Pages

Monday, 27 November 2017

घाटरानवा वाटवारसा

बैलदरा/पायरीची घाटवाट - कोथळीगड (पेठचा किल्ला) - कौल्याची धार या घाटवाटांची परिक्रमा करताना कसं हरवलो घाट-रानव्यात, अन कसं गवसलं कवतिक ऐतिहासिक वाट-वारश्याचं - याचा संक्षिप्त आलेख ट्रेकरदोस्तांसाठी.

          
या ट्रेकची थीम होती घाटवाटांनी पेठच्या किल्ल्याची परिक्रमा करायची - म्हणजे,
उतराईसाठी आंदरमावळाच्या घाटमाथ्यावरून पेठच्या किल्ल्याजवळून कोकणात उतरणारी बैलदरा/पायरीची घाटवाट; पेठच्या किल्ल्याला प्रदक्षिणा घालून चढाई होती कोकणातून पेठच्या किल्ल्याजवळून भामनेरात चढणारी कौल्याची धारेने. नक्की काय डोंगरयात्रा केली, यासाठी हे रेखाटन.
   
(घाटांची नावे-स्थाननिश्चिती: या घाटांच्या नावांच्या बाबत ट्रेकर्सची वेगळी मतं असू शकतील. वेगवेगळ्या गावकऱ्यांकडून मिळलेल्या माहितीनुसार नकाशात नोंद केलीये. अर्थात, नावात काय आहे म्हणा!)
                       
घाटरानव्यातली पुरातन बैलदरा/ पायरीची वाट:
- घाटमाथ्यावरचे गाव: माळेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे
- कोकणातले गाव: धामणी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: कोथळीगड (पेठचा किल्ला)
- स्थानवैशिष्ट्य: सागरी बंदरे (नालासोपारा, कल्याण) ते पुणे या पुरातन मार्गावर पेठच्या किल्ल्याच्या खोऱ्यातून चढणारी वाट. वैशिष्ट्यपूर्ण सोबती असलेले दुर्ग (कोथळीगड), लेणी (आंबिवली, पेठ दुर्गाच्या पोटातलं लेणे, आंदरमावळातली असंख्य लेणी) आणि घाटवाटा (नाखिंदा, कौल्याची धार, बैलदरा, खडीची वाट)
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळच्या कातळात सामान्य खोदाईच्या ५-६ पावठ्या. पदरात बांधलेला पुरातन हौद/ बारव हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे. घाटातील बारवेत वर्षभर पाणी, पण उपसा नाही.
- निवारा: माथ्याजवळ माळेगाव किंवा पेठ गावात
- उतराई: ४०० मी
- वेळ: ४ तास (माळेगाव ते पेठ गाव)

- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
५ भटके. भल्या पहाटेचा कारप्रवास. आंदरमावळाच्या पश्चिमेचा. तळेगाववरून पुढे कान्हेफाट्यावरून वळून आवडीच्या आंदरमावळात निघालेलो. सुरेख सकाळ. रस्ता आता गवताळ माळावरून रस्ता जाताना गाडी थांबवून, ठोकळवाडी धरणावरून घुमत येणारा रानवारा अनुभवत चाय ब्रेक आणि धम्माल ट्रेकगप्पा.

सावळे गावाच्या अलीकडे माळेगावला पोहोचलो. गाडी पार्क करेपर्यंत निनाद्रावांनी गावकऱ्यांकडून वाटा समजावून घ्यायला सुरुवात केली. आपण ऐकलेल्या वाटांची नावं आणि गावकऱ्यांच्या बोली भाषेत प्रचलित असलेली नावं यातला गुंता अजून वाढला. बैलदरा किंवा पायरीची वाट नावाच्या वाटेवर आम्ही कूच केलं. वेळ सकाळचे ७१५.

माळेगावतून नैऋत्येला ५० मी डोंगर चढून धनगरांच्या झापांना मागे टाकत वाट घाटमाथ्याकडे निघाली.

लांबलेल्या पावसामुळे यंदा सह्याद्री तृप्त झालेला, त्यामुळे कोवळ्या ऊन्हांत सोनसळी गवतातून जाणारी वाट पुसटशीच होती. आजच्या ट्रेकमध्ये वाढलेल्या गवत-झाडोऱ्यामधून वाटा शोधणं, हे कर्मकठीण असणार याची नांदीच होती!

टेपाडावर वाटचौक आल्यावर चर्चासत्र झालं. आम्ही घाटमाथ्यावर पोहोचलेलो, पण झाडीमुळे परिसर आणि खोलवर कोकणदर्शन असं काहीच नाही. समोर उतरणारी वाट बैलदरा/ पायरीची वाट; तर उजवीकडे पूर्वेला जाणारी वाट घाटमाथ्यावरून बैलघाट/खडीची वाट, वांद्रे खिंड आणि कौल्याची धार-नाखिंदा घाटाच्या माथ्याकडे जाते.

बैलदरा/ पायरीची घाटाची सुरुवात. वेळ सकाळचे ७४०. हिरव्यादाट झुडुपांमधून उभी उतरणारी बारीक वाट. 

गच्च रानव्यातून प्रथमच अवचित डोकावला आमच्या ट्रेकचा मुकुटमणी - कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला. सुरेख दर्शन. पाठीमागे सह्याद्रीच्या भिंतीसोबत तुंगी-पदरगड-भीमाशंकर नागफणी-सिद्धगडपर्यंतचा नजारा दीठी सुखावून गेला.

कधी उभ्या उतारावरून, कधी दाट झाडीतून तर कधी ओढ्यातून - अशी संमिश्र उतराई. या वाटेला बैलदरा असंही एक नाव असलं, तरी गुरं आणि मालवाहतुकीस ही वाट सुयोग्य वाटत नाही.

कातळावरच्या साध्या खोदाईच्या ५ - ६ पावठ्या, म्हणजे ही वाट पुरातन असल्याची साक्षच! आणि, त्यामुळेच ही 'पायरीची वाट' म्हणायची! (फोटोत कदाचित जाणवणार नाही, पण प्रत्येक कातळखोदीव पायऱ्यावर ट्रेकर्स उभे आहेत.)

(फोटो क्रेडिट: निनाद बारटक्के)

२०० मी उतराईनंतर उतार सौम्य झाला. कोवळ्या उन्हाची तिरीप रानव्याला उजळवू लागली. मंद वाऱ्याच्या झुळुकेसोबत, नागमोडी वळणांच्या वाटेवर घाटांच्या ट्रेकचा सुरेख अनुभव.

कोणी गिरिजन भेटले, की 'कोन गाव' आणि लागलीच बैलदरा-बैलघाट-पायरीची वाट या विषयावर गप्पा हव्यातच!

मंद उतारावरून रानव्यातून प्रसन्न वाट.

पदरात पोहोचल्यावर मोठ्ठाल्या खोडांची जुनी झाडे. वाटचौकापाशी थबकलो. समोरून डावीकडून (दक्षिणेकडून) आलेली वाट कळकराई वाडीतून आलेली. वाटचौकापाशी ठळक खुणा नाहीत. आम्ही सह्याद्रीघाटमाथा उजवीकडे ठेवत उत्तरेकडे पेठ किल्ल्याकडे जाणारी वाट घेतली. वेळ सकाळचे ८:३५.

पदरातली रानव्यातली मर्यादित वापर असलेली, पण एकंच वाट होती. सुरेख रानव्यात झपझप आडवी जाणारी वाट तुडवताना अचानक मिलिंद थबकला. उजवीकडे झाडीत त्याला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गवसलेलं.

इतक्या गच्च घाटरानव्यात जुन्या घाटवाटेचा थक्क करणारा वारसा आमच्यासमोर होता.
दगडी चिरेबंद बांधकाम केलेली चौकोनी बारव समोर होती. झाडीत पाचोळ्यात झाकोळलेली. कातळामुळे गर्ददाट रंगाच्या छटेचं गूढ पाणी. आसपास झाडोऱ्याचं गचपण माजलेलं, त्यामुळे अंदाज घेणं अवघड.
बाहेरच्या बाजूला गुरांना पाणी पिण्यासाठी दगडी चिऱ्यांनी बांधलेली २० फूट लांब पन्हळ. गुरांच्या पाण्याची पन्हळ बघता, बैलदरा-बैलघाट जवळ असला पाहिजे, असंही वाटलं.
६-७ पायऱ्या उतरून गेलं, की पाणी काढता येईल अशी २० फूट लांबीरुंदीची चौकोनी कुलुपाच्या आकाराची बारव.
ही बारव कातळात खोदलेली नाही, तर कोण्या झऱ्याशी सलगी करत काळ्या खडकांच्या चिऱ्यांनी बांधलेली. म्हणून, पेशवाईच्या काळातली म्हणजे ३०० वर्षांपूर्वीची असावी असा (कोणत्याही पुराव्याशिवाय) अंदाज बांधला.
वेळ सकाळचे ९.

बारवेपासून पुढे उत्तरेला पेठच्या किल्ल्याकडे पदरातून जाणारी आडवी नागमोडी वाट होती. टप्प्याटप्प्याने भेटणारे झरे-ओढे, त्यांचा खळाळणारा नाद आणि कोवळ्या उन्हांत चमकणारे पाणी.

घाटाच्या रानव्यातून अधूनमधून डोकावणारा कोथळीगडचा माथा - अजून भरपूर दूर.

घाई-गडबड कसलीच नाही. निवांत कातळ-झाडीचे टप्पे आडव्या वाटेवरून पार करत होतो. वाटलं, की कातळावर पाठ टेकवून विश्रांती - फोटूग्राफी आणि ट्रेकगप्पा!

पदरातून जाणारी आडवी वाट आता किंचित डावीकडे वळत - पेठच्या किल्ल्याकडे जाणार होती. (नंतर, नकाशे वाचताना वाटलं, की उजवीकडे पूर्वेला जाणारी वाट घाटदेव भैरोबाच्या साथीने बैलघाट/ खडीची वाट चढत असावी - कदाचित!)

सह्याद्रीमुख्य रांगेकडे पाठ करून आता आम्ही पेठच्या किल्ल्याच्या दिशेने  जाणार होतो. ही वाटचाल सह्याद्री आणि पेठच्या किल्ल्याला जोडणाऱ्या कौल्याच्या धारेच्या दक्षिण कुशीतल्या पदरातून होती. रेंगाळलेल्या पावसामुळे आणि कमी वापरामुळे वाटा फारश्या मळलेल्या कुठेच नव्हत्या.

मोकळवनातून समोर आला करकरीत उन्हांत निथळणारा कोथळीगडचा झाडीभरला पदर आणि कातळमाथा. किल्ल्याची परिक्रमा करायची असल्याने बरीच चाल बाकी होती.   

पूर्वेला मागे वळून पाहिलं, की दिसणारा पवनचक्क्यांचा माथा म्हणजे नाखिंद्याजवळचा सह्यमाथा. त्याच्यापासून उतरणारी झाडीभरली धार - म्हणजे कौल्याची धार. याच धारेवरून आमचा परतीचा प्रवास असणार होता.

डावीकडे दक्षिणेला झाडीमागे सह्याद्रीच्या भिंतीतून कुठे आणि कुठल्या घाटवाटा उतरत असतील, याचे अंदाज बांधले.

पेठचा किल्ला जवळ येऊ लागला, तसं ऊन तापू लागलं. अन, पावलं झपझप उचलली.

तरीही, क्षणाक्षणाला मागे वळून, गवताळ माळामागे सह्यघाटमाथ्याचे आणि तिरपांड्या कौल्याच्या धारेचं रुपडं डोळ्यांत साठवण्याचा मोह होत होता.

भाताच्या खाचरांमधून घुसत वाट काढताना, साथीला होता - दीठी सुखावणारा हिरवा-पिवळसर रंग, भाताच्या ओंब्यांचा हातांना होणारा स्पर्श आणि आसमंतात घमघणाऱ्या भाताच्या अत्तराचा गंध! 

भाताची कापणी करून, ओंब्यांना उन्हं देणं सुरु झालेलं. पेठ किल्ल्याला वळसा घालत, गावची हद्द सुरु झालेली. सकाळचे ११३०.

पेठच्या किल्ल्याच्या विहंगम दर्शन घडवणारी, उभ्या चढाईची 'कौल्याची धार':
- घाटमाथ्यावरचे गाव: पडारवाडी-वांद्रे, तालुका राजगुरूनगर, जिल्हा पुणे
- कोकणातले गाव: आंबिवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: कोथळीगड (पेठचा किल्ला)
- स्थानवैशिष्ट्य: पेठचा किल्ला आणि सह्याद्री घाटमाथा जोडणाऱ्या धारेवरून चढणारी घाटवाट.
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: कौल्याच्या धारेवर मेटाच्या खुणा-खळगे
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झऱ्यातून
- निवारा: पेठ दुर्गाच्या पोटातल्या पेठ गावात. पडारवाडी-वांद्रे गावात
- चढाई: ४०० मी
- वेळ: २ तास (पेठ गावातून कौल्याची धार चढायला) + २ तास (कौल्याची धार ते माळेगाव)
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

पेठ गावात बाईक्सवर 'यो-गिरी' करत 'ट्रॅकिंग'(?) करायला आलेल्या जन्तेकडे दुर्लक्ष केलं. नव्याने झालेल्या प्लॉटिंग आणि कुंपणामुळे लांबचा वळसा घातला. पेठच्या पदरातल्या सुरेख रानात कुणाच्यातरी फार्म-हाऊसच्या हौसेपायी चुथडा होणार तर!!!

पेठच्या किल्ल्याला वळसा घालत, ट्रेकचा उत्तरार्ध सुरु केला. पूर्वेला सह्याद्रीकडे निघालो. डावीकडे तुलनेने निवांत चढणीची 'नाखिंदाघाटा'ची आणि उजवीकडे किंचित दक्षिणेला उभ्या चढणीची 'कौल्याची धार' अश्या दोन वाटा इथून पडारवाडी-वांद्रेकडे चढतात. त्यामुळे लख्ख मळलेली वाट.

पण, इतक्यातच नव्याने झालेल्या प्लॉटिंगमुळे कौल्याच्या धारेकडे जाणाऱ्या वाटेचा उजवीकडचा फाटा मोडलेला. झुडुपांच्या गचपणीतून वस्पटीतून वाट काढत पेठचा किल्ला आणि कौल्याच्या धारेच्या मधल्या खिंडीत पोहोचलो. इथून किल्ल्याची वाट मोडलेली.

पूर्वेला नाखिंदा टोकापाशीच्या पवनचक्क्या, उतरणारी कौल्याची धार, गवताळ माळ तुडवत जाणारी वाट आणि आभाळात विखुरलेले ढग.

पाठीमागे झाडीभरल्या पदरातून उठावलेला पेठचा किल्ला झपाट्याने दूर आणि खोल जाऊ लागला.

एके ठिकाणी कातळावरून दिसत होता चौफेर सुरेख पॅनोरमा.  उत्तरेला पदरगड - भीमाशंकर-सिद्धगड आणि खेतोबा-आंबेनळी घाटवाटांच्या जागा निरखल्या.

सर्वदूर दृश्यामुळे त्या कातळाची जागा मोक्याची. त्यामुळे धपापणाऱ्या ट्रेकर्सनी विसावण्याची संधी साधलेली. आणि, तिथेच 'कौल्याची धार'सुद्धा पुरातन असल्याची खूण गवसली. कातळात खोदलेले २ खळगे आणि २ खोबणी. एकमेकांपासून ५-७ फूट अंतरावर साधारणतः चौकोनी आकार होईल, अश्या पद्धतीने खोदलेले. इथे नक्की एखादं टेहेळणीचं मेट असेल, असं वाटलं. या खोबण्यांमध्ये लाकडी खांब रोवून आसरा करता येत असेल... कदाचित!

धारेवरची वाट बरीचशी मोडलेली. पण, अरुंद धारेवरून माथ्याकडे घुसत जात वाट काढणं अवघड नव्हतं. चौफेर दृश्यामुळे धम्माल वाट.

डावीकडे समोरच (किंचित उत्तरेला) उभ्या कड्यातून, तिरप्या झाडीभरल्या घळीतून अत्यंत कौशल्याने काढलेली नाखिंदा घाटाची वाट लख्ख  दिसत होती. ३-४ वर्षांपूर्वी ही वाट आम्ही खूप मनापासून अनुभवलेली (वाचा नाखिंदा घाटाच्या चढाईचा ब्लॉग इथे - लिंक)

आता उभ्या धारेवरून, कातळावरून जाणारी वाट. कडक उन्हामुळे दमवणारी. पाणी-खाऊ-फळं असा मारा असूनही, पायात क्रॅम्प्स आले. इलेक्ट्राल संजीवनीचा आधार घेऊन पुनश्च चढाई सुरु.

ऊन तापलेलं. वारं पडलेलं. धारेवरून उभी - अजून उभी - चढण.

खुल्या आभाळ-ढगांच्या पार्श्वभूमीवर अरुंद धारेवरून एकेक पाऊल अजून उंचावर रोवत चढाई. आता समोर कातळटप्पा खुणावू लागला.

तसा सोप्प्या श्रेणीचाच हा कातळटप्पा. पावसाळा सोडून एरवी दोराची गरज नाही.

अरुंद धारेवरची गवता-कातळावरची चढाई अंतिम टप्प्यात आलेली. पेठचा किल्ला दूरवर खोलवर गेलेला. कधी वणवा लागून गेला, की कौल्याची धार उघडी-बोडकी होते. घसरडी होते. तेंव्हा, चढाईला अधिकच त्रास होणार हे नक्की.

नाखिंदा टोकाच्या पोटातल्या गर्द झाडोऱ्याचं दृश्य डावीकडे खुणावत होतं. आधी केलेल्या नाखिंदा घाटाच्या आठवणी जाग्या होत होत्या.

मागे खोलवर कौल्याच्या धारेमागे पेठच्या किल्ल्याचं विहंगम दृश्य! तुंगी-पदरगड-भीमाशंकर-सिद्धगड या सवंगड्यांना रामराम केलं. वेळ संध्याकाळचे ४.

नाखिंद्याजवळच्या घाटमाथ्याचं सुरेख दृश्य! उतरंडीच्या उन्हांत चमकणारं सोनेरी गवत, रानफुलं आणि ओहोळ.

इथल्या सह्याद्रीला घाटमाथ्यावरून थेट कडा नाहीये. तर ५० मी कातळमाथ्याच्या पोटात पश्चिमेला गर्द झाडीचा पदरसपाटी आहे. त्यामुळे, आम्हांला नाखिंद्याच्या उंचीपर्यंत म्हणजेच पवनचक्क्यांपर्यंत चढाई करावी नाही लागली. इथून पुढच्या ट्रेकसाठी या भागाच्या भूगोलाचे फंडे क्लियर हवेत, नाहीतर गडबडणार.

कौल्याची धार चढल्यावर पदरातल्या गर्द रानापाशी आलो. विलक्षण लँडस्केप. वेळ ४:१५.
रानाकड़े जाणारी मळलेली आडवी वाट लागली. पण, २ मिनिटांत लक्षात आलं, ही वाट जाणार उत्तरेला डावीकडे वळत नाखिंदा टोकाजवळून पडारवाडीकडे.

मागे वळून दक्षिणेची वाट घेतली. वांद्रे खिंड - माळेगाव - तळपेवाडी - सावळे गावाकडे जाणारी वाट घाटरानव्यातून शोधतच जावं लागलं. डावीकडे नाखिंदा-वरसूबाई माथा ५० मी उंचावर ठेवत कितीकिती चाललो. वेळ ५.

आडवी गर्दझाडीतली वाट. सुरेख घाटरानवा. डावीकडे सतत साथ देणाऱ्या नाखिंदा डोंगराचा माथा आता आतल्या पूर्वेला वळण घेत होता. इथेच आम्हांला वाटेने चकवलं. डावीकडे वळण घेत जाणारी पायाखालची वाट लख्ख मळलेली. त्यामुळे, माजलेल्या गवतांतून तळपेवाडीकडे सरळ जाणारी पुसट वाट कळलीच नाही. आणि,
कुठल्याश्या नसलेल्या वाटेने घुसत जाण्यापेक्षा मळलेली वाट कधीही बरी, असं म्हणून आम्हीही चालत राहिलो. मात्र, ती वाट वांद्रेखिंडीत जाणार, हे लवकरच स्पष्ट झालं. वेळ ५:३०.

आता, रीवर्क निस्तरून तळपेवाडीची वाट हुडकूनच काढावी लागली. पावसाळा लांबल्याने आणि कमी वापरामुळे वाटा फार मळलेल्या नाहीत. (पावसाळ्यानंतर काही महिन्यांनी ट्रेक केला, तर वाटा शोधणे सोपे होईल.)

घाटमाथ्यावरचा देखणा घनगर्द झाडोरा. आडवी लांबचलांब चाल. दिशा आता अचूक पकडलेली. सु-सा-ट-लो. बैलघाट-खडीची वाट जिथून सुरु होत असावी ती जागा हेरली.


आता अंधारू लागलेलं. गूढरम्य ओढ्यापाशी पक्ष्यांचे कॉल्स, वाहत्या पाण्याचा खळाळ, घनदाट रानवा आणि अंधारून आलेली कातरवेळ.

केवळ दिशाशोधनाच्या कौशल्यावर रानातून पुढे तळपेवाडी आणि माळेगाव गाठलं. आणि, ट्रेकची सांगता केली. संध्याकाळचे ७:३०.

दणदणीत ट्रेकची सांगता रुचकर जेवणाने. गप्पा ट्रेक्सच्याच.

बारा तासांचा सणसणीत ट्रेक झालेला.
... कधी हरवलो घाटरानव्यात - घाटवाटेतल्या गच्चगच्च रानव्यात;
तर कधी पुरतं गोंधळलो वळणघाटांच्या नावं-स्थानं-नकाशात.
... कधी धपापलो लांबचलांब दमवणाऱ्या चढाई-उतराई-चालीने;
तर कधी कुतूहल वाटलं वाटवारशाचं - घाटवाटांवर गवसलेल्या जुन्या ऐतिहासिक वारशाचं.
जपलेल्या आठवणींमध्ये आहे - घाटरानवा वाटवारसा!


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, निनाद बारटक्के, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे
३. घाटांची नावे-स्थाननिश्चिती: या घाटांच्या नावांच्या बाबत ट्रेकर्सची वेगळी मतं असू शकतील. वेगवेगळ्या गावकऱ्यांकडून मिळलेल्या माहितीनुसार नकाशात नोंद केलीये.
४. कृतज्ञता: जितेंद्र खरे आणि योगेश अहिरे ज्यांच्याकडून बैलदरा घाटाबद्दल पहिल्यांदा ऐकलं.
५. कृतज्ञता: प्रसन्न वाघ, ज्यांच्याकडून अमेयला घाट परिसराचा भूगोल समजावून घेण्यात मदत  झाली.
६. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
७. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.


13 comments:

  1. साई ब्लॉग नेहमीप्रमाणेच मस्त! नाखिंद आणि कौल्याची धार झाली आहे आता बैलघाट/पायरीची वाट आणि शेजारीची पूर्वी राहिलेली फेण्यादेवीची घाटवाट करता येईल. मार्गदर्शन करायला तुम्ही घाटवाटा experts आहातच. बैल घाटातली बावर (विहीर) पण मस्त. खूप छान लिहतोस मित्रा अगदी ओघवत!

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत, खूप धन्यवाद! :)
      खरंय, बैलदरा/पायरीचा घाट उतरून कळकराई वाडी आणि फेण्यादेवी घाटाने चढाई हा चांगलाच घाटलूप पर्याय आहे.
      पुनश्च धन्यवाद!

      Delete
  2. मस्त लेख.

    कधी तरी मला पण घेऊन चला एखाद्या घाटवाटेवर.

    ReplyDelete
    Replies
    1. पंकज, धन्यवाद मित्रा!
      नक्की पिलान करूयात एकत्र ट्रेकचा! :)

      Delete
  3. विलक्षण! साई तुझ काही वाचल की पायाला स्फुरण चढत आणि मन ह्या रानव्यात भिरारत!👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तुषारभाऊ! :)
      मनापासून आनंद आहे की, तुला हे आडवाटांचं वेड केंव्हाच लागलं आहे.
      ते उत्तरोत्तर वाढतंच जावं, अश्या शुभेच्छा!

      Delete
  4. साई तुझे लेख वाचले की जवळ जवळ ट्रेक करून आल्याचे पुण्य मिळते. खूप छान लेखन मित्रा: उत्तम

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग वाचून या ट्रेकला जावसं वाटावं किंवा
      केलेल्या दुसऱ्या दणदणीत ट्रेक्सची आठवण येऊन पुन्हा कधी एकदा सह्याद्रीत जाऊ अशी हुरहूर वाटावी
      - हाच हेतू आहे ब्लॉगचा..
      धन्यवाद उत्तमराव! :)

      Delete
  5. वाचून मस्त वाटल.दादा कर्जत वरुन कस जायच सांग ना? एका दिवसात ट्रेक होईल ना

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, कर्जतवरून ट्रेक करताना गाडी प्रवास विचार करता - ट्रेकची दिशा उलट केलेली सोपी जाईल असे वाटते. कर्जत - कोठींबे - आंबिवली मार्गे पेठचा किल्ला चढून कौल्याची धार चढाई. बैलदरा उतरून बारव बघून मागे येत कळकराई वाडीवरून पिंपळपाडा गाठणे. ट्रेक सकाळी लवकर (७ वाजता) सुरु केला, तर एका दिवसात ट्रेक शक्य आहे. गुगल नकाशावरून अभ्यास केला, तर ट्रेकआधी आणि नंतरचा गाडीप्रवास सोपा होईल. धन्यवाद!

      Delete
  6. पाठीमागे सह्याद्रीच्या भिंतीसोबत तुंगी-पदरगड-भीमाशंकर नागफणी-सिद्धगडपर्यंतचा नजारा दीठी सुखावून गेला. Class..... Magical region.

    ReplyDelete
  7. साईप्रकाश, लेखन नेहमीप्रमाणे उत्तम! वाटेत असणारी बारव "बायजाबाईची बारव" म्हणून ओळखली जाते!

    ReplyDelete
  8. छान अनुभव.. मस्त वर्णन.. झकास फोटोज' साई!
    सह्याद्रीतील घाटवाटांची तंगडतोड ही एक भलतीच नशा आहे, याची अनुभूती तुझ्या लेखणीतून वेळोवेळी दिसते.

    ReplyDelete