Pages

Sunday 15 March 2020

'दुर्ग'वाटा 'धाक'वाटा


नाळेतल्या अजस्त्र धोंड्यांवरून उतरताना निघालेलं घामटं, आभाळात घुसलेल्या रौद्र कातळकड्यात खोबण्या जोखत स्वतःला खेचताना छातीत वाढलेली धडधड, शांत प्रसन्न राऊळात जाणवणारी ऊर्जा, डोंगरनाळेच्या तळाशी रांजणखळग्यातल्या गारेगार पाण्याची अवीट गोडी, शिशिर ऋतूच्या पानगळीतून चालताना येणारा चर्रर्र-चर्रर्र आवाज, गारेगार धुक्याच्या लाटांमुळे अंगावर आलेला काटा, नजरेत मावणारा अफाट सह्याद्रीपसारा, घाटाच्या पायथ्याशी अंधारात हरवलेल्या वाटा, अंधाऱ्या राती आभाळातल्या नक्षत्रगणांची लुकलुकणारी रांगोळी आणि ट्रेकरदोस्तांसोबतच्या निवांत गप्पा - अश्या रंगत गेलेल्या 'दुर्ग'वाटा 'धाक'वाटा!
(वरील फोटो: अमेय)

'दुर्ग'वाटा 'धाक'वाटा म्हणजे सह्याद्रीधारेवरच्या दुर्ग आणि ढाकोबा नावाच्या शिखरांची दाऱ्या आणि खुटेदार या आडवाटांनी परिक्रमा!
               
भटकंतीची सुरुवात करायची होती घाटमाथ्यावर 'दुर्ग' शिखरापाशी. भल्या पहाटे पुण्यातून गाडी दामटली. अनेकदा ठरवून काही-ना-काही कारणाने राहून गेलेला हा ट्रेक. त्यामुळे, ट्रेकच्या दिवशी पहाटे नेहेमीचे ट्रेकर सवंगडी साकेत, पियुष आणि अमेय भेटल्यावर गप्पा रंगल्या. जुन्नरपाशी डोंगरांमध्ये चौफेर विखुरलेल्या पुरातन लेणींचा अंदाज घेतला. आपटाळेपाशी नाणेघाट रस्ता सोडून, डावीकडे इंगळून-दुर्गवाडीच्या रस्त्याला लागलो. मीना नदीवर रेंगाळलेल्या धुक्याच्या लाटांमागे डोंगराआड सुर्व्या उगवला.

आसमंताला अजूनही जाग यायची होती. मीना नदीच्या बंधाऱ्याच्या शांतनितळ पाण्यात धुकं-डोंगराचं प्रतिबिंब छेदत, एखादा खंड्या सूर मारत होता.

इंगळूणमधून भिवाडे रस्ता सोडून डावीकडे दुर्गवाडीकडे जाणारा घाटरस्ता घेतला. पल्याड मीना खोरे आणि शंभू डोंगर कोवळ्या उन्हात न्हाऊ लागलेले.

दुर्गवाडी गाठली. पुढे कच्च्या रस्त्याने थेट 'दुर्ग' शिखराजवळ गाडी पोहोचली. झाडीभरल्या समोरच्या कातळांच्या समूहाचं नाव 'दुर्ग' असलं, तरी तिथे 'दुर्ग' म्हणावं असं काहीच नाही. घाटवाटांच्या ट्रेकनंतर इथल्या देवराईनं मढवलेल्या दुर्ग शिखराचं आणि पायथ्याच्या राऊळातल्या दुर्गामाऊलीचं दर्शन आम्ही घेणार होतो.

दुर्ग ते ढाकोबा चाल
सकाळचे ९. पाठपिशव्या चढवून रानात चरायला निघालेल्या गायी-शेळ्यांच्या सोबतीने ट्रेकची सुरुवात केली. आमच्या ट्रेकर चौकडीला साथ द्यायला, दोन भुभ्यांची जोडीही सोबत निघाली. उंची समुद्रसपाटीपासून १११० मी.

दण-दण-दण अश्या जेसीबीच्या आवाजाने कानठळ्या बसल्या. दुर्गपासून ढाकोबाला जाणाऱ्या जुन्या शांत पाऊलवाटेवर, जीपरस्ता खोदायचं काम चाललेलं. हा अनवट डोंगरपट्टा तथाकथित विकासाचा बळी पडणार, या जाणिवेने अस्वस्थ झालो.

दुर्गला डावीकडे ठेवत उभ्या उतारावरून ओढ्यापाशी पोहोचलो आणि जगाचा गोंगाट मागे पडत गेला. पाठीमागे वळून पाहिलं, तर 'दुर्ग'माथा झाडीनं मढवलेला.

तर समोर, ओढ्यापल्याड ढाकोबा माथा खुणावू लागलेला. गारेगार वारं खात धम्माल आडवी वाट चालत, दुर्ग आणि ढाकोबा पठारं वेगळी करणाऱ्या थोरल्या ओढ्याजवळ पोहोचलो. उंची समुद्रसपाटीपासून १००० मी.

ओढ्यात रांजणखळग्यांमध्ये शंखनितळ पाणी. पाण्यावर पाणनिवळयांची गरगर करत लगबग चाललेली. पाण्याच्या आरश्यात ढाकोबाचं शिखर आपली छबी न्याहाळत होतं. गारेगार पाण्याचे घोट घेत काही क्षण आसमंत अनुभवला.
 (फोटो श्रेय: साकेत)
 
पल्याड पाणथळीमध्ये 'रानतेवण'(Marsh Carpet) फुलांची नाजूक नक्षी बहरलेली. नाजुकश्या फुलांवर कोवळी सूर्यकिरणे उजळलेली.

ओढ्यापासून ५० मी चढाई करुन पठारावर आलो. ढाकोबा शिखरापासून सोंड दक्षिणेला - आमच्यासमोर उजवीकडे उतरत आलेली. थेट ढाकोबा शिखराकडे न जाता, आम्हांला आधी ढाकोबा देवळापाशी जायचं होतं.
(फोटो श्रेय: साकेत)

पठारावरून ढाकोबा राऊळ गाठायचं होतं. आधी इथल्या भूगोलाचा अभ्यास केला नसेल, तर वाट शोधण्यास थोडं गोंधळायला होऊ शकेल. पठारावरुन पूर्वेला जात, गच्च झाडीभरल्या डोंगरसोंडेला ओलांडणारी मळलेली गारेगार वाट आम्हांला ढाकोबा राऊळापाशी घेऊन गेली.

माळावर मंजिऱ्यांची रांगोळी विखुरलेली. त्यावर भ्रमरांची लगबग चाललेली. पल्याड कौलांनी शाकारलेले ढाकोबा मंदिर दिसू लागले. सकाळचे १०४५. उंची समुद्रसपाटीपासून ११०० मी.
  (फोटो श्रेय: साकेत)

कौलारु राउळासमोर समाध्यांचे दगड, दगडी दीपमाळा आणि जुन्या राऊळाच्या आधाराचे कोरीव खांब. पाठीमागे ढाकोबा शिखर १०० मी उठावलेले.

गाभाऱ्यात देव्हाऱ्याची नक्षीदार लाकड़ी महिरप आणि त्यात शेंदूरचर्चित अनघड देवता - ढाकोबा. पलिकडे भैरव-भैरवीची लाकडी मूर्ती आणि अस्पष्ट वाघरू शिल्प. अठरा वर्षांपूर्वी ढाकोबाचं दर्शन घेतलं, तेंव्हा जाणवलेली ऊर्जा पुनःश्च जाणवली. खरंच, भोळ्या भक्तिभावानं नवस करणाऱ्या गिरीजनांना आधार देणारी अशी अनेक जागृत देवस्थाने सह्याद्रीच्या दुर्गम भागात आपल्याला बघायला मिळतात.

बाहेर ओसरीत अनेक नंदीमूर्ती, नवसाचे पाळणे-बैलजोडी-घंटा-समया वाहिलेल्या. घंटानादाने प्रसन्न वाटले. थोडका कोरडा खाऊ-विश्रांती घेऊन तुकडी तरतरीत झाली.
  (फोटो श्रेय: साकेत)

आता वेध लागलेले ढाकोबा शिखर गाठायचे. ढाकोबा राऊळापासून उत्तरेला २०० मी पठारावरून आडवं चालत गेलो. समोर आंबोली गावाकडे जाणारी वाट सोडून, डावीकडे झाडीभरल्या सोंडेवर आरुढ झालो. पश्चिमेला ५० मी झाडीतून चढणारी वाट सड्यावर घेऊन गेली. जिकडे बघू तिकडे बेसाल्ट खडकांचा अक्षरश: 'सडा' पडलेला. लाखों  वर्षांपूर्वी ज्वालामुखीय घडामोडी घडताना, सह्यमाथ्याजवळ हे भूविशेष बनलेलं असावं. पहा दृकश्राव्य:

             
सड्यावरून ढाकोबाच्या धारेवरुन माथ्याच्या ३० मी खाली पोहोचलो. माथ्याकडे थेट चढणे अडचणीचे असल्याने, माथा डावीकडे ठेवत आडवं जात आंबोलीकडून चढणाऱ्या वाटेपाशी पोहोचलो. उभी घसरडी घसारा-कातळ वाट चढून ढाकोबा माथ्यावर पोहोचलो. उंची समुद्रसपाटीपासून १२४४ मी. वेळ ११४५.

माथा गाठला, अन् क्षणभर नजरच फिरली. कारण नजर एकदम कोसळली थेट ११०० मी खोलवर कोकणात. १२६४ मी उंचीचा ढाकोबाचा माथा म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य रांगेतलं मुख्य शिखर आहे. पश्चिमेला कोकण, पूर्वेचं मीना खोरं, उत्तरेला कळसूबाई रांगेपासून रतनगड, हरिश्चंद्रगड, नाणेघाट, नानाचा अंगठा, जीवधन, वानरलिंगी, आजोबा. ईशान्येस चावंड, दक्षिणेस कोकणात बुटके गोरखगड-मच्छिंद्र, आग्नेयेस दुर्ग असा विपुल प्रदेश नजरेत केवळ मावतच नाही. ठिकाण मोक्याचं असलं, तरी इथं दुर्ग बांधला नाहीये. कारण शिखरमाथा अगदीच अपुरा आणि उतरत्या कातळाचा आहे. पाण्याचा अभाव आहे. सह्याद्रीच्या अफाट पसाऱ्याचं दर्शन घेऊन भारावून गेलो.


ढाकोबा ते दाऱ्या घाट सुरुवात 
ढाकोबा शिखरावरून घसरड्या उतरंडीवरून निसटत, पूर्वेला जाणारी मळलेली पावठी घेतली. गच्च कारवीतून मोकळवनात आलो. पठारावरून आंबोली गावाकडे न जाता उत्तरेला दाऱ्या घाटाची खिंड थेट गाठता येईल का, याची चाचपणी करण्यात अर्धा तास मोडला. अखेरीस आंबोलीच्या मळलेल्या वाटेनेच उतराई सुरु केली. ओढ्याच्या रेंगाळलेल्या पाण्यामागे ढाकोबा शिखर डोकावत होतं. उंची समुद्रसपाटीपासून ११४० मी.

ओढ्याच्या पोटातल्या गुहेजवळून जात, झपाट्याने वाट उतरू लागली. उंची समुद्रसपाटीपासून १००० मी.

ढाकोबा शिखरापासून ४०० मी उतरल्यावर पठारावर पोहोचलो. उंची समुद्रसपाटीपासून ८५० मी. पाठीमागे ढाकोबाच्या डोंगर-झाडीचं सुरेख दृश्य होतं, तर समोर आंबोली गाव १०० मी अजून खाली उतरल्यावर आलं असतं.

दाऱ्या घाटात पोहोचण्यासाठी आम्हांला आंबोली गावाकडे जायची गरज नव्हती. पठारावरून डावीकडे आडवं निघालो आणि आंबोली गावातून घाटाकडे चढणाऱ्या वाटेला मिळालो. वळणां-वळणांची खडकाळ वाट झाडीमधून, ओढ्याच्या काठावरून दाऱ्या घाटाच्या खिंडीत घेऊन गेली. वेळ २:१५.

आंबोली घाट/ दाऱ्या घाट उतराई:
- घाटमाथ्यावरचे गाव: आंबोली, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- कोकणातले गाव: धसई, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- परिसरातील शिखरे/दुर्ग/ लेणी: दुर्ग, ढाकोबा शिखरे.
- स्थानवैशिष्ट्य: आंबोली ते जुन्नर या मीना नदीच्या खोऱ्यातून कोकणात डोकावणारी घळ
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: नाळेत खोदीव पावठ्या ट्रेकर्सनी नोंदवल्या आहेत.
- वाटेत पाणी: घाट उतरायला लागल्यावर माथ्यापाशी झरा फेब्रुवारीपर्यंत, घाटाच्या तळाशी रांजणखळग्यांमध्ये.
- तांत्रिक कातळारोहण: नाही.
- वाटाड्या: आवश्यकता नाही. ट्रेकर्सना भूगोल अभ्यास करुन, स्वतः जाता येईल.
- निवारा: माथ्याजवळ आंबोली गावात. पायथ्याशी इस्तेची वाडी-सिंगापूर गावात.
- उतराई: ७५० मी
- वेळ: ३ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

घाटाच्या माथ्याजवळ खिंडीत अनघड देवता. उंची समुद्रसपाटीपासून ९५० मी.

घरुन बांधून आणलेली शिदोरी सोडली. थोडकी विश्रांती घेऊन तुकडी तरतरीत झाली. दुपारी ३:३० ला घाटउतराईला सुरु केली. कातळकडे आणि झुडुपी उतारांनी २७० अंशात गुरफटलेल्या नाळेच्या मुखापासून कोकण-दरीचे खोलवर दर्शन झाले.


खिंडीपाशी घाट चढून आलेले दोन गावकरी भेटले. "ह्ये आस्स तासाभरात हाणाल अंतर. खाली गेलो का, डाव्या अंगाची वाट घेऊ नको. ह्यो जेवायच्या अंगाला वाट घावेल पघा." असा सल्ला मिळाला.

उतरायला सुरुवात केली, की नाळेच्या उजवीकडून थोडकी पावठी सुरू झाली. झुकलेल्या उंबराच्या झाडाखाली खळग्यात जिवंत झऱ्याचं पाणी सुखावून गेलं. पहा दृकश्राव्य:


दाऱ्या घाट म्हणजे ढाकोबाच्या उत्तरेच्या नाळेतून उतरत जाणारी वाट. सोबत होती अजस्त्र कातळकड्याचे थर आणि त्याच्यावरून निसटणारी सूर्यकिरणे.

नाळेचा उभा उतार उतरताना, उजवीकडच्या कातळभिंतीचा आधार घेत होतो. एके ठिकाणी कातळाला बिलगलेलं हे विश्व बघून थक्क झालो. डोंगरात फिरताना गोगलगाई-शंख बघितले असतात. सह्याद्री नाळेतल्या कातळभिंतीवरचं विश्व थक्क होऊन बघत राहिलो...

ढाकोबाच्या पश्चिमेचे-उत्तरेचे अजस्त्र कडे, काळाकभिन्न बेसाल्टचे थरांवर थर आणि त्यांना बिलगून उतरणारी सूर्यकिरणे भव्य दिसत होती.
(फोटो श्रेय:अमेय)

पहा दृकश्राव्य:

तळपणाऱ्या कातळकडयांमधून कोणी पूर्वजांनी दळणवळणासाठी घाटवाट काढली असेल. किती व्यापारी-भिक्षू-माणसं-जनावरे-श्वापदे इथून गेली असतील. किती सुख-दुःखांची साथ या वाटेने दिली असेल.
  (फोटो श्रेय: साकेत)

एका वळणावर कसलीतरी दुर्गंधी आली. पलिकडे कुजत पडलेला थोरल्या हुप्प्याचा सापळा. नैसर्गिक अंत, की कोण्या श्वापदाची शिकार कोणास ठाऊक!
पाठीमागे अरुंद नाळेच्या माथ्याकडे होतं कातळ-झाडी, सूर्यकिरणे आणि निळ्या आभाळाचं दृश्य!
         
जेमतेम ५० मी उतराई झाल्यावर पाऊलवाट संपली. नाळेतल्या प्रवाहातून उतराई सुरु झाली. छोट्या चिपा, डुगडुगणारे दगड याचं न संपणारे आवर्तन. 
 (फोटो श्रेय:अमेय)


अवाढव्य धोंड्यांमधून उतरताना पायांवर-गुडघ्यांवर अशक्य ताण येऊ लागलेला. नाळेतून उतराई काही केल्या संपत नाही.

धों-धों बरसणाऱ्या पर्जन्याचं पाणी खळाळत निघणाऱ्या नाळेतून कोकणात उतरणारी ही वाट. आता माणसं जातात म्हणून वाट म्हणायची. सत्तेत येणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्याने जुन्नर-आंबोली गावकऱ्यांना इथून घाटरस्ता काढून, माळशेज घाटाला पर्यायी जवळचा रस्ता बनवण्याची स्वप्ने दाखवलीयेत. घाटरस्ता बनवण्यासाठी इथली भूरचना-उतार सुयोग्य नाही. मोठाले बोगदेच काढावे लागतील.


नाळेतून उतरत जाताना मागे वळून पाहिल्यावर, दोहो बाजूंच्या कातळभिंती आभाळात गेलेल्या. धोंड्यांवरुन उतरुन ट्रेकर मंडळी धपापली होतीच. दम खाताना सोबतचे भुभेसुद्धा एकमेकांची विचारपूस करत होते.

पदरातल्या जंगलाच्या टप्प्यातून जाताना. वाजलेले ५. उंची समुद्रसपाटीपासून ३५० मी.

उजवीकडे दक्षिणेला ढाकोबा शिखर आणि त्याचे कातळकडे अतिभव्य दिसत होते.

नाळेतून उतरून जीव कावलेला. नाळेमध्ये ३० फुटी कड्याने वाट अडवली. कुंडात गारेगार पाणी होतं. डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर निष्फळ घुसखोरी करून बघितली. अखेरीस, उजव्या बाजूने घुसखोरी केल्यावर मळलेली वाट मिळाली.

मध्येच घाटरस्त्यासाठी सर्वेक्षण केल्याचे दगड आढळले. मोकळवनात आलो, तेंव्हा वाजलेले ६:३०. पाठीमागे दाऱ्या घाटाचे अफाट दृश्य!

घाटाच्या पायथ्याशी सपाटीवर पोहोचलो. उंची समुद्रसपाटीपासून २२० मी. दाऱ्या घाटाची ७५० मी उतराई केलेली. उत्तरेला नाणेघाट, जीवधन हाकेच्या अंतरावर आलेले. पायथ्याशी वाटा विकासकामांमुळे हरवलेल्या. अंधार पडू लागलेला. टॉर्चच्या प्रकाशात वाट शोधत धडपड केली. ओढ्याच्या काठी मुक्कामाला असलेल्या आदिवासींनी वाघवाडीच्या वाटेला लावलं.

किर्रर्र अंधारलेलं. वाघवाडीतल्या एका टुमदार घराबाहेर लायटिंगच्या माळांची झगमग होती. 'तानाजी वरे' यांचे घर. चहा-पाण्यासह स्वागत झालं. २०१६मध्ये वरे यांच्या घरातल्या महिलेला नरभक्षक बिबट्याने ठार केल्याचं ऐकल्यावर धक्काच बसला (मटा बातमी). निसर्ग-मानवातला जगण्याचा संघर्ष अस्वस्थ करून गेला.

मुक्कामासाठी आम्हांला रामपूरला जायचं होतं. तानाजीदादांनी फोन करून, धसईच्या एकनाथ पवारांच्या जीपड्याची सोय केली. अर्ध्या तासात रामपूर गाठलं. गावकऱ्यांनी अगत्याने चौकशी आणि मदत केली. गावाच्या टोकाला वाटाड्या तानाजीमामांचं घर शोधलं. रुचकर जेवणाची सोय झाली. दुर्ग-ढाकोबा दर्शन घेऊन, दाऱ्या घाटाने उतराई करण्याची जबरदस्त ट्रेक मेजवानी कशी मिळाली,अश्या पहिल्या दिवशीच्या ट्रेकच्या गप्पा रंगल्या. रामपूरच्या मारुतीमंदिरात निवांत झोपी गेलो.

खुटेदार: उभ्या सह्यकड्यावरून थरारक चढाई
- कोकणातले गाव: रामपूर, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- घाटमाथ्यावरचे गाव: दुर्गवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- परिसरातील शिखरे/दुर्ग/ लेणी: दुर्ग, ढाकोबा शिखरे. गणपती गडद लेणी.
- स्थानवैशिष्ट्य: जीवधन-नाणेघाट परिसरालगतची दुय्यम घाटवाट. पण, नक्कीच ऐतिहासिक वापरातील.
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: उभ्या कातळात ठिकठिकाणी खोदलेल्या खोबण्या-पावठ्यांच्या रांगा
- वाटेत पाणी: नाही.
- तांत्रिक कातळारोहण: सोप्या श्रेणीचे अनेक कातळारोहण टप्पे. दृष्टीभय आहे. तांत्रिक कातळारोहण साहित्याची गरज नाही. पावसाळा टाळावाच. उतराईपेक्षा चढाई बरी.
- वाटाड्या: सोबत असावा.
- निवारा: पायथ्याशी रामपूर गावात हनुमान मंदिर. माथ्याजवळ दुर्गवाडी गावात किंवा दुर्गमाऊली राऊळ  परिसरात.
-चढाई: ११०० मी
- वेळ: ३.५ तास

उजाडायच्या आधीच खुटेदाराच्या वाटेचे वेध लागलेले. मध्यरात्री एक ग्रुप गोंगाट करत मंदिरात मुक्कामाला आला. त्यांना आमच्यासोबत यायचं होतं. खुटेदारच्या अवघड टप्प्यांवर, मोठ्या गोंगाट तुकडीसोबत वाहतूककोंडीत अडकायची आमची इच्छा नसल्याने, त्यांना विनम्र नकार दिला. सकाळी ७ वाजता तानाजीमामांना सोबत घेऊन कूच केलं. उंची समुद्रसपाटीपासून १०० मी.

रामपूरच्या वावरातून सह्याद्रीची ८००-९०० मी उंचीची कातळभिंत बघताना, त्यातून चढणारी वाट असू शकते यावर विश्वास बसेना. वाट नक्की कशी चढेल, यावर ट्रेकर्समध्ये दोन वेगवेगळी मतं. वाटाड्या तानाजीमामांनी डावीकडे उतरणाऱ्या दांडाकडे लक्ष वेधलं. कुठल्याश्या झाडाची-खडकाची खूण दाखवत भलतीकडून वाट दाखवली. एकंदर खुटेदाराच्या चढाईची उत्सुकता मनात दाटलेली.

उजवीकडे नैऋत्येला डोंगरबेचक्यात डोणीदार-पोशीची नाळ-माडाची नाळ अश्या आडवाटा कुठून चढत असतील, याचा अंदाज घेतला.

रामपूरपासून मंद चढाईची वाट चढत हळूहळू कातळभिंतीकडे वाटचाल सुरु केली. किंचित डावीकडे तिरकी चढणारी उभी वाट चढून थोरल्या धोंड्यापाशी पोहोचलो. वेळ ८. उंची समुद्रसपाटीपासून २५० मी.

दाट झाडीतून चढणारी उभी वाट उजवीकडे चढत गेली. खुटेदाराचा पहिला कातळटप्पा दिसू लागला. कातळकड्यावर पोहोचण्याआधी निसटती आडवी वाट होती. उंची समुद्रसपाटीपासून ३५० मी.

खोदीव पायऱ्या आणि मोक्याच्या जागी खोदलेल्या खोबण्या वापरून कातळचढाई सुरु केली. वेळ ८४५.
 (फोटो श्रेय:अमेय)

जिथे आधार नाही, तिथे एक लाकडाचा खुंटा अडकवला होता. याच्यामुळेच वाटेचं नाव खुटेदार असावं का! पहा दृकश्राव्य:
 
             


अधून-मधून येणाऱ्या कातळटप्प्यांवर खोदलेल्या पावठ्या मोठ्या कुतूहलाने नोंदवत होतो.

हा खुटेदाराचा दुसरा मोठ्ठा कातळटप्पा.

खुटेदार अक्षरश: शेकडो वेळा चढ-उतार केलेले तानाजी मामा.

खोदीव पावठ्यांचा अंदाज घेत काळजीपूर्वक वाटचाल चालू ठेवली.

थोरल्या कातळकड्याच्या पोटातून जाताना, माणूस किती छोटा पण कशी कातळ-उंचीवर मात करतो, याची जाणीव झाली.

 (फोटो श्रेय:अमेय)

पाठीवरचे बोजे सांभाळत, डावीकडे-उजवीकडे आधार घेत, आडवं-तिरपं चढत रहायचं. खाली बघितलं, की नजर भिरभिरते - आधी कातळ-गवत टप्पे, मग झुडुपं, त्याखाली जवळचा झाडीटप्पा आणि याखाली मात्र खूप खोल तळाशी असलेली झाडी.
 (फोटो श्रेय:अमेय)

 (फोटो श्रेय:अमेय)


कोण्या पूर्वजांना इथल्या वाटेची गरज होती, त्यांनी कातळावर जीव लावलेला. अडचणीच्या एखाद्या टप्प्यावर पुन्हा एकदा एका रांगेत तिरक्या पावठ्या खणत नेलेल्या.


एकापाठोपाठ येणाऱ्या कातळकड्यांवरील अडचणीची चढाई करुन साकेत शेवटी त्रासून म्हणाला, 'अरे हा खुटेदरा कसला, कुठे-धरा घाट आहे'.

खुटेदार तांत्रिकदृष्टया कठीण नाही. पण, काही पथ्ये पाळली. कातळटप्पे चढताना फक्त समोरच्या आधाराकडे लक्ष ठेवायचं, तर खाली दरीकडे डोकावत बघायचं नाही. पाठपिशवीला फार हेलकावे द्यायचे नाहीत. कातळ तापायाच्या आत, सकाळी उन्हं डोक्यावर यायच्या आत कातळाची चढाई करायची. तुकडीतील सर्वांनी एकमेकांच्या दृष्टीक्षेपात राहायचं आणि हसत-खिदळत मार्गक्रमण करायचं.

माथ्याकडून उतरत आलेल्या दांडावर कारवीच्या झाडोऱ्याने भरलेला दांड दिसू लागला. आडवं जाऊन त्या दांडावरुन झाडीतून उभी चढाई असणार, हे निश्चित होतं.

सकाळी लवकर चढाई सुरुवात केल्याने ऊन्हाचा त्रास नव्हताच. वातावरण आल्हाददायक. खुटेदाराच्या शेवटच्या २०० मी चढाईस सुरुवात. इथे एक सुस्साट कातळकडा आमची वाट पाहत होता. वेळ ९४५.

पायऱ्यांचा जिना बघता, कोण्या राजवटीला इथे गुंतवणूक करायची गरज वाटलेली असणार. खुटेदार ही कोण्या शिकाऱ्याची-कोळ्यांची वाट नक्कीच नाही.

हातात चपला धरुन तानाजीमामा पावठ्यांवरून सराईतपणे चढू लागले. उभा कडा, दृष्टीभय असले तरी सुरेख पावठ्या असल्याने चढाईचा आनंद घेत होतो.
 (फोटो श्रेय:अमेय)

वाळलेल्या भुऱ्या गवताचे, तुरळक झुडूपी कारवीचे आणि कातळाचे कातळटप्पे आता डोक्यावर आलेले. १०० मी उंचावर घाटमाथा डोकावू लागलेला.

४५-५० अंशाची उभी चढाई. तांत्रिकदृष्ट्या कठीण नसली, तरी भरपूर घसारा आणि दृष्टीभय! चढताना खालच्या दरीकडे दुर्लक्ष करुन जाणं शक्य होतं, पण घाट उतराई करताना दरी दरडावणार हे नक्की!

खुटेदाराच्या शेवटच्या टप्प्यात आडव्या वाटेवरून ५० मी वाटचाल होती. उजवीकडे थोडका अंगावर येणारा कडा, पायाखाली गवताळ अरुंद पावठी अन काटेरी बुटकी झुडुपं, तर डावीकडे अशक्य थेट कोसळलेली दरी. पहा दृकश्राव्य:

     
खुटेदाराच्या शेवटच्या टप्प्यात गवताळ घसाऱ्याच्या टप्प्यावरून काळजीपूर्वक वाटचाल केली.
 (फोटो श्रेय:अमेय)

खुटेदार माथ्यावरून खाली डोकावून बघितलं. घसरड्या कातळ-गवताचे टप्पे, तुरळक झुडुपे. नजर गरगरत थेट १००० मी खोलवर गेली. घनदाट झाडोऱ्यावर पसरलेली सह्यधारेची सावली. दरीतून चढणारी बारीक ठिपक्यांसारखी दिसणारी माणसे पाहून, आपण या कड्यावरून चढून आलो यावर अजिबात विश्वास बसेना.

बरेच वर्षं वाट पाहायला लावलेली खुटेदाराची वाट चढून घाटाच्या मुखापाशी आल्यावर मस्त ट्रेकमुळे तुकडी खूष झालेली. वेळ १०३०. उंची समुद्रसपाटीपासून १०९० मी.

घाटमाथ्यावरचं मंद वारं सुटलेलं. सोनसळी गवतावर कोवळं ऊन खात कितीतरी वेळ निवांत पहुडलो. चुकार भुंग्याच्या गुणगुणण्याने जाग आली आणि ५० मी टेपाड चढून दुर्ग-माथ्याकडे निघालो. 

शांतप्रसन्न देवराईतलं दुर्गामाऊलीचं राऊळ. आता आधुनिक पद्धतीने बांधलेले राऊळ आणि आसपास झालेल्या भाविकांसाठीच्या विकासखुणा.  वेळ ११.

अठरा वर्षांपूर्वी २००१ला इथे साधं नेचाच्या पानांनी शाकारलेलं राऊळ होतं. त्यात केलेल्या मुक्कामाच्या आठवणी जाग्या झाल्या.
13_JunnarBhimashankar_DiscoverSahyadri.JPG
 
दुर्गामाऊलीच्या शेंदूरचर्चित तांदळ्याचं दर्शन घेऊन, अजूनही तितकंच शांत-प्रसन्न वाटलं. मूळच्या अनघड तांदळ्याला चांदीचे डोळे, नथ आणि मंगळसूत्राने मढवून माऊलीचं रुपडं पुजिलं होतं.

१० मिनिटात 'दुर्ग' कातळमाथ्यावर पोहोचलो. उंची समुद्रसपाटीपासून ११९० मी. दुर्ग-किल्ला म्हणावं, अश्या कुठल्याच खुणा नाहीत. बेसाल्ट दगडांचा समूह, ज्वालामुखीय घडामोडी घडताना बनलेला. दुर्ग म्हणजे काळ्या कातळांचा नुसता समूह. दुर्गला ‘दुर्ग’ म्हणण्यासारखं इथं काहीच नाही. तटबंदी, पाण्याची खोदीव टाकी, जुन्या वास्तूंचे अवशेष, मेटं, मंदिरं, तोफा, बुरूज, कोरीव गुहा, शिलालेख...असं गडाचं गडपण सांगणारं इथं काहीच नाही.

दुर्गच्या कातळमाथ्यावरून चहुंबाजूस डोंगरदऱ्या, झाडांची विलक्षण रचना दिसते. माथ्यावर कातळावर पाणी वाहून जाण्याकरता पन्हळीसारख्या खुणा, आसरा निर्माण करण्यासाठी खांब उभे करण्यासाठी खड्ड्यांच्या खुणा आहेत. अर्थात या मानवनिर्मित की नैसर्गिक हे ठरवणं कठीणच! खुटेदार या अवघड घाटाचा रक्षक. घाट तसा दुय्यम, त्यामुळे गडही दुर्लक्षिलेला.

झक्कास ट्रेकची आता सांगता करायची वेळ झालेली. दुर्गमाऊलीचा आशीर्वाद घेऊन, गाडीपाशी आलो. दुर्गवाडीवरुन परत निघाल्यावर, डावीकडे गावाजवळ एक निसर्गनवल आहे. साधारण खडकावर दुसऱ्या दगडाने आघात केल्यावर बद्द आवाज येतो. मात्र इथल्या खडकांवर दुसऱ्या दगडाने आघात केल्यावर, धातूसारखा आवाज आला. पहा दृकश्राव्य:

         

येताना, महामार्गावर ट्रेकर्सचे राष्ट्रीय खाद्य मिसळीचा बेत जमवला.

ट्रेकवरुन परत निघालो, तरी मनात कितीतरी दृश्ये रेंगाळलेली - देवराईनं वेढलेल्या दुर्गची, कोसळलेल्या खोल कड्यांचा धाक दाखवणाऱ्या ढाकोबाची, ढाकोबावरुन चौफेर दिसणाऱ्या सह्याद्रीमंडळाची, दाऱ्या घाटाच्या अजस्त्र नाळेची-धोंड्यांची आणि उभ्या कातळातून खोदीव पावठ्यांच्या 'खुटेदार'च्या थरारचढाईची!

एके क्षणी आठवलं खुटेदाराची अवघड चढाई संपल्यावर, कधी काळी कोण्या भाविकाने घाटदेवाला रानफुलांचा तुरा आणि नाणं वाहिलेलं. 'दुर्ग'वाटा 'धाक'वाटा ट्रेकच्या भन्नाट अनुभूतीसाठी आमच्या मनातही अशीच कृतज्ञता होती.
(फोटो श्रेय: साकेत)

------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, अमेय जोशी, पियुष बोरोले, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, अमेय जोशी, साईप्रकाश बेलसरे
३. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
४. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२०. सर्व हक्क सुरक्षित.


8 comments:

  1. Khup mast Trek Sumeet aani tuze Likhan tar khupach bhannat... Sobat photo Aani Video chi phodani... mast jamlay blog mitra

    ReplyDelete
  2. Dear Sai, nicely narrated, gave the feeling of actual participation with you.
    Want to mention that climbing in this route is little easy than descending.
    You made me remember our reverse trek long back.

    ReplyDelete
  3. झकास... वाचून मज्जा आली...
    मंदिरात काही "झ" दर्जाच्या पर्यटक मंडळींचा त्रास सोडला तर ट्रेक झकास पाडलेला दिसतोय ...
    तानाजी मामा गेली "य" वर्षे खुटेदार चे कार्यरत आहेत...
    ब... ढि... या...

    ReplyDelete
  4. दर्जेदार व ओघावती लेखनशैली.१८नोव्हेंबर २०१९ला मित्रासोबत केवळ जुजबी माहितीच्या आधारे बेत आखुन रामपुर मागाठुन खुटेदराने चढाई करून-दुर्ग/ढाकोबा वनंतर दारया घाट उतरून दोन दिवसाची भटकंती केली होती.सुरूवातील ३तास वाट चुकुन ते भरकटलो होतो व उन्हात खुटेदरा चढताना हाल झाले होते.वर पुन्हा माथ्यावर भरकटलो होतो.असो तेव्हापासुन खुटेदराने मनावर मोहिनी केली आहे.त्यानंतर९डिसेंबरमध्ये डोणी/त्रिगुणधाराने घाटाने चढाई करून खुटेदरा घाटाने उतरून आलो.या घाटवाटा खुप थरारक,आव्हानात्मक व कसोटी पाहणारया आहेत.व मनाला आनंद देणारयाही होते.माथ्यावरचा प्रदेश शांत व नयनरम्य आहे.पुन्हा पुन्हा इथे यावस वाटत.

    ReplyDelete
  5. खूप छान वर्णन आणि लिखाण.

    ReplyDelete
  6. खूप सुंदर वर्णन. मी ९ वी मध्ये असताना 1995 मध्ये हा ट्रेक केला होता. आता खरं वाटत नाही.

    ReplyDelete
  7. दादा अप्रतिम लिखाण आणि वाचताना प्रत्त्यक्षात आपणच ह्या घाटवाटांची भटकंती करतोय ह्याची जाणीव होते 👌👍

    ReplyDelete
  8. अप्रतिम लिखाण 💯

    ReplyDelete