Pages

Thursday, 31 December 2015

अनवट लेणी, निगडेची पद्मावती लेणी


...सुरू झाला होता आंदरमावळातला वळणां-वळणांचा रस्ता. आंद्रा नदीच्या पात्रावर तरंगणाऱ्या धुक्याचे लोट उसळत होतेगारठवत होते. नदीच्या पल्याड समोर खुणावू लागली लांबच लांब आडवी पसरलेली डोंगररांग. बेत होता उंच शिखराच्या पोटातलं लेण्यामधलं देवीचं राऊळ शोधायचा आणि रेडीओवर सुद्धा काय समर्पक गाणं गाणं लागलेलं... 
...नदीच्या पल्याड, आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर...
घालु जागर जागर, डोंगर माथ्याला...
घे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार....

आम्हांला कल्पनाच नव्हती, की त्या सकाळी हे सारं सारं आम्ही अग्गदी अस्संच प्रत्यक्ष अनुभवणार होतो....

--------------------------------------------------------------

"निगडे गावाजवळ लेणी आहेत" इतकीशी माहिती सह्यमित्र अमेय जोशीच्या ऐकिवात आलेली. पुढच्याच पहाटे गाडी घेऊन तळेगावच्या दिशेने सुसाटलो होतो. तळेगाव MIDCमधून आंबी-निगडे रस्ता पकडून पश्चिमेला वळलो. डंपरनी उखडून टाकलेल्या रस्त्यावरून आणि चिखलाळलेल्या डबक्यांमधून गाडी चालवायची कसरत करून साकेत त्रासून गेलेला. मंगरूळपाशी पीराच्या/नाथांच्या डोंगराने खुणावले. (या डोंगरावरदेखील पाण्याची कोरलेली टाकी, तुरळक पायऱ्या आणि अर्धवट खोदलेला लेणीविहार आहे. वाचा लिंक). अखेरीस निगडे गावात पोहोचलो. गावामागच्या तासूबाई डोंगररांगेची सणसणीत कातळभिंत बघून शीण कुठल्याकुठे पळून गेला.
                 
          
गावाबाहेर गवताळ माळांवर 'उडिचिरायत' नावाची स्वर्गीय फूलं बहरली होती. 


कड्याच्या पायथ्याशी पदरात सुरेख देवराई लागली. आडव्या वाटेने जाताना झाडीतून कातळकडा डोकावत होता आणि वाट कशी असेल याचा थांगपत्ता लागू देत नव्हता. 


पदरातल्या  झाडीनंतरचा घसरडा उभा चढ केवळ कारवीच्या काटक्यांच्या आधारे चढला. कारवी-क्लायम्बिंगच म्हणायचं!!!


डावीकडे वळणावरच्या कातळावर डुगडुगणारी लोखंडी शिडी होती. शिडी संपल्यानंतर मध्ये ४-५ फूट उंचीच्या खडकावर वजनाचा भार देत (फ्रिक्शनवर) चढलो आणि पटकन खोदीव पावठ्या गाठल्या.
(फोटू उतरतानाचा आहे)


खोदीव पावठ्यांची शृंखला डावीकडून भरभर कातळकड्याच्या पोटात घेऊन गेली.


उजवीकडे दिसणाऱ्या कातळकड्याला चिपकून सूर्यकिरणे घरंगळत पदरातल्या देवराईपाशी स्थिरावत होती.




उजवीकडच्या कड्याच्या पोटातून जाणारी निसटत्या बुळबुळीत कातळपट्टीवरची आडवी वाट (traverse) होती.  

               

             
माथ्यावर काहीतरी चौकोनी खोदाई दिसली, म्हणून झपझप पुढे गेलो. चढाईसाठी पायऱ्या नव्हत्या, त्यामुळे तिथे पोहोचणे शक्य नव्हते. पण तो होता नक्कीच एक विहार! वाह, म्हणजे आम्ही 'निगडे लेणी' गाठली होती तर!!!
(आसपास परिसरातील कांब्रे आणि फिरंगाई लेण्यातदेखील असेच एखाददोन पोहोचता येणार नाही असे विहार आहेत. एकांत ध्यानधारणेसाठी असे विहार खोदले असावेत.)

               
किरकोळ खोदाई करून सोडून दिलेले विहार, पाण्याच्या पन्हळी बघत पुढे कातळात खोल खोदत नेलेल्या चौकोनी मुख असलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांपाशी आलो. पाणी होतं, पण पिवळसर थर असलेलं. 


आता आम्ही आलो पद्मावती लेण्याच्या मुख्य दालनापाशी! साधी खोदाई करून बनवलेली १५' X १२' X ८' ची सपाटी आणि कडेला ओटा खोदलेला. आतल्या बाजूस एक खोली, पण दगड-धूळ माखलेली. शिलालेख किंवा विशिष्ट धार्मिक चिन्हे नाहीत.


पाण्याच्या कोरड्या हौदापासून माथ्यावर झुकलेल्या अजस्त्र कातळकड्याच्या पोटातून चालत पुढे निघालो.


काळ्या कुळकुळीत बेसाल्ट खडक न निवडता गंधकयुक्त खडकाचा टप्पा लेणी खोदाईसाठी कसा निवडलाय ते कवतीकाने न्याहाळालं.


               
आता आम्ही पोहोचलो पद्मावती ऊर्फ पदूबाईच्या घुमटीपाशी. तिथे होता शेंदूरचर्चित तांदळा, वाघोबा शिल्प, लाकडावर कोरलेली मूर्ती (ओळखता आली नाही) आणि पल्याड पाण्याचं टाकं. 
वाटलं, कोणी आणि कधी स्थापिलं असेल हे.. कोणाच्या या पाऊलखुणा…

… आल्या वाटेने कातळ-घसाऱ्यावरून कसरत लेण्याच्या पायथ्याशी पोहोचलो. रानात-शेतात राबणारं एक जोडपं भेटले.
म्हणाले, "काय पोरहो, कुठून आलास्नी?".
आम्ही म्हणलं, "हे काय आलो पद्मावती देवीचं दर्शन घेऊन".
त्यानंतर एक अनपेक्षित झालं.….
त्या दोघांनी साकेत आणि माझ्या पायावर सपशेल लोटांगण घातलं. म्हणले,
"पुण्यवंत तुम्ही. पदुबाईचं दर्शन घेऊन आलास्नी. आम्हास्नीबी लाभू दे पुण्य थोडं…"
आम्ही फक्त अ-वा-क!!!

             
परतीचा प्रवास सुरू झाला. आणि, डोळ्यासमोर सारी-सारी निसर्गचित्रे तरंगत होती.…

कधी थक्क झालो खणखणीत कातळभिंतींच्या दर्शनाने;
तर कधी तृप्त झालो स्वर्गीय रानफुलाच्या सौंदर्याने...
कधी केली निसटत्या उतारावर कारवी-क्यायम्बिंगची कसरत;
तर कधी धपापलो कातळावरच्या डगमगती शिडी चढताना...
कधी थबकलो गर्द गहिऱ्या देवराईत;
अन विसावलो देवीच्या अनगड ठाण्यापाशी...
कधी थरारलो अनवट लेणी सामोऱ्या आल्या तेंव्हा;;
अन अचंबित झालो पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणांनी...
आंदर मावळातल्या 'निगडे'गावच्या अनवट अश्या पद्मावती लेणीच्या भटकंतीत असा निखळ आनंद अनुभवला होता... 
                     
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

महत्त्वाच्या नोंदी:
१. छायाचित्रे: साकेत गुडी
२. भौगोलिक स्थान: लिंक 
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१५. सर्व हक्क सुरक्षित.

14 comments:

  1. Replies
    1. राहुल, ब्लॉग वर स्वागत!!!
      धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल... ☺

      Delete
  2. वाह… ह्यावेळेस सुटसुटीत झालीय ब्लॉगपोस्ट…
    तुमच्या लेणी शोधमोहीमेची आवड आम्हालाही लावून दिल्यामुळे तुमचे भयंकर आभार…
    नेहमीप्रमाणे ब्लॉगपोस्ट अतिशय अभ्यासपूर्ण लिहिली आहेस आणि फोटोज अगदी जबरदस्त…
    मला नाही वाटत गड-किल्ल्यांसोबत अनवट आणि दुर्लक्षित लेण्यांचा शोध, तुमच्याव्यतिरिक्त अजून कोणी घेत असेल…
    पुढच्या लेणी शोधमोहिमेला शुभेच्छा…

    ReplyDelete
    Replies
    1. धनुर्वाद दत्तू!!!
      फोटो क्रेडिट साकेत गुड़ी सरांना!
      ट्रेक्समध्ये आडवाटा आणि जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधणे, हा आपला खरा छंद! त्यामुळे लेणी शोधमोहिमांची गोडी लागली तुलाही...
      आपल्याला माहिती नाही, पण काही इंडोलॉजिस्ट करतही असतील रे या लेण्यांवर काम.त्यांच्याकडून शास्त्रीय आकलन समजून घ्यायला आवडेल..
      चला, पुढच्या काही लेणी बघून येवू लवकर...

      Delete
  3. मस्त रे साईबाबा...🙏🏼
    आम्हाला असं वेड लागायला वेळ आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजी, धन्यवाद!!!
      कार्ले-अजंठा लेणी बघण्याचा अभ्यास वेगळा ताकदीचा, पण मावळातल्या अनवट लेणी फ़क्त ट्रेकर्सनाच जमतील अश्या आणि दुर्लक्षित आहेत. त्याचं काहीच डॉक्युमेंटेशन नाही, म्हणून ब्लॉगप्रपंच.. कधी येताय मावळातली लेणी बघायला?

      Delete
  4. नेहमीप्रमाणेच भन्नाट ब्लॉग!!!

    ReplyDelete
    Replies
    1. सागर, धन्यवाद दोस्ता... :)
      छान वाटलं प्रतिक्रिया वाचून..

      Delete
  5. खुपच छान वाटले,माहीती मस्तच लिहीलीये... आपण या डोंगराळ आणि अवघड वाटणार्या कड्याला भेट दिल्याबद्दल धन्यवाद परत या ।😊

    ReplyDelete
  6. साई फारच छान... सुंदर लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  7. धन्यवाद आपण सर्वांचे.
    आमच्या निगडे गावातील पद्मावती देवस्थान ला भेट देण्यासाठी नक्की या

    ReplyDelete