Pages

Friday 11 September 2020

बागलाणचे दुर्गशिलेदार


२०२० मधल्या सक्तीच्या ट्रेकबंदीचा छळ संपेना. एका आळसावलेल्या रविवारी मोबाईलवर गेल्या वर्षीच्या फोटो-आठवणींचे नोटिफिकेशन झळकले. आणि, एका क्षणात मनाने पोहोचलो बागलाणच्या ट्रेकला - चणकापूर डोंगररांगेतील ‘चौल्हेर-भिलाई-पिंपळा-प्रेमगिरी’ अश्या भन्नाट दुर्गशिलेदारांच्या भेटीला! फोटोअल्बममधून ट्रेकच्या आठवणी उलगडू लागल्या. पुण्यातून निघून नारायणगावला मसाला दुध, सिन्नरला मिसळ आणि तुडुंब गप्पा असा धम्माल ट्रेक प्रवास चालू झालेला. दत्तूचा एक्सयुव्ही रणगाडा झेपावत असल्याने हा-हा म्हणता नाशिक मागे टाकत सटाण्याकडे निघालो. भावडबारी खिंडीपल्याड बागलाण प्रांतात उतरलो. खणखणीत दुर्ग, जुनी मंदिरे आणि बागायती शेतीमुळे बागलाण समृद्ध आहे. भाद्रपदातील खट्याळ पाऊस चाललेला. सटाण्यापासून गाडी वळवली मावळतीला. आता आमच्या उत्तरेला होतं आरम नदीचं खोरं आणि साल्हेर-मुल्हेर असे तालेवार दुर्ग असलेली डोलबारी डोंगररांग; तर दक्षिणेला होतं गिरणा नदीचं खोरं आणि अफाट सातमाळ डोंगररांग. डोलबारी आणि सातमाळ डोंगररांगेच्या दरम्यान छोटेखानी अशी ‘चणकापूर डोंगररांग’ वसली आहे. या डोंगररांगेतील नितांत सुंदर दुर्गशिलेदारांची आम्हांला भेट घ्यायची होती. 

लोभस दुर्गस्थापत्य जपणारा - दुर्ग चौल्हेर 
तिळवण गावातून बघताना दुर्ग चौल्हेरची माची आणि बालेकिल्ला यांवरून नजर हटतच नव्हती. मुरमाड डोंगरसोंडेवरून आधी निवांत मळलेली वाट होती. पण पुढे मात्र घसाऱ्याच्या उभ्या वाटेने दम काढला. अत्यंत खणखणीत तटबंदी, सुबक पायऱ्या, नक्षीकाम केलेले प्राकारतट, अंधाऱ्या द्वाराची वाट आणि एकापाठोपाठ येणारी प्रवेशद्वारं पार करत चौल्हेरमाचीवर पोहोचलो. गडाच्या द्वारातून प्रवेशल्यावर अमृततुल्य पाण्याने तृप्त झालो. डावीकडे माचीवरून फिरताना पल्याडचा कोथमिऱ्या डोंगर खुणावत होता. मोतीटाक्यापासून पुढे जात, चौरंगनाथाचं राउळापासून गडमाथ्यावर पोहोचलो. भरारा वाऱ्यामुळे ढग विखुरले आणि सातमाळ-डोलबारी रांगांचं दृश्य उलगडलं. गडाचा इतिहास फारसा ज्ञात नसला, तरी निवडुंगात हरवलेल्या वास्तू-भूगोल-स्थापत्यातून जाणवणारा दुर्ग चौल्हेर मनात घर करून गेला.

           

गडफेरी करून पायथ्याशी येईपर्यंत घामट निघालेलं. बागायती शेतीपाशी पंपाने उपसलेलं धो-धो पाणी पाटात वळवलेलं. गारेगार पाण्यात निवांत आंघोळी करून ट्रेकर्स फ्रेश झाले. मुल्हेरच्या प्रभावळीतलं ठाणं - दुर्ग भिलाई चौल्हेरपासून डांगसौदाणे आणि पुढे दगडी साकोडे असे टप्पे घेत गाडी निघाली ‘दुर्ग भिलाई’कडे. पाटोळे साखरपाड्याला जाणार्‍या छोट्या घाटरस्त्याच्या वळणांवरून पाहिल्यावर, गडाचं ढगात हरवलेलं टोक खुणावू लागलेलं. आवळबारी/ साखरपाडा खिंडीत गाडी लावली. छोटी पाठपिशवी घेऊन गडाच्या सोंडेच्या वाटेने चढाई सुरु केली. झाडाखाली लाकडात कोरलेल्या वाघोबा-नागोबा देवाला वंदन केलं. परिसरात खऱ्या नागाच्या पिल्लांचं दर्शन झाल्याने तिथून सटकलो. शेरडं चरायला रानात सोडून बिडी फुकत बसलेल्या दादांशी डोंगराच्या-पावसाच्या-वाघराच्या गप्पा झाल्या. गडाची वाट भरपूर घसाऱ्याची होती. डावीकडे उत्तरेला मुल्हेर-हारगडाचं विस्तृत दृश्य होतं. पाऊण तासात गडाच्या कातळटोपीजवळ पोहोचलो. माथ्याच्या उत्तरेला पदरात पोहोचलो. पाण्याच्या टाक्यांची श्रुंखला आणि थोडकं पाणी होतं. पल्याड दोन गुहांमध्ये डोकावल्यावर मारुती आणि देवीचं शेंदूरचर्चित शिल्प खोदलेलं दिसलं, पण मुक्कामास योग्य जागा नाही. अरुंद पावठीवरून पश्चिम टोकापाशी १० फूट सोपे कातळारोहण केलं आणि छोट्याश्या गडमाथ्यावर पोहोचलो. निवडूंग माजलेले. भगव्या झेंड्यापाशी वारं खाताना, साल्हेर-सालोटा-मुल्हेर-पिंपळा-चौल्हेर असं झकास दृश्य दिसत होतं. परत निघाल्यावर कातळटप्प्यानंतर डावीकडे पावठी जाताना दिसली. समोर खुणावत होती सातमाळ डोंगररांग आणि सप्तश्रुंगी शिखर. त्या दिशेला डोकवणाऱ्या कातळ-खोलगटात सप्तश्रुंगी देवीची मूर्ती स्थापिलेली. गडाची सफर पूर्ण करून, घसारा उतराई करत गाडीपाशी आलो. भव्य नेढं असलेला - दुर्ग पिंपळा आता वेध लागलेले ‘दुर्ग पिंपळा’चे. वाटेत रस्त्याच्या बाजूला शेताच्या बांधावर वेगवेगळे निसर्गदेव भोळ्या भक्तीभावाने पुजलेले. लाकडात कोरुन, सुबक रंगवलेली वाघोबा, नाग, मोर, चंद्र-सूर्य अशी शिल्पे आम्ही कवतिकाने निरखली. पुढे अरुंद रस्त्यावर नेमका एक ट्रक बंद पडलेला. दत्तूने तिरप्या माती-उतारावरून कौशल्याने गाडी बाहेर काढली आणि वाहवा मिळवली. पायथ्याच्या मळगाव बुद्रुकला पोहोचलो. सरपंचांनी डोंगराआड डोकावणाऱ्या गडाकडे खुणावलं, ‘त्यो पघा कंडाळा. नेढं त्या अंगाला लपलंय पघा’. कंडाळा हे पिंपळा गडाचं अजून एक नाव! गावापासून पिंपळा किल्ला चढाई जेमतेम तासाभराची. चिखलाळ वाटेवरून छोट्या धरणापाशी गेलो. नितळ पाण्यामध्ये डोंगरसोंडा पाय सोडून बसलेल्या. डावीकडच्या ठळक पायवाटेने झपझप निघालो. पठारावर पोहोचल्यावर भाद्रपदातल्या झिमझिम पावसाची सर आली. आणि अतिशय लोभस अश्या इंद्रधनुष्याचं दर्शन घडलं. ज्याबद्दल इतकं ऐकलेलं, त्या गडाच्या नेढ्याच्या दर्शनाची ओढ लागलेली. पठार पार करून गडाच्या कातळटोपीच्या दिशेने उभी चढाई करत निघालो. चढणारी मुख्य वाट आणि गुरांनी आडव्या-तिडव्या तुडवलेल्या वाटा यांची सरमिसळ झालेली. तिरप्या उतारावरून घाणेरीच्या झुडुपांची दाटी झाली. गडाच्या चिंचोळ्या कातळटोपीचे दोन भाग आणि त्यामधलं आरपार छिद्र ‘नेढं’ जाणवू लागलं. वारा-पावसाने झीज होऊन बनलेले अजस्त्र विस्ताराचे नेढे थक्क होवून बघत होतो. मध्यभागी उंच आणि दोहों बाजूस अरुंद होत गेलेल्या नेढ्यातल्या बेसाल्ट कातळातल्या वळया कुतुहलाने निरखले. अक्षरशः ढकलून देणारा अतितीव्र वारा सुरु झालेला. नेढ्यात घुमणारा ध्रोंकार, कानापासून सुंसुं करत निसटणारे पावसाचे बाण आणि बेभान-स्वच्छंद होऊन भरकटलेले ढगाचे पुंजके - असा माहोल! नेढ्याशेजारी पाण्याची ३ कोरडी टाकी, पलिकडची निसर्गनिर्मित गुहा, गडप्रदक्षिणा मार्गावर कातळावर रंगवलेले देवीचे चित्र आणि शिलालेख आहे. नेढ्यापल्याड बेचक्यातून २० मी. सोपे कातळारोहण करत गडमाथा गाठला. कातळसपाटीत खोदलेले पाण्याचे ३ आयताकृती हौद, कातळात खोदलेले खळगे, वाऱ्याचे तरंग आणि पावसाचे थेंबांची नक्षी उमटलेली. भणाणलेले ढग एक क्षण झाले, दुर्गराज साल्हेरचं दर्शन झालं आणि परत सारं सारं ढगात हरवून गेलं. जिवलग दोस्तांसोबत तो आसमंत अनुभवत कितीतरी वेळ नि:शब्द बसलो. गडाची उतराई करून मळगावात परतलो. मुक्कामासाठी सरपंचांच्या घरी आसरा घेतला. त्यांच्या अगत्याने भारावून गेलो. बेजोड आसमंताचा दुर्ग ‘प्रेमगिरी’ बागलाणची प्रसन्न सकाळ उजाडली. शिवारातून घुमणाऱ्या मोराच्या केया, ओसंडून वाहणारे पाझर तलाव, कुठल्याश्या वीरांच्या स्मृती जगवणाऱ्या उंचच उंच वीरगळ शिळा, घमघणाऱ्या भाताची खाचरं आणि बागलाण प्रांतातले दुर्ग-डोंगर - असा सुरेख माहोल! एव्हाना, चणकापूर डोंगररांगेशेजारचा चौथा शिलेदार आम्हांला आवताण देत होता - दुर्ग ‘प्रेमगिरी’!

कळवणजवळच्या एकलहरे गावातून एखाद्या पालथ्या घमेल्यासारखा भासणारा डोंगर लक्ष वेधून घेत होता. हा डोंगर ‘प्रेमगिरी’ - दुर्ग म्हणून कमी ओळखीचा, पण गडावरच्या नवश्या मारुतीमुळे जास्त प्रसिद्ध! हिंगळवाडीच्या अलिकडे सापुतारा रस्ता सोडून, ऊसाच्या शेतातून कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीजवळ पोहोचलो. गडाच्या धारेवरून थेट घसारा-चढाई करणं टाळलं. गाडी लावून गडाच्या डावीकडच्या (वायव्य) खिंडीकडे निघालो. झाडीतून चढणारी मळलेली वाट होती. खिंडीतून पलिकडे सुजलां-सफलां गिरणा खोरे आणि प्रेमगिरी दुर्गाकडे चढणाऱ्या डोंगरसोंडेचं दृश्य दिसलं. सरत्या पावसात आल्यामुळे चढाई आल्हाददायक, एरव्ही रखरखाट असणार. घसार्‍याची पायवाट गडाच्या कातळटप्प्यापाशी घेऊन गेली. निवडुंग आणि घाणेरीने वेढलेल्या कातळात कोरलेल्या पायर्‍या चढून, गडमाथ्यावर पोहोचलो. छोटेखानी मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतले. कातळसपाटीवरचे एकाशेजारी एक खोदलेले आयताकृती पाण्याचे हौद ओसंडून वाहत होते. विस्तृत पठारावरून दूरवरचे अफाट दृश्य उलगडले. वाऱ्याच्या झुळूकेसोबत हौदातल्या पाण्यावरचे तरंग, उंचच वृक्षाचे, ढगाळलेल्या आभाळाचं प्रतिबिंब आणि पाठीमागे उत्तरेला चणकापूर डोंगररांगेतल्या चौल्हेर-भिलाई-पिंपळा दुर्ग, असे नितांतसुंदर दृश्य! तर, पाठीमागे दक्षिणेला अहिवंत-सप्तश्रुंग-मार्कंड्या-कण्हेरा-धोडप-कांचन अश्या दुर्गांनी नटलेल्या सातमाळ डोंगररांगेचं दृश्य. परतीचा प्रवास सुरु झाला. बागलाणची माती-माणसं-दुर्ग-इतिहास-भूगोल याचं गारुड मनावरून उतरेना. क्षितिजापर्यंत अफाट पसरलेली दृश्ये, असंख्य डोंगर-टेकड्या, त्यावरचे वैविध्यपूर्ण दुर्ग, ढगात हरवलेले डोंगरमाथे, राखाडी डोंगरउतारांवर कुठंतरी विखुरलेल्या उनाड शेळ्या, कुठे शिवारात पुजलेला वाघदेव, गुराख्याशी बोलताना कानाला जाणवणारा अहिराणी भाषेचा गोडवा, अवचित उजळलेलं इंद्रधनुष्य, डोंगरातून आरपार डोकावणारे अवाढव्य नेढे, भन्नाट वारा आणि हक्काचे भटके मित्रमंडळ.. असा किती किती निखळ आनंद!!! ------------------------------------------------------------------- महत्त्वाच्या नोंदी: १. लॉकडाऊनमध्ये गुगलने उलगडलेल्या आठवणीतला हा ट्रेक. सद्यस्थितीत मात्र ट्रेक्सला अजिबात न जाता केलेल्या-करायच्या ट्रेक्सच्या स्वप्नरंजनात रममाण होणे, हेच आपल्या, कुटुंबियांच्या आणि गिरीजनांसाठी हिताचे!!!

२. ट्रेकर मंडळ:: जितेंद्र बंकापुरे, अमेय जोशी, नितीन तिडके, साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे

३. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे ४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories. ५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना. ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२०. सर्व हक्क सुरक्षित.




4 comments:

  1. साई छानच लिहितोस. तुझ्या नेहमीच्या शैलीतील सुंदर वर्णन केलयस. तुझं निरिक्षण आणि ते लिखाणात उतरवण्याचे स्किल कमाल. अरे पण नेहमी प्रमाणे ट्रेकर्स कोण कोण होते हे नाही लिहिलस. तेवढ ॲड कर जमल्यास. 👌👍

    ReplyDelete
  2. व्वा, खूपच छान लिहिलंय भिडू 👌
    "नेढ्यात घुमणारा ध्रोंकार, कानापासून सुंसुं करत निसटणारे पावसाचे बाण आणि बेभान-स्वच्छंद होऊन भरकटलेले ढगाचे पुंजके - असा माहोल!" पिंपळा नेढ्याचं हे वर्णन झक्कास 👍

    ReplyDelete
  3. नेहमप्रमाणेच अफाट ट्रेक आणि झक्कास लिखाण !! जबरा !!

    ReplyDelete
  4. एक नंबर लिहिलंय दादा....सध्या lockdown मुळ नाही करता येत प्लॅन नायतर नक्कीच ठरवला असता हाच ट्रेक....thanks अमेय दादा फॉर शेअरिंग this ब्लॉग ��

    ReplyDelete