Pages

Wednesday, 31 December 2014

पाऊल-खुणा, भुलविती-पुन्हा…

कुसुर आणि फेण्यादेवी घाट…  आणि, इतिहासाच्या भुलवणाऱ्या पाउलखुणा!!!
 

"सह्याद्री ट्रेकिंग = दुर्गभ्रमण" ही व्याख्या एव्हाना अपुरी पडू लागली असते…
… दुर्ग-किल्ल्यांसोबत खोऱ्यात असलेल्या लेणी, घाटवाटा, गिरीस्थळं, देवळं, देवराया… असं बरंच काही खुणावू लागलं असतं…
… मावळातून घुमणाऱ्या वाऱ्याचं वेड वीकएंडला घरी स्वस्थ बसू देत नसतं…
… दोस्तांबरोबर ट्रेक्सच्या आठवणी उगाळणं, पुढच्या ट्रेक्सच्या तारखांसाठी आणि ठिकाणांसाठी वाटाघाटी करून झालेल्या असतात…
… बहुत मुश्किलीने घर - ऑफिसचे 'उंबर-गड' ओलांडून, अखेरीस ट्रेकसाठी कूच केलं असतं…
… घसाऱ्याचा उभा चढ चढून गेल्यावर, वाट चुकलीये आणि प्रत्यक्ष वाट त्याSSS पल्याडच्या सोंडेवर आहे, असा साक्षात्कार व्हायलाच हवा…
… कडाडून भूक लागल्यावर घरून आणलेल्या रुचकर डब्याचा फन्ना उडवायचा…
… स्थळ-काळ-वेळ विसरून हातांची उशी करून, झाडाखाली सावलीत निखळ झोपेचा आस्वाद घ्यायचा…
… अन, कुठल्याश्या आडवाटा, अनवट दुर्ग, लेणी, मंदिरं शोधायची…
परवा अग्गदी असंच काही झालं.
आणि, साकेत आणि मिलिंदसोबत ट्रेक आखला - पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला 'आंदर मावळा'तला.
'कुसुर आणि फेण्यादेवी' घाटांच्या उतराई-चढाईचा…
आणि, इथे दडलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायचा!!! 

      
पुरातन कुसूर घाटाची उतराई
… कुसुर गावाबाहेर शेताडीतल्या विहीरीपासून पश्चिमेला सह्याद्री घाटमाथ्याकडे निघालो. उगवत्या सूर्याकडे 'पाठ फिरवल्याने', आमच्या सावल्या लांब लांब विखुरल्या होत्या. घाटमाथ्यावर फारशी झाडी नाहीये. पण, सळसळ वळत नागमोडी जाणाऱ्या पाऊलवाटेनं सोनसळी कोवळ्या उन्हांत उजळलेला गवताळ माळ तुडवत जाणं, हे खरंच सुख होतं.

     
हंगाम सुगीचा, त्यामुळे शेताडीत शेतकरी दादांची लगबग चाललेली. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी गवताळ माळ, पल्याडचं खळं, शेतकरी दादांची लगबग, भर्राट वारा असा भन्नाट माहोल.

         
आंध्रा खोऱ्याच्या उगमापाशी, कुसुर पठाराच्या वायव्येला घाटाची सुरुवात शोधणं अवघड अजिबात नव्हतं. सूर्य हळूहळू आळोखे-पिळोखे देत वर येऊ लागला, अन कोकणसपाटीवर विखुरलेली सह्याद्रीची अफाट मोठ्ठी सावली काढता पाय घेऊ लागली. आम्ही उभे होतो समुद्रसपाटीपासून २१४९ फूट उंचीवर. पण,घाटमाथ्यावरून दिसणारं दृश्य होतं साधं-सोप्पं, उगा थरकाप उडवणारं - दरारा वाटावा असं नाही.

       
इथल्या पूर्वजांच्या पाऊलखुणांची नोंद अशी, की पूर्वीपासून 'कुसुर घाट' वाहतुकीसाठी उपयुक्त मानला गेलाय. सातवाहनांना 'आंध्रभृत्य' असे म्हणलं जातं, कारण त्यांनी शिलालेख/ ग्रंथामध्ये आंध्रा नदीच्या खोऱ्याचा उल्लेख केलाय.  त्यामुळे, कुसुर घाट सातवाहनांच्या काळापासून महत्त्वाचा असेल? (यासाठी पुरातत्विय पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही.

मात्र, नोंद अशी आहे की पेशव्यांच्या काळात १७७४ मध्ये मुंबई - कल्याण आणि पुणे यांना जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या तीन घाटांपैकी एक घाट होता 'कुसूरघाट' (दुसरे दोन महत्त्वाचे घाट होते - बोरघाट आणि नाणेघाट). कोकण पायथ्याला कर्जत-भिवपुरी आणि सह्यमाथ्याकडे आंध्रा नदीचं खोरं आणि नवलाख उंबरे-तळेगाव अशी गावं 'कुसुरघाट' जोडायचा. इंग्रजांनी सत्ता काबीज केल्यावर बोर-नाणे-कुसूर अश्या तीनही घाटांची डागडुजी करायचं ठरवलं होतं खरं, पण १८२५ ला आधुनिकीकरणासाठी निर्णय घेताना वर्णी लागली फक्त बोरघाटाचीच!!! आणि, तेंव्हापासून हळूहळू कुसुर घाट नकाशावरून हरवत गेला, विस्मृतीच्या गर्तेत बुडत गेला, प्रस्थापित जगापासून एकाकी पडत गेला.…


दणदण भरारणाऱ्या वाऱ्यामुळं भानावर आलो. घाटवाटांचा ट्रेक असूनही थंडीचं जर्कीन आणि कानटोपी चढवावी लागलेली.



आसमंतात कोण्या रानफुलांचा मंद सुगंध दरवळलेला. चौफेर दिसणारं दृश्य डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात मावेना. डावीकडे दक्षिणेला ढाकचं अवाढव्य पठार, तर उजवीकडे उत्तरेला घाटमाथ्यापासून कोकण पायथ्यापर्यंत उतरवलेले टाटा जलविद्युतनिर्मिती केंद्राचे अजस्त्र पाईप्स लक्षवेधी होते.

       
कुसूर घाटाची वाट लांबवर पसरत गेलेल्या सोंडेवरून झाडी - कातळ - गवत - कारवी - घसाऱ्याचे एकेक टप्पे उलगडत जाणार होती. घसाऱ्यावरून आणि मोठ्ठाल्या धोंड्यांशेजारून उतरत, पुढे छोट्या कातळावरची ५-६ पायऱ्यांची लाकडी शिडी उतरून टेपावर आलो.


डोंगरउतारांवर अजून वणवे लागले (की लावले) नसल्याने, वाऱ्याच्या तालावर गवत मस्त डोलत होतं.
कधी गच्च कारवीतून तर कधी गवताळ टप्प्यांमधून सुसाटलेली नागमोडी वाट, झाडीतून घुमणारा वारा, अजूनही न ओसरलेली थंडी, कोवळं ऊन आणि सोबतीला दोस्तांबरोबर रंगलेलं गप्पाष्टक (अर्थातंच ट्रेक्सचं) असा माहोल. सह्याद्री घाटाच्या भटकंतीची मज्जा अनुभवत होतो.


पण, कुसुर घाटाच्या भटकंतीत अपेक्षित असलेल्या, पूर्वजांच्या पाऊलखुणा अजूनही आम्हांला गवसल्या नव्हत्या. त्या म्हणजे, घाटवाटेवर असलेली 'खोदीव पाण्याची जुनी पाच टाकी'.… वाट आता मोठ्ठाल्या कातळांच्या मधून पुढे जात होती. काही झाडांवर 'M' लिहिलेले पिवळ्या रंगाचे बाण होते, पण प्रयोजन कळलं नाही. आणि, आसपास पाण्याची टाकी काही केल्या दिसेनात. (वास्तविक, पाण्याची टाकी इथूनंच जवळ आहेत.)


पुढं अजून १०० मी उतरल्यावर सुदैवाने लाकूड तोडायला आलेले एक दादा 'सतीश पावशे' भेटले. कुसूर घाटातली टाकी बघण्यासाठी दादांबरोबर परत एकदा त्या मोठ्ठाल्या कातळांजवळ चढत आलो. घाटाची वाट सोडून उत्तरेला जात, २ मिनिटं अंतरावर उजवीकडे सपाटीवर उलगडली 'कुसूर घाटातली पाच टाकी'.

           
जमिनीच्या पातळीत चौकोनी मुख असलेली आणि आत खोलवर नेलेली टाकी इथे असणं, ही कुसूर घाट नि:संशय पुरातन आणि महत्त्वाचा असल्याची ही खूण होती. वर्षानुवर्षे बुजलेल्या टाक्यांपैकी चार टाकी काही महिन्यांपूर्वी 'मावळ अॅडव्हेंचरर' संस्थेच्या विश्वनाथ जावलिकर, बोम्बल्या फकीर (रवी पवार) आणि ट्रेकर मंडळींनी साफ केल्याने आता निखळ पाण्याने भरली होती. अतिशय स्त्युत्य उपक्रम. प्रसन्न वाटलं.

       
पाच टाक्यांपासून सभोवार नजर टाकल्यावर कुसूर घाटाच्या उतरणाऱ्या सोंडेचा आणि पल्याडच्या सह्यधारेचा अंदाज घेता आला. उत्तरेला दिसले सह्याद्रीची संपूर्ण उंची उतरणारे पाण्याचे पाईप्स. आंध्रा नदीवरच्या ठोकळवाडी धरणाचं पाणी खांडी गावाजवळून उपसून, कोकणात भिवपुरी गावापाशी टाटांच्या जलविद्युतनिर्मिती केंद्रात नेण्यासाठी हे पाईप्स महत्त्वाचा दुवा आहे. विद्युतनिर्मितीनंतर उल्हास नदीतून हे पाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर आणि भिवंडी या शहरांना पुरवलं जातं.


'पाच टाकी'च्या रुपाने पाऊलखुणा गवसल्याने 'कुसूर घाटा'ची भेट सार्थकी लागली होती. त्यामुळे, उत्साहात उरलेली वाट उतरू लागलो. काही ठिकाणी दगड बसवून पक्की केलेली वाट दिसली, तर काही ठिकाणी दिसल्या खुणा पहारीचे घाव घालून दगड फोडून वाट रुंद केल्याच्या. या पाऊलखुणा कदाचित पेशव्यांच्या काळातल्या, कारण पेशव्यांच्या काळात घाटाची चांगली व्यवस्था राखली जात होती. पुढे इंग्रज राजवटीत देखील कुसूर घाटातून घोडेस्वार आणि बैलांवरून वाहतूक होत असे. बैलगाड्यांसाठी मात्र घाट सुयोग्य नव्हता. १८२६ च्या नोंदीनुसार, कुसूर घाटात मिळणारी वार्षिक जकात २०० रुपये होती, जी घाटाच्या दुरुस्तीसाठी खर्च जात असे.
  
घाटमाथ्यापासून टाकी बघून कुसूर घाट उतरायला जेमतेम दोन तास लागले होते. समोर होतं टुमदार भिवपुरी गावाचं 'विहंगम' दृश्य.

भिवपुरीच्या 'लँडस्केप'ला जिवंतपणा देणारा तलाव बांधलाय सदाशिवभाऊ पेशव्यांची पत्नी - पार्वतीबाईंनी. हा अष्टकोनी दगडी सुबक तलाव बांधवून घ्यायला ७५ हजार रुपये खर्च आला होता. आजमितीस, जिल्हा परिषदेच्या निधीतून तलाव सुशोभिकरणाचे काम चालू आहे.


टाटांच्या जलविद्युतनिर्मिती केंद्रापासून लांबच्या प्रवासाला निघालेल्या वीजेच्या तारांना अलविदा करत, आम्ही पाठीवर सॅक्स पाठीवर चढवल्या. आणि, ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला.


'फेण्यादेवी' घाटाच्या पायथ्याकडे वाटचाल 
कोकणातून सह्याद्री घाटमाथा गाठण्यासाठी आता आमचं लक्ष्य होतं 'फेण्यादेवी' नावाची घाटवाट. "सावळाला जायचंय ना, मग जा की निवांत टाटा पॉवरच्या हाईस्त*मधून…" असा सल्ला गावकऱ्यांनी दिला. (*हॉईस्ट - इलेक्ट्रिक वायर लिफ्ट). अर्थात, सह्याद्री घाट चढाईची ओढ असल्यानं, शॉर्टकट प्रलोभनांना भुललो नाही. कुसूर घाटाच्या उत्तरेला ८ - १० किमी लांब असलेल्या 'फेण्यादेवी' नावाच्या घाटाचा पायथा गाठण्यासाठी पायगाडी दौडवली.


मावळातल्या आंन्ध्रा नदीचं विपुल पाणी कोकणात उतरवल्यामुळे, भिवपुरीचा परिसर 'सुजलाम सुफलाम' झालेला दिसत होता. पाठीमागे सह्याद्रीची भिंत जबरदस्त दिसत होती.


वाटेतले टप्पे मांडवणे आणि हेद्रुजी पोहोचायला टमटम (विक्रम) नामक दिव्य रिक्षेमुळे ४-६ किमी डांबरी रस्त्यावरून पायपीट वाचली. पण, हेद्रुजीमधून फेण्यादेवी घाटाचा पायथा असलेल्या 'माळेगाव'ला पोहोचायचा मार्ग मात्र धोपट नव्हता. थेट सह्याद्री घाटमाथ्याकडच्या विजेच्या टॉवर्सपासून उतरत आलेल्या झाडीभरल्या डोंगररांगेची १०० मी चढाई केल्याशिवाय, पल्याडच्या खोऱ्यातल्या फेण्यादेवीचं दर्शन शक्य नव्ह्तं.


वाट डोंगर-झाडीतून चढ-उताराची, त्यामुळे आम्हां शहरी लोकांना अंमळ जड जाईल, असा गावकऱ्यांचा समज. अर्थात, त्यांच्या सांगण्यानुसार अजून २-३ विक्रम रिक्षा बदलत, डोंगररांगेला वळसा घालून कशेळेमार्गे माळेगाव गाठण्यापेक्षा, सह्याद्रीदर्शन करवणारी चढाई कधीही आम्हांला आवडणार होती. एव्हाना ऊन रटरटू लागलेलं. वारा पडलेला. चिटपाखरं देखील गप्पगुमान आडोश्याला विसावलेली. घाम टिपत, वाळलेला पाचोळा तुडवत, झाडीतून घुसत, ढोरवाटा चुकवत उभा चढ चढून खिंडीत पोहोचलो.

नकाशानुसार फेण्यादेवीच्या पायथ्याचं माळेगाव कुठेतरी पलिकडच्या खोऱ्यात असणार, हे नक्की होतं. पण, दाट झाडीमुळे फेण्यादेवी घाटवाट कशी चढेल, याचा काहीच अंदाज येईना. जरा स्वस्थ बसून, सरबत पिऊन आधी धपापणाऱ्या ऊराला शांत केलं. मगाशी दिसलेल्या घाटमाथ्याकडच्या विजेच्या टॉवरपासून उतरत आलेल्या रांगेवरूनंच  तर फेण्यादेवी घाट चढत नसेल ना, असं 'कन्फ्युजन'! वरती टेपावरून चढल्यावर डोळे विस्फारले. डावीकडे ट्रेकर्सचा लाडका 'पेठचा किल्ला' (कोथळीगड), खोऱ्यातलं गाव माळेगाव असणार. आणि, लांबवर पसरलेली डोंगराच्या सोंडेवरून 'फेण्यादेवी' घाटाची वाट असणार, असा साक्षात्कार क्षण!!!


गर्द झाडोऱ्यातून वळणं घेनाऱ्या धम्माल वाटेवरून, १०० मी डोंगररांग उतरून पल्याड खोऱ्यात पिंपळपाडयापाशी उतरलो, तेंव्हा समोर पेठच्या किल्ल्याचं दृश्य विलक्षण देखणं होतं.


         
पिंपळपाडयापासून पूर्वेला सह्याद्रीच्या विराट दृश्यानं आणि फेण्यादेवी घाट चढताना ही अजस्त्र उंची चढून जायचीये, हे पाहून अक्षरश: भारावून गेलो. आणि, इथल्या पहाडातून जाणाऱ्या तीन घाटवाटा कुठे असतील, याचा अंदाज बांधू लागलो. माळेगाववरून आंध्रा खोऱ्यात सावळा गावाला जोडणारा 'फेण्यादेवी घाट', तर अलिकडच्या पिंपळपाड्यापासून 'आडकी' आणि 'सावळे' घाट चढतात. पूर्वजांच्या पाऊलखुणांची नोंद अशी, की इ.स. १८२६ ला सावळे घाटातून वाहतूक होणाऱ्या लाकडाची किंमत अंदाजे ५० हजार रुपये होती.


एका गावकऱ्याकडून फेण्यादेवी घाटाची वाट समजावून घेतली. शेजारी घराबाहेर रचल्या होत्या सरपणाचा मोळ्या. म्हणजे, २०१५ मध्येही आमच्या वाड्या-वस्त्यांसाठी sustainable इंधनं उपलब्ध नाहीत - परवडत नाहीत, हे मोठ्ठ वास्तव आहेच.


पल्याडच्या कापलेल्या झाडावरची बांडगुळे फारंच प्रतीकात्मक होती. माणूस हेच करतोय नाही का!
पेपरात बिबट्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातम्या रोजच्या पेपरात झळकताहेत… दुसरीकडे, विकासाच्या गोंडस नावाखाली 'भरघोस राजाश्रय' मिळालाय, सह्याद्रीचे 'लचके' तोडायला - फार्महाऊसेस-आश्रम-खाजगी पर्यटनस्थळं उभारायला. अश्या पद्धतीने, ओरबाडत राहिल्यावर इथली परिसंस्था-रानं (ecosystem) कशी कितीकाळ तरतील, ही जाणीव मनोमन अस्वस्थ करून गेली… आपण फक्त हळहळ व्यक्त करायची का….……


अचानक समोर आलं एक चिमुरडं पोर - 'हे येडे कुठं भरकटले' अश्या मुद्रेत. भूणभूण करून 'पारले-जी'चा पुडा मिळवलेलं ते ध्यान बघून हसू फुटलं...

सुरेख सह्य-दर्शन घडवणारा फेण्यादेवी घाट
… आमच्या पूर्वेला सह्याद्रीची भिंत ७०० मी उठावलेली. (खालील फोटोत उंचीचा नीट अंदाज येत नाहीये.) त्यात 'फेण्यादेवी घाटा'च्या वाटेचा आदमास बांधू लागलो. माळेगावच्या उत्तरेला दाट झाडीतून चढत लांबच लांब पसरलेल्या सोंडेवर पोहोचायचं. त्यानंतर पठारावरच्या वाडीला मागे टाकत, पदरातून आडवं आडवं जात, शेवटी घळीतून चढत घाटमाथा गाठायचा होता.


पहाटेपासून ट्रेक सुरू झालेला.. आता पोटात कावळे कोकलू लागलेले.. कोकणातली गच्च दमट हवा…
पण, 'फेण्यादेवी' घाटाची सुरुवात वाट उत्सुकता असल्याने, दाट झाडीतून मळलेली उभी वाट चढू लागलो.


सोंडेवरून १०० मी चढाईनंतर लांबवर घाटमाथ्याजवळ दिसणारी फेण्यादेवी घाटाची खिंड लक्षवेधी होती. तेच होतं आमचं गंतव्य!


पोटपूजा आणि विश्रांतीसाठी सावलीत विसावलो. ट्रेक-स्पेशल मेन्यू म्हणून गृहलक्ष्मीनं मुगाची धिरडी-व्हीटब्रेड आणि सोबत तळणीची मिरची पेरलेला दहीभात दिलेला. मस्त उदरभरण करून तरूतळी दोन घटका विसावलो.


उभा चढ चढून पठारावर पोहोचताना पायात पेटके येऊ लागले होते. इलेक्ट्रालच्या संजीवनीने थोडं बरं वाटलं. पुढे गेल्यावर सह्याद्रीचा पश्चिम कडा उन्हांत तळपत होता.


कळकराईच्या शिवारात गावकऱ्यांना रामराम करून, थोडकं पुढं आल्यावर उत्तरेला (डावीकडे) उलगडला आमचा सखा 'पेठचा किल्ला'. मागच्या वर्षी केलेल्या वाजंत्री घाट - पेठचा किल्ला - कौल्याच्या धारेच्या घाटाच्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.


उत्तरेला जाणारा बैलगाडी रस्ता सोडून, पूर्वेला उंबराच्या खालच्या देवराईच्या 'कोळोबा' नावच्या रानदेवापाशी विसावलो.

आता सह्याद्रीच्या कुशीतल्या पदरातला भन्नाट ट्रॅव्हर्स सुरू होणार होता.


पश्चिमेकडे झुकलेली उन्हं जुन्या-जाणत्या वृक्षांमधून-पारंब्यांमधून वळणं घेत जाणारी पावठी उजळवत होती. डावीकडे थेट डोक्यावर आलेला सह्यकडा, त्याचे एकावर एक रचले गेलेले थर एकदम देखणे दिसत होते.


थोडकं मोकळवन संपलं, सह्यकड्याच्या समोरच्या घळीतून फेण्यादेवीची वाट चढणार होती.


पदरात देखणं गारेगार जंगल दिलखुष करून गेलं. कळकराईमध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्न झाल्याचा पुरावा - पाण्याचा पाईप सांगाती होता.


उंबराच्या पाण्यापासचा उंबर झुकला होता - लगडलेल्या उंबरांमुळे आणि त्यावर अधाशीपणे खादाडगिरी करणाऱ्या हुप्प्यांमुळेही!

सांगा ना, का अश्या झक्क रानाला माणसाची 'नजर लागली'च पाहिजे…. ही बघा, डोळ्यात खुपणारी झाडांची तोड!


ता डावी-उजवीकडच्या सह्यभिंती जवळ येऊ लागल्या. वळणावरून उजवीकडचा सणसणीत कडा हा असा अंगावर आला.

अजून जवळून सह्याद्री कड्यांचं दर्शन झाले. ट्रेकर मंडळी लई खूष!


वळसा घेत वाट फेण्यादेवी घाटाच्या झाडीभरल्या घळीपाशी घेऊन गेली.

 

गारेगार पाणी पिऊन 'तृप्त' झालो. ट्रेकमधला एखादा क्षण 'आहाहा' असतो. आमच्या ट्रेकमधली 'हीच ती वेळ, हाच तो क्षण होता'.
३६० अंशात आम्हांला वेढलेल्या सह्याद्रीच्या पश्चिमघाटातल्या अनवट सौंदर्याचा आनंद आम्ही आकंठ लुटत होतो. कितीतरी वेळ तिथेच घाटात सह्याद्री 'अनुभवत' राहिलो.



आता चक्क थंडी वाजू लागलेली, त्यामुळे फेण्यादेवीच्या शिळांमधून चढणारा घाटाचा शेवटचा टप्पा चढू लागलो.



५० मी उंची गाठल्यावर आम्ही पोहोचलो घाटाच्या देवतेपाशी - 'फेण्यादेवी'च्या ठाण्यापाशी!



ओढ्याची घळ सोडून आता उजवीकडच्या दरडीवरून ५० मी चढून घाटमाथ्यावर पोहोचली. आपण पायथ्याच्या माळेगावपासून कुठून कुठून चढून आलो, हे पाहून केवळ थक्क झालो.


जुन्या नव्या पाऊल-खुणा, भुलविती-पुन्हा…
सावळा गावच्या पठारावरून परतीच्या वाटेवर निघालो.
सख्या सह्याद्रीच्या भटकंतीत दिसलेल्या पाऊलखुणा पुन:पुन्हा भुलवत होत्या.


… काहीशे वर्षांपूर्वी वाटसरूंसाठी घाटमार्गावर पाण्याची टाकी खोदवण्याची जिद्द थक्क करणारी. पण, आजही या 'पाऊलखुणां'वर प्रेम करणाऱ्या अन कष्टाने ही टाकी साफ करून मोकळी करणाऱ्या 'मावळ अॅडव्हेंचरर'च्या विश्वनाथ जावलिकर, बोम्बल्या फकीर (रवी पवार) आणि ट्रेकर दोस्तांची सह्य-भक्ती देखील थक्क करणारी…

… काहीशे वर्षांपूर्वी व्यापार-प्रवासी-धर्मप्रचार-राज्यसंस्था यांच्यासाठी घाटवाटांचं महत्त्व वादातीत होतंच. पण, आजही या 'पाऊलखुणा' जोडतात कोण्या सासुरवाशीणेला वाडीमधल्या माहेराशी. सासुरवाशीण मुलीला वाडीवर माहेरी घेऊन जाणारे आजोबा तान्ह्या नातीला हातात घेऊन, ओढ्यातल्या धोंड्यांवरून उतरताना पाहून थक्क झालेलो…

… काहीशे वर्षांपूर्वी पांथस्थांसाठी विशाल तलाव बांधून सोय करणाऱ्या कोण्या राज्यकर्तीचा द्रष्टेपणा मोठ्ठाच. पण, आजही कदाचित याच 'पाऊलखुणां'च्या प्रेरणेने भिवपुरीचे अजस्त्र पाईप्स कोकणातल्या शहरांसाठी पाणी उतरवतात...

… काहीशे वर्षांपासून उंबराखाली स्थापलेला रानदेव आणि सोबतीची देवराई घाटातल्या प्रवाश्यांना बळ देई. पण, आजही जेंव्हा या घाटांच्या पाऊलखुणा शोधताना ऊर धपापू लागलं, पायात पेटके आले तर हाच रानदेव बळ देतो ट्रेकर्सना.

काळ बदलला,
पण सह्याद्रीतल्या घाटांमधल्या पाऊल-खुणा, भुलविती-पुन्हा… भुलविती-पुन्हा…


----------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. कुसूर आणि फेण्यादेवी घाट हा ट्रेक आम्ही एका दिवसात केला. पण, घाटमाथ्यावरची गावं (अनुक्रमे कुसूर आणि सावळा) आणि कोकणातली गावं (अनुक्रमे भिवपुरी आणि माळेगाव) एकमेकांपासून १० - १२ किमी दूर असल्याने ट्रेकचं नियोजन चांगले हवे. ही अंतरे गाडीने पार केली, तर ट्रेक परावलंबी होतो.
२. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

@ साईप्रकाश बेलसरे, २०१५
छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे

15 comments:

  1. साई.. मस्त भटकंती सुरु आहे..छान लेखन नि प्रचि पण..

    ReplyDelete
    Replies
    1. यो: धन्यवाद दोस्ता...:)
      हा ट्रेक वन-डे फन-डे झाला...
      बाकी, ट्रेकिंग तसं जरा हळूहळूच चाललंय..
      प्रचि माझ्यापेक्षा माझा मित्र साकेतनी फार भारी काढलेत...

      Delete
  2. जबरी… ऐतिहासिक नोंद असलेल्या कुसूर आणि फेण्यादेवी घाटाची मस्त भटकंती करून आलात… आणि तेही नेहमीप्रमाणे सुंदर अश्या शब्दांत मांडून शेवट काव्यात्मक पद्धतीने केलास… झकास… मी तर २ वेळा वाचला हा वृतांत्त…
    कुसूर घाटात ऐतिहासिक "पाण्याची पाच टाकी" आहेत हे बघून तर हा ट्रेक करायची मनापासून इच्छा झाली आहे…
    आंध्रमावळात ले ट्रेक्स करताना तुझी मदत कायम घेणार…
    जबरदस्त ब्लॉगपोस्ट… आणि ह्या वेळेस फोटो हि दर्जेदार…
    जबरी…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      मन:पूर्वक धन्यवाद!!!
      काम्ब्रे - निगडे - पिराचा डोंगर - फिरंगाई अशी आंध्रा खोऱ्यातली लेणी इतक्यात केली होती,
      त्यामुळे कुसूर-फेण्यादेवी घाट ट्रेक करायची खूप इच्छा होती. भन्नाट ट्रेकमध्ये घाटातल्या ऐतिहासिक खुणा पडताळून पाहता आल्या. फोटोज साकेतनी फार भारी काढले यंदा..
      आपण करूयात मावळांमधली भटकंती!!! :)

      Delete
  3. तुझा प्रत्येक वृत्तांत म्हणजे एखाद्या साग्रसंगीत भोजनाचा आनंद….!!! जेवणाची उत्कंठा वाढवण-या "Starters" सारखी सुंदर सुरुवात….ज्यात हल्ली ब्लॉगची शिर्षकं सुद्धा काहीच्या काही भन्नाट असतात….तृप्त करणा-या "Main Course" सारखा मुख्य वृत्तांत आणि "Cherry on the Top" चा आनंद देणा-या "Desserts" सारखा अफलातून शेवट !!!
    हा वृत्तांत सुद्धा ह्याच वळणाने जाणारा….Self Orientation चा उत्कृष्ट नमुना असलेला ट्रेक…सुंदर असे वर्णनाला साजेसे फोटोज…मावळतला सुंदर वेद लावणारा निसर्ग आणि साथीला भक्कम दोस्त !!! और क्या चाहिये…जियो !!!

    ReplyDelete
    Replies
    1. ओंकार:
      किती सुंदर प्रतिक्रिया!
      अरे, गेले काही महिने ऑफिसच्या अतिरिक्त कामामुळे दणदणीत ट्रेक्स होत नव्हते.
      या ट्रेकमध्ये परत एकदा सह्यादी खूप मनापासून अनुभवला, म्हणून त्यातलं थोडकं ब्लॉगमध्ये झिरपलं असेल...
      तुझे ट्रेक्स बहरत जावोत अश्या मन:पूर्वक शुभेच्छा... म्हणजे सुंदर ब्लॉग्ज लवकर लवकर येतीलंच...

      Delete
  4. nice, beautiful and great....................

    ReplyDelete
    Replies
    1. काका:
      तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटतं...
      धन्यवाद!!! :)

      Delete
  5. तुझ्या शब्दांच्या जादुई दुनियेत हरखून गेलो पार ...., सुंदर...!!

    ReplyDelete
    Replies
    1. संकेत:
      तू कविमनाचा सह्यभक्त असल्यानं, या अनवट घाटवाटांचं सौंदर्य तुला भावलं...
      खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून...
      ट्रेकिंग आणि लिखाणासाठी खूप शुभेच्छा!!!

      Delete
  6. खूप छान वर्णन केले आहे प्रत्येक क्षणाचे जणू आम्हीच प्रत्यक्ष तेथे आहोत असा भास होत आहे.
    धन्यवाद मित्रा सह्याद्रीचा हा अनमोल दुर्मीळ खजिना आमच्यासमोर ठेवल्या बद्दल.

    ReplyDelete
    Replies
    1. अमोलजी:
      ब्लॉगवर स्वागत... :)
      आडवाटेच्या सह्याद्रीचं रांगडं सौंदर्य अनुभवलं, ते सह्यमित्रांसोबत शेअर करणं इतकाच हेतू आहे ब्लॉगचा... मस्त वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून..
      खूप खूप धन्यवाद!!!

      Delete
  7. साई, तु ब्लॉगमध्ये लिहीतो तोच तुझा स्वभाव आहे संवेदनशील आणि निर्मळ त्यामुळे प्रत्येक ब्लॉग एखाद्या नावाजलेल्या साहित्यिकाने लिहीला असा वाटतो! फोटो पण क्षण अनुभूती द्यावेत असे.आमचा प्रशांत ( भाऊ) असेच छान लिहीतो पण ईंग्लिशमध्ये.तुमच्यासारख्यांमुळे सह्याद्री निसर्ग व ऐताहासिक पर्यटन हॉटस्पॉट होईल की काय अशी शंका येते!well done buddy!

    ReplyDelete
    Replies
    1. तुषार:
      ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत!!!
      बाप रे.. साहित्यिक वगैरे नाही, आपण आपले साधे ट्रेकर...
      ट्रेक भन्नाट झाला आणि मनापासून अनुभवला, तर त्यातली थोडकी मज्जा ब्लॉगमध्ये उतरत असेल, इतकंच..
      मस्त वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून...
      प्रशांत यांचा ब्लॉग देखील खूप माहितीपूर्ण असतो.. सुरेख फोटोजनी सजवलेला...

      Delete
  8. भिवपुरीचा अष्टकोनी तलाव हा राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला आहे व त्यांचे नाव हि त्या तलावाला देण्यात आले आहे.

    ReplyDelete