Pages

Friday 14 June 2019

भिरीभिरी भटकंती

आंबिवली घाट चढाई - पर्वत - महिमंडणगड - चकदेव - शिडीडाक (घाट) उतराई

कधी सपशेल हरवलोय अरण्यदुर्गम वाटांवर, तर कधी धपापतोय उत्तुंग डोंगरमाथे चढताना. 
कधी विसावतोय उंबराच्या पोटातल्या गारेगार झऱ्यापाशी, तर कधी शहारतोय सह्याद्रीचं वैभव असलेल्या अजस्त्र गव्याच्या दर्शनाने.
कधी नतमस्तक होतोय उंच डोंगरमाथ्यावर समईच्या प्रकाशात उजळलेल्या जागृत शिवपुरीपाशी.
कधी कुडकुडत्या थंडीत आभाळाच्या टोपातलं तारांगण कवतिकानं निरखतोय.
कधी दरीच्या पोटात खुणावताहेत - रानात तग धरून राहिलेल्या गिरीजनांच्या वाड्यावस्त्या आणि जलाशयाने काढलेली डोंगर-झाडी-पाण्याची रांगोळी.
कधी थरथरतोय दुर्गम वाटेवरच्या शिडीवरून उतरताना, खाली डोकावणाऱ्या दरीच्या दर्शनाने.
अनुभवत होतो ‘कांदाटी’ खोऱ्यातली भिरीभिरी भटकंती.


कोयनेच्या उपनदीचं कांदाटीचं खोरं दडलंय महाबळेश्वरच्या दक्षिणेला सातारा-रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेपाशी. आधी चंद्रराव मोरेंकडे असलेला आणि नंतर शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात आणलेला जावळी-जोर-कांदाटी मुलुख. कोयनेच्या जलाशयाने वेढल्याने, रस्त्यांचं जुजबी अस्तित्व असल्याने आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या विस्तारीत (बफर) क्षेत्रात संरक्षित असल्याने – कांदाटी खोरं दुर्गम झालंय. गूढदुर्गम कांदाडी खोऱ्यातल्या दुर्ग-शिखरांचं, जुन्या घाटवाटांचं दर्शन घेण्यासाठी तीन दिवसांची डोंगरयात्रा आखलेली. कोकणातून जुन्या ‘आंबिवली घाट’वाटेने चढाई करून ‘पर्वत’ शिखरावर पहिला मुक्काम, पुढे वनदुर्ग महिमंडणगड बघून ‘चकदेव’ शिखरावर दुसरा मुक्काम आणि शिडीडाक घाटवाटेने तिसऱ्या दिवशी कोकणात उतराई, अशी भिरीभिरी भटकंती!

              
कित्येकदा या ट्रेकने हूल दिलेली. एके दिवशी मात्र भल्या पहाटेच आम्ही तिघे दोस्त ट्रेकसाठी सुसाटलेलो. खड्ड्यांमधून डांबरी रस्त्याचे टप्पे शोधत, वरंध घाटातील द्वारमंडपापाशी पुणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात प्रवेश केला. पुढे मुंबई-गोवा हायवेवरून पूर्वेला प्रतापगडाजवळ सह्यधारेला बिलगून सूर्य उजळू लागला. समोर दरीत एकमेकात गुंफलेल्या डोंगरसोंडांची गूढ नक्षी पसरलेली, कुठे दुर्गम वाड्या धुक्यात हरवलेल्या. रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी घाटाची वळणे उतरून, खेडजवळ भरणा नाक्यावर उदर-भरणा (न्याहारी) केला. गोवा हायवे सोडून डावीकडे पूर्वेला आंबिवलीकडे निघालो. जगबुडी नदीला बिलगून गर्द झाडीतून गर्रगर्र वळणे घेत जाणारा रस्ता गच्च धुक्यात हरवला होता. 


थोरल्या वळणावरून समोर सह्याद्रीचं दृश्य उलगडू लागलं. डावीकडे रसाळगडाचा झाडोरा, समोर ‘पर्वत’ शिखराचे उत्तुंग पश्चिम टोक आणि किंचित उजवीकडे ‘चकदेव’ शिखराचे पश्चिम टोक. या डोंगरपसाऱ्यातून ट्रेकचा मार्ग कसा असेल, याची उत्सुकता दाटलेली. 


आंबिवली गावात वाटांची चौकशी केली.
“दादा, आंबिवली घाटाने जायचंय शिंदीला”
“आरारा, रस्ता चुकला म्हणायचा की. मागे खोपी-शिरगावला जाऊन, रघुवीर घाटाने जाऊ दे गाडी वर शिंदीला.”
“गाडीने नाही, आंबिवली घाटानं पाऊलवाटेनं जायचंय. आणि शिडीडाकेने उतरणार”
“कश्यापारी दमताय, रघुवीर घाटाचा डांबरी रस्ता असताना.”
“अहो दादा, शिवाजी महाराजांचे किल्ले, जुन्या वाटा बघायला पाहिजेत की नाहीत आपण”
“अडूनच बसलात म्हणा ना. पर त्यो आंबिवली घाट न्हाई गावायचा. मोडलीये वाट. आता कोण भेटणार माणूस, तुम्हांला घाटाला लावायला.”
असं ठराविक संभाषण झालं. गावाबाहेर झोलाईदेवीच्या जीर्णोद्धारीत देवळाबाहेर गाडी लावली.

जुनी वहिवाट, आता आडवाट: आंबिवली घाटवाट
पाठपिशव्या लादून ट्रेकला सुरुवात झाली. वेळ सकाळी ९३०. झोलाई देवळापासून आंबिवली गावात येवून, पूर्वेला आदिवासी वाडीकडे जाणारा बैलगाडी रस्ता तुडवू लागलो. सागवानाच्या रानातून डोकावणाऱ्या सह्याद्रीरांगेतून घाटवाट कशी चढत असेल, याचा अंदाज बांधू पाहत होतो. 


कच्चा रस्ता टेपाडावरून वळणं घेत निघाला. आमच्या पाठीमागे रसाळगड, सुमारगड आणि त्यांना जोडणारी उंच डोंगररांग – लक्षवेधी होती. 


तर, समोर जणू आभाळात घुसलेल्या सह्यधारेने आम्हांला वेढून घेतलेलं. डावीकडे ‘पर्वत’ शिखरापासून उतरत आलेली डोंगरसोंड आणि उजवीकडे ‘चकदेव’ शिखराच्या कड्यांचा पसारा यामधल्या दरीत शिरू लागलेलो. वाटेचा अदमास घेताना, चकदेवकडून वायव्येला उतरणाऱ्या सोंडेवरून चढाई करत घाटमाथ्यापाशी सगळ्यात कमी उंचीच्या खोलगटापाशी घाट चढणार, यावर आमच्यात एकमत झालं. प्रत्यक्षात, हा अंदाज चुकणार होता, हे घाट चढताना स्पष्ट होणार होतं.


आंबिवलीतून तासाभरात आदिवासीवाडीत पोहोचलो. वाडीतल्या पोरांकडे घाटवाटेची चौकशी केली. त्यांनी समोरची बैलगाडी वाट सोडून, डावीकडच्या उताराकडे उतरणाऱ्या पाऊलवाटेकडे खुणावलं. सुदैवाने उमद्या स्वभावाचे शेलारमामा भेटले. वय ६२ वर्ष असूनही, तरुणांना लाजवेल असा फिटनेस. मामा माजी सैनिक असल्याने, वाटेच्या माहितीसोबत - गावाच्या पिकपाण्याच्या, जनावरांच्या, शहर-गावातल्या राहणीमानातल्या फरकाच्या आणि वाडीतला तरुण सैन्यात कसे भरती होतात - अश्या गप्पा रंगल्या. गच्च रानातून, विखुरलेल्या धोंड्यांमधून, वेली-झुडुपांमधून शेलारमामा आम्हांला घाटाच्या सुरुवातीपाशी घेऊन गेले. मामांसोबतची थोडकीच भेट, पण कुठल्याश्या ऋणानुबंधांमुळे आपुलकी निर्माण झालेली.
          
चकदेव शिखराकडून वायव्येला उतरणाऱ्या सोंडेवरून, ओढ्याला उजवीकडे ठेवत घाटवाट चढू लागली. 


सुरुवातीला दाट झाडोऱ्यातून निवांत चढणारी रुंद वाट. आडव्या चपट्या दगडांचे थर रचत केलेली ओबड-धोबड फरसबंदीची वाट. 


वाटेच्या कडेला दगडं रचून उभारलेले कठडे आणि थोरल्या खडकांवर सुरुंग लावल्याच्या खुणा बारकाईने निरखल्या. कुठल्याश्या राजाश्रयाने घाटवाट बांधून काढल्याच्या अश्या खुणा आसपास विखुरलेल्या. 


गर्द झाडोऱ्यातून आस्तेकदम चढाई असूनही, दम लागू लागलेला. ट्रेकआधी पहाटे आडवेळेला केलेला लांबचा प्रवास आणि जड पाठ्पिशव्या जाणवू लागलेल्या. वारसाच्या झाडाखाली दम खात बसलो. पूर्ण घाटवाटेवर पिण्याचे पाणी नसल्याने, पाठपिशवीतल्या पाण्याचा आधार होता. वारं पडलेलं, पण दूर रानातून तांबटाची शीळ मोहवत होती. जमिनीला पाठ टेकवून, पाय समोरच्या कातळावर टेकले. डोक्यावरच्या फांदीला लटकलेलं मधाचं थोरलं पोळं दिसलं. पोळ्यातला मध कोणीतरी पळवल्याने, मेणाच्या षटकोनी घरांची नक्षी निरखता आली.


फळं-अल्पोपहारासोबत थोडकी विश्रांती घेतल्यावर तुकडी तरतरीत झाली. आता अरुंद डोंगरसोंडेवर कातळातून काढलेल्या मोठ्या वळणांची फरसबंदीची वाट होती. 


पहिल्या वळणावरून डावीकडे झाडी-दरीमागे पर्वत शिखराच्या कड्यांचे दर्शन; तर वळून आल्यावर दुसऱ्या वळणावरून उजवीकडे सोनेरी वाळलेल्या गवतामागे चकदेवच्या कड्यांचे दर्शन घडलं. 


दुपारचं बाराचं ऊन लख्ख तापायला लागलेलं. खालून घाट बघताना घाटमाथ्यापाशी सगळ्यात कमी उंचीच्या खोलगटापाशी घाट चढणार, हा अंदाज बांधलेला. प्रत्यक्षात मात्र वाट वेगळी होती. घाटमाथा १०० मी बाकी असताना, वाट उजवीकडे आडवी चढत गेली. 


खडकाळ नागमोडी वाटेवरून त्रिधारी निवडूंगांमधून चढत अलगत घाटमाथ्यावर पोहोचलो. 


पायथ्याचे आंबिवली, धनगरवाडा ते झाडीभरल्या सोंडेवरची नागमोडी फरसबंदी वाट, अश्या आत्तापर्यंतच्या चढाईचं दृश्य खोलवर उजवीकडे होतं. 


पल्याड पश्चिमेला पल्याड जगबुडीच्या खोऱ्यातून उठावलेली रसाळगड-सुमारगड-महीपतगडाची रांग भव्य दिसत होती. 



           
अगदी शांतनिवांत घाटवाट - कुठे ओढ्याची नाळ नाही, दरडावणारे कातळटप्पे नाहीत, दृष्टीभयाचे घसाराटप्पे नाहीत. 


म्हणजेच, एकेकाळी माणसं-गुरं वाहतुकीसाठी सुयोग्य वहिवाट. कोयना धरण बांधण्यापूर्वी कोकणातले खेड आणि घाटावरचं सातारा यांच्यात दळणवळणाची ही घाटवाट. 


निसंशय जुनी वापरातली, पण आता मोडकळीस आलेली. संपूर्ण चढाईमध्ये कोणीही गावकरी भेटले नाहीत, कुठेही कचरा नाही. काळाच्या ओघात आता ही जुनी वहिवाट आडवाट झालीये. घाटमाथ्यावर स्वागत केलं छोटेखानी मारुती मंदिराने. बाहेर एक वीरगळ. 


पल्याड देवराईत झोलाई देवीचं कौलारू राऊळ. झोलाईदेवी आणि भैरवाची काळ्या कातळातली साधी मूर्ती. देवळाबाहेर भैरव, भैरवी आणि पूजक अश्या जुन्या देवतामूर्ती आणि शिवपिंड मांडून ठेवलेले. प्रसन्न शांत गारेगार ठिकाण. 


सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या विस्तारित (बफर) क्षेत्रातील दुर्गम कांदाटी खोऱ्यात पोहोचलेलो. जैवविविधता संपन्न असल्याने, ट्रेकर्सना वनखात्याची परवानगी – उपद्रवमूल्य पावती – काढूनच इथे भटकंती करता येते. 


जावळी- कांदाटी खोऱ्यात सत्ता असलेले चंद्रराव मोरे शिवपूजक. त्यांनी दुर्गम डोंगरमाथ्यांवर सप्तशिवपुरी (सात शिवमंदिरे) स्थापिली होती. त्यापैकी, कांदाटी खोऱ्यातल्या ‘पर्वत’ माथ्यावरचं जोम मल्लिकार्जुन आणि ‘चकदेव’चे चौकेश्वर या शिवपुरींना आम्ही भेट देणार होतो. बैलगाडी वाटेच्या उतारांवरून सुसाटत अर्ध्या तासात वळवण गावी पोहोचलो. कोकणातल्या आंबिवलीमधून ७०० मी. घाटचढाई करून वळवणला पोहोचायला चार तास लागलेले. वळवणमध्ये जेवणं आणि वामकुक्षी करून, ट्रेकर्स ताजेतवाने झाले. दुपारचे चार वाजलेले. मुक्कामाला ‘पर्वत’ माथ्यावर पोहोचायचं होतं. 
           
 ‘पर्वत’ची सुरेखरम्य अनुभूती
वळवणच्या ईशान्येस ‘पर्वत’ ४०० मी उठावलेला. पर्वत म्हणजे एकांडं शिखर नसून, भलीमोठ्ठी आडवी डोंगरभिंत पसरलेली. 


झाडीभरल्या दांडावरची ढोरवाटांची मोझाईक नक्षी पार केल्यावर, उभी चढाई सुरु झाली. 


मागे बघितलं, तर वळवण-शिंदी गावांमागे महिमंडणगड झाडी-टेकड्यांमधून लपाछपी खेळत होता. 

   
नैऋत्येला अस्ताव्यस्त पसरलेला चकदेव, झाडी-सावलीमुळे गूढ अनोळखी वाटत होता. कललेल्या दुपारची तिरकी सूर्यकिरणे पर्वतच्या डोंगरसोंडा उजळवत होती.


निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर, सोनेरी उन्हांत उजळलेल्या गवतातून उंच पावलं टाकत चढाई होती.


पर्वतच्या पदरातली गच्च झाडी आणि त्यामागचा कातळमाथा झूम करून पाहिल्यावर, माथ्याच्या उजव्या टोकापाशी शिवपुरीचा कळस डोकावला. ते होतं आमचं गंतव्य! 


पाऊण तासात उभ्या दांडावरून १५० मी चढाई केल्यावर, उंबराच्या पोटातल्या गारेगार झऱ्यापाशी विसावा सुखावून गेला. पल्याडच्या दांडावर कसलंसं धूड हलताना दिसलं. “गsवा!?”, हलकेच पुटपुटलो. होय, गवाच! अजस्त्र आकार, चंद्रकोरीसारखी पांढरी गोलाकार शिंगे, चारही खुरांवर पांढरे मोजे असावेत अशी छटा. सोनेरी गवत-उन्हाच्या पार्श्वभूमीवर गव्याचा आकृतीबंध तेज:पुंज दिसत होता. गवा कुठेतरी मागे वळून पाहत होता. पुढच्याच क्षणी झाडीतून उड्या मारत गव्याचं पिल्लू आणि आई गवा बाहेर आले. सह्याद्रीचं वैभव असलेल्या अजस्त्र गव्यांच्या दर्शनाने भारावून गेलो. अंगावर सणसणीत काटा आला.
         
पर्वतच्या चढाईत थोडक्या वेळात जाणवलं, की हा नावाला साजेसा विस्तृत पसरलेला डोंगर आहेच, पण जगाच्या कोलाह्लापासून कैक मैल दूर नीरव शांततेने ओतप्रत भरला आहे.


दांडावरून चढाई करून आता पर्वतच्या पदरातल्या गर्द झाडीत पोहोचलो. उजवीकडे आग्नेयेला जाणाऱ्या आडव्या वाटेने निघालो. वाटेतल्या ओढ्याच्या पात्रात पाणी खळाळत होतं, जांभळी रानफुलं तरारलेली अन मधमाश्यांची गुणगुण-भुणभुण चाललेली. 


पाण्यापाशी गव्याच्या ताज्या पाऊलखुणा असल्याने, सावधपणे झपझप निघालो. पदरातून तिरकं चढत गर्द झाडी पार केली. 


मोकळवनातून पर्वतच्या कातळमाथ्याचे आणि झाडीभरल्या उतारांचे दर्शन झाले. 


वाट इथे थोडी फसवी आहे. समोर जाणारी वाट ठळक, तर पर्वतकडे जाणारी पुसट. झाडांवर लावलेल्या भगव्या ध्वजामुळे चकवा टळला आणि डावीकडची पावठी शोधून काढली. माथा आता १५० मी उंचावर राहिलेला. अरुंद नागमोडी उंचच उंच वाट कितीतरी वेळ चढत होतो. उन्हं झपाट्याने कलू लागलेली. अखेरीस, कड्याच्या टोकावरचा देवळाचा कळस चमकू लागला. 


‘दक्षिणेची काशी – स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुन देवालय, श्री क्षेत्र पर्वत तर्फे वाघावळे’ अश्या प्रवेशद्वारावरच्या पाटीने स्वागत केलं. दोन्ही बाजूस स्तंभ. दिवसाभरात पुण्यापासून प्रवास करून, आंबिवली घाटाची ७०० मी आणि पर्वतची ४०० मी अशी जोरकस चढाई झालेली. पण, पर्वतच्या शिवपुरीतील प्रसन्न वातावरणाने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. 


देवळाच्या सभामंडपात मुक्काम होता. मंदिरामागे ५० मी खोलवर दरड उतरून विहिरीतून पाणी भरून आणण्याचा द्राविडी प्राणायाम करावाच लागला. घरी खुशाली कळवण्यापुरतं मोबाईलची आठवण झाली. रेंजसाठी झटपट करत साकेत म्हणाला, “इथे रेंज नाही, तर लोक राहतात कसे?”. त्यावर आशूने लगेच “इथले लोक पर्वत रेंजवरच राहतात” अशी कोटी मारली. मोबाईल-हवा-ध्वनी-गर्दी असं कुठलंच प्रदूषण नसल्याने, पर्वतचा मुक्काम अंगात भिनू लागलेला. चुलीवरचं साधं गर्रम जेवण ‘जगात भारी’ लागलं. दगडी पटांगणावर पाठ टेकवून तारांगण न्याहाळत दिवसाभराच्या अनुभवांची उजळणी झाली. गारेगार वारा आमची भंबेरी उडवत होता, सुखावत होता. दमलेले ट्रेकर्स पेंगाळू लागले आणि लवकरच कष्टसाध्य गाढ निद्रेच्या अधीन झाले.

पहाटे लवकरच जाग आली. उजाडायचं होतं. कांदाटीच्या वळणवेड्या खोऱ्यातून, रानावनातून घुमत येणारा भर्राट वारा सुटलेला. गवताच्या सोनसळी लाटा लवत होत्या. देवळासमोर आग्येय धारेपल्याड दिसत होता कोयनेच्या जलाशयाचा अस्ताव्यस्त पसारा. अवचित एका क्षणी तेजोनिधी लोहगोल अवतरला, दिव्य तेजाने भुवन झगमगले.


आणि पर्वतची शिवपुरी सोनेरी कोवळ्या उन्हांत न्हाऊ लागली. विलक्षण सुंदर क्षण. 


सभोवताली पसरलेलं सह्याद्रीमंडळ उजळू लागलं. समुदसपाटीपासून ११३५ मी. उंचीवर असल्याने, घाटमाथ्याची पहिली पातळी आणि त्याच्याही वर उठावलेली घाटमाथ्यावरची शिखरं-खिंडी-सोंडा असं देखणे दृश्य कितीतरी वेळ निरखत बसलेलो. उत्तरेला थेट मागे महाबळेश्वरची असंख्य टोके, मग मकरंदगड आणि त्याच्या अल्याड अंगठेसरी-तेलीसरी-नाळेची वाट अश्या आडवाटांची ओळखपरेड चाललेली. 


न्याहारीसाठी चुलीवरचे गर्रम खमंग पोहे आणि अद्रकवाली चाय असा झक्क बेत होता. काळ्या दगडात बांधलेल्या जुन्या हेमाडपंथी मंदिराला निरखत होतो. चंद्रराव मोरेंनी स्थापिलेली, शिवाजीमहाराजांनी पूजिलेली ही पर्वतची ‘जोम मल्लिकार्जुन’ शिवपुरी (देवालय). इथली एक दंतकथा गुरुवर्य आनंद पाळंदेकाकांनी पुस्तकात नोंदवलेली – ‘अर्जुन वनवासात इथे पर्बत्यावर आला. शंकर पार्वतीने भिल्ल भिल्लीणीचं रूप घेतलेलं. अर्जुन बाण टाकायचा आणि शंकर ते हुकवायचा, अन बाण पार्वतीच्या पाया जवळ पाडायचा. असं बराच वेळ झाल्यावर अर्जुनाला कळून चुकले, की ही तर जगन्माता पार्वती. त्यानं लोटांगण घातलं, मग मल्लिका भिल्लीण ही पार्वतीचं मूळ रूप घेऊन प्रगटली. अन म्हणून हे पर्वतावर मल्लिकार्जुन देऊळ’.


हल्ली देवदर्शनाला जायचं म्हणजे - गाड्या काढायच्या, देवस्थानाबाहेर दुकानांमधून गोंगाटगाणी ऐकत मंदिरात प्रवेश करायचा, स्पीकर्सवरचा श्लोक-मंत्रांचा कल्लोळ झेलायचा आणि धक्काबुक्की सहन करत देवाचं मुखदर्शन करून बाहेर फेकलं जायचं. मात्र, यापेक्षा अत्यंत वेगळी अनुभूती आम्हांला पर्वतवर मिळाली. स्वत: कष्टपूर्वक डोंगरयात्रा केल्यावरच दर्शनासाठी तिथे पोहोचलेलो. 

पूर्वाभिमुख द्वारामधून सभामंडपात प्रवेशलो. दगडी खांबांनी तोलून धरलेल्या सभामंडपातल्या नीरव शांततेने सुखावून गेलो. गाभाऱ्यात शिवपिंड, त्याभोवती फेर धरल्यासारखे मांडलेल्या अनेक पितळी फणाधारी नागप्रतिमा. पाठीमागे मल्लिकार्जुन देवाचे पितळी मुखवटे समईच्या प्रकाशात उजळलेले. गाभाऱ्यात कुठेतरी सह्याद्रीशी एकरूपता अनुभवल्यासारखं वाटलं.

मुक्काम आवरायची वेळ आलेली. वळवणकडून आलेल्या गावकऱ्याने उतराईच्या वाटेतल्या ओढ्यापाशी गवे असल्याचे आणि काळजी घ्यायला सांगितले. पर्वतची नागमोडी चिंचोळी वाट उतरून मोकळवनात आलो. गवे दिसावेत अशी एकीकडे उत्सुकता आणि त्याचवेळा किंचित भीती, यामुळे अंधाऱ्या दाट झाडीचा ओढ्याचा टप्पा सावधपणे पार केला. दांडावरून उभी वाट उतरून तासाभरात पायथ्याला वळवणच्या शिवारांत पोहोचलो. 


वळवणच्या शाळेत ८ मुली-मुलं शिस्तीत अभ्यास करत होते. शाळेबाहेरचं निसर्गाच्या तालावरचं जगणं आणि पुस्तकातला धडा, यांचा कितपत संबंध होता कुणास ठावूक. 


कधीकधी भटकंतीच्या नादात छोट्या निसर्गनवलाईकडे दुर्लक्ष व्हायची शक्यता असते. माळावर ‘मंजिऱ्यां’च्या जांभळ्या तुऱ्यांनी रांगोळी आखलेली. 


मधाच्या शोधात भुंगे आणि मधमाश्या रेंगाळलेले. साकेतने माळावर विखुरलेल्या गवतात काहीतरी चमकणारं हेरलं. ती होती चक्क कीटकभक्षी वनस्पती - ‘ड्रोसेरा’. इंग्रजीमध्ये ‘सनड्यू’ संबोधलं जाणाऱ्या या वनस्पतीचा पसारा निरखताना, पाणीदार चिकट द्रवाच्या मोहाने एक किडा अडकलेला दिसला. कांदाटीच्या खोऱ्यातलं अजून एक रत्न बघून थक्क झालेलो.


वनदुर्ग महिमंडणगडावर
कच्च्या रस्त्याने शिंदी गाव गाठलं. आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या गावातला अनुभव अनपेक्षित आणि धक्कादायक होता. कालाय तस्मै नमः!

अल्याड आग्नेयेला महिमंडणगड पाहून, पल्याड पश्चिमेला चकदेव डोंगरावर मुक्कामासाठी पोहोचायचं होतं. शिंदी गावातून रानातून वळणं घेत कच्च्या गाडीरस्त्याने निघालो. सातारा-रत्नागिरी जिल्ह्यांना सह्याद्रीच्या कुशीतून जोडणारा हा रघुवीर घाटाचा गाडीरस्ता. कांदाटी खोऱ्याला जगाशी जोडणारा हा रस्ता. (कांदाटी खोऱ्यात ट्रेक करताना, या रस्त्यावर पुढे खिंडीपाशी असलेल्या वनखात्याची चौकीतून पर्यटकांनी उपद्रवमूल्य पावती घेणं आवश्यक आहे). झाडीभरला महिमंडणगड जवळ आल्यावर, नदीवरच्या दगडी पुलापाशी रस्ता सोडून गडाची पाऊलवाट सुरु झाली. काळ्या दगडात बांधलेलं सुबक समाधी वृंदावन पाहून थबकलो. काळाच्या उदरात कोणाच्या आठवणी इथे हरवल्या आहेत, कोणास ठावूक. रानातून उभी मळलेली वाट सुरु झाली. ठिकठिकाणी गव्यांच्या पाऊलखुणा वाटेवर, वाळलेल्या चिखलात उमटलेल्या. झाडीटप्पा संपून घसाऱ्याच्या निमुळत्या वाटेवर कारवीच्या बुंध्यांचं रान सुरु झालं. उजवीकडे रघुवीर घाटाच्या रस्त्याचे खोलवर दर्शन होवू लागले. 


एव्हाना, चढाई घामटं काढू लागलेली. दोन टेपाडं आणि मधल्या खोगिरासारखा खळगा असलेला दुर्गमाथा दिसू लागला. करकरीत उन्हाने तापलेला डोंगरउतार, माथ्याकडची झाडी आणि पाठीमागे निळं आभाळ! कातळात खोदलेल्या पावठ्या निरखल्या. पल्याड अर्धवट सोडून दिलेली कातळातली खोदाई – कदाचित टाक्याची किंवा पहाऱ्याच्या मेटाची जागा. 


दुर्गाच्या खोगिरापासून डावीकडची वाट माथ्यावर घेऊन गेली. शिंदीपासून दुर्गमाथा गाठायला सव्वा तास लागलेला. 


दुर्गफेरीला निघालो. छोटेखानी माथ्यावर उंचसखल कातळसपाटीवर सोनेरी गवत आणि तुरळक झाडं-झुडूपं विखुरलेले. पाण्याच्या ७ टाक्यांच्या समुहापाशी थबकलो. 


पहिलं टाकं दंडगोलाकार विस्ताराचं आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेलं. पाण्यावरचा हलका तवंग बाजूला केल्यावर थंडगार रुचकर पाणी होतं. 


पल्याडच्या चौकोनी खांबटाक्याच्या माथ्यावर शिवपिंड आणि तीन पूजक खोदलेले. साधी ओबड-धोबड खोदाई. सह्याद्री दुर्गांवर टाकी विपुल असतातच, पण टाक्यावरचं असं शिल्प दुर्मिळ! 


बाकी ४-५ आयताकृती हौदांमध्ये चिखल-गाळ-दगड साचलेले. १०० मी माळ तुडवून उत्तरेला उध्वस्थ मंदिरापाशी पोहोचलो. छताचे पत्रे वाऱ्यावर उधळलेले. युद्धसज्ज भैरव आणि तांब्याचा मुखवटा बसवलेली त्याची वामांगी भैरवी, यांच्या काळ्या पाषाणातल्या मूर्ती कधी काळापासून इथे स्थापिले आहेत.


माळावर तुरळक घरट्यांची जोती अवशेष सोडले, तर आज गडावर फक्त उरलंय भणाणणारं वारं. जावळी जिंकल्यावर शिवाजीमहाराजांनी हा दुर्ग बांधला आणि १८१८ ला इंग्रजांनी ताबा मिळवला, असा त्रोटक इतिहास. समुद्रसपाटीपासून ९५३ मी उंची आणि मुख्य सह्याद्रीधारेवर वसलेला असल्याने, मोक्याची जागा. रघुवीरघाट-आंबिवलीघाट यांच्या संरक्षणार्थ हे ठाणं. दुर्गावरून सर्वदूर सह्याद्री दर्शन घडत होते.


शिंदी-वळवण खोरं, कोयना जलाशय, आडवा पसरलेला पर्वत, पश्चिमेला चकदेव, वायव्येला आम्ही चढून आलेल्या आंबिवली घाटाची खिंड आणि त्यातून डोकावणारे कोकणातले सुमारगड आणि महीपतगड. दुर्गाच्या खोगिरात उतरून पल्याडच्या उंचवट्यावर जाऊन आलो. दक्षिणेला नागेश्वर सुळका, वासोटा आणि जुना वासोटा सहज ओळखता आले. 


कोयना अभयारण्याचे आणि पश्चिम कड्यांचे विहंगम दृश्य दिसलं. काय ते जंगलाचे हिरवेगार टप्पे आणि किती त्या दुर्गम डोंगर-दऱ्या. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामुळे बहुतांशी भागाचं दर्शन घेता येत नसल्याची हळहळ वाटली, पण आपल्याकडे बेताल वर्तणुकीला आळा घालायला कडक नियमांना पर्याय उरला नाहीये! निमुळत्या घसरड्या पाऊलवाटेने शिंदी गावात परतलो. शिंदी गावातून महिमंडण दुर्गदर्शन करून परत यायला तीन तास लागलेले. 

  
कांदाटीचं अफाट दृश्य ‘चकदेव’वरून
मेट शिंदीमधून आता वेध लागलेले ‘चकदेव’ डोंगरावर मुक्कामास पोहोचण्याचे. झाडी-झुडुपांमधून उभ्या दांडावरून मळलेली वाट चढू लागलो. दोन दिवसाच्या ट्रेकमुळे खांदे सरावलेले, त्यामुळे पाठीवरच्या जड पाठपिशव्यांचं ओझं जाणवेना. दांडाच्या माथ्यापाशी पोहोचलो. डावीकडे खोल दरीच्या पार्श्वभूमीवर गवताचे तुरे सोनेरी उन्हांत उजळलेले. कडयाच्या पोटातून जाणारी अरुंद वाट सुरु झाली. 


शिंदीपासून १५० मी चढाई केल्यावर, भलंमोठ्ठं पठार सुरु झालं. वाऱ्याने हलणाऱ्या गवताच्या लाटांमागे पूर्वेला दिसत होता, कांदाटी खोऱ्याचा अफाट पॅनोरमा. 


डावीकडे पर्वतचा आडवा-तिडवा डोंगरमाथा, पायथ्याला अस्ताव्यस्त पसरलेला कोयनेचा जलाशय, गर्द रानाच्या टप्प्यांमागचा महिमंडणगड, त्याच्यामागे सह्याद्रीच्या बलदंड कणा – त्याचे पश्चिमेला कोसळलेले करकरीत कडे आणि पूर्वेला उतरलेले झाडीभरले मंद उतार. सह्याद्रीचं ते अफाट दृश्य दीठीत अन मनात मावेना. अंगावर सुखद शहारा आला. 


गवतातून वळत जाणाऱ्या, मंद चढाच्या वाटेवर तिन्ही ट्रेकर्स आपापल्या गतीने चाललेले, लांब पांगलेले. 


शांत एकतालात आपल्या धुंदीत ट्रेकची अनुभूती घेत निघालेले. सह्याद्रीशी एकरूप झालेले. तहान-भूक-वेळ याचं भान नाही. कुठून निघालोय, कुठे चाललोय याचं भान नाही. समाधीअवस्था हीच असेल का! एव्हाना, सूर्य कललेला. चकदेवच्या वस्तीचा मागमूस नव्हता. 


पुन्हा एकदा झाडीमधून ५० मी चढाई, पुन्हा एकदा पठार. आसपास गवे आणि वन्य प्राण्यांचा संचार असल्याच्या खुणा. अखेर, मेट शिंदी गावापासून दोन तासांच्या निवांत चालीनंतर चकदेवच्या वस्तीपाशी पोहोचलो. 


मावळतीच्या सूर्यकिरणांनी आभाळात ढगांची नक्षी रंगवलेली. कुण्या मुलुखात चाललेल्या जेट विमानाच्या धूराची रेष उजळलेली. पावित्र्य टिकून राहावे, म्हणून मंदिर परीसरात ट्रेकर्सना शक्यतो राहू देत नाहीत. मित्र योगेश अहिरेच्या ओळखीच्या ‘संतोष जंगम’कडे मुक्कामाची सोय झालेली. घरगुती जेवणानंतर निवांत वारं खात, संतोषभाऊबरोबर बाहेर पडलो. संतोष कांदाटी खोऱ्यातल्या चार गावातला भारी खटपट्या माणूस. हे जंगम लोकं शिवभक्त, देवाचे पुजारी, गळ्यात शिवलिंग-नागप्रतिमा धारण करतात, वशाट खात नाहीत. गप्पा रंगलेल्या रानात तग धरून राहिलेल्या गिरिजनांच्या, जनावरांच्या, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या, जनरीतींच्या, शेती-पाऊस-पिकांच्या!



ट्रेकच्या तिसऱ्या दिवशी जाग आली कोंबड्याच्या आरवण्याने. गोठ्यातली दुधं काढून झालेली. वस्तीवरची दो-चार गुरं आता चाऱ्यासाठी गळ्यातल्या घंटा किणकिणत रानात निघालेली. चकदेवला आपण मुक्कामाला आहोत, या जाणिवेनेच प्रसन्न वाटलं. मुक्काम आवरून राऊळात दर्शनासाठी थबकलो. 


खोपी, उचाट, शिरगाव आणि शिंदी अश्या चार गावांचा हा महादेव – श्री शैल्य चौकेश्वर. दगडी कुंपणातून आत गेल्यावर, हेमाडपंथी देवळातल्या दगडी खांबांनी तोलून धरलेल्या सभागृहातून गाभाऱ्यात प्रवेश केला. शिवपिंड, त्यावर मांडलेल्या तांब्याच्या फणाधारी नागप्रतिमा आणि शिवमुखप्रतिमा. पाठीमागे मांडलेल्या तांब्याच्या ६ देवता. संतोषभाऊंच्या मते त्या आहेत - वरदायिनी, पार्वती, राम, लक्ष्मण, भरत, रघुवीर यांच्या. गुरुवर्य आनंद पाळंदे यांनी चकदेवची एक रंजक कथा नोंदवली आहे, ‘रामराजा वनवासात असताना इथे आला होता. शंकराने भिल्लाचं रूप घेऊन दिलं आव्हान. रामाने टाकला बाण, पण तो शंकराला न लागता चकला आणि देऊळ जिथे आहे, तिथे जाऊन पडला. तवा रामाचा बाणही जिथे चकला, ते हे चकदेव’.


थरारक उतराईची शिडीडाक
चकदेवला निरोप देवून, ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात कोकणात उतराई करायची होती. पठारावरुन पश्चिमेला आडवं गेल्यावर, कोकणाचं दृश्य समोर आलं. समुद्रसपाटीपासून ९८४ मी उंचीवर आणि सह्याद्रीच्या धारेवर आल्यामुळे, दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचं अथांग अफलातून दृश्य दिसलं.


दरीत धुक्याचा समुद्र पसरलेला, जणु सिंधुसागर सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लगटलेला. 


गंमत म्हणजे, एका दंतकथेनुसार विष्णूअवतार परशुरामाने चकदेवच्या याच कड्यावरून बाण मारून, समुद्राला मागे हटवून, कोकणपट्टी निर्माण केली. या परिसराशी परशुरामाचे नाते नक्कीच आहे, कारण डावीकडे दरीत लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र आणि ‘क्षेत्र परशुराम’ देवळाचा परिसर खुणावत होता. 


कोकणात उतराई करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. ट्रेकर्समध्ये सह्याद्रीतल्या काही अनवट ठिकाणांबद्दल विशेष आत्मियता असते. त्यापैकी एक म्हणजे, चकदेवच्या पश्चिम कड्यावरून चढण्या-उतरण्यासाठी फांद्या-वेली बांधून बनवलेली शिडी म्हणजे ‘चकदेवची शिडीडाक’! चकदेवच्या वस्तीला रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी मीठ-मिरचीसाठी थेट कोकणातल्या आंबिवलीत उतरायला पर्यायच नाही. पूर्वीच्या लाकडी शिडीऐवजी १९९० मध्ये इथे एकापाठोपाठ एक तीन लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या. शिड्यांच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षणभर विश्वास बसेना, की अश्या कड्यामधून वाट काढलीये. दरीच्या खोssल दृश्यामुळे आणि एकापाठोपाठ झेपावलेल्या डोंगरदांडांच्या दृश्याने नजर गरगरली. 


शिडीची बांधणी करताना आधारासाठी कठडे, पाईप्सच्या पायऱ्या आणि पायऱ्या बळकट करण्यासाठी दुहेरी आधारतुळया वेल्डिंग केल्या आहेत. पहिल्या शिडीच्या माथ्यावरून दुसऱ्या शिडीची फक्त सुरुवात दिसली. उतराईची सुरुवात करताना, शिडीच्या माथ्याकडचा कठडा घट्ट धरून, दरीकडे पाठ करून शिडीकडे तोंड केलं. दरीकडे जड पाठपिशवीसह पाठ करत असल्याने, काळजीपूर्वक हालचाली केल्या.


लोखंडी शिड्या भक्कम आहेत, पण आपल्या चुकीला इथे माफी नाही. त्यामुळे शांतपणे एका वेळी एका ट्रेकरने शांतपणे उतराई करायची आणि एकमेकांमध्ये पुरेसा संवाद कायम ठेवायचा. ४-५ पायऱ्या उतरल्या, की शिडीच्या पायऱ्यांची नक्षी नेमकी लक्षात आली. पायरीवर पाय ठेवणं सोप्पं की आधारतुळईच्या मध्ये, हे तंत्र सापडलं. भणाणणाऱ्या वाऱ्यासोबत एके क्षणी पाठपिशवीने हेलकावा घेतला आणि क्षणभर हृदयाचा ठोका चुकला. एकाग्रतेने ६० फुटी पहिली शिडी पार झाली. दुसऱ्या शिडीच्या माथ्यावरून खोल दरी, घसारा आणि तिसऱ्या शिडीची सुरुवात दिसली. टप्प्याटप्प्याने दुसरी आणि तिसरी शिडी काळजीपूर्वक पार केली. 


शिड्या असूनही घामटं निघालेलं, ऊर धपापलेलं. हायड्रेशन पिशवीतल्या पाईपने पाण्याचे दोन घोट पोटात गेल्यावर बरं वाटलं. काळाच्या ओघात कांदाटी खोऱ्यात रघुवीर घाट रस्ता आला, तरी पंचक्रोशीत शिडीडाकेचं महत्व आजही अबाधित आहे. पूर्वी कुरकुरणाऱ्या वेलींच्या शिड्यांवरून कसंकाय गावकरी बाया-म्हातारे चढाई करत असतील, याची कल्पना करवत नाही. वेलींची शिडी जाऊन आता लोखंडी शिडी आली, तरी थरार कायम आहे. 


शिड्या उतरल्यानंतर १५ फुटी आडवी वाट - वाळकं गवत, घसारा आणि डावीकडे कोसळलेली दरी यामुळे लय थरथराटाची होती. 


पश्चिमेला सोंडेवरून उतरणाऱ्या उभ्या घसरड्या वाटेवर पोहोचलो. 


पाठीमागे पाहिल्यावर, कोणत्या उभ्या कड्यावरून आपण शिड्या उतरत आलोय, हे दिसत असूनही विश्वास बसेना. 


त्यानंतर, उभ्या उतारांचे टप्पे कितीतरी वेळ उतरत गेलो. 






उन्हाचा तडाखा सुरु झालेला. पाय हुळहुळायला लागले. पदरातल्या एकांड्या झापात एक आजा तग धरून असलेला. आंबट्ट ताकाचे घोट घेत वाघराचे किस्से ऐकले. 

       
गर्द झाडीतल्या मळलेल्या वाटेवरून लांबच लांब उतराई केली. मोकळवनातून मागे बघितल्यावर चकदेवचा माथा आभाळात घुसलेला. 


उतराईच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो. 


‘सैराट’ ब्रांडच्या बटाटा वेफर्सच्या पाकिटांचा कचरा आणि खाली गावातून कुठून तरी ‘झिंगाट’ गाण्याचे सूर ऐकू येवू लागले. झोलाई मंदिरापाशी गाडीपाशी पोहोचलो. 


तीन दिवस कांदाटी खोऱ्यात अनवट रानवाटांवर मनसोक्त चढाई उतराई केलेली. जुन्या वहिवाटा तुडवलेल्या. गिरीजनांच्या श्रद्धेची राऊळे बघून तृप्त झालेलो. भिरीभिरी भटकंती, अजून काय!

-------------------------------------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:
१. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, आशुतोष कुलकर्णी, साईप्रकाश बेलसरे
२. ट्रेकर मंडळी: साकेत गुडी, आशुतोष कुलकर्णी, साईप्रकाश बेलसरे.
३. ट्रेक डिसेंबरमध्ये केला आहे. वेगळ्या सीझनमध्ये ट्रेक केल्यास वाटा-पाणी-गवत-कातळ ही सगळी गणिते बदलू शकतील.
४. कृतज्ञता: ट्रेक मार्गदर्शनासाठी योगेश अहिरे
५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१९. सर्व हक्क सुरक्षित.


15 comments:

  1. Replies
    1. खूप धन्यवाद, अमोल ☺️👍

      Delete
  2. वा साई मस्त ब्लॉग! खूप दिवसांनी तुझे लिखाण वाचायला मिळाले. ब्लॉग वाचताना ऑक्टोबर २०११ मधे केलेल्या पर्वत, चकदेव व शिडी घाटाची आठवण झाली. त्यावेळी पर्वत आणि चकदेव दोन्हीवर केलेला मुक्काम अजूनही आठवतो. त्यातल्या त्यात पर्वत तर अफाट भारी प्रकरण. धन्यवाद मित्रा. फार दिवसांनी एक छान ब्लॉग वाचायला मिळाला. फोटो अप्रतिमच 👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. विनीत, खूप धन्यवाद.. 👍
      हे खोरं गूढ रम्य आहेच, पण शिवपुरीतील मुक्काम विशेष अविस्मरणीय असतात.

      Delete
  3. साई लिखाण सुंदर. जियो. 🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. आनंदकाका, मनपूर्वक धन्यवाद ☺️👍

      Delete
  4. लई भारी...
    साईप्रसाद. सुंदर लिखाण सुंदर माहिती आहे वर्णन तर अप्रतिम आहे नक्कीच करावा असं वाटणारा ट्रेक आहे.. अभिनंदन असेच नवीन नवीन मार्ग करत रहा.. आणि माहिती लिहित रहा...

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ शैलेंद्र, प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं.
      खूप सुंदर सह्याद्री मुलुख असल्याने, ट्रेकला जावसं वाटावं आणि ट्रेकर्सना मदत व्हावी, असं लिहायचा प्रयत्न केलाय.. खूप धन्यवाद!

      Delete
  5. साई, अप्रतिम लिखाण 👌🏻.
    शिंदी-कांदाटी खोऱ्यातल्या सह्याद्रीचा अर्क-गाभा-आत्मा उतरवलायस पार लिखाणात 👏🏻.
    खूपच प्रसन्न वाटले वाचून 😇✌🏻.

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद्राव,
      शिंदी-कांदाटी खोऱ्यात काय जादुई सह्याद्री आहे, हे तुला माहिती आहेच.
      आडवाटा, रानवा आणि शिवपुरीतली शांतता याची धुंदी उतरत नाहीये. ती ट्रेकर दोस्तांबरोबर शेअर केलीये.
      खूप धन्यवाद!

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. खुप छान वाटल तुमचा अनुभव वाचुन. स्वतः तिथ असल्यासारखा वाटत होता इतक छान वर्णन केलत. तुम्हीं वर्णन करत अस्ताना सुरुवती पासुन ते शेवट पर्यन्त सोबतच google map मधे तुमचा प्रवास टीपत होतों. धन्यवाद....

    ReplyDelete
  8. निव्वळ अप्रतिम !!
    सहयाद्रीतल्या आडवाटांवर वर काव्यात्मक लिखाण व तसे लिहिताना ट्रेकरसना योग्य ती माहिती मिळेल ह्या दृष्टीने लिहिले आहे.

    तुर्तास तुझा ब्लॉग वाचून सह्याद्रि मधे हरवून गेलो एवढे नक्की..सगळेच ब्लॉग उत्कृष्ट अणि दर्जेदार आहेत. सह्याद्रि लोकांपर्यन्त पोहचवण्यास लिखणातून मोठा हाथभर
    सध्या परदेशी असल्यामुळे सह्याद्रिला मुकलो आहे.

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे. shindess@hotmail.com या मेलवर नंबर कळवल्यास सविस्तर मार्गदर्शन घेता येईल.

    ReplyDelete
  10. आतिशय सुदर असे वर्णन व भन्नाट असा ट्रेक. हा ब्लॉग वाचून व फोटो पाहून तिथेले निसर्गसौंदर्य प्रत्यक्ष अनुभवल्या सारखे वाटले. चकदेव , पर्वत , महिमंडनगड हा ट्रेक करण्याचे बर्याच दिवसापसुन मनात होते त्यात भरीस भर म्हणजे हा तुमचा ब्लॉग ज्यामुळे आता तर हा ट्रेक करण्याची खूपच उत्सुकता वाढली. याच वाटेने जमेल कि नाही माहित नाही पण नक्कीच ह्या वर्णानातून मिळणारी माहिती आम्हाला ट्रेक करताना १०० टक्के उपयोगी पडणार हे निश्चितच. खूप खूप धन्यवाद .

    ReplyDelete