Pages

Saturday, 21 July 2018

गूढ साहसी भुयारलेणींचे अनुत्तरीत कोडं

गूढ साहसी भुयारलेणींचे अनुत्तरीत कोडं     


*** इंद्रायणीच्या नाणेमावळात कार्ले लेण्याभोवतीच्या दुर्लक्षित लेणी धुंडाळण्याच्या मोहिमेचा तिसरा आणि अंतिम टप्पा. इंग्रज अभ्यासकांची लेण्यांबद्दल अर्ध्या ओळीची त्रोटक नोंद. रानोमाळ वणवण करून दुर्गम-गूढ भूयारांना दिलेली साहसी भेट. लेण्यांच्या न सुटलेल्या जिग-सॉ कोड्यामध्ये चक्रावून गेलो, पण निखळ आनंदही आहे ***

कार्ले डोंगररांगेत ईशान्य बाजूची लेणी
गेले कित्येक महिने नाणेमावळात कार्ले लेणे परिसरात विखुरलेल्या अल्पपरिचित लेणेविहारांना धुंडाळण्याच्या प्रकल्पाने आम्हांला झपाटून टाकलेले. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कार्ले डोंगररांगेच्या दक्षिण बाजूच्या लेणी-विहारांची (वळवण-देवघर-वाकसई-शिलाटणे-टाकवे-वाळक) लेणे-टाक्यांची साखळी समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला. दुसऱ्या टप्प्यात कार्ले-भाजे परिसरात विखुरलेल्या लेण्यांना – ‘पाटण लेणी’ (पूर्व आणि पश्चिमेचे चैत्यगृह, दक्षिणेचा अर्धवट विहार) आणि ‘साई लेण्या’ला भेट दिलेली. एव्हाना, ट्रेकर म्हणून आम्हांला होणाऱ्या भूगोलाच्या आकलनापलिकडे, या लेण्यांना समजावून घेताना आम्ही गोंधळून जाऊ लागलो. अभ्यासक ‘साईली पलांडे-दातार’ आणि ‘डॉ श्रीकांत प्रधान’ आमच्या बाळबोध प्रश्नांना न कंटाळता उत्तरं देत होतेच.

मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात मात्र अजून बुचकळ्यात पाडणारे कोडे सामोरं आलं. आता शोधून काढायची होती कार्ले लेण्याच्या ईशान्येची लेणी. संदर्भ होता “The Cave Temples of India (London, 1880)” नामक जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक ओळीची नोंद. मग स्थानिक ट्रेकरमित्रांची मदत आणि ग्रामस्थांच्या मदतीने कार्ले डोंगररांगेच्या ईशान्य बाजूची भटकंती आम्ही कशी केली. या अनवट जागा खरंच सापडतील का, याची हुरहूर लागलेली. कधी प्रयत्न फसले, तर कधी अत्यंत गूढथरारक लेणेभूयारांची अनुभूती कशी घेतली, त्याचा हा आलेख.

सुरुवात झाली फर्ग्युसन-बर्गेस यांच्या नोंदीपासून. नोंद अग्गदीच त्रोटक - “कार्ले लेण्याच्या ईशान्येस काही एकांडे लेणेविहार आहेत”. मग गुगलबाबांच्या मदतीने कार्ले डोंगररांगेच्या ईशान्येचे डोंगर-गावं झूम करून बघायला लागलो. डोंगररांगेच्या पायथ्याची शिरोटा धरणाजवळ वसलेली सांगीसे, वेल्हवली, नेसवे आणि खांडशी अशी गावं हेरली. या गावांलगत लेणी शोधता येतील असा बेत ठरू लागला. नेहेमीप्रमाणे अमेयने त्याचे संपर्ककौशल्य वापरून स्थानिक ट्रेकरमित्रांना संपर्क करणं सुरु केलं. सांगीसे गावच्या ‘श्री संग्राम रमाकांत गरुड’ यांच्याकडून ‘वेल्हवलीला रस्त्याजवळच्या डोंगरात आहेत एखाद-दोन भुयारं-गुहा’, अशी माहिती मिळाली. त्यामुळे, प्रत्यक्ष भेटीसाठी एव्हाना प्रचंड आतुरता दाटलेली.

आणि, मग लवकरात लवकर कूच केलं नाणेमावळच्या अजून काही लेण्यांच्या भटकंतीसाठी. कामशेत गाठलं. कार्ले डोंगररांगेच्या ईशान्येला जाण्यासाठी शिरोटा धरणाचा रस्ता घेतला. इंद्रायणीचा पूल पार केला. हायवेवरचा ट्रक्सचा गोंगाट मागे पडलेला. उन्हाळा असूनही मावळातली सकाळ गार वाऱ्याने तजेलदार होती. गवताच्या तुऱ्यावरचे दवबिंदू कोवळ्या उन्हांत लकाकू लागलेले. शेताडीत कुठे राब जाळायची, कुठे पावसाआधी शेत नांगरून ठेवायची लगबग चाललेली, तर कुठे पावसाचं पाणी भातखाचरातून फिरवण्यासाठी बांध घालणे-डागडूजी करणे चाललेलं.

कार्ले लेण्यापासून पूर्वेला धावणारी डोंगररांग दिसू लागली. डोंगररांगेच्या पूर्व टोकाला वाळक लेण्यांना रामराम करून वळसा घालत रस्ता खोऱ्यात आत शिरू लागला. सांगीसे गाव मागे टाकत वेल्हवली फाटा गाठला.   

वेल्हवली भुयारलेणे
पश्चिमेकडून पूर्वेला धावणाऱ्या कार्ले डोंगररांगेपासून निघून उत्तरेला वेल्हवलीकडे एक दांड उतरत येतो. दांडाच्या उतारावर ५० मी उंचीचा गोलाकार कातळटप्पा दिसत होता. पायथ्यापासून कुठल्या लेण्याचा मात्र अंदाज येत नव्हता. 

वेल्हवली फाट्यापासून रस्त्याने थोडं पुढे जाऊन लेणेभुयाराबद्दल चौकशी केली. शेरड्यांना चारायला नेणाऱ्या एका मावशींना आम्ही कसली गुहा शोधतोय, याची अचूक खुण पटली. त्यामुळे वाट समजावून घेता आली. करवंदीच्या जाळ्यांमधून ५० मी चढाई करून वेल्हवळी दांडावरच्या पदरात पोहोचलो. तिरक्या सपाटीवर गच्च गवत माजलेलं. तरीही, समोरच्या कातळटप्प्यात चौकोनी गुहा आमच्या नजरेतून सुटली नाही.

गुहेपाशी पोहोचणे अडचणीचे होते. डावीकडून चढण्याचा प्रयत्न काटे-जाळ्यांमुळे सोडला. काट्यांच्या जाळ्यांमधून मार्ग काढत आता उजवीकडच्या कातळातून ओहोळातून मार्ग काढत कातळपट्ट्याच्या पोटात पोहोचलो. 

किंचित डोकावणाऱ्या २० मी कातळटप्प्याच्या पोटातून गुहा शोधत डावीकडे निघालो 

आणि अखेरीस दृष्टीक्षेपात आली चौकोनी गुहा. हुर्रे!!!

गुहा नैसर्गिक की मानवनिर्मित असेल आणि त्यात नक्की काय गवसतंय, याची विलक्षण उत्सुकता लागलेली. प्रथमदर्शनातंच नेहेमीच्या लेण्यांसारखी ही जागा नाही, हे ध्यानात येऊ लागलं. 
       
पहा व्हिडीओ:

गुहेत वटवाघळे-साळींदर-वन्यजीव नाही ना, यासाठी गुहेच्या एका बाजूला थांबून हाकारे टाकले. भुयारात शिरायला तयार झालो. विवेकसरांनी ताकदीचे टॉर्च आणि काठी आपटत भुयारात प्रवेश केला. तीव्र प्रकाशझोतामुळे गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या विस्ताराचा अंदाज येऊ लागला. चौकोनी आकारात खोदलेली ओबडधोबड साधी खोदाई. भुयारात शिरणाऱ्या नैसर्गिक प्रकाशामुळे छताकडचा ओबडधोबड खोदाईचा भाग एकापाठोपाठ कमानी वाटाव्यात असा प्रकाशित झालेला. 

पायथ्याला माती-बारीक दगडांचा मार्ग. मुद्दाम केलेली सपाटी इथे नाहीये. शुद्ध बेसाल्ट खडकातून पहार की साध्या ताकदीचा सुरुंद वापरून खोदाई केलेली. खोदाईतून निघणारा दगड-माल पूर्णपणे बाहेर न काढल्याने, भुयाराच्या मार्गावरच पसरलेला. 

चालताना पायाखालचे दगड गडगड हलून, एकमेकांना घासून आवाज होत होता. त्याच्यावरून चालताना चांगलीच कसरत होत होती. खडकाच्या खोदाईवर दोन टॉर्चचे झोत पडून प्रकाश-सावल्यांचे अजब गूढ आकृतीबंध नाचत होते. सरांच्या चाहुलीने- टॉर्चप्रकाशाने समाधी भंग पावलेल्या वटवाघूळ फडफड करत आमच्या बाजूने निघून गेलं. त्या अनपेक्षित क्षणामुळे कोणीतरी दचकणे आणि नंतर ट्रेकर्सनी खिदळणे हवेच. ठिकठिकाणी सुरुंग-पहार लावल्याच्या ६-१२ इंच खोल अश्या खुणा-छिद्रे होत्या. 

अखंड भुयाराचा भार खांबांशिवाय सहज पेलतं अश्या बेसाल्टचं अंतरंग, खडकाचा पोत आणि त्यातले बदलते रंग, खोदाईमुळे क्वचित उघड झालेल्या मोकळ्या जागा, एखादी तीरासारखी गेलेली क्वार्ट्झची रेषा, पल्याड चमकणारी एखादी स्फटिककुपी – सारंच कवतीकाने न्याहाळत होतो. 

विशेष म्हणजे कार्ले डोंगररांगेच्या उत्तरबाजूच्या लेण्यांच्या खोदाईमध्ये ज्या प्रकारे छिन्नीचे घाव दिसतात, तसे छिन्नीचे घाव कुठेच नव्हते. 

पाण्याचे टाके-शिलालेख-वस्तीच्या खुणा नाहीत. सलग ७० फुट आत भुयारात गेल्यावर झाल्यावर डावी-उजवीकडे छोट्या गुहा खोदलेल्या. 



विवेकसरांच्या मार्गदर्शनाखाली भुयाराची तपशीलवार मोजणी आणि फोटोग्राफी केली. 

वेल्हवली भुयारलेणी - रेखाटन (कृतज्ञता: विवेक काळे सर)

गुहेतून बाहेर डोकावल्यावर दिसत होतं नाणेमावळाचं दृश्य. 

एकंदर अत्यंत गूढ भुयार-गुहा. त्यामुळे टीम बेहद्द खूष!
 

------------------------------------------------------------------------
         
नेसवेची जुनी विहीर. लेण्याच्या शोधात भिरीभिरी भ्रमंती
वेल्हवलीमधून आता गाडीरस्त्याने पश्चिमेला निघालो. नेसवे गावाच्या अलिकडे वळणावर झाडीत लपले होती चौकोनी आकाराची बांधीव जुनी विहीर. 

बाजूला शिवपिंड-नंदी-गणेशमूर्ती. 

रेखीव कटाईचे चिरे वापरून बांधलेली चौकोनी आकाराची खोल विहीर. 

विहिरीत उतरत जाणाऱ्या ८-१० पायऱ्यांचा अरुंद मार्ग पुढे डावीकडे वळला. पुढे ३० पायऱ्या उतरल्यावर कमानीपल्याड चौकोनी विहीरीच्या पाण्याजवळ नेत होत्या. 

उपसा नसल्याने आणि विहिरीचे दगड ढासळल्याने पाणी खराब झालेलं. उथळ झालेलं. कोण्या काळी बांधलेली ही विहीर जुन्या काळाची आठवण जागवणारी. कोणी खोदलेली असेल ही विहीर. इथल्या पूर्वजांची, वाटेवरच्या कोण्या पांथस्थांची-व्यापाऱ्यांची, गाई-गुरांची तहान भागवली असेल. किती उत्सव-गप्पा की संघर्ष रंगले असतील, या पाण्याच्या आसऱ्याने... कोणास ठावूक! 
         
कार्ले लेण्याच्या ईशान्येला असलेल्या मानवनिर्मित गुहांपैकी एखादी गुहा नेसवेच्या डोंगरात आहे का, हे शोधायचं होतं. ‘कुठे गडद-पांडवलेणी आहेत का’, अशी नेसवे गावात ‘भाऊ शिरसाट’ यांच्याकडे चौकशी केली. अश्या संभाषणात आपल्याला अपेक्षित असलेली मानवनिर्मित गुहा-लेणी आणि गावकरी सांगत असलेली कुठलीशी गुहा यात कधीकधी तफावत होते. तसंच काहीसं झालं. रानमेवा खात आणि रानफुलं न्याहाळत नेसवेच्या डोंगरामध्ये १५० मी केली. कधी झाडीखाली भेटला रानदेव, तर कधी विशाल वृक्षांच्या दर्शनाने भारावून गेलो. 

लेण्याच्या शोधात भिरीभिरी भ्रमंती झाली. 

लेणं-भूयार आम्हांला गवसलं नाही. (अर्थात, पुढे कधीतरी नेसवेला गुहा सापडल्यास आश्चर्यही वाटू नये. शक्यता २०%.) लेणे भटकायच्या मोहिमांमध्ये हे असले ‘फॉल्स अलार्म्स’ असले, तरी त्याचा त्रागा न होता मावळाच्या निसर्गाची सुरेख भटकंती झाली, याचाच आनंद मोठ्ठा!   

------------------------------------------------------------------------

खांडशीचे गूढ थरारक भुयारलेणे १
नेसवेपासून पुढे जात पश्चिमेला खांडशी गाव गाठलं. कौलारू राऊळातल्या काळभैरवाचं दर्शन घेतलं. 

गावात पोराटोरांना लेण्यांची माहिती नव्हतीच. गुहा-गडद ऐकल्यावर शेजारचे दुकानदार काका राऊळाच्या चौथऱ्यावर आले. आम्हीही सरसावलो. ‘घरांच्या मागे त्या तिथे डोंगुरात लवण दिसतं का, तिथे आहे की एक गुहा आणि धबधबा. पण आता या वक्ताला नाही मिळायचं पाणी पोहायला. असं करा या पावसाळ्यात परत‘. कर्म! आमचा लेणी भटकायचा उद्देश त्यांना कळेना, आणि ते दाखवताहेत ती गुहा नैसर्गिक की मानवनिर्मित याचा आम्हांला अंदाज येईना. तेवढ्यात दुसरे एक मामा आले. ‘पांडवांनी खोदलेली गुहा शोधतोय’, असं म्हटल्यावर मामांनी मान होकारार्थी हलवली. गावाच्या नैऋत्येला हात दाखवला आणि वाट समजावून सांगितली. कार्ले डोंगररांगेपासून खांडशीच्या पश्चिमेला एक सोंड उतरत आलेली. सोंडेच्या पदरात झाडी आणि कातळटप्प्यांचा उतार दिसत होता. मामांकडून ऐकलेल्या माहितीनुसार थोरल्या आंब्यापासून चढल्यावर तिरकं जात, उतरंडीच्या कातळात शिंदीच्या झाडाच्या वरच्या भागात (म्हणजे खांडशीच्या नैऋत्येला) गुहा सापडणं अपेक्षित होतं. 
       
वाटा फारश्या मळलेल्या नव्हत्या. शिंदीच्या झाडाजवळ वरती कातळात गुहा असेल, या गृहितकावर शोधाशोध चालू होती. कातळावरून-जाळ्यांमधून-घसाऱ्यातून धसकफसक करत शोध चाललेला. गावापासून २०-२५ मिनिटात ७० मी उंचीची आडवी-तिरकी चढाई करून, तिरप्या कातळाजवळ पोहोचलो. आणि, अखेरीस नजरेस पडली कातळाच्या पोटात पूर्वाभिमुखी चौकोनी गुहा!!! 

काळ्या कातळावरचे पहार-सुरुंगाचे घाव, गवताची झुंबाडे, बुटक्या उंचीच्या खोदीव भुयाराचे मुख आणि मुखापाशी बांधलेली दगड-चिखलाची भिंत नजरेस पडली. 

हेही नेहेमीसारखं लेणं नसून वेल्हवळीसारखं गूढ खोदीव भुयार आहे, अशी लक्षणे दिसू लागली. पहा व्हिडीओ इथे:
          
उत्साहात आम्ही पुढे सरसावलो. गुहेत कदाचित वास्तव्य करणाऱ्या वटवाघळे-साळींदरे-वन्यश्वापदे यांना हाकारे घालून आणि काठी आपटून आम्ही आल्याची वर्दी दिली. निवडूंगापासून पुढे येत भुयाराचे मुख कश्या रीतीने दोन्ही बाजूंनी दगड-चिखलाची भिंत बांधून – कदाचित जनावरं आत शिरू नये म्हणून - अरुंद केलंय, ते न्याहाळलं. मूळ लेणे खोदल्यानंतरच्या काळात ही भिंत नव्याने कोणी बांधली असेल, असा अंदाज आम्ही बांधला.
     
वाकून किंवा रांगत भुयारात प्रवेश केला. तळाशी वाळलेला चिखल-माती-दगड पसरलेले. भिंती आणि छताची अर्धगोलाकार अशी ओबडधोबड खोदाई. तळापासून साधारणत: एक फुट उंचीवर भिंतींवर पांढरे पट्टे – गुहेत पाणी साठत असेल का? साठणाऱ्या पाण्याच्या खुणा असतील का या? खोदकामात सफाईदारपणा अजिबात नव्हताच. ठिकठिकाणी कातळावर पहारीचे-सुरुंगाचे घाव असल्याने भुयार मानवनिर्मित निश्चित. मात्र छिन्नी-हातोड्याचे घाव कुठेच नव्हते. 

२० फुट आत दगड-चिखलाने बांधून काढलेली अजून एक भिंत. भुयारातून वाकून चालत जाताना धाप लागू लागलेली.

भुयाराच्या आतल्या भिंतीपल्याड वाकून गेल्यावर आणखी २० फुट खोल भुयाराचा शेवट असेल असे भासत होते. 

प्रत्यक्षात मात्र भुयार ९० अंशात डावीकडे खोदत नेलेले. इथे तळाशी चिखल-दगडं नसून बारीक रेती होती – कदाचित वटवाघळांच्या विष्ठेमुळे. वाकून जाताना चांगलीच धाप लागू लागली. अर्धगोलाकार आकारातील भुयार किंचित चढ चढत आणखी १५ फूट आणि त्यापुढे परत एक वळण. आपल्याच चालीने हवेत उधळलेली धूळ-माती टॉर्चच्या प्रकाशात तरंगताना दिसू लागलेली. मनाच्या कोपऱ्यात डोकावणाऱ्या कुठल्याश्या अनामिक भीतीवर भुयारगुहा समजावून घ्यायच्या कुतुहलाने मात केलेली. यावेळी ९० अंशात उजवीकडे वळून १२ फुट लांबीवर शेवटी ८ फुट व्यासाचा मोठ्ठा गोलाकार खळगा खोदलेला. कदाचित ध्यानगुंफा. वटवाघळांनी फडफड करून, आमचं आगमन आवडलं नसल्याची पावती दिली. वटवाघळांच्या ध्यानसाधनेत व्यत्यय आणल्याबद्दल, मनोमन दिलगिरी व्यक्त केली.
       
खांडशी लेणी १ - रेखाटन (कृतज्ञता: विवेक काळे सर)

एव्हाना भुयारात ऑक्सिजन थोडा कमी पडू लागल्याने, गुदमरायला लागलेलं. रांगत रांगत भुयाराबाहेर पडताना शीण जाणवू लागला. उजवीकडून भुयाराच्या बाहेर सूर्यप्रकाश दिसल्यावर बरं वाटलं. गुहेबाहेर पडल्यावर उन्हाची तिरीपही बरी वाटू लागली. अश्या भुयाराची खोदाई कश्यासाठी, याचा अंदाज बांधता येईना. ध्यानगुंफा असेल, तर किती गुदमरून जायला होईल. साधारणत: लेण्यांमध्ये दिसणाऱ्या खुणा, म्हणजे छिन्नी-हातोड्याचे घाव, शिलालेख, पाण्याचे टाके, बाक, विहार आणि निवासाच्या काही खुणा, असं काहीच सापडलं नव्हतं. पहार-सुरुंगाच्या खुणा बघता, ही भुयारे कोणी काहीशे वर्षांपूर्वी लपण्यासाठी किंवा लपवण्यासाठी खोदली असतील का? असो, अनेक अनुत्तरीत प्रश्न. गूढरम्य लेणेभुयाराच्या दर्शनाने आमची टीम बेहद्द खूष झालेली!

खांडशीचे गूढ थरारक भुयारलेणे २
खांडशीचं गुहाभुयार सापडल्याच्या आनंदात विजयी मुद्रेने खांडशी गावात प्रवेश केला. ‘श्री आबाजी भावरी’ घराबाहेर आमची वाटच बघत होते. ‘भेटल्या का दोन गुहा?’ या आबाजींच्या पहिल्याच प्रश्नाने आम्ही सपशेल क्लीनबोल्ड - ‘दोन गुहा कुठून आल्या? एकंच आहे ना?’ एकाच वेळी काहीच्याकाही वाटलं, म्हणजे एक भुयार पाहायचं राहिल्याची हळहळ, अजून एक भुयार नक्की कुठे-कसं असेल याची उत्सुकता, परत एकदा उन्हात वणवण करत जावंच लागणार यामुळे थोडा कंटाळा, पण तरीही अजून एक भुयार माहित असलेला माणूस भेटल्याचा आनंद!!! 


काळभैरवाच्या राऊळाच्या सावलीत घरून आणलेली शिदोरी सोडली. जेवतानाही विषय एकंच गुहा-भुयारे-लेणी. दोन घास खाऊन तरतरीत झालेली. आबाजी आमच्यासोबत लेणी दाखवायला यायला तयार झाले. आबाजीच्या मते खांडशीच्या दक्षिणेला धबधब्याच्या पोटात एक गुहा आणि पश्चिमेला आम्ही पाहिलेल्या पहिल्या भुयाराजवळ अजून एक भुयार बघायचे होते.

दक्षिणेला धबधब्याच्या पोटातली गुहा पाहण्यासाठी वणवा लागलेल्या पठारापल्याड उंचच उंच चढाई केली. 

आबाजी शिरोटा-राजमाची भागात ट्रेकर्ससोबत फिरले असल्याने, आमच्यासोबत त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या. 

चढावर चांगलं घामटं निघाल्यावर, वळणावरच्या बारीक आडव्या वाटेसमोर धबधब्याच्या पोटातली गुहा दिसू लागली. 

जागा सुंदर, पण गुहेत मानवनिर्मित खोदाईच्या खुणा काहीच नव्हत्या. पुन्हा एकदा ‘फॉल्स अलार्म’ – म्हणजे लेणी सापडण्याची आशा लावून हुलकावणी मिळालेली. 

आमची फार निराशा वगैरे काही झाली नव्हतीच, पण आम्ही शोधतोय ती गुहा ही नाही, याचा अंदाज बाबाजीना आला. ‘आम्ही गावाकडची लोकं. तुम्हांला नाही फसवणार’, असं काहीतरी बोलू लागले. खरंच, किती शुद्ध मनाची माणसं! त्यांना समजावलं की आमचा काहीच गैरसमज नाही. खरंतर, वेध लागलेले खांडशीच्या नैऋत्येच्या आम्ही न बघितलेल्या दुसऱ्या लेणे-भुयाराचे.

डोंगराची पूर्ण उतराई न करता बाबाजी आम्हांला पश्चिमेला घेऊन निघाले. समोर होतं खोऱ्यातले खांडशी गाव आणि पाठीमागे शिरोटा धरणाचं विहंगम दृश्य. 

पदरातल्या झाडीतून हलकेच उतरवत, आडवं जात बाबाजीने आम्हांला खांडशीच्या नैऋत्येच्या तिरप्या कातळाजवळ आणलं. वाऱ्याच्या झोतासोबत झाडा-झुडुपातून घुमत येणाऱ्या करवंदीच्या नाजूक फुलांचा गंध सुखावत होता. वळणावरच्या वाळलेल्या गवतामधून-खोडांमधून दिसणाऱ्या कातळाच्या पोटातल्या गुहाभुयाराच्या दर्शनाने मी भारावून थबकलोच. 

बाबाजीना मात्र खात्री पटत नव्हती, की आता हे भुयार बघून तरी आमचं समाधान होणार की नाही. ७० अंशात उतरणाऱ्या कातळावर वाहत्या ओहोळाच्या पाण्याच्या खुणा उमटलेल्या. पाण्याचा प्रवाह जिथून वाहतो त्या ४० फुटी कातळपथावर अधूनमधून पहार-सुरुंगाचे घाव घातलेले आणि खाली ओहोळाखाली कातळात चौकोनी खोदाईचे गुहाभूयार. जुन्या वास्तू-लेण्यांपाशी दिसणारा कचरा, गुटख्याच्या पुड्या किंवा कोरलेली नावे असं इथे काहीच नव्हतं.

पायथ्यापासून दीडेक फुट उंचीवरून भुयाराची खोदाई सुरु झाली. ओबडधोबड खोदाईची साधारणत: चौकोनी खोदाई. ठिकठिकाणी पहार-सुरुंगाच्या खुणा. भुयारात प्रवेश करण्यास आम्ही आतुर आणि सज्ज झालेलो. 
पहा व्हिडीओ इथे:

साधारणत: ४० फुट खोल भुयाराचा विस्तार शक्तिशाली टॉर्च वापरल्याने लक्षात येत होता. द्वारापाशी आणि भुयारात खोदाईतून काढलेले माल-मोठाले दगड सांडलेले, बाहेर न काढलेले. मुखापासून २५ फुट खोलीवर उजवीकडे खोदलेला गोलाकार आणि किंचित डावीकडे वळणारा मार्ग दिसू लागला. वाकून नव्हे अक्षरशः रांगून या मार्गावर निघालो. तळाशी खूप दगड-रेती सांडल्याने हालचाल करणं अतिशय जिकीरीचे होते, त्यामुळे अक्षरश: धाप लागलेली. काळ्याकुट्ट अंधारात टॉर्च बंद केल्यावर मिट्ट अंधार झाला. कोणीतरी कधीतरी आत काटक्या पेटवून जाळ केलेला. १५ फूट खोलीनंतर टोकाशी ५ फूट व्यासाचा गोलाकार खळगा होता. 
खांडशी लेणी २ - रेखाटन (कृतज्ञता: विवेक काळे सर)

जिथून आत आलो, तो मार्ग हालचालीमुळे उधळलेल्या धुळीने माखलेला. भुयाराचे निरीक्षण करून बाहेर आलो आणि मोकळ्या हवेने जीवात जीव आला. साधारणत: लेण्यांमध्ये दिसणाऱ्या खुणा, म्हणजे छिन्नी-हातोड्याचे घाव, शिलालेख, पाण्याचे टाके, बाक, विहार आणि निवासाच्या काही खुणा, असं काहीच सापडलं नव्हतं. खांडशीच्या दुसऱ्या गूढरम्य लेणेभुयाराच्या दर्शनाने आमची टीम बेहद्द खूष झालेली! 

खांडशीला परत आलो, तेंव्हा गाईड बाबाजींना मानधन दिलेच आणि मनोमन आभार मानले, कारण या गिरीजनांमुळेच आम्हांला अनवट लेण्यांचं दर्शन झालेलं.


कार्ले डोंगररांगेत ईशान्य बाजूच्या लेण्यांचे न सुटलेले जिग-सॉ कोडे - निरीक्षणे:
कार्ले डोंगररांगेत ईशान्य बाजूची वेल्ह्वळी आणि खांडशीची मानवनिर्मित भुयारे बघितल्यावर, नाणेमावळाच्या जिग-सॉमधले आमच्या गटाला पडलेले (आणि न सुटलेले) प्रश्न आणि निरीक्षणे:
१.     काय उद्देश:: ध्यान करणाऱ्या कोण्या साधकांना एकांत मिळावा म्हणून, की कोणाला अज्ञातवासात राहण्यासाठी, की काहीतरी मौल्यवान लपवण्यासाठी? भूयारांच्या शेवटी गोलाकार खळगा केलेला – साधकांसाठी की काही मौल्यवान साठवण्यासाठी? भूयारांजवळ पाण्याची टाकी नसणे, वाकून-रांगत जावे लागावे अशी भुयारांची खोदाई, अंतर्भाग कोंदट आणि दगडधोंड्यांनी भरलेला. त्यामुळे, भुयारे साधकांच्या राहण्यासाठी सुयोग्य नाही वाटत.
२.     स्थान इथेच का: नाणेमावळातल्या गजबजीच्या पुरातन व्यापारी मार्गाजवळ, पण डोंगरापल्याड दडलेला मुद्दाम भाग निवडलेला.
३.     कोणती लेणेवैशिष्ट्य: खोदाईचा दर्जा अतिसामान्य. पहार-सुरुंगाच्या खुणा सर्वत्र आढळल्या, पण लेणे खोदाईत दिसणाऱ्या छिन्नी हातोड्याच्या खुणा अगदी कुठेच नाहीत. वाकून किंवा रांगत जावे लागावे, असे लांबच लांब भुयार. खोदाईनंतर निघणारे दगड भुयारातच विखुरलेले. तळाशी चिखल-माती, तर भिंती आणि माथ्याकडे ओबडधोबड खोदाई. भूयारांजवळ पाण्याचे टाके नाही मिळाले.
४.     कोणत्या काळातली: लेणी खोदताना वापरलेल्या पहार-सुरुंगाच्या वापरामुळे ही कार्ले लेण्यांच्या नंतर काहीशे वर्षांनंतर खोदलेली असावीत.
५.     कोणत्या विशिष्ठ धर्माची: डोंगरापल्याड कार्ले लेण्यांमध्ये आढळणारे बौद्ध धर्मकृत्याचे शिलालेख – स्तूप इथे ईशान्येच्या भूयारांमध्ये नाहीत.
६.     कोणी खोदवलेली – धर्माश्रय, राजाश्रय, व्यापारी हेतू?: धर्माश्रय असल्याची कोणतीही खुण भुयारात नाही. व्यापारी मार्गाजवळ नसल्याने व्यापारी हेतू नसावा. राजाश्रय मात्र नक्कीच असावा. पण कोणाचा?
७.     विलग की कार्ले समूहातील: पल्याडच्या कार्ले लेण्यांमध्ये आढळणारी शिलालेख-धर्मचिन्हे-स्तूप-विहार-टाकी इथे नाहीत. त्यामुळे कार्ले लेण्यांशी ही लेणी संबंधित नसावीत. मात्र वेल्ह्वळी आणि खांडशीच्या दोन भूयारांमध्ये खूप साम्य असल्याने, ही ३ भुयारे मात्र एका साखळीतली.

कार्ले डोंगररांगेत ईशान्य बाजूची वेल्ह्वळी आणि खांडशीची मानवनिर्मित गूढ लेणी-भुयारे धुंडाळताना विलक्षण अनुभूती मिळालेली. कल्पनाशक्तीच्या पलिकडचं भूयारांमध्ये दडलेलं अंधाराच्या साम्राज्याचं जग अनुभवताना चक्रावून गेलेलो, भारावून गेलेलो; तरीही निखळ आनंद अनुभवलेला... 

(पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा)
------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेकर मंडळी: विवेक काळे सर, अमेय जोशी, निनाद बारटक्केमिलिंद लिमये, दिलीप वाटवे, दिलीप गपचूप आणि साईप्रकाश बेलसरे.
२. मन:पूर्वक कृतज्ञता: मयूर तिकोने (पाटण), आबाजी भावरी (खांडशी), संग्राम गरुड (सांगीसे), सचिन शेडगे (कामशेत), साईली पलांडे-दातार (पुणे)
३. ब्लॉगपोस्टचा हेतू "आम्हीच नवीन लेणे शोधले", असा अजिबात नाही. ट्रेकर-इंडॉलोंजिस्ट दोस्तांबरोबर अनुभव शेअर करणे हा आहे. लेण्यांबद्दल अधिक माहिती/ आधीचे संशोधन/ डॉक्युमेन्टेशन कोणाकडे असेल, तर अवश्य अवश्य कळवावे.
४. लेणी आराखडे: विवेक काळे सर
५. मावळ नकाशा आणि ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे.
६. या भुयारांना फक्त अनुभवी ट्रेकर्सनी पूर्ण तयारीनिशी भेट द्यावी. शक्यतो उन्हाळ्यात या गुहालेण्यांना भेट देणे योग्य. वावर अजिबात नसल्याने, सरिसृप-वटवाघळे-श्वापदे यांचा वावर असू शकतो. अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक. शरीर पूर्ण झाकतील असे कपडे, ताकदीचे टॉर्च, काठी आवश्यक. भरपूर पाणी सोबत असावे.
७. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असूनजबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
८. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे२०१८. सर्व हक्क सुरक्षित.


No comments:

Post a Comment