Pages

Monday, 29 September 2014

पाचूच्या हिरव्या माहेरी...



… पाचूच्या हिरव्या माहेरी - आमच्या मावळातल्या - पावसाळी भटकंतीचं मुक्त वर्णन… 


-----------------------------------------------------------------------------------------------------
… यंदा पाऊस जरा जास्तंच लांबला...
जुलै महिन्यातही ऊन अग्गदी मनस्वी तापलेलं
आभाळात विखुरलेले चुकार ढग मॉन्सून येण्याच्या तुता-या वाजवत नुस्तेच गडगडाट करताहेत
सावली म्हणून तर या ढगांचा उपयोग नाहीच, पण आर्द्रतेने आणि तहानेने जीव अधिकंच व्याकूळ होत चाललेला
(प्र.चि. साभार - साकेत गुडी)

अर्थात, ट्रेकर्सना घरी कसं बसवणार...
जिवलग मित्रांची साथ, उत्तम बाईक्स, पाठपिशवीत थोडका खाऊ आणि दाटून आलेले गच्च काळे ढग... पाचूच्या हिरव्या माहेरी – मावळातल्या सदाहरित अस्पर्शित ठिकाणांच्या घुमचक्करीला अजून काय हवं!
रेल्वे क्रॉसिंग अन पुढे दुथडी भरून वाहणार्‍या नदीवरचा पूल पार केला, अन शिरलो थेट मावळात. पाऊस ४-६ दिवस सलग बरसला, की नदीचं मातकट पाणी पूलाला गिळंकृत करतं आणि मग पुढच्या खोर्‍यातल्या सगळ्या गावांचा संपर्कच तुटतो.

अर्ध-कच्च्या नागमोडी रस्त्यावरून हरीतगृहं मागे टाकत, मावळातल्या गावांना जोडणारा झाडीभरला, वळणावळणांचा, छोटासा डांबरी रस्ता आणि त्याच्याशी लगट करणारे छोटे-मोठ्ठे ओहोळ.
‘थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर’ असं गुणगुणायला लागलो...
वाट विचारायला जरा थबकलो, तर भेटली पाहुने, कोन गाव आपलं... अशी आपुलकीने चौकशी करणारा गुराखी, शेतकरी आणि खट्याळ धम्माल पोरं.

 
 
 
 



बघायला मंदिरं-लेणी-किल्लेच पाहिजेत असं काही नाही. नुस्तं निवांत भटकायला निघालेलो.. सोबत होती भातखाचरांची. समोर डोंगररांगेवरून झेपावणारा अस्सल ठेवणीतला जलस्तंभ धबाबा कोसळत होता.

डावी-उजवीकडे पहाड उंचावत, अन रस्त्याच्या जवळ येत गेले, खोरं अरुंद होत गेलं. अगदी रस्त्याला लागूनच छोट्या ओहोळांपासून ते अजस्त्र धबधब्यांपर्यंत नाना त-हा.. एका वळणावर करकचून ब्रेक मारला. समोरचा अशक्य वेड लावणारा कातळ आणि झेपावणारं शुभ्र वैभव.
मावळातलं एक साधं, पण कित्ती देखणं गाव!



गावातच गाड्या लावल्या. घमघमणार्‍या भाताच्या शेताडीतून पाऊलवाट तुडवत निघालो.

‘शहा-यांचे रान आले एका एका पानावर’ असा माहोल.

भाताच्या खाचरात एकच लगबग चालू होती.

पावसाळ्यात दिसणारे खास कंद गौरीचे हात आणि सापकांदा डोकावत होते. उंच डोंगरांच्या पायथ्याशी उठून दिसणार्‍या, काळ्या खडकात बांधलेल्या राऊळापाशी पोहोचलो. गाभारयातल्या विशाल शिवापिंडीचं मनोमन दर्शन घेतलं अन ‘शंभो शंकरा’ गीताच्या धीरगंभीर स्वरांनी गाभारा ओतप्रोत भरून गेला...
मंदिरामागे खळाळणार्‍या आवाजाकडे गेलो, तर काय निसर्गाची किमया! भोवतालच्या सर्व डोंगरांवरच्या पाण्याचे लोट एका ओढ्यातून खळाळत निघाले होते. 
 

वर्षा-धारांचं दान कातळामध्ये घुमून-घुमून कुंडंतयार झाली होती. एक कुंडं भरलं की त्यानं अलगद दुसर्‍या कुंडाकडे पाण्याची जबाबदारी सोपवावी; दुसरे कुंड भरले की त्याने तिसर्‍या कुंडाला पाण्याचं दान द्यावं आणि शेवटी धबधब्याच्या रूपाने खोलवर झोकून द्यावं; अशी अनोखी रचना!


चिखलाळलेल्या वाटेने पहिल्या टेपावर पोहोचल्यावर पाठीमागे शेताडीमधली लगबग इतकी जिवंत अन लोभस वाटते, म्हणून सांगतो.
बहरलेल्या फुलांचं आणि समोरच्या गवतात कोळ्याच्या जाळ्यानं झेललेल्या पावसाच्या थेंबांच्या नक्षीचं कवतिक केलं...

 

झुडुपांमधून डोकावणा-या ‘अग्निशिखे’चं दर्शन प्रसन्न करून गेलं.
माथ्यावरची दाट झाडं ढगात हरवलीत. आणि मगापासून ज्याचा आवाज आसमंतात घुमत होता, तो देखणा धबधबा कातळावरून झोकून देताना दिसला.
फोटो काढण्यात फार वेळ घालवून चालणार नाहीये. कारण, आता ढगांमुळे काळोख दाटून येतोय. पल्याडच्या खोऱ्यातून काळ्या ढगांचा लोंढा काही मिनिटात आम्हाला गाठणार होता.

अन् पावसाचे टप्पोरे थेंब पडू लागतात,
टप्प-टप्प-टप्प... ताड-ताड-ताड... धों-धों-धों...
पाऊस आता ताडताड-ताडताड कोसळू लागला होता. 
पाण्याच्या ओढ्याला ‘ओढा’ का म्हणतात, याचा 'साक्षात्कार' क्षण.

पावसाचे बाण अन् पाण्याचे तुषार मुक्त उधळले होते. माथ्यापासून १०० मी खाली धबधब्याचं रौद्र रूप सामोरं आलं. मुक्तपणे खोल हिरव्याकंच दरीत झोकून देणा-या पाण्याचा मनस्वी हेवा वाटला. दणदण आदळणा-या पाण्याचा आवाज, भोवतीचा गर्द दाट रानवा, पावसाच्या सरीसोबत धाडधाड वाढणारं पाणी, अंगात हुडहुडी भरवणारी थंडी - असा जबरदस्त माहोल!
माथा जवळ येवू लागला, तसं पाऊस ऊणावला.
एका झाडाला बिलगलेल्या ऑर्किडच्या चैतन्याने एकदम दिल खूष!!!
माथ्याकडे बघितलं, झाडाची पानं एकमेकांत हरवली होती.

सात वर्षात एकदा फुललेली कारवी.

भुंग्याची भूणभूण आणि त्याच्या अनोखे रंग..

मगाचा पाऊस आता गायब झालेला, आणि आभाळ स्वच्छ झालेलं. माथ्याच्या अलीकडे पठारावर एक निवांत प्रसन्न क्षण.

फ़ुललेला, बहरलेला, डवरलेला.. मज सखा - सह्याद्री!

साध्या झुडुपात किती किती सुसंगती (सीमेट्री) साधावी...(बारकाईने बघा.)
केवळ-केवळ-केवळ अशक्य!

परतीच्या प्रवासात धबधब्यातला मनसोक्त दंगा, मंदिरात बनवलेली स्टोव्हवरची गरमागरम पावभाजी, कुंडापाशी रंगलेल्या गप्पा, अवचितच मोकळ्या झालेल्या ढगातून पल्याडच्या किल्ल्याच्या कातळमाथ्याचे झालेले दर्शन, ताड-ताड पावसाच्या तडाख्यानंतर कुंडातला तिप्पट झालेला रौद्र प्रवाह, परतीच्या प्रवासात बाईकची हरवलेली किल्ली... अश्या कितीतरी गोष्टींमुळे ट्रेकची रंगत वाढतच गेली होती...

आणि, मग आम्ही अनुभवला आयुष्यातला एक निखळ आनंदाचा क्षण... 
अन, ‘पाचूच्या हिरव्या माहेरी’ आम्ही आकंठ बुडून गेलो... 




© www.discoversahyadri.in, २०१४

17 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम ....ह्या वेळेस पावसात सह्याद्रीत फारशी भटकंती करता आली नाही.
    पण आपले फोटो अन सुंदर वर्णन वाचून त्याची मजा लुटता आली. त्या क्षणात गुरफटुन गेलो अगदी .
    अन मनसोक्त धबधब्यात भिजून हि घेतले ....

    मस्त ..:)

    ReplyDelete
    Replies
    1. संकेत:
      तुझ्यासारख्या कविमनाच्या आणि सह्याद्रीप्रेमीची दाद मोलाची...
      खूप खूप धन्यवाद :) :)

      Delete
  2. shabdach nahit ...khup avadala blog...100 paiki 100 marks

    ReplyDelete
    Replies
    1. अमेय:
      मस्त वाटलं तुझी प्रतिक्रिया वाचून... :)
      सह्याद्री Institute च्या शिकवणीमुळे मार्क्स बरे पडले.. :d

      Delete
  3. मस्त ... लाजवाब फोटोज आणि त्याला तुझ्या सुंदर शब्दांची संगत ... फोटोज तर इतके सुंदर कि मी दोन तीनदा पहिले तरी मन भरलं नाही ... शेवटचा मोराचा फोटो तर क.ड.क ...

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत::
      खूप खूप धन्यवाद मित्रा..
      सह्याद्रीचं सौंदर्य आणि ताजेपणा फोटोज आणि शब्दात मांडायचा प्रयत्न करायचा.
      झेपत नाही, पण आनंद आहे.. :)

      Delete
  4. व्वा … साई, प्रकाशचित्रांच अप्रतीम सादरीकरण आणि त्याला साजेसं शब्दकथन. Keep it Up.

    ReplyDelete
    Replies
    1. अजयकाका::
      ट्रेकला जाताना साध्या Point n’ shoot कॅमेरानी पटापट फोटोज काढलेले... ते सहज सोप्प्या शब्दात बांधले..
      तुम्हांला ब्लॉग आवडला, हे वाचून मस्त वाटले..
      खूप खूप धन्यवाद!!! :)

      Delete
  5. आ… ई… च्या… … गा… वा… त… !!!!!
    क्षणभर मी "आयुष्यावर बोलू काही" (संदीप-सलील) ची व्हीसीडी / डिव्हीडी बघतोय कि काय… असा साक्षात्कार झाला…
    कसं सुचतं रे तुला एवढं जबरी काव्य?
    ब्लॉगपोस्ट ची टायटल तर अगदीचं चपखल बसवलीस…
    अशक्य फोटो… खास करून दुसऱ्या, तिसऱ्या आणि तेहतिसाव्या (हिरव्या पानांमधली काळी फांदी) फोटो चा angle खूपचं आवडला…
    Software Industry मधल्या वॉटरफॉल मॉडेल ची झलक… जुन्या प्रोसेसेसची आठवण सांगून जाते…
    "ओढा" चा लाक्षणिक अर्थ … झकास…
    खऱ्या अर्थाने तू आता "सह्याद्री वर बोलू काही" हा कार्यक्रम सुरु करचं… विंगेमधून आमची साथ असेलचं…
    फ्रेश झालो…

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू:
      कित्ती छान दाद दिलीये..
      अर्थात....
      - मी कवी वगैरे नाही रे, पाडगावकरांच्या “श्रावणात घननिळा बरसला...” मधली एक ओळ वापरलीये...
      - ‘सह्याद्रीवर बोलू काही’ ही भारी कल्पना आहेच. माझी रेंज मात्र अजून थोडक्या घाटवाटा – लेणी – दुर्ग यापलीकडेही जाईना..
      विंगेतून तुमची साथ असण्यापेक्षा,
      - फुले – झाडे – सर्प – भूगर्भशास्त्र - तारांगण - कीटक - वन्यजीव – इतिहास – संस्कृती असं कितीतरी विश्व समजावून घेण्यासाठी तुमची साथ मोलाची...

      खूप खूप धन्यवाद :)

      Delete
  6. Replies
    1. kaka: मन:पूर्वक धन्यवाद :) :)

      Delete
  7. दुसरा फोटो फार सुरेख आलाय… पृथ्वीच्या आकाशात नेपच्यूनसारखा गडद निळा-जांभळा ग्रह अगदी जवळून दिसत असता तर असंच दृश्य दिसलं असतं…
    धुक्यात हरवलेली वाट… मनानेच मला या इथून देखील अलगद उचलून एका अद्भुत विश्वात घेऊन गेली… एक शांत, रिकामं, मोकळं मोकळं मन घेऊन या वाटेवर तासन तास चालत रहायला किती मजा येईल? ही वाट कधीच संपू नये असे वाटेल…
    पाचव्या फोटोत गवताचा पाचूसारखा मखमाली हिरवा रंग आणि त्याच्या contrast ला आकाशाचा सुरेख सावळा-निळा वर्ण… साक्षात विठ्ठलच आपल्या श्यामसुंदर तनूवर हिरवे वस्त्र लेऊन अवतरलाय…
    सहाव्या फोटोतल्या दवबिंदूंच्या माळा तर अप्रतिमच…
    त्या चौदाव्या फोटोतील घर कुणाचं? हिरवाईत दडून गेलेलं? किती चित्तथरारक वाटत असेल अशा जागी रहायला… माचीवरल्या बुधासारखंच आयुष्य जणू… आषाढातील एका तुफान पावसाळी संध्याकाळी त्या घरात एका मिणमिण कंदिलाच्या प्रकाशात बाहेरील पाऊस पहात बसणे हा किती सुंदर अनुभव असेल…

    डोंगराच्या पायथाशी दिसणारं एकुटवाणं राऊळ देखील आवडलं… बाहेर तुफ्फान कोसळणा-या पावसात अशा एकाकी मंदिरात दिव्याच्या मिणमिण प्रकाशात रुद्रपाठ ऐकायला काय भारी वाटेल…
    ती कुंडं तर प्रच्चंडच्च आवडलेली आहेत… अशी मस्त डुबकी मारावी वाटतेय...
    सोनकीची फुले आणि कोळ्याच्या जाळीवरील जलबिंदू तर किलरच्च…
    पाण्यात पडणा-या जलबिंदूंच्या फोटोने एकदम ताल चित्रपटातील ‘दिल ये बेचैन वे’ या गाण्याची आठवण करुन दिली…
    ते ऑर्किड तर किती देखणं… त्या गुलाबी रंगाची छटा किती वेगळी… कुठेच पहायला न मिळणारी… फोटो पहाता पहाता तो गुलाबी रंग नकळत डोळ्यात उतरतो… डोळ्यातून हृदयात उतरत उतरत सारं अंगच त्या गुलाबी छटेनं माखून माखून टाकतो…
    सुंदर आहे हा अनुभव…

    ReplyDelete
    Replies
    1. किती सुंदर प्रतिक्रिया...
      ब्लॉगमधलं नेमकं काय आवडलं, हे वाचून खूप मस्त वाटलं.
      मन:पूर्वक धन्यवाद :) :)

      Delete
  8. फारच छान साई,मजा आली वाचताना

    ReplyDelete
    Replies
    1. प्रदिप, खूप छान वाटतं प्रतिक्रिया वाचून..
      धन्यवाद ☺️👍👌

      Delete
  9. साई,
    अप्रतीम प्रकाशचित्र आणि शब्दांकन. तुझे लिखाण हे वाचण्यासारखे असतेच व त्याबरोबर वाचतां वाचतां अनुभवता येईल असे असते. तुझा ब्लाॅग मी माझ्या काही घुमक्कड मित्रांबरोबर नेहमी शेअर करतो. 👌👍

    ReplyDelete