Pages

Friday, 30 January 2015

'भामनेर'चं 'जिग-सॉ' कोडं उलगडताना…

*** दुर्ग - घाटवाटा - लेणी - गिरीस्थळे यांच्या भटकंतीतून, 
उलगडत गेलेलं अल्पपरिचित 'भामा' नदीच्या खोऱ्याचं 'जिग-सॉ' कोडं ***
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
'कधी कधी जिग-सॉ' कोडयातले तुकडे सपशेल गोंधळून टाकतात.
कोडं सुटत नाहीये, याची हुरहूर लागते... म्हणून मग परत परत प्रयत्न करत राहायचं.
अवचित एका क्षणी त्या विखुरलेल्या तुकड्यांमधून उलगडतो एक 'आकृतीबंध'…  
आणिविलक्षण समाधान मनी दाटून येतं… 
'भामनेर'तले दुर्ग - गिरीस्थळे - लेणी - घाटवाटांची भिरीभिरी भटकंती करताना असंच काही झालं.
(भामनेर म्हणजे भीमेची उपनदी असलेल्या 'भामा नदी'चं खोरं)
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
                 
पहिल्यांदा 'पेठचा किल्ला' (कोथळीगड) पाहिला, तेंव्हा त्याच्या पोटातलं गुहालेणं आणि माथ्याकडे नेणाऱ्या कोरीव पायऱ्या बघून थक्क झालो होतो. मग प्रश्न पडला, सह्याद्रीच्या भिंतीवर आणि कोकणपट्टीवर हा दुर्ग एखाद्या ससाण्यासारखी नजर का ठेवत असेल.
         
... पेठच्या किल्ल्याच्या पायथ्याशी होती, कातळकोरीव 'आंबिवली लेणी'. कोकणात चिल्हार नदीपाशी ही लेणी खोदवण्याचं प्रयोजन काय असेल, हा  भुंगा मनात गुंजत राहिलेला… 

... चाकण – तळेगावजवळच्या ‘भामचंद्र लेण्या'ला भेट नेहेमीचीच. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा इथे पदस्पर्श झालेला. आणि, ही तर मूळची बौद्ध लेणी. पूर्वीची साधी टूल्स वापरून ही लेणी खोदवायला, किती अपार कष्ट पडले असतील. आणि, इथेच या डोंगरात ही लेणी का खोदवली असतील?
     
…. भामा नदीच्या वळणवेड्या खोऱ्यामधल्या गिरीस्थळांची भटकंती सुरू झाली. 'कुंडेश्वर - शिंगेश्वर - तासूबाई - वरसूबाई'सारखे उंचचउंच डोंगर धुंडाळले. माथ्यावरची साधी, पण भोळ्या भाविकांना बळ देणारी राऊळं पाहिली. कोणी उभारली असतील...
          
गडदचं अनवट 'दुर्गेश्वर लेणं' बेधडक धुंडाळताना थरारलो होतोपण अशी दुर्गम लेणी या इथे का खोदवली असतीलयाचं उत्तर गवसेना...
          
...पेठच्या किल्ल्यापासून घाटमाथ्याकडे चढणारी 'कौल्याची धार' नावाची घाटवाट चढत होतो. अन, वाटेत गवसली पाण्याची कातळकोरीव टाकी. पण पुन्हा एकदा पूर्वजांनी हे सगळं का उभं केलं असेल ते उलगडेना
          
वेगवेगळ्या ट्रेक्समध्ये भेटले - 'भामनेरा'तले दुर्ग - घाटवाटा - घाटाच्या पायथ्याची आणि माथ्यावरची कोरीव लेणी-टाकी, शिखरांवरची साधी राउळे - असे 'जिग-सॉ'चे विखुरलेले तुकडे!!!
'डोंगरयात्रा' पुस्तक आणि गुगल नकाश्यांवर हे 'जिग-सॉ'चे तुकडे झूम-आऊट करून पाहू लागलो, आणि 'जिग-सॉ'चा आकृतीबंध उलगडू लागला….

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सह्याद्री घाटमाथ्यापाशी वांद्रे गावाच्या किंचित उत्तरेला शिंगेश्वर-कुंडेश्वर ही उपरांग सुरू होवून २५-३० किमी पूर्वेला धावते. तर, वांद्रे गावाच्या किंचित दक्षिणेला नाखिंदा टोकापाशी सुरू होणारी वरसूबाई–तासूबाई ही उपरांग शिंगेश्वर रांगेच्या ५-७ किमी दक्षिणेकडून धावते. शिंगेश्वर आणि तासूबाई या रांगांनी बनवलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशातून वाहते भामा’. भामेच्या या खो-याला शिवकाळापासून ‘भामनेर’ असं म्हणतात. भामेचा प्रवास तसा छोटासाच.. पाच-पन्नास किमी धाव घेऊन ती चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव गावच्या हद्दीत भीमेमध्ये एकरूप होते.
   
१. तासूबाईचं देवस्थान आणि भन्नाट घळई  
“… कान तोडू का कान???
दरडवण्याचा आवाज ऐकून साकेत आणि मी दचकलोच!!!!!
तर परत आवाज,  “... तोडू का रे कान?
आयला, ही काय भानगड ‘तासूबाई’च्या डोंगरावर...
आसपास कोणी दिसेना.
... आता हा आलो, कान तोडायला.. करवंदीच्या जाळीमागून परत आवाज.
कोणी दरवडेखोर असेल… की असेल कोणी वेडा??? आणि, इथे काय करतोय..

मग जाणवलं, समोरचा अज्ञात आमचा अंदाज घेऊ पाहतोय...
मग मीच ओरडून सांगितलं, तासूबाईच्या दर्शनाला आलोय. इथंच जवळ आहे ना मंदिर..
करवंदीपल्याड आता काही हालचाल जाणवली, अन बाहेर आली एक काळी-सावळी आकृती.

आणि, मग सगळा गोंधळ लक्षात आला.
तासूबाई डोंगराच्या माथ्यावर धनगरवाड्यात राहणारा हा गुराखी दूध पोहोचवायला केंद्रावर निघालेला. आमच्या पिशव्या, सॅक्स, कॅमेरा, गॉगल पाहून आम्हांला ‘दरोडेखोर’ समजून भेदरलेला.
आम्हांला भेटल्यावर, मग पाया पडायला लागला, देवाच्या पाहुण्याना तरास दिला. रागावू नका हां...
मग काय, साकेतने मला आणि मी त्याला ‘दरोडेखोर’ असं यथेच्छ चिडवून झालं......
 … सकाळी-सकाळीच तळेगाव एम.आय.डी.सी.मधून 'नवलाखउंबरे'मधून 'करंजविहीरे'ला जाताना पूर्वदिशा उजळली.
आता रस्ता मिंधेवाडी खिंडीतून जात होता. इंद्रायणी खोऱ्यातून भामा खोऱ्यात प्रवेश करत होता. 
डावीकडे 'वांद्रे' गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने भामा आसखेड धरणाच्या काठाकाठाने वहागाव, देशमुखवाडी अशी गावं मागे टाकत निवांत रस्ता होता. समोर दिसणाऱ्या सुळक्याच्या उजवीकडून वळसा घालून रस्ता तासुबाईच्या पायथ्याला 'कोळीये' (आवळेवाडी) गावी पोहोचणार होता.
'कोळीये' गावापाशी वळणावर 'तासुबाई' डोंगर सुरेख उजळून निघत होता. आमच्या कारची अजस्त्र सावली शिंदीच्या झाडावर विसावली होती. 
 आवळेवाडीमधल्या डिरुबाई मंदिराजवळ गाडी लावून कूच केलं. 
गावातून दक्षिणेला २०० मी उंचावलेल्या तासूबाई डोंगराची कातळभिंत छेदणाऱ्या ओहोळाच्या साथीने चढाई असणार, असा अंदाज बांधला.  
 भामा खोरं आणि आसखेड धरणाच्या सुरेख दृश्यानं भटकंतीला धम्माल आली. वाटेवरच्या कातळकोरीव पायऱ्या बघता, ही वाट निश्चित जुनी असणार. 
कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघणाऱ्या भामा खोऱ्यामधलं सर्वोच्च शिखर 'शिंगेश्वर' आणि निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर दिसणारं त्याचं भामा जलाशयातलं प्रतिबिंब विलक्षण मोहक होतं. 
भामा नदीमुळे सुजलाम - सुफलाम झालेलं खोरं आणि शेताडी…
तासूबाई शिखराकडे उजवीकडे वाट वळली. पठारावरून अतिशय दूरवरचं विहंगम आणि अविस्मरणीय दर्शन घडलं.
 कित्ती दूरवरचं दिसावं. वाह, एकदम दिलखुश!!!  
आणि हे दुर्ग शिलेदारसुद्धा किती ठळक दिसावेत… तासूबाईचीच कृपा म्हणायची.
मुख्य शिखराच्या पूर्व पोटात तासूबाईचं राऊळ आता दिसू लागलं. 


तासूबाई राऊळासमोरच्या घळईच्या दृश्याने नजर गरगरली.
 भन्नाट वसूल दृश्य!!!
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

२. भामा खोऱ्याच्या एव्हरेस्टवर - उत्तुंग 'शिंगेश्वर' शिखरावर
"ह्यो काय शिंगेश्वर… आता पघा, म्हाराष्ट्रात कळसूबाईच्या खालोखाल आमचा शिंगेश्वरंच ऊच!"
आडगावमधल्या कट्ट्यावरचे ग्रामस्थ सांगत होते. Facts वेगळ्या असल्या, तरी समुद्रसपाटीपासून अंदाजे १२५० मी  उंचीचा शिंगेश्वर खरंच दणदणीत उंच दिसत होता...  

पहाटेच राजगुरुनगर - शिरोली - पाईट असे टप्पे घेत, पायथ्याच्या 'आडगाव'ला पोहोचलो होतो. सोनसळी उन्हांत न्हाऊन निघणारी कुंडेश्वर आणि शिंगेश्वर रांग भन्नाट दिसत होती.
चढाई मोठ्ठी म्हणून बुटांचे बंद बांधून; आणि माथ्यावर पाणी नाही म्हणून भरपूर पाणी सोबत घेऊन चढाईस सुरुवात केली. वाटेत कातळकोरीव पायऱ्या बघून हुरूप आला.

पहिला टप्पा चढला की समोर दिसला अजून एक रखरखीत टप्पा - कातळ आणि खुरट्या झुडुपांनी माखलेला. पल्याड आता कुठे शिंगेश्वरचा माथा दिसू लागला होता. 
… अवघ्या वावरात पाण्याचा थेंब नाही. मग ही रानफुलं कुठल्या संजिवनीवर तरतात, कुणास ठावूक…
चढाई तब्बल दोन तासांची - उभी. संपता संपतंच नाहीये. माथ्यावरचं राऊळ आता खुणावू लागलंय…
माथ्याकडे चढणारी घसाऱ्याची, नागमोडी… आणि, कुठे कुठे सावलीचं झाड नाही.
पायथ्याच्या किंचित खाली कोरडी विहीर आणि शिवलिंग. पाणी नाहीच.
माथ्यावर शिंगेश्वर महादेवाचं छोटंसं राऊळ आणि भर्राट वारा.
सह्याद्रीच्या आडवाटेवरच्या या देवतेला वंदन करून मन तृप्त झालं.    
खूप खूप उंच आल्यामुळे, डोंगरउतारावरून खाली वाकून बघितल्यावर भामा खोऱ्यातल्या वाड्या-वस्त्या-शेताडी डोकावत होत्या. 
पश्चिमेला 'शिंगा' रांगेवरून पवनचक्क्यांची रांग सांबरकड्यापर्यंत धावली होती.     
परतीची वाट घेतली, तर ऊर धपापलं होतं. घशाला कोरड पडलेली. पाठीमागे 'शिंगेश्वर' उन्हांत अजून रापत, तळपत उभा होता.
पण, मनात विलक्षण समाधान दाटून आलेलं - भामा खोऱ्याच्या एव्हरेस्टवर चढाई केल्याचं आणि शिंगेश्वर महादेवाच्या दर्शनाने…
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

३. घाटमाथ्याजवळचं 'वरसूबाई' शिखर
…. मे महिन्यात कळाकळा ऊन तापलं, तरी  ट्रेक्सशिवाय घरी बसवत नाही. पाऊलं वळतात, फारा दिवसांपासून ट्रेक्सच्या याद्यांमध्ये घुटमळलेल्या आडवाटांवर… लोणावळे - भीमाशंकर या ट्रेकच्या वाटेवर लागणाऱ्या जादुई 'वांद्रे खिंडी'ला बिलगलेला - 'वरसूबाई'सारखा एखादा डोंगर बऱ्याच दिवसांपासून साद घालत असतो. एखाद्या ट्रेकर दोस्तासोबत मनस्वी तापलेल्या उन्हांतून राजगुरुनगर - शिरोली - पाईट - सुपे - आंबोली - भलवडी अशी गावं घेत, पुढे वांद्रे रस्त्यावरून diversion घेऊन 'वरसूबाई'च्या पायथ्याचे 'तोरणे' गाव गाठायचं. (पर्यायी रस्ता: तळेगाव दाभाडे MIDC - करंजविहीरे - आवळेवाडी - वाघू - आंबू - पायथ्याचे तोरणे गाव (वांद्रे रस्त्यावर))
समोर असतात सह्याद्री घाटमाथ्याजवळ आलोय, हे दाखवणारी झाडी - कातळटप्पे.
टुमदार 'तोरणे' गावातले आपुलकीने चौकशी करणारे ग्रामस्थ.
पवनचक्क्यांमुळे माथ्यावर जायला कच्चा रस्ता आहे. पण, ट्रेकर्सना आवडतात कातळकोरीव पायऱ्या आणि फांद्यांचा पूलावरून चढणारी पाऊलवाट. 
निवांत चढणाऱ्या वाटेवरून उलगडत जाणारे वरसूबाई डोंगराचे कातळउतार आणि झाडीचे टप्पे.
एखादा सरडा आगंतुक ट्रेकर्सकडे कुतूहलाने पाहतो. आणि बेमालूमपणे परत सह्याद्रीत हरवून जातो.
वारं पडलेलं. तापलेल्या उन्हांत एखादं शुष्क झाड आणि पाठीमागे थकून थबकलेल्या पवनचक्क्या.  
आता सह्यधारेमागे पदरगडाची शाळुंका आणि भन्नाट उंचावलेलं भीमाशंकरचं 'नागफणी' टोक खुणावतं। परत परत भटकंतीला यायचं आवताण देतं.
वरसूबाई माथा आता नजीक आलेला.
कातळाच्या टप्प्यांपल्याड झाडीतून आता वरसूबाई डोकावू लागलेला. पश्चिमेला उजवीकडे सरकत वाट वळून माथ्याकडे जाते.
सह्याद्रीत काहीना काही वेगळं दिसायलाच हवं. झाडावर चक्क बांडगुळ म्हणून वाढलेलं निवडुंग!
तासाभराच्या चढाईनंतर माथ्यावरच्या सड्यावर वरसूबाई राऊळापाशी पोहोचतो. नव्यानं बांधकाम होत असलेलं. शेंदूर माखलेला देवीचा तांदळा. सह्यदेवतेला मनोमन नमन करायचं. वाघराशी लढणारा वीर - दीपमाळ - मारुती असं थोडके अवशेष बाहेर दिसतात.
माऊलीनं-गृहलक्ष्मीनं दिलेली शिदोरीवर - पिठलं भाकरी कांदा तुटून पडायचं. अन, तृप्ततेने ढेकर देऊन दोन क्षण विश्रांती घ्यायची.    
वरसूबाई शिखराची भटकंती करून दोन तासात तोरणे गावात आलो, तर तरारल्या शेतामागे 'शिंगेश्वर' शिखर खुणावत असतं.
निरोप घ्यावा म्हणून पाठीमागे बघितलं, तर वरसूबाई डोंगराची मायेची सावली दिठी सुखावते. आमच्या सह्याद्रीमधली दैवतं ही अशी निखळ. साध्या-भोळ्या भाविकांना पावणारी. 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
४. शांत निसर्गस्थळ - कुंडेश्वर
  • जवळचे गाव: पाईट – कोमलवाडी. हेद्रूज
  • पिण्याचे पाणी: उपलब्ध 
  • चढाई: सोप्पी १ तास. कच्च्या रस्त्यावरून दणकट वाहन बरेचसे अंतर जावू शकेल. 
  • वैशिष्ट्य: माथ्यावर मंदिर. वाटेत धबधबे. पाण्याचे कुंड. चासकमान धरणाचे पाणी







- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

५. गडदची दुर्गेश्वर लेणी 
  • पोहोचावे कसे: तळेगाव एम.आय.डी.सी. > नवलाख उंबरे > करंजविहीरे > डावीकडे 'वांद्रे'कडे जाणा-या रस्त्याने भामा आसखेड धरणाच्या बाजूने वहागाव - देशमुखवाडी - कोळीयेमार्गे गडदला पोहोचता येईल. Wikimapia - लिंक  
  • चढाई: १ तास. किंचित अवघड कातळ पायऱ्या. दोराची गरज नाही. 
  • वैशिष्ट्य: गडदच्या बेधडक चढाईचा वृतांत वाचा इथे. भामा आसखेड धरणाच्या दक्षिणेला उभ्या कड्यावर बारीक पायऱ्यांच्या रांगेवरून चढाई. 'दुर्गेश्वर' लेण्यांमध्ये कुठलेच शिलालेख, स्तूप नसल्याने, या लेणी मूळ बौद्धधर्मीय नक्कीच नाहीत. मुख्य दालनाच्या लागत दुर्गेश्वराचं देऊळ आहे. वाघोबा - दीपमाळ - नागप्रतिमा - शिवलिंग असं साधं मूर्तीकाम आहे. सातव्या ते दहाव्या शतकातली ही खोदाई असावी, असा माझा अंदाज आहे. 



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
६. आंबिवली लेणी
  • जवळचे गाव: आंबिवली, कर्जत
  • वैशिष्ट्य: इ.स. पूर्व २५० ते इ.स. १०० दरम्यान पेठच्या किल्ल्याच्या कुशीत चिल्हार नदीच्या काठावर ही बौद्धधर्मीय लेणी खोदवली आहेत. लेण्यात ४२' * ३९' * १०' आकाराचा सभामंडप, त्यात कोरलेला विश्रांतीकरता बाक, वरंडा, बाहेरच्या अंगास अष्टकोनी आणि षटकोनी अश्या स्तंभांच्या दोन जोड्या आहेत. एखाद पाली शिलालेख आढळतो, जो वाचता येत नाही.

छायाचित्र साभार - आंतरजाल Copyright @Akinori Uesugi 


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
७. पेठचा किल्ला (कोथळीगड)
  • जवळचे गाव: आंबिवली, ता. कर्जत; वांद्रे, ता. खेड
  • वैशिष्ट्य: ट्रेकर्सच्या या लाडक्या पेठच्या किल्ल्याच्या पोटात खोदलेलं विशाल लेणे दालन आणि त्याचे कोरीव खांब; कातळमाथ्यावर जाणारा उभ्या पायऱ्यांचा कोरीव बोगदेवजा मार्ग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्वेला सह्याद्रीमाथा चढणाऱ्या 'कौल्याची धार' आणि 'नाखिंदा घाट' या घाटवाटांचा संरक्षक असलेला हा दुर्ग.
 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

८. कौल्याची धार घाटवाट आणि नाखिंदा घाटवाट
  • जवळचे गाव: आंबिवली-पेठ, ता. कर्जत, वांद्रे ता. खेड
  • चढाई: ३ तास. सोपी.
  • वैशिष्ट्य: पेठच्या किल्ल्याला आणि घाटमाथ्याला जोडणारी घाटवाट 'कौल्याची धार' आणि ऐन घाटमार्गात खोदलेली पाण्याची टाकी. अधिक माहितीसाठी: वाचा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

९. करंजविहीरेचा चक्रेश्वर महादेव 
  • जवळचे गाव: करंजविहीरे
  • वैशिष्ट्य: गुहेमधील महादेव मंदिर 
 
(चक्रेश्वर मंदिराची माहिती आणि फोटोज सह्यमित्र 'अमेय जोशी' यांच्या सौजन्याने) 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

१०. भामचंद्र लेणी
  • जवळचे गाव: तळेगाव - चाकण रस्त्यावरील Courtyard Marriott हॉटेलसमोरून रस्ता Hyundai आणि Tetra Pak कंपन्यांकडे जातो. जवळंच भामचंद्र डोंगर आहे.  
  • वैशिष्ट्य: संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा इथे पदस्पर्श झालेला. मूळची बौद्ध लेणी (१५' * १४' * ७'). विहार. पाण्याची टाकी. भामचंद्र महादेवाची स्थापना.








- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -     
'जिग-सॉ'चा आकृतीबंध  उलगडताना:: 


सह्याद्री आणि मॉन्सूननी बनवलं भामा खोरं आणि नदीच्या आधारावर माणसानं फुलवलेली संस्कृतीच्या पाऊलखुणा धुंडाळत भटकंती केली होती… जाणवलं की,
    
…हा 'भामनेर'चा जिग-सॉ बनवला आहे - मॉन्सूनने!!!
अरबी समुद्राची हवा खाऊन कोकणपट्टी दणदण पार करून येणारा मॉन्सून मनमुराद बरसतो. पर्जन्यरेषेपाशी कुठलीच वादावाद न करता, पाण्याच्या वाटण्या होतात, पश्चिमेला अरबी समुद्र किंवा पूर्वेला बंगालच्या उपसागर अश्या आपापल्या वाटा पकडून पाणी खळाळत सुटतं.… 
…हा 'भामनेर'चा जिग-सॉ बनवला आहे - भामा नदीनं आणि आमच्या सह्याद्रीने!!!
सह्याद्रीच्या भिंतींमधून चिंचोळ्या अरुंद डोंगरवळयांमधून पाण्याला आसपासचे ओहोळ येऊन मिळतात. जोडीसंगतीने ते पुढे ओढ्याला मिळतात. रोरावत जाणा-या ओढ्यांचं रुपांतर एखाद्या अवखळ वळणवेड्या भामा नदीत होतं. आणि, सह्याद्रीच्या तालेवार उपरांगांच्या दरम्यान वाहणा-या भामा नदीचं खोरं तयार झालं. 
      …हा 'भामनेर'चा जिग-सॉ बनवला आहे - माणसाने!!!
परिसर ‘सुजलाम सुफलाम’ करणाऱ्या भामा नदीच्या आधाराने जगू पाहणाऱ्या माणसानं वेगवेगळ्या गरजा निर्माण केल्या: शेती - व्यापार-उदीम - धर्मप्रचार - सत्तानियंत्रण अश्या. या गरजांमधून फुलत गेली नद्यांच्या खोऱ्यात संस्कृती. शेतीपाठोपाठ आला व्यापार - धर्म. कोकणातून घाटमाथ्यावर व्यापारासाठी माल नेण्यासाठी घाटवाटा सुरू झाल्या. धर्मप्रचार आणि वर्षावासासाठी (निवासासाठी) लेणी खोदवली गेली. सत्तानियंत्रण म्हणून दुर्ग-किल्ले बनले. आसपासच्या प्रमुख शिखरांवर श्रद्धास्थानं आणि दैवतांची स्थापना झाली. आजच्या काळातल्या पवनचक्क्या आणि धरणं याच संस्कृतीचा एक भाग… 
   
… भामा खोऱ्यातल्या अनेक ट्रेक्समध्ये दुर्ग - घाटवाटा - लेणी - गिरीस्थळे यांच्या भटकंतीतून,  घुमणाऱ्या वाऱ्याने, फुललेल्या रानफुलांनी आणि घमघमणाऱ्या भातखाचरांमधून
- 'भामा' नदीच्या खोऱ्याचं नेमकं हेच 'जिग-सॉ' कोडं उलगडू लागलेलं. 
          

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -     

महत्त्वाच्या नोंदी:
१.
छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
२. चक्रेश्वर मंदिराची माहिती आणि फोटोज सह्यमित्र 'अमेय जोशी' यांच्या सौजन्याने
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. भामा खोऱ्यात जावे कसे: पुण्यापासून जेमतेम ६० किमी दूर असलेल्या, पण ट्रेकर्सना अल्पपरिचित असलेल्या भामा खोऱ्याची वारी करण्यासाठी पुण्याहून राजगुरुनगरला जाताना ४ किमी अलीकडे शिरोली पासून, पाईटपाशी पोहोचावे. किंवा तळेगाव एम.आय.डी.सी. मधून नवलाख उंबरे मार्गे करंजविहीरे गाठावे.
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.

10 comments:

  1. No words... SAI, Simply Great blog info. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. अजयकाका:
      खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून...
      फारशी माहिती नसलेली धम्माल ठिकाणं बघण्यासाठी बऱ्याचदा भटकंती केली होती.
      त्याचा साधासुधा ब्लॉग तुमच्यासारख्या दिग्गज ट्रेकरने वाचला, याचाच आनंद किती मोठा आहे म्हणून सांगू!

      Delete
  2. Mast re saai.. kamaal bhatakanti ahe tuzi

    ReplyDelete
    Replies
    1. यो:
      मस्त वाटलं रे प्रतिक्रिया वाचून... धन्यवाद :)
      मित्रा, आपला कधी येणार रे योग ट्रेकला भेटण्याचा.....

      Delete
  3. ही ब्लॉगपोस्ट वाचल्यावर गुरुवर्य ढमढेरे काकांच्या "हरिश्चंद्रगडाचे सॅटेलाइट किल्ले" चा सखोल अभ्यासपूर्ण लेख आठवला...
    ब्लॉगपोस्ट वाचून अंदाज येतो की तू किती मनापासून अभ्यास करून मेहनत घेऊन ही पोस्ट लिहिली आहेस...
    अतिशय दुर्लक्षित अश्या भामा खोऱ्यातल्या लेणी-घाटवाटा-दुर्ग-मंदिरं ह्यांना जगासमोर आणलंस... त्याबद्दल 1235 वेळा धनुर्वाद...
    सोबतीला मिलींद लिमये सर आणि साकेत गुड़ी सारखे दिग्गज असल्यावर तर अजुनचं मज्जा...
    ओंकार आणि हेम च्या म्हणण्यानुसार खरंचं आता कौतुकाचे शब्द कमी पडले आहेत... पण कौतुकासाठी आपण थोड़ी ना ब्लॉग लिहितो...
    पहिलं वाक्य जाम आवडलं : "कान तोडू का... कान"…
    खरंच भामा खोऱ्याचं अवघड जिग-सॉ पझल… अतिशय अभ्यासपूर्वक सोडवलंस…
    ब… ढी… या…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      गुरुवर्य ढमढेरे काकांच्या कामाचा आवाका वेगळ्याच लेवलचा..
      ब्लॉगमागच्या मेहनतीपेक्षा पेशन्स फार फार लागला. फोटोज – लिखाण यावरचं काम आटोक्यात आलं, की नवीन काही भन्नाट जग कळायच्या. त्यांना भेट देईपर्यंत अजून काही महिने जायचे..
      मिलींद आणि साकेतने खूप मनापासून या सगळ्या ठिकाणांचा आनंद घेतला आणि तळेगावचा मित्र ‘अमेय जोशी’ने गडदचं लेणं आणि चक्रेश्वर डोंगर सुचवला. या सगळ्यातून बनलेला हा ब्लॉग म्हणजे, भामा खोऱ्यातली आम्हांला भेट देता आलेली अनवट ठिकाणं एका ठिकाणी सापडावीत, यासाठीचा छोटासा प्रयत्न...
      "कान तोडू का... कान"चा अनुभव साकेतकडून ऐकशील... भन्नाट!!!

      Delete
  4. साई ... मस्त फ़ोटोज़ आणि माहिती ... सरत्या पावसाळ्यात भामनेर मधली काही ठिकाण धुंडाळाली आता या वर्षी उरलेली नक्की ... तुझ्या लेखाचि नक्कीच मदत होईल ... त्यामुळे मनापासून आभार... सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॉगच्या शेवटी भामनेरचा जिग-सॉ अप्रतिम उलगडला आहेस ...👌

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत:
      धन्यवाद..
      भामनेरच्या भटकंतीला अवश्य अवश्य जावे..
      भामनेरचा जिग-सॉ उलगडण्याचा प्रयत्न केला, पण अजून किती काही दडलं असेल, कुणास ठावूक.. :)

      Delete
  5. भन्नाट भटकंती साई. फार छान माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. समीर: प्रतिक्रिया वाचून छान वाटलं.
      भामा खोरं आणि शेजारचं आंध्रा खोरं आवडेल भटकायला. जरूर भेट द्या या अनवट लेणी-दुर्ग-मंदिरांना!!!
      धन्यवाद!

      Delete