Pages

Friday, 16 November 2018

वाटचाल सातमाळ

सातमाळ डोंगररांगेवरून सलग चढउतार करत केलेल्या, दुर्ग कांचना – धोडप - रवळ्या-जवळ्या - मार्कंड्या – सप्तश्रुंग अश्या दमदार देखण्या डोंगरयात्रेचं वर्णन!

...आसमंत गारेगार ढगात सपशेल हरवलेला. सूर्याचं तर दर्शनच झालं नव्हतं सकाळपासून. वळणांवळणांच्या झाडीभरल्या वाटेवर एकेक पाऊल रोवत चढाई करताना, पाय आणि सॅकचे बंद कुरकुरत होते. पण तरीही, पुढच्याच क्षणी सगळा थकवा विरून जात होता; कारण वाटेवर होता कारवीच्या टपोऱ्या जांभळ्या फुलांचा स्वर्गीय गालिचा. एके क्षणी अवचितच झुळूक वाऱ्याची आली. ढगांची दुलई अलगत दूर झाली अन दमदार दर्शन झालं - गेले तीन दिवस आम्ही तंगडतोड केलेल्या दुर्ग-डोंगररांगेचं. भारावून टाकणाऱ्या अश्या कित्येक क्षणांची अनुभूती घेत आम्ही करत होतो 'वाटचाल सातमाळ' डोंगररांगेची!

सातमाळचं आवताण
सातमाळ! सातमाळ म्हणजे आहे तरी काय?
... सातमाळ म्हणजे नाशिकच्या उत्तरेची जबरदस्त डोंगररांग.
... सातमाळ म्हणजे लढाऊ दुर्गांची श्रुंखला आणि खणखणीत दुर्गस्थापत्य.
... सातमाळ म्हणजे सह्याद्रीचं राकट रूप आणि बेलाग कातळमाथे.
... सातमाळ म्हणजे शूरवीरांच्या रसरशीत इतिहासाची पानं.
... सातमाळ म्हणजे बेसाल्ट कातळातली नैसर्गिक शिल्पं.
... सातमाळ म्हणजे अजूनही मनात इतिहास जपलेली माणसं.
... सातमाळ म्हणजे ट्रेकर्सना आवताण डोंगरयात्रा ट्रेकचं!
           
सातमाळचं आवताण आल्यावर गूगलमॅप उघडून बारकाईने निरखलं. अचला-अहिवंत-सप्तशृंग-मार्कंड्या-रवळ्याजवळ्या-धोडप-कांचना अश्या तालेवार सात-दुर्गांची-माळ म्हणून कदाचित 'सातमाळ' नाव पडलं असेल का! पुरातन शहर नाशिकपासून सुरत, बागलाण, धुळे किंवा सत्ताकेंद्र दिल्लीकडे वाहणाऱ्या व्यापारी वाटांवर नियंत्रणासाठी आणि उत्तरेकडून सातत्याने होणाऱ्या आक्रमणांना थोपवण्यासाठी सातमाळच्या लढाऊ दुर्गांची फळी उभारली असणार...
           
... सातमाळेच्या ट्रेकची उत्सुकता हळूहळू दाटू लागली. सातमाळचे दुर्ग सुटेसुटे गाडीने पायथा गाठून बघण्यापेक्षा, डोंगररांगेवरून डोंगरयात्रा पद्धतीने बघायचे होते. नियोजनासाठी मदतीला धावून आले मित्रवर्य नितीन तिडके आणि अमेय जोशी. ट्रेक तांत्रिकदृष्ट्या अवघड नसला; तरी सातमाळेचा भूगोल, प्रत्येक दिवशीची तंगडतोड चाल, काही फसव्या वाटा-कातळटप्पे, मोजक्या पाण्याच्या-मुक्कामाच्या जागा आणि खाण्यापिण्याच्या सोयी कुठेच नसणं - हे बघता तरी चोख नियोजनाची गरज होती.  विचारांती आम्ही डोंगरयात्रा मार्ग ठरवला - दुर्ग कांचनापासून सुरुवात करून, धोडप, रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या आणि सप्तश्रुंग. जणू काही, सप्तश्रुंगदेवीच्या दर्शनासाठीच होती आमची 'वाटचाल सातमाळ'!


सातमाळ प्रवासाला सुरुवात
...असा भन्नाट ट्रेक करायला सोबत होती हक्काच्या आणि ताकदीच्या दोस्तमंडळींची - साकेत-मिलिंदची! घरातून आणि ऑफिसमधून परमिट्स मिळवलेली. पाठपिशव्या तीन दिवसांच्या शिध्याने फुगलेल्या. आणि, सुरू झाला ट्रेकआधीचा मध्यरात्रीचा पुणे - नाशिक प्रवास. हा रस्ता नेहेमीच अनप्रेडिक्टेबल असुरक्षित वाटतो. रस्त्याची अर्धवट कामे, जड संथ वाहतुकीतून रेसचा खेळ खेळणारे बेफाम चालक, उलट दिशेने चालणारी वाहतुक आणि सूचनेशिवाय अचानक बदलणाऱ्या लेन्स, वगैरे. असो. नेहेमीच्या ढाब्यातलं दोन घास जास्तच जेवण आणि पान, गाडीतली मन्ना डे-गीता दत्त-किशोरची गाणी, नेहेमीचे मसाला दूध-चहा थांबे आणि कधीच कंटाळवाण्या न होणाऱ्या ट्रेकच्या अखंड गप्पा यामुळे प्रवास सुसह्य झाला. नाशिकला पहाटे ३ ला गाडी टच केली. तासभर पडी मारून फ्रेश वाटलं.

ट्रेकच्या सुरुवातीची जागा (कांचना दुर्ग) आणि शेवटची जागा (सप्तश्रुंग दुर्ग) यांच्यामध्ये भरपूर अंतर असल्याने, नाशिकनंतरचा प्रवास एस.टी.ने करायचा होता. एस.टी. प्रवासात हमखास गंमती घडतात, अवली माणसं भेटतात. त्यादिवशी असंच काहीसं झालं. एस.टी. स्टॅन्डवर माझ्या पाठीवरच्या अजस्त्र सॅककडे कुतूहलाने बघत, एका दाद्याने मोबाईलमधून डोकं बाजूला करत विचारलंच, 'क्यों भय्या कहां चले ट्रॅकिंगको?(म्हणजे ट्रेकिंग)'. आम्ही मात्र मराठीत 'डोंगर चढून सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनाला' म्हटल्यावर, कुठून येडे येतात असे भाव करत, 'आरं गाडी जाते की पण वर गडावर थेट. उगा कश्यापारी वणवण!' वगैरे नेहेमीचे संवाद झाले. आणि त्याचा इंटरेस्ट संपला. एसटीला जरा वेळ होता, तेंव्हा म्हणलं 'सुलभ' उरकून घेऊ. तिथे गेलो, तर टेबल थाटून बसलेले काका तमाखूचा तोबरा आवरत म्हटले, 'सॉट रुपये परहेड''. झाली का पंचाईत - ट्रेकमध्ये 'सुलभ'साठी तब्बल सा-ठ रुपये देणे अजिबातच 'सुलभ' वाटेना. आमचं कन्फ्युजन/डिस्कशन बघून सुलभ-काकांनी त्रागा करत, भिंतीवर तमाखूची जोरदार पिंक टाकत तोंड मोकळं केलं आणि 'सा-ठ नहीं. सा -त रुपया... आ जाओ' असा खुलासा केला. ट्रेकमध्ये खिदळायला आम्हांला अजून एक किस्सा मिळालेला... हाहा!!!

... डेपोमधून लपेटदार वळण घेत एण्ट्री झाली - पहाटे साडेपाचच्या सटाणे गाडीची. सुस्साट वेगाने धुळे हायवेवरून जात, सोग्रस फाट्यावरून वळण्याआधी पहाटेच्या मंद प्रकाशात डावीकडे सातमाळची डोंगररांग जाणवू लागली. भावडबारी घाटाअलिकडे खेळदरी फाट्याला बस थांबली. तीन दिवसांच्या सातमाळ रांगेच्या डोंगरयात्रेला सज्ज झालो. वेळ सकाळचे ७:३०.

     
दुर्ग कांचनची चढाई
पहिल्या दिवशी कांचनदुर्गाचे दर्शन घेऊन, डोंगरयात्रा करत धोडपदुर्गावर पोहोचणं, अशी मजबूत चाल होती. खेळदरीमधून कांचनच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्त्यावरून तासभर चाल होती. दुतर्फा हागिणदरी. झपझप निघावंच लागलं. गाव मागे पडल्यावर मात्र शेताडीतून येणारी मोकळी हवा, ढगात हरवलेल्या कांचनचं आणि पूर्वेला उजवीकडच्या बाफ़ळ्या डोंगराच्या दृश्याने तरतरी आली. शाळकरी मुलं-मुली सायकलवर निघालेली. पोळ्याच्यावेळी बैलांवर झोकात रंगवलेलं ‘सैराट’-‘झिंगाट’ बघून हसू फुटलं. कुठेशी आंघोळीच्या पाण्याचे बंब पेटलेले, तर कोणी आजा शेरडं घेऊन रानात निघालेला. बाकी सगळं निवांत. छोट्याश्या 'पुरी' गावातलं चहा-जेवणाचं आमंत्रण कसंबसं टाळलं. उजवीकडचा कच्चा रस्ता कांचनकडे घेऊन निघाला. समोर डोंगर कोवळ्या उन्हात लख्ख चमकत होते – जणू आडवी चवड रचल्यासारखे. त्यांचे कातळमाथे मात्र अजूनही परतीच्या मान्सूनच्या काळ्या-करड्या विखुरलेल्या ढगात हरवलेले. भरारा वारं आलं आणि फड्या निवडुंगाच्या रानामागे ढगांच्या पसाऱ्यातून कांचनाच्या माथ्याचं दर्शन झालं.


पश्चिमेला हंड्या आणि लेकुरवाळी डोंगराचे माथे डोकावले. आमचं आजचं गंतव्य असलेला धोडप अजून मात्र दिसलाही नव्हता. समोर राखाडी डोंगरउतारांवर विखुरलेली अगदीच तुरळक झुडुपं. निळ्याभोर आभाळात झपाट्याने पसरणारे आणि विखुरणारे करडे ढग कांचनाच्या माथ्याशी लपाछपी खेळत होते. शिवपिंडीसारखा भासणारा उजवीकडचा (पूर्वेचा) मंचन दुर्ग, तर डावीकडचा कांचन दुर्ग.


गडावर पोहोचण्यासाठी कांचन-मंचन खिंडीकडे चढाई सुरु केली. वेळ सकाळचे ८:१५. मंचनकडून येणाऱ्या डोंगरसोंडेवर आरुढ होऊन, पुढे खिंडीपाशी चढून माथा गाठायचा होता. दुरून साजिऱ्या दिसणाऱ्या डोंगराची उंची थोडकी वाटलेली, पण भरभक्कम सॅक्स आणि उभ्या चढाईमुळे घामटं निघालेलं. थोडी वाकडी वाट करुन, पदरातून आडवं जात देवीचं उद्ध्वस्थ राऊळ गाठलं. जुने कोरीव खांब आणि शिल्पे कशीबशी रचून चुना फासलेला.


एव्हाना निळ्या आभाळात घुसलेला कातळमाथा खुणावू लागलेला. डोंगरउतार मुरमाड आणि रखरखीत. एकंचएक मळलेली वाट नाही, तर झुडुपांमधून घसाऱ्यातून घुसत जाणाऱ्या शेरड्यांनी तुडवलेल्या वाटांची नक्षी होती.

       
पायथ्यापासून दीड तासांच्या चढाई झालेली. खिंडीच्या अलिकडे उजवीकडे कातळाच्या पोटातल्या मोठ्ठया गुहेने लक्ष वेधलं. गडांवर शेजारी-शेजारी खोदलेले टाकी-समूह पाहिले असतात, पण इथे आहे गुहेच्या पोटात खोदलेला सात-आठ टाक्यांचा समूह. आजमितीस हाच काय तो गडावरचा थोडका आडोसा. मुक्कामासाठी पुरेशी सपाटी नाही, पण पाणी मात्र गारेगार.

     
खिंडीतून उजवीकडे गडाच्या पूर्व माथ्याची (मंचन) चढाई सुरु झाली. कातळ-निवडुंगांमधून बारीक रुंदीच्या उभ्या चढणीवर बारीक पावठ्या चढत मंचनच्या माथ्यावर पोहोचलो. चिंचोळ्या सपाटीपल्याड २० मी उंचीचा सुळका अभेद्य वाटत होता. पूर्वेला लांबवर चांदवडच्या तालेवार दुर्गडोंगरांवर कृष्णमेघांमधून कोवळी सूर्यकिरणे झिरपत होती.


तर पश्चिमेला सातमाळ रांगेतल्या एकापाठोपाठ उगवलेल्या दुर्ग-शिखरांचं दृश्य भारावून टाकत होतं. भर्राट वारा आला. सोनेरी उन्हात गवताळ माथ्यावर सोनकीची फुलं लुकलुकू लागली आणि पाण्याच्या जोड-टाक्यांमध्ये तरंगांची नक्षी उमटू लागली.

कातळातल्या पावठ्या सावकाश उतरून, खिंडीतून पुढे कातळभिंतीला वळसा घालून, गडाच्या पश्चिम भागावर (कांचन) पोहोचलो. तटबंदीतल्या उध्वस्थ द्वारातून गडाच्या माथ्यावर प्रवेश करण्याआधी, कातळावर खोदलेल्या मारुतीबाप्पाला वंदन केलं.


अरुंद माथ्यावर कातळाच्या पोटात खोडलेलं खांबटाकं, जोती, कातळात एका रांगेत खोदलेले असंख्य खळगे बारकाईने न्याहाळलं.



     
दरीत वसलेल्या वाड्या-वस्त्या, हिरव्यागार डोंगरउतारांवर विखुरलेली शेरडं आणि ढगांशी लपाछपी खेळणारे दुर्ग-डोंगर माथे, अश्या आसमंतात हरवून गेलो. वेळ सकाळचे ११.

कांचन ते धोडपची लांबच लांब डोंगरयात्रा 
सातमाळ डोंगरयात्रेतल्या पहिल्या दुर्गाचा निरोप घ्यायची वेळ आलेली. एव्हाना कांचनमाथा ढगात गुरफटू लागलेला. एका क्षणात ढगात हरवलाच जणू. गडाच्या खिंडीतून उत्तरेकडे पदरावर उतरलो. धोंडयांमधून-झुडुपांमधून-भारंगीच्या रानातून पश्चिमेला पठार तुडवत गेलो. पाण्याचं छोटुसं टाकं बाजूला ठेवत पठाराच्या टोकाशी पोहोचल्यावर खोलवर दर्शन झालं - 'कांचनबारी'चं. बारी म्हणजे खिंड. उभ्या घसाऱ्यावरून आणि सोप्या कातळटप्प्यांवरून काळजीपूर्वक उतराई केली. कातळाकडे तोंड करून उतरताना पाठीवरच्या सॅक्स हेलकावे घेऊ लागलेल्या. कातळात तासून काढलेल्या पावठ्यांची मदत घेत आधी ट्रेकर्स आणि मग सॅक्स उतरवल्या.


कातळ-घसाऱ्यावरची आमची धांदल बघून बारीतला गुराखी आजा धुम्म खिदळत होता. त्याला कल्पनाही नव्हती, इतिहासाचं एक सोनेरी पान इथेच आपल्या पूर्वजांनी लिहिलंय. इ.स. १६७० ला सुरतेची लूट स्वराज्यात घेऊन येणाऱ्या शिवाजीमहाराजांना थोपवण्यासाठी मोघली सरदार दाऊदखान चालून आला होता. कांचनबारीच्या लढाईत राजांनी मोघली सेनेचा दारुण पराभव केला आणि ३००० मोघल गर्दीस मिळवले. आजमितीला इथे मात्र असतो संथनिवांत वातावरण, राखाडी-मुरमाड डोंगरचढउतार आणि भर्राट वारा!
         
दुपारचे १२:३० झालेले. कांचनबारीतून पुढे उभा चढ चढताना लय धाप लागलेली. पठारावर हंड्या डोंगराच्या कुशीत पोहोचताना, पावसाची झिम्मड उडालेली. आलेला पाऊस लवकरच निवळला. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर हंड्या डोंगराच्या कातळपोटात कोण्या देवीचं ठाणं, चरणाऱ्या गायी आणि हिरवेगार डोंगरउतार निरखत उदरभरण आणि वामकुक्षी संपन्न झाली. सातमाळरांगेवरून पश्चिमेला जात, हंड्या-लेकुरवाळी डोंगरांना डावीकडून वळसा घालत निघालो.


पठारावर कुठेकुठे साठलेल्या तळ्यात म्हशी निवांत डुंबत बसलेल्या. म्हसरांनी केलेल्या चिखलराड्याला टाळून जाणं शक्यच नव्हतं. चिकचिकाट आणि घमघमाटाच्या त्या चिखल-चॉकलेट फॅक्टरीतून कसंबसं बाहेर पडलो. निळं आभाळ, तुरळक ढग आणि क्षितिजापर्यंत पसरलेल्या सातमाळ रांगेवरून लांबचलांब चाल.

चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आलेली, पण मुक्कामाच्या धोडपकिल्ल्याचं दर्शनही झालं नव्हतं. जिरे-युक्त कोकम सरबत पिऊन पुढं निघालो.

लेकूरवाळी पठारापल्याड डोंगराच्या मानेवरून आडवी धम्माल वाट होती. झुडुपांमधून भव्य इखारा सुळका-डोंगराचं दर्शन घडू लागलेले. इखारा पठारावर पोहोचण्यासाठी पुन्हा एक चढ, पुन्हा चिखलातून आडवी वाट पार केली.


इखारा आश्रमापासून दूरवर दर्शन झाले धोडप किल्ल्याचे. ढगांशी खेळणारा धोडपचा कातळमाथा पाहून थबकलोच. यंत्रवत आडवी चाल, पाठीवरची बोजी आणि पायांचे ब्लिस्टर्स यांची बोचणी लागेना. धोडपच्या दर्शनानेच उत्साह संचारलेला. वेळ दुपारचे ४.


दुर्ग धोडपची चढाई 
पायथ्याच्या हत्ती गावाकडून येणारी वाट पठारावर भेटली. घाणेरीच्या रंगबेरंगी फुलांच्या नक्षीमागे, धोडपच्या घेऱ्यातली तटबंदी, पल्लेदार बुरुज आणि ढगांना बिलगलेला कातळमाथा मोहक दिसत होते.

पठारावरच्या तळ्यात पोरांची धम्माल मजा चाललेली. भरभक्कम तटबंदी, कमानयुक्त द्वार, मारुती आणि शिलालेख दर्शन घेऊन घेऱ्यातल्या सोनारवाडीपाशी पोहोचलो.


ढग आणि सूर्यकिरणांचा खेळ चाललेला. कातळमाथ्याला धडकून ढगांच्या लाटा फुटत होत्या, दणदण निसटत होत्या. वाऱ्याच्या फुफाट्याने ढग उधळले आणि बालेकिल्ल्याचं रुपडं उलगडलं. ढगाळ आभाळाची पार्श्वभूमी आणि पायथ्याचं पोपटीहिरवं झुडूपी रान यांच्यामध्ये उठून दिसणारं धोडपच्या डाईकचं रौद्र सौंदर्य, डाईकच्या कातळाला छेदणारी करकरीत खाच आणि माथ्यावरचा शेंडीस्वरूप अष्मस्तंभ (वोल्कॅनिक प्लग).


कातळकड्यातल्या जुन्या पावठ्यांशेजारी नवीन लोखंडी रेलिंगचे ठिगळ पार करून द्वारापाशी पोहोचलो. पहिल्या दिवसाची चाल तब्बल ११ तासांची आणि २० किमीची झालेली. कातळशेंडीच्या पोटातल्या गुहेत मुक्काम होता. बाहेर कधी वाऱ्याचा तडाखा, तर कधी पावसाची झिमझिम चाललेली. गुहेत दिवसभरच्या दमदार ट्रेकच्या गप्पा रंगलेल्या. गुहेतल्या उपद्रवी बेडर उंदरांकडे दुर्लक्ष करणं अवघड होतं. वाऱ्यासोबत स्टोव्हचा प्रकाश गुहेच्या भिंतीवर थरथरत होता. गरमागरम भात-रस्सा ओरपून, पोटातले कावळे सुखावले. थंडीने हुडहुडी भरलेली. स्लिपींगबॅगच्या ऊबेमुळे गप्पा उणावल्या आणि ट्रेकर्सच्या घोरण्याने गुहा लवकरच दणाणून गेली.

धोडपची नितांतसुंदर सकाळ
दुसऱ्या दिवशी उजाडण्याआधी दर्जेदार आलं-गवती चहायुक्त चहाच्या मगने, हात शेकत गुहेबाहेर डोकावलो. गुहेतली ऊब सोडून बाहेर आल्यावर, ढगांच्या गारेगार लाटा अंगावर धडकू लागल्या. जर्किन असूनही अंगावर सर्रकन काटा आला. ढगांचा स्पर्श, अंधारात पिठूर ढगांवर हेडटॉर्चचा विखुरणारा प्रकाश, पाण्याने ओथंबून एका लयीत डोलणारं गवत आणि मधूनच एखादा ढग विरळ झाला की दूरवरून दरीतून घुमत येणारे दिव्यांचे तारे - सारंच स्वप्नवत!

उजाडल्यावर उत्सुकता लागली होती निसर्गाविष्कार असलेली 'डाईक' बघण्याची. डाईक म्हणजे लाखो वर्षांपूर्वी सह्याद्रीची उत्पत्ती होताना, लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे तयार झालेली बेसॉल्ट कातळाची भिंत. मुक्कामाच्या गुहेपासून पश्चिमेला लगेचच डाईकची सुरुवात झाली. ढगांचे लोट धडकत होते आणि धोडपची शेंडी - वोल्कॅनिक प्लग अष्मरचना आपल्याच धुंदीत हरवलेली. थंडावत जाणाऱ्या लाव्हारसाने विशेष अदाकारी दाखवत, ५०० मी लांब-५० मी उंच, पण जेमतेम १० मी रुंदीची पातळ कातळपट्टी-डाईक बनवली होती. डाईकच्या कातळात मध्यभागी होती वैशिष्ट्यपूर्ण खाच.


गुहेतला मुक्काम आवरला. वेळ सकाळचे ७:३०. मेघसरींनी काळ्याकभिन्न कातळमाथ्यावर आणि मुरमाड उतारांवर लुसलुशीत गवताची नक्षी फुलवलेली. उभ्या-आडव्या-तिरक्या वाऱ्याच्या झोतावर गवताचे ताटवे झुलत होते. दुतर्फ़ा तेरड्याची झुडुपं तरारलेली, पाण्याने निथळत होती, वाऱ्यावर एकलयीत डोलत होती. पाऊस नसला, तरी वाऱ्यावर बारीक जलतुषार उधळलेले. पुस्तकात उल्लेख असलेल्या जुन्या वास्तू-तोफ कुठेशी गवतात हरवून गेलेल्या. पण, तटबंदीखाली तासून काढलेला तिरका कातळकडा, अजस्त्र आकाराचे दोन फारसी शिलालेख आणि रानफ़ुलांमध्ये रमलेली द्वारे बघून आम्ही धोडपच्या प्रेमात पडलेलो.



     
शिडीपासून समोर पसरलं होतं अफलातून दृश्य. दरीमध्ये हलक्या विखुरलेल्या ढगांच्या लाटा उसळत होत्या. कुठे दिसत होते उदंड पावसामुळे तुडुंब भरलेले पाझर तलाव, तर कुठे दिसत होती हिरव्या रंगाच्या नानाविध रंगाछटा ल्यालेली शेतंशिवारं. आसमंत असा चैतन्यमय झालेला.


धोडपवरून रवळ्या-जवळ्याकडे डोंगरयात्रा
पायऱ्यांची खोल विहीर, समाधी आणि गणपती-शिवमंदिर न्याहाळत धोडपमाचीच्या घेऱ्यातून पश्चिमेला आडवं निघालो. सोंडेसारख्या पाकळीची चक्क हालचाल करून कीटक भक्षणारे हळुंदा फूल लक्षवेधक होते.

फरसबंदी वाटेवरुन पुढे उद्ध्वस्थ द्वारापाशी आणि पल्याडच्या वस्तीपाशी पोहोचलो. शाकारलेला झाप, कोवळं गवत शोधत निघालेले गाई-घोडे, आंब्याच्या डवरलेल्या झाडामागे ढगात हरवलेली धोडपची शेंडी असा सुंदर पॅनोरमा डोळ्यात साठवला.

धोडपच्या पठारावरून सातमाळ डोंगररांगेवरुन रवळ्या-जवळ्या दुर्गांपाशी थेट जाणारी वाट लांबून वळणे घेणारी आणि अडचणीची आहे. त्यामुळे, पश्चिमेला खोऱ्यात उतरून वडाळी भोई गावातून परत सातमाळ डोंगररांगेवर चढाई करायची होती. धोडप पठारावरच्या भातराशीसारख्या दोन टेकड्या आणि लगतच्या विजेच्या टॉवरपासून समोर खोलवर दरीचं दर्शन झालं. दरीकडे पाहताना एकमेकांत गुंतत गेलेले डोंगर दांड, ढग-ऊन-सावलीचा खेळ आणि रानवा दीठी सुखावून गेला. दरीच्या डावीकडून कातळावरून आणि निवडुंगांमधून आडवी जाणारी वाट होती. एक मावशी रानातली फुलं निवडण्यात गर्क होत्या. 'ही आमच्या डोंगरतली जाईमोर भाजी, कळवणच्या बाजारात न्हेऊन विकणार' असं मावशींनी सांगितलं. 'आता मोखाड्याच्या वाटेनं उतरणार व्हयं! निघा बिंगी बिंगी'... वेळ ९:१५.
               
समोर दरीमध्ये विखुरलेलं वडाळी भोई गाव आणि ढगांशी लपाछपी खेळणारे रवळ्या-जवळ्या-मार्कंड्या दुर्ग असं दृश्य न्याहाळत, निवांत सोंडेवरून लांबच लांब उतरणाऱ्या मोखाड्याच्या वळणवाटेने कूच केलं. दुतर्फा टपोऱ्या निळ्या-जांभळ्या फुलांची कारवी फुललेली. पल्याड, घाणेरीच्या रंगीबेरंगी बारीक फुलांच्या सड्यामधून उतरणारी वाट शेताडीत पोहोचली. भुरभुरणारा हलका पाऊस सुखावत होता.

वडाळी भोई गावात ‘प्रभू बागुल’ यांच्या घरी चहाचा आग्रह मोडवेना. 'शिवाजीराजांनी आम्हांला हा गड-मुलुख दिलाय राखायला. म्हणून, आम्ही हा गाव सोडून कधीच कोठे जाऊ शकत नाही'. काय म्हणावे या श्रद्धेला!राजांच्या साध्या माणसांच्या अगत्याने आम्ही भारावून गेलेलो. वेळ ११:३०.

कारवीमधून रवळ्या-जवळ्याची चढाई
वडाळी भोई गावातून नैऋत्येला जवळ्या दुर्गाची कातळटोपी आणि बाजूला पसरलेल्या तवा डोंगराची खिंड खुणावत होती. शेताडीतून बाहेर पडून तवा डोंगराला बिलगलेली निवांत वळसे घेणारी वाट चढू लागलो. पाण्याची नक्षत्रे उरी साठवलेल्या कारवीच्या स्वर्गीय फुलांचे घोस दुतर्फा बहरलेले.


ओलसर मातीच्या वाटेवर कारवीच्या फुलांचा सडा शिंपलेला. आपल्या पावलांनी फुलं तुडवली जाणार नाहीत ना, याची काळजी घेत चढाई चालू होती. दर दोन मिनिटांनी थबकून, धोडपपासून चालून आलेल्या खोऱ्याचं दृश्य उरी साठवून घेत होतो.


जवळ्यादुर्ग आणि तवा डोंगराच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीतून पल्याड भणाणणारा वारा आणि रानफुलांसोबत रवळ्या-मार्कंड्या दुर्गांचं सुरेख निसर्गदृश्य सामोरं आलं. वेळ १२:३०.
       
विनंती न करताच एक लाकूडतोडे मामा वाट दाखवण्यासाठी आमच्यासोबत निघाले. खिंडीतून रवळ्या-जवळ्या पठाराची उंची गाठण्याआधी २० मी उंचीच्या उभ्या कातळकड्याने वाट अडवली. पाठीवरच्या बोज्यांमुळे काळजीपूर्वक हालचाली केल्या. उंचच उंच होल्ड्स घेत सोप्या श्रेणीचा कातळटप्पा पार केला आणि पठार गाठलं.


खोदीव पाण्याच्या टाक्यापाशी शिवपिंडीलगत वाहत्या झऱ्याचा खळखळाट चालू होता. उदरभरणासाठी इतकी सुंदर जागा कधी सापडणार! पॅकलंचनंतर झऱ्याचं थंड पाणी पिऊन मस्त ढेकर दिली. वेळ १.


अडचणीच्या वाटेचा, पण ऐतिहासिक वारशाचा जवळ्या
निवडुंगाआड सॅक्स दडवून, जवळ्या दुर्गाच्या चढाईस निघालो. दुर्गाच्या माथ्यापासच्या २० मी उंचीच्या कातळपट्टीमधून वाट कशी चढेल, याची उत्सुकता लागलेली.

गडाच्या उत्तर नाकापाशी झाडीभरला चढ चढून उजवीकडून कातळमार्ग होता. राखाडी कातळातल्या अर्धवट पायऱ्या आणि डुगडुगणाऱ्या दगडांवरच्या निसटत्या आडव्या वाटेवरून चढाई करत अगदी सावकाश गेलो.

पुढे उभ्या पायऱ्या चढल्यावर कातळात खोदून काढलेला भुयारी मार्ग आणि गडाचे कातळात खोदलेलं द्वार दृष्टीक्षेपात आलं.

इतिहासाच्या पानात 'रोला-जोला' उल्लेख केलेले हे दुर्ग मोघल-मराठे-इंग्रजांच्या ताब्यात होते. हे ठेवणीतले दुर्ग नाहीत, तर आहेत झुंजवलेले दुर्ग. इतिहासाच्या त्रोटक नोंदींचे वाचन करत, द्वारापाशी थबकलो. फारशी भाषेतल्या भव्य शिलालेखाला स्पर्श केला आणि हरवलेल्या इतिहासाची स्पंदने जोखायचा प्रयत्न केला.
         
भुयारी मार्गातून दुर्गमाथ्याजवळची थोडकी तटबंदी डोकावली आणि माथ्याकडे निघालो. गवताळ माळावर दोन-चार पाण्याची टाकी दडलेली. नितळ पाण्यात वाऱ्यासोबत येणाऱ्या हलक्या लाटांसोबत जणू प्रतिबिंबातल्या आभाळावर तरंग उमटत होते.


बाकी असतीलही काही जोती-अवशेष गडावर, पण आता सगळंच हरवलंय माजलेल्या गच्च हिरव्यागार गवतात. उत्तर टोकावरच्या एकांड्या ताशीव खांबापाशी पूर्वी कदाचित अजून एखादं द्वार असेल का, असं वाटलं. चौफेर सातमाळ रांगेतल्या सवंगडी डोंगर-दुर्गांचे दृश्य सुरेख.


थोडकी उतराई करून, उजवीकडे जाणाऱ्या वाटेने जाऊन गडमाथ्याच्या उत्तरेकडे कातळाच्या पोटात खोदलेले विशाल पाण्याचे टाके न्याहाळले. परतीच्या उतराईमध्ये भुयारी प्रवेशद्वारापासून गडाचा कातळमार्ग उतरताना विशेष काळजी घ्यावी लागली.


बुळबुळीत पायऱ्यांवरून जाताना कधी बाजूच्या कातळभिंतीला बिलगून उतरलो. डुगडुगणाऱ्या चिपांवर विश्वास ठेवणं अवघड होतं.


गडाच्या पदरात आल्यावर उजवीकडे कातळाच्या पोटात खोदत नेलेले अजून एक विशाल टाके गवसले.


जवळ्या दुर्गाची अशी प्रसन्न भेट झालेली. आता वेळ होती त्याचा जोडीदार रवळ्या दुर्गाकडे जायची. वेळ २:३०.

रवळ्या दुर्गाच्या चढाईचा थरार
जवळ्या दुर्गाला डावीकडे ठेवत पठारावरून रवळ्या-जवळ्या खिंडीकडे निघालो. जवळ्याच्या पश्चिम कातळात अर्धवट खोदाई सुरु करून सोडून दिलेल्या गुहालेण्याने लक्ष वेधून घेतलं.




खिंडीतल्या सपाटीवर तिवारीवस्तीपाशी सॅक्स टेकवल्या. तिवारीवस्ती म्हणजे, 'अल्याड रवळ्या - पल्याड जवळ्या आणि मध्ये वस्तीवर रवंथ करतात ढवळ्या-पवळ्या', असं शीघ्रकाव्य बनवलं. दोन-चार साधे झाप, गाईगुरं, पल्याड पाण्याची तुडुंब भरलेली टाकी. तिवारीवस्तीपासून आता रवळ्यादुर्गाच्या भेटीचे वेध लागलेले. कललेल्या दुपारच्या वेळी अवाढव्य ढगांच्या उगा गडगड बाता मारणं चाललेलं. पश्चिमेला ढगांच्या सावलीत किंचित झाकोळून गेलेले रवळ्या दुर्गाचे झाडीभरलेले उतार, कातळमाथा आणि माथ्यावरचं गवताळ पठार खुणावत होते. पायथ्याच्या भगव्या झेंड्याच्या शेजारून वाट रानात शिरली. गोलाकार कातळाच्या पोटापाशी पोहोचलो. वळणावर कातळाच्या पोटात चौकोनी आकाराचे खोल विवर खोदलेलं. गडाच्या वाटेवर पहारा देताना पावसा-पाण्याच्या वेळी आडोसा म्हणून कोण्या मावळ्याने आसरा घेतला असेल या मेटावर.


वळणावरच्या निसटत्या वाटेनंतर उभ्या आणि अरुंद कपारीतून २० फूट चढाई होती. कातळारोहणातल्या 'चिमणी' पद्धतीने - म्हणजे कपारीच्या एका भिंतीला पाठ टेकवून समोरच्या भिंतीला बूट टेकवून स्वतःला अडकवायचं आणि कपारीतून वर सरकायचं - अशी अवघड नाही, पण धम्माल चढाई होती.

कपार चिमणीचढाईनंतर २५ फुटी कड्याने वाट अडवली. माथ्यावर थोडकी तटबंदी होती. दृष्टीभय नाहीच, पण बऱ्यापैकी गुळगुळीत असलेला कातळ चढून जाणं सरळसोपं नव्हतं. दोन-चार होल्ड्स घेऊन निम्मी ऊंची गाठल्यानंतर खरी गंमत सुरू झाली. माथ्यापाशी एका बोल्टला २ फुटी दोरखंड अडकवलेला. त्याला धरून डावीकडे तिरका झोका घेत तो-तिथला-वरचा पिंचहोल्ड मानसिक आधारासाठी पकडायचा आणि मुख्यत: पायांच्या घर्षणाच्या आधारे तिरक्या कातळावरुन झटकन चढून जायचं, हे कर्म सोपेसरळ नव्हते. आम्हां ट्रेकर्सची धडधड-खटपट-झटापट झाली. ऍक्शन ट्रेकर बुटांच्या सोलच्या घर्षणावर विश्वास ठेवत कसंबसं कातळटप्पा चढून गेलो.


तिवारीवस्तीतल्या बायाबापड्या कमरेला पदर खोचून कडा यंगून जातात, हे ऐकून थक्क झालो. गडावर गुराखी लोकांनी 'लयं झ्याक युगत' केलेली. वाय आकाराची मोट्ठी गलोल असावी अश्या लाकडांना रोवून गडावरुन थेट पायथ्याच्या पदरातल्या झाडाला तार बांधलेली. गडाच्या माथ्यावर गुरांना येणं शक्य नसल्याने, माथ्यावरच्या लुसलुशीत गवताच्या पेंढ्या बांधायच्या आणि तारेवरुन टायरोलीन ट्रॅव्हर्स पद्धतीने गडाखाली पाठवायची - अशी जुगाड युक्ती केलेली.

वाऱ्याच्या झोतासोबत गडाच्या तिरपांड्या माथ्यावरचं गवत सळसळत होतं. निळ्या आभाळात विखुरलेल्या ढगांच्या चुकार सावल्या जवळ्या दुर्गावर पसरलेल्या – जणू हिरव्यागार गालिचावरची सोंगटी.


पठारावर पाण्याच्या टाक्याजवळ निवांत गप्पाष्टक रंगलं. कातळावर प्रेम करणाऱ्या कोण्या रसिक राजाने सातमाळच्या डोंगर-दगडांमध्ये दुर्ग कसे वसवले असतील, पाथरवटांनी हुशारीने जागा हेरून टाकी खोदून पाण्याची आणि स्थापत्यासाठी दगडाची सोय कशी केली असेल. खरंच, त्या शंखनितळ पाण्याने आपल्या उदरात किती कथा दडवल्या असतील.

 
रवळ्याला निरोप द्यायची वेळ झालेली. रॉकपॅच उतरण्याची कसरत-खटपट केली. कपार उतराई करताना चिमणी-उतराई पोसिशनमध्ये यायला थोडी खटपट झाली, पण पाठ-बुटांना भक्कम आधार मिळाल्याचं जाणवल्यावर कपार झपझप उतरून गेलो. तिवारीवस्तीत विसावलो. घर आणि गोठा एकत्रच. अवीट चवीचा रवाळ खवा बांधून घेतला. अफलातून बासुंदी चहासोबत गप्पा रंगल्या.


रवळ्या-जवळ्यापासून मार्कंडयाची डोंगरयात्रा
उन्हं कलू लागलेली. रानोमाळ विखुरलेल्या गाई-गुरांना घरी आणण्यासाठी गुराख्यांची लगबग सुरु झालेली. आम्हीही पाठीवर सॅक्स चढवल्या. मुक्कामासाठी भरपूर चाल-उतराई-चढाई करुन पल्याड मार्कंड्या दुर्गापाशी पोहोचायचं होतं. संध्याकाळचे ५. झाडीभरल्या पदरातून उंचावलेल्या रवळ्यागडाच्या डावीकडून आडवं जात पश्चिमेला निघालो.


गुरं सैराट भटकायला जाऊ नये, म्हणून वाटेवर बाभळीच्या काट्यांचे जंजाळ पसरलेले. पाठीवरची सॅक सावरत त्यातून कसंबसं पलिकडे गेलो. माळरानाच्या हिरव्या गालिचावर सोनकीच्या नक्षीशेजारी, तळ्यात बेडकांचे सूर मारणे चाललेले. उंच-सखल टप्प्यांवरून वाटचाल करताना आणि ओल्या पाऊलवाटेवरुन वळणं घेताना, मावळतीच्या सूर्यकिरणांमुळे मार्कंड्याचे विलक्षण तेज:पुंज दर्शन घडत होते. दाटून आलेल्या घनांच्या पसाऱ्यातून निसटणाऱ्या सूर्यकिरणांनी डोंगरउतार उजळलेले.


दरीच्या काठावरून खोलवर मुलाणबारी/ बाबापूर खिंडीतून जाणारा डांबरी रस्ता, धारेवरून चढणारी मार्कंड्याची वाट आणि झाडीभरले डोंगरउतार असं दृश्य बघत बसलो. मुलाणबारीमध्ये भलतंच डेव्हलपमेंट काम चाललंय. 'निसर्ग पर्यटन क्षेत्र मार्कंडेय पर्वत' अश्या स्वागतकमानीपासून रेलिंग-पायऱ्या बांधलेली वाट सुरु झाली. वेळ ६:३०.

दिवसभराच्या चालीनंतर पायऱ्यांवरून चढाई करणं चांगलंच जीवावर आलेलं. दाट झाडोऱ्यातून घुमणारा मोरांचा केकारव आणि पाठीमागे रवळ्या-जवळ्या-धोडपच्या पॅनोरमा दृश्याने थोडका हुरुप आला.






गडाच्या पठारावर पोहोचेपर्यंत अंधारु लागलेलं. रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजात ढेपाळलेले ट्रेकर्स मान खाली घालून कसेबसे एकएक पाऊल टाकत निघालेले. अंधारात थोडंफार दिशाहीन भरकटणं व्हायलाच हवं. मिट्ट अंधारात गडाचा भव्य कातळकडा डावीकड़े ठेवत, गडाच्या पदरातल्या आश्रमापर्यंत पोहोचताना ट्रेकर्सच्या पेशन्सची अक्षरश: परीक्षा पाहिली गेली. आश्रमाबाहेर पत्राशेडखाली मुक्कामासाठी परवानगी मिळाली. ट्रेकच्या दुसऱ्या दिवशी धोडपच्या मुक्कामापासून निघून रवळ्या-जवळ्या दुर्गांना भेट देऊन, मार्कंड्याला पोहोचायला १२ तास आणि १९ किमीची डोंगरयात्रा झालेली. गर्रम रुचकर जेवण शिजवलं. दोन घास जेऊन घेतले. घोंघावणारा तुफान वारा क्षणाक्षणाला वाढत चाललेला, थंडीचा पारा गोठत चाललेला, आसमंतात काळा मिट्ट अंधार दाटलेला. स्लीपिंगबॅग्जमध्ये अधिकाधिक गुरफटून घेतोय. स्वप्नं पडताहेत - डोंगरदऱ्या, गिरिजन, कातळ, रानफुलं, ढग आणि सातमाळच्या वाटचालीची...

मार्कंड्यावरून सप्तश्रुंगचं उत्कट दर्शन
उजाडला ट्रेकचा तिसरा आणि शेवटचा दिवस. मार्कंड्या दुर्ग बघून, डोंगर उतराई-चढाई करुन सप्तश्रुंग दुर्गाची चढाई-उतराई करायची होती. किंचित उजाडू लागताच ढगांमध्ये गुरफटलेल्या गडाची चढाई सुरु केली. आश्रमामागे घळीतून चढणाऱ्या वाटेवरच्या नवीन-जुन्या राऊळांचं दर्शन घेत खिंडीत पोहोचलो. खिंडीच्या अलिकडे डावीकडे चौकोनी सरळ खोल खोदून कातळाच्या पोटात खोदत नेलेली गुहा वैशिष्ट्यपूर्ण होती. काहीजण याला ध्यानगुहा म्हणत असले, तरी हे गडाच्या पहाऱ्याचे मेट असणार, असं वाटलं.

खिंडीतून पल्याड सप्तश्रुंगगडाचं आणि मंदिराच्या कळसाचं दर्शन होणं अपेक्षित होतं, पण आसमंतात होतं फक्त ढगांचं साम्राज्य. उभ्या खोदीव पायऱ्या चढताना, चोहोबाजूंस तेरड्या झुडुपांच्या लाटा पसरलेल्या.


माथ्याच्या अलिकडे घुमटीखाली 'कमंडलू तीर्थ' टाके आणि एका ओळीतली पाण्याची ३ टाकी दिसली. मोघल - मराठे यांच्या राजवटीतला हा दुर्ग, पण पुराणकथांनुसार आदिशक्तीचे उपासक मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य असलेली जागा असल्याने, थोडकं तीर्थक्षेत्राचं रुप आलंय. सर्वोच्च माथ्यावर कडयाच्या टोकावर छोटंसं राऊळ. राऊळावर 'ओम चैतन्य मार्कंडेश्वराय नमः' लिहिलेलं. इथून मार्कंडेय ऋषींची केलेली पुराण-स्तोत्रं-प्रार्थना कान देऊन ऐकत असल्याने, समोरच्या डोंगरावरील सप्तश्रुंगदेवीची प्रतिमा किंचित झुकली आहे, असं म्हणतात. राऊळात मार्कंडेयऋषींच्या भव्य मूर्तीपुढे ‘शिव महाराज’ खड्या आवाजात देवीची कवने आळवत होते.

ढगांचे लोट धडकत होते. सप्तश्रुंगगडाचे-मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले नव्हते. वाऱ्याचा जोर वाढला, थंडीने गारठून गेलो. अन एके क्षणी वाऱ्याच्या झोतासोबत ढगाची दुलई उलगडली आणि सप्तश्रुंगीदेवीच्या देवळाच्या कळसाचं दर्शन घडलं. सातमाळट्रेकची वणवण करणाऱ्या ट्रेकर्सना जणू सह्याद्री आदिशक्तीचा संकेतच मिळाला. 'सौ बार काशी, एक बार मार्कंडऋषी' हे मनोमन पटलं. निसर्गदेवतांच्या अवीट अनुभूतीचा आनंद मनात साठवत गडाची उतराई सुरु केली.

मार्कंड्याच्या नाळेची अवघड वाट
मार्कंड्यागडाच्या पायथ्याच्या आश्रमात परत आलो. स्वामींचा निरोप-आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल सुरु केली.


गडाच्या पदरातल्या सपाटीवरून कातळमाथ्याला उजवीकडून वळसा घालत निघालो. जांभळ्या बरका(स्मिथिया) च्या फुलांचे गालिचे पसरलेले.


मार्कंड्याच्या उभ्या कातळमाथ्याला ढगांनी लपेटलेलं.


सप्तश्रुंगला जाण्यासाठी मार्कंड्या पठाराच्या उत्तरेला नाळेतून उतरणारी वाट धुंडाळायची होती. या नाळेतून उतरणं एरवी सोपं, पण पावसामुळे अडचणीचं झालेलं. गडगडणाऱ्या धोंडयांमधून ओढ्याचं पाणी धुम्म सुसाटलेलं. बुळबुळीत शेवाळलेल्या कातळावरून एकवेळ चढून जाणं ठीक, पण उतराई करणं धाडसाचं झालेलं.


अगदी सावकाश हालचाली करत, कातळाकडे तोंड करून हळुहळू एकेक पाऊल ठेवत, नाळेची १०० मी उतराई केल्यावर अक्षरश: हायसं वाटलं. पाय हुळहुळू लागलेले. वाजले होते ११. दरीतून घुमत येणाऱ्या वाऱ्यासोबत कसलासा मोहक गंध आसमंतात पसरलेला. दगडावर विश्रांती घ्यायला निमित्त हवंच होतं. खजूर-राजगिरा वडीचा खुराक घेतला.

आता ओढयातून उतराई सोडून, डावीकडे निसटत्या तिरक्या कातळावरून वीस मिनिटं धम्माल आडवी वाट होती. गच्च फुललेल्या तेरड्याच्या डोलणाऱ्या झुडुपांमधून फारशी मळली नसलेली वाट होती.


आडवी वाट संपल्यावर धारेवर आलो. झाडीभरल्या टप्प्यांवरून उतराई करताना, सोप्या कातळटप्प्यांची कोडी सोडवून पोहोचलो मार्कंड्या-सप्तश्रुंग खिंडीत. खिंडीत आदिवासी भाविकांनी वाघदेव पुजलेला. उभ्या उंच लाकडी ओंडक्यांवर चंद्र-सूर्य-वाघरु अश्या निसर्गदेवतांना कोरलेलं.


कातळधारेवरची उभी चढाई करताना, ठिकठिकाणी पावठ्या खोदलेल्या असल्याने चढाई सोपी होती. पाठीमागे मार्कंड्याचा पहाड विलक्षण देखणा दिसत होता.

तर समोर रानफुलांमागे गडाचे शिखर-मंदिराचा कळस खुणावत होता. वेध लागलेले गाठायचे. कातळाच्या पोटातल्या आडव्या वाटेनंतर खोदलेल्या पायऱ्यांची साखळी सुरु झाली.
         



सप्तश्रुंगीगडाचं पठार गाठलं. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या आईसमोर नतमस्तक  झालो. शेंदूरचर्चित भव्य सप्तश्रुंगी आईचं मनोहारी रुप डोळ्यात साठवलं. सातमाळेची तीन दिवस दुर्ग-डोंगरयात्रा करून, आदिशक्तीच्या भक्तीचा आणि शिवसह्याद्रीच्या शक्तीचा सप्तश्रुंगीगड गाठणे, हा किती सुरेख योग!
     
सप्तश्रुंगगडाचा थक्क करणारा ऐतिहासिक वारसा
पौराणिक-धार्मिक-ऐतिहासिक संदर्भ बरेच असले, तरी आधुनिकीकरणामुळे गडाचं गडपण शोधावंच लागतं. इंधनगाडीने घरी निघण्यापेक्षा चंडिकापूर-वणी बाजूला उतरणारी ऐतिहासिक डोंगरवाट खुणावत होती. गडाच्या नैऋत्येला निघालो. पाण्याचं बांधीव तळे आणि खोदीव टाक्यापासून सप्तश्रुंगच्या कड्यांचे रौद्र दर्शन घडले.


कड्यावरच्या गणेशमंदिरापाशी एक आश्चर्य आमची वाट बघत होतं.


उतराईच्या वाटेवर कातळात खोदलेल्या तब्बल पावणेचारशे उंच-देखण्या पायऱ्या आणि ठिकठिकाणी कोरलेले चक्क पाच शिलालेख.


खंडेराव दाभाड्याची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी १७१० साली काही पायऱ्या आणि नाशिकचे कोन्हेर, रुद्राजी व कृष्णाजी यांनी १७६८-९९ मध्ये उर्वरित पायऱ्या खोदवल्या, अश्या उल्लेखाचे एक संस्कृत व ४ मराठी शिलालेख आहेत.



लख्ख सफाईदार खोदाईच्या पायऱ्या उतरताना, उभ्या उतराईने पाय-गुडघे बोलू लागलेले.


सप्तश्रुंगगड अतिपरिचित असतो, पण त्याचं दुर्ग-पण उलगडणाऱ्या उभ्या अप्रतिम पायऱ्या, रेखीव कातळजिना आणि शिलालेख पाहून निव्वळ थक्क झालेलो.




पायथ्याशी सप्तश्रुंगीदेवीच्या प्रतिमा पुजलेली. सातमाळ्याच्या आईसमोर नतमस्तक होऊन, तीन दिवसाच्या सातमाळ ट्रेकच्या वाटचालीची सांगता केली.

वाटचाल सातमाळ
डोळ्यांसमोर दृश्यं तरळत होती ट्रेकच्या विलक्षण अनुभूतीची..
कधी ऊर धपापलं उभ्या घसाऱ्यावरून धस्सक-फस्सक चढाई करून..
कधी हरवलो डोंगररांगेवरच्या गच्च गवतात आणि रानफ़ुलांमध्ये..
कधी वेडावलो ढगांची गोधडी पांघरून घेतलेल्या सातमाळच्या रांगड्या सौंदर्याने..
कधी केली मैलोन्मैल यंत्रवत तंगडतोड...
कधी थरारलो एकसे बढकर एक दुर्ग अनुभवून..
कधी जाणवणारा वीरांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज..
कधी अचंबित झालो लाव्हारसाने निर्मिलेल्या सृजनाने..
तर कधी भारावून गेलो आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने..
कधी रंगल्या गप्पा गुराख्यांच्या खोपटात - खव्याच्या चहासोबत ..
कधी धुक्याआडून दर्शन घडलं कातळकड्यातल्या देवीच्या ठाण्याचं..
कधी अवाक झालो लढवय्या दुर्गस्थापत्याने..
कधी भारावलो विराट पॅनोरमा दृश्यांनी..
रिमझीम पाऊस-ऊन-ढगधुक्यामध्ये भिजलो-गारठलो-घामेजलो कधी..
नाशिक प्रांतातल्या सातमाळेच्या ट्रेकच्या दमदार वाटचालीनं अवीट अनुभूती दिलीये.. कृतज्ञ आहोत..


-------------------------------------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. पूर्वप्रकाशित: साप्ताहिक लोकप्रभा, २३ नोव्हेंबर, २०१८
२. ट्रेकर मंडळी: साकेत गुडी, मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे.
३. ट्रेक सप्टेंबरमध्ये केला आहे. वेगळ्या सीझनमध्ये ट्रेक केल्यास वाटा-पाणी-गवत-कातळ ही सगळी गणिते बदलू शकतील.
४. कृतज्ञता: ट्रेक मार्गदर्शनासाठी अमेय जोशी, नितीन तिडके
५. ब्लॉगवरील फोटो: साईप्रकाश बेलसरे
६. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
७. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१८. सर्व हक्क सुरक्षित.

10 comments:

  1. Replies
    1. खूप खूप धन्यवाद!👍👌☺️

      Delete
  2. अतीव सुंदर लेख. गुंगवून टाकलंस तू.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद, सागर!👍👌☺️

      Delete
  3. एक नंबर... एकंदरीत झकास ट्रेक झालेला आहे...
    सागर ने म्हटल्याप्रमाणे संपूर्ण ब्लॉग एकाच दमात वाचून काढला...
    मला सुद्धा आता पुढच्या सप्टेंबर मध्ये सातमाळ करावीशी वाटतेय... खास करून सप्तशृंगीगडाच्या पायऱ्या / शिलालेख बघण्यासाठी...
    एकंदरीत नेहमीप्रमाणे ब...ढि...या...

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद, दत्तू!👍👌☺️
      सातमाळा दुर्गस्थापत्य ट्रेकर्सनी अवश्य पहावे आणि गाडीने हे दुर्ग सुटेसुटे बघण्यापेक्षा ट्रेकर्सनी डोंगरयात्रा पद्धतीने (रेंज ट्रेक) करावेत, हा ब्लॉगचा हेतू आहे.

      Delete
  4. नेहमीप्रमाणे तुफान शब्दांची टोलेबाजी. ढवळ्या पवळ्या सुरेख जमून आलंय. हिरवेगार फोटो पाहून मजा आली. ट्रेक सातमाळेवरून केला म्हणजे तुफानी तंगडतोड. नाशिकातल्या किल्ल्यांची चढाई - उतराई म्हणजे गुडघे मजबूत हवे.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद, देवा!👍👌☺️
      सातमाळा 'डोंगरयात्रा' पद्धतीने दमवणारा आहेच, पण जबरदस्त मजा आली. दुर्गस्थापत्य-रेंजट्रेक-गारेगार देखणा निसर्ग असा सुरेख अनुभव मिळाला.
      खूप धन्यवाद!👍👌☺️

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete