Pages

Friday 21 May 2021

कोरबारसाचा घाटवारसा

‘कोरबारस’ खोऱ्यातून कोकणात चढाई-उतराई करणाऱ्या, विपुल पुरातन वारसा असलेल्या घोडेजीन-निसणी घाटवाटांच्या भटकंतीचा हा वृत्तांत. ट्रेकमध्ये ‘सवघाटा’चं कोडं सुटलं, हा बोनस!

…रानात कधी ट्रेकर्सच्या मागे लागतात खरे भुंगे, तर कधी नवीन वाटांच्या कोड्यांचे भुंगेसुद्धा मागे लागतात. असाच भुंगा मागे लागलेला सवघाटाचा. लोणावळ्याच्या दक्षिणेला कोरीगड-आंबी खोऱ्यात इंग्रजांच्या नकाशात नोंदवलेला Sava Ghat, पुरातन व्यापारी मार्गांच्या नकाशातला चौल-पुणे मार्गावरचा सवघाट आणि डोंगरयात्रा पुस्तकात नोंदवलेला सवघाट खुणावत होता. दिग्गज ट्रेकर्ससोबत चर्चा, नकाशे-संदर्भपुस्तकांची पारायणे आणि गावकऱ्यांच्या ओळखी जुळवल्या. पण, सवघाटाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. विकीमॅपियावर कोण्या उत्साही ट्रेकरने भलतीकडे सवघाटाचं मार्किंग केल्याने गोंधळ वाढला होता. पण त्याच परिसरातील घोडेजीन-निसणी घाटांच्या जोडगोळीने आमचं लक्ष वेधलं. सवघाटाचं कोडं सोडवण्यासाठी याच वाटांची भटकंती ठरवली.


विपुल पुरातन खुणा असलेला घोडेजीन उर्फ बहिरीचा घाट

भ्रमणमंडळ जमवून कोरीगडच्या पायथ्याच्या पेठ शहापूरला पोहोचलो. 

गावाच्या अलीकडे ओढ्यावरच्या पुलापासून वायव्येला जात वाट शोधायची होती. प्रसन्न वातावरणात ट्रेकला सुरुवात झाली. 

घाटमाथ्याजवळ गवताळ उंच-सखल माळावरून जाणारी नागमोडी वाट होती. मंद वाऱ्यासोबत डोलणारी गवताची पाती कोवळ्या उन्हांत लखलखत होती. न बोलवताच रानातली चार कुत्री आमच्यासोबत निघालेली. 

पाणथळ सपाटीवर रानतेवण (मार्श कार्पेट) फुलांचा गालिचा न्याहाळला. 

क्लिष्ट भूरचना आणि झाडीमुळे घाटाची सुरुवात शोधणे जिकीरीचे होतं. वाट वापरात नसल्याने झाडोऱ्यातून घुसाघुशी करत, कसबसं कड्याच्या टोकाशी पोहोचलो. 

दक्षिणेला आळसावून पसरलेली कोराईघाटाची डोंगरसोंड आणि पाठीमागे अनघाई दुर्ग दिसला. दिशाभूल निस्तरून घाटाची सुरुवात शोधायची होती.


आघाडीच्या मिलिंद-निनाद्राव या मावळ्यांनी सदाहरित झाडोऱ्यातून वाट काढली. 

मळलेली वाट गवसल्याने हायसं वाटलं. सह्यधारेच्या झाडीतून पहिल्यांदाच घोडेजीन घाटाच्या भूरचनेचे दर्शन होवू लागले. मुख्य डोंगरसोंड अस्ताव्यस्त पसरलेलीये. जवळचा झाडी-कातळ ल्यालेला पहिला डोंगरदांड; लांबवर पसरलेला दुसरा दांड आणि त्यापलिकडे न दिसणारा पण नकाशात बघितलेला तिसरा दांड - अश्या डोंगरदांडांना बिलगून घाटवाट उतरणार होती.

     

पहिल्या टप्प्यात सह्यधारेला बिलगून, डावीकडे १०० मी उतरून डोंगरसोंडेच्या पदरात पोहोचायचं होतं. झाडोऱ्याच्या दाटीमध्ये वाऱ्यासोबत रानपेटारी ऊर्फ मदाम फुलं लवत होती. 

वाटेत धोंड्यावर शेंदूर फासलेलं दैवत म्हणजे प्रवाश्यांना आधार देणारी वाघजाई देवी. 

नागमोडी उतरंडीनंतर गवतात लपलेल्या ४-५ खोदीव पायऱ्या अनुभवी ट्रेकर खरेंच्या नजरेने टिपल्या.

सह्यधारेपासून कोकणात धावणाऱ्या डोंगरसोंडेच्या कुशीत पोहोचलेलो. यापुढची घाटाची वाटचाल सोंडेच्या उजवीकडून, डोंगरदांडांना वळसे घालत टप्याटप्याने उतरणारी होती. 

ओढ्याच्या खळग्यानंतर घाटवाटेच्या दुसऱ्या टप्प्यात मंद उताराची आडवी वाट घनदाट रानातून धावत होती. 

उंच वृक्षांच्या सावलीत फुललेली ‘जंगली अबोली’ सूर्यकिरणांनी उजळू लागलेली. 

कारवीतून १०० मीटर उतराई केल्यावर मोकळवनात आलो. सोनेरी गवतापल्याड चौफेर दृश्य दत्तूने कॅमेरात टिपलं. 

उत्तरेला नागफणी, भेलीवचा मृगगड, मोराडीचा सुळका दिसत होता. तर दक्षिणेला घाटमाथ्यापाशी पाणडोंगर आणि कोराईघाटाची सोंड दिसली, मात्र अनघाई दुर्ग झाकोळलेला.

 पठारावरचं पावसाळी तळं आणि उंबराचं झाड पांथस्थांना क्षणभर विश्रांतीसाठी आवताण देणारं. झाडाखाली तिरप्या खडकावर कोरलेलं निसर्गदेवता चंद्र-सूर्याचे सुबक शिल्प अमेयने हेरलं. 

घाटवाटेच्या तिसऱ्या टप्प्यात सोंडेच्या कातळमाथ्याला डावीकडे ठेवत ५० मीटर उतरलो. पदरातल्या कातळसपाटीत नैसर्गिक रांजणखळगे आणि चिखल भरलेलं छोटं मानवनिर्मित टाकं आढळलं. 

दरीपल्याड निसणीच्या डोंगरदांडाचे जवळून दर्शन होत होते. 

पुन्हा एकदा देखण्या रानाच्या टप्प्यातून उतरणारा टप्पा सुखावून गेला. 

डावीकडच्या दांडाचा कातळ माथ्यावर आला. 

मोकळवनातून मागे एकमेकांना बिलगलेले दांड आणि कातळटप्पा यांची किनार जणू घोड्याच्या पाठीवरच्या खोगीर-जीनासारखी भासत होती. त्यामुळेच घाटाचं नाव घोडेजीन! 

दांडापासून वाट डावीकडे वळसा घेत जात होती, तिथे वाटेपासून थोडं बाजूला जिवंत झरा हेरून काळ्या दगडांच्या चिऱ्यांनी बांधलेला हौद होता. 

हौदाबाहेरचं गोमुख निरखत आणि हौदातलं गारेगार गोड पाणी रिचवत गप्पाष्टक रंगलं. 

घाटाच्या शेवटच्या टप्प्यात, तिसऱ्या दांडाच्या कुशीतल्या झाडीतून बहिरी देवाच्या ठाण्यापाशी पोहोचलो. 

अजस्त्र कातळाला शेंदूर फासलेला. खोदलेल्या चौकटीत बहिरीचं अनघड रूप, शेजारी वाघराचं शिल्प आणि दगडी समई! बहिरीचं ठाणं असल्याने घाटाला 'बहिरीचा घाट' असंही म्हणतात. 

वणव्याने करपलेल्या पठारावर एव्हाना उकाड्याची भट्टी पेटलेली. घोडेजीन घाटवाटेची ६३० मी उतराई करून, पायथ्याच्या ‘वडाच्या वाडी’पाशी पोहोचायला अडीच तास लागलेले. घाटवाटेवरील विपुल वारसाखुणा आढळल्याने ट्रेकर्स खूष झालेले. आंब्याच्या सावलीत घरून आणलेल्या जेवणाची पंगत रंगली.

घोडेजीन घाटाचा द्रुतगती साथीदार - निसणी घाट

परतीच्या चढाईसाठी घोडेजीन घाटाला बिलगून चढणाऱ्या दांडावरून चढणारी निसणी घाट धुंडाळायची होती. वडाच्या वाडीपासून उत्तरेला बैलगाडीवाटेने जात ओढ्यात उतरलो. सोबतच्या कुत्र्यांनी खळग्यातलं पाणी लपालपा पिऊन घेतलं. गर्द झाडीमध्ये लपलेला निसणीचा दांड उजवीकडे पूर्वेला सह्यधारेकडे उंचावत गेलेला. एकलयीत चढाई सुरु झाली. 

१०० मीटर चढाई झाल्यावर लक्षात आलं, की घाटाच्या चढाईचा मुख्य दांड उत्तरेला अजून दूर आहे. कातळसपाटीपासून दाट झाडोऱ्यातून दिशाशोधन करत ५० मीटर चढाई केली. पुसट वाटेवरून डावीकडे उत्तरेला निघालो. पदरातल्या गवताळ माळावरची झक्क आडवी वाट होती. 

धारेवरचा कातळटप्पा आता दिसू लागलेला. आखूड धारेवर ५ मीटर कातळाने वाट अडवलेली. अडथळा पार करण्यासाठी कातळाला तिरका ओंडका - निसणी टेकवलेली. निसणीची उंची खूप नाही, दृष्टीभय नाही किंवा दोराची गरज नाही. कातळाला आधार नसल्याने आरोहण थोडं अडचणीचे. निसणीवर डावं पाऊल ठेवून, उजवा हात जास्तीत जास्त उंचावून कातळावर घर्षण-आधाराची चाचपणी करायची होती. मध्येच निसणीचं टोक डगमगायचं. त्यामुळे कातळारोहणात वर्ज असलेला - गुडघ्याने आधार घेऊन पुढे सटकावं लागलं. ट्रेकर्सच्या निसणीवरच्या खटपटीमुळे चेष्टामस्करी चाललेली. 

अचानक लक्ष गेलं, कोणतीही अपेक्षा न ठेवता आमच्यासोबत रानात हुंदडणाऱ्या कुत्र्यांच्या केविलवाण्या आवाजाकडे. निसणी आणि दरडीवरून चढाई कुत्र्यांना शक्य नसल्याने खालीच अडकलेले. अचानक निरोप घेताना वाईट वाटलंच.

पुढे अरुंद धारेवरून मळलेली वाट होती. 

गवताळ उभ्या धारेवरून चढताना डावीकडे सह्याद्रीचा अफाट पॅनोरमा.

 तर उजवीकडे घोड्याच्या खोगिराच्या आकाराची घोडेजीन घाटाची सोंड खुणावत होती. दाट वृक्षांमधून चढताना, ढोलीतल्या पाण्याचा साठा चकित करून गेला. मऊशार गवताळ पठारावरून १०० मीटर चढाई बाकी होती.

मोकळवनातून पुढे घाटमाथ्यावर पोहोचण्याआधी, कातळमाथा डावीकडे ठेवत जाणारी मंद चढाची आडवी वाट होती. 

माथ्यापाशी तिरक्या कातळावरील ४-५ खोदीव पावठ्यांनी आम्ही जुन्या वहिवाटेवर आहोत, याची आठवण करून दिली. 

निसणी घाटाची ६३० मीटर चढाई करून घाटमाथ्यावर पोहोचायला दोन तास लागलेले. 

सवघाटाबद्दल अंदाज

सह्यधारेवरून घोडेजीन-निसणी घाटांचा परिसर न्याहाळताना दोन अंदाज बांधले. पहिला अंदाज म्हणजे, घाटमाथ्यावरचं कोरबारस खोरं, त्याचा संरक्षक कोरीगड आणि वायव्येला कोकणातल्या आंबा नदीच्या खोऱ्याला जोडणाऱ्या या दोन वाटा - लांब वळसे घेणारी घोडेजीन मालवाहतूकीसाठी, तर द्रुतगती वाट निसणी माणसांसाठी योग्य असल्याने, या वाटा एकाच घाटाच्या जोडवाटा म्हणून बघता येतील. दुसरा अंदाज म्हणजे, घोडेजीन-निसणी वाटांचं भौगोलिक स्थान आणि जुन्या नकाशांतलं ‘सवघाटा’चं स्थान एकंच आहे. पुरातन खुणा बघता आज माहिती असलेल्या घोडेजीन-निसणी जोडवाटा म्हणजेच विस्तृतीत गेलेला ‘सवघाट’. गोंधळात टाकणारं सवघाटाचं कोडं सुटलेलं.

परतीच्या प्रवासात पाठीमागे फक्त पाऊलखुणा, तर सोबत आनंदयात्रेची स्मरणे होती. नकाशात आकलन होत नाही, अश्या डोंगरवैविध्याचे बारकावे प्रत्यक्ष फिरताना उलगडलेले. रानातल्या वळणवाटांवरची रानफुलांची रंगपंचमी डोळ्यात साठवलेली. पूर्वजांच्या पाऊलखुणा पाहून थक्क झालेलो. निसणीच्या कातळावरची धडपड, ट्रेकरदोस्तांसोबतचे धम्माल क्षण आणि सोबत देणाऱ्या कुत्र्यांना अचानक मागे सोडताना वाटलेली हुरहूर हे अनुभव गाठीशी बांधलेले. बघुयात सह्याद्री पुढच्या कुठल्या कोड्याचा भुंगा मागे लावतो ते!

               

महत्त्वाच्या नोंदी:

१. सद्यस्थितीत ट्रेक्सला अजिबात न जाता केलेल्या-करायच्या ट्रेक्सच्या स्वप्नरंजनात रममाण होणे, हेच आपल्या, कुटुंबियांच्या आणि गिरीजनांसाठी हिताचे!!!

२. फोटो: निनाद बारटक्के, साईप्रकाश बेलसरे

३. ट्रेकर मंडळ: अमेय जोशी, पियुष बोरोले, उत्तम अभ्यंकर, राकेश राऊत, निरंजन भावे, जितेंद्र खरे, जितेंद्र बंकापुरे, निनाद बारटक्के, साकेत गुडी, मिलिंद लिमये, साईप्रकाश बेलसरे.

४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

६. पूर्वप्रकाशित: लोकप्रभा २७ मे २०२१

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२१. सर्व हक्क सुरक्षित.

5 comments:

  1. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट वर्णन. दोन-तीन टप्प्यात उतरत जाणाऱ्या घोडेजीन घाटात टाकं, चंद्र सूर्य शिल्प, गोमुखी हौद, बहिरी ठाणं शोधणं आणि परत त्या झाडोऱ्यातून निसणीच्या वाटेला लागणं म्हणजे मोठं दिव्य...त्याबद्दल तुमच्या मंडळाचे करावं तेवढं अभिनंदन कमी.

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट फोटोग्राफी तसेच सुरेख वर्णन .इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा व इतरांना त्यांचा लाभ देण्याचा वसा घेतलेल्या तुम्हा तरुणांच्या वाटचालीबद्दल अभिनंदन . तसेच पुढील शोधकर्यासाठी अनेकानेक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर वर्णन वाचताना स्वतः ट्रेक करतोय असेच वाटते आणि आम्ही याआधी अश्याच काही चाललेल्या अनवट वाटांची अनुभूती देते

    ReplyDelete
  4. खुप छान अणि शोधक भटकंती , तुमच्या मुळे ह्या घाटवाटांची माहिती मिळाली !!

    ReplyDelete
  5. हा ट्रेक थोडा क्लिष्ट वाटतो पण तुम्ही केलेल्या जबरदस्त वर्णनामुळे आणि तिथे मोठ्या प्रमाणात सापडलेलया अनेक खाना खुनामुळे या ट्रेक चे ओढ लागले आहे, तुमच्या लिखाणामुळे घरबसल्या अजून एक भटकंती करायला मिळाली. मस्तच !.

    ReplyDelete