Pages

Friday, 28 April 2017

जाज्ज्वल्य अभिमान पुण्यातल्या ७ कातळलेण्यांचा



आमचे लाडके पुलं सांगून गेले आहेत, 'पुणेकर व्हायला कसल्यातरी गोष्टीचा जाज्ज्वल्य अभिमान हवा- नुसता नाही, जाज्ज्वल्य अभिमान'!'. जाज्ज्वल्य अभिमान असण्यासाठी - पेठांचे पुणे, 'विनम्र' लोकांचे पुणे, खवैय्या पुणे, महाराजांचे पुणे, साहित्यिक पुणे, औद्योगिक पुणे, खरेदीचे पुणे, उत्सवी पुणे, सवाई पुणे, मंदिरांचे पुणे, दुचाकी पुणे, बेशिस्त ट्राफिकचे पुणे, चोखंदळ पुणे, शैक्षणिक पुणे, आयटी पुणे - ही आणि अशी कितीतरी कारणं आहेतच की! 

'पुणे तेथे काय उणे' असा जाज्वल्य अभिमान वाटण्यासाठी, अजून एक कारण बऱ्याचजणांना माहित नसेल. सांगा - येरवडा, हिंजवडी, बाणेर, हनुमान टेकडी, पर्वती, चतु:शृंगी आणि बाणेर या ठिकाणांमध्ये साम्य काय? कोणी म्हणेल - आम्ही राहतो तिथे, तर कोणासाठी ट्रॅफिकमधून वाहत कंपनीला जायच्या, मॉर्निंग वॉकच्या, देवदर्शनाच्या, भटकायच्या किंवा खादाडीच्या या जागा! आश्चर्य वाटेल, पण पुण्यातल्या या अतिपरिचित जागांवर पुण्यातल्या अल्पपरिचित अश्या कातळकोरीव लेणी आहेत!!!

...१९९६ पासून 'पुण्यातल्या लेणी'भेटीचा प्रोजेक्ट मनात घोळत होता. एक लेणं पाहिल्यावर अजून एखाद्या लेण्याची माहिती मिळायची. असं करत भेट दिली तब्बल ७ कातळलेण्यांना.
१. सुपरिचित हनुमान टेकडीवरचं अल्पपरिचित 'वृद्धेश्वर लेणं'
२. आयटी पार्कमधला 'माणचा विहार'
३. बाणेरचं 'बाणेश्वर लेणं'
४. चतु:शृंगीचं 'गणेशखिंड लेणं'
५. येरवड्याचं 'तारकेश्वर लेणं'
६. पुण्यातल्या लेण्यांचा मुकुटमणी - 'पाताळेश्वर लेणे'
७. गर्दीच्या टेकडीवरचं 'पर्वती लेणे'


शहरातल्या ७ कातळलेण्यांच्या कश्या भटकल्या आणि नकाशावर ही सग्गळी ठिकाणे मांडल्यावर कसं अनोखं निरीक्षण सामोरं आलं, त्याचा हा वृतांत....   
         
हनुमान टेकडीवर.. आणि लेणं? होय - "वृद्धेश्वर लेणं"
शहराच्या मध्यभागी असलेली 'हनुमान टेकडी' पुणेकरांच्या जिव्हाळ्याची जागा. कोणी व्यायामासाठी, कोणी मित्रमंडळींना भेटायला, कोणी लेक्चर्स बंक करून उनाडक्या करायला. आम्ही मात्र हनुमान टेकडीवर संस्कृतीच्या जुन्या पाऊलखुणा सापडताहेत का, हे शोधायला निघालेलो. सिम्बॉयोसिसजवळ जुन्या पासपोर्ट कार्यालयासमोरून हनुमान टेकडीवर पायऱ्या चढत निघालो. उगवतीची कोवळी किरणं पॅगोडाला उजळवत होती. 


इथून हलक्या चढाची मळलेली वाट माथ्यावरच्या हनुमान राऊळापाशी घेऊन गेली. शनिवार सकाळी हनुमानचरणी भक्तांची झुंबड उडालेली. तिथून निसटून मळलेल्या वाटेने चालल्यावर पोहोचलो गोखले स्मृतीस्तंभापाशी. 

             
हीच ती जागा - जिथे १२ जून १९०५ ला सूर्योदयाला जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखलेंनी 'समाजोन्नतीसाठी शिक्षणा'ची पायाभरणा करण्यासाठी, 'दी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी'ची स्थापना केली. २००५ला या घटनेची स्मृती म्हणून स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय. गोखलेस्मृतीस्तंभापाशी नतमस्तक झालो, कारण या जागेपाशी स्पंदनं जाणवली...
... पुण्याला शिक्षणाचं 'माहेरघर' घडवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या गोपाळ कृष्ण गोखलेंची!
... काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनून भारताच्या स्वातंत्र्यसमराला दिशा देणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखलेंची!
... महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीना यांनाही आपण 'प्रति-गोखले' व्हावे असं वाटावं, अश्या अफाट बुद्धी-कर्तृत्वाच्या गोपाळ कृष्ण गोखलेंची!

                     
... इथंपर्यंत टेकडीवर भटकायला येणारी तुरळक माणसं भेटत होती. यापुढच्या शोधासाठी मात्र रेडीमेड उत्तरं नसणार होती. गोखले स्मृतीस्तंभापासून उत्तरेला सामाजिक वनीकरणाच्या झाडांमधून-चरांमधून-कातळांवरून उतरत गेलो. झाडी संपल्यावर उतरंड्या कातळावर नव्याने बांधली असावी, अशी छोटी देवळी दिसली. घुमटीमध्ये देवीची मूर्ती. घुमटीपासून चौफेर टाकली. पूर्वेला थंडीत गुरफटलेल्या आणि साखरझोपेतल्या पुण्याचं दर्शन झालं. 


टेकडीच्या पायथ्याशी अग्गदी खेटून वसलेली पत्राशेडवस्ती आता इतकी जवळ आलेली, की इथे कुठे काही लेणं असायची शक्यता वाटेना. तेवढ्यात देवळीसमोर उतरत्या कातळात काहीतरी खोदीव दिसलं. साध्याच खोदाईच्या, पण नि:संशय जुन्या कोरलेल्या १२-१५ पायऱ्यांची साखळी सुरू झाली आणि जबरदस्त उत्सुकता दाटली. 


पत्राशेडवस्ती तर आता एकदम जवळ आलेली. कातळाच्या टप्प्याखाली डावीकडे चिंचेच्या झाडाखाली पेव्हमेंट ब्लॉक्स लावलेले आणि मंदिराचा आवार असावं, असं वाटलं. अक्षरश: पळतच कातळासमोरच्या पटांगणात पोहोचलो. अवघा कातळ आणि विहाराला काळ्या ऑईलपेंटने रंगवून, 'श्री वृद्धेश्वर पाची पांडव मंदिर' असं ऑईलपेंटमध्ये लिहिलेलं. पण, तरीही कातळात खोदलेला विहार लपत नव्हता. 

           
पुण्याच्या हनुमान टेकडीवर अल्पपरिचित जुनी लेणी गवसल्याने, आम्ही बेहद्द खूष! आपल्याकडे असंय, की कुठेही जुनी लेणी असली, की ते 'पांडवांचंच कृत्य' अश्या दंतकथा प्रचलित! 


ओसरीपलिकडे विहाराच्या दरवाज्याला लाकडी दार आणि कुलूप बसवलेलं. दरवाजाच्या उंबरठ्यावर खिळ्यांनी नाणी ठोकलेली. पायरीच्या दगडामध्ये काहीसं पुसट कोरलेलं, पण वाचता येईना. 


दरवाज्याच्या डावीकडे "श्री दामोदर दास मारुती'ची रेखीव मूर्ती स्थापिलेली. दर्शनी भागातला मोठ्ठा विहार साधारण २० फूट लांब-रुंद, तर ८ फूट उंचीचा होता. लेण्यात वृद्धेश्वर महादेव पिंडीसोबत विठ्ठल-रुक्मिणी आणि गणेशमूर्ती विराजमान आहेत. कातळात खोदलेल्या लेण्यामध्ये, वृद्धेश्वराची शिवपिंड, बाजूला दोन पितळी त्रिशुळ! शाळुंका पांढऱ्या टाईल्समध्ये बांधून काढलेली. कोण्या भाविकाने पाच नारळांचं तोरण श्रद्धेने वाहिलेलं.

       
मुख्य लेण्याच्या बाहेर उजवीकडे कातळात खोदलेली एक खोली असावी, पण त्याला दरवाजा आणि कुलूप बसवलेलं. त्यामुळे बघता आली नाही. देवस्थानाची स्टोअररूम म्हणून वापरत असावेत. विहारापासून पुन्हा मागे पटांगणात आलो. लेण्यांकडे वळून पाहताना, उजवीकडे जाणाऱ्या पाऊलवाटेने खुणावलं. पल्याडच्या उतरत्या कातळामधून खुणावत होत्या अजून दोन कोरीव गुहा. या गुहा मात्र होत्या साध्या खोदाईच्या. १० फूट दरड चढून लेण्यांसमोर गेलो. 

         
डावीकडचा विहार ७ फूट खोल, ५ फूट रुंद आणि ६ फूट उंच. मुखापाशी थोडकी कोरीव पट्टी. 


तर, पल्याडचा विहार १२ फूट खोल, १५ फूट रुंद आणि ८ फूट उंच! यालादेखील मुखापाशी थोडकी कोरीव पट्टी! भिंतीवर कोण्या भक्ताने भोलेनाथाचं चित्र रेखाटलेलं. 


विहारात बाकी धर्मचिन्हे-कोरीव बाक असं काहीच नाही. कुठलीशी चिप्सची पाकिटं, दारूच्या बाटल्या, चपला असा कचरा विखुरलेला. कदाचित कोण्या साधकाच्या एकांत साधनेसाठी कोरलेल्या पुण्यातल्या लेण्याची २१व्या शतकातलं मूल्य - युटिलिटी व्हॅल्यू - इतकीच असावी?!
         
वृद्धेश्वर लेणं गवसल्याचा आनंद होता. पण परिसरातल्या कचरा-दारू बाटल्या आणि वस्तीमुळे आता मात्र फिरूयात मागे, असं माझ्या मनात डोकावत होतं. निनाद्रावचं कुतूहल काही केल्या शमलेलं नव्हतं. पुढे अजून काही लेणे-अवशेष असू शकतील, अशी त्याला खात्री! 


पत्राशेडमधून डोकावणाऱ्या बनियनवाल्या काकांना विचारलं, "अजून आहेत का हो काही गुहा इथे?" 
तमाखूनं फुगून बसलेल्या तोंडावर एक्सप्रेशन आलं - 'चSSSक'!
आमचे निनाद्रावही नाद सोडेना, "काही खडकातलं खोदकाम?" 
पचकन तोंडातला भार हलका करून काका तोतरे बोलले, "ह्ये पघा पलीकडे"
कातळापर्यंत खेटून वस्ती भिडलेली. समोरच्या कातळावर खोदाईच्या खुणा दिसल्यावर धावलो. दीड फूट लांबी-रुंदीचे पाण्याचे कोरडे टाके नजरेसमोर होतं. 


३ फूट खोली आणि थोडकं कातळाच्या आत खोदत नेलेलं. आत कचरा टाकलेला, कधीतरी कोणी टाक्यामध्येच कचरा जाळल्याने माथ्याकडचा खडक काळवंडलेला. टाक्यातल्या जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी टाक्याला बाहेरच्या बाजूला खोदून चर काढलेला. 


एकीकडे पत्राशेडवस्ती, हागणदरी, गच्च कचरा आणि दारूच्या बाटल्यांचा खचामधून त्रस्त झालेलो; तर दुसरीकडे पुण्यातली अल्पपरिचित लेणी गवसल्याचा आनंद मनात दाटलेला. परत हनुमान टेकडी चढून हनुमान राऊळापाशी आलो. समोरच्या झाडीभरल्या टेकडीच्या दृश्याने भारावून गेलो आणि वृद्धेश्वर लेणं गवसल्याचा आनंद मनात साठवत परतीच्या वाटेवर निघालो... 

                
हिंजवडी आयटी पार्कशेजारचं लेणं - माणचा विहार!
हिंजवडी-माणमधल्या ट्रॅफिक आणि खड्डे रस्त्यांवरून जाणे, हा रोजचा ट्रेक अनेकजण करतात. गर्दीच्या या रस्त्याजवळंच एक चक्क जुनं कातळकोरीव लेणं आहे. ते शोधण्यासाठी हिंजवडी फेज १ मधून पिरंगुटच्या रस्त्याने निघालो. 'माण' गाव पार केल्यावर, डावीकडे चांदे-नांदेकडे जाणारा छोटा रस्ता लागला. पिरंगुट रस्ता सोडून आता या रस्त्याने डावीकडे वळलो. उजवीकडे एक छोटी टेकडी आणि त्याचा कातळटप्पा खुणावत होता. 

         
बारकाईने पाहिलं, तर या कातळटप्प्यात रंगवलेली एक जागा आणि गुहा दिसली. या इथेच असणार होता माणचा विहार! (संध्याकाळी उजळत असलेला सौरदिवा ही लेणं ओळखण्याची खूण!) चांदे-नांदेचा रस्ता सोडून, उजवीकडच्या कच्च्या रस्त्याने १०० मी जाऊन गाडी लावली. टेकडी डावीकडे ठेवत, पाच-सात मिनिटं उजवीकडे आडवं चालत गेलो. बाहेरून रंग मारला असल्याने वरच्या काळ्या कातळातला एकांडा विहार लक्ष वेधू लागला. आता लेण्याच्या दिशेने चढत गेलो. गाडी लावल्यापासून १० मिनिटात गुहेपाशी पोहोचलो होतो. नि:संशय कातळात खोदलेला लेणेविहार आमच्यासमोर होता. 

   
लेण्याच्या बाहेर किंचित सपाटी आणि डावीकडे दर्शनी भागातला कातळ तासून काढलेला. माथ्याजवळ दोन-तीन चौकोनी खड्डे, कदाचित कातळाची पोत जोखण्यासाठी खोदलेले. 


५ फूट उंच आणि २ फूट रुंद प्रवेश असलेल्या द्वाराच्या उंबरठ्यातून, दोन छोट्या पायऱ्या उतरून आत प्रवेश केला. कातळात खोदून काढलेला हा ८ फूट लांब, ८ फूट रुंद आणि ८ फूट उंचीचा विहार होता. 


द्वार-पायथ्याची सपाटी-भिंती-छत अशी सगळी खोदाई साध्या दर्जाची होती. खोदीव बाक-धर्मचिन्हे-शिलालेख असं काही नसलं, तरी पायथ्याच्या कातळात खोदलेला सारीपाट लक्षवेधी होता. 


कधी कोण्या साधकासाठी खोदवलेला हा विहार असेल, आज मात्र आयटी पार्कच्या कॉन्क्रीट जंगलात हरपलेला - माणचा विहार!  


बाणेरचं बाणेश्वर लेणं
'आमच्या वेळचं पुणे आता राहिलं नाही', असं ज्यांना वाटतं ते मान्य करतील, की गावातल्या पेठांपलिकडे विस्तार होत पुण्यालगतची कित्येक गावं आता झपाट्याने शहरातली मध्यवर्ती ठिकाणं झाली. जबरदस्त वेगाने विकसित झालेल्या टाऊनशिप्स - व्यावसायिक संधी - छोट्या आणि मध्यम आकाराच्या आयटी कंपन्या यामुळे बाणेरचं असंच काहीसं झालंय. पण, अश्या कोलाहलात अनेकदा आपल्याला माहितीच नसतं, की अश्या गावातही  इतिहासाच्या काही पाऊलखुणा विखुरल्या असतील. 

बाणेरच्या कातळखोदीव लेणी अशीच बरीच वर्षे साद घालत होती. विद्यापीठाकडून बाणेर गावापाशी आल्यावर, बिल्डिंग्जच्या जंगलातून तुकाई देवी मंदिराची टेकडी खुणावू लागली. बाणेरच्या स्वागतकमानीपाशी गाडी लावून, डावीकडच्या हनुमान मंदिरापासून चालत निघालो. इथे कोणालाही 'बाणेर लेणी' कुठे, याची कुठलीच कल्पना नव्हती. मात्र, तुकाई देवी मंदिराची वाट विचारणं सोपं होतं. चिंचोळ्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर, डावीकडे वळलो. घरांच्या बेशिस्त दाटीतून जाणारी चिंचोळी वाट होतीमिनिटाभरात समोर आलं 'श्री बाणेश्वर देवस्थान'! 

       
टेकडीच्या माथ्यावर असलेल्या तुकाई देवी मंदिरापेक्षा पायथ्याच्या लेण्यांचं कवतिक आम्हांला जास्त होतं. बाणेश्वरच्या दर्शनी भागात कातळात खोदलेल्या भिंती होत्या, पण गुहांकडे नेणाऱ्या चिंचोळ्या मार्गाला लोखंडी ग्रील आणि कुलूप लावून बंद केलेलं. हाच लेण्यात प्रवेश करायचा मूळ मार्ग असावा. 

         
ग्रीलमधून डोकावल्यावर इथे लेणी असतीलही असं वाटू लागलेलं. पण प्रवेश बंद असेल की काय, अशी हुरहूर लागलेली. कुतुहलाने उजवीकडच्या पायऱ्या चढून वरच्या कातळावर पोहोचलो. समोर होती उभट दगड रचून उभी केलेली दगडी दीपमाळ, बाजूला चार बाजूंना नंदीबैलमुख खोदलेला कोरीव चौकोनी दगड (शिवलिंग?) आणि बाजूला चक्क एक वीरगळाचा उभट दगड.

       
एव्हाना समोरच्या कातळाच्या पोटात खोदलेली लेणी खुणावू लागलेली. १०-१२ फूट उतरून गेल्यावर कातळछताला आधार देणारे, चौकोनी आकाराचे दोन खांब आणि कातळात खोदलेला सभामंडप दिसू लागला. 

           
लेण्यात डावीकडून प्रवेश करू लागलो. डाव्या बाजूस अनेक वीरगळ (hero stone) काचेच्या शटरमागे रचलेले. वीरगळाच्या उभट कातळाचे तीन भाग करून त्यावर कोरलेल्या प्रतिमा लक्ष वेधत होत्या. वीर झुंजताना, शिवपूजन करताना आणि स्वर्गात जाताना अश्या प्रतिमा वीरगळावर कोरलेल्या. इतके सारे वीरगळ असलेल्या बाणेरला इतिहासात काय घडलं असेल, याबद्दल कुतूहल वाटलं. 

               
बाणेश्वरच्या लेण्यात चौफेर नजर टाकली. आम्ही उभे असलेला मंडप, त्याला आधार देणारे चार चौकोनी खांब आणि समोर ३ कोरीव विहार होते. 

     
मंडप ३० फूट रुंद, ९ फूट उंच, ३५ फूट खोल असा आकाराचा होता. खांब २ जाडी-रुंदीचे. खांबांना अधिक आधार मिळण्यासाठी माथ्याजवळ खांबांची जाडी फूटभर जास्त होती. 

       
समोरच्या विहारांपैकी डावीकडच्या अंधाऱ्या विहारात स्वच्छ पाण्याचे टाके आणि जिवंत झरे झिरपून साठलेले लवणस्तंभ होते. पावसाळ्यात या टाक्याचे पाणी ऊतू जाऊन लेण्यात पसरते आणि पंप लावून उपसावे लागते. 

         
टाके बघून झाल्यावर मधल्या विहाराकडे गेलो. ५ फूट रुंद, ५ फूट खोल आणि ६ फूट उंचीच्या जुन्या लेण्यात बाणेश्वर महादेव शिवलिंगाची स्थापना केलेली दिसली. ही स्थापना गेल्या कदाचित ५०-७० वर्षातली असणार. 

     
सापडणाऱ्या अवघ्या जुन्या लेणी पांडवांनीच अज्ञातवासात खोदल्या अश्या दंतकथा आपल्याकडे सर्वदूर पसरल्या आहेत. त्यामुळे, देवस्थानाच्या बोर्डवर 'प्राचीन पांडवनिर्मित लेणी' अशी नोंद अपेक्षितच होती. माझ्या अंदाजाने लेण्यांची खोदाई इ.स. आठव्या ते दहाव्या शतकातील खोदाई असावी. मंदिराच्या उजवीकडची साध्या खोदाईची गुहा आता देवस्थानाची स्टोअररूम झालेली. बाणेश्वर लेण्यात देवस्थान झाल्याने वीज आली, वावर वाढला आणि स्टील खांबांच्या रांगा लेण्यात उभ्या राहिल्या याबद्दल खंत बाळगायची, की कचरा-दारुडे-प्रेमी युगुलांपासून ही जागा बचावली म्हणायची! बाणेश्वर लेणी बघून मन प्रसन्न झालेलं. बाहेर येऊन माथ्यावरची तुकाई देवी मंदिराची टेकडी चढून गेल्यावर, बाणेरचं काँक्रीट जंगल अंगावर आलं आणि लांब वळसा घेत जाणारी मुळा नदी खुणावत होती. 

               
सपशेल हरवलेले गणेशखिंड (चतु:श्रुंगी) लेणं
... पुणे विद्यापीठ चौकाला जुने लोक याला 'गणेशखिंड' म्हणून ओळखतील. कोणाला आठवेल दुतर्फा घनदाट झाडीच्या कॅनोपीचा गारेगार राजभवन-औंध रस्ता, तर कोणाला भारावून टाकेल इंग्रज अधिकारी रँडचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंचा पराक्रम. कोणाला आठवेल युनिव्हर्सिटीमध्ये मस्त भटकायला जाणे, तर कोणाला आठवेल लहानपणीची चतु:श्रुंगीची मोट्ठी जत्रा! आज मात्र आधुनिकता आणि अशक्य ट्रॅफिकमध्ये हरवलेली ही जागा! 
               
गणेशखिंड आठवण्याचं कारण म्हणजे, इंग्रजांनी १८८५ च्या आसपास प्रकाशित केलेल्या शासकीय गॅझेटीयरमध्ये 'गणेशखिंड लेणी' आणि कोणतेही शिलालेख नसलेल्या साध्या विहारांचा उल्लेख आहे. चतु:श्रुंगी देवीचे देऊळ या 'गणेशखिंड लेणी'त स्थापना झाली असावी, असा माझा कयास आहे. चतु:श्रुंगी देवीची स्थापना मुळातल्या जुन्या लेण्यात असेल का, हे मंदिराच्या सजावटीमुळे जोखणे अशक्य आहे. पुजाऱ्यांना काहीच कल्पना नाही. देवळाजवळ पाण्याचे टाके असल्याची नोंद आहे. चतु:श्रुंगी टेकडीच्या परिसरात नको-त्या गोष्टी बोकाळल्याने, सद्ध्या मंदिराभोवती फार कुंपणे बांधली आहेत. त्यामुळे, पाण्याचे टाके शोधूनही नाही सापडले. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर कातळखोदीव पायऱ्यांची मालिका होती. 

     
देवळापासून दूरवर पसरलेलं पुणे कोवळ्या उन्हांत चमकत होतं. गणेशखिंड लेण्यातच चतु:श्रुंगी देवीची स्थापना झाली याची शक्यता वाटत आहेच, पण तरी हाती अजूनतरी काही न गवसल्याची हुरहूर मनात दाटली आहे... 
                                         
येरवड्याचं तारकेश्वर लेणं
सद्ध्या पुण्याचा जबरदस्त विकास होतोय पूर्वेला. येरवडा, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी आणि पुढे नगर रस्त्यावर मॉल्स, कंपन्या आणि हॉटेल्सची अशक्य गजबज दाटलीये. शहराच्या इतक्या मध्यवर्ती भागात बंडगार्डनच्या पुलाजवळ गर्दी-ट्रॅफिकच्या रस्त्याजवळ चक्क कातळखोदीव लेणी आहेत, यावर विश्वास बसणं खरंच अवघड आहे. एके दिवशी सकाळी मुळा-मुठेवरच्या बंडगार्डन पुलाजवळून नगरच्या दिशेला वळलो. डावीकडचा छोटा डांबरी रस्ता (आणि पायऱ्या मार्ग) येरवड्याच्या टेकडीवर घेऊन निघाला. टेकडीवरच्या तारकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या आवारात पायऱ्या चढून गेलो. मुळातल्या लेण्याभोवती तारकेश्वर मंदिर उभारल्यामुळे अजूनही लेणी कुठं असतील, हे लक्षात येईना. लेण्यासमोरचा सभामंडप आणि माथ्यावर कळस नक्की हल्लीचा. आता तारकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. निम्म्या उंचीपर्यंत मार्बल बसवला असला, तरी उरलेली भिंत आणि छत यामुळे हे मूळचं जुनं लेणं याची खात्री पटली. इतक्या गजबजीच्या येरवड्याच्या परिसरातली ही जागा - लेणे म्हणून अल्पपरिचित असावी, याची गंमत वाटली. मंदिराबाहेर आल्यावर बंडगार्डन परिसरातील पुण्याचं आणि मुळा-मुठेच्या विलोभनीय दृश्यामुळे आणि पुण्यातली अजून एक लेणी गवसल्याने मनात आनंद दाटलेला... 

                   
पुण्यातल्या लेण्यांचा मुकुटमणी - पाताळेश्वर
जे.एम.रोड म्हणजे काय - खादाडी, शॉपिंग आणि हँगआऊट... बस्स इतकंच?! याच जंगली महाराज रस्त्यावर शिवाजीनगरला (पूर्वीचे भांबुर्डे) एक अफलातून लेणं आहे - पाताळेश्वर! 'पुण्यातलं लेणं' म्हटलं, की त्यातल्या त्यात कोणाला आठवेल असं हे लेणं, पण क्वचितच नीट निरखलेलं! एके दिवशी रस्त्यावरच्या कर्कश्य कोलाहलातून वाहत, जंगली महाराज रस्त्यावर पोहोचलो. दत्तसंप्रदायातील योगी सद्गुरू जंगली महाराजांच्या विलक्षण तेज:पुंज समाधीचं दर्शन घेतलं. समाधीच्या परिसरापल्याड डोकावलो. अखंड कातळात कोरलेलं कातळपुष्प - पाताळेश्वर लेणं - खुणावू लागलं! 'पाताळेश्वर' या नावाला साजेसं असं कातळाच्या पोटात खोदलेलं भलंमोठ्ठ पटांगण आणि विशाल लक्षवेधी नंदीमंडप. पायऱ्या उतरून लेण्यांच्या प्रांगणात पोहोचलो. समोर होता थक्क करणारा विशाल गोलाकार नंदीमंडप. 


गोलाकार छत्रीला पेलणारे, बाहेरील परिघातले १२ चौकोनी खांब आणि आतल्या परिघातले चार चौकोनी खांब. 


कोरलेला नंदी, त्यावर खोदलेल्या माळा आणि घंटा. 


लेण्यात शिरण्याआधी डावीकडे दोन स्तंभ खोदलेली खोली आणि पाण्याचे टाके बघितले. 


अस्पष्ट देवनागरी शिलालेख निरखत, आता मुख्य लेण्यात प्रवेश केला. हे शैव ब्राम्हणी/ हिंदू पद्धतीचे, आठव्या शतकात राष्ट्रकुटांच्या राजवटीत खोदवलेलं. 


बौद्ध लेण्यांपेक्षा इथे फरक असा, की बौद्ध लेण्यात पुजण्याचा दागोबा स्तूप आणि सभोवती भिक्षूंच्या निवासासाठी छोटे विहार खोदलेले असतात. पाताळेश्वरचं ब्राम्हणी लेणं मात्र निव्वळ प्रार्थनेसाठी. 


त्यामुळे लेण्यात देखणा सभामंडप, गर्भगृहे आणि मोठ्ठा प्रदक्षिणामार्ग खोदलेला. 


सुरेख तुळतुळीत खोदाईच्या स्तंभांच्या एकापाठोपाठ तीन रांगा, असे २४ स्तंभ आहेत. 


सभामंडपाच्या दोन्ही टोकांना देखावे - भग्नावस्थेत, अर्धवट सोडलेले की फोडून टाकलेले, हे सांगणं अवघड आहे. मुख्य गर्भगृह - गाभारा म्हणजे ३ खोल्या आहेत. बाहेर नंदी आणि १०' X १२' आकाराच्या गर्भगृहात पाताळेश्वराचं शिवलिंग, बाण आणि नागाची प्रतिमा होती. 


डावीकडच्या गर्भगृहात गणपती आणि उजवीकडच्या गर्भगृहात पार्वतीची मूर्ती होती. जवळच राम, सीता आणि लक्ष्मणाच्या संगमरवरी मूर्ती अलिकडच्या काळात स्थापन केलेल्या दिसल्या. महादेवाला प्रदक्षिणा घालावी की नाही यात न अडकता, मोठ्ठ्या आकाराचा प्रदक्षिणामार्ग कुतूहलाने निरखला. 


पाताळेश्वरच्या लेण्यातून बाहेर पडून नंदीमंडपापाशी विसावलो. थंड कातळावर बसून, लेणी खोदवणाऱ्या इंजिनीअरसारखा विचार करू पाहिला. फारशी आधुनिक साधनं-टूल्स नसलेला तो कुठलासा जुना काळ. लेणं खोदण्यासाठी कोण्या भाविकाने-राजाने दान दिलं असेल. त्याच्या मनातली योजना-व्हिजन समजावून घेऊन, बनलेला आराखडा-डिझाईन. ते प्रत्यक्षात कसं आणायचं, याचा एक्झीक्युशन प्लान कोण्या पाथरवटाला समजावून सांगायचं टास्क्स. खोदताना कातळाचा हवा असलेला भाग नेमका ठेवून, बाकी इतर कातळ कातून काढायचाय. बरं, इथे काही एखादी चूक झाली, तर 'अन-डू/ कंट्रोल-झेड' करायची सोय नाही. एक-दोन वर्षे नाही, कित्येक पिढ्या खपल्या असतील हे सगळं बनायला.  पुण्याच्या संस्कृतीचा सर्वात जुना वारसा - पाताळेश्वर लेणं - अनुभवताना भारावून गेलेलो.
                       
गर्दीच्या टेकडीवरचं 'पर्वती लेणे'
नावात 'पर्वत' असलेली एक टेकडी - 'पर्वती'. पण, पुणेकरांच्या मनात पर्वताएवढं स्थान असलेली. फक्त एक टेकडी नाही बरंच काही. पेशव्यांची पर्वती, व्यायामाची, देवदर्शनाचीपर्वती पाचगाव वनविहाराची, भटकायची, हिमालय ट्रेक्सच्या सरावाची पर्वती.. आता प्रेमी युगुलांची, झोपडपट्टीची, हागीणदरीची, कचऱ्याचीही पर्वतीच!     

'पर्वतीटेकडीवर कुठेतरी लेणेटाके आहे', एव्हढ्या माहितीवर निघालेलो. उताराच्या टप्प्यांवर कातळटप्प्यात लेणे असायची शक्यता असल्याने, पर्वतीच्या उतारांवरून प्रदक्षिणा सुरू केली. पायऱ्यांनी निघाल्यावर टेकडीचा पहिला टप्पा गाठल्यावर, पायऱ्या सोडून उजवीकडे उतरंडीवरून निसटत निघालो. झोपडपट्टीच्या विळख्यातून, हागणदरीतून नाक दाबून झपझप पर्वतीच्या तटबंदीकडे तिरकं चढत गेलो. झाडीत हरवलेली विहीर बाजूला ठेवत, साध्या खोदाईचा पाण्याचा उथळ हौद गाठला. 

               
जुनं टाकं असेल, की नाही - अश्या शक्यतांचा विचार करत पुढे निसटलो. पर्वतीच्या दक्षिणेची पेशवेकालीन अप्रतिम तटबंदी आणि झरोके न्याहाळले. 


तुटक्या तटबंदीमधून आता माथ्यावर पोहोचलो. 


पेशव्यांनी बांधलेलं देवदेवेश्वर मंदिर आणि सकाळच्या कोवळ्या उन्हांत उजळलेले, झाडीतून डोकावणारे सुरेख विष्णूमंदिर पाहून सुखावलो. 


लेणी कुठे असेल, याचा अंदाज अजून येईना. विष्णू मंदिरामागून पर्वतीच्या तटबंदीतून परत बाहेर पडत, लेणी शोधत आता दक्षिणेकडून पूर्वेला निघालो. शाहू महाविद्यालयाच्या बाजूच्या उतारावरून आता परत पायऱ्यांच्या बाजूला येऊ लागलो. माथ्याकडे जाणाऱ्या वाटा सोडून आडवं गेलो. आणि, 'ते'' गवसलं. उतरंडीच्या पोटात कातळटप्प्यात खोदलेलं लेणं दृष्टीक्षेपात पडलं. 

मुख्य द्वार ८ फूट उंच आणि ६ फूट रुंद आणि डावीकडे - उजवीकडे ४ फूट लांबी-रुंदीच्या खिडक्या. लेण्याच्या आत डोकावलो. फूटभर खोलीभर पाणी आणि गच्च प्लास्टिक कचरा साचलेला. 


अंदाजे ३० रुंद, १५ फूट उंच आणि ३५ फूट खोल खणत नेलेलं. लेण्याच्या आत चार चौकोनी खांबांनी कातळाचा भार धरलेला. 


प्रत्येक दोन खांबांच्या मागे, लेण्याच्या आत टोकाशी अर्धवर्तुळाकार खोदाई केलेली - अर्धवट सोडलेली. 


अनेकदा पर्वतीला जाऊनही, किंचित आडबाजूला लपल्याने दुर्लक्षित असलेली आणि खूपंच कमी पुणेकरांना माहिती असलेली पर्वती लेणी गवसल्याने आम्ही तुडुंब खूष झालेलो!!!
             
पुण्यातल्या लेण्यांचा अर्थ शोधताना...
पुणे शहराची फुफ्फुसं असलेल्या टेकड्यांवरील ही कातळपुष्पे डोळे भरून पाहिली होती. आज नकाशावर लेण्यांची ठिकाणं मांडली. पुण्याला वेढणाऱ्या टेकड्या आणि पुण्याच्या समृद्ध करणाऱ्या मुळा-मुठा-पवना नद्या डोळ्यात भरल्या. लेण्यांची ठिकाणं नकाशावर बघून, लेण्यांच्या 'स्थाना'बद्दल साक्षात्कार क्षण आला.
१. सगळी लेणी नद्यांपासून जवळ खोदलेली. म्हणजे, मुळा-पवना-मुठेच्या काठाशी पुण्याची संस्कृती विकसत होत जाताना, आपल्या पूर्वजांनी नदीच्या जवळच्या टेकडयांमध्ये ही लेणी खोदलेली.
२. पूर्वीची बंदरे नागोठणे-चौल-रेवदंडा पासून ताम्हिणी-सावळ-सवाष्णी-वाघजाई घाटाच्या मार्गे पुण्याकडे येणाऱ्या जुन्या वाहत्या मार्गावर लेणी खोदलेली.
अजून कुठे लेणी दडलीयेत पुण्याच्या टेकड्यांवर कोणास ठावूक!

दुसरा अंदाज बांधला लेणी 'कधी' खोदली असतील याचा...
पुण्याचा ज्ञात इतिहास सातवाहन काळापासूनचा - २००० वर्षांचा. जुन्या काळातली सामान्य साधने (टूल्स) वापरून अथक परिश्रमांनी ही लेणी कधी-कोणी-का खोदवली, याबद्दल काहीच माहिती नाही. पाताळेश्वर आणि बाणेश्वर ही स्पष्टपणे ब्राम्हणी-हिंदू शैलीतली, म्हणजे कदाचित ८-१० शतकातली. पण, बाकी लेण्यांमध्ये खोदाई धर्माच्या खुणा नाहीत, त्यामुळे अजून जुनी असू शकतील - कदाचित. पंचेंद्रियांच्या कुवतीपलिकडचं मानवी आयुष्याचं कोडं सोडवण्याच्या ध्यासाने ध्यानस्थ होण्यासाठी कोण्या साधकांसाठी खोदली असतील? कोण्या धनिकाच्या किंवा राजाश्रयाने ही लेणी खोदलेली? अलिकडच्या काळात मात्र तिथे हिंदू देवतांची स्थापना झालेली.

एक गोष्ट मात्र प्रकर्षाने खटकली. या लेणी पुण्यातला वारसा आहे, इथल्या मातीत रुजलेल्या संस्कृतीच्या पूर्वजांच्या पाऊलखुणा आहेत. तिथला आज दारुडे आणि प्रेमवीरांच्या हक्काच्या जागा झाल्यात. तथाकथित विकासाच्या उद्रेकामध्ये आणि गुंठामंत्रांच्या भस्म्या रोगापायी ही कातळपुष्पे कोमेजून जाताहेत. गर्दीत, वस्त्यांमध्ये, कचऱ्यामध्ये, हागणदरीत, बिल्डिंग्जमध्ये, धूरामध्ये हरवून चाललीयेत...

... वीकएण्डला घरी लोळत पडण्यापेक्षा, 'उनाडक्या' करत ऐन पुणे शहरात असलेल्या अल्पपरिचित कातळकोरीव लेण्यांची ओळख झालेली. आम्ही काही आर्किओलॉजिस्ट/ इंडॉलॉजिस्ट नाही. आम्ही काही नवं शोधलं असा दावा तर मुळीच नाही. पण, विस्मृतीच्या उदरी हरवलेला, आपल्या पुण्याच्या संस्कृतीचा वारसा अनुभवतानाचा शुद्ध आनंद आम्ही लुटला होता. पुलं म्हणतात तसं - 'पुण्याचा जाज्ज्वल्य अभिमान वाटावा', अश्या कारणांमध्ये अजून एका कारणाची भर पडलेली... 


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, साकेत गुडी, अमेय जोशी, फारूक सुतार, जितेंद्र बंकापुरे, दिलीप गपचूप, निनाद बारटक्के
२. छायाचित्रे: निनाद बारटक्के, साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
           
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.


15 comments:

  1. Sai: Awesome. This is going to be a big eye opener for those who live in Pune, but have never tried seeing anything nearby. Good Job ..!

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much, Ameya! Right, the intent is to make our folks aware of these hidden forgotten historical places in Pune city..
      I hope, a few people visit these caves now..

      Delete
  2. Nice blog Sai. Thanks for sharing great source of information. I have been to Baneshwar caves once for tree plantation activity but never visited other caves. Now will visit them.

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad Vinit!
      Yes, please do visit the caves. Let me know, of I can be of any help... You'll like then all..

      Delete
  3. Sai - As usual very well documented...!

    ReplyDelete
  4. Congratulations and thanks for such a nice documentation !!

    ReplyDelete
  5. झकास वृत्तांत... अमेय ने म्हटल्याप्रमाणे पुण्यातल्या लेण्यांविषयी अभ्यासू वृत्तीने भटकून ब्लॉग लिहिलास... त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच...
    पुण्यात राहून सुद्धा बऱ्याच लोकांना ह्या ऐतिहासिक खजिन्याबद्दल फारशी कल्पना नाही...
    तुझ्या ब्लॉगद्वारे हा एक आय ओपनर मिळाला आहे...
    वाचून मजा आली... बढिया

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दत्तू! ☺️👍
      खरंय, पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागात चक्क कातळकोरीव लेणी असूनही ती लोकांना माहित नाहीयेत.
      तू लिहिल्याप्रमाणे, ही माहिती वाचून काही उत्साही लोकांनी या लेण्यांना भेट दिली, तर ब्लॉग लेखनाचे प्रयत्न सार्थकी लागतील..

      Delete
  6. अतिशय मस्त लेख...या लेखामुळे विस्म्रुतित गेलेल्या लेण्यांकडे परत लोकांचे लक्ष वळेल..पुण्याच्या आजुबाजुंच्या टेकड्यांवर जुनी मंदिरे आहेत..जसे की चांदणी चौकाच्या मागच्या टेकडिवरचे किंवा भूगावच्या टेकडिवरचे खंडोबाची देवळे... अशा देवळांवरपण एक मस्त शोधमोहिम होउ शकेल...

    ReplyDelete
    Replies
    1. Bhushex,
      छान वाटलं प्रतिक्रिया वाचून..👍👌☺️
      खरंय, पुण्यातल्या टेकड्या आणि राऊळे हा असाच अजून एक दुर्लक्षित विषय.. बघुयात, कधी मुहूर्त लागतोय...
      धन्यवाद!👍👌☺️

      Delete
  7. Replies
    1. खूप धन्यवाद मित्रा! :)

      Delete
  8. Useful article, thank you for sharing the article!!!

    Website: blogcothebanchuabiet.com chia sẻ những câu nói mỉa mai người khác hay stt một mình vẫn ổn và giải thích hiện tượng chim sẻ bay vào nhà là điềm gì.

    ReplyDelete