Pages

Sunday, 17 April 2016

समृद्ध करणारी हरिश्चंद्राची परिक्रमा

हरिश्चंद्रगड परिक्रमा - जुना माळशेज घाट, काळूचा वोघ, सादडे घाट, कोकणकडा, जुन्नर दरवाजा (राजनाळ)

लाभले आम्हांस भाग्य, की जन्म झाला सह्याद्रीच्या कुशीत...

लाभले आम्हांस भाग्य, की शिव-सह्याद्री आराध्य दैवत म्हणून लाभले...
लाभले आम्हांस भाग्य, की सह्याद्रीच्या आडवाटांच्या भटकंतीचं ‘वेड’ मनी रुजलं, अंगी भिनलं...
लाभले आम्हांस भाग्य, की सह्याद्रीच्या भूगोलासोबतच इथल्या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणजेच दुर्ग-लेणी-मंदिरे-घाटवाटा धुंडाळण्यात निखळ आनंद मिळू लागला... 
     
... आणि, याच आनंदाच्या ध्यासापायी गेले कित्येक दिवस एका भन्नाट ट्रेकचा बेत शिजत होता. ज्याप्रमाणे भाविक लोक एखाद्या पवित्र नदी-मंदिर-पर्वताची श्रद्धायुक्त अंत:करणाने परिक्रमा करतात, त्याचप्रमाणे आम्ही ट्रेक-परिक्रमा करणार होतो शिव-सह्याद्रीचं मनस्वी दर्शन घडवणाऱ्या ‘हरिश्चंद्रगडा’ची. अर्थातच, नेहेमीच्या रुळलेल्या वाटांवरून खिरेश्वर किंवा पाचनई गावातून करायचा हा ट्रेक नव्हता. तर 'प्रगतं दक्षिणमिति प्रदक्षिणं’ या वचनानुसार आम्ही दक्षिणेकडून (डावीकडून) गडाला सुरुवात करून प्रदक्षिणा घालणार होतो. हरिश्चंद्रगडाची अनुभूती घेणार होतो - ‘जुन्या माळशेज’ घाटवाटेतून, ‘काळूच्या वोघा’जवळून, पश्चिमेच्या बेलपाडा गावातून, उत्तरेच्या ‘सादडे घाटा’तून, गडाच्या कोकणकड्यावरून आणि आग्नेयेच्या ‘जुन्नर द्वारातून राजनाळे’तून. बेत होता तीन दिवसांच्या खडतर परिक्रमेचा, पण साकेत आणि मिलिंद हे कसलेले ट्रेकरदोस्त सोबत असल्यामुळे ही परिक्रमा आनंददायी होणार याची खात्री होती.
         


(छायाचित्र: दौन्ड्या डोंगरावरून हरिश्चंद्रगड. साभार: श्री. अनुप अचलेरे)

माळशेज पठारावरून हरिश्चंद्रचं मनोहारी दर्शन

.... अवसरी घाटात ढाब्यातलं जेवण, नारायणगावचं ‘एक्स्ट्रा-मलई-मारके’ मसाला दूध आणि खुबी फाट्यावर कडक चहामुळे ट्रेकच्या आदल्या रात्रीचा गाडीप्रवास सुसह्य झाला. मुक्कामाला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर गावी पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. चिंतामण कवटे यांच्या ‘ऐश्वर्या’ नामक घरगुती हॉटेलपाशी मुक्काम आणि गाडीपार्किंगची सोय झाली. गावात मुक्कामाला असलेल्या बेशिस्त टूरीस्टांचा कोलाहल आणि दणदणीत थंडी यांच्याकडे दुर्लक्ष करत स्लीपिंगबॅगमध्ये गुरफटलो.

उजाडला परिक्रमेचा पहिला दिवस! आजचा पल्ला दमदार होता. दक्षिणेकडील ‘जुन्या माळशेज’ घाटाच्या पाऊलवाटेवरून, गडाच्या पोटातल्या ‘काळूचा वोघ’ धबधब्याजवळून आणि खोरं ओलांडून पश्चिमेकडून बेलपाडा गावातून गडाचं दर्शन घ्यायचं होतं. सकाळी साडेसहा वाजता पाठीवरच्या भल्याथोरल्या सॅक्स चढवल्या आणि खिरेश्वरच्या प्राचीन राऊळातल्या नागेश्वर महादेवाला वंदन करून हरिश्चंद्राच्या परिक्रमेचा शुभारंभ केला. उभ्या-आडव्या पसरलेल्या डोंगरवाटांनी भटकून, आता थेट तीन दिवसांनंतर आम्ही खिरेश्वरला परतणार होतो.

             

गडाच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या पठारावरून प्रदक्षिणा घालत निघालो. दमदार ब्रेकफास्ट करून निघाल्याने पायगाडी मस्त दौडवली. नागेश्वर राऊळ आणि शेजारच्या कातळकोरीव लेण्यापासून माळशेज घाटाकडे जाणारी पाऊलवाट आम्ही निवडली होती. वाटेतल्या कातळावरचं कोरलेलं शिवलिंग बघता, ही वाट पुरातन काळापासून वापरात असणार असं वाटलं. दीडतासाची पठारावरून चाल, पण किती मनोहारी. पूर्वेला सूर्य अजूनही निरोळी-रांजणाच्या डोंगरांमागे दडलेला. तरीही, हरिश्चंद्रगडाच्या शिखरांचे (हरिश्चंद्र-तारामती-रोहिदास) माथे हलकेच उजळू लागलेले. वाटेवरून कधी दिसलं गडाचं देखणं प्रतिबिंब पुष्पावती नदीतल्या पात्रात, तर कधी गड उठून दिसला वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनसळी गवताळ पठारामागे. कधी खिळवून ठेवलं तळ्याच्या काठी उमललेल्या निळ्या मंजिऱ्या, पोहोणारी बदकं आणि मागे गडाच्या विस्तृत पॅनोरमाने. आमच्या परिक्रमेची सुरुवात अशी प्रसन्न झालेली...

     
माळशेज जुन्या घाटवाटेवरून हरिश्चंद्रचं सर्वांगसुंदर दर्शन
घाटमाथ्यापासून कोकणात उतरणाऱ्या माळशेज घाटाचा ‘गाडीरस्ता’ बनायच्या काहीशे वर्षे आधीपासून वापरात होती ‘जुन्या माळशेज’ घाटाची पाऊलवाट. मराठ्यांच्या वसई मोहिमेत या घाटातून भिवंडीकडे सैन्य गेल्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्यामुळे हरिश्चंद्रच्या परिक्रमेत या पुरातन घाटवाटेने उतरतण्यासाठी आम्ही आतुर झालेलो. घाटापाशी पोहोचण्यासाठी खुबी गावापासून महामार्गावरून कल्याणच्या दिशेने चालत निघालो. उधळ्या, घोण्या, भोजगिरी, दौंड्या-देवदांड्या अश्या सह्यमाथ्याच्या अजस्त्र डोंगरांच्या कुशीतल्या निवांत शांत घळीत दडलेल्या घाटदेवाच्या राऊळापाशी विसावलो, तेंव्हा जुनी घाटवाट सापडणार का असा प्रश्न पडलेला. 


राऊळापासून परत महामार्गावर आलो, तेंव्हा डावीकडे होतं रस्त्याचं लपेटदार वळण, तर उजवीकडे होतं पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहाच्या (MTDC) प्रवेशद्वार. समोर घाटाचा लोखंडी सुरक्षा कठडा (गार्डरेल) किंचित मोकळा ठेवला होता आणि इथूनच होती माळशेजच्या जुन्या घाटवाटेची सुरुवात! 


खडकां-झुडूपांमधून उतार उतरू लागलो आणि लवकरच सुरू झाली दगड घट्ट बसवून बनवलेली फरसबंदीची मोठ्ठी मोकळी-ढाकळी जुनी घाटवाट आणि दिशादर्शक बाण. काही वर्षांपूर्वी गच्च कारवीच्या रानात हरवू पाहणारी ही वाट अलिकडेच वनखात्याने वाट मोकळी केली होती. समोर दिसणारी माळशेजच्या गाडीरस्त्याची वळणे आणि निरीक्षणे-टोके उंचावत गेली. वाट आता झपाट्याने डावीकडे (दक्षिणेला) माळशेज घाटाच्या मुख्य दरीच्या कुशीत शिरू लागली. वायव्येकडे उघडत जाणाऱ्या या दरीमधला ओढा पावसाळ्यात काय सणसणीत वाहत असेल. माथ्यापासून १०० मी उतरल्यावर कातळात कोरलेल्या खोबण्या आणि पायऱ्या लागल्या. 



उजवीकडे ओढ्यापाशी उतरल्यावर खुणावत होतं अजस्त्र खडकांच्या कुशीतलं उंबराचं झाड - डवरलेलं, झुकलेलं. खोबणीत होता निखळ थंड पाण्याचा स्त्रोत. माळशेजच्या उंचचउंच कड्यांच्या पोटातल्या दाट झाडीतली नीरव शांतता अनुभवली.


थोडं पुढे उभ्या खडकाळ उतरंडीवरून उतरताना जुन्या घाटवाटेच्या पाऊलखुणा सामोऱ्या आल्या. खोदीव पायऱ्या उतरत गेल्यावर उजवीकडच्या कातळात होती शेंदूरचर्चित गणेशमूर्ती आणि चंद्र-सूर्याची महिरप असलेली छत्री. 


पल्याड उंचावर कातळात होतं खोलवर खोदत नेलेल्या थंड पाण्याचं टाकं आणि त्याच्याबाजूला आणखी एक अर्धवट खोदाई सोडलेलं टाकं! कित्येकशे वर्षे सैन्य-व्यापार-वाटसरू यांना उपयुक्त असलेली पुरातन वहिवाट आजच्या व्यावहारिक गरजांसाठी निकामी झाली होती. जुन्या वाटेचं कवतिक आता फक्त लाकूडतोडे, गुराखी, शिकारी आणि चुकूनमाकून फिरकणाऱ्या कोण्या ट्रेकर्सना!


सकाळी निघाल्यापासून अडीच तास आणि माथ्यावरून घाट उतरायला सुरुवात केल्यापासून अर्धा तास झालेला. खजूर-चिक्की-फळांचा खुराक घेऊन आणि टाक्यातलं गोड गार पाणी पिऊन टीम तरतरीत झाली. माळशेज घाटरस्त्यालगतच्या मुख्य ओढ्याच्या उजव्या काठावरून दाट झाडीच्या टप्प्यांतून आता वाट झपाट्याने उतरू लागली. माळशेज घाटरस्त्यात बेताल पर्यटकांनी अव्याहत फेकलेला तऱ्हेतऱ्हेचा कचरा याच ओढ्यातून इतक्या लांब वाहत आलेला, साचत राहिलेला, विषण्ण करून गेला! 


फरसबंद मोठ्ठ्या पाऊलवाटेवरून लांबलचक वळणं घेत उतरणाऱ्या वाटेवर झुकलेल्या झाडोऱ्यावर भल्या मोठ्ठ्या कोळ्यांनी जाळं विणलेली. अजूनही काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या होत्या. गच्च जंगलातून निवांत रुंद वाट ओढ्यात रेंगाळलेल्या पाण्यापाशी थबकली. दोन तासात माळशेज घाटाची ६०० मी उतराई केल्यावर पायथ्याशी निसर्ग आणि तथाकथित विकास यातली विसंगती अंगावर आली – एकीकडे सह्याद्रीचं विराट दृश्य, तर दुसरीकडे रान कापून रस्ते-रिसॉर्टचा भस्म्या आणि गुंठामंत्रांच्या स्कोर्पिओ! 


ओढ्यातल्या रांजणकुंडांच्या नक्षीजवळून चालताना हरिश्चंद्राची उंची आणि विस्तार नजरेत मावेना. गडाची कोकणात कोसळलेली कातळभिंत आणि तारामती-रोहिदास शिखरं कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होती. वाघराच्या शेंदूर फासलेल्या शिल्पाच्या बाजूने, मोकळ्या पठारावरून जीपरस्ता अर्ध्या तासात थिटबी गावाकडे घेऊन जाणार होता. डावीकडे झाडोऱ्यात घाटाचं रक्षण करणाऱ्या मारुतीचं ठाणं, त्याच्या पूर्वेला एक कबर. घाटाकडे जाणाऱ्या वाटेवर खडकात व्याघ्र-चंद्र-सूर्य अश्या निसर्गदेवता खोदलेल्या. कोरलेल्या व्याघ्राचे लांब पाय, लपेटदार शेपूट आणि टवकारलेले कान रानच्या राजाचा रुबाब आणि दरारा दाखवणारे. 


माळशेजच्या जुन्या महत्त्वाच्या घाटवाटेवरून उतराई करत आम्ही हरिश्चंद्र-दर्शन घेतलं होतं. असा हा परिक्रमेचा पहिला टप्पा आम्हांला सुखावून गेलेला... 


काळूच्या वोघापासून हरिश्चंद्रचं रौद्रविराट दर्शन

माळशेज घाटाच्या पश्चिम कातळकड्यामध्ये एक निसर्गनवल दडलंय – ‘काळूचा वोघ’ नावाचा अजस्त्र धबधबा. धबाबा तोय आदळून धबधब्याच्या पोटापाशी बनलेला ‘वोघ’ (म्हणजे घळ) आणि रांजणखळगे बघण्याची उत्सुकता होती. थिटबी गावामध्ये सॅक्स ठेवून परत एकदा आल्या वाटेने पूर्वेला सह्याद्रीकडे निघालो. माळशेजघाटाची जी जुनी पाऊलवाट आम्ही उतरलो होतो, त्याच्या उत्तरेला (डावीकडे) ‘काळूचा वोघ’ असणार होता. घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता सोडून डावीकडील रानातल्या वाटेने निघालो. एव्हाना ऊन तापायला लागलेलं आणि वारं पडलेलं. दोन कोरडे ओढे पार केले आणि समोरचं दृश्य बदलू लागलं. सह्याद्रीच्या भिंतीच्या जवळ-जवळ जाणारी वळणां-वळणांची हलक्या चढाईची वाट आता काळूच्या मुख्य मोठ्ठ्या ओढ्याच्या पात्रात उतरली. समोर होता अक्षरश: थ-रा-रू-न टाकणारा पॅनोरमा. हरिश्चंद्रगडाची शिखरे आभाळात घुसलेली. डावीकडे मागे अफाट उंचीची रोहिदास-तारामती शिखरे, रोहिदासजवळचा सुळका ‘काट्याची लिंगी’ आणि समोरचे अजस्त्र धबधबे - डावीकडचा ‘काळूचा वोघ’ आणि उजवीकडचा ‘रेठीचा झुरा’. 

आता आम्ही ओढ्याच्या पात्रामधून डाव्या बाजूने चढत काळूच्या वोघाजवळ पोहोचलो. थिटबी गावातून सॅक्स न घेता काळूच्या वोघापाशी पोहोचायला तासभर लागलेला. समोर होता घाटमाथ्यापासून पाच टप्प्यांमध्ये उतरणारा अजस्त्र धबधबा - काळूचा वोघ आणि पाण्याने दोहोबाजूचा कातळ कातून बनवलेली रांजणकुंडं आणि एक जबरदस्त घळ - २५०-३०० फूट लांब आणि ७०-८० फूट खोलीची. 



रौद्रविराट सह्याद्रीच्या दर्शनाने भारावून गेलेलो. पावसाळ्यात धबाबा कोसळणाऱ्या जलौघाचं काय देखणं तांडव असेल इथे! आता मात्र डिसेंबरमध्ये आम्ही कातळाला पाठ टेकून, खळाळणाऱ्या अल्लड पाण्याच्या झऱ्याचा नाद आणि हलक्या वाऱ्यासोबत घुमत येणारा कारवीचा मंद सुवास अनुभवत होतो... 


बेलपाड्यातून डोळ्याचं पारणं फेडणारा कोकणकडा

आता गाठायचा होता हरिश्चंद्रच्या परीक्रमेतला पुढचा टप्पा! थिटबी गावातून माळशेजच्या सुपाच्या आकाराच्या खोऱ्यातून उत्तरेला जात हरिश्चंद्रगडच्या रोहिदास शिखराच्या पायथ्याची डोंगरसोंड चढून पल्याडच्या खोऱ्यात उतरायचं होतं. दुपारचे अडीच वाजलेले. भूक लागलेली. अनायासे समोर आलेलं नदीचं गारेगार पात्र, रेंगाळलेल्या पाण्याची साथ आणि गर्द सावलीचं आवताण नाकारणं शक्यच नव्हतं. काठाशी शिदोरी सोडली अन दोन घास खाऊन घेतले. नदीच्या पाण्यापल्याडच्या उभ्या दरडीवरून उतरणाऱ्या, आणि आपल्याच प्रतिबिंबाने दचकून घसरणाऱ्या शेरडाची गंमत बघत विश्रांती घेतली. 

काळू नदीपासून मुक्कामाचं बेलपाडा गाव गाठण्यासाठी, आमच्या चालीने अजून दोन तास लागणार होते. रोहिदास शिखराच्या पश्चिमेला उतरणाऱ्या सोंडेवर नक्की कुठे चढायचं म्हणजे पल्याडच्या खोऱ्यात उतरणारी वाट मिळेल, ते एका गुराखी आजानं समजावून सांगितलं. सपाटीवरची शेताडी पार करून खिंडीकडे चढणारी योग्य वाट शोधली. आम्ही होतो रोहिदास शिखराच्या अगदी पायथ्याशी. खरंतर, हरिश्चंद्रगडावरून रोहिदास शिखराची उंची कळत नाही. इथून तळातून बघताना मात्र त्याचे एकावर एक रचल्यासारखे दिसणारे कातळ-झाडीभरले टप्पे आणि वरचा कातळमाथा बघताना मान अवघडली.



एव्हाना रोहिदासच्या सोंडेवर चढताना आमची टीम धापा टाकू लागलेली. उभा तीव्र चढ, दिवसभराचे श्रम आणि पाठीवरच्या वजनदार सॅक्समुळे वेग मंदावलेला. आधी काही काळ कोकणातल्या आर्द्रतेमुळे घामानं निथळत होतो. पुढेतर वेळोवेळी पाणी पिऊनही घाम न येता, नुस्तंच इंजिन तापायला लागलं. रोहिदास शिखरापासून उतरणाऱ्या सोंडेवर कसंबसं पोहोचलो होतो. शरीर काय सिग्नल्स देतंय, त्याचा अंदाज घेऊन सक्तीचा ब्रेक घेतला. पाण्यासोबत संत्री-खजूर-चिक्की-राजगिरा असा शक्तीदायक पण हेल्दी खाऊ घेतला. 


आता पल्याड खोऱ्यातून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याच्या दर्शनाची विलक्षण आस लागलेली. उतारावरच्या झाडीभरल्या वाटेमुळे अजूनही कुठलं दृश्य दिसलं नव्हतं. जास्तीत जास्त जलद निघालो. एका क्षणी मळलेली वाट मोकळवनात आली आणि समोर उलगडलेल्या नजऱ्याने आम्ही अक्षरश: स्पीचलेस!!!  ...ओढ्यापाशी रेंगाळलेलं पाणी, उंबरांनी लगडून झुकलेली झाडाची फांदी, घरी परतणाऱ्या गायी आणि सोनेरी गवताळ उतारांमागे मावळतीच्या सूर्यकिरणांनी उजळून काढलेला कोकणकडा आणि आकाशाला भिडलेली कोंबडा-न्हाप्ता-रोहिदास शिखरं!!!

          
....ट्रेकर्सना मदत करणाऱ्या बेलपाड्यातल्या ‘कमळू पोकळे’च्या घरी मुक्कामाची झक्क सोय झालेली. रानोमाळ भटकलेल्या ट्रेकर्सना गर्रम पाण्याच्या अंघोळी, घरगुती जेवण आणि विश्रांतीमुळे तरतरी आली. 


दऱ्याकड्यांची, ऊन्हावाऱ्याची, रानझाडीची, दमवणाऱ्या-सुखावणाऱ्या रानवाटांची दृश्यं स्वप्नातही रुंजी घालत होती. पहाटे खणखणीत आवाजात कोंबडेबुवा आरवू लागले आणि साखरझोपेतून हलकेच जाग आली. घरासमोर सारवलेल्या अंगणात आलो. बाहेर मिट्ट काळोख आणि दूरवरून घुमत येणारा पहाट भूपाळीचा मृदुंग. अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. कारण, पूर्वेला होती चांदण्या रातीनं मढवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकड्याची अंधुक धूसर अंतर्वक्र रेषा!!! 


न्हाप्ता शिखराचं वि-रा-ट दर्शन आणि कसदार चढाईने तृप्त करणारा सादडे घाट

परिक्रमेच्या दुसऱ्या दिवसाची आता ओढ लागलेली. मजबूत न्याहारी करून सकाळी सातच्या आत आम्ही कूच केलं. हरिश्चंद्रगडाच्या उत्तरेला असलेल्या अजस्त्र न्हाप्ता (नकटा) शिखराच्या पोटातून “सादडे घाटा”ने (याला ‘साधले घाट’ असंही म्हणतात) चढाई करून सह्याद्रीमाथा आणि पुढे मुक्कामासाठी हरिश्चंद्रगडाची चढाई – अशी भरपूर चढाई वाट पाहत होती. 


बेलपाडा गावातून बाहेर पडल्यावर सह्याद्रीतलं एका सर्वोत्तम दृश्य सामोरं आलं. पॅनोरमामध्ये उजवीकडे कोकणकड्याचं आणि डावीकडे त्याचा तालेवार सोबती ‘न्हाप्ता’ शिखराचं - अशी दोन अर्धवर्तुळाकार खोरी दिसत होती. घोडीसुळके, अजस्त्र न्हाप्ता शिखर, सादडे घाटाची खिंड, कोंबडा शिखर, उतरणाऱ्या सोंडेवरचा केळेवाडी सुळका, कोकणकड्याची गूढ धूसर कातळभिंत आणि रोहिदास शिखर अश्या अतिभव्य दृश्याने अक्षरशः वेड लावलं. 



भुऱ्या गवताळ माळावरून-झुडुपांमधून जाणारी, वाहत्या ओहोळांशी लगट करणारी हलक्या चढउताराची मळलेली वाट न्हाप्ता शिखराच्या पायथ्याशी घेऊन गेली. अवघं खोरं साखरझोपेत हरवलं असताना, सूर्याची हलकी नाजूक किरणं न्हाप्ताच्या माथ्याला अलगद उजळवू लागली. एकावर एक रचलेले कातळटप्पे, भुरे गवताचे-झाडी टप्पे आणि अतिशय दिमाखात तोऱ्यात उठवलेलं माथ्याचं नाकाड हे दृश्य बघून अंगावर सुखद शहारा आला. 


बेलपाड्यातून निघाल्यापासून निवांत चालीने तासभर चालल्यावर एका मोठ्या ओढ्याशी पोहोचलो होतो. “आसं बगा, त्यो ओढा गावला ना, की गेलात तुमी सरळ सादड्याच्या वाटेनं. बाकी रानात जाणाऱ्या इतर ढोरवाटांवर हरवू नका”, असं गावकर्यांनी बजावलं होतं. न्हाप्ताच्या पूर्वेला कातळभिंतीतली सर्वात कमी उंचीची जागा म्हणजे सादडेघाट. तिथल्या खिंडीच्या दिशेने ओढ्याला लगटून घाटवाट चढणार होती. 


घाटाच्या सुरुवातीला हळूहळू चढणारी प्रशस्त वाट होती. सकाळची वेळ. कारवीचा किंचित तिखट गंध आणि अनवट पक्ष्यांचे सूर आसमंतात घुमत होते. प्रत्येक क्षणी थबकून निरखावेसे वाटावे अशी न्हाप्ता शिखराची रूपं अनुभवत होतो. ओढ्याच्या बाजूने चढत अर्ध्या तासात पदरातल्या मोकळवनात पोहोचलो. कातळाला पाठ टेकवून हाताची उशी करून पडल्यावर समोर होतं सुरेख दृश्य - कोकणकड्याच्या कोंबडा शिखराकडून उतरणारी करवती धार, केळेवाडी सुळका, सादडे घाटाची झाडीभरली खिंड आणि न्हाप्ता शिखराचा उभी भिंत! एव्हाना आम्हांला चढाईची मस्त लय गवसलेली आणि अधूनमधून चिक्की-फळं-खजूर असा हेल्दी खुराक चालू होताच. त्यामुळे, सह्याद्रीतल्या एका सुरेख घाटाच्या चढाईची मजा अनुभवत होतो. 


वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनेरी गवताच्या दांडावरून उभी चढाई सुरू झाली. कातळात खोदलेल्या दोन-चार पायऱ्या बघून ही घाटवाट पुरातन आहे, याची खात्री पटली. घनदाट झाडीतून, मोठ्ठाल्या कातळांच्या बाजूने आणि नुकताच बहर येवून गेलेल्या कारवीच्या झुडुपांमधून वळणे घेत चढाई चालू होती. ओढ्याच्या पात्रातल्या कातळापाशी फुलपाखरांची अन मधमाश्यांची लगबग चाललेली दिसली. निरखून बघितलं, तर कातळाच्या ओंजळभर खोबणीत नितळ थंड पाण्याचा स्त्रोत होता. सादडे घाटात ६०% उंचीवर असलेला हा पाणीसाठा साधारणत: जानेवारीपर्यंत ट्रेकर्सना आधार देतो.



उभ्या उताराच्या वळणवाटेवर दगड घट्ट बसवून फरसबंदीची उभी वाट चढताना घामटं निघू लागलं. आता यापुढची चढाई बऱ्यापैकी ओढ्यातूनच होती. ओढ्यातून डावीकडे जाणारी उभ्या धारेवरची वाट घाटमाथ्याकडे पेठेच्या वाडीकडे जाते. साकेत आणि मिलिंदने ओढ्याच्या उजव्या काठावरून चढणारी आणि पुढे खिंडीतून पाचनईकडे नेणारी वाट अचूक पकडली. मी मात्र डोंगरउतारावरून माती-धोंडे-काटक्यांमधून धस्सक-फस्सक करत उगा जीवाला त्रास करून घेतला. मग योग्य वाट गाठल्यावर क्षणभर विश्रांती घेतली. ऊर धपापत होतं - चढाईमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. गच्च झाडीतून चढत कसं आणि कित्ती चढलो याचा आलेख डोळ्यांसमोर होता. निळंशार आभाळ, हिरवंगर्द कारवीचं रान आणि काळ्या कातळाच्या पार्श्वभूमीवर न्हाप्ता शिखर, त्याचे पूर्वेकडचे कडे, जोडशिखरे आणि माथ्याजवळचं छोटंसं नेढं भन्नाट दिसत होते. 


आता सादडे घाटाची नाळ सुरू झाली. दोहोबाजूच्या उंचच उंच कातळभिंतींमधून अजस्त्र धोंड्यांच्या राशीवरून चढत गेलो. पावसाळ्यात धबाबा तोय आदळून बनलेल्या खोलगट घळीतून चढताना क्वचित खोदलेल्या पायऱ्या कवतिकाने निरखल्या.


अखेरीस पोहोचलो सादडे घाटाच्या खिंडीत - सह्यघाटमाथ्यावर. बेलपाड्यातून निघाल्यापासून इथे पोहोचायला चार तास लागलेले. खिंडीत कातळावर बसून भर्राट वारं खाताना ऊर धपापलेलं, घामाने गच्च भिजलेलो; पण न्हाप्ता शिखराच्या अ-ज-स्त्र दर्शनाने अग्गदी तृप्त झालेलो. सादडे घाट फक्त ट्रेकर्ससाठी. उभ्या चढाईची, पण वापरातली पाऊलवाट आहे. कोठेच दोर किंवा इतर उपकरणांची गरज नाही. हरिश्चंद्रगडाच्या परीक्रमेतला महत्त्वाचा टप्पा गाठलेला. ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला... 



कोकणकड्याचं रौद्र दर्शन घडवणारी हरिश्चंद्राची चढाई

हरिश्चंद्रगडाची परिक्रमा करताना आता आम्हांला पोहोचायचं होतं थेट गडावरच. पाचनईच्या नेहेमीच्या वाटेपेक्षा आम्ही शोधणार होतो, कोंबडा शिखराजवळून थेट कोकणकड्याकडे चढणारी आडवाट! 

सादडे घाटाच्या खिंडीतून पूर्वेला सदाहरित रानातून उतरणारी वाट पकडली. वाहत्या झऱ्याच्या शेजारून उतरत १० मिनिटात गवताळ माळावर आलो, अन समोर आला मुळा खोऱ्यातून घुमणारा वारा. डावीकडे उत्तरेला कलाडगड आणि ‘कलाडचा कोंबडा’ नावाचा सुळका, वनखात्याचा निरीक्षण मनोरा, उजवीकडे दक्षिणेला अस्ताव्यस्त पसरलेला हरिश्चंद्र पर्वत आणि कोंबड्याचा तुरा असावा अश्या आकाराचं गडाचं ‘कोंबडा’ शिखर. वाट कशी असेल याचा अंदाज घेऊन, वाटांच्या चौकापासून उजवीकडे दक्षिणेला वळलो. वाऱ्याने पठारावर डोलणारे गवत, मध्येच कातळाची सपाटी, रेंगाळलेले पाण्याचे ओहोळ, रानफुलांची दुलई अशी गवताळ माळावरची परिसंस्था (ecosystem) अनुभवत तासभर सुरेख चाल होती. पाणथळ भागापाशी शेरळाच्या फुलांची तुरे, शेताच्या खळ्याशेजारी शेंदूरचर्चित रानदेवाचं ठाणं आणि पल्याड वाहत्या ओहोळापाशी गारेगार सावली होती. खादाडी, थोडकी विश्रांती आणि गप्पाष्टकासाठी परफेक्ट स्पॉट! 


मंजिऱ्याच्या तणांच्या दुलईमागे कोंबडा आणि त्याची झाडीभरली खिंड खुणावत होते. थेट खिंडीची दिशा पकडून माळ तुडवत निघालो. 


खिंडीकडे चढणाऱ्या वाटेची सुरुवात किंचित शोधावी लागली. आणि, गच्च सदाहरित जंगलातून ओढ्याच्या उजवीकडून कारवीतून चढणारी सुरेख मळलेली वाट लागली. खिंडीत पोहोचलो आणि लक्षात आलं, की कोकणकड्याशेजारून ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेली ‘नळीची वाट’ जिथे घाटमाथ्यावर पोहोचते त्याच खिंडीत आम्ही पोहोचलेलो. 


पश्चिमेकडील काळू नदीच्या आणि पूर्वेच्या मुळा नदीच्या खोऱ्याच्या दृश्याने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. एकीकडे नळीच्या थरारक वाटेचं आणि रोहिदास शिखराचे दर्शन; तर दुसरीकडे मुळा खोऱ्यातून झाडीतून चढून आलेली वाट! आता गडावर पोहोचण्यासाठी १५० मी चढाई बाकी होती. कोंबड्याच्या भव्य कातळाकडे पाठ फिरवून, समोरच्या उतरंडीच्या कातळावर १० मी सोप्या श्रेणीचे कातळारोहण करायचं होतं. वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत होती आणि ट्रेकर्सची भंबेरी उडवत होती. कातळ चढल्यावरच्या पठारावर डहाणीच्या तुर्यांवर मोहून भुंगे आणि मधमाश्या गुणगुणत होते. पठार पार करून झुडुपांमधून चढत, शेवटी कातळावरून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर! सादडे घाटातून निघाल्यापासून घाटमाथ्यावरच्या प्रसन्न वाटांनी अडीच तासात गडमाथा गाठलेला आणि समोर आलं अदभूत दर्शन कोकणकड्याचं....


कोकणकड्यावर अनुभवला नितांतसुंदर मुक्काम

रविवारची पर्यटकांची गर्दी ओसरू लागली आणि सख्या कोकणकड्यासोबत आम्हाला निवांत मोकळा वेळ मिळाला. सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकणकड्याचं - एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणारं आणि त्याचवेळी उत्कट मनस्वी आनंद देणारं - दृश्य अनुभवत निवांत तासनतास बसलो.

ट्रेकर्सना मदत करणाऱ्या भास्करकडे नेहेमीप्रमाणे मुक्काम होता. गडावर भास्कर नव्हता, पण यावेळी भेटला भास्करचा बाबा. शेवग्याच्या शेंगांची विलक्षण चवदार भाजी, तांदूळ-ज्वारी मिश्रित कडक भाकरी, पिठलं भात आणि ठेचा असं जगात भारी जेवण बाबाने आग्रह करकरून वाढलं. आजच्या कमर्शियल युगात भास्करच्या बाबाकडून मात्र जे निखळ मैत्र आणि प्रेम अनुभवलं, त्याला तोडंच नाही. मिश्कील, प्रेमळ, गप्पिष्ट, सारखं गदागदा हसणाऱ्या भास्करच्या बाबाने आमच्या मनात कायमचं घर केलं. 



जेवणं झाल्यावर परत कोकणकडा फक्त आमच्यासाठी मोकळा मिळाला. चंद्रप्रकाशात उजळलेल्या कोकणकड्यावर वाफाळलेल्या कॉफीच्या मगने हात शेकत, तारांगणातल्या उल्का धुंडाळत आणि दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं न्याहाळण्यात कसला आनंद आहे, हे समजायला ट्रेकरचं काळीज हवं...


राजनाळेमधून जुन्नर दरवाज्याची भन्नाट उतराई

दिवस तिसरा. आज हरिश्चंद्रगड परिक्रमेची सांगता करण्यासाठी जुन्नर दरवाजाची आडवाट निवडलेली. कोकणकडा आणि भास्करच्या बाबाला अलविदा करून सातच्या आत पूर्वेला मंगळगंगेच्या काठावरचं कुळकुळीत काळ्या पाषाणातले भव्य हरिश्चंद्रेश्वर राऊळ गाठलं. 

विश्वामित्र-हरिश्चंद्राच्या पौराणिक कथेची पार्श्वभूमी असल्याने परिसरात लेणी-राऊळं-टाकी-शिलालेख-शिल्पे यांचा खजिना होता. समोरच्या पुष्करणीतलं पाणी ओंजळीत घेऊन एका गावकऱ्याने अर्घ्य वाहिला, अन पाण्यातल्या तारामती शिखराच्या प्रतिबिंबावर तरंग उमटले. 


आता आम्हांला हरिश्चंद्र शिखराजवळ चढून जुन्नर दरवाजाची वाट गाठायची होती. सूर्याची कोवळी किरणं दाट झाडीपासून निसटून गवतातून-कातळावरून जाणाऱ्या वाटेला बिलगू लागली. नेहेमीची खिरेश्वरची वाट सोडून उजवीकडे हरिश्चंद्र शिखराकडे चढणारी ठळक वाट घेतली. सुरेख कारवीतून, झुकलेल्या फांद्यांखालून चढत जाताना देखण्या मदम-पुष्पापाशी मधमाश्या गुणगुणत होत्या. 


हरिश्चंद्र आणि तारामती शिखरांना जोडणाऱ्या धारेवर पोहोचल्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हांत समोर आली काहीच्या काही अशक्य लँडस्केप्स. 


निळ्या आभाळात हलकेच विखुरलेले ढगाचे पुंजके, त्याचे क्षणाक्षणाला बदलत जाणारे रंग. 


उत्तरेला तालेवार दुर्ग-डोंगर - अलंग-कुलंग-मदन-कळसूबाई-कलाडगड-आजोबा-कात्राबाई-मुडा-गवळदेव-घनचक्कर-भैरवगड-पाबरगड-औंढा-पट्टा-बितन; पश्चिमेला नागफणीसारखं उठवलेलं तारामती आणि मागचं रोहिदास शिखर आणि दक्षिणेला सिंदोळा, निमगिरी, माळशेजची शिखरे, ढाकोबा, गोरख-मच्छिंद्र, हटकेश्वर आणि पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी असं विलक्षण पॅनोरमा!!!



हरिश्चंद्र शिखराला डावीकडे ठेवून गेल्यावर, खोलवर घळीत डोकावणारी चिंचोळी आडवी वाट होती. हरिश्चंद्र शिखराच्या उतारावर कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं, घराचं जोतं आणि खोदीव पायऱ्या न्याहाळल्या. पठारावरून डावीकडे पूर्वेला जात दक्षिणेला उतरणारी ‘राजनाळ’ गाठली. सकाळी कोकणकड्यापासून निघाल्यापासून गडदर्शन करत, इथे पोहोचायला २ तास लागलेले. 


आता दगड-धोंड्यातून अरुंद नाळेची उभी उतराई सुरू झाली. काही ठिकाणी उभ्या कातळाकडे तोंड करून उतरणं भाग होतं, तेंव्हा आजूबाजूच्या कातळातले गोल आधार खळगे सहजीच हातात येत होते. 


शिवलिंग आणि पूजक खोदलेले शिल्प, खोदलेल्या पायऱ्या, मेटाच्या जागा बघता, पूर्वी कदाचित हीच मुख्य वाट असेल असं वाटलं. 



नाळ संपून धोंडे भरलेला ओढा सुरू झाला, ओढ्यात झुडुपे सुरू झाली, डावीकडच्या धारेमधले आरपार छिद्र नेढे डोक्यावर आलं. मागे वळून हरिश्चंद्रच्या भव्य कातळकड्यांना डोळ्यात साठवलं आणि ओढा सोडून डावीकडची आडवी वाट पकडली. 


मोठ्ठी नैसर्गिक गुहा बाजूला ठेवत गच्च कारवीमधून पुढे धारेवर पोहोचलो. कोरांटीसारखी दिसणाऱ्या कारवीच्या जातीतल्या ‘आखरा’ नावाच्या झुडुपांमधून वाट होती. कमरेएवढ्या उंचीची ही झुडुपं अतिशय बोचत होती. चार वर्षांनी फुलणाऱ्या आखराचा मध औषधी असतो म्हणे. उभ्या धारेवरची घसारायुक्त उतराई केली. सुळकेवजा डोंगरास डावीकडून वळसा घालून आडव्या वाटेवरून कोरीव पावठ्या न्याहाळत ओढ्याजवळच्या गच्च झाडीत विसावलो. तापलेल्या उन्हांतल्या चालीने धाप लागलेल्या इंजिनला पाणी-ताक देवून थंड केलं. झाडीतून उतरणाऱ्या उभ्या वाटेने खिरेश्वर गावची सपाटी गाठली. हरीश्चंद्राच्या थरारक परीक्रमेची सांगता करणारी राजनाळ उतरायला आम्हाला तीन तास लागलेले... 


समृद्ध केलं होतं हरीश्चंद्राच्या परीक्रमेने...

परतीच्या वाटेवर निघालो, तरी तीन दिवसांच्या हरीश्चंद्राच्या परीक्रमेची दृश्यं दीठीपुढून हलेनात…
मंगळगंगा-मुळा-पुष्पावती नद्यांची गूढ खोरी...
विराटरौद्र अनुभूतीने थरारून टाकणारे कडे-सुळके, अन भारावून टाकणाऱ्या अजस्त्र डोंगरसोंडा...
भक्ती-योग-ज्ञान-वैराग्याची साधना झाल्याची साक्ष देणारी लेणी-मंदिरं-पुष्करणी-शिल्पे अन शिलालेख...
भोळ्या भाविकांना आधार देणारा हरिश्चंद्रेश्वर महादेव, लेण्यातला गणपतीबाप्पा अन गारेगार पाण्यातला केदारेश्वर...
जुन्या वहिवाटीच्या, पण आता हरवत चाललेल्या घाटवाटा...
जैववैविध्याने नटलेलं घनदाट अरण्य, अन मोहक फुलपाखरांच्या रंगांच्या छटा...
घाटमाथ्याचा भर्राट वारा, अन पठारावर सळसळणाऱ्या सोनेरी गवताच्या लाटा... 
गिरीमित्राचं निखळ प्रेम, आणि जिगरी ट्रेकमित्रांची साथ...
होतो थोडा दमलेला, पण होतो तृप्त आणि कृतज्ञ...

शिवसह्याद्रीचं स्मरण-दर्शन करण्यासाठी केलेली, ही होती आमची “हरिचंद्राची परिक्रमा”. 



------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. पूर्वप्रकाशित: लोकप्रभा २२-एप्रिल-२०१६
२. छायाचित्रे: मिलिंद लिमये, साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
३. कृतज्ञता: गुरुवर्य आनंद पाळंदे यांचे पुस्तक 'चढाई उतराई'
४. भौगोलिक स्थान: http://wikimapia.org/529306/Harishchandragad
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.


ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.
           

27 comments:

  1. Apratim - Are kase suchate! Trek peksha jast efforts aahet - pan athavani mhanun ani trekkers sathi ekdam upayogi !

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा.. खरंय, ३ दिवसांचा ट्रेकब्लॉग लिहायला ३ महिने लागले.
      ट्रेकच्या अनुभवाचा पुन:प्रत्यय यावा आणि ट्रेकरदोस्तांना ट्रेकला जाताना मदत व्हावी, असं लिहायचा प्रयत्न आहे..
      तुझ्या आणि साकेतशिवाय हा ट्रेक शक्यच नव्हता!

      Delete
  2. अप्रतिम .. खुपच प्रेरणादायी .

    ReplyDelete
  3. वाह !! निव्वळ अप्रतिम.... !!

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखन... वाचताना स्वतः हरिश्चंद्राच्या डोंगर रांगात भटकतोय असे क्षणभर वाटले..
    मित्रा... अनेकानेक धन्यवाद.. तसेच सर्व टिमचे अभिनंदन...

    ReplyDelete
  5. अप्रतिम !! सगळी वाट डोळ्यासमोर उभी राहिली. "चंद्रप्रकाशात उजळलेल्या कोकणकड्यावर वाफाळलेल्या कॉफीच्या मग ने हात शेकत, तारांगणातल्या उल्का धुंडाळत आणि दूरवरच्या धुसर गूढ शिखरांची टोकं न्याहाळण्यात कसला आनंद आहे, हे समजायला ट्रेकर च काळीज हवं …. " या ओळीशी अगदी मनापासून रिलेट करू शकलो ..आणि सर्व फोटो सुद्धा भारी आहेत! वाचून खूपच मजा आली!

    ReplyDelete
    Replies
    1. अद्वैत,
      ब्लॉगवर स्वागत!
      हा हा.. खरंय! ज्यानं सह्याद्री मनापासून अनुभवलाय, त्या प्रत्येक ट्रेकरला हा अनुभव जवळचा वाटणार..
      छान वाटलं प्रतिक्रिया वाचून...
      धन्यवाद :)

      Delete
  6. लाभले आम्हास भाग्य.... म्हणून हे वाचावयास मिळाले. ब्लॉग भन्नाटच!
    हे असपण असत हे माहित नव्हत. म्हणजे की पहिले हे समजायचो की ट्रेक म्हणजे फक्त किल्ले भटकणे. सह्याद्रीत पावलं रुळायला लागल्यापासून पूर्वी वापरात असलेल्या पण सध्या दुर्लिक्षेलेल्य घाटवाटा, अपरिचित लेण्या-वाटा किवा rappelling - क्लायंबिंग, त्याच्या नोंदी ठेवणे, रेकॉर्ड बेस डाटा बनवन ..... हे पण असत हे माहिती झालं. घाटवाटांच्या नाद अजून जडला नाही. नाळ जुळलीच तर एखादी घाटवाट सोबतीनेच पार करू.

    ReplyDelete
    Replies
    1. देवा,
      ट्रेककट्ट्यावरच्या मित्रांना वर्णन सांगावं, तसं लिहिलंय... मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून..
      सह्याद्रीने दडवलेल्या दुर्ग-लेणी-मंदिरे-गिरीस्थळे-ecosystem समजावून घ्यायला आयुष्य कमी पडेल!
      दणकट टीम जमवून घाटांचा नाद अवश्य लावून घ्या... सर्वांगसुंदर ट्रेक्स!
      धन्यवाद! :)

      Delete
  7. जबरदस्त भटकंती आणि सोबत सुंदर वर्णन

    ReplyDelete
  8. अप्रतिम लिखाण. भन्नाट ट्रेक !!

    ReplyDelete
  9. झक्कास भटकंती साई ! आणि नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखन... आवडलंय हे वेगळं सांगायला नकोच !

    ReplyDelete
  10. अप्रतिम भटकंती वर्णन जणु आम्ही भटकतोय या परीक्रमात
    खुप छान परिक्रमा दादा...!

    ReplyDelete
  11. साई..अप्रतिम ब्लॉग...हा ट्रेक माझ्या wish list मध्ये add kela...

    ReplyDelete
  12. ज… ब… र… द… स्त…

    ब्लॉग वाचताना प्रत्यक्ष तुमच्याबरोबर असल्याचा फिल आला…

    फोटोज लैच करकरीत आलेत…

    मिलिंद सर आणि साकेत सर असताना ट्रेक ची मजा काही औरचं…

    लुप्त पावणाऱ्या आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या महत्वाच्या घाटवाटांची सफर जबराट झालेली दिसतेय…

    बरं झालं तुम्ही मंडळींनी रविवारी संध्याकाळी हरिश्चंद्रगड केलात, अन्यथा तिकडे पाय ठेवायलाही जागा मिळाली नसती…

    कमळू पोकळे आणि भास्करच्या तीर्थरूपांचा आदरातिथ्य कायम स्मरणात राहण्यासारखा… त्यांना आमचाही दंडवत…

    तुझं लिखाण तर नेहमीप्रमाणेचं जबरी असतं… आजही त्याचा प्रत्यय आला…

    ब… ढी… या…

    ReplyDelete
  13. साई.. एकदम टॉप नि दर्जा वर्णन.. ! ह्या वाटेन कधी जाईन का ते माहित नाही पण हे लेखन वाचतानाच सगळी दृश्य सामोरी आली.. खूप सुंदर.. ! आणि अस लेखन वाचून सह्याद्रीच्या प्रेमात पडण्यासाठी ट्रेकरच काळीज असण्याची आवश्यकताच नाही.. आम्हा ट्रेकर्सलोकांना काय निखळ आनंद नि सह्याद्रीच्या ओढ आणखीन वाढली.. keep trecking.. keep writing.. 3 Cheers !!

    ReplyDelete
  14. मस्त ब्लोग.
    कमलू पोकळे म्हणजेच 'कमा'चा नंबर मिळेल का ? नळीच्या वाटेने जाण्यासाठी त्याचासारखा चांगला मार्गदर्शक नाही.
    आम्ही गेलो तेव्हा त्यानेच वाट दाखवली होती. परंतु नंबर हरवला आहे... :(

    धन्यवाद,
    महेश रा. कुलकर्णी

    ReplyDelete
  15. माळशेज घाटावर नजर ठेऊन असणारा, साडेचार हजारापेक्षा ही जास्त ऊंचीचा हा महाकाय पुराणपुरूष. जेवढा भव्य तेवढ्याच तिथे जाणार्या वाटा हि दिव्यच. तुमची याच वाटांनी समृध्द करणारी परिक्रमा घडली.
    हे खऱच खुपच आनंददायी यात शंकाच नाही.

    ReplyDelete
  16. वाह, क्या बात है !

    ReplyDelete
  17. रौद्र आणि सुंदर भटकंती. लेख आवडलाच. जियो.

    ReplyDelete
  18. Uttam Varnan!!!! Angavar sarsarit kata ala!!

    ReplyDelete
  19. तब्बल एक वर्षानंतर हे वाचतोय आणि पुन्हा १९८५ सालच्या आठवणी मोहरून आल्या! पुनश्च धन्यवाद!

    ReplyDelete
  20. जबरदस्त रे मित्रांनो ! फारच सुंदर.

    ReplyDelete
  21. Useful article, thank you for sharing the article!!!

    Website bloggiaidap247.com và website blogcothebanchuabiet.com giúp bạn giải đáp mọi thắc mắc.

    ReplyDelete