पाटण आणि साई लेणींचे जिग-सॉ कोडं
भल्या
पहाटे पाटणला पोहोचलो. शांतनिवांत सकाळ. मयूर भेटला. एकदम उत्साही आणि हसतमुख
ट्रेकरमित्र. लगेचच लेण्यांच्या विषयाला हात घातला. आमच्या पश्चिमेला होती विसापूरवरून
उतरत आलेली लांब डोंगरसोंड. डोंगरसोंडेच्या कातळातून सहजीच डोकावत होती एक थोरली
गुहा. कित्येक वर्ष पाटणला येऊन गेलेलो, पण ही गुहा कधीच लक्षात आली नव्हती.
मयूरसोबत गुहेकडे चढाई सुरु केली.

गुहेखाली पदरातली शिंदीची झाडं आणि उभा उतार यामुळे थेट गुहेकडे चढणे अडचणीचे होते.

उजवीकडून (उत्तरेकडून) डोंगरमाथ्यावर जाणारी मळलेली वाट घेतली.

डोंगरसोंडेचा माथा जवळ आल्यावर मयूरने मळलेली वाट सोडून, डावीकडच्या उतारांवरून वाटेचा-लेण्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.

लेण्याकडे जायला वाट अशी नव्हतीच. गच्च निसरड्या गवतातून उभं चढत आणि सोपे कातळारोहण अशी अडचणीची चढाई केली.

नाणोली गावाच्या अलिकडे टेपाडावरचं खंडोबा मंदिर खुणावू लागलं. पायथ्याशी गाडी लावून खंडोबाच्या मंदिराच्या डावीकडून डोंगराच्या माथ्यावरच्या पवनचक्क्यांसाठी बांधलेल्या कच्च्या रस्त्याने चालत निघालो. डोंगरावरच्या वाडीतले गावकरी बाईक घेऊन रस्त्याने भेटत होते, पण त्यांना साई लेण्यांबद्दल काही कल्पना नव्हती. दुतर्फा उंच झक्क झाडी, डोंगर माथ्याकडे टेकणारे पूर्व मॉन्सून ढग आणि निवांत चालीचा कच्चा रस्ता.

एका वळणावर अजस्त्र ईगल आऊलच्या फडफडण्याने दचकलो. डोक्यावर शिंगे असल्यासारख्या दिसणाऱ्या त्या विशाल घुबडाच्या भेदक दर्शनाने अंगावर काटा आला. कच्च्या रस्त्यावरून जाताना डावीकडच्या डोंगरउतारामध्ये कातळटप्प्यांमध्ये लेणे कुठे असेल, याचा अंदाज घेत पुढे निघालो.

हत्तीच्या गंडस्थळासारखा विशाल कातळमाथा असलेल्या डोंगराच्या पोटातली गुहा खुणावत होती. पण, चढाईसाठी अजिबात वाटच नसल्याने अजून पुढे काही सापडतंय का बघत निघालो.

आभाळात पूर्व-मॉन्सून ढग जमलेले. हवेतल्या दमटपणामुळे घामाने निथळू लागलो. पहिल्या पावसासोबत आगमन झालेल्या माश्यांनी आमच्याभोवती घोंघावायला सुरुवात केलेली. खंडोबाच्या देवळापासच्या सोंडेपासून निघाल्यावर अडीच-तीन किमी चाल झाल्यावरही लेणे कुठे, याचा अंदाज येईना. क्वचित कोणी स्थानिक भेटले, पण कुणालाच साई लेण्याबद्दल कल्पना नव्हती. ढगात हरवलेल्या माथ्याकडच्या पवनचक्क्यांची संथ कुरकुर चाललेली. बराच वेळ खर्च करूनही लेणे गवसणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली.
इंद्रायणी नदीच्या
खोऱ्यातल्या - नाणेमावळातल्या - अल्पपरिचित कातळलेणी धुंडाळण्याच्या वेडापायी
पहिल्या टप्प्यात कार्ले डोंगररांगेच्या दक्षिण बाजूस असलेली लेणी-विहारांची (वळवण-देवघर-वाकसई-शिलाटणे-टाकवे-वाळक)
लेणे-टाक्यांची साखळी समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात
इंग्रज अभ्यासक फर्ग्युसन यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी केलेल्या एका ओळीच्या
नोंदीच्या आधारे आणि स्थानिक ट्रेकरमित्रांच्या मदतीच्या कशी भिरीभिरी भ्रमंती
केली आणि काय गवसलं, याच्या वर्णनाचा हा ब्लॉग. मोहिमेच्या दुसऱ्या
टप्प्यात भेट दिली पाटण गावच्या तीन चैत्यलेण्यांना आणि नाणोली-साई गावजवळच्या साई
लेण्यांना.
पाटण
चैत्यगृह १ (पूर्वेचे)
...
एके दिवशी भल्या पहाटे मळवलीपाशी रेल्वेक्रॉसिंग करून, पाटण गावातून बाहेर पडत
पूर्वेला वाघजाईच्या मंदिरापाशी गाडी लावली. मंदिराबाहेरचं वैशिष्ट्यपूर्ण
गद्धेगाळ शिल्प आणि ओळीने मांडलेले आठ नंदी न्याहाळले.
(फोटो साभार: साकेत गुडी)
आसमंत न्याहाळला तर लक्षात
आलं, की पाटण वसलंय दुर्ग विसापूर आणि भातराशी शिखराच्या डोंगरसोंडांच्या कुशीत.
पूर्वेला भातराशीकडून उतरलेल्या डोंगरसोंडेच्या उतारावर खोदलेलं चैत्यगृह बघायला
आम्ही आतुर झालेलो.
गावापासून मरगळवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून जात,
अर्ध्या तासाच्या चालीनंतर लेण्याच्या आसपास पोहोचलेलो. उतारावरच्या झुडुपांमधून
लेणे सहज दिसत नव्हते.
शोधाशोध घुसाघुशी केल्यावर फडकणाऱ्या ध्वजाच्या दिशेने चढत
गेलो. आणि, समोर आलं पाटणचं चैत्यगृह. पहा व्हिडीओ इथे:
मूळातल्या
नैसर्गिक गुहेची खोदाई करत साधारणत: घुमटाकार छताचा आकार दिलेला. अत्यंत सुबक आणि
दर्जेदार खोदाईचे हे चैत्यगृह म्हणजे बुद्धाच्या स्मरणार्थ उभारलेलं स्तूपयुक्त
प्रार्थनामंदिर. लेण्याची खोदाई करताना काही ठिकाणी बेसाल्टमधल्या नैसर्गिक पोकळी
(cavity) उघड झालेली. तळाशी किंचित उंचसखल सपाटी आणि किंचित रेतीचा थर (हल्लीच इथे
सिमेंटचा थर दिलाय म्हणतात). इथे शिलालेख किंवा पाण्याचे टाके नाही. मात्र,
लेण्यासमोर विवेकसरांना पाण्याच्या टाक्यासारखी खोदाई जाणवली. लेण्याच्या उजवीकडे आयताकृती
दालनात रेखीव स्तूप आणि शेजारी छोटा बाक खोदलेला. स्तूपाच्या पायथ्याशी वर्तुळाकार
जोते, त्यावर नक्षीदार वेदिकापट्टी, घुमटाकार अंड, त्यावरची छोटी खाच (कदाचित
बुद्धाच्या रक्षेचा अंश ठेवण्यासाठी जागा) आणि थेट कातळछताला आधार देणारी हर्मिका
अशी स्तुपाची रचना. त्यामुळे इथे वेगळ्या लाकडी छत्राची इथे योजना नव्हती. जोते
म्हणजे मृत्यूलोक, घुमटाकार अंड म्हणजे आकाश आणि हर्मिकेच्या सात उतरत्या पायऱ्या
म्हणजे सप्तस्वर्गांचे प्रतिक. स्तूपाच्या आयताकृती दालनाबाहेर तळाशी चौकोनी
खाचांमध्ये कदाचित लाकडी चौकट बसवली असेल का, कुणास ठावूक!
लेण्यातून
समोर दिसणारे नाणेमावळ सकाळच्या कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होतं. पूर्व
मॉन्सूनचे ढग न्याहाळत कितीतरी वेळ बसून राहिलो. उतरताना पाटणच्या उत्तरेचा मोठ्ठा
बांधीव तलाव खुणावू लागला.
मुद्दाम वाट वाकडी करून बांधीव तलाव आणि त्याच्या
काठावरचं शिवमंदिर न्याहाळलं. हा तलाव कधी-कोणी बांधला हे माहिती नसलं, तरी नक्कीच अजून एक जुनी जागा.
पाटण चैत्यगृह
२ (पश्चिमेचे)
“भाजे लेण्याच्या
पूर्वेला आयरा गावापाशी एकांडे ध्यानविहार आहेत”, अशी एका ओळीची नोंद फर्ग्युसन
यांनी केलेली. बाकी काहीच तपशील नाही. भाजे लेण्याच्या पूर्वेला डोंगरापल्याड आहे पाटण गाव. आयरा नावाचं इथे
कुठलंच गाव नाही. त्यामुळे फर्ग्युसनने ‘आयरा’ म्हणून नोंदवलेली लेणी हीच
पाटण गावची लेणी, असा अंदाज बांधून पाटणला अजून काही लेणी आहेत का हे धुंडाळायचं ठरवलं.
आमच्या अमेयचे ट्रेकर मित्र सगळीकडे असतात. त्याने पाटणच्या ‘मयूर तिकोने’ या ट्रेकरमित्राशी
संपर्क केला आणि भटकंती ठरली सुद्धा.

गुहेखाली पदरातली शिंदीची झाडं आणि उभा उतार यामुळे थेट गुहेकडे चढणे अडचणीचे होते.

उजवीकडून (उत्तरेकडून) डोंगरमाथ्यावर जाणारी मळलेली वाट घेतली.

डोंगरसोंडेचा माथा जवळ आल्यावर मयूरने मळलेली वाट सोडून, डावीकडच्या उतारांवरून वाटेचा-लेण्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली.

लेण्याकडे जायला वाट अशी नव्हतीच. गच्च निसरड्या गवतातून उभं चढत आणि सोपे कातळारोहण अशी अडचणीची चढाई केली.

आणि,
मग झालं गुहेचं पहिलं दर्शन. पूर्वेचं ऊन लेण्याला उजळवत होतं.
वाळक्या गवतातून धस्सकफस्सक
करत लेण्याजवळ गेलो. जवळ गेल्यावर लेण्याच्या डावीकडचा खळगा आणि गुहेची सफाईदार
खोदाई जाणवू लागली. आणि लेण्यात ते काय आहे – ‘स्तूप’!!! आम्ही जोरात ओरडलोच.
आतुरतेने जवळ गेल्यावर स्तुपाच्या उजवीकडे लेण्यातला विहारही दिसू लागला.
पायथ्याशी बेसाल्टमधली नैसर्गिक पोकळी खोदाई लेण्याची खोदाई करताना मोकळी झालेली. तळाशी
असलेल्या वाळलेल्या चिखलमातीवरून पावसाचे पाणी कदाचित साठत असावं. मात्र हे
खोदलेले नाही वाटत.
पहा व्हिडीओ इथे:
मुख्य लेण्याच्या दालनाची वैशिष्ट्यपूर्ण अर्धगोलाकार आकारात खोदाई केलेली.
मुख्य लेण्याच्या दालनाची वैशिष्ट्यपूर्ण अर्धगोलाकार आकारात खोदाई केलेली.
डावीकडे
चौकटीत स्तूपाची खोदाई सुरुवात करून अर्धवट सोडलेली. स्तुपाचा आकार काही रेखीव आणि
सफाईदार नाही वाटत.
स्तूपाच्या कातळावरचे खडकाचे खपचे बघता, खोदाई करताना कातळाची
कटाई बिघडली म्हणून सोडलं की दगडाचा पोत साधा म्हणून सोडलं, कुणास ठावूक.
माथ्याकडचा हर्मिकेचा भाग पडला किंवा फुटला किंवा फोडला आहे. लेण्याच्या
अर्धगोलाकार भागात समोर वर्षावासासाठी खोदलेला विहार दिसत होता.
किंचित बाक
खोदलेली त्यात पायरी, अरुंद द्वार आणि छोटुश्या विहाराची जागा.
विहाराच्या आत बाक
नाही. माथ्याचा भाग किंचित घुमटाकार खोदलेला. शिलालेख नाही. पाण्याचे खोदीव टाके
नाही. लेण्याच्या तळाशी बऱ्यापैकी सपाट केलेला कातळसपाटी. त्यावर कोरलेला
सारीपाटाचा डाव आणि तीन-चार खळगे.
लेण्याबाहेर समोर शिलाटणे लेण्यांपाशी
पूर्वमॉन्सून ढगांची सलगी चाललेली.
डावीकडे
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पसरलेलं पाटण गाव आणि त्याचा तलाव, समोर पाटण चैत्य १
असलेली भातराशीकडून उतरणारी सोंड, किंचित उजवीकडे भातराशी शिखर आणि उजवीकडे
विसापूरच्या माथ्यावरची तटबंदी!
अनेकदा पाटणला भेट देऊनही, लक्षात न आलेलं पाटणच्या पश्चिमेचं चैत्यगृह पाहून
टीम बेहद्द खुश झालेली.
पाटणची लेणी झाली बघून असं वाटत असतानाच, मयूरने सांगितलं अजून एका ठिकाणी साधं लेणं आहे.
फक्कड चहाच्या संजीवनीने टीम पुन्हा एकदा तय्यार झाली.
पाटण
लेणे ३ (दक्षिणेचे)
पाटण गावापल्याडच्या
वाघजाई देवळापाशी गाडी लावली. मंदिराच्या दक्षिणेला दुर्ग विसापूर आणि भातराशी शिखराला जोडणारी रांग
दिसत होती. विसापूरच्या पूर्वेच्या बुरूजापासून उतरलेल्या
डोंगरदांडाशेजारून मळलेली वाट चढत होती.
डोंगराचा पदर जवळ आल्यावर मळलेली वाट
सोडून ओढ्यातून चढत, कातळमाथ्याच्या पोटापाशी पोहोचलो सुद्धा. मात्र इथून पुढची
चाल चांगलीच अडचणीची होती. कातळमाथा डावीकडे ठेवून आडवं घुसत गेलो. झुडूपांच्या गच्च
जाळ्या माजलेल्या. भेकरांच्या-साळींदरांच्या-डुकरांच्या बुटक्या-अरुंद वाटा तुडवत
लय ओरबाडून घेतलं.
अखेरीस दृष्टीक्षेपात पडलं एक अर्धवट खोदाई करून सोडून दिलेलं
लेणं. माथ्यावर आग्या मोहोळ असल्याने शांततेत हालचाली केल्या. २५ फूट रुंद असलेली
आणि माथ्याकडून दोन टप्प्यात खोदलेली अचूक काटकोनातली सुरेख कटाई.
बाहेरच्या बाजूस
छिन्नीचे घाव बारीक-जवळजवळ-सुबक.
तर आतल्या बाजूस दगड-माल खोदून काढायचा असल्याने छिन्नीचे
घाव ढोबळ आणि लांब लांब घातलेले.
लेणे अर्धवट का सोडले, याचा अंदाज मात्र बांधता
आला नाही.
परतीचा प्रवास सुरु
झाला. आल्या वाटेने न येता, वळसा घालत विसापूरपासून पाटणकडे वायव्येला उतरणाऱ्या
मुख्य ओढ्यातून उतरायचे होते. परत एकदा सुरु झाला झुडूपा-जाळ्यांचा खेळ. अशक्य
गचपण असल्याने सॅक पाठीवरून काढून घेतली. जाळीखाली चक्क पाठीवर झोपायचे. पाय दुमडून
पुढे सरकायचे आणि सॅक ओढून घ्यायची, असा द्राविडी प्राणायाम चाललेला.
मागे आग्या
मोहोळ आणि आम्ही जाळीतून अतिशय हळू सरकू शकत असल्याने, हा टप्पा काळजीपूर्वक पार
केला आणि हुश्श केलं. बारीक वाटेवरच्या घसाऱ्यावरून उतरल्यावर, विसापूरच्या
ओढ्याच्या पात्रात समोर आली नैसर्गिक मोठ्ठी गुहा.
ओढ्याच्या पात्रातले रांजणखळगे
अडस-दडस करत उतरले.
मयूरने एके ठिकाणी कातळात खोदलेली दोन शिवलिंगे दाखवली.
मयूरच्या घरी खूप अगत्याने स्वागत
झालं. पोटभर न्याहारी केल्यावरच निरोप घेतला. किती किती आपुलकीने आम्हांला. मैत्र
सह्याद्रीचे – अजून काय!
पाटणच्या पूर्वेचे
उत्तम चैत्यगृह, पश्चिमेचे अर्धवट चैत्यगृह आणि दक्षिणेचे अर्धवट सोडून दिलेले
लेणे बघितल्यावर, नाणेमावळाच्या जिग-सॉमधले आमच्या गटाला पडलेले (आणि काही न
सुटलेले) प्रश्न आणि निरीक्षणे:
१.
काय
उद्देश:: बौद्ध धर्माच्या साधकांना एकांत ध्यान करण्यासाठी
ध्यानगुंफा
२.
स्थान
इथेच का: नाणेमावळातला गजबजीचा पुरातन व्यापारी
मार्ग - पुरातन दुर्ग (विसापूर) – लेणी अशी जोडगोळी. कार्ले-भाजे लेण्यांच्या
परिसरातील उपग्रहांसारखे विखुरलेली एकांडी लेणी. डोंगरावरची लेणी साधकांसाठी
ध्यानगुंफा म्हणून
३.
कोणती
लेणेवैशिष्ट्य: खोदाईचा दर्जा चांगला. छिन्नी
हातोड्याच्या सुबक खुणा. लेण्यांजवळ शिलालेख किंवा पाण्याचे टाके नाही, पण मोठ्ठी
छिद्रे खणलेली.
४.
कोणत्या
काळातली: कार्ले-भाजे लेण्यांच्या काळाच्या आसपास
खोदलेली असावीत.
५.
कोणत्या
विशिष्ठ धर्माची: पाटण चैत्यगृह स्पष्टपणे
बौद्ध धर्मकृत्य. जवळची कार्ले-भाजे लेणी बौद्ध धर्मकृत्य असल्याने आणि बांधीव
दागोबासाठी खोदलेल्या अर्धवर्तुळाकार दालनांमुळे ही लेणी बौद्ध साधकांना एकांत
साधनेसाठी खोदवली असावीत.
६.
कोणी
खोदवलेली – धर्माश्रय, राजाश्रय, व्यापारी हेतू?: धर्माश्रय नक्कीच. व्यापारी हेतू नसावा. राजाश्रय मात्र नक्कीच
असावा. पण कोणाचा?
साई लेणे (हे फर्ग्युसनने नोंदवलेले नाही. कार्ले डोंगररांगेत नाही, पण जवळच नाणेमावळातल्या पुरातन मार्गाजवळ असल्याने, या लेणेगटात नमूद केलंय)
कार्लेलेणे ज्या डोंगररांगेत खोदलंय, त्या रांगेच्या दक्षिण बाजूची फर्ग्युसनने नोंदवलेली लेणी (देवघर, वाकसई, शिलाटणे, टाकवे, वाळक) आम्ही एव्हाना बघितली होती. पुरातन व्यापारी मार्गालगत टप्प्याटप्प्याने खोदलेली लेणी-टाकी अशी साखळी असेल, असा अर्थ काढू पाहिला. आता या परिसरातली लेणी बघून झाली असावीत, असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा सह्याद्रीने सुखद धक्का दिला. आमच्या अमेय जोशीचा मावळचा रिसर्च आणि स्थानिक ट्रेकर मित्रांशी संपर्क दांडगा असल्याने त्याला या परिसरातल्या अजून एका लेण्याची माहिती मिळाली. कामशेतचे श्री शिवप्रसाद सुतार आणि मित्रमंडळाने नाणेमावळातल्या अल्पपरिचित ‘साई लेण्या’ला भेट दिल्याचं कळलं. हे लेणे नैसर्गिक गुहा, की मानवनिर्मित हे प्रत्यक्ष भेट दिल्याशिवाय कळणार नव्हते. फर्ग्युसनने ही जागा नोंदवली नाहीये, पण शिवप्रसाद यांनी आपुलकीने तपशीलवार माहिती दिल्यामुळे आम्हाला गुहालेणे सापडू शकले, हे कृतज्ञतापूर्ण नमूद केलं पाहिजे.
भौगोलिकदृष्ट्या हे लेणे कुठे ते पाहू. कार्ले लेण्याची डोंगररांग पश्चिम-पूर्व धावून वाळकपाशी संपलेली. थोडं पूर्वेला दुसरी एक डोंगररांग नाणे-नाणोली गावापासून सुरु होवून वायव्येला ढाक दुर्गापर्यंत धावते. या डोंगररांगेमुळे नाणेमावळाची एक शाखा वायव्येला उकसण-जांभिवलीकडे पसरली आहे. डोंगररांग सुरु होते, त्या नाणोली-साई गावापाशी साई लेण्याची जागा. वाळक गावापासून पूर्वेला ही जागा पुरातन मार्गालगतच. म्हणून कार्ले लेण्याच्या दक्षिण बाजूच्या लेणेसमुहातलं हे लेणे असेल, असा अर्थ आम्ही काढला. साई लेणे आहे तरी काय याची आता उत्सुकता दाटलेली.
एके दिवशी पहाटेच कामशेत गावातून जांभिवलीचा रस्ता घेऊन नाणे गाव गाठलं. नाणोली–साई गावाच्या वळणां-वळणांच्या रस्त्यावरून प्रवास करताना थबकलो. नाणेमावळाच्या दृश्याच्या पार्श्वभूमीवर गवताळ माळावर विखरलेल्या मेंढ्या आणि गप्पीष्ट धनगर भेटले. सालाबादप्रमाणे उन्हाळ्यात मेंढ्यांना पूर्वेच्या दुष्काळी भागातून सह्याद्री घाटवाट उतरून कोकणात न्यायचं आणि मॉन्सूनची वर्दी आली की पुन्हा घाट चढून गावाकडे परतायचं, ही त्यांची जीवनशैली मावळातल्या जुन्या संस्कृतीचाच भाग म्हणायचा.

नाणोली गावाच्या अलिकडे टेपाडावरचं खंडोबा मंदिर खुणावू लागलं. पायथ्याशी गाडी लावून खंडोबाच्या मंदिराच्या डावीकडून डोंगराच्या माथ्यावरच्या पवनचक्क्यांसाठी बांधलेल्या कच्च्या रस्त्याने चालत निघालो. डोंगरावरच्या वाडीतले गावकरी बाईक घेऊन रस्त्याने भेटत होते, पण त्यांना साई लेण्यांबद्दल काही कल्पना नव्हती. दुतर्फा उंच झक्क झाडी, डोंगर माथ्याकडे टेकणारे पूर्व मॉन्सून ढग आणि निवांत चालीचा कच्चा रस्ता.

एका वळणावर अजस्त्र ईगल आऊलच्या फडफडण्याने दचकलो. डोक्यावर शिंगे असल्यासारख्या दिसणाऱ्या त्या विशाल घुबडाच्या भेदक दर्शनाने अंगावर काटा आला. कच्च्या रस्त्यावरून जाताना डावीकडच्या डोंगरउतारामध्ये कातळटप्प्यांमध्ये लेणे कुठे असेल, याचा अंदाज घेत पुढे निघालो.

हत्तीच्या गंडस्थळासारखा विशाल कातळमाथा असलेल्या डोंगराच्या पोटातली गुहा खुणावत होती. पण, चढाईसाठी अजिबात वाटच नसल्याने अजून पुढे काही सापडतंय का बघत निघालो.

आभाळात पूर्व-मॉन्सून ढग जमलेले. हवेतल्या दमटपणामुळे घामाने निथळू लागलो. पहिल्या पावसासोबत आगमन झालेल्या माश्यांनी आमच्याभोवती घोंघावायला सुरुवात केलेली. खंडोबाच्या देवळापासच्या सोंडेपासून निघाल्यावर अडीच-तीन किमी चाल झाल्यावरही लेणे कुठे, याचा अंदाज येईना. क्वचित कोणी स्थानिक भेटले, पण कुणालाच साई लेण्याबद्दल कल्पना नव्हती. ढगात हरवलेल्या माथ्याकडच्या पवनचक्क्यांची संथ कुरकुर चाललेली. बराच वेळ खर्च करूनही लेणे गवसणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली.
परत एकदा शिवप्रसाद यांनी दिलेली लेण्यांची माहिती आणि परत पडताळून पाहिली. त्यांनी काढलेल्या फोटोत साई लेण्यातून आसमंतात दिसणाऱ्या डोंगररांगा, झाडीचे टप्पे बारकाईने बघितले. जाणवलं, की मगाशी आम्हांला दिसलेला हत्तीच्या गंडस्थळासारखा कातळमाथा असलेला डोंगर साई लेण्यातून डावीकडे दिसतोय. खूण मिळालेली, त्यामुळे आल्या रस्त्याने परत निघालो.

खुणेच्या डोंगरापासून वळत जाणारा रस्त्यावरून झाडीमागे कातळात काही गुहा जाणवत होत्या.

दिशाशोधनाच्या अनुभवाच्या जोरावर पदरातल्या दाट रानव्यात घुसलो. गच्च झाडी-पालापाचोळा-जाळ्यांमधून-जनावरांच्या वाटांवरून कातळकड्याच्या जवळ गेलो.

लेणे नक्की कुठे हे दिसले नव्हतेच. कड्याकडे उंच पाहिल्यावर दिसणाऱ्या खोलगटीत लेणे असू शकेल, अश्या शक्यतेवर कडा चढून पाहायचं ठरवलं. एका कातळावर ठिकठिकाणी माफक खोदाई करून लेणे खोदण्यासाठी कातळाचा दर्जा जोखला असेल का, असं वाटलं.

कधी कातळकड्यावरून, कधी बाजूच्या उतारावरून ५० फूट सोप्या श्रेणीचं कातळारोहण करून गेलो.

उभ्या उतारावरची भुसभुशीत रेती – कातळ आणि झुडुपांच्या जाळीमधून कशीबशी चढाई केली.

अखेरीस समोर उलगडली कातळकड्याच्या पोटातली तिरकी लंबगोलाकार गुहा. मुळातली नैसर्गिक गुहा असलेलं, पण स्पष्टपणे मानवनिर्मित खोदाई केलेलं – हेच ते साई लेणे!

पहा व्हिडीओ इथे:

गुहेच्या डावीकडे बाकाची खोदाई - छिन्नी हातोडाचे घाव घालून केलेली.

तळाशी उंच-सखल माती-दगड साठलेले, तर छताकडे मूळ ओबढधोबड गुहा सोडून दिलेली. गुहेच्या मागील बाजूस उभ्या भिंतीसारखी अर्धगोलाकार खोदाई. कातळ किंचित तिरका असल्याने भिंतीसाठी एका थराची कटाई झाल्यावर बारीक आडवी पट्टी ठेवून मग पुढच्या थराची कटाई केलेली.

गुहेच्या मुखापाशी उजवीकडच्या कातळावर उभ्या छिन्नीचे एकसलग सुबक घाव.

आतल्या टोकापासून दिसणारा गुहेचा विस्तार बघता कोणी-कधी-कुठल्या उद्देशाने ही गुहा खोदवली, असा नेहेमीचा अनुत्तरीत प्रश्न पडला. शिवप्रसाद यांच्या मते या गुहेत स्वराज्याचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे काही काळ वास्तव्यास होते. तेंव्हाच्या काही खुणा असतील का या!

गुहेचे निरीक्षण-नोंदी घेतल्यावर, गुहेबाहेरचे ढग, झाडी, कातळटप्पे आणि परिसरातली गावं न्याहाळत गप्पा रंगल्या.

थर्मासमधून आणलेल्या फक्कड चहाचं सेलिब्रेशन चालू असताना, काळेसर गुहेचं निरीक्षण करत होतेच. वर्षावासासाठी गुहा खोदत असल्याने, गुहेजवळ पाण्याचं टाकं असलंच पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. लेण्याशेजारी पाण्याचे टाके दिसलं नव्हतं. मात्र निरीक्षण करताना गुहेच्या तळाशी पडलेल्या मातीच्या भांड्यांचे-खापरांचे तुकडे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. कधीतरी कोणीतरी गुहेत वास्तव्य केल्याचा पुरावा.

खुणेच्या डोंगरापासून वळत जाणारा रस्त्यावरून झाडीमागे कातळात काही गुहा जाणवत होत्या.

दिशाशोधनाच्या अनुभवाच्या जोरावर पदरातल्या दाट रानव्यात घुसलो. गच्च झाडी-पालापाचोळा-जाळ्यांमधून-जनावरांच्या वाटांवरून कातळकड्याच्या जवळ गेलो.

लेणे नक्की कुठे हे दिसले नव्हतेच. कड्याकडे उंच पाहिल्यावर दिसणाऱ्या खोलगटीत लेणे असू शकेल, अश्या शक्यतेवर कडा चढून पाहायचं ठरवलं. एका कातळावर ठिकठिकाणी माफक खोदाई करून लेणे खोदण्यासाठी कातळाचा दर्जा जोखला असेल का, असं वाटलं.

कधी कातळकड्यावरून, कधी बाजूच्या उतारावरून ५० फूट सोप्या श्रेणीचं कातळारोहण करून गेलो.

उभ्या उतारावरची भुसभुशीत रेती – कातळ आणि झुडुपांच्या जाळीमधून कशीबशी चढाई केली.

अखेरीस समोर उलगडली कातळकड्याच्या पोटातली तिरकी लंबगोलाकार गुहा. मुळातली नैसर्गिक गुहा असलेलं, पण स्पष्टपणे मानवनिर्मित खोदाई केलेलं – हेच ते साई लेणे!

पहा व्हिडीओ इथे:

गुहेच्या डावीकडे बाकाची खोदाई - छिन्नी हातोडाचे घाव घालून केलेली.

तळाशी उंच-सखल माती-दगड साठलेले, तर छताकडे मूळ ओबढधोबड गुहा सोडून दिलेली. गुहेच्या मागील बाजूस उभ्या भिंतीसारखी अर्धगोलाकार खोदाई. कातळ किंचित तिरका असल्याने भिंतीसाठी एका थराची कटाई झाल्यावर बारीक आडवी पट्टी ठेवून मग पुढच्या थराची कटाई केलेली.

गुहेच्या मुखापाशी उजवीकडच्या कातळावर उभ्या छिन्नीचे एकसलग सुबक घाव.

गुहेचे निरीक्षण-नोंदी घेतल्यावर, गुहेबाहेरचे ढग, झाडी, कातळटप्पे आणि परिसरातली गावं न्याहाळत गप्पा रंगल्या.

थर्मासमधून आणलेल्या फक्कड चहाचं सेलिब्रेशन चालू असताना, काळेसर गुहेचं निरीक्षण करत होतेच. वर्षावासासाठी गुहा खोदत असल्याने, गुहेजवळ पाण्याचं टाकं असलंच पाहिजे असा त्यांचा विश्वास होता. लेण्याशेजारी पाण्याचे टाके दिसलं नव्हतं. मात्र निरीक्षण करताना गुहेच्या तळाशी पडलेल्या मातीच्या भांड्यांचे-खापरांचे तुकडे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. कधीतरी कोणीतरी गुहेत वास्तव्य केल्याचा पुरावा.
आल्या वाटेने उभा कातळ उतरणं अडचणीचं असल्याने, आडवं जाऊन मग उतराई करायची ठरवलं. लेण्याकडे तोंड केल्यावर डावीकडे कातळाच्या पोटातून निघालो. आणि गवसलं कातळातला जिवंत झरा हेरून खोदलेलं पाण्याचे उथळ छोटेसे टाके. आत घट्ट चिखल गाळ साचलेला.

१० मिनिटात विवेक सरांनी तो उपसून काढला. त्यामुळे टाक्याचा विस्तार ०.७ मी रुंद आणि १.२५ मी खोदाईचा (कातळ माथ्यापासून १ मी, पाण्याची पातळी ०.३ मी) हे लक्षात आलं. टाक्यापासून उभी उतराई करून पदरातल्या दाट झाडीत आणि मग ज्या रस्त्याने आलो त्या कच्च्या रस्त्यावर उतरलो.

ही गुहादेखील कार्लेलेणे परिसरातील लेणे-टाकी साखळीतील एक असावी, असा कयास आमच्या टीमने बांधला. एक अल्पपरिचित लेणेगुहा पाहून आमची टीम जबरदस्त खूष झालेली!

एखाद्या रविवारी दुपारी अडगळीत इतस्थतः विखुरलेल्या जिग-सॉ कोड्याचे तुकडे गवसावेत; खटपटीनंतर
थोडक्या तुकड्यांतून काहीसा आकृतीबंध उलगडू लागावा; तरीही, बरेचसे तुकडे गवसत नसल्याची हुरहूर
लागावी, असं काहीसं आमचं नाणेमावळाच्या भटकंती मोहिमेत झालेलं. मोहिमेच्या
दुसऱ्या टप्प्यात कार्ले लेणे परिसरात विखुरलेल्या पाटण आणि साई लेण्यांचं दर्शन
घेतलं होतं. थोडक्या माहितीच्या आधारे भूगोल-संस्कृतीचे आडाखे बांधले; भरवशाच्या
अभ्यासू टीमसोबत धपापत्या ऊराने गच्च काटयांमधून रांगत-घुसत गेलो; कातळ-घसाऱ्यावरच्या
मोडलेल्या वाटा हेरत वणवण केली; सह्यमित्रांच्या साथीनं
गुहा-भुयारं-घळी-लेणी धुंडाळली; सह्याद्रीच्या बेसाल्टमध्ये
लेण्यांच्या रूपाने रचलेली जणू कृष्णांतरीची काव्ये अनुभवली आणि तरीही नाणेमावळच्या
भूगोल-संस्कृतीचं जिग-सॉ कोडं सुटत नसल्याची हुरहूर लागलेली. पाटण आणि साई
लेण्यांचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु झालेला. आम्हांला कल्पनाच नव्हती, की नाणेमावळाचे
जिग-सॉ कोडं अजून कठीण होत जाणार आहे; आणि कार्ले लेणे परिसरात एक अत्यंत
गूढ अश्या भुयारांची शृंखला लवकरच आम्हांला थरारानुभूती देणार आहे.
------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेकर मंडळी: विवेक काळे सर, अमेय जोशी, निनाद बारटक्के आणि साईप्रकाश बेलसरे.
२. मन:पूर्वक कृतज्ञता: मयूर तिकोने (पाटण), शिवप्रसाद सुतार आणि मित्रमंडळ (कामशेत), डॉ. श्रीकांत प्रधान (पुणे), साईली पलांडे-दातार (पुणे)
३. लेखाचा हेतू "आम्हीच नवीन लेणे शोधले", असा अजिबात नाही. फर्ग्युसन यांनी नोंदवलेल्या लेणी-टाक्यांची आजची परिस्थितीची नोंद करणे; अनुभव ट्रेकर्स आणि इंडॉलोंजिस्ट दोस्तांबरोबर शेअर करणे आणि या लेण्यांचे संवर्धन व्हावे हा आहे. लेण्यांबद्दल अधिक माहिती/ आधीचे संशोधन/ डॉक्युमेन्टेशन कोणाकडे असेल, तर अवश्य अवश्य कळवावे.
४. लेणी आराखडे: विवेक काळे सर
५. मावळ नकाशा आणि ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे.
६. शक्यतो उन्हाळ्यात या गुहालेण्यांना भेट देणे योग्य. वावर अजिबात नसल्याने, सरिसृप-वटवाघळे-श्वापदे यांचा वावर असू शकतो. अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक. शरीर पूर्ण झाकतील असे कपडे, ताकदीचे टॉर्च, काठी आवश्यक. भरपूर पाणी सोबत असावे.
७. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
८. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.
अतिशय सुंदर उपक्रम.काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या व उपेक्षित राहीलेल्या प्राचीन लेण्नयांचा नव्याने शोध घेऊन ती प्रकाशझोतात आणने गरजेचे आहे.तेव्हाच लोकांपर्यंत हया लेण्यांसंबंधी माहिती पोहोचेल त्यांवर अधिक प्रकाश पडेल.नाहीतर ही लेणी कायमची दुर्लक्षित राहतील.
ReplyDelete