Pages

Thursday, 28 August 2014

जांभ्या पठारं... अनघड दुर्गलेणेमंदिरं...

.... लांबवर पसरलेलं उंच-सखल माळरान, बाभळीच्या विखुरलेल्या झुडुपांपाशी पाय उंचावून चोखंदळपणे 'फक्त कोवळाच' पाला खुडणारी शेरडं, ज्वारीच्या पिकामागे दूरवर डोकावणारी राखाडी रंगाची उजाड टेपाडं आणि त्यातून वळणं घेत जाणारा एखादा ओहोळ.... 

.... दरीच्या पोटात लपलेलं जागृत देवस्थान, मन प्रसन्न करणारा झाडोरा आणि अवचितंच पिसा-याचं वैभव मुक्तपणे उलगडणारा मोर...

.... दूरवर उधळलेले कृष्णमेघ आता सरत्या दुपारच्या वक्ताला दाटून येतायत, पठारावरून वाहणारा भर्राट वारा पावसाचे बाण सोबत घेऊन येतोय, चिंब भिजवतोय, पण पटकन खो देऊन भिरीभिरी लांब निघूनही जातोय...

.... नजरेसमोर आहेत जांभ्या खडकाची लंबाडी पठारं, माथ्याजवळचा कातळटप्पा, त्यात कोरून काढलेली गुहामंदिरं अन 'अनघड' दुर्ग...


----------------------------------------------------------------------

सांगली जिल्ह्यातले दुर्ग (भूपालगड (बाणूर), कोळदुर्ग, जुना पन्हाळा) आणि 
लेणे मंदिरांच्या (शुक्राचार्य, दंडोबा, गिरीलिंग, गडसिद्ध) भटकंतीचा 'दुरांतो' फोटोब्लॉग.

…. पहाटे चारलाच कूच केलं होतं. पल्ला लांबचा होता. पुणे - कराड प्रवास करून, उजवीकडे सदाशिवगड मागे टाकला.  गुहागर ते विजापूर या ऐतिहासिक मार्गावर आम्ही पोहोचलो होतो.


'विटा' गावाकडे जाताना, डावीकडे डोंगरमाथ्याकडे जाणारा एक रस्ता दिसला. रस्त्याजवळ 'गुंफा' अशी पाटी होती, म्हणजे आपण भेट द्यायलाच हवी नाही का! मात्र 'गुंफा' फक्त नावापुरतीच. या डोंगराचं नाव रेवणसिद्ध डोंगर. इथलं वैशिष्ट्य म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार अध्याय ४० मध्ये 'विट गाव मानदेशात, तेथे राहिले रेवणनाथ' असं वर्णन केलेलं हे रेवणसिद्धाचं राउळ. एकदम शांत प्रसन्न जागा.


पुढे विटा - खानापूर असे टप्पे घेत आम्ही 'पळशी' गावापाशी आलो. पुण्यापासून २५० किमी प्रवास होत आला होता. प्राजक्तने खरंच ताकदीने ड्रायव्हिंग केलेलं.

पळशीजवळचे भूपालगड (बाणूर), कोळदुर्ग, आणि शुक्राचार्य लेणे मंदिर - हा होता आमच्या भटकंतीचा पहिला टप्पा.


पठारी रांगेवरून छोटा गाडीरस्ता 'शुक्राचार्य' स्थानापाशी घेऊन गेला. रखरखीत प्रदेशातल्या झाडीभरल्या द-याचं प्रथम दर्शन प्रसन्न करून गेलं. पाय-या उतरत उतरत दरीच्या पोटातल्या 'शुक्राचार्य' गुहेकडे निघालो.


शुक्राचार्य (शुकाचार्य) स्थान महात्म्य वाचून पुढे निघालो.


समोर होता दीठि सुखावणारा बारमाही झरा.


शुकाचार्य गुहेपाशी स्वागत केलं काळतोंड्या वानरांनी. या निसर्गरम्य परिसरात मनसोक्तपणे मोर वावरत असतात. जांभ्या खडकाच्या पोटात शुकाचार्य लेणेमंदिर आहे. एके बाजूस अनघड गुहेत शिवलिंग आहे.


शुकाचार्य मंदिराच्या उजवीकडच्या गुहेतून माथ्याकडे बघितलं, तर चिंचोळ्या कपारीत लवणस्तंभ दिसतात. पूजा-याने इथूनच 'शुकाचार्यांच्या पाठीची पूजा करा' असं सांगितलं.


असा हा शुक्राचार्य परिसर रम्य. पण आता गर्दीच्या लोंढ्यापुढे शांतता हरवू लागलेला.........


इतिहासाच्या पानातलं, मराठी मनातलं 'सल' - भूपालगड (बाणूर)
भूपालसिंह राजाने बांधलेला 'भूपालगड' हा स्वराज्याच्या सीमेवरचा आणि गुहागर - विजापूर या व्यापारी मार्गावरचा किल्ला.

बसातीनुस्सलातीन, तारीखे दिल्कुशा या मुघल ग्रंथकारांनी आणि मल्हार रामराव चिटणीस यांनी बखरीत या प्रसंगाचे वर्णन केल्यानुसार - 
१६७८ मध्ये 'फिरंगोजी नरसाळा' या गडाचे किल्लेदार असताना, दिलेरखान मुघलाने हल्ला केला. यावेळी दुर्दैवाने युवराज संभाजी  दिलेरखानच्या पदरी होते. निकराची लढाई करावी, तर समोर युवराज संभाजी - अश्या कठीण प्रसंगी फिरंगोजी रात्रीस गड सोडून शिवरायांकडे निघून गेला. खानाने भूपालगडवर आसरा घेतलेल्या तब्बल ७०० धारक-यांची कत्तल केली. हा क्लेश सहन न होवून, संभाजीराजे स्वराज्यात परतले.
*** अर्थात, बखरीतील माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल संशयानं बघितलं जातं. स्वराज्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी केलेल्या अफाट कामगिरीबद्दल आणि बलिदानाबद्दल आपल्याला नि:संशय अभिमानंच आहे.

अशी ही इतिहासाच्या पानांतली दुर्दैवी आठवण मनात ठसठसत असताना, आम्ही शुकाचार्य ते बाणूर गाडीरस्त्यावरून जात होतो. ४-६ किमी अंतराचा टप्पा. पठारी भागात असल्याने 'दुर्ग' म्हणून ओळखावा, अश्या खुणा दिसत नाहीत. शेताडीमागचं हे टेपाड म्हणजे बाणूरचा माथा.


रचलेल्या दगडांचे साध्या धाटणीचे तट ओलांडून गाडीरस्ता थेट भूपालगडावर वसलेल्या बाणूर गावात पोहोचला. कार प्रवासाने एव्हाना अंगं आंबून गेलेली. म्हणून बैलांनी गाडा खेचण्याची हौस करून घेतली. 


गडावरचा मोठ्ठा तलाव प्रसन्न करून गेला. तलावाचे काठ कातळात कोरलेले. समोर दिसत होती माथ्यावरच्या  मंदिराची कमान.


माथ्यावर आहे श्री बाणेश्वर/ बाणसिद्ध मंदिर. नगारखाना-ओसरी. गडावर अन्य ठिकाणी आहेत कमान नसलेली ३ द्वारं अन चुनारहित रचीव तट.


मंदिराच्या पल्याड शिवरायांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचं वृंदावन/ समाधी.


माथ्यावरून दिसतं लांबवर दिसतं सुरेख दृश्य. समोर दिसणारे लक्षवेधी श्रावण बाळ डोंगर, ढगांची नक्षी आणि पवनचक्क्या.

वाटलं, इतिहासाच्या पानातलं अन मराठी मनातलं 'सल' असणा-या प्रसंगाचा साक्षी असलेला हाच का तो भूपालगड. कोण कुठले ७०० मराठेवीर इथल्या मातीत हरवले, कुठल्या ध्येयाने पेटून त्यांनी आत्माहुती दिली… 'दुर्दैव' या शब्दाची प्रखर जाणीव करून देणारा क्षण! आसपास पाहिलं, तर वाहत होता फक्त भन्नाट नि:शब्द वारा!!!


भूपालगडाचा भग्न संरक्षक - कोळदुर्ग
पुढचा टप्पा होता जवळचाच कोळदुर्ग. भूपालगडाची पश्चिम बाजू कमकुवत. पठारावरून थेट प्रवेश शक्य  आहे. म्हणून संरक्षणासाठी 'कोळदुर्ग' उभारला असावा. आजमितीस हा दुर्ग अक्षरशः शोधूनंच काढावा लागतो. माळरानामध्ये विखुरलेल्या भग्न शिल्पांजवळून रचीव दगडांच्या तटाकडे गेलो.


माळरानावर काळाच्या ओघात हरपलेलं नामशेष झालेलं मंदिर असावं, असं गावक-यांनी सांगितलं.  


एका दृष्टीक्षेपात कोळदुर्गची रचीव तटबंदी, पल्याड शुक्राचार्य दरा आणि शेवटी भूपालगड (माथ्यावर झाडं असलेला), असा सग्गळा परिसर समोर आला.


गडाचा इतिहास केंव्हाच लुप्त झालेला, आणि आता भूगोल हा असा हरवलेला....


जांभ्या कातळातले आश्चर्य - दंडोबा लेणेमंदिर
भटकंतीचा उत्तरार्ध सुरू झाला होता. आम्हांला कल्पनाच नव्हती, की भटकंतीमध्ये अजून खूप काही उलगडायचंय....


कोळदुर्ग मागे टाकून 'पळशी'जवळ परत जत हमरस्त्यावर आलो. 'घाटनांद्रे' गावापासून 'कवठे महाकाळ' आणि पुढे मिरज-पंढरपूर रस्त्यावर 'मिरज'ची दिशा पकडली. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या सीमेवर, खरशिंग गावानजिक 'दंडोबा डोंगर' आहे. धनगर समाजाचे हे जागृत दैवत. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या सोमवारी श्री दंडनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात भरते.  डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बनवलाय, त्यामुळे दंडोबा डोंगर आता मिरजजवळच्या दुष्काळी पट्ट्यातील 'पिकनिक स्पॉट' होवू पाहतोय. उधळलेल्या ढगांच्या पार्श्वभूमीवर समोर दिसला जुना पन्हाळा आणि गिरीलिंग डोंगर.


दंडोबाचं वैशिष्ट्य म्हणजे हेदेखील जांभ्या खडकात कोरलेलं लेणे मंदिर आहे. कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे लेणे ५८ फूट लांब आणि ३६ फूट रुंद असं सणसणीत आहे. इथल्या शिलालेखानुसार सातव्या शतकात इ.स. ६८९ ला कौडण्यपूरच्या राजा सिंघणने हे लेणे खोदवले आहे. मात्र, अभ्यासकांच्या मते हे लेणे १२व्या ते १४व्या शतकात देवगिरी यादव राजा सिंघण याने कोरले असावे. द्वारपाल मूर्तींच्या खाली दोन मराठी शिलालेख आहेत. एकात इ.स. १७७३ असा उल्लेख आहे. सिनप्पा आणि बाळप्पा तटवते अशी नावे कोरली आहेत. गाभाऱ्यात नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. गर्भगृहाभोवती मोठ्ठाले आधारखांब सोडून, पाच फूट रुंदीचा प्रदक्षिणा मार्ग कोरून काढला आहे. इथे टाकळी ढोकेश्वरच्या लेणेमंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाची अवश्य आठवण होते. श्री भवानी, लक्ष्मी आणि वीरभद्र अश्या मूर्ती आहेत. लेण्याच्या माथ्यावरच्या डोंगरावर एक उंच स्तंभ बांधला आहे.

दंडोबा म्हणजे कोरीव लेणे मंदिर, धनगर समाजाचं आराध्य आणि दुष्काळी भागातील सुरेख गिरीस्थळ.
  

गिरीलिंगचं लेणेमंदिर आणि जांभ्या दगडातील साधे विहार
दंडोबा डोंगरावरून कार आता निघाली कुटकोली गावाच्या वळणरस्त्यांवरून. हमरस्त्यापासून ८-१० किमी अंतर्भागात जाताना वाटेत टिपले टिपिकल धनगर.


गिरीलिंगच्या पायथ्याशी गाडी लावली. आता गिरीलिंग आणि त्याच्या माथ्याच्या पठारावरचा 'जुना पन्हाळा' हा दुर्ग हे आता आमचं लक्ष्य होतं. ढगांची दाटी होवू लागली होती.


सोप्प्या वाटेने वीसेक मिनिटात गिरीलिंग लेणे मंदिरापाशी पोहोचलो.


माथ्याच्या १० मी खाली, जांभ्या खडकातील लेणेमंदिर आणि गिरीलिंग हे देवस्थान.


आता पावसाची झिमझिम चालू झालेली. गिरीलिंगच्या जवळ असलेले काही अनघड विहार बघितले.


आतली शिवपिंड नव्याने ठेवलेली असणार. कोरीव काम अगदीच साधे, पण जांभ्या दगडातली लेणी असल्याने दगडाची पोत (टेक्श्चर) बघायला मजा येते.



भिरीभिरी - जुन्या पन्हाळ्याच्या शोधात
गिरीलिंगच्या लेणेमंदिराच्या कवतिकानंतर आता आमचा शेवटचा टप्पा होता, 'जुना पन्हाळा' दुर्ग.

गिरीलिंगच्या माथ्यावर १० मी चढून गेल्यावर माथ्यावर विस्तीर्ण पठार सामोरं आलं. पावसाचा तडाखा आता रपरप सुरू झाला. एका लांडोरीने तुरूतुरू चालत कड्याच्या टोकावर जाऊन मस्त पोज दिली. जांभ्या खडकाच्या  पठाराच्या कडेकडेने आम्ही पूर्वेला निघालो. पाउस आणि ढगांमुळे जुना पन्हाळा कुठे असावा, कसलाही काही पत्ता लागेना.

जांभ्याचे मोठ्ठेच्या मोठ्ठे कपचे कड्याजवळ अलग होऊ पाहत होते. काही वर्षात हे कपचे विलग होऊन दरीत कोसळणार, हे नक्की. पठाराची कड कधी दरीच्या दिशेने लांब डोकावत होती, आणि परत मागे येत होती. या वळणा-वळणांवरून गेल्यावर कधीतरी पल्याड 'जुना पन्हाळा' दिसणार होता. एरवी ट्रेकमध्ये एखादं भूभू आपल्यासोबत येतं, इथे चक्क एक काळतोंड्या वानराचं पिल्लू आमच्या मागावर येत होतं.

तब्बल पाउण तासांच्या, चिखलाळ वाटांवरच्या भिरीभिरी चालीनंतर अखेरीस रचलेल्या दगडांचा तट दिसू लागला. अलीकडचं पठार आणि पल्याडचा दुर्ग यांच्यामध्ये संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार रुंद खंदक आणि किरकोळ तट आहे.


दुर्गामध्ये प्रवेश करताच काही जोती दिसली. पूर्वेला पाण्याच्या उथळ टाकी आणि सदरेच्या जागेपाशी गेलो. शिलाहार राजांनी गड बांधणीसाठी पाहणी केली होती. नंतर बांधकाम अर्धवट सोडून कोल्हापूरजवळ पन्हाळ्याची उभारणी केली. म्हणून हा जुना पन्हाळा.


'घड्याळ्याचे काटे सुसाट पळताहेत, म्हणून इथूनच परतीस निघावे का' - हा विचार हाणून पाडला, हे किती किती बरं झालं. कारण, अजून एक आश्चर्य आमची वाट पाहत होतं. पूर्वेला उतरणा-या कातळकोरीव पाय-यांवरून १० मी उतरत गेल्यावर जांभ्या खडकातलं अजून एक लेणेमंदिर आमची वाट बघत होतं. याला 'गडसिद्ध' असं म्हणतात. इथल्या नितांत शांत वातावरणात गडसिद्ध शिव, घोडपागा, गुहा, टाके अश्या जागा मन प्रसन्न करून गेल्या.


पहाटे ४ वाजता सुरू झालेल्या भटकंतीचा दिवस आता कलू लागलेला. जुन्या पन्हाळ्याचा निरोप घेऊन, जलद गतीने निघालो. पठाराच्या कडेकडेने चालून, गिरीलिंग गाठण्यापेक्षा पठाराच्या मध्यावरून शॉर्टकट मारला. आणि 'अश्शी माती, चिक्कण माती'मध्ये बूट यथेच्च बरबटून घेतले.

अक्षरशः 'जड पावलांनी' जुन्या पन्हाळ्याचा निरोप घेत होतो. साकेत तर म्हणाला, 'आपला मिल्खासिंग झालाय' (ज्याने पायाला वजन बांधून धावण्याचा सराव केला होता.)


…. घरी परतायला पहाटेचे तीन वाजले - निघाल्यापासून २३ तास. परतीच्या लांब प्रवासात 'टोल भरून खड्ड्यांचा मार' खाल्लेला. उद्या ऑफिसमध्ये नवीन आव्हानांचा नवीन आठवडा सुरू होणार…वगैरे, वगैरे…

पण, आत्ता हे असलं काहीच जाणवत नाही.
कारण डोळ्यांसमोर रुंजी घालत होती  - लांबवर पसरलेली उंच-सखल माळरानं, दरीच्या पोटातली अनोखी देवस्थानं, बरसणारे कृष्णमेघ, इतिहासाच्या पानातलं 'सल' खोलवर दडवलेले दुर्ग, लुप्त झालेला इतिहास आणि भूगोलही हरवलेला....
जांभ्या पठारं, अन त्यातली अनघड दुर्गलेणेमंदिरं...
बस्स, अजून काय पाहिजे!


छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
© www.discoversahyadri.in, २०१४

9 comments:

  1. ज… ब… र… द… स्त…
    ह्या भागातला (माण तालुका ) सर्किट ट्रेक खूप दिवसांपासून मनात सलतोय… ब्लॉग पोस्ट वाचून व्हर्चुअल ट्रेक चा फील आला…
    शेवटचा फोटो अगदीच कडक आलाय…
    एकंदरीत २३ तासांत बराच दंगा केलाय तुम्ही लोकांनी… बरंच काही बघितलंत…
    लिखाण तर नेहमीप्रमाणेचं अत्युत्तम… बऱ्याच दिवसांनी ट्रेक ब्लॉग पोस्ट ची मेजवानी मिळाली…
    ज… ब… री…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      "एक दिवसा"चा ट्रेक ना, म्हणून वेळेत घरी परत आलो :P
      ह्या भागात पावसाळ्यात भेट देणं बरं पडतं. सुंदर landscapes दिसतात.
      आडवाटेवरच्या ठिकाणांचा साधा-सोप्पा ब्लॉग लिहिला. तुमच्यासारख्या दर्दी भटक्यांला आवडला, आणि तिथं जावंस वाटावं यातंच आनंद आहे.
      खूप खूप धन्यवाद :) :)

      Delete
  2. मस्त वर्णन केले आहे काही वर्षांपूर्वी आम्ही हा भूपाळगडाचा ट्रेक केला होता गडावरील बहिर्जी नाईकांची समाधी पाहून मनाला अनेक प्रश्न पडले. त्यावेळी कोळदुर्गविषयी माहिती नसल्या कारणाने शुक्राचार्य आश्रम पाहून परत माघारी आलो होतो पण त्यावेळी मनात कुठे तरी वाटत होते कि समोरील डोंगरावर पूर्वीच्या काली कदाचित एखादा दुर्ग असावा पण आता काही दिवसापूर्वी भगवान चिले सरांच्या पुस्तकात कोळदुर्गचा उल्लेख पहिला व वाचला आणि आता तुमच्या ह्या ब्लॉग वर त्यामुळे आता पुन्हा एकदा ह्या भागाची वारी करण्याचा वेध मनाला लागला आहे कोळदुर्ग पाहिल्याशिवाय कदाचित मन शांत होणार नाही लवकरच जाईन
    धन्यवाद बाकी प्रवास वर्णन उत्तम _/\_

    ReplyDelete
    Replies
    1. दादा, ट्रेकर्स मित्रांना कट्ट्यावर अनुभव सांगावेत, असं लिहायचा प्रयत्न असतो.. तुम्हांला आवडलं आणि ते कळवलं, त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
      भूपाळगडावरचा दुर्दैवी इतिहास आणि अग्गदीच नामशेष झालेल्या कोळदुर्गाचा भूगोल - दुर्दैंव!!!

      Delete
  3. तुम्ही एका दिवसात खूपच भ्रमंती केली मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!
      आम्ही या ट्रेक्सना सह्याद्री दुरांतो एक्सप्रेस म्हणतो, एका दिवसात खूप ठिकाणं - न उरकता! याच्याबद्दल ब्लॉगपण लिहिलेला... http://www.discoversahyadri.in/2013/10/SahyadriDurantoExpress.html


      Delete
  4. गेल्या महिन्यातच जुना पन्हाळा,गिरीलिंग व जत जवळचा रामदुर्ग हा ट्रेक केला पण तुमच्या ह्या ब्लॉग मुळे त्या भागातील जांभ्या दगडातील दंडोबा लेणेमंदिराची माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद आता पुन्हा एकदा मिरज वारी वेळी नक्कीच या ठिकाणी जात येईल
    धन्यवाद _/\_

    ReplyDelete
    Replies
    1. दंडोबा लेणेमंदिर मस्तंय. अवश्य भेट द्या...
      अश्या आडवाटेच्या दुर्गांच्या आवर्जून भेटीला जाताय, त्याबद्दल अभिनंदन!

      Delete
  5. कोळदुर्ग संवर्धन साठी घेतलाय. बा रायगड परिवार.

    ReplyDelete