Pages

Thursday, 4 August 2016

सह्यानुभूती - श्रावणातली!

सह्यानुभूती श्रावणातली!
         
... ट्रॅफिक. ऑफिस. इमेल्स. मीटिंग्ज. कॉन्फरन्स कॉल्स. टार्गेट्स. डेडलाईन्स. रिपीट. अश्या चरकातून जाऊन जाऊन जाऊन अक्षरश: चोथा झाल्यावर, मग अखेरीस - ज्या दिवसाची आठवडाभर वाट पाहिली तो - वीकेण्ड उजाडला होता. आंग्लाळलेल्या जगातली हँग झालेली आमची सिस्टिम रिसेट करण्यासाठी आता एकंच उपाय होता - सह्याद्री-दर्शन घेणं, सह्यानुभूती घेणं!!!
         

                 
... भल्या पहाटे आम्ही चार भटके आडवाटांच्या ट्रेकसाठी सुसाटलो होतो. पायगाडीचं इंजिन पेटवण्यापूर्वी ट्रेकर्सनी भरलं चटकदार मिसळीचं इंधन; अन त्यावर ढाब्यावरच्या अमृततुल्य चहाचा 'एकच प्याला'! बरं, तेवढ्याने समाधान नाही म्हणून अजून - 'एकच प्याला'! एव्हाना ट्रेक्सच्या गप्पांना आणि हास्यकल्लोळाला ऊत आला होता.
         
"समस्त ग्रामस्थांकडून सहर्ष स्वागत" करणाऱ्या स्वागतकमानीखालून पश्चिमेला गाडी वळवली. हायवेवरच्या रोंरावत जाणाऱ्या गाड्यांचा कोलाहल आता मागे पडला. चिकचिकाटात माखलेलं आणि शहराचा स्पर्श झालेलं गावठाणही मागे पडलं. आणि, सुरू झाला सह्याद्रीच्या कुशीत नेणारा छोटा अर्ध-कच्चा रस्ता.
           
वाड्या-वस्त्यांमधून जाणाऱ्या त्या रस्त्यावर भेटत होती - शनिवारच्या शाळेसाठी चालत निघालेली हसरी पोरं; केंद्रावर दूध पोहोचवायला निघालेले गवळीदादा; गाडी दिसली की भुंकून पाठलाग करून बिझी राहणारी कुत्री; वरच्या अंगाने येणाऱ्या पहिल्या एसटीची वाट पाहणारी आजी; घरची सग्गळी कामं उरकून, आता शेताडीत निघालेली मावशी; आधी निवांत आणि गाडी अंगावर आल्यावर धांदरटपणे सुसाटणाऱ्या कोंबड्या; तालुक्याच्या गावी जाण्यासाठी एका बाईकवरून निघालेले तिघे; हातात काठी घेऊन शेरडं-गाईंना चरायला निघालेला आजा... अश्या समस्त ग्रामस्थांना रामराम करत निवांत प्रवास चाललेला...
    

                         
आता रस्ता गवताळ माळरानांतून हलके चढ-उतार करत पश्चिमेला निघाला. दोहोबाजूंस तालेवार डोंगररांगा उठावू लागल्या. मध्ये होतं वळणवेड्या नदीचं चिंचोळं खोरं. खोऱ्याच्या टोकाशी मोक्याच्या जागी बांधलेल्या धरणाची भिंत दिसू लागली. पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. ढगांमधून निसटणारा एखादा सूर्यकिरण आता धरणाच्या अजस्त्र भिंतीला उजळवू लागला होता. नदीच्या पात्रात झेपावणाऱ्या पाण्याच्या तुषारांमधून इंद्रधनुष्य उजळलेलं. धरणाच्या भिंतीशेजारून वळणं घेत रस्ता चढत गेला. आषाढातल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरलं होतं, उचंबळत होतं...
           
जलाशयाच्या काठाने वळसे घेत जाताना, कधी पाण्यात एकुडवाणी उभी असलेली झाडांची खोडं, तर कधी अर्धवट बुडलेलं एखादं राऊळ दिसलं. खरंच - आपल्या पाण्याच्या गरजेसाठी या खोऱ्यातली किती गावं, किती घरं उठवली गेली असतील; संस्कृतीच्या किती पाऊलखुणा हरपल्या असतील...
                           
आता समोर अरुंद पूल होता. झाडीआडून अचानक लपेटदार वळण घेत एसटी बस आली. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' ती तत्पर असल्याने, एसटीला जाऊ दिलं. तेव्हडंच पाय मोकळे करायला निमित्त मिळालं. डोंगरमाथ्याकडून छोटे-मोठ्ठे ओहोळ एकत्र येऊन ओढ्याला मिळत होते. डुईवर इरली घेऊन दो-चौघेजण मासे पकडण्याची खटपट करत होते. दरडीवर टेकलेला आजा त्याची मस्करी करत होता. किती साधं निवांत आयुष्य!
               
घाटमाथा जवळ येत गेला. समोर होता - ढगात हरवलेला गडाचा माथा, त्याचा १०० मीटर कातळकडा, कड्यावरून धबाबा कोसळणारा जलस्तंभ, त्याच्या पोटात खोदलेल्या लेणी, उजवीकडे कोकणात उतरणाऱ्या घाटवाटेची खिंड, पदरातलं दाट जंगल, पायथ्याची टुमदार वाडी आणि विखुरलेली भातखाचरं! असा लँडस्केप बघून अंगावर अक्षरश: शहारा आला.
       
                
साध्या पण टुमदार वाडीत पोहोचलो. चौकशीकरता एका घरी गेलो आणि एक अनपेक्षित प्रश्न विचारला गेला - "काय आलात का तुम्ही पण जमिनी विकत घ्यायला!" एक क्षण अवाकच! नंतर आम्ही कसं महाराजांचा गड बघायला आलोय, हे सांगितल्यावर मात्र चहा घेतल्याशिवाय सोडेचनात आणि जेवायला इथेच या, असा आग्रह!!!

                     
... पण आम्हांला मात्र वेध लागले होते गडाचे. पण, तो होता तरी कुठं? ढगांमध्ये कुठेतरी हरवलेला! वाडीतून गडावर कसं जायचं ते समजावून घेतलं. गावाबाहेर पश्चिमेला देवराई, तिथून कोकणात उतरणारी घाटाची खिंड सोडायची, थोरल्या आंब्यापासून पुढे झुडुपांमधून चढून पठार गाठायचं, धबधब्याशेजारची लेणी पाहून मग पदरातून आडवं जात उभी वाट चढून माथा - अशी वाट शोधत जायचं होतं.
       
       
भिजू नये म्हणून नाही, तर वाऱ्या-थंडी-पावसात अंगात ऊब टिकून राहावी म्हणून अंगावर पावसाळी जर्कीन चढवलं. पाठीवर सॅक्स अडकवल्या आणि कूच केलं. गावातली विहीर काठोकाठ भरलेली. गच्च दाटून आलेल्या आभाळाचं प्रतिबिंब विहिरीत पडलेलं आणि चुकार एखादं-दोन थेंब पाण्यात पडून वलयं उमटत होती. भाताच्या घमघमणाऱ्या शेताडीजवळ आलो.

         
भाताच्या खाचरात एकच लगबग चालू होती. बांधावरून जाताना चहूबाजूंना दिसत होत्या, शेता-शिवारात उचंबळणाऱ्या रंगीबेरंगी लाटाच-लाटा!

                   
रानाची वाट पकडली, अन खास पावसाळ्यात दिसणारे कंद – गौरीचे हात, रानहळद आणि सापकांदा डोकावू लागले. पल्याड होती कोळ्यांच्या जाळ्यांनी झेललेल्या थेंबांची नक्षत्रे.

       
गडाच्या पायथ्याशी देवाच्या नावाने राखलेल्या पुजलेल्या - देवराईत पोहोचलो. उंचचउंच जुने-जाणते वृक्ष आणि दगडाखाली पुजलं जाणारं भैरोबाचं ठाणं! बाहेर कातळावर कोरलेला वाघदेव, चंद्र आणि सूर्य. वाटलं, कुठल्या आनंद-दुःखाच्या परिस्थितीत इथल्या स्थानिक पूर्वजांनी या निसर्गदेवतांना पूजलं असेल...
       
पावसाळा म्हणजे ट्रेक्स काढणाऱ्या ग्रुप्सचा सुगीचा हंगाम. त्यातल्या पिकनिकछाप लोकांनी 'ट्रेकिंग (ते त्याला 'ट्रॅकींग' म्हणतात)' एंजॉय करून, आपला जन्मसिद्ध हक्क म्हणून ढीगभर कचरा मागे सोडलेला. आम्ही आमच्या परीने विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला.
          
देवराईपासून पुढे घाटमाथ्यापाशी आलो. खोलवर कोकणात उतरणाऱ्या जुन्या घाट-पाऊलवाटेच्या तोंडापाशी असलेलं शंखनितळ पाण्याचं टाकं, कधीतरी शेंदूर लावला असलेली देवता आणि खोदीव पायऱ्या न्याहाळून कड्याजवळ काळजीपूर्वक गेलो. कोकणाचा नजारा ढगांमुळे सपशेल हरवलेला.
        
हवा कुंद झालेली. सुलतानढवा करून चालून येणारे काळे ढग दिसू लागले, म्हणून काढता पाय घेतला. खुणेचं थोरल्या आंब्याचं झाड हेरलं. पण हा हा म्हणता,तडाखेबंद सर कोसळायला लागली. भिजू नये म्हणून नाही, तर वाऱ्यापासून आडोसा म्हणून छत्रीसोबत झटपट केली. ती झटक्यात उलटी झाली. 
         
           
अरबी समुद्रावरून वाहत आलेल्या मॉन्सूनच्या ढगांना प्रथमंच विरोध झालेला - सह्याद्रीच्या भिंतीच्या रूपाने. दोघेही तालेवार. त्यामुळे पावसाचा तडाखा अजूनच वाढला. तुफान वारा आणि जणू काही बाण अंगात घुसावेत, अश्या पावसाच्या रेघा दिसत होत्या.
        
काय व्हायचं ते झालंच - वाट चुकली. कधी कशी चुकली कुणास ठाऊक! चेहऱ्यावरचे पाणी निपटून वाटेचा अंदाज घ्यायचा आणि इकडून तिकडून वाट शोधायचा प्रयत्न फसला. वाटेची 'वाट' लावल्याबद्दल आघाडीच्या मावळ्याचं कोडकौतुक झालं. तरीही 'सापडेल वाट', या हट्टाने उभ्या चढावर झुडुपांमधून धस्सक-फस्सक करत चढाई सुरू केली. झुडुपांना धरून ओढून एकेक पाऊल रोवत चढाई करत होतो. गच्च झुडुपांमुळे अंग ओरबाडून निघू लागलं. १५-२० मिनिटांचा खेळ, पण पहिल्या टेपाचा उभा चढ असा चांगलाच दमवून गेला.
        
दिवसभर जर इतका पाऊस पडत राहिला, तर ट्रेक कसा होणार - असं वाटू लागलं. प्रत्यक्षात मात्र, जसा पाऊस अचानक आला, तसाच अचानक उणावला सुद्धा. लागलीच योग्य वाट सापडली आणि पठारावर पोहोचलो. वाडीपासून किती चढून आलो, यासाठी वळून पाहिलं. दूरवर पसरलेली भातखाचरं आणि शेताडीमधली लगबग लोभस वाटत होती.

                     
टेपापल्याड एक मोर पिसारा फुलवून सौंदर्यप्रदर्शन करत होता. त्याला त्रास होणार नाही, असं लांबून आम्ही दृश्य पाहत होतो.

         
झाडाआड दडलेली लांडोर आता दिसायला लागली. लांडोरीच्या मागे जाताना हवेतून झेपावणाऱ्या मोराची दुर्मिळ फ्लाईटसुद्धा बघायला मिळाली. बराच वेळ झाला, पण लांडोरीने मोराकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. ट्रेकर्सना कोट्या करायला किस्सा मिळालेला. त्यामुळे झाडाखाली खजूर खाताना खिदळून झालं.

           
... कुठेतरी लांबून धबाबा धबधब्याचा आवाज आसमंतात घुमत होता, त्या दिशेने निघालो. अलगद तरंगत उतरणाऱ्या पावसाच्या रिमझिम रेशिमधारा गवतावर विसावत होत्या. काही क्षणात तर चक्क ऊन पडलं. मग लक्षात आलं, की स्वतःचा सूर-ताल-लय ठरवणाऱ्या मॉन्सूननं - आषाढात 'द्रुतलयी'त बरसल्यावर, आता श्रावणात 'विलंबित एकताल' सुरू केलेला. पावसाला विचारावंसं वाटलं, "काय रे, तू शहरात वाटतोस रटाळ आणि तोच तू सह्याद्रीत इतका रसिक कसा"...
                   
... माळावर जांभळ्या मंजिऱ्याचा गालिचा हळुवार वाऱ्यावर डुलत होता. चमचमणाऱ्या उन्हात भुंग्यांची आणि फुलपाखरांची लगबग चालू होती. चिखलाळलेल्या बुळबुळीत वाटेवरून पाय सटकत होते, पण चुबुक चुबुक करत चालताना मजा येत होती. पल्याड तुरुतुरु चालीच्या खेकड्यांनी अवघ्या माळावर बिळं बनवलेली.
            
धबधबा जवळ येऊ लागला. हिरव्यागार दाट रानात शेवाळलेल्या खोडांवर आमरीचे (ऑर्किड) देखणे झुबके लगडलेले. चिंब भिजून कुडकुडणारी पाने वाऱ्याच्या झोतासरशी थरथरत होती.

           
तुळतुळीत कातळकड्यावरून कोसळणारा जबरदस्त धबधबा पाहून छाती दडपली. धबधब्याच्या पोटातलं कातळकोरीव लेणं दृष्टीक्षेपात आलं. वाटलं, कितीशे वर्षांपूर्वी साधी टूल्स वापरून लेणी खोदण्याचे कोणी इतके कष्ट घेतले असतील? 'वर्षावासा'साठी कोण साधक किंवा व्यापारी राहिले असतील इथे? आणि शिवरायांच्या काळात, आणि स्वातंत्र्यसंग्रामात झाला असेल या लेण्यांचा उपयोग? 'वर्षावासा'साठी खोदलेल्या लेण्यांचा उपयोग आज ऑईलपेंटने ILU लिहिण्यासाठी किंवा गुरे बांधायला होतो, हे पाहून कसंनुसंच वाटलं.
                     
मागे येऊन, गडाच्या पदरातून जाणारी धम्माल वाट तुडवू लागलो. घनगर्द रानवा दाटलेला. त्यातून वळसे घेत जाणारी मऊसूत वाट होती. नाना रंगांच्या त्या रानात मॉन्सूनच्या संजीवनीमुळे रानफुलं बहरली होती. चालताना वाटेवरच्या झुडुपांना जरा धक्का लागला, की पाण्याचे तुषार अंगावर उधळले जात आणि नाजूक रानफुलांचा सडा पाऊलवाटेवर विसावत असे. समोर लक्ष गेलं, तर वाटेवर झुकलेल्या फांदीवर निवांत पहुडला होता लांबलचक 'हरणटोळ'!!! (एक साप).

      
आता गडाची उभी चढाई सुरू झाली. पाऊस नव्हता. ढगांची विलक्षण झुंबड अनुभवली. पाण्यात निथळणाऱ्या फुलांना दाद देत, उभ्या धारेवरुन पाऊलवाट चढू लागलो. कारवीच्या कॅनोपीमधून उभी वाट चढताना अचानक करकचून ब्रेक दाबल्यासारखा थांबलो आणि दोन हात मागे सरकलो. एक अवाढव्य रानडुक्कर डावीकडच्या दरडीतून उजवीकडच्या झाडीत सुसाटलं आणि लांबवर दिसेनासं झालं. अंगावर अक्षरश: भीतीयुक्त शहारा आला. हातातली काठी चाचपली आणि निसर्गापुढे आपण केवढेसे आहोत याची जाणीव झाली...
       
गडाच्या पहिल्या द्वारापाशी पोहोचलो. वीरमारुतीच्या प्रतिमेस वंदन केला. पायऱ्यांवरून खळाळत सुटलेल्या पाण्यातून चढत माथा गाठला. ढगांच्या दुलईत आकंठ बुडून गेलो.

           
ढगांचा हलका तिखट गंध-स्पर्श अनुभवत, जुने अवशेष धुंडाळत निघालो. आभाळ-मायेने तृप्त होऊन पाण्याची टाकी इतकी काठोकाठ भरलेली, की वाऱ्याच्या हलक्या झोतानेही पाणी बाहेर पडावे. पुढच्या पाच मिनिटात पाऊस आणि ढग विरळ झाले. तरी वाऱ्याबरोबर उधळलेले ढगातले चुकार स्वैर बाण पाण्यावर विसावत होते. निळ्यारेशमी पाण्यावरची थेंबांची नक्षी किती वेळ न्याहाळत बसलो, कळलंच नाही. चमचणारं ऊन जाऊन, पुन्हा पाऊस आला. गारठवू लागला आणि मग गडाची उतराई करणं भाग होतं...

                 
... परतीच्या वाटेवर मन चिंब पावसाळी झालेलं. श्रावणातल्या दिवसाभराच्या भटकंतीत - घमघमणाऱ्या भाताच्या खाचरांचा सुगंध, मोराच्या प्रसन्न आविष्काराने सुखावलेली दिठी, देवराईतल्या घनदाट झाडीतल्या राऊळातली मनस्वी शांतता, रानडुकराच्या थराराने काळजाचे वाढलेले ठोके, ढगांच्या दुलईचा नाजूक स्पर्श, धबधब्याचा आसमंतात घुमणारा नाद, रानमित्रांनी घरी मायेने खाऊ घातलेल्या पिठलं-भाताची चव, जुन्या संस्कृतीच्या पाऊलखुणा असलेल्या दुर्ग-लेणी-घाट-राऊळाची भेट - अश्या निखळ अवीट सह्यानुभूतीने श्रीमंत झालेलो... तृप्त झालेलो... कृतज्ञ आहोत!!!




------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. पूर्वप्रकाशित: लोकप्रभा ०५-ऑगस्ट-२०१६
२. छायाचित्रे: साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

13 comments:

  1. साईप्रसाद,खूपच छान !

    ReplyDelete
  2. साई मित्रा खुपचं छान. फोटोज तर कमाल

    ReplyDelete
  3. फारच सुंदर झालंय साई.. सह्याद्रीचं देखणेपण आपल्या लेखणीतून असंच वाहतं राहो !

    ReplyDelete
  4. Sai,
    Nehami pramanech khumaasdaar...
    Photo ek number...!!

    ReplyDelete
  5. Superb...मोर, लांडोर आणि हरणटोळ तेही एकाच दुर्ग यात्रेत .... क्या बात

    लेखन तर अप्रतिम

    ReplyDelete
  6. साईनाथा... तृप्त केलंस रे बाबा ...

    ReplyDelete
  7. साईनाथा... बरं झालं तू मराठीचा प्राध्यापक नाही झालास... पुस्तकात अडकून बसला असतास !!!
    थॅंक्स ...

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. साई, हिरवा हिरवा ग्गार लेख! सुंदर!!

    ReplyDelete
  10. अप्रतिम लेख व प्रकाशचित्रे. गडाचे नाव व कोठली लेणी याचे कुतूहल जागे झाले.

    ReplyDelete
  11. नेहमीप्रमाणेच सुरेख आणि खुसखुशीत वर्णन...
    सर्वात आवडलं ते ह्या "सह्यानुभूती" ट्रेकच्या ठिकाणाचा कुठेही उल्लेख केलेला नाहीस...अन्यथा भविष्यात आपल्याला ह्या जागांची फक्त "सहानुभूती" दाखवावी लागेल... अर्थात त्याचं कारण हि तेवढंचं महत्वाचं आहे...
    फोटोज तर लैच भारी...
    काळजाला भिडलेला आणि सद्यस्थितीतला भेडसावणारा यक्षप्रश्न :
    <>
    मोराची दुर्मिळ फ्लाईट आणि मोराच्या फुललेल्या पिसाराचा फोटो लाजवाब... नशीबवान आहेस...
    धबधबे, शाळकरी मुलं, ऑर्किड्स आणि हरणटोळ चे फोटो एकदम कडक...
    एकंदरीतचं... बऱ्याच दिवसांनी खुमासदार मेजवानी दिलीस...
    धनुर्वाद,
    ट्रेकळावे,
    दत्तू ​तुपे.

    ReplyDelete