Pages

Friday, 7 November 2014

|| लयभारी दुर्गवारी ||


रोमांचक अनुभवांची लयभारी दुर्गवारी:: मोरबारी घाट - भास्करगड - हर्षगड - त्र्यंबकगड - भंडारदुर्ग 
... मध्यरात्रीच्या पुणे - नाशिक एशियाड प्रवासाने अंग आंबून गेलेलंपहाटे साडेतीनला कुडकुडत्या थंडीत गर्रम कांदापोहे अन चहा हवाच की! प्लॅटफॉर्मवर डुलक्या घेत असतानाच, 'जव्हार' एस.टी.ने लपेटदार वळण घेत एन्ट्री मारली. अभि आणि मी दोघेच ट्रेकला निघालो असल्याने, सामानानं लादलेल्या अजस्त्र सॅक्स आणि बूड टेकवायला जागा कशीबशी मिळवावीच लागली. एस.टी.च्या खिडक्यांचा जूररर्र आवाज आणि त्याहीपेक्षा मोठ्ठ्या आवाजात चाललेला जनतेचा गुजराती-हिंदी-मराठी मिश्रित गलका असह्य झाला, म्हणून खिडकीबाहेर डोकावलो...


चांदण्यात डोंगर-सुळक्यांच्या कडा आभाळाच्या पटावर उजळलेल्या. नकाशात डोकावलो, तर सह्याद्री घाटमाथ्याजवळ 'उतवड' डोंगरापासून सुरू होऊन पूर्वेला धावणा-या 'त्र्यंबक रांगे'तल्या  भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला अश्या विलक्षण डोंगर-दुर्गांची रेलचेल दिसली. प्राचीन बंदरे (नालासोपारा, डहाणू, वसई) आणि नाशिकची बाजारपेठ यांना जोडणा-या 'गोंदा घाटा'वर लक्ष ठेवण्यासाठी हे दुर्ग उभारले होते. म्हणूनच, त्र्यंबक रांगेच्या आमच्या ट्रेकमध्ये कोकणाच्या बाजूने चढणारी जुनी घाटवाट आणि थोडकं दुर्गवैभव धुंडाळावं, असा बेत होता...


...वळणावर ड्रायव्हरनं ब्रेक मारला, अन विचारांची तंद्री मोडली. अंगावर सणसणीत काटा आला - एस.टी.च्या बंद खिडक्यांमधून घुसू पाहणाऱ्या कडक थंडीमुळे आणि 'जव्हार-त्र्यंबक' गाडीरस्ता आता त्याच पुरातन 'गोंदा घाटा'तून जात असल्यानेही!!!


मोरबारी - रटाळ रखरखीत घाटवाट...
कोकणातून त्र्यंबक रांगेचं दर्शन घेण्यासाठी 'मोरबारी' नावाच्या पाऊलवाटेने आम्ही चढणार होतो. गंतव्य 'भास्करगड' असला, तरी आधी नतमस्तक व्हायचं समोरच्या बलदंड 'उतवड' डोंगराच्या चरणी. नंतर पदरातून आडवं जात 'भास्करगड'चा पायथा गाठायचा असा 'मोरबारी' घाटाचा ३ तासांचा पल्ला आहे. 

कोकणातून ७०० मी उंच उठवलेले धूसर गूढ डोंगर, उजाडल्यावर ओकेबोके वाटू लागले. 


एकीकडे मोखाड्याजवळचा वाघ तलाव आणि दुसरीकडे खोच तलाव यांमुळेच काय ते आसमंतात थोडेफार चैतन्य होते. 


उतवडच्या रखरखीत डोंगरापासून उतरलेल्या लांबचलांब रटाळ सोंडेवरून तब्बल दीड तास चाललो. 
 
 


जड सॅक्सची सवय नसल्याने खांदे बोलत होते आणि रात्रीची अपुरी झोपही जाणवत होती. ट्रेकची सुरुवातच अशी रटाळ झालेली.  
 



अखेरीस, मोरबारीच्या सलग तीन तासांच्या चढाईनंतर, समोर दिसू लागला 'भास्करगड'.

पाण्यासाठी वणवण, पण अमृत गवसलं...
सोबत प्रत्येकी चार लिटर पाणी होतं, तरी तळपत्या उन्हांत पाणी झपाट्याने संपू लागलेलं आणि  गडावर पाणी नाही. उतवड डोंगर आणि भास्करगड यांच्यामधल्या बेचक्यात पाणी शोधण्यासाठी केलेली वणवण व्यर्थंच गेली. अखेरीस पाण्यावाचूनंच भास्करगडची उभी धार चढायला सुरुवात केली. गडाच्या कातळमाथ्यापासून ५० मी खाली पोहोचलो, अन अचानक सामोरा आला एक च-म-त्का-र... 'हुर्रे - पाण्याचं टाकं'!!!  


पाणी काढायला कॉटन-स्लिंगची लांबी कमी पडली, तर त्याला बुटांची लेस जोडणं किंवा पाणी गाळायला रुमाल - असले 'जुगाड' ट्रेकर्सना कधी शिकवावे थोडीच लागतात. चला पाण्याचं कोडं तर सुटलं आणि पौष्टिक सँडविच पोटात गेले. ट्रेकची मैफल आता कुठे जमायला लागलेली.
 

आता आमचं लक्ष्य होतं भास्करगडचा माथा. गडाला बिलगून दगडांच्या राशींवरून-झुडुपांमधून घुसत गेलो. 
 




द्वाररचना अग्गदी बघण्यासारखी - कातळकड्यात कोरून काढलेला ‘नागमोडी जिना' - रुंद पाय-या, एका बाजूला उंच कठडा आणि नागमोडी वळणं घेत जाणारा मार्ग. 
 



काही पाय-या व्यवस्थित, तर काहींवर मोठ्ठाल्या दगडांचं अतिक्रमण. लपेटेदार वळण घेवून कातळकोरीव जिना द्वारापाशी घेऊन गेला.

प्रवेशद्वार निम्म्याहून जास्त मातीनं बुजल्याने, विनम्र होवून झुकून गडात प्रवेश केला. कोरलेल्या जिन्याची ही सगळी रचना बघता, भास्करगडची बांधणी सातवाहन काळातील असावी. 

... माथ्यावर उधाणलेल्या खट्याळ वा-यानं पाचोळा अन मातीसोबत 'भोवरा' बनूनघिरक्या मारत आमची फार भंबेरी उडवून दिली.  पण, करकरीत उन्हांत तापणा-या त्र्यंबक' रांगेचं थरारक दृश्य पाहून आमचं भानंच हरपलं. 


पूर्वेला रौद्र-भीषण कड्यांचा सह्याद्रीतला 'सर्वांगसुंदर' हर्षगड काय देखणा दिसतो, म्हणून सांगू. 


हर्षगडाच्या अल्याड फणी डोंगर, तर पल्याड होते कापड्या - ब्रम्हा डोंगर, मागचा त्र्यंबकगड (ब्रम्हगिरी) आणि धुसर होत गेलेली अंजनेरी रांग असे बहुत जुनेजाणते दुर्ग. दक्षिणेला उप्पर वैतरणा धरणाचं लकाकणारं पाणी आणि त्यासोबत लांबवर पसरलेल्या वाड्या-वस्त्या-वळणवेडे रस्ते 


गडावर पिण्याचे पाणी, सावलीला बरं झाड आणि राहण्यास जागा बिलकुल नाही. 


गडाला चोहोबाजूंनी ५० मी कड्याची बेलाग नैसर्गिक तटबंदी असल्याने रचीव तटबंदी फारशी नाहीच.  परंतु, देवगिरी, बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे, परत मोगल, कोळी, पेशवे आणि इंग्रज अशी कित्येक स्थित्यंतरे गडाने अनुभवली आहेत.


भास्करगडाच्या अनवट रौद्र सौंदर्यामुळे त्याचा निरोप घेताना पाय अंमळ जडच झालेले... उत्तरेला उतरत जाणाऱ्या सौम्य सोंडेवरून पाऊलवाट खिंडीत उतरली. 
 
 


ट्रेकरूटनुसार इथून दोन तास चढाई करून - फणी डोंगर बाजूला ठेवत हर्षगडच्या पायथ्याशी गणेश आश्रमात मुक्कामाला पोहोचायचं होतं. पण दिवस अगदीच कललेला, रानात पाण्याची शाश्वती नाही, अतिरिक्त श्रम झालेले. म्हणून, खिंडीत लागलेल्या निरगुडपाडा ते आंबोली रस्त्यावर उजवीकडे वळून निरगुडपाडा (टाकेहर्ष) गावात मुक्काम केला.
 

रात्री गप्पा मारायला आलेला एक मोबाईलधारी वीर भलताच बडबड्या निघाला. हा हिरो म्हणतो, "इथल्या रानातून लाकडं तोडून शहरात ट्रकनी पाठवायची ह्यो माजा धंदा. एखाद्या हॉटेलमध्ये भेटून 'थैली दिली', की इथं रानात साला कोनी अडवत नाही आपल्याला. पन येक सांगतो, गेली १५ वर्षं म्या इथं काम करतोय, पन या रानात आता काही ती मजा नाही राहिली. सरकारनी जरा साग-साल असली जबरी झाडं लावायला पाहिजेत की नाहीसांगा  पघा तुम्हीच "
आम्ही अ-वा-क!!!


सह्याद्रीतला सर्वांगसुंदर दुर्ग - हर्षगड

 


सह्याद्रीमधल्या अनोख्या दुर्गांमध्ये 'हर्षगड' उर्फ 'हरिहर'चं स्थान फार मोलाचे. खूप कवतिक ऐकल्यामुळे आमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली, म्हणून भल्या पहाटे निघून पाऊण तासात हर्षगडाच्या पठारावर पोहोचलो. 


नाजूक रानफुलांच्या साथीमुळे आणि वाऱ्याच्या मंद झुळूकांमुळे ट्रेकची लज्जत वाढत चाललेली.

१८१८ मध्ये मराठ्यांच्या साम्राज्याची 'शक्तिपीठे' असलेले दुर्ग निकामी करण्याचा 'खुळा-नाद' इंग्रजांना जडला होता. 'हर्षगड' निकामी करण्याचं 'कृत्य' कोण्या एका ब्रिटीश 'कॅप्टन ब्रिग्ज'कडे होतं. पण, झाली वेगळीच गंमत. हर्षगड जिंकल्यावर गडाच्या अनवट सौंदर्यानं हा गडी खुळावून लिहितो, "Words can give no idea of its dreadful steepness. It is perfectly straight for, I suppose 200' and can only be compared to a ladder over a height of this nature." हर्षगडचा चढाईमार्ग आजही आपल्याला ‘जसाचा तसा’ बघायला मिळतो, म्हणून गडाच्या 'स्थापत्यशास्त्रज्ञा'सोबतंचत्या कोण्या 'ब्रिग्ज'च्या 'गुणग्राहकते'लादेखील सलाम करून चढाई सुरू करायची

७५ अंशांत उभ्या, किंबहुना आभाळास भिडलेल्या कड्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या; आणि पाय-या जिथे संपतात त्या बेचक्यात मोठ्ठ्या कलात्मकतेने रचलेलं गडाचं प्रवेशद्वार हा हर्षगडाचा पहिला टप्पा! 


तीनेक फूट रुंद अन दीड-दोन फूट उंच अश्या सणसणीत ९० पायऱ्या आणि आधाराच्या खोबणी असलेला दगडी जिना सावकाश चढत निघालो. 


ऊर धपापायला लागलं. छोटेखानी बुरुज असलेल्या व्दारामधून गडात प्रवेश केला, शेंदूरचर्चित गणेश मूर्तीला वंदन केलं आणि हुश्श केलं.

हर्षगडच्या मार्गाचा थरार अजून बाकी होता. हर्षगडाचा दुसरा टप्पा म्हणजे ब्रिग्जने रॉक कट गॅलरीअसं वर्णन केलेला धम्माल मार्ग. पोकळ चौकोनी पाईप उभा कापल्यावर उजवीकडचा अर्धा भाग जसा उलट्या इंग्रजी 'सी' अक्षरासारखा दिसेल, अश्या आकारात कातळकड्यात कोरून काढलेला मार्ग वाकून चालत जात पार केला. 


तिसऱ्या टप्प्यात कातळात खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर १३० पायऱ्यांचा दगडी जिना खोबणीमध्ये हात रुतवत पार केला. 
 

पूर्वीच्या कड्यावरच्या बारीक पायऱ्या आणि त्याच्यालगतच्या कड्यात कालांतराने कोरलेला कठडेवाला जिना अशी स्थित्यंतरे
जाणवली. शेवटी, बोगदेवजा दरवाजा पार करून गडात प्रवेश केला. खरोखरंच अद्भूत दुर्गरचना!!!


आता दुर्गवास्तू धुंडाळत निघालो.  


पठारावर सदरेचं जोतं, टाकी, पुष्करणी, बलभीम आणि शंकराची पिंड बघितली. 
 




एकाच अवघड मार्गावर अवलंबून न राहता आणखी एका दुर्गम कातळकोरीव नागमोडी जिन्याची खोदाई दिसली. 


पूर्व टोकापाशी ५-६ टाकी, घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. (इथे गरज पडल्यास मुक्काम करता येईल). हर्षगडने निजामशाही, मोगल, हिंदवी स्वराज्य, परत मोगल, परत मराठे, इंग्रज - अशी कित्येक स्थित्यंतरे अनुभवली.

सनावळीच्या इतिहासापेक्षा हर्षगडवरच्या 'गनिमी काव्या'ची दंतकथा धम्माल आहे. एकदा मोघलांची मोठ्ठी सेना गडावर चालून आलेली, आणि गडावर तर मोजकीच शिबंदी. मग एका जाणत्या आजीने सुचवली युक्ती… "रणदुंदुभी निनादू द्या आणि खूप साऱ्या खरकट्या पत्रावळ्या कड्यावरून खाली लोटत रहा..." गडाच्या खालून बघणाऱ्या मोघलांना खरंच वाटलं, की गडावर हजारो मावळ्यांची सेना सज्ज आहे, आपला काही टिकाव लागणार नाही आणि मोघलांनी काढता पाय घेतला... 
(संदर्भ: सहलीतून समजणा-या इतिहासाच्या पाउलखुणा - आनंद पाळंदे)


अश्या या खऱ्या अर्थाने 'सर्वांगसुंदर' गडाचा निरोप घ्यायची वेळ झाली होती, पण अजूनही पावलं आणि ऊर थरथरत होतं, हर्षगडची अद्भूत दुर्गरचना अनुभवून!!!
पौराणिक वारश्याचा त्र्यंबकगड (ब्रह्मगिरी)
ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झालेला. देखणा दुर्ग 'त्र्यंबकगडबघण्यासाठी जागृत ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमधून पायऱ्यांची वाट चढू लागलो. सर्व बाजूंनी शे-सव्वाशे मीटर उभे कातळकडे कोसळलेले असल्याने गड मोठ्ठा विलक्षण दिसत होता. 
 

अखंड कातळात कोरलेल्या जिन्याची सातवाहनकालीन रचना अग्गदी भास्करगड आणि हर्षगडासारखी. माथ्यावर प्रशस्त पठारावरून गडदर्शन करताना गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर, गोदातीर्थ टाके, जटा मंदिर आणि हत्ती मेट असे अवशेष प्रसन्न करून गेलं. सर्वोच्च असलेल्या पंचलिंग शिखरावरून वैतरणा आणि गोदावरी नदी खोऱ्यांचं अफाट दृश्य मिळालं.



साहसाचा थरार - भंडारदुर्ग
ट्रेकच्या अखेरच्या टप्प्यात बघायचा होता, त्र्यंबकगडचा अल्पपरिचित जोडकिल्ला - 'भंडारदुर्ग'. आम्हांला कल्पनाच नव्हती, की एक अनपेक्षित थरार आमची वाट पाहत होता!!!
 
भोळ्या भाविकांनी एकावर एक रचलेले नवसाचे दगड बाजूला ठेवून, जटामंदिराच्या मागून उत्तरेकडे निघालो. 


उजवीकडे त्र्यंबकची धार, तर डावीकडे खोलवर तळेगावच्या खचूर्ली तलावाचं पाणी चमकत होतं. गवताळ उतरंडीवरून, टोचणा-या काटेरी झुडुपांमधून, घसा-यावरून सटकणारी बारीकशी वळणवाट अगदीच काही सोप्पी नव्हती. सोनेरी गवतामागून 'भंडारदुर्गाचा बुधला' डोकावला, अन तो सह्याद्रीचा चमत्कार पाहून अंगावर सणसणीत शहारा आला. 


भंडारदुर्ग दिसत होता एखाद्या पालथ्या जलकुंभासारखा. चोहोबाजूंनी शे-सव्वाशे मीटर उंचीचे अवाढव्य कातळकडे आणि जलकुंभावर सुबक पाकळ्या कोरल्या असाव्यात, अश्या शेजारी-शेजारी असलेल्या विलक्षण देखण्या उभ्या घळी. 
 

वैशिष्ट्य म्हणजे, त्र्यंबकच्या मूळ पठारावरंच भंडारदुर्ग असला, तरी इंग्रजी 'यू' आकाराची १०० फूट लांब, १०० फूट खोल आणि १० फूट रुंद अशी निमुळती कातळपट्टी त्र्यंबकच्या माथ्यापासून भंडारदुर्गाला स्वतंत्र करते. ही चिंचोळी कातळपट्टी म्हणजे 'डाईक' अश्मरचनेचा सुरेख आविष्कार.

पहिल्या टप्प्यात त्र्यंबकच्या माथ्यावरून भंडारदुर्गाच्या डाईकवर उतरायचं होतं. कातळाच्या पोटातून खोदलेल्या साठेक पायऱ्या उतरत तळाशी पोहोचलो. 


बाहेर पडण्यासाठी जेमतेम फूटभर उंचीच्या दिंडीतून डोंबारकसरत करत सरपटत बाहेर पडलो.  


दुसऱ्या टप्प्यात चिंचोळ्या डाईकवरून झुडूपं आणि खडकाळ उंचवट्यांवरून चालताना खोलवर दऱ्या आणि वारा धमकावत होता, पण आम्ही हे थ्रील एन्जॉय करत होतो. 

 

तिसऱ्या टप्प्यात भंडारदुर्गाच्या पायथ्याच्या बुटक्या दिंडीमधून सरपटत शिरून, पायऱ्या चढून माथ्यावर पोहोचणार होतो. अन इथेच एक अनपेक्षित गोष्ट घडली.

आमचा दिंडीतला प्रवेश रोखण्यासाठी इथे सज्ज होती, दात विचकावत धमकवणारी १२-१५ माकडांची फौज. त्र्यंबकला माकडे अतिशय आक्रमक आहेत. भीतीने अंगावर सणसणीत शहारा आला. मग माकडांना फुटाण्यांचं आमिष दाखवून अभिनं मला 'कव्हर' दिलं आणि मी शिरलो दिंडीतून आत गडाकडे. पण, आता अभि अडकला. माकडांनी त्याची ट्राउझर पकडली. मी कसाबसा म्हणतोय, 'अरे, अभि ये ना…'. तो म्हणतोय, 'अरे काळ्या, इथे XYXये". तणावपूर्ण वाटाघाटीनंतर शेवटची फुटाण्यांची पुडी हस्तंगत करून माकडांनी अभिला सोडलं. 

गडावर पोहोचून स्वच्छ गार पाण्याची टाकी, घरांची जोती आणि आसमंत बघितला. 
 



निघावं म्हणलं, तर माकडांची पलटण आता भंडारदुर्गवर आमची वाट पाहत उभी! मग मी जे काही केलं, ते आता वाचून हास्यास्पद वाटेलदोन हातात दोन वाळक्या काटक्या लांब धरून सावकाश चालू लागलो. कुठल्याश्या अंत:प्रेरणेने गंभीर मोठ्ठ्या आवाजात 'श्रीराम जयराम जयजयराम' म्हणायला सुरुवात केली.  एकसमान आवाजामुळे किंवा आमच्यापासून त्यांच्या पिलांना धोका नाही असं वाटल्याने असेल कदाचित, पण आश्चर्य म्हणजे माकडांच्या हळूहळू जवळ आलो, बाजूने गेलो, तरी माकडं ढिम्मं! आम्ही झपझप पाय-या, सरपटी दिंडीची वाट, डाईक पार करून पलीकडे गेलो. मागं वळून पाहिलं, तर भंडारदुर्गाच्या तटावरून माकडं वाकुल्या दाखवत होती.असा धम्माल अनुभव!!!

|| लयभारी दुर्गवारी ||
 
....अखेरीस परतीचा प्रवास सुरु झाला. त्र्यंबक रांगेतली मोरबारी घाट - भास्करगड - हर्षगड - त्र्यंबकगड - भंडारदुर्ग अशी भटकंती केलेली. चेहरे रापलेले, पायांना ब्लिस्टर्स आलेले, सॅक्स रिकाम्या झाल्यात, पण सोबत घेऊन निघालो होतो रोमांचक अनुभवांनी गच्च भरलेली पोतडी!!!
कधी भारावून गेलो 'अ-द्भू-त' दुर्गरचनेने..
कधी सुखावलो एखाद्या नाजूक ऑर्किडच्या नजाकतीने..
तर कधी धपापलो रखरखीत उभ्या घाटवाटेच्या चढाईने..
कधी आसमंतात घुमणा-या वाऱ्यासोबत दरवळत होता गंध - इतिहासाच्या रोचक कथांचा...
तर कधी कुठे समजून घेतला वारसा - गंमतीशीर दंतकथांचा...
कधी उलगडला अभेद्य भासणाऱ्या किल्ल्याचा दडवलेला वैशिष्ट्यपूर्ण कातळकोरीव जिना..
तर कधी असह्य तहानलो डोंगरमाथ्यावर, आणि वाटला हेवा खाली खोऱ्यात चमचमणा-या जलाशयाच्या पाण्याचा...
कधी तथाकथित प्रगतीच्या वावटळीच्या अस्वस्थ करणा-या कथा ऐकून हळहळ वाटली
कधी थबकलो काहीशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या पाउलखुणा बाळगणा-या एखाद्या लेणेमंदिरापाशी..


रसरशीत अनुभवांच्या या गाठोड्याला म्हणावं तरी काय..
"लयभारी दुर्गवारी" - अजून काय!!!!


© साईप्रकाश बेलसरे, २०१४
पूर्वप्रकाशित:: लोकप्रभा, १४ नोव्हेंबर, २०१४  
छायाचित्रे: साईप्रकाश बेलसरे, अभिजित देसले

7 comments:

  1. "भास्करा" सारखी तुझी तळपती लेखणी बघून कमालीचा "हर्ष" झाला…ह्या लेखणीची धार उतरोत्तर परजत राहो आणि आम्हाला "ब्रम्हां"डा इतुका आनंद मिळत राहो अशी "त्र्यंबका" चरणी प्रार्थना !!!!

    ReplyDelete
  2. ओंकार::
    वाह, क्या बात है... किती सुंदर दाद!!!
    अनुभवांच्या ‘भांडारा’साठी आणि थोडक्या लिखाणासाठी सह्याद्रीच्या शरण जाऊन, सातत्याने भन्नाट भटकंती करण्यासाठी या शुभेच्छा मोलाच्या!!! :)

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. तुझा लेख वाचल्यावर जाहले एक स्फुरण आम्हांस
    पेश - ए - खिदमत हाजिर हुजूरांस

    इतिहासाचा अद्भुत काळ पुरुष
    दाखवतो कवडसे आणि वळसे
    त्याच्या कायम वाढणाऱ्या वयाचे आणि अनुभवाचे
    कधी रौद्र कड्यांच्या निऱ्यांचे अन कधी भंगलेल्या मानभावी कड्यांचे

    तोच निवडतो त्याची माध्यमे आणि कलमे आणि ते कलम -धारी हात
    कधी बखरी , कधी पोवाडे
    कधी शाहीर , कधी इतिहास वेडे
    कधी कवी कधी सह्याद्री वेडे
    ऐतिहासिक बखरकार, पुरंदारेंसारखे ग्रंथ-नाटककार , गोनीदांसारखे कथाकार आणि तुझ्यासारखे ब्लॉग कार ..

    ReplyDelete
    Replies
    1. अनिकेत सर,
      बापरे, फार मोठ्ठ्या लोकांच्या यादीत नाव टाकलंय... मी साधा ट्रेकर आणि थोडकं लिखाण केलंय...
      असो.. स्फुरण जोरकस आणि लयबद्ध आहे :) फारंच छान!!!
      धन्यवाद :)

      Delete
  5. क्या बात है… खरंच लय भारी झाली आहे तुमची दुर्गवारी…
    ओंकार ची प्रतिक्रिया सुद्धा जबरदस्त…
    दोन दिवस… चार किल्ले… एक घाट… आणि दोन ट्रेकर… बढीया…
    दणदणीत ट्रेकवृतांत्त …
    मस्त…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू,
      ट्रेक भन्नाट दुर्गांचा, अनुभवांचा, दमवणारा होता.
      घाट - डोंगररांगा तुडवून दुर्ग बघण्याची मज्जा काही औरंच!!!
      हो, ओंकारनी खूपंच अप्रतिम प्रतिक्रिया लिहिलीये...
      सुहास जोशींमुळे लोकप्रभाच्या माध्यमातून खूप वाचकांपर्यंत हा भटकंती वृतांत पोहोचला, याचा आनंद आहे :)
      धनुर्वाद!!! :)

      Delete