरं तरत असतील अश्या पाण्याचा आस-यानं.
     उतार उतरून कोकणसपाटीला आल्यावर, मोकळवनातून पाठीमागे बघितलं. सर्वात उंच असलेला शिवगड, त्याच्या डावीकडून अलगद उतरणारी झाडीभरली वाट आणि सह्याद्रीची भिंत संध्याकाळच्या मंद प्रकाशात उजळून निघत होते.  
     ट्रेकचा शेवट गोड व्हावा म्हणून की काय, पण अनपेक्षितरित्या फडफड आवाज करत ५-६ 'धनेश' (हॉर्नबील) हे असे समोरून उडत गेले. अहाहा… एकदम थरारक!!!
अर्थात, असे क्षण कॅमेरामध्ये टिपण्याचे प्रयत्न करणं व्यर्थंच. पण, सह्याद्रीच पावला म्हणायचा!!!  

शिदोरी अविस्मरणीय आठवणींची…
अखेरीस, परतीचा प्रवास झाला.….

डोळ्यांसमोर तरळत होती अरण्यातली दृश्यं...

भर मे महिन्यात केलेली आडवाटेच्या 'मुडागडच्या पाजे'ची दमवणारी चढाई…
     बख्खळ दमलेलं असताना, तहानलेलं असताना स्वत:ला कसंबसं ढकलत, एकापाठोपाठ एक घसरडे चढ-उतार शांतपणे पार करणं…
     अरण्याच्या टोकाशी तग धरून राहिलेल्या कुठल्याशा वाड्या-वस्त्या… अपार कष्टानं फुलवलेली शेतं-शिवारं…  वाऱ्यावर डोलणारी पिकं… निर्मळ मनं. कृतज्ञता वाटते या गिरिजनांबद्दल, की ज्यांच्यामुळे आडवाटा थोड्यातरी वापरात राहतात…  
     घाटमाथा आणि कोकण यांच्या दरम्यानचा दुर्गम विराट सह्याद्रीचा पहाड जोडणाऱ्या काही ऐतिहासिक घाटवाटा धुंडाळल्या होत्या. कधी दुर्मिळ माल या घाटाने कोल्हापूरला गेला असेल, कधी कुठल्या सत्ताधीशाच्या आज्ञेवरून सैनिक या घाटाने चढून गेले असतील, तर कधी कोण्या माहेरवाशिणीचे पाय जड झाले असतील… आणि आताच्या काळात या वाटांनी निकामी होऊन पडणं. काय काय अनुभवलं असेल या घाटवाटांनी…   
     अरण्यवाटा तुडवताना सह्याद्रीचं वैभव पाहून मन थक्क होतं. तुफान तंगडतोडीने पायाला ब्लिस्टर्स आलेले, त्यामुळे पुढचे कित्येक आठवडे ट्रेकची आठवण काढत राहिलेलो..  
     रानातलं जैववैविध्य आपल्याला पुरेसं कळत नाही, म्हणून मनाला खरंच टोचणी लागते. आपल्या नवशिक्या नजरेला जेव्हडं दिसतं, ते थोडकं निदान टिपत रहायचं…



भर मे महिन्यातही पाचोळ्याखाली ओलावा आणि जळवा दिसणं, हे विलक्षण संवेदनशील अरण्याचं द्योतकंच!
अरण्यातला माहोल - अत्यंत विलक्षण, गूढ…

हलकेच डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन ती शांतता, तो वारा, तो गंध, तो स्पर्श… सारं सारं निरागस मनाने अनुभवायचा… मनी टिपून ठेवायचा…  

आता विचार केला, की खरंच काय झालं साध्य या ट्रेकमधून?

दो-चार डोंगर-द-या चढउतार केले, तहानेने व्याकुळ होणं म्हणजे काय हे अनुभवलं, पायाला फोड येईपर्यंत तंगडतोड चाल… बस्स, इतकंच असतं का ट्रेकिंग म्हणजे?


अज्जिबात नाही, खरं तर ट्रेकची खरी धम्माल वाढलेली सोबतच्या ट्रेकर मंडळींमुळे - एकदम 'अवली' व्यक्तिमत्त्वं, पण सह्याद्रीवर निस्सीम प्रेम असलेले.…
… हिमालय आणि सह्याद्रीतल्या अवघड आणि अनवट वाटांवर लीलया नेतृत्त्व करणारे, ट्रेकर्सना घडवणारे, कामाची स्वत: जबाबदारी घेऊन सगळ्यांसाठी खपणारे  दिग्गज - 'अजय ढमढेरे'…
… ट्रेकविषयाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर प्रखर मत असणारा, निवडक ट्रेकर सोबतींना जिगरी दोस्त बनवण्यासाठी खपणारा (म्हणजे वाचा - "यारों का यार, डोक्यात जाणा-यांचा दुश्मन"); पण खऱ्या अर्थाने 'हरहुन्नरी' ट्रेकर - ब्लॉगर - फोटूग्राफर - जितेंद्र बंकापुरे (दत्तू)…
… आडवाटा शोधण्यासाठी 'भरवश्याचा' शिलेदार, वाईल्डक्राफ्ट'चा brand ambassador आणि पुढच्या ट्रेकर्ससाठी GPS मॅप्स नोंदवण्याची खटपट करणारा - निनाद बारटक्के…
… दिलखुलास व्यक्तिमत्व आणि सह्याद्रीच्या जैववैविध्याबद्दल विलक्षण आपुलकी असलेला मुंबईचा 'चक्रम हायकर' - यतीन नामजोशी…
… गंभीरपणे बोलत हलकेच मिश्किल कोट्या करणारा, दणदणीत सह्याद्रीवाटा तुडवणारा ट्रेकर - नितीन तिडके…
… ट्रेकर दोस्तांमध्ये रमणारा, विश्रांतीच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क शोधणारा 'होतकरू' - श्रवण प्रसाद…
… जबरदस्त एण्ड्युरंस असलेले; गाडीत किंवा ट्रेक तुकडीत नेहेमी पुढे असणारे अष्टपुत्रे काका… 
… शांतपणे ट्रेक मनापासून एन्जॉय करणारा तुकडीत सगळ्यात तरूण ट्रेकर - करण सिंघ…
… वयाच्या ६९ वर्षी फिटनेसने अवाक करणारे उत्साहमूर्ती - देवल काका…
… भयंकर दम लागला असेल, बरोब्बर अश्या क्षणी प्रत्येकाच्या हातावर आग्रहाने आवळा कॅण्डि ठेवणारे सिंघकाका…
अश्या एकसे बढकर एक 'तरुण दिग्गज' आणि ताकदीच्या ट्रेकर्समुळेच असे ट्रेक दुर्मिळ!!!

कोल्हापूरचे अरण्यदुर्ग, दुर्गम घाटवाटा आणि अरण्यवाटांवरचा थरार अजूनही मनी रुंजी घालत आहे… 
पण, खरी मज्जा सोबतंच्या ट्रेकर दोस्तांमुळेच!!!





© साईप्रकाश बेलसरे, www.DiscoverSahyadri.in,२०१४

23 comments:

  1. साई मस्त जमून आलाय ब्लॉग ... खरच आंबोली व राधानगरी हा परिसर समृद्ध वनश्रीने नटलेला आहे आणि तो तसाच दुर्गम राहावा हीच देवाकडे प्रार्थना ... गणिताच उदाहरण आवडल ... ब्लॉगच्या शेवटी केलेलं प्रत्येक ट्रेकर मित्राचं वर्णन एकदम समर्पक आहे ... Jeetendra Bankapure उर्फ दत्तू, यारो का यार आणि डोक्यात जाणाऱ्यांचा दुश्मन ... हाहाहाहा

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत::
      खरंय रे अग्गदी...
      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  2. नेहमीप्रमाणे जबरदस्त लिखाण आणि मांडणी..ही मंडळी किती दिग्गज व कसलेले ट्रेकर्स आहेत ह्याची पुन्हा एकदा प्रचिती आली...Thanks for sharing this blog..

    ReplyDelete
    Replies
    1. अमेय::
      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  3. अगंगंगंगंगं… अगदीच अशक्य लिहिलंस… पूर्ण ट्रेक डोळ्यासमोर जसा च्या तसा उभा राहिला… जबरदस्त लेखन… नेहमीप्रमाणे सरस्वतीने प्रसन्न होऊन तुझ्या जिभेवर साहित्याचे क्लासेस उघडले आहेतचं… उगीच नाही तुला गिरिमित्र संमेलन मधल्या ब्लॉगर्स स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं… You always Deserve it…
    स्कॉलरशिप मधल्या पाली च्या गणिताचं उदाहरण तर अगदीचं तंतोतंत जमलेलंय… जबरी…

    तुमच्यासारख्या दिग्गज ट्रेकर्स बरोबर ट्रेक करायची पुन्हा एकदा संधी मिळाली हे आमचं अहोभाग्य समजतो… सोबतीला नेहमीचे दिग्गज आणि "यशस्वी कलाकार" असले कि ट्रेक मध्ये खरी रंगत चढते… अन्यथा "सोलो ट्रेक" (ज्याच्या आम्ही पूर्ण विरोधात आहोत) केल्याचा फिल येतो…
    सरतेशेवटी ब्लॉगपोस्ट मधल्या प्रत्येक ट्रेकर च्या व्यक्तिमत्वाचे छोटेसे पैलू उलगडून दाखवलेस… हे तुझ्या चांगल्या निरीक्षणशक्तीचे कौतुक आहे…
    "यारों का यार" तर जन्मापासूनचं आहे…
    पण "डोक्यात जाणाऱ्यांचा दुश्मन" : उगीच बाजार उठवायचा… निव्वळ सवंग प्रसिद्धी मिळवायची आणि लोकांच्या जिवाशी खेळायचे… असल्या बाजारू लोकांनी सह्याद्रीची वाट लावायला सुरवात केली आहे… अश्यांना झाडावर उलटं टांगून मिरचीची धुरी दिली पाहिजे… बघा तुम्हाला कदाचित पटेलचं…
    मे महिन्याच्या ट्रेक च्या आठवणी ताज्या झाल्या… भन्नाट… लगे रहो…
    प्रचंड प्रमाणात धनुर्वाद…

    ट्रेकळावे,
    दत्तू तुपे

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू::
      खरंतर, काका आणि तू घेऊन गेलात, म्हणूनच माझा हा ट्रेक झाला... अन्यथा, एक घाटवाट आणि दुसरी अरण्यवाट जन्मात बघितली नसती, हे नक्की!!!!
      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  4. OK लिहिलं आहेस (ह्याला म्हणतात कौतुकासाठी शब्द कमी पडणं !!!)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा, भारी....
      TKVM (ह्याला म्हणतात धन्यवाद म्हणण्यासाठी शब्द कमी पडणं !!!)

      Delete
  5. Dhap laagun jibh kordi padat astanna Awal kanthi denaare.. tol jata jata haat deun sawarnaare.. ghaam ani ukada yani nirjalikaran jhalya war "Raag Dahi" pesh karnaare.. awghad prasangii bhaan rakhun sawrun nenara "kaka" sarathi.. gacch rana chya veshi varli jambhalanche ghad chya ghad sthal kaal harpun fast karnaare.. ranvat ambat god Raaywal sapadala ki khishat gheun athvanine denare.. an ashya saglyanchi moat bandhun annare.. ya war kadi mhanje diwas bharachya haaimaari nantar awarjun "Ajey Misal" khayala ghalnaare bhetlet mhanje nakkich gelya janmi sahyadrit maharajn charnii seva ghadli asnaar.. tya shivay kuthl aapla evdha nashib..

    Girijananni jo manacha toda ghatlay na sai tujhya hatat to asach uttarottar chamkat raho..

    trivaar mujara..!!

    Rane kakanna Dirghayushya laabho hech ghatachya devi charnii sakada ghatlay..

    ReplyDelete
    Replies
    1. यतीन:
      तुझं म्हणणं अग्गदी बरोबर.. गुरुवर्य आणि मंडळी यांच्याशिवाय खऱ्या अर्थाने ट्रेक अनुभवणे, अशक्य!!!!
      या ट्रेकच्या निमित्ताने तुझीही भेट झाली, हा आनंद मोठाच!!!
      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  6. तुमच्या खास लिखाण शैलीतून या अनुभवाच्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल अगदी मनापासून धन्यवाद ….!
    जंगलाचा essence जो capture केलाय अक्षरशः अंतर-मनाला भिडतो…!
    Trek च्या दरम्यान मनात घोळणारे विचार thoughts आणि त्यांची चाल-बिचल अगदी अचूकच टीपलिये (same reason blog post वाचताना virtually पोचलो होतो तिकडे).
    खर्या अर्थाने "SOULFUL" लिखाण म्हणाव याला; ज्याने करून वाचताना खर्या अर्थाने "SOULFUL" experience मिळतो.

    आमच कौतुक केल्या बद्दल धन्यवाद…! Basic rules चा एक भाग म्हणून trek चा आधी त्या-त्या प्रदेशा च्या maps/topology चा सखोल अभ्यास करतो, एवढच. दुसर म्हणजे "Orientation" मुळे पूर्वी २-३ चांगले treks फसलेले त्याची चूट-पुट मनात अजून आहे, तशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून हा homework न चुकता करतो. तसेही "Orientation" चे "Funde" trek च्या आधीच clear असलेले केव्हा ही फायदयाचे :-).

    परत एकदा धन्यवाद, असेच लिहित राहा _/\_

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद्राव:
      खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून...:)
      लिहिलेले साधे वर्णन तुम्हांला soulful वाटले....
      कारण जसं अनुभवलं तसंच आणि तेव्हडंच लिहिलंय.....
      आणि कारण तुम्हीदेखील तितकाच उत्कटपणे ट्रेक एन्जॉय केलाय म्हणून...
      धन्यवाद आणि भेटूच पुढच्या आठवड्यात!!!

      Delete
  7. अफाट सुंदर लिहिलं आहेस. _/\_

    ReplyDelete
    Replies
    1. सागर::
      छान वाटलं प्रतिक्रिया वाचून...
      खूप खूप धन्यवाद :) :) :)

      Delete
  8. tujhi lekhni ashich baharat javo hi ganaraya charani prarthana...:)

    ReplyDelete
    Replies
    1. अनिकेत सर::
      धन्यवाद!!!
      तुम्ही स्वत: कष्ट घेऊन, धक्का देवून ब्लॉग लिखाणाचा 'श्रीगणेशा' करावलाय... :)

      Delete
  9. खूपच भारी वर्णन !!! एकदम जबराट!!!

    ReplyDelete
    Replies
    1. यश::
      ब्लॉगवर स्वागत!!!
      छान वाटलं प्रतिक्रिया वाचून...
      मन:पूर्वक धन्यवाद :) :) :)

      Delete
  10. ​नेहमी प्रमाणेच उत्तम, वादच नाही. ​
    ​नवीन गड ​​आणि वाटांची माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद !
    ​आणि गिरिमित्र संमेलनातील ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत प्रथम पारितोषिकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. ​

    ReplyDelete
    Replies
    1. योगेश,
      छान वाटलं तुमची प्रतिकिया वाचून..
      आमचे ट्रेकर दोस्त सोबत, म्हणून या ब्लॉगमधल्या अरण्यवाटा भटकता आल्या... _/\_
      आणि खरं सांगू,
      ट्रेकचा अनुभव भन्नाट असला, तरंच थोडकी मज्जा वर्णनात उतरते..
      नाहीतर काय, नुसता शब्दांचा खेळ उरेल.....................
      म्हणून, या ब्लॉग्जचं खरं श्रेय त्यांनाच आणि अर्थातंच सह्याद्रीला :)

      Delete
  11. खूपच छान !!!
    आम्हालाही मुडागड व शिवगडचा ट्रेक करायचा आहे. ( पण मुहूर्तच लागत नाहीये :( :( )
    तुमचा ब्लॉग वाचून खूप मदत होईल. असंच लिखाण आणि भटकंती चालू असू द्या.
    नशिबात असेल तर भटकंती करतानाच तुमच्याशी भेट होईल ..
    भविष्यासाठी शुभेच्छा ..
    धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. विकास,
      ब्लॉगवर स्वागत..
      मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून..
      ट्रेकर्सना मदत होईल आणि ट्रेकला कधी जाऊ असं वाटावं, हाच ब्लॉगचा हेतू आहे.
      मुडागड-शिवगड हे जबरदस्त अरण्यदुर्ग आहेत, अवश्य भेट द्या. हो, भेट झाली ट्रेकला, तर आवडेलच..
      धन्यवाद!👍

      Delete
  12. लॉकडाऊन काळात हे असं ब्लॉग रुपी सह्याद्रीचं भरलेलं ताट समोर आलंय की किती किती वाचून घेऊ आणि किती नाही, मन काही तृप्त व्हायला मानत नाही... जबरदस्त लिखाण... (इतक्या वर्षांनी ब्लॉग वाचतोय पण तरी त्याचा टवटवीतपणा तसाच आहे)

    ReplyDelete