हिरडस मावळातली मोहनगड - नीरबावी - वाघजाई घाट - शिवथरघळ - न्हावणदीण घाट - कावळ्या दुर्ग डोंगरयात्रा

‘ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये’, असे म्हणतात. हिरडस मावळातल्या आमच्या ट्रेक्समध्ये आम्ही नेमकं हेच करायला गेलो. सह्याद्रीऋषीचं मूळ (रानवनातले डोंगरदुर्ग, राऊळे आणि घाटवाटा) आणि नदीचे मूळ शोधताना भटकंतीच्या निखळ आनंदाची अनुभूती घेतली.
पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात पश्चिमेला आहे नीरा नदीचं खोरं (मावळ). डोंगरदऱ्यांमध्ये विपुल प्रमाणात हिरड्याची झाडं असल्याने, या मावळाला म्हणतात ‘हिरडस मावळ’. हिरडस मावळातल्या आमच्या ट्रेक्समध्ये - शिवकाळातला ‘मोहनगड’, नीरा नदीच्या उगमापाशी असलेली बांधीव विहीर – ‘नीरबावी’, दुर्गा-जननी-वाघजाईची जुनी-जागृत राऊळे आणि त्यांच्या देवराई, सह्याद्रीऋषीच्या जटांमधून उतरणाऱ्या ‘वाघजाई घाटा’ची पुरातन वाट, समर्थांच्या शिवथरघळीपासून चढणारी-मोडलेली ‘न्हावणदीण घाटा’ची वाट आणि वरंध घाटातून ‘कावळ्यादुर्गा’चं संपूर्ण दर्शन घेताना – राकट लोभस सौंदर्याने भारावून गेलेलो. आमच्या डोंगरयात्रेचे हे रेखाटन.
... एके दिवशी भल्या पहाटे कूच केलेलं. पुणे-सातारा महामार्गावर केतकावळ्याला मसाला-चाय थर्मासमध्ये भरून घेतला. भोर येण्याआधी घाट उतरताना डावीकडे नीरेच्या सुरेख वळणाने (नेकलेस पॉइंट) खुणावलं. भोर गाव मात्र अजूनही साखरझोपेत गुरफटलेलं. आता भोर – महाड रस्त्याची खडखड सुरु झाली. गाडीचा वेग मंदावलेला. डावीकडे दुर्ग रोहिडा खुणावू लागलेला. पुढे प्रवास होता नीरा देवघर धरणाच्या जलाशयाच्या सोबतीने. वाटेत छोटंसं साधं गाव - हिरडस मावळातलं हिरडोशी. गावाच्या पश्चिमेला नीरा देवघर जलाशयाच्या पल्याड समोर एक उंच डोंगर खुणावत होता. याचं नाव दुर्गाडी/ जननीचा डोंगर/ मोहनगड.
हवेत हवीहवीशी थंडी. नीरा देवघर जलाशयाचं पाणी डोंगरसोंडांमधून वळसे घेत दूरपर्यंत शांतनिवांत पसरलेले. एखादं पेंटिंग असावं असं निसर्गचित्र. एखाद्या खट्याळ खंड्याने सूर मारत माश्याचा वेध घेतला, अन ‘हिरडस मावळा’ला हलकेच जाग येऊ लागलेली.

वळणां-वळणांच्या अरुंद रस्त्याने गाडी पुढे निघाली. रस्त्यावर फारशी रहदारी नाहीच. तांबडफुटी झाली. चमचमणाऱ्या जलाशयात उतरलेल्या झाडीभरल्या डोंगरसोंडा उजळू लागल्या.

वाफाळलेल्या चहाचे घोट घेत ट्रेक्सचं कधी न संपणारे गप्पाष्टक रंगलं. बहरलेल्या काटेसावराच्या मोहक फुलांवर उड्या मारत ताव मारणारा सुतार पक्षी उडाला. पाठीमागे दुर्गाडी-मोहनगड आणि माथ्यावरचं राऊळ आता कोवळ्या उन्हांत उजळू लागलेलं.

शिरगावच्या किंचित अलिकडे दुर्गाडी फाट्यावर महाड रस्ता सोडून डावीकडे वळलो. दीड किमी अंतरावर रस्त्यालगत दुर्गा देवीचे मंदिर. नीरा देवघर जलाशयाच्या पाण्यालगतची शांत प्रसन्न जागा. मंदिराच्या आवारात काही वीरगळ आणि समाधीशिळा.
हिरडस मावळाच्या घाटांचा रक्षक – मोहनगड
मंदिराबाहेर पारावरच्या मामांना वाट विचारायला गेलो. उत्तरही अपेक्षित. “मोहनगड? नाही बा. असलं काही न्हाई इथ्ये. ह्यो डोंगुर दुर्गाडीचा. त्याला जन्नीचा डोंगुरबी म्हणत्यात. ह्ये असं जा रानातून”. गडावर चढण्यासाठी वाटा दोन. आम्ही दोन्ही वाटा निरखायच्या ठरवलेल्या. पहिली वाट दुर्गा मंदिरासमोरूनच सुरु होवून नैऋत्येकडून चढणारी. दुसरी वाट दुर्गामंदिरापासून अजून ४ किमी पुढे जात ‘दुर्गाडी’ गावातून. दुर्गाडी गावातून कच्च्या रस्त्याने १ किमी गेल्यावर सामोरी आली जननीचं देवराई आणि राऊळ. उंचच उंच वृक्षांमधून कोवळी किरणं उतरू लागलेली.

पाखरांची लगबग-किलबिलाट आणि हवेत मंद गारवा. मंदिरात ‘जनी अंधारी बाजी’ अशी पाटी. मूळच्या देवळीवर सभामंडप बांधून काढलेला. मंदिरासमोर काही मूर्ती आणि ५-६ वीरगळ मांडून ठेवलेले.
जननीच्या देवळापासून पश्चिमेला पाऊलवाटेने निघालो. समोरून आला रानातून लाकडाची मोळी आणणारा आजा. झपाट्याने तुटणाऱ्या रानाबद्दल आपल्याला कितीही हळहळ वाटली, तरी नाण्याला दुसरी बाजू आहेच. वर्षात एकदा होणारी थोडकी भात-नाचणीची शेती आणि ४ फुटकळ गुरं-शेरडं सोडली तर गिरीजनांना उत्पन्नाची साधनेच नाहीत. एकीकडे शहरात आपल्याला दिसत असतो पैश्याचा-साधनांचा बेताल अपव्यय, तर दुसरीकडे सह्याद्रीच्या रानातला हा जगण्याचा संघर्ष सुन्न करतो...

... आडवं जात खिंडीपाशी थबकलो. कोरीव दगड – वीरगळचं तो. वीरगळावर शिवलिंगपूजा करणारे साधक आणि वीराला स्वर्गात घेऊन निघालेले देवदूत/ अप्सरा. इथे या रानात कोण्या वीराचे स्मारक असेल बरं? कोणत्या झुंझात हा वीर कामी आला असेल? आज आपल्याला भेटतो, इतिहासाचा केवळ एक मूक साक्षीदार!

आता होती उघड्या-बोडक्या उभ्या दांडावरून चढणारी वाट. सोनेरी वाळलेल्या गवतातून, तुऱ्यामधून चढणारी. वाऱ्याच्या झोतामुळे सुखद चढाई.

धारेवरून पल्याड मोहनगडाचा कातळमाथा आणि पदरातल्या गर्द देवराईची झाडी खुणावू लागलेली.

झाडीच्या टप्प्यांमधून पुढे गेल्यावर, माथ्याला डावीकडे ठेवत जाणारी आडवी गारेगार धम्माल वाट होती. कातळमाथ्यापासून सुटावलेल्या अजस्त्र शिळा पदरात विसावलेल्या. माथ्याला अर्धवळसा घालत आडव्या वाटेने गडाच्या ईशान्य धारेवर पोहोचलो. शिरगाव दुर्गादेवीच्या देवळापासून येणाऱ्या वाटेला मिळालो. शेजारीच होतं बहिरीचे ठाणं म्हणजे छोटीशी देवळी आणि अनघड देवता.

इथून गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी १०० मी उभी चढाई होती. पल्याड सह्याद्री पश्चिमधारेचं दृश्य उलगडू लागलं.

वायव्येला पसरलेला गूढरम्य सह्याद्रीमाथा, तळ्ये गावाजवळचं जननीचं शिखर आणि त्याच्या अलिकडे नजर स्थिरावली वाघजाई घाटावर. झपाटून टाकणारं दृश्य. मोहनगडावरून दिसणाऱ्या दृश्यामुळे पुढच्या ट्रेकची - वाघजाई घाटाची ओढ आता लागलेली. नैऋत्येला कोकणात मंगळगड उर्फ कांगोरी दुर्ग उठवलेला. याच सह्यधारेतून घसरगुंडी करत उतरतात चोरकणा, कुंभेनळी आणि चिकणा अश्या जुन्या घाट-पाऊलवाटा.

मोहनगडाची यापुढची वाट बहुतांशी कातळातून, त्यामुळे ठिकठिकाणी कातळात साध्या पायऱ्या खोदलेल्या. कुठेकुठे पायऱ्या खणताना लावलेल्या सुरुंगासाठी खणलेले खळगे. इतक्या सगळ्या पायऱ्या आणि सुरुंगाच्या खुणा बघता या पायऱ्या नक्की कधीच्या - मूळच्या किल्ल्याच्या, की अलिकडच्या काळात गडावर देवीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी खणलेल्या हे सांगणं अवघडचं.

माथ्याच्या २० मी अलिकडे होती डावीकडे उतरत जाणारी वाट. कातळात खोदत नेलेलं दोन साधे खांब असलेलं पाण्याचं टाके. नक्कीच जुनं. फार उपसा नसल्याने प्यावसं वाटावं, असं नितळ नाही. अगदीच पाणी जवळ नसेलच, तर पाणी गाळून घेता येईल.

शेजारी एक कोरडं टाकं अर्धवट खांबांची खोदाई करून सोडलेलं. पल्याड ओहोळापाशी तिसऱ्या टाक्याची खोदाई सुरुवातीलाच सोडलीये.

टाक्यांपासून मागे येत माथ्याकडच्या जननीच्या मंदिरापाशी पोहोचलो. पाण्याचा प्रश्न सोडवला असेल, तर या मंदिरात ३ ते ४ जणांना मुक्काम करता येईल इतकीशी जागा आहे. सिंहावर बसलेल्या अष्टभुजा जननीदेवीची नवीन मूर्ती आणि शेजारच्या जुन्या देवतामूर्तीला वंदन केलं.

देवळाच्या सावलीत बसून, चिक्की-मोसंबीचा अल्पोपहार घेत गडासंबंधीची ऐतिहासिक नोंद वाचायला घेतली. छत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५९ मध्ये बाजीप्रभू देशपांड्यांना पाठविलेले एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. त्यानुसार ‘हिरडस मावळातल्या कासलोडगडाला ‘मोहनगड’ असं नाव ठेऊन तो वस्तीयोग्य करायला सांगितला’. पत्रातील मजकूर साधारणत: असा:
“कासलोडगडचे नाव मोहनगड असे ठेऊन किल्ला वसवावा असे ठरवून पिलाजी भोसले यांस त्या किल्ल्याचा हवाला देऊन पाठविले आहे आणि त्यांच्याबरोबर किल्ल्याच्या शिबंदीकरिता २५ लोक पाठविले आहेत. तरी तुम्ही त्यांना पंचवीस लोकांबरोबर मोहनगड किल्ल्यावर ठेवणे आणि किल्ल्याच्या हवालदारास घर व लोकांना अळंगा करून द्याल व पावसापासून त्रास होणार नाही अशा करून देणे. नाहीतर सजवंज करून द्याल. किल्ल्यावर लोक राहतील त्यांना त्रास होणार नाही असे हवालदारास घर व लोकांना अळंगा व एक बखळ सज्ज करून देणे. तुम्ही याप्रमाणे काम विल्हेवार लावून द्याल असा आम्हाला भरवसा आहे. म्हणून तुम्हाला लिहिले आहे. तरी या लिहिण्यानुसार किल्ला मजबूत करून देणे. मग तुम्ही किल्ल्याखाली उतरणे.”
मोहनगड जावळीच्या खोऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने, प्रतापगडाच्या युद्धाच्या आधी मोहनगडावरही थोडी पूर्वतयारी केली गेली असू शकेल. ऐतिहासिक नोंद असली, तरी हिरडस मावळात मोहनगड नक्की कुठे, याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. वरील पत्र आणि प्रत्यक्ष नोंदींच्या आधारे २००८ साली डॉ सचिन जोशींनी दुर्गाडी/जननीचा डोंगर हाच मोहनगड उर्फ़ कासलोडगड म्हणून प्रकाशात आणला. गडावर बाकी कोणतेही अवशेष, तटबंदी, तोफा, द्वार उपलब्ध नाहीत. भिडे नामक स्थानिक भक्ताने इथल्या जुन्या जोत्यावर नवीन जननीचं मंदिर बांधून काढलंय. ते जुनं जोतं मंदिराचंच होतं, की किल्लेदाराच्या घरट्याचे हे सांगणे अवघड.
गडाचं भूराजकीय महत्त्व समजावून घेण्यासाठी मंदिरामागे झाडीभरल्या टेपाडावर पोहोचलो. दुर्गाडी पायथ्यापासून ३०० मी आणि समुद्रसपाटीपासून ११०० मी उंचावर आलेलो. गडावरून अग्गदी जवळ बघितल्यास ६-७ घाटवाटा सहजी दिसल्या - वाघजाई, चिकणा, कुंभेनळी, चोरकणा, कामथे, न्हावणदीण आणि वरंध. या घाटांवर नजर-नियंत्रण ठेवणारं, टेहेळणीचं ठिकाण म्हणून मोहनगडाचे महत्त्व.

चौफेर दूरवरपर्यंत अफाट सह्याद्रीदृश्य. दक्षिणेला अजस्त्र अशी नाखिंदा-रायरेश्वर, कोळेश्वर, महाबळेश्वर पठारे आणि मकरंदगड.

नैऋत्येला प्रतापगड-महिपतगड, वायव्येला रायगड-पोटला डोंगर आणि उत्तरेला सह्यकण्यामधील घाटवाटा (फडताड, शेवत्या, भिकनाळ, मढेघाट, उपांड्या, आंबेनळी, गोप्याघाट) आणि तोरणा-राजगड सहजीच नजरेसमोर होते. ३६० अंशातल्या सह्याद्रीदर्शनाने आणि भर्राट वाऱ्याने ट्रेकर्स फ्रेश झालेले.
गडाचा निरोप घ्यायची वेळ झालेली. उतरताना तळेगावच्या दुर्गप्रेमींची (रोहित बापट, प्रसाद काशीकर, सौ व श्री रूपक साने) भेट झाली. सोशल मिडियामुळे ट्रेकर्सची नावं ऐकली असतात, पण ट्रेकला भेटी झाल्या की ओळखी होतात, गप्पा रंगतात.

उतराईसाठी शिरगावच्या वाटेवरून मोहनगडचा शेवटचा टप्पा अजस्त्र दिसत होता.

ट्रेकर्सच्या पुढच्या फळीतल्या अभिला पदरातल्या झाडीत लक्षावधी फुलं दिसली. अंजनीची झाडं नाजूक फुलांनी बहरलेली. अवघं रान निळं-जांभळं झालेलं.

मोहनगडाचे शिरगाव बाजूचे हे झाडीचे टप्पे झपाट्याने कापून काढले जाताहेत.

हिरडस मावळातून शहराकडे ट्रक्सभरून ओंडके तोडले जाताहेत. दोन-पाच वर्षात हिरडस मावळ उजाड होवू नये, अशी आई जननीच्या पायाशी प्रार्थना केली.

नीरा नदीचं मूळ – नीरबावी
हिरडस मावळात अल्लड बागडणाऱ्या नीरा नदीचं मूळ बघायला निघालो. दुर्गाडीवरून महाड रस्त्यावर येऊन डावीकडे वळल्यावर एक किमी अंतरावर शिरगावला पोहोचलो. गावातून पश्चिमेला पायवाटेने १५ मिनिटं चालत गेलो.

वरंध घाटाचा रस्ता उजवीकडे उंचावरून, पण जवळूनच वळणे घेत जात होता. झुडुपांमधून-ओहोळांमधून आडवी जाणारी वाट किंचित चढून पलिकडे लवणात उतरली. झाडीमधून डोकावत होती एक रम्य जागा – दगडी चिऱ्यानी बांधून काढलेली बावी (विहीर/ कुंड).

बाहेरील चौकोनी कुंडाच्या मांडणीच्या आत जरा छोट्या आकाराची अजून एक चौकोनी बांधणी, त्याच्या अजून आत छोट्या आकाराची चौकोनी बांधणी अश्या किमान चार पातळीत नीरबावी कोण्या अज्ञात दानशूराने कधीकाळी बांधून काढलीये.

आत शंखनितळ पाणी, तीन बाजूंना कोनाडे, समोरच्या कोनाड्यात नीरानदीची देवता मूर्ती.

नीरबावीपासून समोर वरंधा घाटातील ‘द्वारमंडप’ (धारमंडप) टोकापाशी जाण्याची वाट आता मोडली असली, तरी पूर्वी वरंध घाटातले पांथस्थ-व्यापारी-गुरं घाटाच्या चढाईनंतर इथे नीरबावीपाशी कसे विसावत असतील, याचा जणू प्रत्ययकारी दृश्य डोळ्यासमोर होतं.

उन्हं कललेली. पाण्याच्या आसऱ्याने आजही गिरीजन गायीगुरे नीरबावीपाशी ओढले जात होते. माथ्यावर लाकूडफाटा-रानातल्या भाज्या लादून गिरीजन निघालेले. नीरबावीसमोरच्या शिवपिंडीला नमन करत होते.

आसपासच्या गर्द झाडीतून गळ्यातल्या घंटा किणकिण वाजवत गायी घरी निघालेल्या. वरंधघाटात नीरानदीचं मूळ असलेल्या नीरबावीच्या शांत परिसरात हे सारं अनुभवत कितीतरी वेळ रमून गेलो...
हरवलेली जुनी वहिवाट – वाघजाई घाट
... मोहनगडावरून सह्यकण्याचे दूरदर्शन झालं होतं, तेंव्हाच त्यातून उतरणाऱ्या वाघजाईच्या पुरातन घाटवाटेची ओढ लागलेली. वरंध घाटाच्या किंचित दक्षिणेला असलेली ही वाट चढायला आम्ही उंबर्डे गावात दाखल झालो. उत्तरेला झाडीभरल्या उतारांपल्याड कावळ्यागडाच्या कुशीतून जाणारी वरंध घाटरस्त्याची रेखीव वळणे दिसत होती.

आम्हांला मात्र शोधायची होती उंबर्डेगावाच्या नैऋत्येला वाघजाई घाटाची वाट. गावामागे धारेवर चढून गेल्यावर, पल्याड वाघजाई घाटाच्या खिंडीचं पहिल्यांदा दर्शन झालं.

घाटवाट फारशी वापरात नसल्याने चकवा लागणार होताच. उंबर्डेच्या एका मामांनी वेळीच हाकारे घातले आणि वाट समजावून सांगितली.

वाघजाई घाटापाशी पोहोचण्याआधी गच्च झाडोऱ्यातून, डोंगर-सोंडांमधून, ओढ्या-झऱ्यामधून भिरीभिरी भटकंती करत चांगलं तासभर धम्माल वाटचाल होती.

मित्रवर्य निनाद बारटक्केकडून वाट समजावून घेतलेली. अन्यथा वाघजाई घाटाची खिंड कुठे असेल याचा अंदाज बांधणं खरंच अवघड. हिरडस मावळाच्या गर्द रानाच्या टप्प्यातून रमत गमत चाल होती.

ओढ्याच्या पात्रात रेंगाळलेल्या पाण्यापाशी फुलपाखरांची आणि मधमाश्यांची लगबग चाललेली.

दाट झुडुपांमधून जाणारी आडवी वाट संपूच नये, असं वाटत होतं.

झाडीभरल्या डोंगरसोंडांवरून जात सह्यधारेजवळ पोहोचलो. किंचित उठवलेल्या टेपाडाच्या अलिकडे वाघजाई घाटाची खिंड असणार होती.

घाटाच्या सुरुवातीआधी ऐन सह्यधारेवर गवसलं कातळात खोदलेले पाण्याचे छोटेसे टाके. तीन फुट लांबी-रुंदीचे ओबढधोबड मुख आणि चार फूट खोदाई. पाण्याचा उपसा नसल्याने फारसं पिण्यायोग्य नाही. वरंध घाटाशेजारचा वाघजाई घाट कदाचित दुय्यम महत्त्वाचा घाट असेलही, तरीही पाण्याचे टाके आणि सह्यधारेमागे पूर्वेला संरक्षक मोहनगड बघता वाघजाई ही जुनी वहिवाट नक्कीचं असणार याची खात्री पटली.

टाक्यापासून पूर्वेला होता मोहनगड - घाटावर लक्ष ठेवायला अगदी मोक्याच्या जागेवर.

दक्षिणेला कोकणातल्या झाडीभरल्या दरीत तळ्ये-किये-गोठिवली अशी गावं. पाठीमागे कांगोरी-मंगळगड खुणावत होता.

टाक्यापासून निघून भर्राट वारं खात गवताळ टेपावरून वाघजाईच्या घाटवाटेच्या खिंडीत पोहोचलो. उंबर्डेपासून घाटाच्या सुरुवातीला पोहोचायला दीड तास लागलेला.

खिंडीतून दक्षिणेला सटकणारी घाटाची पुसटशी पावठी गवसली. ५० मी उतराई झाल्यावर उंबराच्या झाडाखाली भगवाध्वज फडकताना दिसला. हे वाघजाईचं ठाणं.

चांदीचे रेखीव मुखवटे आणि सिंहारूढ देवीचे टाक आता झिजलेले. दगडावर मांडून ठेवलेले. पांथस्थांना आधार देणारं हे जुनं श्रद्धास्थान.

पण शेजारच्या वरंध गाडीरस्त्यामुळे आता वाघजाई घाटाची व्यावहारिक गरज संपलीये. त्यामुळे, फारतर वाघजाईच्या ठाण्यापर्यंत नवरात्रीला ग्रामस्थांपैकी कोणीतरी फिरकतो, बाकी पुढची वाट अग्गदीच मोडून गेलीये. त्यामुळे, वाघजाईच्या ठाण्यानंतरची उतराई फारच त्रासदायक ठरली. अशक्य गचपण माजलेलं. जनावरांच्या पुसट वाटा गुंगवत होत्या. खाजरी झाडं, त्यावरून हवेत उधळलेले कसलेतरी कण, पाठपिशवीला खेचणाऱ्या काटेरी फांद्या, निसटते उतार यावरून जाताना जीव अग्गदी मेटाकुटीला आला.

नजरेच्या टप्प्यातला ४०-५० फूट उतराईचा कयास बांधायचा, एकदा पियुषने केलेला प्रयत्न फसला की मग परत नवीन प्रयत्न करायचा अमेयने. नुसती नुसती दमछाक. अर्थात, वाट नाहीच मिळाली, तर आल्या वाटेने परत उंबर्डेला जायचा शेवटचा पर्याय मी राखून ठेवलेला. अर्थात, नवी वाट शोधताना टीमकडे पळवाटेची वाच्यता अजिबात करायची नसते. शेवटी वाघजाईलाच दया आली असावी. घुसत-फसत-काट्यांनी ओरबाडून घेत, वाघजाईच्या ठाण्यापासून १०० मी उतराई करून, पदरातल्या झाडीतून वाट अखेर मोकळवनात पोहोचली. खिंडीपासूनच्या खडतर उतराईने, वाट शोधायच्या प्रयत्नांनी आणि उन्हाच्या तावाने ट्रेकर्स दमून गेलेले.

मोकळवनातून डावीकडे पूर्वेला वळलेली पुसट पाऊलवाट गवसली. गच्च रानातल्या २०० मी उतराईनंतर वळसा घालत वाट सपाटीवर पोहोचली.

दोन टप्प्यांमधली वाघजाईची उतराई कशी त्याचं दृश्य सामोरं होतं. सह्यधारेपासून वाघजाईच्या ठाण्याजवळून पदरातल्या मोकळवनापर्यंत १५० मी आणि नंतर पुढे आलेल्या दांडाला वळसा घालत उतराई करणारा दुसरा टप्पा. वाघजाईघाटाची जुनी वहिवाट आता मोडलेली, पण जुन्या खुणा आणि वाटशोधनाचा भन्नाट अनुभव सांगाती जमा झालेला.

गर्द दाट आंब्याखाली विश्रांतीला थबकलो. घरून आणलेला रुचकर डबा आणि त्यावर ताक झाल्यावर डोळे जडावलेले. आंब्याच्या पाचोळ्यात वारं खात निवांत पडी हवीच होती. वाऱ्यावर भिरभिरत गरगरत खाली पडणाऱ्या चुकार पानांचा हलका आवाज सोडला, तर आसमंतात नीरव शांतता. ट्रेकर्स परत ताजेतवाने झालेले.

घाट उतरला, तरी ट्रेकच्या पुढच्या टप्प्यासाठी बरीच चाल बाकी होती. पायथ्याचे तळ्ये गाव गाठलं. वाघजाई घाटाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या वरंध घाटाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी पायगाडीला पर्याय नव्हता. कोकणातून खालून सह्यकडा न्याहाळत बैलवाटेने आडवे निघालो.

तळ्ये गावच्या शेताडीमागे सह्यधारेवरचे जननी शिखर विशेष लक्षवेधी होते.

आता पुढे उत्तरेला वरंध घाटाची खिंड आणि दुर्ग कावळ्या खुणावू लागला.

शेताडीतून, पदरातल्या जंगलातून, माझेरी धबधब्याच्या पोटातून जात सह्यधारेच्या कुशीतून धम्माल मळलेली वाट होती.

वाघजाई घाटाच्या पायथ्यापासून तीन तासांची चाल केली, तेंव्हा कुठे वरंधघाटातील माझेरीला गाडीरस्ता गाठला.

शिवथरघळीपासून कावळ्या दुर्ग चढणारी, आता मोडलेली न्हावणदीण घाटवाट
माझेरीपासून महाडरस्ता सोडून, बारीक गाडीरस्ता समर्थांच्या शिवथरघळीला उतरतो.

‘गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालेली बळे. धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे. विश्रांती वाटते तेथे, जावया पुण्य पाहिजे. कथा निरुपणे चर्चा, सार्थके काळ जातसे’ या समर्थांच्या शब्दांची प्रचीती येणारं विलक्षण स्थान. इथे यायला आस्तिक असलंच पाहिजे, असं काही नाही. घळीत निसर्गदेवतेचं दर्शन घेऊन थोडा वेळ घळीत शांत डोळे मिटून बसलो. कैक दिवस टिकेल अशी ऊर्जा मिळाली.

शिवथरघळीपासून पारमाची गावापाशी येताना कावळ्या दुर्ग आणि डावीकडे त्याच्या न्हावीण सुळक्याचं दर्शन झालं.

पारमाची गावापासून कावळ्या दुर्गाचा माथा २०० मी उंचावलेला. सुळका वाटावा अशी गडाची धार पुढे आलेली. त्याच्या उजवीकडच्या बेचक्यातून थेट चढणारी न्हावणदीण घाटवाट आम्हाला शोधायची होती.

पारमाची गावात एका मामांकडे वाटेची चौकशी केली. मामा - ”न्हावणदीण? त्ये कश्याला? कावळ्यागडावर वरंधा घाटातून जा की सरळ. अवो, ही वाट कवाच मोडली. १५-१६ वर्षांपूर्वी इथ्ये कोसळली एक लई वंगाळ दरड. गावातले १७ लोकं गेले त्यात. वाटही मोडलीच. मध्यंतरी अशी तुमच्यासारखी लोकं आलेली. त्यातली एक बाई पडली की खडकावरून...”

अर्थात, आम्हांला खुमखुमी म्हणून न्हावणदीण नाळेपर्यंत गेलोच. साकेत भरपूर घुसखोरी करून आला. नाळेतून १०० मी घुसत गेल्यावर गडावर पोहोचणं अगदीच अशक्य नव्हतं.

विचारांती पूर्ण बंद पडलेल्या त्या आडवाटेचा नाद सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. वरंधा घाटात पोहोचण्यासाठी ग्रामस्थांच्या सोईसाठीचा कदाचित ही जवळची पाऊलवाट. दरड अपघातामुळे आणि रस्ते-गाड्या आल्यामुळे निरुपयोगी-निकामी झालेली...
वरंध घाटाचा रक्षक – दुर्ग कावळ्या
कोकणातून महाडवरून भोर गाठण्यासाठी असलेल्या घाट-पाऊलवाटांपैकी वरंध घाटाचा गाडीरस्ता अंग्रेजों-के-जमाने-मै बनवला गेला. भोरकडून हिरडस मावळातून वरंधाघाटाकडे चढत येणारा रस्ता सह्यधारेवर जिथे पोहोचलो, ते ठिकाण ‘धारमंडप’. धारमंडपापासून समोर खुणावत होता अस्ताव्यस्त पसरलेला एक डोंगर. सह्यकण्यावर तीन बाजूंनी कातळकड्यांचे संरक्षण लाभलेला हा डोंगर होता - दुर्ग कावळ्या.

गड म्हणून दुय्यम, पण वरंधा घाटाच्या रक्षणासाठी महत्त्वाचे ठिकाण. घाटरस्ता बनवताना सुरुंगाने फोडल्याने कावळ्या आता दोन भागात विभागलेला दिसत होता. वरंधाघाटाच्या रस्त्यावर भजीपॉइंटपाशी वाघजाई देवळीच्या वरच्या डोंगरात आहे कावळ्या गडाचा दक्षिण भाग. देवळीपासून भोरच्या दिशेने रस्त्याने गेल्यावर, १०० मी अंतरावर एक बारीक पाऊलवाट उजवीकडे डोंगरमाथ्याकडे निघाली. तीव्र चढ चढून पाण्याच्या ९ टाक्यांपाशी पोहोचलो.

थंड गोड पाणी.

इंग्रजांनी घाटरस्ता बांधताना तीव्र उतार टाळण्यासाठी सुरुंग लावून कावळ्या गडाचा डोंगर-कातळ फोडून, खालच्या पातळीतून - सध्याच्या भजीटोकाच्या पातळीतून - फिरवला असावा.

घाटाचा जुना रस्ता द्वारमंडपापासून थेट इथेच पाण्याच्या ९ टाक्यांपाशी येत असावा आणि जुन्या बांधीव पायऱ्यांच्या वाटेने गडाच्या पश्चिम भागात उतरत असावा - असा माझा अंदाज.

समोर उत्तरेला १०० मी अंतरावर होतं वाघजाई देवीचे मूळ ठाणे. ते बघून पुनश्च गाडीरस्त्यापाशी उतरलो.

वाघजाईमंदिरापासून (भजी टोक) महाडच्या दिशेने निघाल्यावर गाडीरस्ता भागडी खिंडीतून वळला. कावळ्या गडाच्या उत्तर भागाला भेट द्यायला पाऊलवाटेची इथेच सुरुवात झाली. बारीक वाटेने कातळकडा उजवीकडे ठेवत गेलो.

सपाटीवर दोन पाण्याची टाकी, भग्न शिवालय आणि पुढे मातीत हरवलेले उद्ध्वस्थ जोते दिसले, पण गडाच्या या उत्तर भागात पाणी कुठेच नव्हते.

एका झाडाला फूटबॉंलच्या आकाराचे काहीतरी लटकलेले मिलिंदला दिसलं. आंब्याच्या पानांना कसल्याश्या डिंकाणे सुबक जोडत-चिकटवत बनवलेले ते होते कुठल्याश्या मुंग्यांचे वारूळ - केवळ थक्क करणारे.

उजवीकडे दरीत कावळ्या किल्ल्याला बिलगलेला न्हावीण सुळका खुणावत होता.

पलिकडे आहे चौकट उरली नसलेलं पारमाची द्वार. इथूनच पारमाचीतून चढणारी न्हावणदीण घाटाची वाट होती, जी आता सपशेल मोडलीये. गडाचं शेवटचं टोक किंचित डावीकडे पश्चिमेला वळत गेलेलं. टोकापाशी होता गडाच्या उत्तर टोकाचा बुरुज आणि त्यावरचा भगवाध्वज.

हिरडस मावळाचे दृश्य - थोडका डोकावणारा मोहनगड, तळये गावच्या जननीचे त्रिकोणी टोक आणि वळणे घेत कावळ्या गडावरून उतरणारा वरंध घाट.

सोबत होतं सह्याद्रीचं चौफेर अफलातून दृश्य. सह्यदर्शनाने भारावून गेलो. भर्राट वाऱ्याने भगवा फडफडत होता. ट्रेकर्सच्या गप्पा रंगल्या होत्या हिरडस मावळाच्या परिसरातल्या भटकंतीच्या.
कधी रमलो गर्द देवराईतल्या राउळापाशी, तर कधी धपापलो तापलेल्या घसरड्या वाटांवर..
कधी फसलो गचपणात सपशेल हरवलेल्या वाटेवर, तर कधी थबकलो पदरातल्या गारेगार झाडीमध्ये – अंजनीच्या फुलांच्या सड्यापाशी...
कधी भारावलो कोण्या वीराच्या स्मारकशीळेपाशी, तर कधी दीठीत मावेना सह्याद्रीचा अ-ज-स्त्र पनोरमा...
कधी भुकावल्या-तहानलेल्या क्षणी घरून आणलेल्या डब्याची अवीट चव चाखलेली, तर कधी ट्रेकर दोस्तांबरोबरच्या धम्माल गप्पांमध्ये
कधी अर्घ्य दिला नदीच्या मुळाशी असलेल्या नीरबावेमध्ये, तर कधी थक्क झालो जुन्या घाटवाटेवर गवसलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी...
कधी हळहळलो झपाट्याने तुटत चाललेल्या हिरड्याच्या रानामुळे, तर कधी आधार मिळाला समर्थांच्या शिवथरघळीच्या दर्शनाने...
सह्याद्रीऋषीचं हिरडस मावळातलं कुळ, अन नीरानदीचं मूळ धुंडाळताना असं कितीतरी अनुभवलेलं...
लोभस हिरडस मावळाने अशी जबरदस्त रानभुली घातलेली...

-------------------------------------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा, २७ एप्रिल, २०१८
२. ट्रेकर मंडळी: साकेत गुडी, मिलिंद लिमये, अभिजीत देसले, निनाद बारटक्के, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे.
३. ट्रेक डिसेंबरमध्ये केला आहे. वेगळ्या सीझनमध्ये ट्रेक केल्यास वाटा-पाणी-गवत-कातळ ही सगळी गणिते बदलू शकतील.
४. कृतज्ञता: वाघजाई घाटाच्या माहितीसाठी निनाद बारटक्के
५. ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे
६. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
७. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१८. सर्व हक्क सुरक्षित.

मस्त वर्णन , विशेषकरून ते पानांचा football आच्छर्यच !!
ReplyDeleteऐतिहासिक संदर्भांसहित निसर्गाच्या विविध छटा सुरेख शब्दबद्ध केल्या आहेस. प्रकाशचित्रेही सुंदरच!
ReplyDelete