Pages

Thursday, 1 December 2016

शिव-प्रतापाची जावळी

शिव-प्रतापाची जावळी
     
हिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या 'जावळी'च्या ट्रेकमध्ये गवसलेलं. जुन्या रानवाटा तुडवताना स्पर्श झाला होता रसरशीत इतिहासाचा, शूरांच्या कथा ऊरी जपणाऱ्या काळजांचा आणि शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांचा!!!
-------------------------------------------------------------

शोध शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांचा... 
रविवार दुपारची निवांत वेळ. टीव्ही-मोबाईल-लॅपटॉप-सोशल मीडियावरच्या अनावश्यक 'ट्रेंडिंग टॉपिक्स'ची नकारात्मकता टाळायची होती. घरातल्या छोटेखानी ग्रंथालयातलं 'शिवचरित्र' हाती घेतलं. प्रत्येकच प्रकरणात होती अशक्यप्राय आव्हानांवर मात करणाऱ्या बुद्धी, शक्ती, नीती आणि युक्तीची  गाथा! त्यादिवशी थबकलो होतो 'जावळी प्रकरणा'पाशी.
... कसे ते जावळीचे अजस्त्र पहाड-दुर्ग आणि किर्रर्र अरण्य,
... कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब,
... कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट,
... कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं,
... कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर - वरदायिनी- कालभैरव - भवानीची पुरातन राऊळं,
... किती ती दूरदृष्टी भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची,
... किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ - क्रूरकपटी अफझलखानाचं,
... अन, किती थरारक कूटनीती राजांची खानाला जावळीत खेचून आणून नेस्तनाबूत करणारी!!!
     
कित्येक तास अक्षरश: हरवून गेलो होतो जावळीच्या थरारात. हा इतिहास दरबार-महालांमध्ये नाही, तर सह्याद्रीच्या दुर्ग-डोंगरांमध्ये आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये घडलाय. त्यामुळे, एव्हाना ट्रेकर मावळ्यांच्या हंटरशूजचे घोडे खिंकाळू लागलेले. शिध्याची शिदोरी सोबत घेतली. पाठपिशवीचं खोगीर चढवलं. हायकिंग हॅटचं मुंडासं चढवलं आणि कूच केलं 'जावळी'कडे - रोमांचक इतिहासाच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी!
               
... मध्यरात्री अडनिड्या वेळी निघून, पुणे - सातारा रस्त्यावर 'टोल भरून खड्ड्यांचा मार' सहन करत प्रवास केलेला. वाई फाट्यावर गाडी वळली, तसं हायवेवर कुरकुरणारे अजस्त्र ट्रक्स आणि हॉर्न्स मागे पडले. कृष्णामाईची लाडकी वाई साखरझोपेत होती. पसरणी घाटातून लपेटदार वळणं घेताना, कारच्या टेपवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द घुमू लागले - "जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवीजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी, जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी... " आणि खरंच, इसवीसन १६५६ मध्ये स्वराज्यवृद्धीसाठी अतिशय मोक्याची असलेली जावळी चंद्रराव मोरेंकडून काबीज करण्यापासून; ते इसवीसन १६५९ मध्ये विजापूरहून रोंरावत आलेलं अफझलखानाचं वादळ जावळीत खेचून आणून उलथवून टाकणं - या काळात शिवरायांच्या बुद्धी-युक्ती-शक्तीची गाथा जावळी प्रांताने अनुभवली आहे, जगली आहे. शिवचरित्रातली ही यशोगाथा खोलवर जपून ठेवणाऱ्या अरण्य - दुर्ग - राऊळ - नद्या - रानवाटांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चौघेजण जावळीच्या ट्रेकला निघालेलो...


उतराई ऐतिहासिक रडतोंडी घाटाची... 
... महाबळेश्वरला भल्या पहाटे स्वागत केलं गारेगार ढगांनी. एस.टी. स्थानकावर खादाडी आणि चहाचं इंधन भरून घेतलं. पाठपिशवीचे बंद आवळले. ट्रेकच्या पहिल्या दिवशी महाबळेश्वरच्या पश्चिमेला कोयनेच्या खोऱ्यात डोंगरझाडीतल्या जावळीला उतरायचं होतं. ट्रेकच्या पूर्वार्धात महाबळेश्वरपासून ऐतिहासिक रडतोंडी घाटाने उतरून पुढे प्रतापगड चढाई आणि पुढे मुक्कामाला जावळी गावातल्या चंद्रराव मोरेंच्या कुलदैवताच्या राऊळापाशी पोहोचायचं होतं. हे सग्गळं अर्थातच कारने नव्हे, तर जावळीचा इतिहास अनुभवलेल्या वाटांवरून पायगाडीने करायचं होतं. दुतर्फ़ा गर्द झुकलेल्या झाडोऱ्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून मावळतीच्या टोकाकडे (मुंबई टोक) चालत निघालो. पश्चिमेकडून तरंगत येणारे ढग हलकेच स्पर्श करून सुखावत होते, गारठवत होते. पोलादपूर नाक्यावरच्या शेकोटीच्या ऊबेचा मोह टाळला, अन ढगात हरवलेल्या साखरझोपेतल्या रस्त्यावरून झपाझप निघालो. 

     
खॅखॅ असा आवाज आसमंताला चिरत गेला, म्हणून थबकलो. डोक्यावरच्या जांभळाच्या झुकलेल्या फांद्यांवर काटक्यांनी बांधलेल्या मोट्ठ्या घरट्यापाशी काहीतरी हालचाल जाणवली. खोडाच्या एका बाजूने लालचुटूक गोंडस तोंड डोकावलं. हा होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी 'शेकरू' (Indian giant squirrel). गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असा हा शेकरू हे सह्याद्रीच्या जैववैविध्याचं प्रतिकंच!

     
एरवी मावळतीच्या टोकापासून कोयनेच्या कुशीतल्या जावळी - प्रतापगडचं सुरेख दृश्य दिसतं. आत्ता मात्र सग्गळंच ढगात गुरफ़टलेलं. रडतोंडी घाट गाठण्यासाठी मुंबईटोकाच्या शेजारून पश्चिमेला उतरणारी मोठ्ठी रुंद पाऊलवाट गवसली. 

        
उंचच उंच झाडांमधूनमळलेल्या झक्क वाटेवरून, ढगांमुळे ओलसर झालेल्या खडकांवरून निसटत आणि उभा उतार उतरत १५० मी उतराई केली. 


पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटाचा डांबरी रस्ता पार केला आणि हिरडा-गेळ-जांभळाच्या झाडोऱ्यामधून वळणं घेत पायवाटेने मेटतळे गावापाशी पोहोचलो. हायवेने ५०० मी चालल्यावर मोठ्ठया वळणावर घाटाच्या संरक्षित भिंतीमधून बाहेर पडलं, की रडतोंडी घाटवाटेची सुरुवात झाली...

                        
... रस्त्यावरच्या हॉर्न्सचा आवाज मागे पडला. भर्राट वारा आला. ढगांची चादर दूर होवू लागली. आसमंत उलगडू लागला. महाबळेश्वरपासून प्रतापगड मकरंदगडापर्यंत पसरलेल्या उभ्या-आडव्या पहाडांचं, गर्ददाट झाडीचं, कोयनेचं - 'जा-व-ळी'च्या खोऱ्याचं प्रथमंच दर्शन होत होतं. 


आणि कानांत घुमू लागला घोड्यांच्या टापांचा आवाज... भास का? भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हांला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही 'गोवले' जाऊ लागलेलो. कारण "येता जावळी, जाता गोवळी", असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश्वर रायरी परिसरातलं  घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मैत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्त्व मान्य होणार नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, "...तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी!’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराजांनी स्वतः जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या "रडतोंडी घाटा"ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सैन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या "निसणीच्या घाटा"ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि अक्षरश: "बावनकशी सोनं" असलेली जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे - अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड,  मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाटपारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या.. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधूसागरापर्यंत झेप घेता येणं अन मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे, तानाजी-सूर्याजी मालुसरे) गवसणं अश्या खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी 'जावळीचे राजे' असा राज्याभिषेक करून घेतला अन आसमंतात घोड्यांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला..
               
...जावळीच्या इतिहासाचा हा थरार काळजात जपणाऱ्या 'रडतोंडी' आणि 'निसणी' या घाटवाटांचं दर्शन आम्ही घेत होतो. गच्च कारवीच्या टप्प्याखाली रानात उतरणारी मंद उताराची डोंगरसोंड आणि त्यावरून उतरणारी रडतोंडी घाटाची वळणांवळणांची प्रशस्त वाट आता दिसू लागली. वाईकडून प्रतापगडाकडे जाताना अफझलखान याच वाटेने गेलेला. खानाला चक्रव्यूहात खेचण्यासाठी राजांनी आसपासच्या डोंगरवाटा बंद करून, रडतोंडी घाट मात्र खास बांधून घेतलेला असणार, अश्या खुणाच सामोऱ्या होत्या. व्यवस्थित बांधून काढलेली फरसबंदीची निवांत लांबचलांब वळणं घेत जाणारी वाट होती. 

     
आधी फारशी झाडी नसलेल्या डोंगरसोडेंवरून वाट १०० मी उतरली, पण मग मात्र टेपावरून उतरताना दाट झाडीचे टप्पे सुरू झाले. 


गर्द झाडोऱ्यातून सळसळ करत जाणारी बारीक रानवाट सुरू झाली. 

       
अंधाऱ्या रानाला चिरत जाणारी वाट क्वचित मोकळवनात आली, की समोर मकरंदगड आणि प्रतापगड खुणावायचे. कधीकधी उंचच उंच वृक्षांचा, गच्च पाचोळ्याचा आणि अजस्त्र वेलींचा गुंता इतका दाटत गेला, की वाट सपशेल हरवायची. 


'रडतोंडी' हे आपलं नाव सार्थक करणाऱ्या घाटवाटेचा चपखल उपयोग करूनमहाराजांनी खानावर मानसिकदृष्ट्यादेखील कशी कुरघोडी केली असेल, हे चांगलंच जाणवलं. 


झाडांना बांधलेल्या भगव्या फिती आणि वाटेच्या कडेला बसवलेले दगड शोधत उतरत गेलो. 


आंब्याच्या खोडांवर वाऱ्यावर झुलणाऱ्या आमरीच्या (ऑर्किड) झुबक्यांना दाद दिली. मंद उताराची लांबच लांब आडवी वाट शेवटी गोगलेवाडीपाशी डांबरी रस्त्यावर पोहोचली. महाबळेश्वर बाजारपेठेपासून निघून रडतोंडी घाटाची ६५० मी उतराई करायला ३ तास लागलेले.

पार गावातल्या इतिहासाच्या पाऊलखुणा
गोगलेवाडीपासून डांबरी रस्त्यावरून प्रतापगडाच्या पायथ्याच्या 'पार' गावाकडे निघालो. वाटेत महाराष्ट्राच्या लाडक्या कोयना नदीवरचा  कमानींचा दगडी पूल लागला. हा पूल शिवकालीन, म्हणजे कदाचित अफझलभेटीसाठी बांधलेला. ऋतूचक्राचा आणि कोयनेच्या तुफान प्रवाहाचा तडाखा सोसूनही, पूल भक्कम आणि आजही वापरात आहे. 


पुलाजवळच्या गणेशाचं दर्शन घेतलं. आंब्या-फणसाच्या दाट सावलीतून चालत 'पार' गावात पोहोचलो. गाव प्रतापगडाच्या कुशीत. मूळचं नाव 'पार्वतीपूर'. कोकणात उतरणाऱ्या पारघाटाच्या माथ्यावरचं हे गाव. गावात काळ्या पाषाणातल्या 'आदिशक्ती श्रीराम वरदायिनी'चं देखणं राउळ. टुमदार 'पार' गाव आम्हांला फार आवडून गेलं.


शिव-प्रतापाचा प्रतापगड... 
पार गावातला राजांचा पुतळा पाहिला. आता मात्र वेध लागलेले प्रतापगडाचे! गावातून उंच डोंगरझाडीमुळे गड एकदम लपून गेलेला. पाण्याच्या पाईप्सच्या साथीने जाणाऱ्या वाटेवरून गडाची चढाई सुरू केली. ऊर धडधडू लागलेलं, उभ्या वाटेमुळे की प्रतापगडच्या दर्शनाच्या आसेने - कुणास ठावूक! वाट सुरेख मळलेली. दाट झाडोऱ्यातून चढताना आणि आसमंतात दूरवर नजर टाकताना, गडाचं भौगोलिक महत्त्व चांगलंच लक्षात येत होतं. मूळ सह्याद्रीधारेपासून थोडक्या अंतरावर सुटावलेल्या 'भोरप्या' (तथा 'रानआडवा गौड’) डोंगरावर, जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावरचं हे अत्यंत मोक्याचं स्थान. राजांना कल्पना होतीच, की जावळी जिंकणं म्हणजे थेट आदिलशहाला डिवचणं आणि त्याचा दुष्परिणाम आपण ओढवून घेणार आहोत. त्यामुळे दूरदृष्टीने त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांकरवी जावळीत बेलाग दुर्ग बांधून घेतला. गड पाहून राजे खूष झाले आणि त्यांनी नाव ठेवलं - 'दुर्ग प्रतापगड’!


... पार गावातून निघाल्यावर दाट झाडीतून अन उंच कारवीमधून चढाई होती. वळणावरच्या गेळाच्या झाडावर मुंग्यांनी चिखलाचे घरटे बांधलेले, तर पायथ्याशी गडमुंगीच्या वारूळाची चिरेबंदी. 


उभ्या दांडावरच्या चढाईनंतर आता थोडी निवांत आडवी वाट होती. पाचोळा चुबुक-चुबुक तुडवत निघालो. महाराजांना भेटायला आतूर झालेला अफझलखान ज्या वाटेने पार गावातून प्रतापगडाकडे गेला, त्याच वाटेने आम्ही निघालेलो. अशक्य-अतर्क्य वाटावा अश्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या मातीचं-मुलुखाचं दर्शन आम्ही घेत होतो. शिवचरित्राची पाने नजरेसमोर तरळत होती...

... महाराजांनी जावळी जिंकली होती, ती सैन्याच्या बळापेक्षा युक्तीने! त्यामुळे, आदिलशहाचा तीळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, ऊंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षासाठी ठिकाण राजांनी ठरवलं - जावळी!!! खानाने पायथ्याच्या वाईमध्ये छावणी टाकली आणि राजांना खलिता धाडला, "शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावाचा जावळी प्रदेश तू मला परत कर". खानाने राजांना वाईस बोलावल्यावर राजांनी आपण फार घाबरलो असल्याचे भासवलं आणि समझोत्यास तयार आहोत असं कळवलं, "तुम्ही तर पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्याबरोबर युद्ध म्हणजे आगीशी खेळ. तुम्ही खरंच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील." आणि, अखेरीस १० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगडच्या पायथ्याशी खानाची आणि राजांची भेट ठरली. प्रतापगडाच्या कुशीतल्या जननीच्या टेंब्यावर शाही शामियाना उभारला गेला होता. भेटीची घटका जवळ आलेली... 

... त्या रोमांचक इतिहासाच्या विचारांनी आणि डोंगरचढाईने आता धाप लागलेली!!! पार गावातून निघून एव्हाना पाऊण तास झालेला. गड एखादवेळा झाडोऱ्यातून किंचित डोकावलेला, पण किती लांब याचा अंदाज येईना. वाऱ्याचा पत्ता नाही. घश्याला कोरड पडलेली. पाठीवरचं ओझं जड झालेले. एकसमान लयीमध्ये चढाई चालू ठेवली. झाडीतून चढणाऱ्या उभ्या वाटेने मोठ्ठं वळण घेतलं आणि आम्ही अक्षरशः थबकलोच. डावीकडे निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर तुरळक विखुरलेल्या ढगाच्या पुंजक्यांमधून उंचावलेला प्रतापगडाचा माथा आणि उजवीकडे पोलिस बंदोबस्तीत असलेली खानाच्या कबरीची वादग्रस्त वास्तू. हीच-हीच ती जागा, जिथे जावळीच्या इतिहासातला थरार घडला. 




शामियान्यात खानाच्या कपटाची चाहूल लागताच, ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडलं, तसं राजांनी वाघनखांनी खानाची आतडी बाहेर काढली. कवी भूषण यांनी लिहिलं, "एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है". ज्या युद्धशैलीला समर्थ रामदासांनी वृकयुध्द (लांडगेतोड) म्हटलंय, त्या गनिमी काव्याने राजांनी शत्रूला आपल्या मोक्याच्या जागी खेचून आणलं आणि नामशेष केलं. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९! भर मध्यान्हीला "केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला... दुंदुभी  निनादल्या, नौबती झडाडल्या, दशदिशा कडाडल्या...."!!! आजही, मार्गशीर्ष षष्ठीला जावळी-प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा होतो आणि शिव-प्रतापाची जावळी लाखो मनं स्फुल्लिंगीत करते. इतिहासातल्या अनोख्या युद्धांचा अभ्यास करताना, आजंही आमची भारतीय सेना जावळी-प्रतापगडाच्या युद्धाचा अभ्यास करते...


शक्तीपीठ प्रतापगडाचं दर्शन... 
... गडावर डांबरी रस्त्याने येणाऱ्या गाड्यांचे हॉर्न्स सुरू झाले आणि आधुनिक जगात परतलो. चिलखती बांधणीच्या 'उगवतीच्या बुरूजा'वरच्या भगव्या झेंड्याला मुजरा करून, गडावर दाखल झालो. महाबळेश्वरपासून निघाल्यापासून पाच तासात (रडतोंडी घाटाची ६५० मी उतराई, पार गावातून ४०० मी चढाई आणि १३ किमी चाल झाल्यावर) गडावर पोहोचलेलो. राजांनी बांधून घेतलेलं - पण आता गर्दीत आणि नव्या वास्तूंमधून हरवलेलं - दुर्गस्थापत्य शोधायचा प्रयत्न केला. 

   
महिषासुरमर्दिनी रूपातील भवानीमातेसमोर नतमस्तक झालो. गडावर कितीही गर्दी असली, तरी भवानीमाता, केदारेश्वर आणि राजांचं भव्य अश्वारूढ शिवशिल्प नि:संशय शक्तीपीठे आहेत, याची अनुभूती घेतली. राजांच्या वीररसयुक्त पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरलेले शब्द "माझ्या मायभूमीचे रक्षण, हे माझे परम कर्तव्य" ऊरात साठवले. गडावरून चौफेर दर्शन घडलं जावळीच्या अथांग सह्याद्रीमंडळाचं. जावळीचं विशेष फक्त भूगोलात नाही, तर ह्या सह्याद्रीमंडळामुळे आपल्यापर्यंत काही अंशी पोहोचते - अशक्यप्राय आव्हानांवर मात करणाऱ्या बुद्धी, शक्ती, नीती, युक्तीची शिवप्रतापाची गाथा!!!
       
वाडा कुंभरोशीकडे उतराई... 
थरारक इतिहासाच्या अजून पाऊलखुणा शोधण्यासाठी गडाचा निरोप घेणं भाग होतं. चढाई आग्नेयेच्या पार गावातून केलेली, तर आता उतराईसाठी ईशान्येच्या वाडा कुंभरोशी गावाकडची पाऊलवाट तुडवू लागलो. 


गडाचा डांबरी रस्ता बनायच्या आधी हीच मुख्य वापरातली वाट होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांधून काढलेली. समोर महाबळेश्वरचं झाडीभरलं पठार नजरेसमोरचं सारं क्षितीज व्यापून टाकत होतं. 


घनदाट झाडीतली मस्त मळलेली वाट आणि सुरेख प्रसन्न चाल होती. 


उभा उतार उतरणारी वाट उतरून तासाभरात वाडा कुंभरोशीला पोहोचलो. पोलादपूर हायवेवरचं छोटंसं गाव. ट्रेकर्सच्या पायगाडीला 'अद्रकवाली चाय'चं इंधन मिळालं. आमचं गंतव्य होतं जावळी खोऱ्यातलं एक ऐतिहासिक ठिकाण - चंद्रराव मोरेंच्या वास्तव्याचं मुख्य स्थान - 'जावळी' गाव!

ऐन जावळीत - मोरेंच्या कुलदैवताच्या चरणी... 
परत एकदा हायवेवरून चालायची वेळ आलेली. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून लांबचलांब रटाळ चाल चालत राहिलो. चालून चालून पायाला ब्लिस्टर्स आलेले. अखेरीस डावीकडे 'जावळी' गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा आला. मावळतीचे सूर्यकिरण आता महाबळेश्वराच्या पांगळा (एलफिस्टन) टोक ते डोमेश्वर (लॉडविक) टोक ते मावळतीचे (मुंबई) टोक अश्या जबरदस्त कातळभिंतींना उजळवू लागलेले. जावळीच्या रंगमंचावर आभाळात विखुरलेल्या रंगांची उधळण अनुभवत होतो. 


कोयनेच्या चिंचोळ्या पात्राच्या काठाने वळणं घेत जाणारा रस्ता जावळी गावातल्या काळभैरव मंदिरापाशी थबकला. प्रतापगडापासून निघून ६ किमी चाल झाली होती, तर दिवसाभरात १९ किमी. पाराखाली विसावलो. श्री काळभैरवनाथ आणि कुंभळजाआई हे जावळीच्या मोरेंचं कुलदैवत! देवळात हरणाची शिंगे लटकवलेली. चंद्रराव मोरे आणि शिवरायांनी पुजलेली ही दैवते. या देवतांसमोर नतमस्तक होताना कुठेतरी जावळीच्या इतिहासाची जवळून भेट झाल्यासारखं वाटलं. 


देवळामागच्या टेकाडावर मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष - जोत्याची जागा दाखवतात. खरंतर सग्गळ-सग्गळ हरवलंय. काळभैरवनाथ मंदिराबाहेर आलो. परिसरातल्या जुन्या जाणत्या वृक्षांवर बागडणाऱ्या मोराने आणि भल्यामोठ्ठ्या शिंगचोच्या धनेशाच्या (हॉर्नबील पक्षी) जोडीने आमची दाखल घेतलेली. 


अंधार दाटू लागला. मुक्कामाची तयारी सुरू केली. (मंदिरात मुक्कामास परवानगी नाही). पूर्वेला पौर्णिमेच्या निखळ चांदण्यात महाबळेश्वरच्या पहाडाची उंच कड उजळून निघालेली, तर पश्चिमेच्या धारेवर गूढ रानवा दाटलेला. स्टोव्हवर रस्सा शिजत ठेवला आणि गर्रम सूपचा आस्वाद घेत गप्पाष्टक जमलं. गावकऱ्यानी देवळाजवळ येणाऱ्या गव्यांची-रानडुकरांची भीती घातलेली. त्यामुळे एकीकडे सावध नजर; तर दुसरीकडे एका दिवसात गप्पांसाठी होता जावळीचा इतिहास, जावळीचा भूगोल आणि अधूनमधून अंगावर येणारा आधुनिकतेचा कोलाहल! गारवा दाटत गेला. रुचकर जेवण झालं. जावळीच्या कुशीत असल्याच्या भावनेनेच मनात आनंद दाटलेला!

जावळी भटकंतीची प्रसन्न सकाळ
... जावळीच्या कुशीतल्या झक्क मुक्कामामुळे मंडळी ताजीतवानी झालेली. ट्रेकच्या उत्तरार्धात जावळीमधल्या इतिहासाची साक्षीदार असलेली 'निसणी’ची अवघड वाट चढून महाबळेश्वरला जायचं होतं. 

   
तांबडफुटीआधीच दमदार न्याहारी करून कूच केलं. 


डांबरी रस्त्याने चालत कोयनेच्या गूढरम्य खोऱ्यात शिरू लागलो. 


'खालच्या जावळी'च्या वाडीतून 'मधल्या जावळी'च्या वाडीत आणि पुढे 'वरच्या जावळी'च्या वाडीत पोहोचलो. 

     
उजवीकडचं डोमेश्वर (लॉडविक) टोक, समोरचं पांगळा (एल्फीस्टन) टोक आणि महाबळेश्वरचा झाडीभरला माथा ढगात हरवलेला. 


आता डांबरी रस्ता किंचित उजवीकडे पूर्वेला वळू लागलेला - डोमेश्वर (लॉडविक) आणि पांगळा (एलफिस्टन) टोकांदरम्यान पसरलेल्या कोयनेच्या दरीच्या कुशीत शिरू लागलेला. एकमेकांच्या साथीने किनाऱ्याकडे येणाऱ्याविखुरत जाणाऱ्या, फुटत जाणाऱ्या लाटा असाव्यात, अश्या असंख्य डोंगरवळयांच्या सह्याद्री-सागराकडे आम्ही निघालेलो. जावळीने आम्हांला अक्षरश: वेढून टाकलेलं. 


बाजूचं वळणवेड्या कोयनेचं पात्र, आंबा-फणस-बांबूचा गच्च रानवा, वीरघराण्यातल्या मोरे वंशजांची घरं, डोंगरउतारांवर विखुरलेल्या शेताडीची नक्षी, फडफड असा विलक्षण मोठ्ठा आवाज करत दरीच्या पोटात खोलवर पल्ला मारत जाणारे हॉर्नबील्स, गच्च झाडीवेलींनी नटलेले डोंगरउतार, उभ्या घसरड्या डोंगरसोंडा, माथ्याखालची सलग कातळभिंत आणि गच्च रानाचे टप्पे आणि त्यासोबत रेंगाळलेले तुरळक ढग अश्या चित्ताकर्षक पॅनोरमानं आम्हांला भारावून टाकलेलं.


ऐतिहासिक निसणीच्या वाटेचा थरार
चिंचोळ्या होत गेलेल्या जावळी खोऱ्यातलं दरीच्या पोटातलं शेवटचं गाव - 'दरे'! इथून महाबळेश्वरमाथा ५०० मी उठवलेला. महाबळेश्वरला चढण्यासाठी - पांगळा (एलफिस्टन) टोकाजवळ चढणारी 'निसणीची वाट' आणि दुसरी - बाजारपेठेची वाट. त्यातल्या निसणीच्या वाटेचं आम्हांला आकर्षण होतं, कारण हीच ती वाट ज्या वाटेने स्वत: जावळीत उतरवून शिवाजीमहाराजांनी जावळी जिंकलेली.

दरे गावातल्या फणसाच्या झाडाखाली विसावलो. वाटेचा अंदाज घेऊ लागलो. डावीकडे (उत्तरेला) उतरत आलेल्या उभ्या डोंगरसोंडेवरून वाट असणार होती. कोयनेचं पात्र पार करून शेताडी पार केली. आंब्याच्या डेरेदार झाडापासून पाठीमागे दरे गाव आणि पाठीमागची डोमेश्वर (लॉडविक) टोकाची सोंड विलक्षण देखणी दिसत होती. 


दाट झुडुपांमधून तीव्र चढाची वाट चढाई सुरू झाली. १०० मी चढाई झाल्यावर पहिल्या टेपावरून किंचित डावीकडे जात, आता मुख्य सोंडेवरची चढाई सुरू झाली. अरुंद धारेवरून वाऱ्याच्या झुळुका अंगावर झेलत, कधी सोनसळी गवतातून आडवी वाट होती, तर कधी फसव्या घसाऱ्यावरून चढाई होती. दम खायला थोडं थबकलो. मागं वळून पाहिलं, तर ढगांच्या दुलईतून जावळीला हलकेच जाग येत होती. ढगांमधून एखादा सूर्यकिरण डोंगरझाडी उजळवत होता आणि खोऱ्यात ढगांच्या सावल्यांची नक्षी विखुरलेली. पल्याड प्रतापगड ढगांशी लपाछपी खेळत होता. अप्रतिम दाट डोंगर-झाडीचं प्रसन्न दृश्य!

निसणीच्या सोंडेच्या माथ्याच्या खाली असलेल्या कातळभिंती आता खुणावू लागलेल्या. वाटेवरच्या दुसऱ्या टेपावरून आडवं चालत गेलं, की निसणीचा थरार सुरू होणार होता. चढावर मोक्याच्या ठिकाणी बहरलेल्या झाडापर्यंत पोहोचणं आणि त्यापुढे कातळातून चढाईमार्ग असणार, असा अंदाज बांधला. 


एव्हाना पाठीवरच्या सॅक्स कुरकुरू लागलेल्या. धाप लागून घसा कोरडा पडलेला. मान खाली घालून एकसलग लयीत (ऱ्हीदममध्ये) हळूहळू, पण न थांबता चढाई करत राहिलो. रखरखीत उभ्या चढावरचा घसारा चढून झाडापर्यंत पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेताना, जावळीचं विहंगम दृश्य सामोरं होतं. 


वाऱ्याने हलणाऱ्या रानापल्याड कोयनेची गूढ दरी, बाजारपेठेची वाट, डोमेश्वर (लॉडविक) टोक, प्रतापगड आणि पांगळा (एलफिस्टन) टोकाचे कडे असं सुरेख दृश्य!


निसणीचा मुरमाड घसारा आणि कातळावरची थरारक चढाई आमची वाट पाहत होती. 


उभ्या घसाऱ्यावरून चढत, उजवीकडे आडवं जात मोठाल्या धोंड्यांवरून पोहोचलो. 


१० मी उंचीचे कातळारोहण होते. सोप्प्या श्रेणीचे. दोराची गरज नाही, पण वाट निसरडी अरुंद आहे. माथ्याजवळ पोहोचल्यावर कातळातल्या खोदाईने लक्ष वेधलं. पांथस्थांना आधार देण्यासाठी कातळात कोरलेली कधीकाळी शेंदूर फासलेली मूर्ती समोर होती - बहुदा गणेशाची असेल! वाटलं, जावळीत उतरण्याआधी आमच्या राजांनी स्पर्शिलेला हा कातळ असेल का, त्यांनी पुजली असेल का ही मूर्ती?

      
मूर्तीपाशी उभं राहून आतापर्यंतच्या चढाईचा अंदाज घेतला. ऊर धपापत होतं - निसणीच्या उभ्या चढाने आणि थेट दरे गावापर्यंत घरंगळलेल्या रौद्र निसरड्या डोंगरसोंडेच्या दृश्यानेही! 



       
कवी गोविंदांनी या मुलुखाचं वर्णन खरंच अचूक केलंय, "जावळिचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी, भयाण खिंडी बसल्या पसरूनी रानमोळी"!


निसणीच्या कातळटप्प्यापासून महाबळेश्वर माथा अजूनही १०० मी उंचावर होता. 

       
कारवीतून जाणारी, निसरड्या उतारावरची लाल मातीतली फुटलेली आडवी वाट आणि त्यानंतरची खडी वाट वेगाने पार केली. जावळीचं दृश्य आणि घाटमाथ्याचा गारेगार वारा अनुभवत विसावलो. 


पल्याड रानडुक्कराची खुरं मातीत उमटलेली. वेलीच्या जंजाळ्यातून चढत पुढे माथ्यावरच्या मोकळवनात पोहोचलो. पठार तुडवून परत झाडीत शिरण्याआधी किंचित डाव्या बाजूला बांधीव चौकोनी कोरडी बांधीव विहीर होती - इतिहासाची अजून एक पाऊलखूण! 

         
इथलं रान 'राखीव' घोषित केल्यामुळे थोडंफार टिकलेलं. घनदाट जंगलाचा टप्पा पार करून, वनविभागाच्या कृत्रिम पाणीसाठ्याच्या बाजूने क्षेत्र महाबळेश्वर ते पांगळा (एल्फिस्टन) टोकाजवळ डांबरी रस्त्यावर पोहोचलो.

आधुनिक जगाचा विद्रूप कोलाहल
निसणीमाथा ते क्षेत्र महाबळेश्वर ते महाबळेश्वर बाजारपेठ अशी ८ किमीची डांबरी रस्त्यावरची चाल आमची कसोटी पाहणार होती. जावळीच्या सुरेख ट्रेकनंतर रस्त्यावरच्या गाड्या आणि विद्रूप कोलाहल अंगावर आला. यंदाचं निरीक्षण म्हणजे, रस्त्याच्या दोहोंबाजूस कचराकुंडी मानणाऱ्या उपद्रवी टूरीस्टांनी विखुरले होते - बाळांचे डायपर्स!? खरंच, त्या टुरीस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरंसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा! एन्जॉय करायला थंड हवेचं ठिकाण असण्यापल्याड, जावळी तुम्हांला जगण्याची अपार उर्जा देईल. पण, जावळीचा इतिहास-भूगोल समजावून घ्यायची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे...

शिव-प्रतापाची जावळी अनुभवताना... 
सुदैवाने फारसं डांबरी रस्त्यावरून चालावं न लागता क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारी पाऊलवाट मिळाली. गेळाच्या, जांभळीच्या बुटक्या झुडुपांच्या गच्च रानातून आडव्या धावणाऱ्या वाटेवर थबकलो, लगडलेल्या आमरीच्या झुबक्यांपाशी! 

     
पुढच्या पाच मिनिटात पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. 


हा मारुती समर्थस्थापित ११ मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. 

 
राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व! सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबीरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, शिव-प्रतापाची जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलेलो! आधुनिक जगाच्या कोलाहलात परतण्याआधी भर्राट वाऱ्यात जांभळीच्या झाडाखाली जावळीच्या भटकंतीचे क्षणांना उजाळा देवू म्हटलं. चंद्रराव मोरेंनी म्हणल्यानुसार येता जावळी जाता गोवळी...हे आजमावून बघितलेलं. इतिहासाच्या पानांमधली जावळी, दोन दिवसाच्या भटकंतीत भेटलेली जावळी आणि भेटलेली मनात रुंजी घालत होती...

गवतालाही भाले फुटतील, अश्या इतिहासाची जावळी...
वळणवेड्या कोयनेची अन घनदाट अरण्याची जावळी...
महाबळेश्वराची, भवानीची अन काळभैरवाची जावळी...
वीरांची, शौर्याची जावळी... चंद्रराव मोरेंच्या अभिमानाचीही जावळीच!
जिवा महालेच्या स्वामीनिष्ठतेची जावळी...
आदिलशाहीच्या जिव्हारी लागलेली जावळी... अफझलखानाला चितपट करणारीही जावळीच!
निसरड्या भयावह घाटवाटांची जावळी... आम्हां ट्रेकर्सचीही जावळीच...
रौद्र सह्याद्रीची जावळी... गनिमी काव्याची जावळी... शिव-प्रतापाची जावळी!!!

शिव-प्रतापाच्या उर्जेने उत्तुंग स्वप्नं पाहण्याची अपार उर्जा दिलेली... जावळीच्या भटकंतीने आनंदवनभुवनाची अनुभूती दिलेली... कृतज्ञ आहोत...
       

               
------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, महेश वाठारकर आशुतोष कुलकर्णी
२. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
३. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
४. पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा. ९ डिसेंबर २०१६


ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

25 comments:

  1. Replies
    1. मिलिंद, धन्यवाद! खरंच, अविस्मरणीय ट्रेक.. आत्ता मुहूर्त लागला ब्लॉगपोस्ट पूर्ण करायला.. _/\_

      Delete
  2. अप्रतिम ट्रेक!

    साप्ताहिक लोकप्रभा. ९ डिसेंबर '२०१६' दुरुस्ती करावी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद इंद्रा!!! _/\_
      २०१६च लिहिलंय रे.. कुठे २०१७ अनावधानाने लिहिलं गेलंय का?

      Delete
  3. दणकट भटकंती___/\___
    भूगोल map ह्यावेळेस दिला नाही....
    आणि त्यात तुम्ही वाटाड्या घेतला नाही.. आता आमच्यासारखा ढ विद्यार्थी कसा पोचणार ?

    ReplyDelete
    Replies
    1. देवा, धन्यवाद!
      ट्रेकरदोस्तांनी आग्रह केलेला की, हाताने रेखाटन काढूनच नकाशा देत जा. प्रयत्न केला, पण जावळीच्या डोंगर-दऱ्यात पुरतं हरवून गेलो, धाप लागली. आता, विकिपीडिया स्कीनशॉटवाला नकाशा दिलाय. बघ, उपयोग होईल का...

      Delete
  4. वा राजे!!! आम्हालाही नेऊन आणलत की जावळीला... अप्रतीम जमलाय लेख !! अर्थात नेहमीप्रमाणे !!!

    ReplyDelete
    Replies
    1. दादा, धन्यवाद! जावळीत ३-४ वाऱ्या झाल्या. जावळीत अधिकाधिक गोवले जाण्याचा आनंद तुझ्यापर्यंत लिखाणातून पोहोचला, याचा आनंद आहे.. _/\_

      Delete
  5. Replies
    1. चैतन्यकाका, धन्यवाद! _/\_

      Delete
  6. नेहमीप्रमाणे मस्तच...फक्त नकाशा miss करतोय...आणि एक जाणवतंय ..येता जावळी जाता गोवली...नक्कीच एकदा जावळीत गेल्यावर पुन्हा पुन्हा जावंस वाटेल.... आणि हो लोकप्रभामध्ये "साईप्रकाश" हा "साईप्रसाद" झालाय.

    ReplyDelete
    Replies
    1. पुंडलिक मित्रा, धन्यवाद!
      नकाशा हाताने रेखाटन काढायचा होता, तो जमेना. नेहेमीसारखा wikimapia स्कीनशॉटवर नकाशा दिलाय.
      खरंय, जावळीत गोवलो गेलोय पूर्णपणे.. आनंद आहे!

      Delete
  7. साई, इतिहासाचा उत्तम अभ्यास करून निसर्गाशी जवळीक साधायची कला तुला छानच जमलीय. त्याहीपेक्षा हे अनुभव अतीशय रसाळ आणि सोप्या भाषेत मांडण्याचे तुझे कसब लाजवाब !
    व्वा, मजा आ गया.

    ReplyDelete
    Replies
    1. गुरुवर्य, तुमच्या सह्यमोहिमांपुढे 'भातुकलीचा खेळ' वाटावा, अश्या आमच्या ट्रेकचं वर्णन वाचलं आणि इतकं छान प्रोत्साहन दिलंत, यातंच आनंद आहे _/\_

      Delete
  8. साई अप्रतिम लिहलं आहेस. नेहमीप्रमाणे तुझ्या ओघवत्या शब्दात. इतकं छान कि पुन्हा पुन्हा वाचावं वाटलं. तुझ्या या लेखामुळे जावळीचा इतिहास, भूगोल आणि काव्यात्मक असा तिहेरी प्रवास झाला. आभारी आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत, धन्यवाद मित्रा!
      ट्रेक करतानाच त्यात गुंफलेले जावळीचा भूगोल-इतिहास-ट्रेकअनुभव असे धागे जाणवत होते. लिखाणातून तो अनुभव पोहोचला तुझ्यापर्यंत, याचा आनंद आहे.. धन्यवाद!!!

      Delete
  9. very nice ...............beautiful

    ReplyDelete
    Replies
    1. काका, छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.. धन्यवाद!

      Delete
  10. साई, अफलातून लिखाण! तुझी एक खास काव्यात्मक शैली आहे आणि त्यात तु पूर्ण इतिहास, भूगोल, वर्तमान सर्वांचा अभ्यास करून लिहितोस त्यामुळे लेख अजुनच वाचनीय होतो. फोटो तर खुपच भारी आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. अनुपकाका,
      आपण अनुभतोच - सह्याद्रीतल्या भूगोलाचे आपल्याला प्रेम, पण तो इथल्या इतिहास आणि संस्कृतीमध्ये इतका विरघळलाय, की फक्त ट्रेक/ इतिहास/ वर्तमान असा विचार शक्य नाही.
      तेच थोडं लिहिलं..
      मनःपुर्वक धन्यवाद.. 👍👌☺️

      Delete
  11. ऐतिहासिक आणि घनदाट जावळी खोऱ्याचा इतिहास प्रत्यक्ष समजून, तिकडे अनुभवून, आम्हाला ब्लॉग मार्फत दर्शन घडवून आणि समजावून सांगितल्याबद्दल तुझे कौतुक आणि आभार मानावे तितके कमीच आहेत...
    भौगोलिक मॅप न टाकल्याबद्दलही तेवढेच आभार, कारण हि ब्लॉग पोस्ट वाचल्यावरचं ह्या दुर्गम घाटवाटांची टोपोग्राफी समजायला पाहिजे... स्वतःहुन शोधलेल्या घाटवाटांचं अप्रूप जास्त वाटतं... असं माझं वैयक्तिक मत आहे...
    ह्या जबरदस्त ट्रेक ला मी येऊ शकलो नाही त्याबद्दल खूपंच वाईट वाटतंय... क्षमस्व... असो...
    संपूर्ण ब्लॉग पोस्ट एका दमात वाचली कारण लिखाणचं तसं जबरदस्त आणि खिळवून ठेवणारं होतं...
    बाकी... तुझ्या ओघवत्या लेखनशैलीला नेहमीप्रमाणेच सलाम...

    टीप : तुझ्या आत्तापर्यंतच्या सर्व ब्लॉग पोस्ट्स मधली ही पोस्ट मला सर्वात जास्त आवडली...

    ReplyDelete
    Replies
    1. दत्तू: मन:पूर्वक धन्यवाद! :)
      खूप उशिरा प्रतिसाद लिहितोय.. :(
      जावळीच्या ट्रेकमध्ये सह्याद्रीभूगोलापल्याड, इथल्या मातीत घडलेल्या थरारक इतिहासाच्या स्मृतीचे तरंग आपल्यापर्यंत पोहोचू लागतात, भारावून टाकतात. तू जावळीत अनेकदा हे अनुभवलं आहेसच, त्यामुळे लिखाण आवडलं असेल...
      चला एखाद्या जावळीतल्या ट्रेकचा पिलान जुळवू... धनुर्वाद!!! :)

      Delete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. खूप सुंदर लिखाण. इतिहास जिवंत केलात. धन्यवाद. असेच लिहित राहावे.

    ReplyDelete
    Replies
    1. मुकुंद, भटक्या मित्रांना प्रत्यक्ष ट्रेकला जावसं वाटावं आणि ट्रेकमध्ये मदत व्हावी, यासाठी लिहिलंय.. धन्यवाद!!!👍👌☺️

      Delete