Pages

Saturday, 27 January 2018

~दुर्ग~दुर्घट~भारी~


दुर्घटपण खऱ्या अर्थाने सर्वांगसुंदर ट्रेक..
थरारक, पण अप्रतिम स्थापत्याने नटलेलं दुर्गत्रिकुट..
खडतर, पण जबरदस्त टीममुळे झालेली अविस्मरणीय दुर्ग-डोंगरयात्रा..
एरवी गजबजलेला, पण टुरिष्टांचा कुंभमेळा टाळून अग्गदी फुरसतसे केलेली सं-पू-र्ण परिक्रमा..
सह्याद्री ट्रेकिंगमधला मानदंड असलेल्या अलंग - मदन - कुलंग (उर्फ AMK) आणि बोनस मिळालेल्या ‘छोटा कुलंग’(CK) शिखराच्या ट्रेकचं हे वर्णन!
खत्तरनाक ट्रेक.. खरोखरच, ~दुर्ग~दुर्घट~भारी~!!!
------------------
WARNING:: हा ट्रेक अतिशय खडतर असून, घसारा आणि दृष्टीभय असलेल्या जागी कातळारोहण असल्याने - कठीण श्रेणीचा आहे. पुरेश्या अनुभवाशिवाय, साधनांशिवाय आणि दणकट टीमशिवाय अजिबात प्रयत्न करु नये.
          
... ओढ्यातले अजस्त्र धोंडे - काटेरी झुडूपं – निसरडे कातळ आणि उन्हाचा तडाखा सहन करत, पाठीवरची भलीमोठ्ठी सॅक खेचून घेताना शिणलोय. पोहोचलोय ट्रेकच्या सर्वात धोकादायक टप्प्यांवर...
... काळ्याकभिन्न कातळातल्या एकापाठोपाठ एक अश्या उंचउभ्या – अरुंद - तिरक्या पायऱ्या चढतोय. नेमकं वळणावरचा डावीकडचा कातून काढलेला कातळ सपशेल झुकलाय, थेट अंगावर येतोय. अरुंद तिरक्या पायरीवरचा चुकार दगड धक्का लागून, उजवीकडच्या खोSSल दरीझाडीत गरगर-गरगरत सुसाटलाय. धस्स होतंय...
... बेसॉल्टच्या अ-ज-स्त्र काळ्या कातळकड्याच्या पोटातून जाताना, समोरच्या सुळक्यावर स्थिर राहून घिरट्या घालणाऱ्या गिधाडांच्या जोडीला काय नजारा दिसत असेल, असं वाटून हेवा वाटतोय.
... कातळकड्यांमधून नजाकतीने खोदलेल्या पायऱ्यांचं कवतिक करत असतानाच, मोक्याच्या टप्प्यांवर इंग्रजांनी सुरुंग लावून गड निकामी केलेला बघून हळहळतोय...
... तिरक्या कातळ-घसाऱ्यावरून बुटांच्या घर्षणाच्या आधारावर तोल सांभाळत जातोय. जेमतेम पाऊल मावेल अश्या पुसट घसरड्या कातळ-पावठीवरून जाताना, कपारीतली घुबडांची जोडी खुणावतीये...
... कातळकड्यावरची थरारक चढाई करताना सुरक्षादोराच्या बिलेचा आधार आहे, पण कातळाला बिलगून पुढच्या होल्ड्सची चाचपणी करताना कोणीतरी अडखळतोय. पण, अश्या अडचणीच्या ठिकाणी दिग्गज ट्रेकर टीमची मोलाची साथ मिळतीये...
... धुंदी होती दुर्घट कातळारोहणाची, अफलातून दुर्गस्थापत्य समजावून घ्यायची आणि जबरदस्त भारी टीमसोबत दणकट अश्या AMK(+CK) ट्रेकची!!!

ट्रेकमार्गाची कल्पना यावी, म्हणून हे रेखाटन...

.. १९९३ला पाळंदेकाकांचं ‘डोंगरयात्रा’ पुस्तक हाती आल्यापासून ध्यास लागलेला हा ट्रेक – AMK!
.. प्रत्येक सह्याद्रीप्रेमी ट्रेकरच्या यादीतला (करायचाच आहे किंवा केलेल्यातला उत्कृष्ठ), असा ट्रेक – AMK!
.. इतिहासाच्या पानांमध्ये प्रवरा-दारणा खोऱ्यांवर अधिराज्य करणाऱ्या दुर्गांचा ट्रेक – AMK!
.. अवघड कातळारोहणामुळे सहजसाध्य नसलेला ट्रेक – AMK!
.. कमर्शिअल ग्रुप्ससोबत ट्रेकला जाण्याचं वावडं असल्याने आणि ढाबळ जनतेच्या कुंभमेळ्याची दहशत असल्याने, माझा कित्येक वर्षे राहून गेलेला आणि हुरहूर लावणारा ट्रेक – AMKचा!!!

साद अलंग-मदन-कुलंगची...
गुरुवर्य ढमढेरेकाकांचे अमेरिकेतले मित्र आनंदकाका यांनी AMKचा विशेष ध्यास घेतलेला. त्यांच्यासोबत AMKची हुरहूर लागलेल्या आम्हां दो-चौघांना संधी मिळालेली. सह्याद्री कातळावर विलक्षण प्रेम करणाऱ्या अनुपकाकांकडे आणि ढमढेरेकाकांकडे कातळारोहणाचं नेतृत्व असल्याने, आम्ही निर्धास्त झालेलो. ६ ट्रेकर्स. ४ दिवसांच्या ट्रेकचा बोजा-शिधा-कातळारोहण साहित्य. त्यामुळे सॅक्स अवाढव्य झालेल्या. गाडीवर सॅक्स बांधतानाच लक्षात आलेलं, की लssय जास्त सामान झालंय. शेल डिझलचे गोमुत्र शिंपडून मोहिमेचा श्रीगणेशा केला. पहाटे चारला पुण्यातून एक वावटळ (सफरी स्टॉर्म) नाशिकरस्त्याने उधळलं आणि गाडीवर बांधलेल्या सामानाचा ताशा ताडताड वाजू लागलेला. नारायणगावचं मसाला दूध आणि कोतूळच्या पवारांकडे दोन प्लेट पोहे-वडा असे नेहेमीचे थांबे घेत, पुढे आभाळात घुसलेल्या पाबरगडाला रामराम करत प्रवरा खोऱ्यातल्या भंडारदरा गावात पोहोचलो. AMK ट्रेक करण्यासाठी ट्रेकर्स उत्तरेकडील आंबेवाडीकडून किंवा दक्षिणेकडील उडदावणे किंवा घाटघर गावातून सुरुवात करतात. आम्ही घाटघर बाजूने ट्रेकरूट आखलेला. घाटघर रस्त्याने निघालो, अन मोबाईलमधला 4G डेटासिग्नल जाऊन नुसतंच G दिसू लागलं (म्हणजे आता ‘G-ग्रामीण मोड’ सुरु झाला, अशी कोटी मारण्यात आली.) प्रवरा नदी अडवणाऱ्या अजस्त्र विल्सन जलाशयाच्या भोवती कोवळ्या उन्हांत एकसे बढकर एक शिखरांनी फेर धरलेला. दक्षिणेला सुरुवात केल्यावर पाबरगड – घनचक्कर – गवळदेव – कात्रा – मुडा अशी डोंगरभिंत, नैऋत्येला निळ्या पाण्यापल्याड देखणा रतनगड आणि खुट्टा सुळका, पश्चिमेला शिपनुर डोंगर. अलंगच्या डोंगरगर्दीपलिकडे AMK रांग लपलेली, तर वायव्येला अलंगकिल्ल्याचा साथीदार किर्डा, साकिरा आणि आभाळात हरवलेलं कळसुबाई शिखर!

अssय वत्सला’ असा रस्त्यात आडव्या आलेल्या गायीला हाकारा टाकत, कळसुबाई रांगेतल्या साकिरा-किर्डा शिखरांच्या कुशीतला नागमोडी रस्ता सुरु झाला. धरणाच्या पाण्याच्या बाजूने निवांत वळसे घेत, आता समोर अप्पर घाटघर धरण दिसू लागलं. शांत निळ्याशार पाण्याच्या पोटात दडलेली धरण बनण्याच्या कष्टांची गोष्ट ऐकली. गेली कित्येक वर्षे रेंगाळलेल्या घाटघर उदंचन प्रकल्पाच्या कामात आलेल्या असंख्य अडचणी – वनजमिनीचा वादंग, विस्थापितांचा संघर्ष, अतिवृष्टीतल्या अपघातात १४ मजुरांचं बलिदान-मृत्यू, गाळात रुतलेली यंत्रसामग्री अश्या असंख्य अडचणींचे अडथळे पार करत, अभियांत्रिकी कौशल्याने या प्रकल्पाला पूर्णत्वास नेलेलं. घाटमाथ्यावरचं पाणी अप्पर घाटघर धरण विजेच्या मागणीनुसार कोकणातल्या लोअर घाटघर धरणात नेऊन विद्युतनिर्मिती केली जाते. वीजमागणी घटली, तर कोकणातून पाणी परत घाटमाथ्यावरच्या धरणात पंपअप केलं जातं.
       
धरणाच्या पाण्यात मंद वाऱ्यासोबत हलक्या लाटा, डुबुक-डुबुक आवाज, पाण्यात विखुरलेले झाडांचे बोडके बुंधे आणि पाठीमागे प्रथमच दर्शन झालेलं अलंग-मदन-कुलंग रांगेचं. ज्या ट्रेकची इतकी वाट पाहिलेली, ती डोंगररांग समोर पाहून भारावून गेलेलो. डावीकडे कुलंग, मध्ये काही सुळके-लिंगी आणि मदनगड तर उजवीकडे अजस्त्र अलंगगड! पाण्यापासून ट्रेकरूटचा आवाका जोखताना, काकांनी तर या किल्ल्यांचं वर्णन केलं - ‘हे तर असुरदुर्ग’! एकसेबढकर एक असुर!

घाटघर गावात पोहोचल्यावर, चार दिवसाच्या ट्रेक शिधा-खाऊ-इक्विपमेंट वाटप करून, अतिरिक्त सामानाचे बोजे कमी करून ट्रेकसुरुवातीची 'गणपती-बाप्पा-मोरया' घोषणा द्यायला अंमळ उशिरच झाला. सकाळचे ११:३०.
          
अफाट दुर्गस्थापत्याचा आणि कातळकड्यांचा अलंगगड:
- उंची: १४७९ मीटर
- उत्तर पायथ्याची गावे: कुलंगवाडी आणि आंबेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक
- दक्षिण पायथ्याची गावे: घाटघर आणि उडदावणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
- स्थानवैशिष्ट्य: उत्तरेला दारणा आणि दक्षिणेला प्रवरा खोऱ्यांवर लक्ष ठेवणारे कळसुबाई रांगेतले अत्यंत दुर्गम-देखणे-पुरातन दुर्ग
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: विपुल दुर्गस्थापत्य, शिलालेख, लेणी, मराठ्यांच्या उत्तर राजवटीत पेशवेकाळापर्यंत राबता
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे
- निवारा: माथ्यावरचे गुहालेणे ४० – ५० ट्रेकर्ससाठी
- चाल (घाटघरपासून): ७ किमी
- चढाई: ६०० मी
- वेळ: ६ तास (विश्रांतीसह)
- वाटाड्या: आम्ही घेतला नव्हता. वाटा शोधण्यास मदत हवी असल्यास, वाटाड्या घ्यायला हरकत नाही.
- वाटेतल्या ठळक खुणा:
पाठीवर दणकट सॅक्स चढवून, घाटघरमधून ईशान्येला कूच केलं. कधी शेताडीतून, कधी विखुरलेल्या वाड्यांमधल्या गावकऱ्यांना रामराम करत, कधी गवताळ माळांवरून तर कधी करवंदीच्या जाळ्यांमधून मोहक फुलांचा सुवास घेत वाटचाल करत निघालो. कुठे शेताडीत राब जाळण्यासाठी पाचोळा विखरून ठेवलेला, तर कुठे रब्बी हंगामातला कांदा-लसूण लावलेला. किंचित उंच टेपावर आलो आणि प्रथमच AMKचा संपूर्ण पॅनोरमा समोर आला. पायथ्याच्या झाडीच्या टप्प्यांपासून पदरातलं रान आणि त्यावर उसळलेले बेलाग कातळ-सुळके. पहिल्या दिवशीचं गंतव्य होतं – अलंगगडाची चढाई करून मुक्काम!

प्रवरेच्या एका स्त्रोताचं पाणी खडकाळ पात्रात रेंगाळलेलं. अलंगचा अफाट विस्तार आहे घोड्याच्या नालासारखा.

अलंगच्या दक्षिण टोकापासून एक दांड खाली उतरलेला. त्याच्यावरून चढाई करून पदरातल्या जंगलात पोहोचणे, हा पहिला महत्त्वाचा टप्पा.

थोडक्या झाडीमधून चढाई झाली अन मग उघड्याबोडक्या दांडावरची उभी घसाऱ्याची चढाई सुरु झाली. ट्रेकचा पहिला दिवस जागरण-प्रवासाचा शीण असल्याने नेहेमीच जड जातो. इथे तर चार दिवसांच्या ट्रेकचं वझं पाठीवर. त्यामुळे चांगलंच घामटं निघालं. 

अलंगच्या कड्यांचं दर्शन घेत, वाळलेल्या गवतावरून घसाऱ्यावरून धस्सफस्स करत पहिल्या टेपावर पोहोचलो. वेळ दुपारचे १.

दांडावरून चढाईचा दुसरा टप्पा चढला, की गडाच्या पदराच्या सपाटीत पोहोचणार होतो. पहिल्या टप्प्यात उभ्या चढाने दमवलं खरं, पण दुसऱ्या टप्प्यात मात्र दाट झाडीतली मंद चढाची वाट सुखावून गेली. झाडी मोकळी झाली आणि पुनश्च कुलंग-मदन-अलंगच्या खोऱ्याचे सुंदर दर्शन झाले. आता मदन आणि अलंगचे पश्चिम टोक एकमेकात गुंफले गेले होते, हरवले होते.

दुसरा टप्पा संपण्याआधी थोडका कातळ, त्यात खोदलेल्या पुसट पावठ्या आणि माथ्यावर किंचित दो-चार घडीव दगड. ढमढेरेकाकांच्या मते हे गडाचं पहिलं पहाऱ्याचं ठिकाण – म्हणजेच मेट - असू शकेल. वेळ १:३०. 

दुसऱ्या टप्प्याची चढाई संपून पठारावर आलो. पोटातल्या कावळ्यांना घरून आणलेला डबा खुणावत होता. पोळीभाजी-पराठे-दहीसोबत झाडाच्या सावलीत गप्पाष्टक रंगलं. थंडगार रुचकर ताकाचा आस्वाद घेऊन पोटोबा तृप्त झाले. वेळ २:१५. 

मोकळवनात आहे महत्त्वाचा वाटचौक. आम्ही आलो ती घाटघरची वाट, उजवीकडून दक्षिणेकडून आलेली उडदावणे गावातून आलेली वाट. समोर उत्तरेला अलंग-मदनच्या खिंडीतून कुलंगकडे जाणारी वाट; तर उजवीकडे ईशान्येला अलंगची वाट. एखादी फुटकळ दगडी लगोर सोडली, तर बाकी खुणा नाहीत. त्यामुळे इथे वाटांचा भूगोल पक्का हवा.

दाट झाडीच्या टप्प्यांमधून किंचित चढणारी आणि अलंगच्या कुशीत नेणारी आडवी वाट होती. अलंगच्या समोरच्या धारेला बिलगलेला सुळका जाणवत होता.

गर्द झाडीमागून अलंगचे बेलाग कडे उन्हांत उजळलेले दिसत होते. काकांनी बजावलं होतं, की आपल्याला लवकरच ही आडवी मळलेली वाट सोडून उजवीकडे अलंगकडे जाणारी वाट घ्यायचीये.

(वाट शोधायची खुण अशी सांगतात, की अलंगच्या दक्षिण टोकापासच्या (उजवी बाजू) सुळक्यापासून घरंगळलेल्या बारीक घळी उर्दू वाचन दिशेने मोजल्या, तर तिसऱ्या घळीतून अलंगची वाट चढते.)

आडवी वाट मस्त मळलेली. छोटा ओढा पार करून, धम्माल झाडीतून वळणांवळणांची वाट होती. त्यामुळे, मिलिंद आणि मी सुसाटलो होतो. अलंग वाटफाटा शोधायचा, हे डोक्यात होतंच. इतक्यात, मागून काकांचे हाकारे आले आणि लक्षात आलं की आपला अलंगचा फाटा मागेच सुटला. पाचेक मिनिटांचं रीवर्क करून पुन्हा एकदा टीमला येऊन मिळालो. झालेलं असं, की त्या आडव्या वाटेवरच्या ओहोळामधून अलंगकडे चढत जायचं होतं. हा फाटा कोणत्याही खुणा नसल्याने समजणे अवघड. अलंगचा चकवा, अजून काय! वेळ २:४५.

ओढ्याच्या पात्रात दगडाची लगोर आणि बाण आखून अलंगच्या ओढ्यातली वाटचाल सुरु केली. खळग्यातलं थंडगोड पाणी पिऊन तरतरी आली. हे पाणी फेब्रुवारीपर्यंत टिकत असावं.

ओढ्याच्या पात्रातून वाटचाल अडचणीची होती. काटेरी झुडुपांची दाटी-धोंडे-कातळ-रेतीमधून उभी चढाई करत धाप लागली.

अलंगच्या कातळकड्यानजीक आलो, अन ओढ्यातल्या दगड-धोंड्यांचा खच आटोक्यात आला. कातळावर नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या खोदीव पावठ्या आणि पायऱ्या सुरु झाल्या. 

तरीही, बहुतांशी निसरडे कातळ, भूसभूशीत गांडूळमाती-घसारा आणि अरुंद अशी दमवणारी वाट. अलंगच्या चढाईतला महत्त्वाचा टप्पा आम्ही गाठणार होतो.

पूर्वी इथे एक कातळारोहण टप्प्याचं कोडं सोडवावं लागे. बेचक्यात अडकवलेल्या लाकडी ओंडका/मोळी/वेलाच्या आधारे चढावे लागे. पण आता मात्र लोखंडी शिडीची सोय झाली आहे. चढाईपूर्वी हक्काची विश्रांती घेऊन, रुचकर हेल्दी सरबत पिऊन टीम तरतरीत झाली.

अलंगच्या कड्याला शिडी असली, तरी पाठीवरची सॅक घेऊन सावकाश काळजीपूर्वक चढाई केली. 

तब्बल पाच तासांच्या चढाईनंतर, उंचच उंच पायऱ्या चढत अलंगच्या गणेशद्वारापाशी पोहोचलो. उन्हं कलायला लागलेली. भर्राट वारं खात आसमंत न्याहाळताना झक्क वाटलं. वेळ ४:३०.

द्वाराची रचना, गणेशप्रतिमा, कमानाकार दगड, दगडांची कटाई.. असं सग्गळ थक्क होऊन पाहिलं.

गणेशदरवाजा दगड चिणून बुजवलंय. कधीकाळी आणि का कोणास ठावूक!

(कोणी गटाने इथे संवर्धनकार्य ठरवलं, तरी अशक्य मोट्ठे दगड आणि माती भरल्याने हे द्वार मोकळं करणं अतिअवघड काम वाटतं.)

द्वाराच्या उजवीकडच्या दरडीवरून पुढची चढाई होती. आधार-होल्ड पकडून सॅकसह स्वत:ला कसंबसं खेचून कातळावरचा वळसा घातला. सह्याद्रीतल्या काळ्याकभिन्न कातळावर प्रेम करणाऱ्या गुणग्राहक पूर्वजांचं स्मरण करत दरड चढून गेलो.

माथ्यावर पोहोचल्यावर समोर होतं – कातळात खोदलेलं पहाऱ्याचं मेट. आत काहीच नाही.

मेटाच्या वर उंबराच्या झाडापाशी पाण्याचं टाकं आहे. पाणी नसलं, तर मातीपाशी ओलावा होता. गणेशद्वारापासचं मेट आणि पाण्याचे टाके पाहता, इथे राबता पहारा असावा असं वाटलं.

गणेशद्वारापासून गडाची मुक्कामाची गुहा पाऊण तास अंतरावर आहे. 

नि:संशय पुरातन वाट! कातळात खोदून काढलेली. कधी पायऱ्या, तर कधी कातळखोदीव मार्ग.

अलंगच्या कातळमाथ्याच्या पोटातून साधारणत: आडवी वाट.

आडवी जाणारी ही वाट केवळ अप्रतिम! एकीकडे भव्य कातळकड्याने छाती दडपते; तर डावीकडची दरी खोssलवर खुणावते. वाट काळजीपूर्वक पार पाडायची असली, पण अवघड कुठेच नाही.

लेण्याच्या पायथ्याशी असलेले घडीव दगड आणि खळगे बघता, इथे एखादी पहारा-दिंडी असावी असं वाटलं.

उजवीकडे कातळात वर खांब सोडून खोदलेले लेणे लक्ष वेधतं.

पाठीमागे वळून बघितल्यावर ट्रेकच्या सुरुवातीपासून - अप्पर घाटघर जलाशयापासून - किती लांबचा पल्ला गाठला, हे जाणवलं.

अखेरीस, मुक्कामाच्या गुहांपर्यंत पोहोचलेलो. इथे दोन मोठ्ठ्या गुहा आहेत. वेळ ५:३०. म्हणजे, घाटघरपासून गडाचा माथा गाठायला (विश्रांतीसह) ६ तास लागलेले. 

डावीकडची गुहा पायऱ्या चढून गेलो. दगडधोंड्यांनी भरलेली. गडावर गर्दी असेल, तर एखादा छोटा ग्रुप राहू शकेल. 

मुक्कामाला त्यातल्या त्यात उजवीकडची गुहा बरी. गुहेत आत डावीकडच्या बाजूला मुक्कामाला जरा बरी जागा. समोर आणि उजवीकडे दालने आहेत. ४०-५० ट्रेकर्स राहू शकतील. गुहेत बारीक रेती असल्याने, मुक्कामास कॅरीमॅट हवे. गुहेतल्या उंदरांपासून सॅक्सचा बचाव करणं आवश्यक. गुहेच्या बाहेर पाण्याचं टाकं आणि गणेशपट्टी आहे, पण पाणी पिण्यालायक नाही. सूर्यास्ताआधी पठारावरच्या टाक्यातून पाणी आणलं. पाणी नितळ स्वच्छ नव्हते, पण वेळ साजरी झाली. (अलंगच्या माथ्याकडून ११ पाण्याच्या टाकीसमूहात जास्त चांगले पाणी आहे.)
             
सूर्य पश्चिमेला कललेला. गुहेबाहेर झक्क आलेयुक्त चहाचे घोट घेत आभाळातली रंगपंचमी न्याहाळत बसलो. हलकेच अंधाराची दुलई पांघरून AMK विसावत होते. त्या दिवशी A-M-K माथ्यांवर फक्त आम्हीच मुक्कामाला होतो. दिवसभर रानातून-कातळावरून भटकलेल्या दमलेल्या ट्रेकर्सना गर्र्म सूप आणि जेवणाने तरतरी आली. हवेत हलका गारवा. दूरवर खोऱ्यात शेताडीचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांचे लुकलुकणारे टॉर्च आणि क्वचित आभाळात सुसाटलेली विमानं सोडली; तर आधुनिक जगापासून कितीतरी दूर पोहोचलेलो. काकांनी बासरीवर सूर आळवायला सुरुवात केली. AMKच्या ट्रेकच्या पहिल्या दिवसाची सांगता करायला, सुरेल प्रसन्न साथ होती हृदयनाथ - आर.डी. - किशोरच्या गीतांची. रातकिड्यांच्या किरर्ररर्र आवाजाला छेडणारी गीते हवेत घुमू लागली. ‘असा बेभान हा वारा’... ‘पल पल दिल के पास..’.. ‘खिलते है गुल यहां’.... दाद द्यायला होते दर्दी रसिक ट्रेकर्स. क्वचित एखादी तेजाळत लुप्त होणारी उल्का! AMKसारखी दुर्लभ इच्छा पूर्ण होत असताना, आभाळातल्या उल्केकडे वेगळी काही मागायची गरजच नव्हती...

अफाट दुर्गस्थापत्याचा अलंग

... सुरेख साखरझोपेतून जाग आली. अलंग मुक्कामी आपण आहोत, या भावनेनेच किती फ्रेश वाटलं.  काकांनी चहाचं आधण ठेवलेलं. त्यांना ’१० मिनिटात फोटू काढून येतो’ असं सांगून सुसाटलो. (प्रत्यक्षात अलंगच्या दुर्गस्थापत्यामध्ये तब्बल २ तास रमलो-हरवून गेलो. शेवटी, काळजीने हाकारे मारत काका आम्हांला शोधत निघालेले...)

गुहेतून बाहेर आल्यावर डावीकडून खोदीव पायऱ्या आणि एक ध्वस्थ गुहा मागे टाकत माथ्याकडे निघालो. थोडकी रचलेल्या दगडांची तटबंदी आणि दुर्गस्थापत्य बघत तांबडफुटी व्हायच्या माथ्यापाशी पोहोचलो. अलंगचा पूर्वेचा सवंगडी किर्डा डोंगर अजस्त्र दिसत होता. पाठीमागे कळसुबाई क्रमांक २ शिखर डोकावू लागलेले.

एक गिधाडांची जोडी किर्डा-अलंगच्या दुर्घट कड्या-सुळक्यांमधून आभाळात फिरत होती. 

आभाळात एव्हाना सूर्योदयाची उत्सुकता दाटलेली. एके क्षणी कुठलाही गाजावाजा करत, “पूरबसे सूर्य उगा, फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा...”

पल्याड मदन आणि कुलंगला आता सोनेरी किरणं उजळवू लागलेली. 

अलंगच्या माथ्याच्या टेकडीवरून परत मुक्कामाच्या गुहेकडे जातानाच, गडफेरी पूर्ण होणार याचा अंदाज आलेल. माथ्याकडून डावीकडे-पश्चिमेकडे उतरत गेल्यावर पाण्याचे कातळाच्या पोटात खोदत नेलेले खांब टाके आणि कातळात खोदलेले पुसटसे शिवलिंग दिसले.

 माथ्याच्या टेकडीच्या पोटात उत्तरेला गुहा खुणावत होती. माथ्यावरून वाहणारे पाणी थेट गुहेत पडू नये म्हणून माथ्याजवळ खोदलेली पन्हळ, गुहेतली पाण्याची ३ टाकी, भग्न शिवपिंड आणि गुहेबाहेरची शेंदूरचर्चित देवता आणि घडीव दगड (समई/ दीपमाळ?) न्याहाळली.


उत्तरेकडे कातळसपाटीवर काही कोरडी, काही पाण्याने भरलेली टाकी आणि चौकोनी शिवलिंग.

एका झुडूपाखाली घडीव दगड रचलेलं भग्न शिवमंदिर आणि परिसरात विखुरलेल्या समाधी-स्मारकाच्या शिळा. आपल्याकडच्या दुर्ग-किल्ल्यांवर दुर्मिळ असा शिलालेख असल्याने, हे ठिकाण विशेष मोलाचे. शिलालेख राजस्थानी शैलीत आहे. शिलालेखाचे वाचन असे:
श्री सदाशिव सहश
श्री दीवानवीर साहीप
किल्लेदार अलंग, प्रौरुतराप माणसिंघ भदोरिआ
तानी अर्धांगी
श्रीदेशरुवरी सहगौन सईति न पाईग
याचा अर्थ किल्लेदार मानसिंग भदोरिआ याच्या मृत्युनंतर त्याची पत्नी येथे सती गेली.
(संदर्भ पुस्तक: शिलालेखांच्या विश्वात - महेश तेंडूलकर. शिलालेख फोटो: अजय देशपांडे)
किल्लेदार मानसिंग भदोरिआ व त्याची पत्नी यांच्या स्मृतीत हे शिवमंदिर बांधले असावे. खरंच, काय काय चांगलं-वाईट बघितलंय या गडपुरुषाने!

सतीस्मारक संवर्धन आणि जवळच्या पाण्याच्या टाक्यांच्या सफाईसाठी पुणे व्हेंचरर्सच्या ट्रेकर्सनी १९८५ आणि १९८९ मध्ये श्रमदान केलेलं. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता वाटली.

पल्याड, रेखीव बांधकामाची वाड्याची वास्तू आता खुणावत होती. वाड्याजवळ पाण्याची तीन रेखीव टाकी. दगडी चिऱ्याच्या खोदाईचा दर्जा बघता, ही गडाच्या किल्लेदाराची वास्तू असणार. दगडी चिरे, छताच्या कौलांची खापरे आणि मातीच्या कुठल्याश्या सुबक वस्तूंचे तुकडे – ही सारी म्हणजे उत्तर-मराठा राजवटीत हा दुर्ग वापरात असल्याची लक्षणे. सत्ता-महत्त्वाकांक्षा-यश-अपयश-आसु-हसू अनुभवलेली ही वास्तू आज कोलमडलीये. उध्वस्थ भिंतींमधून आजमितीस वाहतोय फक्त वादळ-वारा-पाऊस आणि तळपतं कडकडीत ऊन! कालाय तस्मै नम:!

माथ्याकडून उतरत गेल्यावर लवळात एखाद्या धरणासारखा बांध घातलेला. आणि उलगडली अत्यंत रेखीव आणि अवाढव्य अशी ११ पाण्यांच्या टाक्यांची नक्षी. तसं म्हटलं, तर ही गडावरच्या स्थापत्यासाठी लागणाऱ्या दगडासाठीची खाण आणि पाण्याची सोय. परंतु, या पाण्याच्या टाक्यांची खोदाई आणि एकत्रित आकृतीबंध काय विलक्षण देखणा आहे! दिलेलं काम कंटाळा करत कसतरी धेडगुजरी उरकण्याच्या आजच्या काळात, अलंगच्या टाक्यांचं काम करणाऱ्या आणि विलक्षण सौंदर्यदृष्टीने कालातीत ठसा उमटवण्याऱ्या अज्ञात स्थापत्यशिल्पकारांबद्दल विशेष आदर वाटला.

टाक्यांच्या परिसरात विखुरली समोर होती असंख्य घरांची जोती. अलंगच्या गुहाखोदाईचा काळ खूप पूर्वीचा मानला, वेगवेगळ्या कालखंडात अलंगवर वस्ती कशी होत गेली असेल, हे दाखवणाऱ्या खुणा आसपास विखुरलेल्या. म्हणजे, काही जोती साध्या दगडातली, काही सुरेख कटाईच्या दगडी चिऱ्यामधली आणि सरतेशेवटी (कदाचित पेशवेकाळात) काही जोती भाजलेल्या लांबट चपट्या विटांची. 


पूर्वी राजकीयदृष्ट्या AMKमध्ये अलंगचा दर्जा जास्त – एखाद्या राजधानीसारखा – असावा, त्यामुळे अलंगचे स्थापत्य विशेष सुंदर आहे. अलंग दुर्गदर्शनास व्यवस्थित वेळ देऊन तृप्त झालेलो. भक्कम न्याहारी करून, अलंग मुक्काम आवरून कूच केलं. वेळ १०:३०.

(अनेकदा ट्रेकर्स AMKचा घाईगडबडीचा प्लान करतात किंवा फक्त कातळारोहण थ्रीलमध्ये रमतात. अलंगची भटकंती अजिबात चुकवू नये, असं सुचवावेसे वाटते.)

गुहेकडून पश्चिमेला मदनच्या दिशेने निघाल्यावर अलंगच्या पठारावर पाण्याची टाकी, ध्वस्त जोती आणि शिवमंदिर. 

अलंगच्या पश्चिम टोकासमोर होता मदनच्या कराल कड्यांचा अफाट व्ह्यू!
(फोटो: मिलिंद लिमये)

अलंगचा निरोप घेताना पाय अडखळले. सॅक्स जड वाटल्याच. गडाचा निरोप घेताना काळीजही अंमळ जड झालेलं...

अलंगची थरारक उतराई
अलंगच्या उत्तर अंगाने (म्हणजे आंबेवाडी बाजूला) माथ्यापासून पहिली ७० मी उतराई एकदम थरारक आहे. ३ टप्प्यांची ही उतराई. पहिला टप्पा दृष्टीभय असलेल्या आखूड पायऱ्यांवरून, दुसरा ६० फुट उभा कडा रॅपलिंग आणि शेवटी ३० फूट तोडलेल्या पायऱ्यांवरून उतरायची कसरत.

अलंगच्या सपाटीवरून चालत आलो, अन उतराईच्या पहिल्या टप्प्यात एक क्षणभर नजर खोलवर दरीमुळे गरगरलीच. उभ्या कातळातल्या उंच, तिरक्या झुकलेल्या आखूड पायऱ्या सुरु झाल्या. पायऱ्यांच्या अग्गदी शेजारीचं कातळटप्पे असलेली खोssल दरी. अगदीच एक-टप्पा-आऊट! पहिल्या वळणापाशी पायऱ्यांमध्ये खोदलेले होल्ड्स आणि डावीकडच्या कातळाचा आधार घेत, पायऱ्या उतरणं अवघड नाही; पण दृष्टीभय सणसणीत आहे! अनुभवी ट्रेकर्स अनुपकाका आणि मिलिंदची दृष्टीभयाची ‘नजर मेली’ असल्याने ते सहजंच उतरून गेले. दुसऱ्या वळणावरून पायऱ्या उतरून गेल्यावर अलंगच्या ६० फुटी कातळटप्प्यापाशी पोहोचलो. हा उतराईचा दुसरा टप्पा. जवळच अलंगा – पहारेकऱ्यांची विश्रांतीची गुहा – आहे. इथेच गडाच्या द्वाराची तोडलेली चौकट जाणवते.

... इंग्रज जात्याच धूर्त! इसवी सन १८१८मध्ये कर्नल मॅकडोवलने मराठ्यांकडून अलंग-मदन दुर्ग जिंकून सत्ता मिळवलीच. पण, आमची ही दुर्ग-शक्तिस्थळे कायमस्वरूपी निकामी करण्यासाठी, मुळातच अवघड असलेल्या कड्यातल्या पायऱ्यांनाच सुरुंग लावला. आजंही अलंग आणि मदनच्या मोक्याच्या कातळटप्प्यांवर सुरुंगाच्या खुणा दिसतात. अलंगच्या कड्यावरच्या देखण्या पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून नामशेष केल्या; त्या आपल्याला बघता आल्याच नाहीत, याची हळहळ नक्कीच वाटते. ६० फुटांच्या या कातळटप्प्याची चढाई-उतराई तांत्रिक कातळारोहण साहित्याशिवाय शक्य नाही.
कड्यांना सुरुंग लावण्यासाठी इंग्रजांना मदत घ्यावी असेल - इथल्या गिरीजनांची.
त्याच कड्यांवरून कातळारोहण करताना वाटाड्या म्हणून मदत लागते - इथल्या गिरीजनांची.
असाच एक गिरीजन – आंबेवाडीतले गणपत मोरे - यांना अलंगचा कडा दोराशिवाय झपझप चढून येताना बघून आम्ही थक्क झालो.

(फोटो: मिलिंद लिमये) 

आता वेळ होती रॅपलिंग तंत्राने ६० फुटी कडा उतरायची. कडा सरसरत उतरताना रॅपलिंग तंत्र केवळ ट्रेकची गरज म्हणून वापरलेलं, थ्रीलसाठी अजिबात नाहीच. रॅपलिंगसाठी कातळारोहण साहित्याची कशी बांधणी कशी केली, त्याबद्दल थोडसं... सर्वप्रथम अनुपकाकांनी सेल्फ-अँकर करून घेतलं, त्यामुळे कड्याच्या काठाशी वावरणे निर्धोक झालं. २०० फुटी दोरातला निम्मा दोर वापरायचा होता – रॅपलिंगसाठी आणि निम्मा आधार-बिलेसाठी. सरसरत उतरण्यासाठी रॅपलिंग करण्यासाठीच्या दोराला एक अँकर-आधार आणि सुरक्षा-बिले दोरासाठी लांब दुसरा अँकर - असे स्वतंत्र अँकर्स प्रस्थापित केले. आणि, त्या दोन अँकर्सना बॅकअप म्हणून अधिक सुरक्षिततेसाठी मास्टर अँकर प्रस्थापित केला. डिसेंडरमधून रॅपलिंगचा बिले दोर फिरवलेला, त्यामुळे बिलेवर अचूक नियंत्रण मिळालेलं.
(हे सगळं तपशिलाने सांगण्याचं कारण हे की - दोराला अँकर न करता येणारे, एका बोल्टवर रॅपलिंग आणि बिले दोर अँकर करणारे आणि फक्त हाताने दोर खेचत बिले देणारे – AMK कातळांवर कातळारोहणाचे नेतृत्व करताना सापडतात. आणि, सेल्फ-अँकर, ते कशाला बरं?) 

रॅपलिंग यंत्रणा प्रस्थापित झाल्यावर मग एकेका ट्रेकरची तयारी. कंबरेला बांधलेले हार्नेस आणि त्याच्या बक्कलातून वळवलेल्या पट्टीची गाठ दोनदा तपासली गेली. डिसेंडरमधून रॅपलिंगदोर वळवून घेतल्याने, घर्षणाच्या सहाय्याने उतराई हळूहळू नियंत्रित होणार होती. रॅपलिंग दोरासह अधिक सुरक्षा देणारा बिलेदोर हमखास बांधला गेला. पाठीच्या बाजूल्या ब्रेकहॅन्डमध्ये हातमोजे चढवलेले आणि पुढचा गायडिंग हात सुद्धा सज्ज झाला. रॉकक्यायम्बिंगपेक्षा रॅपलिंगचं तंत्र कसं वेगळं हे समजावून सांगायला ढमढेरेकाका आणि अनुपकाकांसारखे दिग्गज होतेच. कातळाला पाय लावून, मागे झुकून वजन कसं दोरावर टाकायचं, पायात अंतर कसं हवं आणि पाय गुडघ्यात कसे वाकता कामी नाही, याचं ऑन-द-जॉब-ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल सुरु झालं. रॅपलिंग पहिल्यांदाच करणाऱ्या भिडूंना सुरुवातीला भीती वाटणे साहजिक होते. कातळारोहण साधनांवर आपल्या जीवाचा विश्वास टाकणे आणि कोसळलेल्या कड्याकडे पाठ करत वजन मागे दोरावर टाकणे, या दोन्ही गोष्टींना त्यांचं मन राजी होईना. व्यवस्थित सुरक्षायंत्रणा असूनही, दोरावर अडकून पडलेल्यांना गोडीगुलाबीने बोलून काहीच फरक पडेना. मग शेवटी, काकांनी ठेवणीतल्या अशक्य भारी XYZ शिव्या घातल्या. ट्रेकर्समध्ये दणदणीत हशा. तिकडे तो अडकलेला ट्रेकर कधी सरसरत खाली पोहोचला, त्याचं त्यालाही कळलं नाही. 

टीममधील रॅपलिंगचा लास्ट-मॅन अनुपकाकांनी दोराला U पद्धतीने गुंफून सरसरत खाली आले. सगळं साहित्य तपासलं. ६ लोकांच्या टीमसाठी अँकर लावण्यापासून माणसे-सॅक्स उतरवायला १.५ तास लागला. (आता विचार करा, मोठ्ठ्या ३०-४० किंवा जास्त संख्येचे अनेक ग्रुप वीकेंड्सना या कातळटप्प्यांवर कसे तुंबत असतील.)

अलंगच्या उतराईच्या तिसऱ्या टप्प्यात काही पायऱ्या उतरत गेल्यावर, शेवटच्या ३० फुटी कातळातल्या पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडून टाकलेल्या. हा टप्पा तांत्रिकदृष्ट्या कठीण नाही. थेट दृष्टीभय नाही. तरीही, सरळसोपा नक्कीच नाही. सुरक्षा दोराला धरून काळजीपूर्वक ट्रेकर्स आणि सॅक्स उतरवल्या. वेळ ३:१५.

जवळच एक गुहा आणि कोण्या देवीची मूर्ती खोदलेली. गरज पडल्यास ५-६ ट्रेकर्सना मुक्काम करता येईल, पण पाणी उपलब्ध नाही.

अलंगच्या कातळकड्यातून आडवं जाणारी सुरेख वाट होती. वाटेत एक बुजलेलं पाणी नसलेलं टाकं. अलंग-मदनच्या खिंडचौकात पोहोचण्याआधी मदनच्या कातळकड्यांचं अप्रतिम दर्शन झालं. वेळ ४. वाटचौकातून उजवीकडे (उत्तरेला) आंबेवाडीकडे वाट उतरते, तर डावीकडे (दक्षिणेला) घाटघरची कड्यावरून आडवी जाणारी बारीक वाट. समोर मदनच्या कातळमाथ्याला डावीकडून वळसा घालणारी वाट कुलंगला, तर मदनच्या कातळमाथ्याला उजवीकडून वळसा घालणारी वाट मदनच्या माथ्याकडे जाते.

भर्राट वाऱ्याचा थरारक चढाईचा मदनगड:
- उंची: १४७० मी
- उत्तर पायथ्याची गावे: कुलंगवाडी आणि आंबेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक
- दक्षिण पायथ्याची गावे: घाटघर आणि उडदावणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
- स्थानवैशिष्ट्य: उत्तरेला दारणा आणि दक्षिणेला प्रवरा खोऱ्यांवर लक्ष ठेवणारे कळसुबाई रांगेतले अत्यंत दुर्गम-देखणे-पुरातन दुर्ग
- इतिहास: इसवीसन १७६० – ६१ – मुज्जफरखानचा चाकर रामचंद्र नारायण यास अटकेत ठेवलेले.
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: खोदीव पायऱ्या, जोती, दुर्गस्थापत्य, शिलालेख, लेणी-गुहा, पाण्याची टाकी
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे
- निवारा: माथ्यावरचे गुहालेणे ४० – ५० ट्रेकर्ससाठी
- वाटाड्या: आम्ही घेतला नव्हता. वाटा शोधण्यास मदत हवी असल्यास, वाटाड्या घ्यायला हरकत नाही.
- वेळ (अलंग माथ्यापासून): ६ तास (मुख्यत: अलंगचे कातळावरोहण आणि मदनचे कातळारोहणामुळे).
- वाटेतल्या ठळक खुणा:

अलंग-मदनच्या खिंडीतून मदनचा माथा १०० मी डावीकडे उंचावर ठेवत आडवी वाट सुरु झाली. 

मदनचा खणखणीत कातळकडा डोक्यावर आलेला. माथ्यावर जायला वाट एकंच. 

उंच-अरुंद आणि हलकेच वळण घेत जाणाऱ्या पायऱ्या थेट गगनावेरी गेलेल्या. जुन्या काळची मर्यादित साधनं वापरून इतकं सुबक कातळशिल्प घडवणाऱ्या कोण्या अज्ञात दुर्ग-अभियंत्याचं मनोमन वंदन केलं. 

भल्यामोठ्ठ्या सॅक सांभाळत, आखूड पायऱ्या चढताना अंग चोरून घेत एका वेळी एक पायरी चढायची. डावीकडे अंगावर येणाऱ्या कड्याकडे आणि उजवीकडच्या दरीकडे दुर्लक्ष करायचं.


सत्तर-ऐशी पायऱ्यांनी चढत दोन वळणं घेत आता थोडक्या कड्याच्या पोटातल्या सपाटीवर आलो. उजवीकडे कातळात खोदलेली आडवी वाट. पण, मध्येच वळणावरचा १०- १२ फुटांची वाट उध्वस्थ झालेली. उजवीकडे दरीचं खोलवर दर्शन. सॅक्स घेऊन हा टप्पा पार करताना मानसिक आधार वाटावा, म्हणून दोर लावलेला. एक क्षण उजवीकडे बघितलंच आणि नजर गरगरली थेट खोल दरीत. तिरक्या कातळावर बुटांच्या घर्षणाच्या आधारावर झुपकन निघून गेलो. (फोटो क्रेडीट: अजय देशपांडे)

वळणावरून पुढे उभ्या पायऱ्या चढत आता आम्ही थबकलो, मदनच्या कातळारोहण टप्प्यापाशी. अलंगप्रमाणेच मदनच्या पायऱ्या १८१८मध्ये कर्नल मक्डोवेल तोडलेल्या, त्यामुळे कातळारोहणाला पर्याय नाही. ५० फुटांचा शुद्ध कातळकडा. ७५-८० अंशात झुकलेला. अनुपकाकांनी नेहेमीप्रमाणे कातळकडा लीलया पार करून आरोहाणासाठी आधारदोरांची यंत्रणेची स्थापना केली. सूर्य पश्चिमेला कललेला. वाजले होते ५:१५. झपाट्याने अंधारू लागल्याने, जलद हालचाली करणं भाग होतं.

प्रत्येक आरोहकाने स्वत: कातळारोहण करून चढायचं असल्याने (म्हणजे, माथ्याकडून खेचून घेण्याचा पर्याय नको असल्याने) ६ जणांच्या टीमसाठीही या टप्प्यावर भरपूर वेळ लागत होता. चढाई सुरु केल्यावर तसे बरे होल्ड्स होते. आधार बिलेही होता. पण पींचहोल्ड्सवर स्वत:ला खेचून घेताना कसरत सुरु झाली. कोणीतरी रॉकवर अडकायचाच. मग सुरु प्रेमळ उद्बोधक संवाद.
रॉकवर अडकलेला कोणीतरी: “अरे, इथे उजव्या हाताला ना, होल्ड फार भारीये.
अनुपकाका माथ्यावरून: “आवडतं म्हणून प्रत्येक गोष्ट धरणार का. आय मीन, होल्ड रे” (बाकी ट्रेकर्समध्ये हशा!)
रॉकवर अडकलेला कोणीतरी: “हा रोप आहे ना माझा. हां.हं.हां.हं.. अरे, नाहीये जमत. च्यायला हात सटकतोय..
ढमढेरेकाका: “हातचं सोडून एवढ्या लांबच धरायचंय कशाला. अरे XYZ, रोप सोड. बीलेरोप सोड. सोड तो रोप. हां पकड तो होल्ड. हाण हाण XYZ PQR” (तुफान हशा!)
काही सेकंदात अडकलेला ट्रेकर माथ्यावर पोहोचतोही!

कातळकड्याचा उगाच अतिबाऊ न करता खेळीमेळीत आरोहण करण्यासाठी असं मार्गदर्शन आवश्यकंच होतं. अंधारायच्या आत सगळी माणसं पोहोचली कातळटप्प्याच्या माथ्यावर. वेळ ६:४५. 

सॅक्स उपसून घ्यायला अनुपकाका आणि मिलिंदला फार कष्ट पडले. एक अवाढव्य सॅक अजूनही खालून आणायची राहिलेली. एव्हाना हेडटोर्च लुकलुकू लागलेले. गच्च अंधार पडलेला. सकाळपासून अलंग-मदनच्या टप्प्यांवर नेतृत्व करणाऱ्या दी ग्रेट अनुपकाकांनी त्यापुढे अंधारात रॅपलिंग करून, पाठीवर सॅक लादून वर आणली, तेंव्हा खुद्द ढमढेरेकाकांनी ‘भले शाब्बास’ अशी दाद दिली. मदनच्या कातळकड्याला अपेक्षेपेक्षा खूप वेळ लागलेला. वेळ ७:१५. (जास्त संख्येने आरोहक या टप्प्यांवर आले, की ट्रॅफिक जॅम होणार हे नक्की.)

मदनचा कातळकडा चढलो, तरी मदनच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी चढाई बाकी होतीच. अंधारात सॅक्स पाठीवर चढवून हेडटॉर्चच्या प्रकाशात कुठली आडवी घसाऱ्याची वाट चाललोय, कुठल्या बारक्या पायऱ्या चढतोय, कसला दरवाजा-गुहा मागे पडतोय – याचा फारसा अंदाज लागेना. आम्ही अंधारात कसली चढाई केली, हे पुढच्या दिवशी उतराई करताना कळणार होतं.

मदनच्या टाक्यामधून थंडगार पाणी पिऊन मुक्कामाच्या गुहेपाशी पोहोचलो. ४०-५० लोकं सहज राहतील, अशी मोठ्ठी गुहा. वेळ ७:३०. दिवसभर डोंगर-कातळांमधून वणवण भटकलेल्या ट्रेकर्सना सूप आणि रस्सा-पराठे अशी मेजवानी मिळाली. हवेत गारवा पसरू लागलेला. समोर अलंगवर जाग होती. गुहेत मुक्कामी आलेल्या गटाने पेटवलेल्या शेकोटीच्या ज्वाळा वाऱ्यासोबत लवत होत्या.

मुक्कामासाठी दोन पायऱ्या उतरून गुहेत प्रवेश केला. आत वारं शिरणार नाही, अशी पूर्वाभिमुख रचना. ४० फुट लांब, २० फुट रुंद अशी गुहा. ४० – ५० ट्रेकर्सना मुक्कामास पुरेल अशी. तळाशी गच्च राख-माती साठलेली. कसलासा कुबट वास भरलेला. त्याकडे दुर्लक्ष करून स्लीपिंगबॅग मध्ये शिरलो. मिट्ट अंधाराची गुहा. डोळे उघडे की मिटलेले हे समजेना; पण डोळ्यांसमोर फेर धरलेला अलंग-मदनच्या विस्मयकारी कराल कातळवैभवाने, वैविध्यपूर्ण स्थापत्याने आणि थरारक वाटांनी....

मदनच्या दुर्गस्थापत्य
... ड्रीम ट्रेकचा तिसरा दिवस उजाडला. गुहेतला मुक्काम आवरून झक्क न्याहारी करून सॅक्स तयारी झाली. मदनची गडफेरी छोटीशी. गुहेपासून ५० फुट उंचीवर खडकाळ माथा. पूर्वेला मदनच्या गुहेच्या पल्याड गवताळ उतारावर दोन टाकी. आणि अगदी हाकेच्या अंतरावर अलंग. मागे किर्डा आणि कळसूबाई शिखरे खुणावतात. ढगांमुळे सूर्य आळसावलेला.

पश्चिमेला कुलंगच्या अफाट कड्यांचे दर्शन. झाडीभरल्या पदरातून चालत जाणारी मदन ते कुलंग वाट जोखली.

मदनच्या माथ्यावर एखादं कोरडं टाकं, आधारखांब रोवण्यासाठी खोदलेला खळगा बस्स इतकंच! आणि हो, मदनच्या माथ्यावर दडलंय कातळाला आरपार छेदणारं एक थरारक नेढं. दोराची सुरक्षितता घेऊन साहसी ट्रेकर्स मदनच्या नेढ्यात उतरतात. अतिरिक्त थरथराट धोकादायक जागा! मदनचं नेढे बघण्याचा हट्ट सोडून देणे इष्ट!!!

मदनचा निरोप घ्यायची वेळ झालेली. वेळ सकाळचे ९. सॅक पाठीवर लादून पाण्याच्या दोन टाक्यांपाशी विसावलो. या टाक्यांमध्ये अजस्त्र शिळा असल्याने पाणी टिकत नसे. बाजूच्या खळग्यातल्या पाण्यावर वाढत्या ट्रेकर्सची गरज भागेना. म्हणून, अभय काळे-अजय ढमढेरे टीमने या टाक्यांचं १९९८मध्ये सफाईकाम केलं. पुणे व्हेंचरर्सने ३१-डिसेंबर-२०१०ला टाक्यासाठी श्रमदान केलेलं. अरुण सावंतसरांच्या नेतृत्वाखाली ट्रेकर्स आणि गिरीजनांनी पुन:श्च एकदा दोन वर्षांपूर्वी पाण्यातल्या शिळा काढण्याचे काम केलं. आज जानेवारीमध्ये टाक्यात फुटभर खोलीचं पाणी वाऱ्यावर डोलतंय. मासळ्या बागडताहेत. आज मदनच्या टाक्याचं अफलातून गोड आणि अतिथंड पाणी पिताना, त्या टाक्यांच्या सफाईसाठी घाम गाळणाऱ्या आमच्या ट्रेकरमित्रांबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.

टाक्यांजवळ दोन-चार घरट्यांची जोती बाजूला ठेवत उतराई सुरु केली. उभ्या पायऱ्यांच्या जिन्याचं कवतिक करावं, की समोर पसरलेल्या घोड्याच्या नालाकृती आकाराच्या अलंगच्या पसाऱ्याला डोळ्यात साठवावं, काहीच कळेना.

मदनच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या थक्क करणाऱ्या. आखूड-तिरक्या-उंच. थोडं दृष्टीभय आहे, पण अलंगच्या पायऱ्यांइतकं नाही. कातळाकडे तोंड करून सावकाश उतराई केली. उध्वस्थ द्वाराची चौकट आणि शेजारची अलंगा – पहारेकऱ्याच्या गुहेपाशी क्षणभर थबकलो. गुहेत गरज पडल्यास ५-६ ट्रेकर्स राहू शकतात. पाणी मात्र माथ्यावरच!

उतरंडीवरून अलंगच्या सी-आकाराच्या कड्यांचं एकदम जवळून दर्शन घेत, आता वाट डावीकडे वळली. आडवं जात मदनच्या कातळटप्प्यापाशी पोहोचलो. वेळ ९:४५.

रॅपलिंग यंत्रणा उभारून ६ ट्रेकर्सनी कातळकडा उतरून जाणे आणि साहित्याची आवराआवर करून निघण्यासाठी दीड तास मोडला. वेळ ११:१५.


मदनच्या अप्रतिम पायऱ्या, उध्वस्थ आडवी वाट, पुनश्च पायऱ्या, खोलवर दरीचे दर्शन आणि खुणावणारा अलंग असे टप्पे घेत, पायऱ्या संपल्यावर मदनच्या कातळकड्याच्या कुशीतून आडवे जात अलंग-मदनची खिंड गाठली. वेळ ११:४५.

अलंग-मदनकडून कुलंगकडे रौद्र आडवी चाल
अलंग-मदनच्या खिंडीत विसावलो. दक्षिणेला घाटघर बाजूने आतुरतेने वाट बघत होतो आमच्याच ट्रेकर मंडळातल्या ८ दोस्तांची. फक्त वीकेंड सुट्टी असलेले हे दोस्त शुक्रवारी मध्यरात्री निघून घाटघरमधून ४ तासांचा ट्रेक करून आम्हांला खिंडीत भेटले. घाटघर वाटेवरून खिंडीत येण्यापूर्वी मंडळींना मदनच्या कड्यांचं रौद्र दर्शन झालेलं. (फोटो क्रेडीट: निनाद बारटक्के)

ट्रेकरदोस्तांची गळाभेट-हास्यकल्लोळ-ओळखी-सरबत झालं. आता एकत्र कूच केलं कुलंगकडे. पूर्वी कुलंगला जाण्यासाठी अलंग-मदनच्या खिंडीतून आंबेवाडीकडे ३०० मी उतरून आडवं जात, पुन्हा कुलंगची चढाई असा द्राविडी प्राणायाम होता. ३-४ वर्षांपूर्वी अरुण सावंतसर आणि आंबेवाडीतील गिरीजन - बहुदा गणपत मोरे – यांनी अलंग-मदनच्या खिंडीतून कड्यांच्या पोटातून थेट कुलंगकडे जाणारी वाट वापरात आणली. ट्रेकर्सचा वेळ आणि कष्ट वाचवण्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञताच वाटली. खिंडीतून पश्चिमेला निघाल्यावर मदनच्या कड्याच्या पोटातून आडवं जायचं होतं. कुलंगच्या वाटचालीमध्ये दोन लिंगी-सुळक्यांना वळसा घालणार होतो. कोसळलेल्या दगडांच्या चीपांचा खच, कधी मोठाले धोंडे, कपारी, कधी घसरडी अरुंद वाट, कधी खाजरी झुडूपं आणि हलके चढ-उतार असलेली वाट असली, तरी ती अति-खडतर नाही. फक्त या टप्प्यात थोडं ऊन लागलं, पुढे पूर्ण सावलीतून वाटचाल. 

कुलंगला बिलगलेली एक कातळधार आमच्यासमोर आलेली. जणू आभाळात घुसलेली. वेळ १२:२०.

खिंडीत उतरून पुन्हा कातळधारेच्या पोटातल्या आडव्या वाटेला लागायचं होतं. खिंडीत उतरताना घसारायुक्त घसरगुंडी उतरताना, माथ्यावरच्या झाडाला आधारासाठी दोर लावला. वाटेत दोन बोल्ट्स आहेत. सावकाश उतराई केली तर खूप अवघड नाही.

खिंडीतून पुन्हा चढून कातळकड्याच्या पोटाची पातळी गाठली. पाठीमागे उन्हांत तळपणाऱ्या मदनगडाच्या सुळक्याचे आणि अलंगच्या कड्याचे अफलातून दृश्य होते. थक्क करणारे! वेळ दुपारचा १.

वाटचालीतली दुसरी लिंगी कातळभिंतीच्या पोटातून उजवीकडून आडवं जात पार केली. (या लिंगीला उजवीकडून आणि डावीकडून दोन्ही बाजूंनी वळसा घालत कुलंगकडे जाता येते.) खिंडीतून माध्यान्हीची सूर्यकिरणे कुलंगच्या धिप्पाड कातळकड्याला चिपकून वाटेवर तरंगत उतरत होती.

कुलंगच्या पोटातली आडवी चाल. खादाडी ब्रेक. राजुकाकांचे धम्माल किस्से. घसाऱ्याच्या उतराई-चढाईचे टप्पे. माथ्यावर कुलंगच्या कातळकोरीव पायऱ्या खुणावू लागल्या. अखेरीस आम्ही पोहोचलो कुरुंगवाडीतून कुलंग चढणाऱ्या उभ्या दांडावर पोहोचलो. वेळ २.

उत्तुंग कुलंगवर अविस्मरणीय चढाई आणि मुक्काम...
- उंची: १४७० मीटर
- उत्तर पायथ्याची गावे: कुलंगवाडी आणि आंबेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक
- दक्षिण पायथ्याचे गाव: घाटघर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
- स्थानवैशिष्ट्य: उत्तरेला दारणा आणि दक्षिणेला प्रवरा खोऱ्यांवर लक्ष ठेवणारे कळसुबाई रांगेतले अत्यंत दुर्गम-देखणे-पुरातन दुर्ग
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: विपुल दुर्गस्थापत्य, शिलालेख, लेणी, पाण्याची टाकी, पायऱ्या, द्वार
- इतिहास: १६७० छत्रपती शिवाजीमहाराज सुरतस्वारीवरून परताना धुंवाधार अलंग-कुलंग-त्रिंगलवाडी परिसरात कडाक्याचे युद्ध
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे
- निवारा: माथ्यावरचे गुहालेणे ४० – ५० ट्रेकर्ससाठी
- वाटाड्या: आम्ही घेतला नव्हता. वाटा शोधण्यास मदत हवी असल्यास, वाटाड्या घ्यायला हरकत नाही.
- वेळ (अलंग माथ्यापासून): ६ तास (मुख्यत: अलंगचे कातळावरोहण आणि मदनचे कातळारोहणामुळे).
- वाटेतल्या ठळक खुणा:
कुलंगच्या उभ्या धारेवरून खोदीव पायऱ्यांची शृंखला सुरु झाली. अक्षरश: थक्क करणारं कृत्य. सुमारे दोन-अडीचशे उभ्या पायऱ्या खोदलेल्या. सुदैवाने इंग्रजांच्या सुरुंगाच्या तडाख्यातून या पायऱ्या बचावल्यात.

कुलंगच्या सुबक पायऱ्यांसोबत अलंग-मदनचा करकरीत पॅनोरमा.

शेवटच्या चढाई टप्प्यात खोदीव वाट डावीकडे आडवी जाते. माथ्याकडचा जिना खुणावू लागलेला.

कातळात खोदलेल्या गोलातून प्रवेश करत, पहारेकऱ्यांच्या तीन देवड्या बाजूला ठेवत आता वाट अंतिम टप्प्यात आली.

गडाला असलेल्या एकमेव मार्गावरून आपण कुलंगच्या माथ्यावर पोहोचलो, की त्याची थोडकी तटबंदी, माथ्यावरचे स्थापत्य आणि सवंगडी अलंग-मदन साद घालू लागतात.

माथ्यावर मुक्कामाच्या गुहेत (३६ * २९ फुट) ५०-६० ट्रेकर्स आरामात राहू शकतील अशी जागा. गुहेभोवती तीन बाजूंनी कातळखोदीव चर – ज्याचं प्रयोजन कळत नाही. गुहेतून बाहेर आल्यावर उजवीकडे-पश्चिमेकडे पाण्याची विपुल टाकी आणि घरट्यांची-वाड्यांची जोती. तर गुहेच्या डावीकडे-पूर्वेला गेल्यावर आठ अधिक दोन अश्या पाण्याच्या टाक्यांचा देखणा समूह. गणेशाची भग्न पण सुबक मूर्ती एका टाक्यावर, तर शिवपिंड दुसऱ्या टाक्याजवळ पुजलेली.
 
गडाच्या पूर्व टोकावरून कळसुबाई रांगेचे भेदक दर्शन. कळसूबाई, कळसूबाई २, किर्डा, अलंग, मदन आणि आम्ही ज्या वाटेने अलंग-मदनच्या खिंडीतून कुलंगला आलो, त्या वाटेचा वेध घेतला. कितीतरी वेळ इथे बसून सह्याद्रीचं अद्भूत रुपडं निरखलं.

उन्हं कलू लागलेली. काहीश्या ढगाळ हवेमुळे पश्चिमेला मळभ दाटलेली. कुलंगचा शेजारी छोटा कुलंग शिखर विशेष बारकाईने न्याहाळलं. ट्रेकच्या चौथ्या दिवशी छोटा कुलंग आणि समोर पसरलेल्या पदरातल्या दाट जंगलातून आम्ही वाटचाल करणार होतो.

एका लवणात टाक्यांचा समूह खोदलेला. आसपास विखुरलेले अनेक घडीव दगड सुचवतात की ही टाकी म्हणजे दुर्गस्थापत्यासाठी दगडांची खाण आणि पाण्याची सोय. आठ फुट जाडीचा बांध आणि रेखीव कमानीतून जादाचे पाणी वाहून नेणारं उध्वस्थ गोमुख विशेष सुंदर.

पाण्याच्या टाक्यांपासून मिळाली विलक्षण सुंदर फ्रेम.

गडफेरी मनसोक्त करून परत मुक्कामाच्या गुहेत आलो, तर संगमनेरचे दिग्गज ट्रेकर गुरुवर्य भरत रुपवाल (भाऊकाका) आम्हांला येऊन मिळालेले. अलभ्य लाभ! दुसरीकडे विशेष बल्लवाचार्य चैतन्यकाका आणि कौस्तुभ यांनी रात्रीच्या खादाडीसाठी जंगी बेत आखलेला. ३ किलो मटार निवडून झालेले. ५-६ किलो फळे चिरून झालेली. बल्लव कौस्तुभने सपाट दगडाचा पाटा-वरवंटा बनवून वाटण रांधलेले. बेत होता मटार-उसळ, ज्वारीची भाकरी आणि फ्रुटसॅलड. ट्रेकमधली जंगी मेजवानी. सत्ते-पे-सत्ता चित्रपट स्टाईलने ट्रेकरमंडळी तुटून पडली आणि काही मिनिटात खादाडी फस्त झाली! चैतन्यकाका आणि कौस्तुभ यांना विशेष दाद देण्यात आली. (काही फोटो: अजय देशपांडे)

रात्रीच्या चांदण्यात गप्पाष्टक संपेना. आभाळात चांदण्यांनी फेर धरलेला. ट्रेकचा तिसरा दिवस असा संस्मरणीय झालेला... (फोटो: निनाद बारटक्के)


ट्रेकचा चौथा दिवस. चहाचे मस्त घोट घेत दोस्तांबरोबर गप्पाष्टक रंगवत डोंगरातला सूर्योदय अनुभवणे, यासारखं सुख ते काय!

चैतन्यकाका – कौस्तुभने न्याहारीसाठी अप्रतिम चवीची खि-का (साबुदाणा खिचडी – मसाला काकडी) केलेली. पुण्यात कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ असलेली ही मंडळी डोंगरावर मात्र ज्या उत्साहाने वेगळ्या रोलमध्ये शिरून सगळ्यांना चविष्ठ खाऊ घालतात, त्याला तोड नाही.

कुलंगची उतराई सुरु. सकाळी १०. उभ्या दांडावरून काय सुरेख पायऱ्या खणल्या आहेत.

छोटा कुलंग शिखराची मस्त-थरारक चढाई...
कुलंगच्या पायऱ्या संपल्या. पदरातल्या झाडीत रानफुले फुललेली. वाटफाट्यावर आलो. समोरची उत्तरेला मळलेली वाट कुलंगवाडीकडे. उजवीकडे पूर्वेला वाट अलंग-मदनकडे. डावीकडे पश्चिमेची जेमतेम मळलेली आडवी वाट कुलंगच्या कड्याच्या पोटातून छोट्या कुलंगकडे निघाली. वळणापलिकडे छोट्या कुलंगचे सुरेख दर्शन.

कुलंग आणि छोट्या कुलंगच्या खिंडीत पोहोचलो. (या खिंडीत कुरुंगवाडीतून थेट चढतदेखील पोहोचता येते.) खिंडीतून उजवीकडे पश्चिमेला आडवं चालत गेलो. कढीलिंब/कढीपत्त्याच्या झाडाशेजारी, वाहत्या पाण्याने छोटी घळ कोरून काढलेली. त्यातून चढणारा कातळारोहण मार्ग. 

ढमढेरेकाकांना छोटा कुलंग चढाईसाठी मुंबईच्या चक्रम हायकर्सचे आशिष म्हात्रे आणि राजन महाजन यांनी माहिती दिलेली. चक्रमच्या सहयांकन’१७ मोहिमेसाठी कातळारोहण मार्गात रोवलेल्या, तीन लाकडी शिड्यांची आम्हांला मदत होणार होती. या शिड्या मुद्दाम पक्क्या केल्या नाहीयेत. ट्रेकर्सनी स्वत:च्या जोखमीवर त्या वापराव्यात, अशी रचना आहे.

सॅक पायथ्याशी ठेवल्या. वेळ ११:३०. घळीतून धोंडे-कातळटप्पे चढत छोटा कुलंगची चढाई सुरु झाली. (जवळच्या एका कातळाला बिलगलेले मधमाश्यांचे पोळे बघता, इथे गोंगाट-धूर टाळणे इष्ट!) कातळारोहणाचा आनंद लुटत, गरज पडली तरच लाकडी शिड्यांचा आधार घेत चढाई करत होतो. एके ठिकाणी बेचक्यात मोठ्ठी शिळा अडकलेली. बेचक्याचा कडा आणि शिळेच्यामध्ये थोडी मोकळी जागा. तिथून ‘चिमणी’ आरोहणतंत्राने पाठ आणि पाय कातळावर रोवून शिळेच्या माथ्यावर विसावलो. 

छोटा कुलंग म्हणजे, कुलंग किल्ल्याच्या शेजारचा पश्चिमेला असलेला डोंगर. ऐतिहासिक संदर्भ/ खुणा काहीच नाही. माथ्यावर गवत-काटेरी झुडुपं घसारा माजलेला. पण, पूर्वेला कुलंग काय जबरदस्त दिसतो म्हणून सांगू. इथे येण्याचे सारे कष्ट वसूल!

गवत-घसारा चढून, नागफण्यासारखा डोकावणाऱ्या छोटा कुलंगचा माथा गाठणं अडचणीचे काम होते. 

अश्या अनवट शिखरांच्या माथ्यावर पोहोचून कसलं समाधान मिळतं, हे कळायला ट्रेकर्सचं काळीज हवं. वेळ १२:३०.

आल्या वाटेने चिमणी टप्पा-तीन शिड्या-घळ उतरून छोट्या कुलंगच्या पोटात पोहोचलो. वेळ १:३०.

कुलंगच्या पदरातल्या रानातून लाजवाब वाटचाल...
छोटा कुलंगच्या पश्चिमेला आडवं जात गाढवघाटाकडे जाता येतं. घाटघरला परतण्यासाठी सोबत असलेल्या सनाजीने वेगळा मार्ग सुचवला. छोटा कुलंग ज्या घळीतून उतरलो होतो, त्याच घळीतून उतरत कुलंगच्या झाडीभरल्या पदरात पोहोचायचं होतं. मग घाटघरला जाणारी आडवी वाट लागणार होती. छोटा कुलंगची शिड्या लावलेल्या घळीचं भन्नाट दृश्य मागे ठेवत, ओढ्यातून उतरत निघालो. वाट अशी नाहीच. ओढ्यात एके ठिकाणी जरा चिमणी तंत्राने उतराईची कसरत केली. ज्यांना गरज वाटली, त्यांना साधा खांद्यावरून रोवून दोराचा आधार दिला.

ओढ्यातून कातळ-झुडुपे टप्पे उतरत गेलो. 

रानात कसलासा स्वर्गीय घमघमाट होता. आम्हांला वाटलं हा मोहाच्या फुलांचा तर वास नव्हे! पण, सनाजीने सांगितलं हे आहे कोंभफळ.

पदराची झाडीभरली सपाटी गाठली. पाठीमागे छोटा कुलंगचे सुरेख दृश्य. वेळ २:४५.

झऱ्यापाशी रंगली खादाडी, ताक-सरबत. गप्पाष्टक. वेळ ३:४५.

घाटघरला जाण्यासाठी साधारणत: ६ किमी आडवी चाल आणि उतराई बाकी होती. अप्रतिम रानातून आडवी जाणारी वाट. दाट झाडीतून आडवं चालताना दर १०० पावलांवर वाहता झरा. 

छोटा कुलंग आणि कुलंगचं पॅनोरमा दर्शन. वेळ ४.

रानातली आडवी धम्माल वाट. सुरेख रानफुले, झरे. वळणावरून कुलंगच्या पदरातल्या जंगलाचे आणि दरीचे दर्शन. कुलंगच्या दक्षिणेची लिंगी आकर्षक दिसत होती. वेळ ४:४०. सूर्य झपाट्याने मावळतीला निघालेला. घाटघर अजून लांब होतं. मागे रेंगाळलेल्या टीमला काकांनी खास ठेवणीतल्या शब्दात कोडकौतुक करून पिटाळलं.

झपझप चालत पठार पार केलं. इतका वेळ कड्याच्या पोटातून दक्षिणेला जाणारी वाट आता किंचित उजवीकडे नैऋत्येला निघालेली. 

मोकळवनातून पाठीमागे बघितलं, आणि सामोरं आला ट्रेकचा एक उत्कट साक्षात्कार क्षण. गेल्या चार दिवसात केलेल्या ट्रेकचा समग्र आलेख सामोरा होता. डोळ्यांचं पारणं फेडणारं दुर्लभ दृश्य. आमच्या टीममध्ये कोणी कधीच न बघितलेला AMKचा दुर्मिळ व्ह्यू. एकाच वेळी ड्रीमट्रेक पार पडू शकतोय याचं अतीव समाधान आणि त्याचवेळी ट्रेक अंतिम टप्प्यात आला म्हणून हुरहूर!

पहा व्हिडीओ:


अरुंद गवताळ धारेवरून उतरणारी घसाऱ्याची वाट. खोलवर दाट झाडी. मागे अलंग-मदन-कुलंगचं दृश्य.

खडकाळ धारेवरची धम्माल बारीक वाट.

बाजूला गवताशेजारी खोल दरी कोसळलेली. वेळ ५:३०.

सपाटीवरून घाटघरची वाट तुडवू लागलो. सूर्य देवीघाटामागे लगबगीने साईन-ऑफ करायला निघालेला. AMK ट्रेकमध्ये दुर्घट-अवघड असं होतं तरी काय, यावर चर्चा रंगली. सह्याद्रीभूगोलअभ्यास, योग्य हंगाम (सीझन), गर्दी टाळून साधलेलं टायमिंग, कातळकड्यांसाठी भक्कम तांत्रिक नेतृत्व, चारदिवसांचे सर्व साहित्य वाहून न्यायची क्षमता, शारीरिक क्षमतेसोबत दृष्टीभयावर मात करण्यासाठी मानसिक धैर्य दाखवणारे मंडळ - खणखणीत टीम हवीच. आमच्या AMK ट्रेकमध्ये नेमक्या याच सगळ्या पॉझिटीव्ह गोष्टी जुळून आल्या. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे - सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी आणि या अवघड वाटांचा ध्यास घेतलेली मंडळी... 
(फोटो: निनाद बारटक्के)

- अजय ढमढेरे: ७-८ केलेल्या AMKच्या अनुभवाच्या जोरावर जबरदस्त रूट आखलेला. AMK फुरसतसे बघितला पाहिजे, हा रास्त आग्रह. चतुरस्त्र नेतृत्व. जबरदस्त जोडलेली माणसं. किश्यांचे चौफेर चौकार आणि षटकार. बासरी-माऊथऑर्गनची धम्माल मैफल. गुरुवर्य!
- अनुप अचलेरे: सह्याद्रीकातळावर अतोनात प्रेम. कातळ दिसला की रक्त सळसळतं, हात शिवशिवतात, पायांची ग्रीप जोखली जाते असा ट्रेकर. फोटोग्राफी-दुर्गस्थापत्यात रमणारे. मूर्ती लहान, पण कर्तुत्व (आणि सॅक) अवाढव्य!
- आनंद खरे: ‘द्रोना’चार्य अनुभवाने आणि सोबतच्या फोटोग्राफी सामग्रीमुळेही. स्वैच्छिक रिटायरमेंट घेऊन अमेरिका आणि भारतभ्रमणाचा ध्यास घेतलेले. AMKचा ध्यास घेतलेले आणि जिद्दीने पूर्ण करणारे.  
- अजय देशपांडे: ट्रेकमधील प्रत्येक गोष्ट एन्जॉय करणारे आणि मनापासून दाद देणारे. विपुल ट्रेक करुनही,  डोंगराबद्दल कुतूहल कायम असलेले. उत्तम फोटोग्राफर.
- मिलिंद लिमये: रानटी एन्ड्युरन्स. नेहेमी ट्रेकच्या आघाडीला. अव्वल टीमप्लेयर. शांतपणे सह्याद्रीचा ट्रेक एन्जॉय करणारा, अभ्यासू, भरवश्याचा मित्र.
- भरत रुपवाल: वयाच्या ७० व्या वर्षी कुलंग चढून आमच्यासोबत आलेले सह्याद्रीट्रेकिंगमधले एक गुरुवर्य. प्रवरा-मुळा खोऱ्याचा विश्वकोश.
- निनाद बारटक्के: घाटवाटा एक्स्पर्ट. सह्याद्री भूगोल, नकाशे आणि ट्रेकगॅझेट्सचा अभ्यासक, स्वत:चं अभ्यासू मत असणारा ट्रेकर आणि फोटूग्राफर ‘गौतम’. 
- नितीन तिडके: सह्याद्रीचर, म्हणजे बोजड सॅक घेऊन फिरताना सह्याद्रीत सापडला नाही, तर पुण्यात कंपनीत सापडणारा. जलचर, म्हणजे पाणी मिळालं की डुंबणारा. बोकडचर म्हणजे १२ महिने बोकडावर जगू शकणारा. विश्रांतीच्या वेळेला कुठेतरी कड्याच्या टोकावर ध्यान लावून बसणारा. 
- विजय राजगुडे: रॉकवर सहज बागडणारा, अवघड जागी हमखास मदतीला धावणारा. अफाट एन्ड्युरन्सचा नेहेमी आघाडीला असलेला भन्नाट ट्रेकर.
- चैतन्य सहस्त्रबुद्धे: नेहेमी पहिल्या फळीत रूट ओपन करणारे. अफाट टेस्टी पदार्थ करून सगळ्यांना खाऊ घालणारे. अवघड सह्याद्री ट्रेक्सचा आनंद लुटणारे.
- कौस्तुभ दातार: अत्यंत बुद्धिमान. मोजकेच, पण लय भारी पंचेस टाकणारा. ट्रेकसाठी नवनवीन उपयुक्त साहित्य मिळवणारा. आपल्या आणि इतरही ग्रुपमध्ये सर्वोत्तम गडगडाटी घोरणे. अफाट भारी बल्लवाचार्य.
- राजूकाका लोकरे: गडांवर शांती-नि-केतन शाळा भरवणारे (म्हणजे काय, हे समजावून घ्यायला त्यांच्यासोबत ट्रेकचा योग यायला पाहिजे). माणसांमध्ये आणि सह्याद्रीमध्ये रमणारे. एकसेबढकर एक किश्श्यांनी खळाळणाऱ्या हास्याने ट्रेकमधले अवघड क्षण सोपे करून टाकणारे.
- जितेंद्र बंकापुरे: सगळ्या ट्रेकर्सशी विशेष नातं जुळवणारा. माझा AMK ट्रेक घडवणारंच असा विडा कित्येक वर्षांपूर्वी उचलेला. तो आठवणीने पूर्ण करणारा दोस्त. ट्रेकमधलं सगळ्यात पिछाडीचं डिझल इंजिन. वर्ल्डक्लास हेडमसाज करणारा. वर्ल्डक्लास ब्लॉगर.

... ट्रेकवरून घरी निघालो. मनात अजूनही रुंजी घालत होते AMK. अलंगच्या अफाट दुर्गस्थापत्याने आणि कातळकड्यांनी थरारलेलो. मदनच्या कातळकड्यावरच्या दृष्टीभयाने अजूनही ऊर धपापतंय. कुलंगच्या कातळातल्या पायऱ्यांच्या वैभवाने भारावलेलो. दुर्ग-दुर्घट-भारी - अजून काय!

------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेकर मंडळी: अजय ढमढेरे, अनुप अचलेरे, आनंद खरे, अजय देशपांडे, मिलिंद लिमये, भरत रुपवालराजूकाका लोकरेजितेंद्र बंकापुरे, निनाद बारटक्के, नितीन तिडके, विजय राजगुडे, चैतन्य सहस्त्रबुद्धेकौस्तुभ दातार, साईप्रकाश बेलसरे.
२. ट्रेक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात केला आहे. वेगळ्या सीझनमध्ये ट्रेक केल्यास वाटा-पाणी-गवत-कातळ ही सगळी गणिते बदलू शकतील.
३. कृतज्ञता: छोटा कुलंग चढाईच्या माहितीसाठी मुंबईच्या चक्रम हायकर्स; आशिष म्हात्रे आणि राजन महाजन
४. ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे. काही फोटो मिलिंद लिमये, अजय देशपांडे, निनाद बारटक्के.
५. WARNING:: हा ट्रेक अतिशय खडतर असून, घसारा आणि दृष्टीभय असलेल्या जागी कातळारोहण असल्याने - कठीण श्रेणीचा आहे. पुरेश्या अनुभवाशिवाय, साधनांशिवाय आणि दणकट टीमशिवाय अजिबात प्रयत्न करु नये.
६. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
७. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१८. सर्व हक्क सुरक्षित.



17 comments:

  1. साई, तुझ्या लिखाणाची मजा काही औरच.... वाचताना पुन्हा एकदा ट्रेक जगलो. लै भारी! विशेषतः तिडीकची ओळख तर एकच नंबर :-)

    ReplyDelete
  2. साई, अप्रतीमच झालंय लिखाण. अर्थात तुला सुंदर, अर्थवाही अशी लेखनशैली गवसलेली आहे. त्यामुळे 'अमकु' सारख्या देखण्या, मर्दानी आणि दुर्गस्थापत्यशैलीत अव्वल असणाऱ्या या हिऱ्यांचं वर्णन करायला जवाहिरही तुझ्यासारखाच हवा 👏 प्रवाही आणि रसाळ भाषा, चपखल प्रकाशचित्रे ... व्वा 👌
    बहुत काय लिहिणे. ही आमची लेखनसीमा.

    ReplyDelete
  3. Amazing trek. Ajay kaka this is only possible with you. Sai it is spectacular presentation of this trek. Just superb. I was feeling like I have done this with all of you. You all are amazing. I am so happy to see Papaji in this trek. Great work...

    ReplyDelete
  4. Great work Sai.. very detailed information with wonderful pictures. Ajay kaka this is only possible with you. Amazing trek.

    ReplyDelete
  5. साई, नेहमीप्रमाणेच रिफ्रेश करून सोडणारं मस्त लिखाण... १६-१७ वर्षांपुर्वी या दुर्गांची केलेली भटकंती इथल्या अपूर्व स्थापत्यामुळे अंतर्मुख करणारी ठरली होती. आज पुन्हा एकदा आठवणी बहरल्या... छान शिर्षक, फोटोंसह जबरदस्त डिटेलिंग... एकदम बढिया बाॅस...

    ReplyDelete
  6. Superb writing, awesome photographs. Ajay Deshpande is my classmate from Bhave Highschool, Pune. He gave me the link to this blog. My son had done Sahyankan 2015 with Chakram Hikers, Mulund Mumbai. Keep treeking, keep blogging.

    Here are links to my blogs:
    https://mytraveliaries.blogspot.in/
    https://lekhanachaudyog.blogspot.in/
    https://prakashchitranachaudyog.blogspot.in/
    Enjoy reading!
    -Chetan Apte

    ReplyDelete
  7. Apratim!! Difficult to say what is better: photo,description of trek or the tremendous team spirit ....everything is Lay Bhari😀. Specially appreciated the correlation between the description and the photos showing the exact spots, routes etc which were described in the text. This is probably the best blog that I have read abt AMK.
    Shrikant Oak, Indore

    ReplyDelete
  8. जबरदस्त....नेहमीप्रमाणे 👆🏻👆🏻👆🏻
    हाइक्लास ट्रेकचा हाइक्लास लेखाजोखा 😍...दुर्ग -दुर्घट लयच भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    अमकुच्या आमच्या ट्रेकमध्ये मला कुलंग सर्वात भावुन गेला होता...संपुर्ण सह्याद्रीमध्ये (म्हणजे मी आतपर्यंत अनुभवलेल्या) पाण्याची सर्वांगसुंदर व्यवस्था मला इथे दिसली...अफलातून 👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  9. साई जबरदस्त! 💐💐💐

    ReplyDelete
  10. जोरदार ! जबरी !! जबराट !!! जबरदस्त !!!!
    दर्जेदार लिखाण, संपूर्ण अवशेषयुक्त आणि निवांत भटकंती मुळे सर्व अभ्यासताना वेगळी मजा आली असेल.
    १. अलन्ग च्या खालील (आंबेवाडी बाजूने- ३० फुटांच्या इथली) जी गुहा आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
    २. त्याच गुहेत कमीत कमी १५ ते २० जण सहज झोपू शकतील इतकी जागा आहे.
    छोटा कुलंग चढाई थरथराट. ( इथे रोप ची आवश्यकता आहे का ? )
    कधी तरी एखाद्या तगड्या भटकंतीला साद घालत जा. दोन जास्त अनुभव मिळतील. भटकंतीचे नवे पैलू उलगडतील.

    ReplyDelete
  11. साई: ब्लॉग फारच भारी जमलाय! A real masterpiece of artistry in writing!
    माझा मते, तुझा आज परंतचा ब्लॉग्स मधला हा सर्वोत्तम ब्लॉग आहे, अस म्हणायला हरकत नाही!
    Best is yet to come, but to me this is your best work of art till date!👌🏻

    ReplyDelete
  12. अनुपकाका,
    गुरुवर्य ढमढेरेकाका,
    तनुजाजी,
    आनंदसर,
    चेतनजी,
    श्रीकांतजी,
    संदिप,
    तुषार,
    देवा,
    निनाद्राव,
    मुकुंद,

    खूप खूप खूप धन्यवाद! आनंद वाटला..
    जबरदस्त दिग्गज ट्रेकरमंडळींमुळे माझ्या सामान्य भटक्याच्या कुवतीबाहेरचा AMKचा स-म-ग्र ट्रेक साध्य झालेला..
    AMKच्या थ्रीलच्या साचेबंद इमेजमुळे आणि घाई-गडबड ट्रेककार्यक्रमांमुळे ‘दुर्गस्थापत्या’कडे ट्रेकर्सचं दुर्लक्ष होतं. तेही मांडायचा प्रयत्न केलाय. ट्रेकर्सना मदत होईल (पण स्वत: वाटा शोधण्याच्या आनंदाचा रसभंग होणार नाही); इतपत मोजकी माहिती आणि अनुभव लिहायचा प्रयत्न केलाय.
    पुनश्च धन्यवाद! :)

    ReplyDelete
  13. @ Sai and team- लेख वाचल्यानंतर मला माझ्या AMK trek ची आठवण झाली.....feeling nostalgic... very well drafted (Word to word).

    ReplyDelete
  14. अप्रतिम ट्रेक आणि त्यापेक्षा अप्रतिम लिखाण... नेहमीप्रमाणे उत्तम...

    ReplyDelete
  15. Sundar Warnan, Apratim Likhan

    ReplyDelete
  16. निवांत फुरसत से हा ब्लॉग वाचून काढला...
    झक्कास लिहिलं आहेस... बरोबर मागच्या वर्षी आपण तिकडे होतो आणि आत्ताही ब्लॉग वाचल्यावर तिकडे असल्याचा फिल आलाय...
    तपशीलवार माहिती दिली आहेस... जबरदस्त ...

    ReplyDelete