Pages

Thursday 30 April 2020

सह्याद्री डोंगररांगा


भूगोल क्लिष्ट, म्हणून उगाच बाऊ केलेला. भूगोल महाराष्ट्राचा असेल, म्हणजे दगड-धोंडे-नकाशे इथे संपत नाही, तर हा आहे सिंधुसागर, सह्याद्री आणि सुजल-नद्यांनी घडवलेला रांगडा, रसरशीत आणि रंजक पट! सह्याद्रीचा कणा दक्षिणोत्तर पसरला असला, तरी घाटमाथ्यापासून पूर्वेला तीन मुख्य डोंगररांगा पसरल्या आहेत. त्यांची नावं - सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. तर, घाटमाथ्यापासून कोकणात पश्चिमेला पसरलेल्या डोंगररांगांपैकी माथेरान डोंगररांग मोठी आणि महत्त्वाची. चला तर मग, सह्याद्रीतल्या डोंगररांगांची ओळख करून घेऊ.
                              
१. सातमाळा अजिंठा डोंगररांग
नाशिक जिल्ह्याच्या वायव्येस हातगडपासून सुरुवात होऊन पूर्वेला औरंगाबाद जिल्ह्यात जाणारी 'सातमाळा अजिंठा' डोंगररांग सलग नसून तुटक स्वरुपात आहे. धुळे (गाळणा डोंगर), नांदेड (निर्मल डोंगर), औरंगाबाद (वेरूळ डोंगर), हिंगोली (हिंगोली डोंगर), नांदेड (मुदखेड डोंगर) आणि यवतमाळ (पुसद टेकड्या) या थोड्या तुटक फांद्या पण भौगोलिकदृष्ट्या सातमाळा-अजिंठा रांगेचाच भाग आहे. पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने वर्षात ९०० मिमी पाऊस होतो, त्यामुळे इथे उष्णकटिबंधीय पानझडी वने आणि विषम कोरडे हवामान असतं.
    
नाशिक जिल्ह्यात 'सातमाळा रांग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगररांगेत, शक्तिपीठ सप्तश्रुंग देवी आणि अहिवंत, धोडप, कांचन, इंद्राई, असे काही उत्कृष्ट दुर्ग आहेत. मोहनदर दुर्गावरील डोंगराला आरपार पडलेले विशाल नेढे आणि दुर्ग धोडपची डाईक आणि ज्वालामुखीय स्तंभ विशेष आहेत. अनेक दुर्ग आणि डोंगरयात्रा  ट्रेकर्सना खुणावतात.


ही डोंगररांग औरंगाबाद जिल्ह्यात 'अजिंठा रांग' नावाने ओळखली जाते. अजिंठा डोंगररांगेत घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, पाटणादेवी ही शक्तिपीठे; जगात सर्वोत्तम अशी कातळलेणी अजिंठा, वेरूळ, पितळखोरे; गौताळा आणि औट्रमघाट अभयारण्य आणि अंकाई, देवगिरी, अंतुर, सुतोंडा, वेताळवाडी असे काही उत्कृष्ट दुर्ग आहेत.
     
या डोंगररांगेने उत्तरेकडील तापी या पश्चिमवाहिनी नदीचे आणि दक्षिणेकडील गोदावरी या पूर्ववाहिनी नदीचे खोरे वेगवेगळी केलेली आहेत. त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर व संपूर्ण मराठवाडयातील जिल्ह्यांमधून जात महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे सुजलाम-सुफलाम करते. दारणा, प्रवरा, मुळा, पूर्णा, प्राणहिता, सिंदफणा, मांजरा, दुधना, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्यांमुळे गाळाची सुपीक मृदा आणि काळी मृदा असल्याने हे खोरे सुपीक आहे.  

सुरतेची लूट घेऊन महाराज स्वराज्यात परतताना झालेल्या लढाईची साक्षीदार कांचनबारीची लढाई आणि दिलेरखानाला जेरीस आणणाऱ्या रामजी पांगेरांचा दुर्ग 'कण्हेरा' याच डोंगररांगेत. त्र्यंबकेश्वर हा गोदाथडीचा स्वामी. ही भूमी प्रभू रामचंद्राची, सप्तश्रुंगी देवीची, महाराष्ट्राचे पहिले राज्यकर्ते 'सातवाहनां'ची आणि ज्ञानेश्वरांची-एकनाथांची!  

अशी ही सातमाळा-अजिंठा डोंगररांग!!!

२. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग
पुणे-नाशिक महामार्गाचा प्रवास अजून किती वर्षे रटाळ-रेंगाळणारा राहणार, कुणास ठावूक! त्यामुळे, या प्रवासात आपण महाराष्ट्रातील तीन मुख्य डोंगररांगांपैकी एक 'हरिश्चंद्र बालाघाट' डोंगररांग कधी ओलांडतो, हे लक्षातही येत नाही. तर चला ओळख करून घेऊयात 'हरिश्चंद्र बालाघाट' डोंगररांगेची. 

पश्चिम-मध्य महाराष्ट्रात उठवलेली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग अहमदनगर जिल्ह्याच्या वायव्येस हरिश्चंद्रगडापासून सुरुवात होऊन, अहमदनगरजवळून पुढे आग्नेयेस उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यापर्यंत आणि पुढे हैद्राबादपर्यंत पसरलेली आहे. मात्र, ही रांग सलग नसून तुटक स्वरुपात आहे आणि तिची उंची आग्नेयेस कमी होत जाते. 

अहमदनगर जिल्ह्यात 'हरिश्चंद्रगड रांग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगररांगेत - हरिश्चंद्रगड आणि मांजरसुंबा (जि. नगर) हे दुर्ग, टाकळी ढोकेश्वर कातळलेणी आणि कळसुबाई- हरिश्चंद्र अभयारण्य हे ट्रेकर्सचे नंदनवन आहे. तर, नगर जिल्ह्याच्या आग्नेयेस कर्जत रेहेकुरी काळवीट अभयारण्य आणि माळढोक अभयारण्य आहेत. हरिश्चंद्र रांगेत लाव्हापासून बनलेले बेसाल्ट खडकांचे ठळक भूविशेष दर्दी भटक्यांना नेहमीच साद घालतात, मग तो हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा असो, गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल असो, बोरी गावची टेफ्रा नावाची ज्वालामुखीय राख; वडगाव दर्याचे लवणस्तंभ किंवा कुकडी नदीतील निघोज-टाकळी हाजीचे रांजणखळगे असोत. 


हरिश्चंद्र डोंगररांगेत पश्चिमेला हवामान थंड-कोरडेअसते आणि अतिवृष्टी होते. पण, उष्णकटिबंधीय पानझडी असलेला हा भाग मानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने उघडा-बोडका होत चालला आहे. हरिश्चंद्र बालाघाट परिसरात मेंढपाळ लोकांची वस्ती असून, ऋतूचक्रानुसार ते हालचाल करताना हमखास दिसतात.

बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात बालाघाट म्हणून ओळखली जाणारी डोंगररांग ठिकठिकाणी सपाट डोंगरमाथ्याचा व रुंद खिंडींचा पठारी प्रदेश असून, कातळकडे आखूड होत जातात.  पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने बहुधा हा अवर्षणग्रस्त असतो. वातावरण मुख्यत:  उष्ण विषम कोरडे असते. पूर्व भाग मात्र अत्यंत खडकाळ आहे. बालाघाट डोंगररांगेत तुळजाभवानी आणि आंबेजोगाईची शक्तिपीठे आणि नळदुर्ग किल्ला आहेत.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने उत्तरेकडील पूर्ववाहिनी गोदावरी व दक्षिणेकडील पूर्व वाहिनी भीमा नदी या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी केलेली आहे. भीमाशंकरला उगम पावणारी भीमा नदीच्या खोऱ्यात पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग, नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही भाग सुजलाम-सुफलाम होतो. कुकडी, घोड, भीमा, भामा, आंध्रा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, नीरा अश्या उपनद्यांमुळे भीमा नदीचे खोरे गाळाची सुपीक मृदा आणि काळी मृदा असल्याने हे खोरे सुपीक आहे. भीमाशंकर हा भीमथडीचा स्वामी. सातवाहनांच्या पाऊलखुणा असलेला नाणेघाट, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी आणि महाराजांचे नेतृत्व-कर्तृत्व याच भीमेच्या खोऱ्यात सिद्ध झाले. तर हीच भीमा वाळवंटातून चंद्र्कोरीसारखी वळण घेते तिथे विठोबा अठ्ठावीस युगे विटेवरी उभा आहे, जो महाराष्ट्राच्या अध्यात्म, कर्तव्यधर्म आणि जीवनाच्या वारीचा सोबती-सारथी आहे. 

अशी ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग!!!

३. शंभू महादेव डोंगररांग:
दत्तमंदिराजवळ कातळात खोदलेलं जुनं पाण्याचं टाकं अजूनतरी रस्तारुंदीकरणातून बचावलंय ना, याची खात्री करत आपण खंबाटकी घाटाच्या खिंडीत पोहोचतो. ही खिंड वसलीये महाराष्ट्रातील तीन मुख्य डोंगररांगांपैकी एका - 'शंभू महादेव' डोंगररांगेत. चला तर मग, आज #मनाने_भटकंती करून येऊयात 'शंभू महादेव' डोंगररांगेची. 
            
पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेल्या रायरेश्वर पठारापासून सुरुवात होणारी ही डोंगररांग पूर्वेला जात सातारा जिल्ह्यात प्रवेशते. त्यानंतर, आग्नेयेस वळून शिखर-शिंगणापूरपर्यंत धावते. सातारा-सांगली जिल्ह्यातून जात ही डोंगररांग पुढे कर्नाटकात प्रवेश करते. सलग नसून तुटक स्वरुपात असल्याने, शंभू महादेव डोंगरांना पश्चिमेला मांढरदेव, मध्यभागी म्हस्कोबाचे डोंगर आणि पूर्वेला सीताबाईचे डोंगर अशी स्थानिक नावे आहेत. डोंगररांगेचा तीव्र उतार उत्तरेला असून, दक्षिणेला मंद उतार आणि पठारी भाग आहे.
नकाशा साभार: सातारा जिल्हा gazetteer 

डोंगररांगेच्या सुरुवातीला १२०० मी पेक्षा जास्त उंची असलेले डोंगर आहेत. डोंगररांगेच्या पश्चिमेला असलेल्या रायरेश्वर पठारावरील अतिदुर्गम नाखिंड नेढे-टोक, सर्वोच्च माथ्यावर दिसणारी रंगबेरंगी ज्वालामुखीय रेती, शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ जिथे घेतली ते रायरेश्वर राऊळ, शिवभक्त जंगमांची वस्ती आणि कातळखोदीव लेणी विशेष आहेत. 

                    



रायरेश्वरच्या पूर्वेला माथ्यापाशी ५० मी उंचीची कातळटोपी घातलेले, शिलाहारांनी बांधलेले केंजळगड आणि पांडवगड दुर्ग ट्रेकर्सना भुरळ पाडतात, तर पल्याड मांढरदेवी शिखरावर काळूबाईच्या शक्तीपीठापाशी भाविक नतमस्तक होतात. दरीकडे नजर भिरभिरत असतेच, कारण झाडीतून दर्शन होत असते धोम धरणाचे, मेणवली घाट त्या तिथे कुठेतरी, समोर पसरलेली ती प्राचीन वाईनगरी आणि या इथे चमचमणारे पात्र असते संथ वाहणाऱ्या कृष्णाबाईचे.
       
खंबाटकी घाटाजवळ शंभूमहादेव डोंगररांग आग्नेयेस वळते आणि पुढे माण तालुक्यात सीताबाईचा हिरवागार डोंगर, ताथवडा उर्फ संतोषगड आणि वारूगड हे असे टप्पे घेत शिखर शिंगणापूरला 'शंभू महादेव' राऊळापाशी विसावते. प्रत्येक ठिकाणची माती, संस्कृती विशेष. जसं की, सीताबाईचा डोंगर म्हणजे पुन्हा वनवासात असलेल्या दंडकारण्यातील सीतामाईचं वास्तव्य असल्याची आख्यायिका असलेला बाणगंगा-माणगंगा नद्यांचा उगमस्थान - माळावरचं ओएसिस! माथ्यावर अवाढव्य मोठ्ठी विहीर असलेला संतोषगडावरील प्रेक्षणीय. तेराव्या शतकात सिंघणराजे यादवाने बांधलेले श्री शिखर शिंगणापूर मंदिर, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत! चैत्र शुद्ध अष्टमीला शिवपार्वतीचा प्रतीकात्मक विवाहसोहळा संपन्न होताना, भक्त अभिषेकासाठी ‘भुत्या तेल्याची कावड’ म्हणजे दोन मोठे रांजण १२ मी. लांबीच्या काठीला अडकवून, डोंगराळ उतारांच्या 'मुंगी घाटा'तून मानवी साखळी करून आणणे, ही  शिखर शिंगणापूरची विशेष परंपरा!
             
खंबाटकी घाटाजवळ शंभूमहादेव डोंगररांगेला दोन फांद्या फुटतात. दक्षिणेला वळलेल्या पहिल्या फांदीवर चंदन-वंदनगड आणि नांदगिरी/ कल्याणगड हे दुर्ग आणि जरंडेश्वर हे गिरीस्थळ देवस्थान आहे. खोऱ्यातली किकली आणि लिंब-शेरे हीदेखील जुनी गावे. शंभरहून अधिक वीरगळी आणि पुरातन शिल्पकलेने नटलेले भैरवनाथ मंदिराचे किकली गाव याच परिसरात. लिंबशेरेची बारामोटेची विहीर आणि त्यातील जलमहाल वैशिष्ट्यपूर्ण. गुडघ्याएवढ्या पाण्यातून अंधाऱ्या लेणीमध्ये जात, नांदगिरीच्या जलमंदिरातील पार्श्वनाथाचे दर्शन घेणे, हा अनोखा अनुभव. हनुमानाने लंकेला द्रोणागिरी पर्वत घेऊन जाताना, वाटेत पडलेल्या तुकड्यावरचं - डोंगरावरचं - जरंडेश्वर हनुमानाचे देऊळ अशी आख्यायिकाही रंजक.
        
शंभूमहादेव डोंगररांगेच्या दुसऱ्या फांदीवर वर्धनगड, महिमानगड असे दुर्ग आणि पल्याड सुटावलेला भूषणगड एकांडा शिलेदार आहे. औंधचं संस्थान आणि यमाई डोंगर जवळच. माळरानांच्या प्रदेशात पूर्वेला ९०० मी पर्यंत कमी होते. मोठालं मुंडासं बांधलेले आणि हातात घुंगरकाठी घेतलेले धनगर-मेंढपाळ लांबच लांब पसरलेल्या या माळांवर गुरांना चारत भटकताना हमखास भेटतात. व्यंकटेश माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली 'माणदेशी माणसं' इथलीच. 
               
शंभूमहादेव डोंगररांगेमध्ये हवामान, जंगले आणि भूरूपे यात फार वैविध्य आहे. एकीकडे सह्याद्रीची रांग आणि शिखरे, बेसाल्ट कातळकडे तर दुसरीकडे माण तालुक्यात उघड्या बोडक्या टेकड्या-पठारे. एकीकडे सह्याद्री घाटमाथ्यावर सरासरी ५५०० मिमी वार्षिक पाऊस, तर पूर्वेला माण तालुक्यात वार्षिक सरासरी ५०० मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो. घाटमाथ्यावर उष्णकटिबंधीय सदाहरित वनक्षेत्र आणि जांभी मृदा, त्यानंतर पूर्वेला निमसदाहरीत वनक्षेत्र आणि अतिपूर्वेला खुरट्या वनस्पतींचे वनक्षेत्र किंवा फक्त राखाडी भुरे खडक असे वैविध्य आहे. 

अशी ही शंभू महादेव डोंगररांग!!!

                  
शंभूमहादेव डोंगररांगेमुळे उत्तरेला असलेली पूर्ववाहिनी भीमा आणि दक्षिणेच्या पूर्ववाहिनी कृष्णा नदीचे खोरे वेगळे होते. कृष्णा खोरे हे (गोदावरी खोऱ्यानंतर) महाराष्ट्रातील दुसरे महत्त्वाचे खोरे आहे. कृष्णानदी आणि शंभूमहादेव डोंगररांगेने शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेची स्वप्ने सत्यात येताना बघितली, वाईला पांडित्य जोपासलं, कष्टाळू माणसांचा माणदेश बनवला, भाविकांची श्रद्धास्थाने मांढरदेवी-शिखर शिंगणापूर पूजिला आणि साताऱ्याच्या शौर्याची-त्यागाची गाथा घडवली.

४. माथेरान डोंगररांग
            
खंडाळ्याचा घाट उतरून कर्जत रेल्वेस्टेशनला पोहोचताना 'दख्खनच्या राणी'चं ऊर धपापत असते. सराईत खवय्ये पटकवतात गर्रम वडापाव, तर सराईत भटके पटकवतात डाव्या बाजूची मोक्याची जागा! आगगाडी नेरळ - वांगणी - बदलापूर - अंबरनाथ हे थांबे न घेता सुसाटलेली असते, तेंव्हा भटक्यांची नजर वेध घेत असते डावीकडच्या गूढ डोंगररांगेकडे. कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघणाऱ्या उभ्या चढणीच्या डोंगरसोंडा, झाडीभरले डोंगरमाथे आणि तो अजस्त्र गोपुराकार सुळका कोणता बरे! ही डोंगररांग आहे महाराष्ट्राच्या कोकणपट्टीतील एक मुख्य डोंगररांग - 'माथेरान डोंगररांग'. चला तर मग, आज #मनाने_भटकंती करून येऊयात 'माथेरान' डोंगररांगेची.



महाराष्ट्राच्या पश्चिमेचा सिंधुसागर आणि दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वताचा घाटमाथा यांच्यादरम्यान वसलीये कोकणपट्टी. वळणवेड्या जलद वाहणाऱ्या नद्यांची खोरी आणि उंच-सखल डोंगराळ चिंचोळ्या कोकणात सलग धावणारी महत्त्वाची डोंगररांग म्हणजे 'माथेरान' डोंगररांग. रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला सुरुवात होऊन, ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेपाशी या डोंगररांगेचा पसारा आहे. तुरळक विखुरलेल्या टेकड्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या माथेरान रांगेची सह्याद्रीच्या मुख्य कण्याशी नाळ जोडली आहे. पण, सलग धावणारी माथेरान डोंगररांग सुरु होते कर्जतजवळच्या सोंडेवाडीच्या 'सोंडाई' दुर्गापाशी. हे आहे माथेरान रांगेचं आग्नेय टोक! 


इथून वायव्येस धावणारी रांग सरळ उठावते 'माथेरान' गिरीस्थळापाशी. अस्ताव्यस्त पसरलेल्या माथेरान पठारापासून नैऋत्येला 'प्रबळगड' फांदी धावते. प्रबळगडला उत्तरेला बिलगलेल्या सुळक्यावर 'कलावंतीण दुर्ग' आहे. 


तर, प्रबळगडपासून दक्षिणेला मोरबे धरणाकडे धावणाऱ्या सोंडेवरच्या सुळक्यावर 'ईरशाळगड' वसलाय. (प्रबळगड फांदी अर्थातच लोहमार्गावरून दिसत नाही.) 
           
पुन्हा माथेरानच्या उत्तरेची डोंगररांग निरखली, तर माथेरानच्या उत्तरेला 'पेब' ऊर्फ 'विकटगड दुर्ग' बिलगलेला. इथून उत्तरेला नेढे असलेल्या अरुंद 'नाखिंड' डोंगरापासून, पुढे माथेरान रांग वायव्येला वळते. भला थोरला गोपुरासारखा माथा असलेला 'चंदेरी' दुर्ग आणि चंदेरीचा सखा अथवा सख्खा शेजारी 'म्हैसमाळ'' डोंगर रौद्र दिसतात. पुढे करवती धारेच्या डोंगररांगेवरील सात सुळके असलेला 'नवरा-नवरी' डोंगर, 'पाच पीर दर्गा' डोंगर आणि नंतर 'गणेश-कार्तिक' नावाचे जुळे सुळके आहेत. इथून नैऋत्येला धावणाऱ्या डोंगरफांदीवर 'मलंगगड' आणि 'देवणी' सुळका देखणे उठावले आहेत. गणेश-कार्तिक सुळक्यांच्या नंतर वायव्येला 'ताहुली' नावाचा थोरल्या डोंगरापाशी माथेरान रांगेची सांगता होते.
         
वायव्येला उल्हास नदी आणि नैऋत्येला पातळगंगा नद्यांच्या खोऱ्यादरम्यान माथेरान रांग धावलीये. सह्याद्री घाटमाथ्यापाशी राजमाची दुर्गाजवळ उगम पावणारी उल्हास नदी उंच काठांमधून नागमोडी वळणे घेत दुथडी भरुन वाहत वसईपाशी समुद्राला मिळते. डोंगराळ आणि गुंतागुंतीच्या डोंगररांगेमध्ये अत्यंत उभ्या चढाच्या डोंगरसोंडा, वेगवान ओढ्यांच्या उभ्या घळी, करकरीत कातळधारा-सुळके, कातळमाथ्याची झीज होवून आरपार पडलेली नेढी, जैववैविध्य असलेले झाडीभरले माथे अशी प्राकृतिक भूस्वरुपाची वैशिष्ट्ये रौद्र-सुंदर आहेत. डोंगराळ भागाची नद्या-ओढ्यांमुळे जमिनीची भरपूर झीज होते. पावसाळ्यात भरपूर पर्जन्यवृष्टी, उन्हाळ्यात उष्ण हवामान आणि वर्षभरात हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. वार्षिक सरासरी ५२०० मिमी पाऊस आणि नियंत्रित वाहतुकीमुळे माथेरान माथ्यावर निमसदाहरित आणि पायथ्याला पानझडी रानामध्ये साग, ऐन, शिसव, आंबा, आपटा, अर्जुन, आसना, बाभूळ, बेहडा, गोरखचिंच, पळस, खैर, वड, बांबू, धावडा अशी विपुल वनसंपदा आढळते. लोहमार्ग-महामार्ग जवळ असल्याने आणि MIDCमुळे खोऱ्यात सातत्याने औद्योगिकीकरण होत आहे. अभियांत्रिकी, रसायने, कागद गिरणी असे उद्योग आहेत. अंतर्भाग मात्र अविकसितच. डोंगरउतारांवर दऱ्याखोऱ्यामध्ये उंचवट्यांवर विखुरलेल्या वाड्या-वस्त्या आणि तुरळक भातशेती आढळते. डोंगररांगेच्या तळाशी सातत्याने जंगलतोडीमुळे तुरळक झुडुपे उरली आहेत.
         
माथेरान डोंगररांगेमध्ये पर्यटक, अभ्यासक, ट्रेकर्स आणि कातळारोहकांसाठी विपुल आकर्षणे दडलीयेत. मोरबे धरणाजवळचा माथ्यावर देवीचं ठाणं आणि गुहाटाकी असलेला छोटेखानी सोंडाई दुर्ग टेहेळणीसाठी असावा. माथ्यावरच्या रानामुळे इ.स. १८५० मध्ये मॅलेट नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला भुरळ पडली. इंग्रजांनीच इथे वसवलं माथेरान गिरीस्थळ. ८०३ मी. उंचीच्या पठारावरचं जैववैविध्य, घनदाट झाडी, माथ्यावर नेणारी छोटी आगगाडी, लाल पायवाटा आणि विविध टोके पर्यटकांसाठी. तर, किमान १५-२० सोप्या-अवघड पाऊलवाटांची भुरळ पडते ट्रेकर्सना. वाहनबंदीमुळे माथेरानचं सौंदर्य सुरक्षित राहिले आहे. स्वच्छ हवा असली, की पश्चिमेला खुणावते मुंबापुरी, घारापुरी, तुर्भे टेकडी. उत्तरेला येऊर टेकडी, पारसिक भूशीर आणि त्यातून जाणारी मध्य रेल्वे केसासारखी. पल्याड कल्याणची खाडी किंवा उल्हास नदीचे मुख दिसते. उत्तरेला माहुली, कामणदुर्ग, तुंगारेश्वर, टकमक, अशेरी, महालक्ष्मी खुणावतात.
       
अनेक राजवटींची स्थित्यंतरे बघितलेला आणि पुरातन गुहाभुयारे, अगम्य घनदाट रानात हरवलेले दुर्गावशेष आणि कलावंतीण दुर्गाच्या विहंगम दृश्यामुळे प्रबळगड लोकप्रिय आहे. टेहेळणी सुळक्यावर चढण्यासाठी कोण्या स्थापत्यशास्त्रज्ञाने नागमोडी कातळखोदीव पायऱ्यांची अजोड नक्षी बनवलेला - कलावंतीण दुर्ग! दक्षिणेला ईरशाळगड म्हणजे माथ्यावरच्या विशाळादेवीच्या ठाण्यामुळे नाव पडलेला सुळकेवजा दुर्ग. माथ्याजवळचे नेढे आणि पाण्याची गारेगार टाकी यामुळे ईरशाळगड ट्रेकर्सना खिळवून ठेवतो. सुळक्याचा गवताळ घसाऱ्याचा कातळमाथा चढण्यासाठी मात्र कातळारोहण साहित्य आणि कौशल्य हवे. 

पुरातन खोदीव गुहा, धान्यकोठारे असलेला आणि अप्रतिम निसर्गदृश्ये दाखवणारा पेब उर्फ विकटगड ट्रेकर्सचा अत्यंत लाडका. या पेब किल्ल्याच्या तटबंदीचे चिरे माथेरानच्या बाजूस ढकलून आणि माथेरानवर चढवून इंग्रजांनी बंगले बांधले, असं म्हणतात. चिंचोळ्या माथ्याचा आणि नेढे असलेला नाखिंड फसव्या वाटांमुळे खुणावतो. भव्य गोपुरासारखा आकार, घनदाट रानातली फसवी वाट, लांबच लांब चढाई, कातळमाथ्यावर जाण्यासाठी गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा यामुळे चंदेरी दुर्ग आव्हानात्मक आणि फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी! गणेश-कार्तिक सुळके कातळारोहण सरावासाठी सुयोग्य. मलंगगडवर हाजी मलंग दर्गा नेहेमीच भाविकांनी गजबजलेला. तर, बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणार्‍या थरारसाहसामुळे गिर्यारोहकांना खुणावतो. मलंगगडवर मराठे आणि इंग्रजांच्या अटीतटीच्या रोमहर्षक लढाईचा इतिहास आहे. 

माथ्यावरचे तीन सुळके, उत्तुंग कडे आणि अनगड वाटा यामुळे ताहुली डोंगर- म्हैसमाळ व नवरानवरी शिखरे खास ट्रेकर्ससाठीच. धबधबा आणि मंदिरामुळे कोंडेश्वर मंदिर पावसाळ्यात गजबजलेले. बकाल शहरीकरणातही भाविक आणि अभ्यासकांना भावणारे, शिलाहार राजवटीत बांधलेले भूमीज शैलीचे अंबरनाथचे अलौकिक शिवमंदिर याच परिसरात. अशी ही माथेरान डोंगररांग!
   
अश्या या महाराष्ट्रातील डोंगररांगा आणि त्यांनी बनवलेली नद्यांची खोरी - महाराष्ट्राची माती, संस्कृती, इतिहास, जीवनशैली, शक्तीपीठे आणि माणसं घडवणारी!

महाराष्ट्रदिन, १ मे २०२०

#महाराष्ट्रातील_डोंगररांगा; 
#मनाने_भटकंती; 
#डोळस_भटकंती.
           

2 comments:

  1. Amazing and very informative writing .

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद!!!

      Delete