Pages

Monday, 28 March 2016

बिकट वहिवाट

"सावळ घाट": पूर्वीची वहिवाट; का झालीये आज बिकटवाट?
                   
सह्याद्रीच्या ओढीने केलेला भर उन्हाळ्यातला ट्रेक, बिकट घाटवाटेची तंगड़तोड़, त्या जुन्या वहिवाटेवर हरवलेल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा, कुंडलिका दरीचं अद्भूत दर्शन आणि सह्याद्रीचं विराट पॅनोरमा दृश्य - अश्या आनंदयात्रेचा हा वृतांत!!!

                
….अंग भाजून काढणारा उन्हाळा तापला होता. वीकेंडला घरी मस्त पंख्याचं वारं खायचं, आमरस चोपायचा आणि आळसावून लोळायचं, हे काही मानवेना. अन, भल्या पहाटे पुण्याच्या पश्चिमेला मुळशी खोऱ्याकडे कूच केलं. मुळशी जलाशयाच्या काठाने वळणं घेत जाणाऱ्या रस्त्यावर गाडीबाहेर हात काढल्यावर हलका गारवा सुखावत होता. मोहीम होती ताम्हिणीघाटाच्या गाडीरस्त्याच्या किंचित उत्तरेला असलेल्या 'सावळ' नावाच्या घाटवाटेच्या पदभ्रमंतीची!
       
.... ताम्हिणीघाट जिथून कोकणात उतरू लागतो, त्या ‘निवे’ गावापाशी हायवे सोडून, उजवीकडे लोणावळ्याच्या गाडीरस्त्याने निघालो. या रस्त्यावरच्या गिरीस्थळांच्या (कुंडलिका दरीदर्शन, अंधारबन घाट, कैलासगड, घनगड, तेलबैला, अनवट कातळलेणी) ध्यासाने पूर्वी कित्येकदा गाडी वळवली होती. यावेळी मात्र 'निवे' फाट्यावरून वळल्यानंतर जेमतेम एखाद-दोन किमी अंतरावर डावीकडे 'परातेवाडी'ला गाडी पार्क केली. ऊन्हं चढायच्या आत ट्रेक करायचा होता. घड्याळ वेळ दाखवत होतं सकाळचे ७:३०!

… गावात ज्या घरी वाटेची विचारपूस केली, ते होतं एक लग्नघर. 'आला आहात, तर लग्नासाठी थांबाच' असा गोड आग्रह झाला आणि हातात पडली लग्नपत्रिका - पंचक्रोशीतल्या अंदाजे ६०० 'मान्यवरां'ची नावं असलेली. अर्थात, सह्याद्रीचं आवताण आधी घेतल्याने लग्नाचं आवताण कसंबसं टाळलं आणि सावळघाटाची माहिती काढली. कोकणात उतरण्यासाठी गावकऱ्यांना ताम्हिणीघाटाच्या गाडीरस्त्याची सोय असल्याने, सावळघाटाची पाऊलवाट अजिब्बात वापरात नाही आणि वाट शोधावीच लागेल, अशी माहिती मिळाली. घाटवाट शोधून उतरण्यासाठी आख्खा दिवस हाती असल्याने आम्ही गाईड न घेता परातेवाडीतून बाहेर पडलो.
             
....पावसाळ्याच्या आत शेत नांगरून ठेवायच्या धांदलीत असलेल्या शेतकरीदादाला रामराम केला. पठारावरून पश्चिमेला सह्यधारेकडे उतरत निघालो. कोवळ्या उन्हांत गळ्यातल्या घंटा किणकिण वाजवत गायी-वासरं चाऱ्याच्या शोधात निवांत हुंदडत निघालेल्या. माळावरच्या करवंदीच्या जाळीवर मधमाश्या अन फुलपाखरांची लगबग सुरू झालेली. सह्यधारेपाशी आलो आणि आम्ही नक्की कुठे आलेलो याचं दृश्य उलगडू लागलं.
              

                  
सह्याद्रीची उंची होती मध्यमच, म्हणजे सहा-सातशे मीटरची. सह्याद्रीची एकसलग भिंत नव्हती, तर सह्यधारेने वळणवेड्या देखण्या दऱ्यांची नक्षी मांडली होती. सह्याद्रीवर धडकणारं मॉन्सूनचं पाणी कोकणाकडे वाहून नेणाऱ्या 'कुंडलिका' नदीच्या दोन विलक्षण देखण्या दऱ्यांच्या मध्ये डोंगरसोंडेच्या माथ्यावर आम्ही होतो. 
           


आमच्या डावीकडची (दक्षिण) कुंडलिकेची दरी होती ताम्हिणी घाटालगतची 'प्लस व्हॅली' नावाची. 


समोर कोकणात भिरा धरणाचं पाणी चमकत होतं.

आणि, आमच्या उजवीकडच्या (उत्तर) कुंडलिकेच्या दरीत डोकावलो, तर खुणावत होती उगवतीच्या सिनेर खिंडीतल्या विजेच्या खांबांपासून धावणारी डोंगररांग, त्याच्या पदरातून जाणारी अंधारबन घाटाची रम्य रानवाट, पश्चिमटोकावरचा जांभळ्या डोंगर आणि हिर्डीचं पठार.              

       
कुंडलिकेच्या या दोन ऱ्यांतून आणि मुळशीच्या तलावातून पाईपने उतरवलेले पाणी भिरा धरणात जमा होतं, विद्युतनिर्मितीसाठी वापरलं जातं आणि याच पाण्याच्या विसर्गामुळे उचंबळणाऱ्या कुंडलिकेच्या पात्रात साहसी वॉटरराफ्टींग करता येतं.


घाटाची सुरुवात नक्की कुठून?
सह्यधारेवरून बघताना घाटाची वाट नक्की कुठून आणि कशी उतरणार, याचा काहीच अंदाज येईना. दक्षिणेच्या प्लस दरीच्या तीव्र कातळ उतारांवरून नजर भिरभिरून झाली. पण तिथून वाट उतरण्याची शक्यता दिसेना.


दुसरी शक्यता म्हणजे, पश्चिमेला समोर कोकणात उतरणाऱ्या सोंडेवर जो सुटावलेला ढलप्या डोंगर होता, त्याच्यावर चढून मग पलिकडे एखादी दांडावरून उतरणारी वाट असेल का?


किंवा तिसरी शक्यता म्हणजे, सह्यधार आणि ढलप्या डोंगर यांच्यामधल्या खिंडीतून उजवीकडे उभ्या घळीतून निसटणारी वाट असेल?


परातेवाडीपासून निघून/ शोधाशोध करण्यात पाऊण तास उलटलेला. आता समोर कातळाच्या घसरंडीवर वाळलेल्या भुऱ्या गवतावरुन उतरत ढलप्या डोंगराच्या दिशेने उतरत गेलो. खिंडीत उतरण्यापूर्वी खूप उभा उतार असणार आणि तो उतरताना कसरत असणार, असं वाटून गेलं. पण प्रत्यक्षात आम्हांला एक आश्चर्य भेटणार होतं....

सावळ घाटातल्या वहिवाटेच्या खुणा

किंचित उजवीकडे तिरकं उतरत गेल्यावर समोर आलं आश्चर्य - जुन्या घाटाच्या, वाहिवाटेच्या पाऊलखुणा. 
उभ्या कातळ तासून खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्यांची माळ पाहून थरारून गेलो.

पल्याड अजून एक कवतिक. उथळ खोदाईचं आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेलं टाकं. १२' लांबी, ३' रुंदी, ३' कातळाच्या आत खोदाई आणि ५' खोल. जवळ शिलालेख किंवा देवता नाही. टाकं उघडं असल्याने पाणी गढूळ, पिण्यास योग्य राहिलं नाहीये.


निवांत वारं खात बसलो. ऊन तापायची वेळ झाली, तरी पल्याडची दरी अजूनही आळसावली होती. त्यातंच निमित्त झालं पूर्वमॉन्सूनच्या चुकार ढगाचं. ढगांची तलम दुलई पांघरून प्लसदरी आपुल्याच नादात हरवलेली...

टाक्याच्या पलिकडे कातळातून उतरण्यासाठी उभ्या पायऱ्या खोदलेल्या.


सावळघाटातल्या जुन्या पाऊलखुणा पाहून आम्ही खूष झालेलो. 
खरंच, आमच्या सहयाद्रीत भटकणं म्हणजे फ़क्त डोंगर दऱ्यांमधून तंगड़तोड़ नसून, सोबतीला असतात इथल्या मातीत फुललेल्या वसलेल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा... आम्ही निश्चितच होतो पूर्वीच्या वहिवाटेवर!

घाटाची उतराई आहे तरी कुठून?
पायऱ्या आणि टाकं सापडलं, म्हणजे आत्तापर्यंत योग्य वाट मिळाली होती. झाडीभरल्या खिंडीत आलो. समोर ढलप्या डोंगरावर चढणारी वाट पुसट मळलेली. ५० मी चढून डोंगरमाथ्यावर गेलो. आम्हांला पाहून एका रानसश्याने दचकून धूम ठोकली. थोडकं शोधलं, पण थेट उतरणारी अशी वाट नव्हती. म्हणजे आता एकंच पर्याय उरलेला - मागे खिंडीकडे उतरून वाट शोधणं. 

अर्थात, वाट शोधाव्या लागल्याशिवाय ट्रेकची मज्जा ती काय! आणि, अश्या चुकल्या वाटांवरच एखादं कवतिक गवसतं. असंच काही झालं, आणि आमच्यासमोर आलं कुंडलिकेच्या दरीचं सुरेख खोलवर दृश्य! 
वाह, मजा आ गया!


घाटाची वाट कुठे असेल, याची आता शक्यता एकंच उरलेली. खिंडीतून उत्तरेला कुंडलिका दरीकडे उतरणारी वाट असू शकणार होती. खिंडीतल्या गच्च झाडी-गचपणातून निरखून पाहिलं, तर खरंच एक पुसट पावठी घळीत उतरू लागलेली. 

वाटलं, मगाशी ही वाट कशी बरं दिसली नव्हती... असो, सावळघाटाची वाट अखेरीस सापडलेली!


सुरुवातीला अरुंद बेचक्यातून दगड धोंडयामधून उभी उतरंड उतरणारी पुसट वाट होती. पिवळ्या ऑईलपेंटने रंगवलेले दिशादर्शक बाण अधून-मधून सोबतीला होते. माथ्यावरची दाट झाडी झपाट्याने उंचावत गेली. आसपास अंग ओरबाडणाऱ्या झुडपांमधून रेताड़ घसरंड उतरत गेलो.


कुंडलिका दरीचं आणि कातळटप्प्यांचं भन्नाट खोलवर दर्शन घडत होतं. 

           


वाट मळलेली अजिब्बात नव्हती. गच्च झाडोऱ्यातून, दगड-धोंड्यातून, बोचऱ्या काट्या-कुट्यातून कसंबसं उतरत जात होतो. घसाऱ्याने आणि उभ्या उताराने पाय शिणून गेले. उष्मा-आर्द्रतेने जीव त्रासून गेला. अधून-मधून दिशादर्शक बाण दिसले, की दिलासा मिळत होता.

खिंडीतून उतरायला लागल्यापासून तासाभराने सावळ घाटाची घळ थोडी रुंद झाली. आणि, समोर आलं अजून एक आश्चर्य - पाण्याचं दुतोंडी टाकं. काठोकाठ गच्च भरलेलं. नितळ. गारेगार पाण्याचं. 


या वाटेवर पाण्याची टाकी-पायऱ्या खोदण्याचे कष्ट घेतले गेलेत, म्हणजे ही कोणे एके काळची 'वहिवाट'. आज मात्र का झालीये बिकट आडवाट! कदाचित, गाडीरस्ते आले आणि जुन्या वाटा निकामी होत चालल्या.

टाक्याच्या पल्याड कुंडलिका दरी आणि अंधारबन घाटाच्या कड्यांचं विलक्षण सुरेख दर्शन होत होतं. माथ्यावरच्या जांभळ्या डोंगराला हलकेच ढुशा देऊन विखुरणाऱ्या ढगांची लगबग बघत निवांत विसावलो. 

   
उभ्या उतारावरून उतरून उतरून पाय हुळहुळू लागले होते. पण, घनदाट झाडोरा आणि त्यातून डोकावणाऱ्या कड्याचं वैभव यामुळे थकवा जाणवत नव्हता.

संपूर्ण सावळघाटाच्या भटकंतीत वाट शोधावीच लागते. मध्येच हरवते. (म्हणजे, आपण हरवतो) फार डावी-उजवीकडे न जाता गचपणातून (ट्रेकर्सच्या भाषेत वस्पटी) उतराई करत जात राहायचं. दिशादर्शक बाण, रचलेले दगड मदतीस असतात, पण तेसुद्धा शोधावेच लागतात.


घळीतल्या (दुसऱ्या) पाण्याच्या टाक्यापासून निघाल्यावर अजून एक तास उतराई झाली आणि समोरचे कातळकडे अग्गदी जवळ आले. पार आभाळाला भिडले. जाणवू लागलं, की आता लवकरच आपण कुंडलिकेच्या दरीच्या तळाशी पोहोचणार आहोत.


दूरवर झाडीभरल्या कुंडलिका दरीतल्या नावजी आणि अंधारबन सुळक्यांचं दर्शन झालं.


मागे वळून सावळघाटाची उतराई कुठून केली याचा अंदाज घेतला. सह्यधारेपासून निघाल्यापासून त्या डावीकडच्या झाडीत दडलेल्या घळीतून उतरत कुंडलिकेचं पात्र गाठण्यासाठी आम्ही अडीच तास उतराई केली होती.
(सावळघाट जर कोणाला उलट दिशेने - म्हणजे चढून जायचा असेल, तर कुंडलिका नदीच्या पात्रातून घाटाच्या घळीकडे कधी आणि कुठे वळायचं हे अचूक सांगणं थोडं अवघड आहे.)



गच्च झाडीतून वळणं घेत अचानक समोर आलं कुंडलिका नदीचं पात्र. उगवतीला कुंडलिका दरीचं पिंप्री गावाजवळच्या सिनेर खिंडीपर्यंत दर्शन झालं. (इथूनच अंधारबन घाटट्रेक सुरू होतो)  


पश्चिमेला नदीच्या पात्रातूनच आता वाटचाल करायची होती.


भर उन्हाळ्यातही ठिकठिकाणी रांजणखळग्यात नितळ पाणी टिकून होतं.


दरीतली समृद्ध परिसंस्था (ecosystem) प्रसन्न करून गेली.


दाट झाडीच्या सावलीतून पात्रातल्या धोंड्यांवरून उड्या मारत मस्त मस्त वाटचाल होती.


मोकळवनातून बाहेर पडलो आणि अनुभवला ट्रेकमधला एक उत्युच्च क्षण! 
सह्याद्रीच्या अद्भूत वळणवेड्या दऱ्या-डोंगरांच्या दृश्याने खुळावलोच...सावळ घाटाशेजारी देवडोह-प्लसदरी अत्यंत लोभस दिसत होती, खुणावत होती. 


एव्हाना, ऊन बख्खळ तापलेलं, धुमसत होतं, रटरटत होतं. तासभर प्रयत्न केल्यावर असह्य आर्द्रतेमुळे 'दुरून डोंगर साजिरा' मानून, देवडोहाला 'फिर मिलेंगे चलते चलते' म्हटलं आणि भिरा गावाकडे निघालो.
   
भिरा तलावापासून कुंडलिका दरीचे दर्शन
आम्हांला पश्चिमेकडे जात प्रथम भिरा धरण आणि मग भिरा गावापाशी ट्रेकची सांगता करायची होती. 

भिरा धरणाच्या उगमापाशी मागे वळून पाहिल्यावर कुंडलिका दरीचं खोलवर भन्नाट दृश्य मिळालं. भान हरपून बघतच राहिलो. समोर सिनेर खिंडीपर्यंत झाडीभरली दरी...

त्याच्या थोडं उजवीकडे दक्षिणेला समोर होता सावळ घाटाचा ढलप्या डोंगर. त्याची पश्चिम धार एखाद्या सुळक्यासारखी दिसत होती.
(या बाजूने चढाई करून आडवं जात सावळ घाटाच्या घळीकडे चढता येणार नाही. प्रयत्न करून बघितलाय.)


थोडं लांबून काढलेला फोटू


अजून थोडं उजवीकडे देवडोहाचा देखणा परिसर...


आणि पल्याड सह्यधार, पायथ्याचा लेंड नावाचा सुळका...

ऊन तापलेलं. भिरा धरणाच्या डाव्या काठाने चालत चालत अशक्य लांब चाल होती. पाण्यावरून तापलेल्या वाफा उधळलेल्या. फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर भिरा गाव गाठलं.

भिरा गावाच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पायथ्याला 'लेंड' सुळका लक्षवेधक होता. सुळक्याच्या बाजूने घाटमाथ्याकडे चढणाऱ्या पूर्वीच्या लेंड घाटाच्या पाऊलवाटेवर टाटा पॉवरने सिमेंट पायऱ्या बांधून काढल्याने आता चढाई करण्यात फार रस नव्हता. १५-२० वर्षांपूर्वी गावकऱ्यांना घाटमाथ्यावर घेऊन जाणारी हॉईस्ट प्रकारची लिफ्ट आता बंद पडलेली. त्यामुळे, भिरा - विळे - निवे - पुणे अश्या प्रवासाला निघालो.



परतीच्या वाटेवरती...
ताम्हिणी घाटातून लपेटदार वळणे घेत एस.टी. बस निघाली, तरीही ट्रेकर्सच्या नजरा भिरभिरत होत्या कुंडलिकेच्या वळणवेड्या दऱ्या-डोंगरांमधून...
अन, डोळ्यासमोर तरळत होते ट्रेकचे एकसे बढकर एक भन्नाट क्षण...

कधी थरारलो दर्शनाने विराट सह्याद्रीच्या,
कधी गुरफटलो तलम दुलईत ढगांच्या...

कधी थबकलो अगणित फुलपाखरांच्या थव्यापाशी,
कधी सुखावलो रांजणकुंडातल्या नितळ पाण्यापाशी...

कधी भुलवत होती कातळात कोरलेल्या पायऱ्यांची माळ,
तर कधी हरवून जायचं निमित्त होतं अथांग सोनेरी गवताळ माळ...

कधी फसलो अशक्य गच्च गचपणात,
कधी धपापलो वळणवेड्या डोंगरउतारांत,
कधी त्रासलो तडाखा देणाऱ्या उन्हात...

कधी थक्क झालो पाहून घाटातल्या जुन्या पाऊलखुणा,
वाटले रुंजी घालतात आसमंतात इथे आठवणी कुठल्या, कोणाच्या..

कवी अनंतफंदी सांगून गेलेत, “बिकट वाट वहिवाट नसावीधोपट मार्गा सोडू नको...” 
पण तरीही, धोपटमार्ग सोडून कसला आनंद शोधात होतो या बिकटवाटेवर?
ध्यास सह्याद्रीचा, अन ध्यास हरवलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा धुंडाळण्याचा, अजून काय!
                   


महत्त्वाच्या नोंदी:
१. छायाचित्रे: मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे
२. वाट खूप गचपणीची आणि बेचक्यातली असल्याने आर्द्रतेचा त्रास होतो. पावसाळा आणि हिवाळ्यात वाट झुडुपांमध्ये हरवते.
३. कृतज्ञता: गुरुवर्य आनंद पाळंदे यांचे पुस्तक 'चढाई उतराई', यतिन नामजोशी यांचे अनुभव, विक्रम मराठे (Indologist) यांच्या संशोधन नोंदी
४. भौगोलिक स्थान: लिंक
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

13 comments:

  1. हा ट्रेक आम्ही 2015 च्या ऑक्टोबर हिट मध्ये केला होता, प्रचंड आद्रता होती... कोरीव पायऱ्या आणि खोदीव पाण्याची टाक्या बघून दिलखुश झालो होतो...
    ताम्हिणी घाट गाडीरस्ता झाल्यापासून इथल्या बऱ्याचश्या घाटवाटा हळू हळू लोप पावत आहेत...
    नेहमीप्रमाणेचं जबरी वर्णन...
    बढिया...

    ReplyDelete
    Replies
    1. धनुर्वाद दत्तू!
      आर्द्रता भयंकर ड्रेन करते या घाटाला.. त्यात ऑक्टोबरमध्ये तुम्हाला प्रचंड वस्पटी लागली असेल..
      पण तरीही सुरेख अनुभव देणारा घाट!

      Delete
  2. भर उन्हात सह्याद्रीच्या ओढीने झालेली दमदार सह्ययात्रा. फोटू आणि वर्णन खासच.

    कधी थरारलो दर्शनाने विराट सह्याद्रीच्या,
    कधी गुरफटलो तलम दुलईत ढगांच्या.....

    एक नंबर.

    ReplyDelete
    Replies
    1. योगेशभाऊ,
      तुम्हाला सहयाद्रीचं वेड, त्यामुळे ब्लॉगमधला अनुभव जवळचा वाटला असणार..
      धन्यवाद!☺👍

      Delete
  3. नमस्कार साईप्रकाश, आमच्या आवडत्या ठिकाणी आपण जाऊन आलात याचा आनंद झाला. श्री.आनंद पाळंदे यांच्या १९९३-९५ सालातील'कैलासगड/रत्नगिरी"(वडूस्ते)शोध मोहिमेत मी सहभागी होतो,तेंव्हा प्रथमच आम्ही या दरीत डोकावलो.आणि मग येथील अजिंक्य कातळ भिंती आणि सुळके चाचपणी साठी दोनदा उतराई झाली. नोव्हेंबर १९९८ मध्ये "कुंडलिका"(५५०') सुळका चढाई यशस्वी केली,२००० साली "नावजी"(८०')ची प्रथम चढाई केली.
    ब्लॉग आवडला... आता एकदा हिरडीतून "जांभळ्या" चढून या.

    ReplyDelete
    Replies
    1. विवेकजी, जबरीच! _/\_
      शहरांचा स्पर्श या खोऱ्यांना व्हायच्या आधीच्या काळातला सह्याद्री तुम्ही अनुभवलाय, जिथे आज आम्ही २०-२५ वर्षांनी पोहोचतोय...
      प्रतिक्रिया वाचून मस्त वाटलं. धन्यवाद!

      Delete
  4. वा! साई आता महिनो न महिने लटकलेले ब्लॉग पण पोतडीतून बाहेर काढा लवकर! अप्रतिम!

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा.. तुम्हांला माहिती आहेच, ट्रेकिंगपेक्षा लिखाण जास्त दमवतं.
      भटकंती भूगोल + अनुभव असं लिखाण करायला थोडा जास्त वेळ लागतोय.
      धन्यवाद तुषार!

      Delete
  5. व्वा साईप्रकाश अप्रतिम व भन्नाट लिखाण ट्रेक चे अप्रतिम वर्णन व फोटोग्राफी तर उत्तमच
    अनपेक्षितपणे पाहायला मिळालेले अवशेष व वहिवाटा ( पाण्याच्या टाक्या व कातळातील पायऱ्या ) दिसल्यानंतर काय आनंद मिळतो ते फक्त सह्याद्रीमध्ये फिरणाऱ्या सह्याद्री वेड्यानाच समजणार व अनुभवत येणार
    बाकी तुम्ही शेवटी केलेल काव्य वर्णन अप्रतिम
    कधी थरारलो दर्शनाने विराट सह्याद्रीच्या,
    कधी गुरफटलो तलम दुलईत ढगांच्या.........
    कधी मला एखाद्या माझ्या भटकंतीच्या लिखाणात लिहावंस वाटल तर लिहायची परवानगी द्यावी हीच विनंती _/\_

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रिया वाचून आनंद झाला..
      सह्याद्रीच्या आडवाटा शोधण्याचा आनंद दोस्तांसोबत शेअर करण्यासाठीच हा ब्लॉगचा खटाटोप आहे..
      मन:पूर्वक धन्यवाद!!!

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. मस्तच उतराई सावळघाटाची !!

    ReplyDelete