Pages

Monday, 18 December 2017

~थ~र्रा~टा~नु~भू~ती~

आजोबा शिखराची घाटवाटांनी परिक्रमा करताना - उतराई केली खडतर गुहिरीच्या दाराने आणि दृष्टीभय असलेल्या घसारा-कातळटप्प्यांवरुन चढाई केली कठीण पाथरा घाटाची. जबरदस्त.. निव्वळ थर्राटानुभूती!!!


WARNING:: हा ट्रेक अतिशय खडतर असून, घसारा आणि दृष्टीभय असलेल्या जागी कातळारोहण असल्याने - कठीण श्रेणीचा आहे. पुरेश्या अनुभवाशिवाय, साधनांशिवाय आणि दणकट टीमशिवाय अजिबात प्रयत्न करु नये.

... एकापाठोपाठ एक तिरक्या-उभ्या कातळटप्प्यांवरची चढाई काही केल्या संपेना...
... चार तासांच्या खडतर चढाईनं शिणल्यावर पोहोचलो होतो ट्रेकच्या सर्वात धोकादायक टप्प्यांवर...
... काळ्या कातळाचे टप्पे, तुरळक भुऱ्या गवताची झुंबाडे आणि फसवी घसरडी रेती - आधारासाठी विश्वास तरी कशावर ठेवावा...
... वेळ टळटळीत माध्यान्हीची. निळ्या आभाळात एखादा स्वच्छंद ससाणा पल्लेदार वळणं घेतोय. अन, पाठीमागे त्याला आव्हान देणारं अजस्त्र शिखर खुणावतंय.
... आधारासाठी तिरका वर कुठेतरी होल्ड सापडलाय. वाऱ्याने हेलकावणाऱ्या सॅकला सावरत, विचित्र अवघडलेल्या हालचाली कसरत करत, स्वतःला खेचून घेतोय...
... पुसटत्या तिरक्या कातळावरून बुटांच्या घर्षणाच्या आधारावर झूप्पकन आडवं निघून जायचंय. ऊर धपापलंय. घशाला कोरड पडलीये. कोणीतरी अश्या टप्प्यावर 'लॉक' होतंच.  पण,अश्यावेळी जिगरी ट्रेकरदोस्त त्याला सोबत देऊन अलगत सोडवतात.
... डोकावणाऱ्या (ओव्हरहँग) कातळाला वळसा घालणारी, जेमतेम पाऊल मावेल अशी रेताड घसाऱ्यावरची अरुंद वाट चढताना खाली दरीकडे नजर गेली आणि एक क्षण हरवलोच. करवती धारेपल्याड एकदम नजर गरगरली होती शेकडो फूट खोल दरीत! थर्राट सह्याद्रीदर्शनाने भारावून गेलेलो.

डोक्यात झिंग चढली होती सह्याद्रीतल्या खडतर, अवघड आणि मानाच्या वाटा भटकण्याची. ट्रेकमार्गाची कल्पना यावी, म्हणून हे रेखाटन...


... १२ ट्रेकर्सनी दोन रणगाड्यांमधून (गाड्या) पहाटे ४ ला पुण्यातून कूच केलेलं. नारायणगाव-ओतूर-ब्राम्हणवाडा-कोतूळ-राजूर असे टप्पे घेत, लाडक्या मुळा खोऱ्यात प्रवेश केला. अवघ्या आसमंतात हिवाळी पहाटेची धुरकट (हेझी) हवा दाटलेली. कोथळे भैरवगडालगत हरिश्चंद्रगडाची गणेशधार आणि बालेकिल्ला-तारामती-कोंबडा शिखरं अंधूक जाणवत होती. घनचक्करच्या अजस्त्र पहाडाला बिलगून, कोवळी किरणं मुळा नदीच्या वळणवेड्या खोऱ्यात झिरपू लागली. कलाडगड किंचित धूसर धुकटात फसलेला, मात्र त्यामागचा आभाळात घुसलेला न्हाप्ताचा (नकटा) कातळमाथा उन्हांत उजळलेला. पाबरगड-शिरपुंजे भैरवगड-घनचक्कर-गवळदेव-मुडा अश्या शिखरांच्या कुशीतून जाणारा निवांतशांत रस्ता. कुठे शेताडीमध्ये शेतकरीदादाची सुगीच्या हंगामाची लगबग, तर कुठे दुरून विहिरीतून पाणी भरून आणणाऱ्या बायाबापड्या. कुठे शेरडं घेऊन रानात चाललेला आजा, तर कुठे चालत शाळेत निघालेली पोरंटोरं.


कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातले दाट झाडीचे टप्पे सुरु झाले. आदल्या दिवशीच्या पावसाने झालेली ओलसर पानं आणि रस्ते. दत्तूच्या गाडीच्या सनरुफमधून बाहेर डोकावलो. रस्त्याची वळणं, चढ-उतार, रानवा, गारेगार आसमंत आणि अधूनमधून डोकावणाऱ्या सह्याद्रीची रुपं अनुभवू लागलो. कुमशेतची दुसरी वाडी गाठायला ९:३० वाजले. दोन दिवसाच्या शिधा-सामानाची विभागणी करण्यात, हास्यकल्लोळात आणि परत एक चहा असं करत, ट्रेकसुरुवातीची 'गणपती-बाप्पा-मोरया' घोषणा द्यायला वाजले १०:३०.
           
खडतर उतराईचे 'गुहिरीचे दार':
- घाटमाथ्यावरचे गाव: कुमशेत, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
- कोकणातले गाव: डेहणे/ वोरपडी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: सह्याद्रीतल्या वैशिष्ट्यपूर्ण देखण्या आजोबा शिखराच्या ईशान्येकडून उतरणारी खडतर घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: नाहीत
- वाटेत पाणी: जानेवारीपर्यंत नैसर्गिक झरे
- निवारा: माथ्याजवळ कुमशेत, कोकणात डेहणे/ वोरपडी
- चाल: १२ किमी
- उतराई: ८०० मी
- वाटाड्या: आम्ही घेतला नव्हता. वाटा शोधण्यास मदत हवी असल्यास, वाटाड्या घ्यायला हरकत नाही.
- वेळ: ७ तास (विश्रांतीसह)
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

कुमशेतवरून पश्चिमेला बैलगाडीवाटेवरून ट्रेकर्सची वरात निघाली. सोबत होती रानात हुंदडायला निघालेल्या गाई-शेरडांची.

उजवीकडचं टेपाड मागे पडलं आणि गवताळ माळापल्याड उत्तरेला खुणावू लागला आजा पर्वत. वेळ ११.

माळावर वायव्येला वळून मस्त निवांत मळलेली वाट तुडवू लागलो. कधी कातळावरून, कधी निवडुंगाशेजारून, तर कधी गवतातून अलगत चढ-उतार करणारी वाटचाल. आदल्या रात्री पाऊस झाल्याने, कुठेतरी कातळावर पाणी साठलेलं. शेताडीत गवताच्या गंज्या रचलेल्या.

डावीकडे आजा/आजोबा पर्वत आणि उजवीकडे करंडा डोंगर. त्यांच्यामध्ये होती झाडीभरली खिंड - गुहिरीच्या दाराची.

किंचित चढ चढून वाट आजोबाच्या उतारांकडे जाऊ लागली.

कधीकाळपासून या भागात आजोबा डोंगराच्या कुशीत होते सह्याद्रीच्या सुरेख रानाचे टप्पे. याच टप्प्यांमधून आजाच्या शिखराकडे चढणारी वाट आहे. दोनेक वर्षांपूर्वी अतिवृष्टीने आजाचा पूर्वेचा २०० मी उंचीचा भलामोठ्ठा भाग दरडीच्या रुपाने ढासळला. माणसाच्या निसर्गातल्या ढवळाढवळीने, की निसर्गचक्राचा एक भाग म्हणून - कुणास ठाऊक! त्यामुळे आता मात्र, आजाच्या शिखरावर जाण्यासाठी या घसाऱ्यातून घुसत जायला पर्याय नाही.

ओढयाच्या पात्रात 'सिद्धाचे कुंड' नावाच्या रानदेवाचे ठाणे. पूर्वी हे अत्यंत रम्य ठिकाण - झाडीतनं शोधूनच काढायला लागायचे. आता दरडीनंतर ओसाड कातळावर उरली होती गंजलेल्या पत्र्याच्या आडोश्याखाली होती दगडी कोरीव पणती, कधीकाळी माखलेला शेंदूर, फाटका रंग उडालेला ध्वज आणि वाहिलेलं एखादं नाणं. रानदेवाला मनोमन वंदन केलं. माणसाने ढवळाढवळ केली नाही, तर सह्याद्री इथे काही वर्षात पुनःश्च रानवा फुलवायला समर्थ आहे, याची खात्री होतीच. वेळ ११:४०.

रानाच्या सुरेख टप्प्यामधून हिरव्यागार झुडुपांमधून आता गारेगार आडवी वाट तुडवत होतो. उत्सुकता होती गुहिरीच्या दाराच्या सुरुवातीची.

ओढ्यात रेंगाळलेल्या पाण्यापल्याड सुरेख दृश्य. डावीकड़े आजोबा, उजवीकडे करंडा आणि मध्यभागी झाडीभरली खिंड गुहिरीच्या दाराची.

ओढा ओलांडला. गवताळ माळावर एक क्षण थबकलो. आजोबा आणि करंड्याच्या डोंगरसोंडांमधून घुमत येणाऱ्या रानवाऱ्याची अनुभूती घेतली. पल्याड वाट चढून पोहोचलो गुहिरीच्या खिंडीत. आरोग्यदायी अल्पोपहार आणि फलाहार केला. वेळ १२:३०.

आणि, अखेरीस दर्शन घडलं गुहिरीच्या नाळेचं. आजोबाचे उत्तरकडे गुहिरीच्या नाळेत कोसळलेले. ज्या गुहिरीच्या दाराबद्दल इतके दिवस ऐकून होतो, त्याच्या उतराईची उत्सुकता मनात दाटलेली. 

नाळेतून खोलवर कोकणदर्शन झालं. सपाटीवरच्या चढाईनंतर अचानक नाळेच्या वाटेची उतराई सुरु झालेली. आणि थोडक्या वेळातच - पायांवर ताण कमी येण्यासाठी वॉकिंग स्टीक आणि कातळभिंतींचा कसा आधार घ्यायचा, दगडांवर रेलत खोलवर उतरताना अडकणारी सॅक कशी सोडवायची, न हलणारे दगड कसे हेरायचे आणि दम लागू न देता हळूहळू सातत्याने कशी उतराई करायची, अश्या तंत्राचा ऱ्हिदम सापडायला लागला.

आख्ख्या नाळेमध्ये बारीक आकाराच्या विटा सांडल्या असाव्यात, असा दगडांचा खच पडलेला. त्यातून उतरत राहणे, म्हणजे किचकट काम. लूज खडकांच्या चिपांवरून हळूहळू उतरण्याची कसरत चाललेली. जिथे पाय ठेवू, ती चिप कधी धोका देईल याचा भरवसा नव्हता.

अतितीव्र उताराची गुहिरीची नाळ अग्गदी खोलवर हरवलेली दिसत होती. कधी डाव्या पायाने लीड घेत डाव्या पायावर भार देत उतरायचं, तर कधी उजव्या पायावर भार देत. कधी कातळाकडे फेस करून, तर कधी चक्क बसून गुरुत्त्वाकर्षणाचा वापर करून किंचित घसरत. झपाट्याने पाय शिणत होते. मात्र, समाधान एक होतं, की पूर्ण गुहिरीची उतराई सावलीतून होती. त्यामुळे हवा गारेगार.
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

नाळेतून समोर दरीपल्याड डोकावत होता - साम्रदजवळचा शिपनेरचा डोंगर. खाली ७०० मी खोलवर कोकण  झाडोरा. अंतर चांगलंच लांब होतं.

माथ्यापासून १०० मी उतरल्यावर एका २० फुटी कातळटप्प्याने स्वागत केलं. अशक्य अवघड काहीच नाही. कातळटप्प्याचा मान राखण्यासाठी कातळाकडे फेस करून उतरायचं. आधी डावीकडे थोडा अडचणीचा ट्रॅव्हर्स आणि मग खाली उतरायचं. एखादा ठिसूळ आधार सोडला, तर बाकी बख्खळ चांगले आधार होल्ड्स आहेतच. सॅक्ससह कातळ उतरणं ज्यांना अडचणीचं वाटलं, त्यांच्या सॅक्स रोपने सपासप उतरवल्या. वाजला होता दुपारचा १.

उतार अतिरिक्त आहे. कधीकधी असह्य आहे. गुडघ्यांची अक्षरश: वाट लावणारा, शिणवून टाकणारा. कधी अल्याडचा आधार दगड पकडून, तर कधी पल्याडच्या दरडीला लटकून उतराई चाललेली.

खडतर उताराने पायांवर ताण येत असला, तरी ट्रेकर्सच्या सतत खिदळण्याने गुहिरीचं दार दणाणून जात होतं.

२०० मी उतराई झाल्यावर नाळेचं मुख उलगडत जाऊन, थोरल्या घळीतली उतराई सुरु झाली. किरकोळ झुडुपं दिसू लागली. वाट अशीच घळीतून उतरणार, की थोडं डावी-उजवीकडून दांडावरून जाणार याचे आडाखे बांधणे चाललेले.

मागे वळून पाहिलं, तर गुहिरीच्या दाराची 'चौकट' - म्हणजे घाटमाथ्याजवळचे कडे उन्हांत उजळत होते. पण, खुद्द घाटामध्ये मात्र दिवसभर गार सावली होती.

खिंडीपासून ३५० मी उतरल्यावर हळूहळू डावीकडे करंडा शिखराचा माथा लख्ख उन्हात उजळलेला. झाडोरा जवळ आल्यावर, वाट गुहिरीची मुख्य घळ सोडून आता दक्षिणेला-डावीकडे दांडावर वळू लागली. दुपारचे २.

घाटाची घळ सोडली, तरी सुसाट उताराची साथ सोडली नव्हती. वाट बारीक झुडुपांमधून आणि घसरड्या रेतीतून धुम्म घरंगळली होती. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागलेले, त्यामुळे जेवणासाठी सगळ्यांना एकत्र बसता येईल अश्या जागेचा अंदाज घेत होतो.

त्या बंबाळ्या रानात जेवणासाठी ओढ्याच्या पात्रातला तिरका कातळटप्पाच काय तो थोडा मोकळा मिळाला. घरून आणलेला डबा खाऊन आणि थंड ताक पिऊन दणदणीत ढेकर देण्यात आली. वेगळी विश्रांती घेणं टाळलं. दुपारचे ३:१०. समोर डोकावत होते सखेसवंगडी डोंगर - पश्चिमेला शिपनेरचा डोंगर, उत्तरेला करोली घाटाच्या मागे दुर्ग अलंग. साम्रदचा कोकणकडा. सांदण दरी अर्थातच लपलेली.

परत एकदा उतराई सुरु. सततच्या दगड-घसारा-उताराने पाय आता खरंच शिणलेले. अवघड जागी सतत लक्ष ठेवून, त्यातल्या त्यात न हलणाऱ्या दगडांची निवड करुन करुन थोडा ताण आलेला. तुलनेत सोपा झाडीतून वळणारा एक उतार आला. एका गाफील क्षणी घसरड्या घरंगळीच्या तावडीत सापडलो आणि दोन-पाच फूट घसरुन भस्सकन आदळलो, कोलमडलो. पडताना सॅकमुळे छानसं स्थिरावलो (लॅण्ड झालो) असलो, तरी उजव्या हाताच्या तळव्यावर-बोटांवर-थोडं गुडघ्याला शेकाटलंच. पुढच्या क्षणी उठून परत उतराई चालू केली असली, तरी लागलेला मुका मार पुढे ट्रेकभर जाणवला. थोडक्यात निभावलं असलं, तरी हे प्रकर्षाने जाणवलं की, दमलेल्या अवस्थेतल्या ट्रेकर्सना चकवायला गुहिरीच्या दाराकडे कसली अस्त्रं आहेत. गुहिरीचं अजून एक अस्त्र - दोन घसारा टप्पे - येणं अजून बाकी होतंच...

पुढची चाल सुरु केली. मोठ्या ओढ्याच्या पात्रात कुठूनतरी आजाच्या माथ्यावरुन घरंगळत आलेल्या शिळा गुंफून पडलेल्या. त्यांच्या कुशीत साठलेल्या पाण्यात पडलेलं आभाळाचं प्रतिबिंब वाऱ्यासोबत डुलत होतं.

आणि, मग आले गुहिरीचे अस्त्र असलेले दोन घसारा टप्पे. रेती-गवत-घसारा आणि अतितीव्र उतरंड. दुपारचे ३:४५.

आधीची घळीतली वाट परवडली, रॉकपॅच परवडला म्हणायची वेळ आली. उतरंडया स्क्रीवर जास्त जीव त्रासला. आम्हांला आधीच्या रात्री झालेल्या पावसामुळे दबलेल्या रेतीचा थोडा फायदा मिळाला. अन्यथा सुसाट घसरगुंडीच ती!!!
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

पहिला घसारा टप्पा ४० फुटांचा उतरला. पायगाडीला ब्रेक मारला. डावीकडे-दक्षिणेला आजोबाचे रौद्रविराट देखणे दृश्य होते. घसाऱ्यावर विश्रांती घेताना ते दृश्य भारावून मनी साठवले. माथ्याच्या कातळमाथ्याला चिकटून निसटून जाणाऱ्या सूर्यकिरणांची नक्षी न्याहाळली आणि माथ्याकडून झेपावणाऱ्या ओढे-झाडी-डोंगरटप्प्यांचे वैभव दिठीत साठवले.

पुढे होता १२० फूट उतराईचा दुसरा घसारा टप्पा. ज्या सुसाट स्पीडने गवता-घसाऱ्यातून वाट उतरते, ते कम्माल. पायाची गुडघ्यांची वाट लागलीये होतीच. पण, आम्ही निवडलेली ट्रेकची ऋतू-वेळ (सीझन) योग्य होती. रानात वणवे लागले, डोंगरउतार करपले तर हे घसारा टप्पे अजून खडतर बनणार, हे नक्की. वेळ दुपारचे ४:१०.
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

घाटाची उतराई बरीचशी झालेली. इथून कुठेतरी डावीकडे पुसटशी वाट आजोबा शिखराच्या कुशीतल्या वाल्मिकी आश्रमात थेट नेते म्हणे. रान फार माजलंय. वाट सापडणं अवघडच. त्यामुळे, आम्ही निघालो तुलनेत मळलेल्या वाटेने. पायथ्याच्या दाट रानातून गुहिरीच्या ओढ्याच्या काठाने धुम्म सुसाटली वाट वोरपडी/ डेहणेकडे. ऊन उतरु लागलेलं. आभाळात तुरळक ढग विखुरलेले. पाठीमागे वळून पाहिल्यावर सह्यगिरीच्या अजस्त्र भिंतीत कात्रा - करंडा - गुहिरी - आजोबानं फेर धरलेला. अप्रतिम पॅनोरमा!


गुहिरीच्या पात्रात कात्रा-करंड्याचे अजस्त्र कडे हे असे विखरून गेलेले, हरवून गेलेले. बिंब की प्रतिबिंब खरं!

करंडा - गुहिरी - आजोबाला अलविदा करायची वेळ आलेली. पल्याडचा रतनगड-खुट्टा सुळका-नेढं निरखलं.  नदीपात्रात निवांत बसून बघितली - आभाळाच्या आणि सह्याद्रीच्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर उडणारी बगळ्यांची माळ. ...

खडखड खडखड करत आदळणाऱ्या ट्रॅक्टरच्या आवाजाने भानावर आलो. वाळूउपसा जोरात चाललेला. पोरांच्या हातात मोबाईलवर बॉलीवूड गाणी लागलेली. वोरपडी/ डेहणे गाव - आधुनिक जग - जवळ आलेलं. संध्याकाळचे ५.

वोरपडीच्या मारुती मंदिरात मुक्काम होता. गुहिरीदाराच्या उतराईने बख्खळ दमवणूक झालेली, पण सिंघकाकांनी सगळ्यांकडून स्ट्रेचिंग व्यायाम करून घेतल्याने तरतरी आली. ढमढेरेकाकांनी उत्कृष्ट चहा आणि हेल्दी-टेस्टी मिसळीची मेजवानी दिली. त्यानंतर रात्री रंगली मैफल किशोरच्या अवीट गाण्यांची... थंडी हवा ये चांदनी सुहानी, ए मेरे दिल सुना कोई कहानी... सर रखके आसमां पे, पर्बत भी सो गये.. मेरे दिल तू सुना कोई ऐसी दास्तान, जिसको सुनकर मिले चैन मिले मेरी जान... 

दृष्टीभयाचा थरार 'पाथरा घाट': 
- घाटमाथ्यावरचे गाव: कुमशेत, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर
- कोकणातले गाव:कोटाची वाडी/ कुंडाची वाडी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: सह्याद्रीतल्या वैशिष्ट्यपूर्ण देखण्या आजोबा शिखराच्या दक्षिणेला असलेली कठीण घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: घाटनदेवी ठाणे आणि पाण्याचे खोदीव टाके (कोरडे). खिंडीच्या अलिकडे ओढ्यात पहारीचे घाव घातल्याचे असंख्य गोल खळगे (कदाचित पाणी टाके खोदाईसाठी कातळाची पोत बघण्यासाठी)
- वाटेत पाणी: नाही. पायथ्याच्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये जानेवारीपर्यंत
- निवारा: कुमशेत
- चाल ११ किमी
- चढाई: ७०० मी
- वाटाड्या: आम्ही घेतला नव्हता. वाटा शोधाव्या लागतात. पुरेसा अनुभव नसेल, तर वाटाड्या सोबत घावा.
- वेळ: ७ तास (विश्रांतीसह)
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
पाथराघाट अवघड वाट असल्याने दणकट ब्रेकफास्ट करून वोरपडीतून निघालो. वोरपडीतून वडापने कांबे - वालशेत - कोठाची/ कोटची वाडी गाठली. इथून किंवा पल्याडच्या कुंडाच्या वाडीतून पाथरा घाट गाठता येतो. या वाड्या म्हणजे अगदीच आदिवासी पाडे असल्याने, इथे मुक्काम टाळलेला. गच्च धुके दाटलेले. सकाळचे ८:२५.

मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवीत होता... आधीच पाथरा घाटाबद्दल बरंच काही ऐकलेले, त्यात हे असं गूढरम्य वातावरण.

फक्त रानावर अवलंबून असलेल्या या गिरीजनांना काय समजावणार वृक्ष-पर्यावरणाचे महत्त्व.

मोकळवनात आलो. धुकं ओसरलं. आणि दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्यगिरीचे सुरेख दर्शन घडलं. आजोबा आणि सीतेचा पाळणा सुळका लक्षवेधक होते.

सह्याद्रीचे पश्चिमेला पसरलेले अनेक दांड आडवे पार करत, दक्षिणेला तिरकं जात पाथरा घाटाकडे १.५ तासांची चाल होती. प्रत्येक घळीत उतरायचं आणि पाण्यानी ओंजळ भरून पुढच्या दरडीवर निसटायचं.

कधी पसरलेला मऊशार गवताचा गालिचा. निवांत पहुडून इंजिन थंड करायचं आणि सह्याद्रीच्या कुशीतल्या नीरव शांततेचा अनुभव घ्यायचा. पाच मिनिटांच्या विश्रांतीत पाच तासांच्या झोपेचं सुख! योगनिद्रेतला दत्तू!

मोकळवनातून संपूर्ण टेरेन नजरेसमोर आला. डावीकडे उत्तरेला आजोबा आणि सीतेचा पाळणा सुळका. तर उजवीकडे दिसणारी दातेरी धार म्हणजे पाथरा घाट. माथ्यापासून ४५-५० अंशात झुकला असावा असं भासणारा  १५० मी कातळकडा, त्याला लागून असलेली नॉच - खिंड घाटणदेवीची. तिथे पोहोचायचं होतं. पल्ला बराच दूर होता. वेळ ९:४५.

उत्तरेकड़ून आजोबाकडून निघून पसरलेल्या सह्यभिंतीचं देखणं दर्शन घेत दीडेक तास चाललेली आडवी चाल आता संपत आलेली.

घाटणदेवीच्या किंचित उत्तरेच्या दांडावरून उभी चढाई सुरु झाली. गवताळ टप्पे. अडचणीच्या जागी घुसाघुशी. दिशाशोधन कौशल्य वापरावे लागले. पण, पाथऱ्याला असल्या अडचणी असणारच, ही मानसिक तयारी असल्याने वेळ मारून नेली. पाथरा-कृपेने (की माणसांच्या कृपेने!) अजूनही रानात वणवे लागले नसल्याने, देखण्या मऊ गवताच्या गालिच्यावरून चढाई करत झाडीभरला टप्पा गाठला. हे गवताळ टप्पे वणव्यात करपले, की रानात किती रखरख होईल आणि चढाई किती रटाळ-खडतर होईल, याची कल्पना करवेना.
     
उजवीकडे घाटमाथ्याकडे बघितलं, की पाथरा घाटाची कुठकुठली अंगे दिसत होती, हे समजावून घेतलं. समोर माथ्यापासून घरंगळलेल्या तिरप्या कातळकड्याची कड, एक खिंड आणि उजवीकडे सुळक्यासारखं डोंगरटोक खुणावत होतं. कातळकड्याच्या याच धारेवरून पाथरा घाटाची चढाई असणार होती. तिथे चढाई करताना डावीकडे ज्या दरीचं रौद्र दर्शन घडणार होतं, ती दरी आमच्यासमोर पसरली होती. खिंडीच्या अलिकडे घाटणदेवीचं ठाणं सापडणं अपेक्षित होतं. आणि, सुळक्यासारख्या डोंगरटोकाच्या पल्याड एक भेदक देखणी डोंगरधार दिसणार होती. घसरड्या गवतावरून आडवं जात, ओढा गाठला. वेळ १०:३०.

पाथराची खिंडीची उभी उंची गाठण्यासाठी ओढ्यातून सरळ उभी वाटचाल होती. सह्यमाथा आणि पाथराचे थरारक टप्पे जवळ येऊ लागले होते. वेळ १०:४५.

ओढ्याच्या पात्रातून कधी धोंड्यांवरून, तर कधी कातळावरून उभं चढत गेलो. पाथरा चढाईची कातळधार इतकी डोक्यावर आलेली, की तिला न्याहाळताना डुईवरचं टोपडंच निसटलं.

१०० फूट ओढा चढाई केल्यावर, ओढ्यातली चढाई थांबवून आता पाथरा खिंडीकडे उजवीकडे चढत जायचं होतं. कूच करण्याआधी कातळात असंख्य छोटे खळगे दिसले – नि:संशय खोदीवचं! पहारीने कातळाची पोत जोखण्यासाठी खोदलेले, कदाचित एखादे पाण्याचे टाके खोदण्याआधीची चाचपणी. इतकी आडवाट असूनही, जुनी पाऊलखुण गवसली की मनोमन आनंद वाटला. वेळ ११.

आता पाथराघाटाच्या कातळचढाईमार्गाच्या कुशीतली वाट होती. पाथराच्या कातळकड्याची अंतिम टप्प्यातली १५० मी चढाई करण्यापूर्वी, चढाईच्या टर्म्स आणि कंडीशन्स अश्या आधीच स्पष्टपणे दाखवण्यात आलेल्या.

खिंडीत पोहोचण्याआधी उजवीकडे कड्याच्या नैसर्गिक खोलगटीत काहीतरी खुणावू लागलं. खाजऱ्या वस्पटीतून घुसत गाठलं – भोळ्या भाविकांच्या पांथस्थांच्या श्रद्धेचे घाटणदेवीचे ठाणे आणि कोरडे खोदीव टाके. वेळ ११:४५.

देवीला नवसाची वाहिलेली असंख्य असंख्य मडकी, चुडा, लाकडावर खोदलेली देवता आणि कातळावर कधीकाळी माखलेला शेंदूर. थोडकी विश्रांती घेतली. आवळासरबत पिऊन टीम तरतरीत.

देवीला वाहिलेली, पण आज चलनातून बाद झालेली कितीतरी नाणी. कोणी कित्ती वर्षांपूर्वी वाहिली असतील. कसले नवस मागितले असतील. पाथराघाट चढणारी अजून एक वाट कुंडाच्या वाडीतून उभा दांड चढून, थेट घाटणदेवीच्या ठाण्यापाशी पोहोचतो असं ऐकलेलं. पुसट वाट दिसली खरी.

घाटणदेवीपासून पाथराघाटाच्या चढाईतल्या अंतिम टप्प्याचे जवळून दर्शन झाले. खिंडीतून पहिला टप्पा ७० फूट सोप्पा. सपाटीनंतर दुसऱ्या टप्प्यावर किंचित अवघड कातळ आणि त्यानंतर अरुंद कातळावरची वाट. माथ्याच्या ७० फूट खाली तिसऱ्या टप्प्यात उजवीकडे आडवी जाणारी अतिअरुंद वाट – असे सारं काही नजरेत सामावून घेतलं. आमच्या पाथराघाटाच्या सुरक्षित चढाईसाठी देवीला वंदन केलं आणि खिंडीकडे कूच केलं. खिंडीतून डावीकडे पाथऱ्याचा थरार सुरु झाला. वेळ दुपारचे १२. सकाळपासून ३.५ तासांच्या उभ्या चढाईनंतर आम्ही पाथऱ्याची कातळ-घसाऱ्यावरची चढाई करणार होतो. ही चढाई थोडी अवघड वाटू शकण्याचे हेही एक कारण!

चढाईमार्गाचा कोन (ग्रेडीयंट) आणि भुसभुशीत गांडूळमातीची घसरगुंडीची वाट सोप्पी नव्हती. उजवीकडे दरीपल्याड न्हाप्ता शिखर आणि रोहिदास शिखर खुणावत होतं.

पहिल्या टप्प्यावर ७० फूट चढाईकरून पोहोचणं तुलनेत सोपं होतं. सावलीच्या या झाडानंतर चढाईमार्गावर कुठेच झाड नाही. एका ट्रेकरची एनर्जी या टप्प्यात कमी पडू लागलेली. त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता, त्याला लगोलग खजुराचा खुराक देवून फीट करण्यात आलं.

दुसऱ्या टप्प्याची वळणा-वळणांची चढाई करताना मागे खिंडीपल्याड उतरत गेलेली करवती धारभेदक दिसत होती.


उभ्या कातळटप्प्यांवरून वळसे घेत जाणारी अरुंद वाट. वणवा लागला नसतानाही माती गडद करड्या रंगाची होती. त्यातून चुकार गवताचे झुंबाडे वाऱ्यावर थरथरत होते. एकमेकांच्या अक्षरशः डोक्यावरून चढणारी वाट.

आता आम्ही पोहोचलो पाथराघाटाच्या किंचित अवघड कातळटप्प्यापाशी. धोका कमी व्हावा, म्हणून बिनीच्या शिलेदारांनी बिले दिलेला, त्यामुळे होता मानसिक आधारही. टप्प्याच्या खाली मार्गदर्शनासाठी ढमढेरेकाका. वीस फूट उंचीच्या कातळावर आधी उजवीकडून चढत गेलो. हा कातळ चढणे तांत्रिकदृष्ट्या खूप अवघड नव्हतं. होल्ड्स मजबूत होते. पण, तरीही होता जबरदस्त थरार! पहा हा व्हिडीओ:
       
एकतर भीषण दृष्टीभय होतं. दुसरं म्हणजे, तो वीस फुटी कातळटप्पा चढल्यावर छोट्या पावलाएवढ्या सपाटीवर पोहोचण्याआधीचा होल्ड अडचणीचा, त्यामुळे सहजी गवसत नाही. आधीचे ट्रेकर्स कसे जाताहेत, ते निरखल्याने पटकन जाता आले.

सिंगकाका त्या टप्प्याच्या माथ्यावर अवघड जागी थांबून, प्रत्येकाला होल्ड्सचं मार्गदर्शन करत होते. आता, डावीकडे निसटती आडवी वाट होती. बुटांनी तिरक्या कातळावर घर्षणाने होल्ड घेत, आडवं जायचं होतं. या आडव्या चालीदरम्यान खाली अंतर्वक्र खोलगट आहे. कातळपट्टी पार करून पल्याड दोन माणसे उभी राहतील, अश्या सपाटीवर पोहोचलो तेंव्हा छातीचे ठोके धडधड वाढलेले. पण, अवघड टप्पा पार पडल्याचे समाधानही होते. तिडकेने कातळावरून एकसेबढकर एक जड पाठपिशव्या खेचून घेतल्या. दोरबिले-पाठपिशव्या खेचणे या उपक्रमामुळे या टप्प्याला पार करायला पाउण-एक तास लागला.

रिस्कएलिमेंट जास्त आहे.

अंतिम टप्प्याच्या आडव्या वाटेपूर्वी, रखरखीत घसरड्या डोंगरउतारावरून ५० फूट चढाई केली. थोडकी तिरकी सपाटी मिळाल्याने छोटी विश्रांती घेऊन आरोग्यदायी खाऊ घेतला. वेळ दुपारचे १:३०.

डोकावणाऱ्या कातळाला बिलगून चढणारी अतिअरुंद वाट. आणि, उजवीकडे खोल खोल दरी.

आता होती, अंतिम टप्प्यातली आडवी वाट. काही महिन्यांपूर्वी मी ही वाट माथ्याच्या बाजूने दूरून बघितलेली. ती ज्या भेदक कड्याच्या कडेकडेने उतरते, हे पाहून आपण पाथराघाट चढाईचं धैर्य कधी करणार नाही, अशी समज करून घेतलेली. त्यामुळे त्या आडव्या वाटेची आता उत्सुकता मनात दाटलेली. कातळमाथ्याच्या पोटातून जाणाऱ्या अरुंद वाटेवरचं निसटते वळण. वणवा लागून गेल्यावर हीच वाट अजून आव्हानात्मक होणार, हे नक्की!

गवता-कातळा-घसाऱ्यावरची अरुंद आडवी वाट फक्त समोरचं एक पाऊल जोखत चालायची.
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)
     
तांत्रिकदृष्ट्या कठीण नाही, पण खत्तरनाक दृष्टीभय. एका ठिकाणी मी लॉक व्हायची शक्यता बघून, तिडकेने पटकन होल्ड्स दाखवून तिथून सोडवलं. डावीकडच्या कातळपट्टीवर दोन्ही हातांनी रेलून, तिरक्या कातळावर बुटांच्या घर्षणाच्या जोरावर पकड घेतली आणि सुटलो तिथून. अडचणीच्या त्या जागी तंत्रापेक्षा, खरा खेळ होता मनाचा! 
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

उजवीकडे नजर टाकली, की ही अशी गरगरणार खोल-खोल-खोल. अडचणीची जागा.

वळण घेऊन वाट पोहोचली पाथरा घाटाच्या माथ्यावर!!! हुर्रे!!! अंगावर सणसणीत शहारा आला. अवघड वाटेचं कवतिक, भन्नाट टीमबद्दल अभिमान-आदर वाटला. वेळ २.

परत एकदा दर्शन आजा शिखराचे.

दक्षिणेला दर्शन न्हाप्ता शिखराचे. हवा स्वच्छ असेल, तर थेट नाणेघाट-ढाकोबाचे दर्शन घडते.
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

कुमशेतला पोहोचायला घाटमाथ्यावरची तास-दीडतास चाल बाकी होती. देवराईतल्या श्रीधारेराव राऊळाच्या शांततेने भारावून गेलो.
(फोटो क्रेडिट: अमेय जोशी)

कुमशेतची वाट तुडवू लागलो, अन गुहिरी-पाथरा घाटांच्या ट्रेकमध्ये अवघड-अवघड असं होतं तरी काय, यावर चर्चा रंगली.
- एकतर वाटा तितक्याश्या वापरात नसल्याने, सह्याद्रीभूगोलाचा आणि वाटा-दिशाशोधनाचा अनुभव हवाच. वाटा शोधण्यात वेळ गेला, तर दुप्पट दमणार आणि अवघड जागांवरचा धोका वाढणार.
- दुसरं म्हणजे ट्रेकसाठी योग्य हंगाम (सीझन) आणि दिवसातली वेळ (टायमिंग) साधणे. पावसाळ्यानंतर लगेच गेलं, तर वाटा सापडणे अवघड आणि ओला कातळ लागणार. हिवाळ्यात उशिरा वणवे लागून गेले, की घसाऱ्याची तीव्रता वाढणार. वेळेच्या बाबतीत विशेषतः पाथरा घाटाची सुरुवात उशिरा केली किंवा वेळेचं नियोजन फसलं, तर नेमकं दमल्यावर उन्हांत अवघड पॅचला पोहोचणार.
- तिसरं कारण म्हणजे, कातळ आणि घसारा टप्पे तांत्रिकदृष्ट्या खरंतर अवघड नाहीत. पण, जबरदस्त दृष्टीभय, घसारा आणि आणि दमलेलो असताना अवघड टप्प्यापाशी असणे, यामुळे धोका (रिस्क एलिमेंट) वाढतो. ट्रेक्समध्ये अधूनमधून रिस्क असते, पण इथे दमल्या अवस्थेत किंवा दृष्टीभयाच्या मानसिक ताणामुळे एखादी चूक होणं, शक्य आहेच. वाटांच्या काठिण्याचा फार बाऊ करायची गरज नाही, पण योग्य ठिकाणी दोराचा गरजेनुसार वापर करण्यात कमीपणा वाटू नये.
- चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे, ट्रेकमध्ये असे पुरेसे टप्पे आहेत, जिथे टीममधल्या एखाद्यानेही कच खाल्लेली/ चूक केलेली अज्जिबात परवडणार नाही. टीमने एकत्र राहून एकमेकांच्या फिटनेसकडे-मानसिकतेकडे लक्ष ठेवणे; खाण्यापिण्याचे तंत्र सांभाळणे आणि 'एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ' करणारी खणखणीत टीम हवीच.

आमच्या गुहिरी-पाथरा ट्रेकमध्ये नेमक्या याच सगळ्या पॉझिटीव्ह गोष्टी जुळून आल्या. आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे - सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारी आणि या अवघड वाटांचा ध्यास घेतलेली मंडळी...
- पाठीत उसण भरली असूनही अवघड ट्रेकच्या सर्व आघाड्यांवर लीलया नेतृत्व करणारे ढमढेरेकाका. खरंच, एक माणूस इतक्या विषयात आणि कलांमध्ये सर्वोत्तम कसा असू शकतो आणि तरीही पाय कायम जमिनीवर - नव्हे डोंगरावर...
- सह्याद्रीचा अफाट व्यासंग आणि प्रेम असलेले, खळाळणाऱ्या हास्याने वातावरण प्रसन्न करून टाकणारे, सगळ्या ट्रेकर्सशी विशेष नातं जुळवणारे - उत्तमराव.
- सुरक्षित ट्रेकसाठी सगळ्यांना सदिच्छा देणारे, रिफ्रेश करणारी स्ट्रेचिंग योगासने करून घेणारे आणि कातळावर अशक्य लीलया बागडणारे- सिंगकाका.
- भन्नाट एन्ड्युरन्स असलेले, अत्यंत फोकस्ड आणि सगळ्यात पुढे वाट ओपन करणारे अष्टपुत्रेकाका
- घाटवाटा एक्स्पर्ट, अफाट ओरीजनल ब्लॉगर आणि दोस्तांसाठी जीव टाकणारा, हल्ली कधीकधी सामाजिक-कौटुंबिक बांधिलकीत अडकणारा, ट्रेकचं २.३५ ली क्षमतेचं डिझल इंजिन दत्तू बंकापुरे.
- सह्याद्री भूगोल, नकाशे आणि ट्रेकगॅझेट्सचा अभ्यासक, स्वत:चं अभ्यासू मत असणारा, जबरदस्त फोटूग्राफर - निनाद्राव बारटक्के.
- शांतपणे घाटांचा ट्रेक एन्जॉय करणारा, अभ्यासू, भरवश्याचा आणि सुरेख फोटुग्राफी करणारा अमेय जोशी.
- भन्नाट फिटनेस असलेला, पुढच्या फळीतला ट्रेकरमावळा आणि पक्का टीमप्लेअर - विजय राजगुडे.
- आधी 'वकार' होवूनही ट्रेकचा आनंद लुटणारा, एकसेबढकर कोटीबाज - चिराग मुळे.
- फक्त घाटवाटांच्या ओढीमुळे ठाण्यावरून वाहतुकीचा त्रास सहन करून आलेली, घाटट्रेक्स-आकाश-निसर्गफोटूग्राफीत मनोमन रमणारी - शिल्पा बडवे.
- या कॅलेंडर वर्षात दोनदा गुहिरी-पाथरा ट्रेक करणारा, भलीमोट्ठी पोर्टर सॅक घेऊन ट्रेक करणारा अफाट ताकदीचा ट्रेकर - नितीन तिडके.

... ट्रेकवरून घरी निघालो. गुहिरीच्या दाराच्या आठवणीने गुडघे अजूनही ठणकताहेत. पाथराच्या कातळकड्यावरच्या दृष्टीभयाने अजूनही ऊर धपापतंय. थर्राटानुभूती - अजून काय!


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेकर मंडळी: अजय ढमढेरे, उत्तम अभ्यंकर, महेंद्र सिंग, अष्टपुत्रेकाका, जितेंद्र बंकापुरे, निनाद बारटक्के, नितीन तिडके, अमेय जोशी, विजय राजगुडे, चिराग मुळे, शिल्पा बडवे, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे, अमेय जोशी
३. WARNING:: हा ट्रेक अतिशय खडतर असून, घसारा आणि दृष्टीभय असलेल्या जागी कातळारोहण असल्याने - कठीण श्रेणीचा आहे. पुरेश्या अनुभवाशिवाय, साधनांशिवाय आणि दणकट टीमशिवाय अजिबात प्रयत्न करु नये.
४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.


22 comments:

  1. नेहमीप्रमाणेच एक नंबर लिखाण... खूप मज्जा आली...
    तुझे/अमेयचे फोटोज सुद्धा झकास...
    आठवड्याभराने ट्रेकच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या...
    ब...ढि...या...

    ReplyDelete
  2. खूप छान आणी सविस्तर माहिती

    ReplyDelete
  3. जबराट लिखाण !!! जबराट फोटो !!!

    ReplyDelete
  4. वेड लावलंय आता… जबरदस्त लिखाण, फोटोग्राफी, डिटेलिंग. मजा आली. पाय शिवशिवायला लागलेत.हिमालय ट्रेकसाठी बॅग भरलेलीच आहे. तीच उचलून थेट कुमशेत गाठावे असं वाटतंय!😊👍💐

    ReplyDelete
  5. एकदम भारी नेहमीप्रमाणे!! नकाशा खूपच छान जमतो नेहमीच, शिकायला पाहिजे तुमच्याकडून जमलं तर एखादा ब्लॉग त्यावर पण लिहा!!

    ReplyDelete
  6. मित्रा, ब्लाॅगमधून संपूर्ण ट्रेकच पूर्ण झाला... अप्रतिम मांडणी, विषयाबाबत सखोल माहिती, मार्गदर्शन... आणि एकंदर ब्लाॅग लाजवाब...

    ReplyDelete
  7. खूप सुंदर लिखाण. कोणतीही अतिशयोक्ती न करता त्या वाटेचा थरार आपण उभा केलात. असेच लिहीत जा. आपल्या या पुढील मोहिमांकरिता खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. खूप सुंदर लिखाण. कोणतीही अतिशयोक्ती न करता त्या वाटेचा थरार आपण उभा केलात. असेच लिहीत जा. आपल्या या पुढील मोहिमांकरिता खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  9. superb.....thanks for documenting and sharing it!!!

    ReplyDelete
  10. कसलं जबरी लिखाण! मजा आली.

    ReplyDelete
  11. अप्रतिम वर्णन , उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद

    ReplyDelete
  12. साईप्रकाश , लिखाण तर थरारक ! माझ्या फेब्रुवारी-मार्च ,१९९१ च्या कळसुबाई -रतनगड आजोबा ट्रेकची आठवण जागी झाली.मी व माझा मित्र मुकुंद कुलकर्णी अशा दोघांनी हा ट्रेक बारी >कळसुबाई > पांजरी > रतनगड > कात्राबाई खिंड > आजोबाच्या वरच्या कड्यावर > पाथराबाई खिंडीतून > कुंडाची वाडी > तळेगाव व पुढे एस.टी . ने शहापूर असा ट्रेक केला होता .

    ReplyDelete
  13. Simply superb. Could not make it for Sahyankan2017. I will wait for next version/ program.

    ReplyDelete
  14. थरार: शब्दात छान मांडलाय.

    ReplyDelete
  15. जितेंद्र बंकापुरे,
    Jayraj Joshi,
    Ajay Kakade,
    Deva Ghanekar,
    Ajit Satam,
    Yash Gaikwad,
    Prasad Kashikar,
    Harinath Machanabhatla,
    Phdixit,
    Bhausaheb Kanmahale,
    खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.
    जबरदस्त ट्रेक मंडळी सोबत असल्याने ट्रेक भन्नाट झाला, तो मी शब्द-फोटोजमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.
    पुनश्च धन्यवाद!

    Sambhaji,
    मुद्दाम नकाशावर थोडी जास्त मेहनत घेतलीये. निनादरावकडून तपासून घेतलाय. GPS trackपेक्षा नकाशा वाचून प्रदेश समजावून घेऊन ट्रेकर दोस्तांनी ट्रेक करावा, अशी इच्छा आहे.

    Anand Shinde सर,
    मन:पूर्वक धन्यवाद! तुम्हांला हे साधं लिखाण अनुभव आवडले आणि तुम्ही आवर्जून ते ब्लॉगवर आणि फोनवर कळवलं, यामुळे प्रोत्साहन मिळालं. धन्यवाद!

    Devendra Joshi
    ट्रेकरदोस्तांसाठी थोडी आणि नेमकी माहिती लिहिण्याचा प्रयत्न केलाय. मदत व्हावी, पण ट्रेकर्सना स्वत:ला ट्रेकशोध घेताना नाविन्य रहावं, असा समतोल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हांला ते भावलं, याचा आनंद वाटला. धन्यवाद!

    Dilip Zunjarrao सर,
    खूप धन्यवाद! आम्हांला डिसेंबर २०१७ मध्येही ज्या जागा अनवट वाटतात, त्या तुम्ही १९९१मध्ये अनुभवल्यात! जबरदस्त अनुभव असेल, यात शंका नाही!!!

    ReplyDelete
  16. Saiprakash and team- Kudos!! I can really understand the feeling of proudness...
    @ Saiprakash-
    1) Wonderful description. Very well formatted and articulated.
    2) The article is specific, crisp and clear reflection of experience.
    3) For an seasoned trekker (the one who has essence of dusty days & chilly nights, deep jungles & gorges, tough & long ridges and spurs; last but not the least flavor of been in the arms of Sahyadri) this article and map will be extremely useful.

    ReplyDelete
  17. Zakkaas ! Jabara ahet ya donhi ghaatwata ...

    ReplyDelete
  18. साई,
    लिखाणाची शैली...मांडणी...छायाचित्रे यांनी सह्याद्रीतली ही खासमखास अशी भटकंती खर्‍या अर्थाने जिवंत केली...वाचून खर्‍या सह्याभटक्याला कधी हा ट्रेक करतो अनं कधी नाही, असे न वाटल्यास नवल!
    सह्याद्रीतल्या अशा अनगड वाटांवरची तुझी मुशाफिरी आणि तितकीच ताकदपूर्ण लेखणी अमुल्य आहे...ती अशीच सुरू राहो...

    ReplyDelete
  19. खूपच सुरेख माहिती मित्रांनो.

    ReplyDelete