Pages

Saturday, 3 July 2021

लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना

मावळातल्या दुर्ग लोहगडाच्या घेऱ्यातून दुर्गम परिक्रमा करताना १७ दुर्गम कातळलेणी धुंडाळली. थरारून गेलो पुरातन अप्रकाशित प्राकृत-ब्राम्ही शिलालेखाच्या दर्शनाने! कोडं पडलं, लोहगड असेल का, प्राचीन जैन लेणी-मठ?

२०१९च्या मे महिन्यातली आमची मोहीम होती दुर्ग लोहगडची! इंद्रायणीच्या नाणेमावळातला लोहगड सगळ्यात महत्त्वाचा दुर्ग - शिवप्रेमींचं स्फूर्तीस्थान, तज्ज्ञानी अभ्यासलेला आणि पर्यटकांनी फुललेला. सुपरिचित गजबजलेल्या लोहगडवर नवीन काय अनुभूती मिळणार, असा पूर्वग्रह करून घेतला नाही. पुसटशी माहिती मिळालेली, की ‘लोहगडाच्या घेऱ्यात कातळकोरीव लेणी-विवरं आहेत’. गडाच्या माथ्यावर नव्हे, तर त्याच्या कातळकड्यात खोदलेली लेणी-टाकी धुंडाळण्यासाठी गडाची परिक्रमा आखली. कल्पनाच नव्हती, की आम्हांला एक पुरातन खजिना आढळणार होता...
          
नकाशावर लोहगडाचा परिघ बघताना, त्रिकोणी माथा आणि ईशान्य टोकाबाहेर विंचवाच्या नांगीसारखी धावलेली ‘विंचूकाटा’ माची दिसली. दुर्गपरिक्रमेच्या पहिल्या टप्प्यात होता लोहगड-विसापूर दरम्यानच्या ‘गायखिंडी’पासून विंचूकाट्यापर्यंतचा उत्तरकडा. विंचूकाट्याच्या कातळपट्टीत लेणी शोधणं हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा विंचूकाटा ते लोहगडवाडीपर्यंतचा नैऋत्य कातळकडा. चौथा टप्पा, म्हणजे पूर्वेला लोहगडवाडीसमोरचा कातळकडा.
                
समव्यसनी दणकट ट्रेकरमंडळी जमली. सह्याद्री-जिओग्राफिक-कार विवेक काळे, मावळगूगल अमेय जोशी, आडवाटांमध्ये रमणारा निनाद बारटक्के आणि दुर्ग-लेणी-घाटवाटांवर रमणारे अस्मादिक (साईप्रकाश बेलसरे) होतेच. दिग्गज गिर्यारोहक अजय ढमढेरे आणि इंडॉलॉजिस्ट अभिनव कुरकुटे सामिल झालेले.
         
गायखिंडीत पोहोचलो, तेंव्हा पूर्वमान्सून ढगांच्या लाटा गडमाथ्याला धडका देत होत्या, गुरफटून टाकत होत्या, पूर्वेला निसटत होत्या. गळ्यातल्या घंटा किणकिणत गाई-शेरडं माळावर विखुरलेली.

गायखिंडीजवळ कातळकड्यात पाण्याची टाकी
गडाच्या माथ्याकडून झेपावणारा कातळकडा जिथे संपतो, तिथे माकडवाटांनी कड्याला बिलगून धोंडे-झाडी-जाळ्यांमधून प्रदक्षिणा घालायची होती. डोक्यावर हेल्मेट आणि त्यावरून मधमाश्याप्रतिबंधक जाळीची टोपी चढवली. 

गायखिंडीपासून धारेवरून ५० मी उंची चढून नेढ्यापाशी पोहोचलो. पूर्वाभिमुख कातळात जमिनीच्या पातळीवर मुख असलेलं, दीड मीटर रुंदी-उंचीचे टिचकं कोरडं टाकं होतं. नेढ्यापासून गडाच्या उत्तर पोटातून विंचूकाट्याच्या दिशेने आडवं निघालो. कातळातल्या दोन पावठ्या नोंदवत, दगड-घसाऱ्यातून कारवीचे बुंधे पकडून तोल सांभाळत दरडीवरून उतरलो. उत्तराभिमुख कातळात जमिनीच्या पातळीशी मुख असलेले, बोगद्यासारखी खोदाई केलेले टाके आढळले. विवेकसरांनी नोंदवहीत निरीक्षणे आणि रेखाटन काढलं. दोन अनवट टाक्यांच्या नोंदीसोबत, लोहगड परिक्रमेची सुरुवात झक्क झालेली.


उत्तर कातळकड्याच्या पोटातून दुर्गम धाडसी वाटचाल
डावीकडे डोकावणाऱ्या कातळकड्यावर वाळलेल्या गवताचे-शेवाळ्याचे पट्टे विखुरलेले. पायथ्याशी शिळांचा खच आणि माजलेली झुडुपं यातून कसरत करत जाणारी शिकाऱ्यांची पुसट पावठी. 

आमच्यासोबत उंडारायला निघालेला कुत्रा रानातले आवाज-गंध टिपत कधी पायात घुटमळायचा, तर कधी गुरगुरत सावध व्हायचा. 

एका क्षणी रानातल्या शांततेला चिरणारा आवाज घुमला. आमच्या चाहूलीमुळे भेकराने धोक्याची सूचना दिलेली. कड्याच्या पोटात ओलावा-गारवा होता. राखाडी कातळात स्फटिकांची नक्षी, त्यावर कोळ्याच्या जाळ्यांचं नक्षीकाम आणि बाहेर पाकोळ्यांच्या विष्ठेचा खच पडलेला. कुठे तिरकी लगबगीने जाणारी ‘रॉक गेको’ पाल, तर कुठे कपारीबाहेर शिकाऱ्यांनी साळींदर-सश्याला कोंडीत पकडण्यासाठी पन्हळीसारखी दगडांची रास रचलेली. 

एके ठिकाणी दगड-झुडुपांच्या गचपणात अडकलो. हेल्मेट आणि मधमाश्यारोधक टोपीमुळे हालचाल अवघड झालेली. वाट बंद झाल्याचं वाटू लागलं. इतक्यात, गडमाथ्यावरून शिवछत्रपतींचा जयघोष दरीत घुमला. मार्गही निघाला आणि गायखिंडीपासून गडाची उत्तर बाजू दोन तास कड्याच्या पोटातून जात आम्ही पोहोचलो विंचूकाटा माचीच्या कुशीत. 
                          
विंचूकाटा माचीच्या पोटातली लेणी-विवरे-टाकी
लोहगड परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यात विंचूकाटा माचीच्या पोटात मानवनिर्मित लेणी-टाकी उलगडणार होती. पहिली कातळकपार खुणावू लागली. १४ मीटर रुंद आणि ४.५ मी खोलीच्या कपारीत दोन ठिकाणी त्रोटक खोदाई आणि विभाजक खाच होती. तळाची सपाटी, पाठीमागचा कातळ आणि छत छिन्नीने तुळतुळीत केलेले. 




निसटत्या कातळपट्टीवरून पश्चिमेला २० मी आडवं गेल्यावर, २१ मी रुंद आणि ४ मी खोल कपार उलगडली. 

एका बाजूला सपाटी आणि छत छिन्नीने तासलेलं. गुहेचा विस्तृत उघडा भाग बघता, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी वापर होत असावा. 

समोरच्या आंब्यावर फांदीवरून धांदल करणारी ‘शेकरू’ खार पाहून आश्चर्य-आनंद वाटलं. लोहगडच्या उरल्यासुरल्या रानात शेकरू तग धरून होती. गुहेतून पायथ्याशी ७ मी उतरण्यासाठी उत्तम कटाई असलेला अरुंद जिना कातळात खोदलेला. कातळात साध्या-रांगड्या पावठ्या खोदण्याऐवजी कोण्या पाथरवटाने अदाकारी दाखवलेली.

पश्चिमेला १०० मी आडवं जात कपारी-गुहा तपासत निघालो. किंचित उंचावरची कपार चढून गेलो. 

ओबडधोबड कातळमुखाजवळ खोदीव खळगे होते. वाकून प्रवेश केल्यावर  ४ मी रुंद, ५.५ मी खोल आणि १.५ मी उंचीचा विस्तार आणि छिन्नीने सपाट केलेल्या भिंती दिसल्या. निवासी लेणीमध्ये नैसर्गिक झरा लागल्याने गारेगार पाणी साठले होते. कुठेतरी लपलेल्या बेडकाने सूर लावलेला. 

निसरड्या वाटेवरून पुढे निघालो. उजवीकडे खाली घेरेवाडीतली चिमुकली घरं, तर डावीकडे होती माथ्यावर विंचूकाटा माचीची तटबंदी. गडाचं विहंगम दर्शन घेणाऱ्या ‘ड्रोना’चार्याला गडाच्या पोटातल्या गुहांची आणि तिथे लुडबुड करणाऱ्या ट्रेकर्सची चाहूल लागली नव्हती. 
  
पुढे उत्तराभिमुख कातळपोकळीत किंचित नागमोडी बोगदा खोदलेला दिसला. कोण्या साधकाने इथे ध्यान लावलं असेल, असं दृश्य डोळ्यासमोर आणलं.


आम्ही आलेलं न आवडल्याने, गुहेतून हजारोंच्या संख्येने कसल्याश्या माश्या घोंघावत बाहेर आल्या. मधमाश्यारोधक टोपी, शरीर पूर्ण झाकणारे कपडे असल्याने आम्ही स्तब्ध राहिलो. मीटरभर रुंदीच्या बोगद्यातून रांगत गेल्यावर इंग्रजी ‘एल’ आकारात खोदलेले एकापाठोपाठ दोन टप्पे उतरलो. ४.५ मी खोल- २ मी रुंदीची खोली आणि गच्च दगड-धोंडे साचलेले.

विंचूकाटामाचीच्या टोकाच्या बुरुजाच्या पोटात पोहोचलो. कोसळणाऱ्या जलधारांचे ओरखडे सोडले, तर गवताचं पातंही नसलेला भव्य कातळकडा जणू अंगावर कोसळू पाहत होता. विंचूकाटा लेणीसमुहातील शेवटच्या गुहेची खोदाई उलगडू लागली. कंबरेवर हात ठेवून गुहेकडे चढणाऱ्या आरोहकांकडे बघत होतो. इतक्यात आरडा झाला, 'अरे माकडं बघ सॅकपाशी'. खाऊच्या आशेने माकडांनी सॅकची चेन सराईतपणे उघडलेली आणि पोटाला पिल्लं बिलगलेल्या माकडिणीने दात विचकारलेले. कसंबसं सॅक सोडवून दडवली.

वायव्येकडे उघडणाऱ्या गुहेच्या मुखापर्यंत ३ मीटर सोपा कातळटप्पा चढून गेलो. टॉर्चचे प्रखर झोत, हाकारे टाकून आणि दांडक्याने कातळ ठोकून, गुहेत कदाचित दडलेल्या सरीसृपांना-साळींदरांना आगमनाची वर्दी दिली. नैसर्गिक पोकळीला खोदत नेलेल्या छिन्नीचे घाव कातळावर उमटलेले. जेमतेम १ मी. उंच-रुंदीच्या गुहेत डोकावल्यावर, तळाशी षटकोनी आकाराचे आणि पाऊण मी लांबी-रुंदीचं मुख दिसले. 

मुखापासच्या डावी-उजवीकडच्या खोदीव खाचा निरखून आत डोकावल्यावर, इंग्रजी 'एल' आकारामध्ये काळोखात विवर हरवलेले दिसले. दोन्ही बाजूच्या कातळपट्टीवर तळवे टेकवून, अलगत विवराच्या आत पाय सोडत गेलो. दीड मीटर खोलीवर पाय टेकले.
                    
विवराच्या आत डोकावल्यावर थक्क झालो. पाउण मी रुंदीचा आणि ६ मी लांब चौकोनी गूढ बोगदा समोर होता.

सरपटत पुढे सरकताना उडणारे धुळीचे कण टॉर्चच्या प्रकाशात उजळत होते. भिंतीला चिपकलेला एखादा कोळी अचानक समोर आल्याने दचकलो. टोकाशी अजून एक इंग्रजी ‘एल’ आकाराची खोदाई होती. सव्वा मीटर उतरल्यावर अंधारी खोली जाणवू लागली. डावीकडे-उजवीकडे  ४ मी. लांब, २.५ मी. रुंदी आणि १.५ मी उंची असा विस्तार. खोलीच्या भिंती आणि माथा छिन्नीच्या घावांनी तासलेल्या, पण खोदाईनंतर धोंडे बाहेर काढले नव्हते. छतापाशी हलका ओलावा असला, तरी भरभरून पाणी साठत नसावे. सरपटी विवरात धपापलेलो. गुदमरु लागलेलं. काय असेल या विवर-लेणीचं प्रयोजन? लेणी कोण्या साधकांची? की पाण्याचे टाके? की लोहगडाचे संरक्षण मेट? की शिकाऱ्यांनी खोदलेलं? काहीच निष्कर्ष काढता येईना. 

लोहगड परिक्रमेच्या पूर्वार्धात कड्यातली लेणी-टाकी धुंडाळताना, गायखिंडीवरच्या कड्यात दोन पाण्याची टाकी आणि विंचूकाटा माचीच्या पोटात पाच लेणी-टाकी आढळलेली. अभ्यासू ट्रेकर दोस्तांबरोबर कष्टसाध्य निखळ आनंद अनुभवत होतो. कल्पनाही नव्हती, की परिक्रमेच्या उत्तरार्धात गडपुरुष प्रसन्न होऊन पुरातन खजिना उलगडणार आहे...



लोहगड परिक्रमेतला पुरातन खजिना (उत्तरार्ध)
दुर्ग लोहगडची अल्पपरिचित वारसा ठिकाणं बघण्यासाठी, आम्ही गडाच्या परिघाला कातळकड्याला माकडवाटांनी बिलगून धोंडे-झाडी-जाळ्यांमधून परिक्रमा करत होतो. परिक्रमेच्या पूर्वार्धात गायखिंडीच्या कड्यात पाण्याची दोन टाकी आणि विंचूकाटामाचीच्या पोटात पाच विवरे-लेणी-टाकी आढळली होती. कल्पनाही नव्हती, की परिक्रमेच्या उत्तरार्धात गडपुरुष प्रसन्न होऊन पुरातन खजिना उलगडणार आहे...



लोहगडच्या नैऋत्य कातळभिंतीमध्ये असतील लेणी?
आता पुढच्या टप्प्यात विंचूकाटामाचीच्या पोटातून गडाची नैऋत्य कातळभिंत निरखत, लोहगडवाडीपाशी प्रवेशद्वारांपर्यंतची बाजू तपासायची होती. गडमाथ्याचा कातळ ५० मी डावीकडे डोक्यावर ठेवून, कड्याच्या पोटातून निघालो. अडचणीच्या गचपणीतून जाताना ताकदीची-संयमाची परीक्षा सुरु झाली. सुरक्षिततेसाठी मधमाश्या-रोधक टोपी आणि हेल्मेटमुळे गुदमरायला लागलेलं. 

अस्तित्वात नसलेल्या वाटांवरून कदाचित काहीच नसलेल्या गोष्टी शोधायची कसली हौस! मात्र, गडाच्या या बाजूला जुनी लेणी-टाकी असतील का, ही शक्यता पडताळणे गरजेचे होते. उजवीकडे ७० मी खोलवर दुर्गामाऊलीच्या देवराईचा रानवा होता. धबधब्यांच्या खोलगटी-कपारीच्या तळाशी मर्कट-घारी-सरीसृप-गरुड आसरा घेत असतील, अश्या जागी पोहोचलो. 

धपापत्या ऊराने गच्च काटयांमधून रांगत-घुसत गेलो, तर कधी कातळ-घसाऱ्यावरच्या मोडलेल्या वाटा हेरत वणवण केली. 

तब्बल दोन तासांनी, वळणापल्याड वणव्याने करपलेल्या डोंगरउतारावर गडाची तटबंदी उन्हांत लखलखताना दिसू लागली. लोहगडच्या पुरातन कोड्यात ‘नैऋत्य कातळभिंती’त मानवनिर्मित कातळखोदीव गुहा-टाकी नाहीत, हे उलगडलेलं.

 
अल्पपरिचित लोहगडवाडी लेणी समूह
उन्हाळ्यात आडवाटांवरुन वणवण करून शिणलेल्या ट्रेकर्सना घरून आणलेली शिदोरी, थंड कोकम सरबत आणि गप्पाष्टक यामुळे तरतरी आली. आता लोहगडवाडी समोरच्या कातळकड्यात खोदलेल्या लेणींना भेट द्यायची होती. गडाच्या दक्षिण टोकास तटबंदीच्या बाहेर, विंचूकाट्याच्या खालच्या भुयारी टाकीसारखी टाकं आढळलं. गडाच्या पायऱ्यांच्या वाटेने निघालो. हजारो पर्यटक गडावर जातात, पण त्यांना या गडाच्या घेऱ्यातील लेणींबद्दल माहिती नसते. ५० मी चढाई केल्यावर पायऱ्यांची वाट सोडून, उजवीकडे कातळातल्या गुहेपाशी पोहाचलो. टिचक्याश्या पूर्वाभिमुख गुहेच्या आत एक कोनाडा खोदलेला. 
   
कातळकड्याला बिलगून उजवीकडे निघालो. झाडांच्या दाटीतल्या सपाटीवर पोहोचल्यावर, दोन थरांमध्ये खोदलेला लेणीसमूह समोर होता. 

वरच्या थरातील लेणीपाशी पोहोचण्यासाठी २० मी तिरक्या आखूड पावठ्यांची रांग होती. 

दोराची आवश्यकता नव्हती, पण बहिर्वक्र कातळावरून चढताना काळजी घेणं आवश्यक होतं. 

अनोख्या कातळखोदाईपाशी थबकलो. मुळातलं पाण्याचे टाके नंतर उभा छेद दिल्यासारखं खोदून काढलेलं. टाक्याची कड्याकडची बाजूदेखील खोदल्याने तिथे दोन-मजली लेणीरचना दिसत होती. 

टाक्याच्या खालच्या मजल्याची पाहणी करत असताना, माथ्याकडे पाणी उपसण्यासाठी खोदलेल्या मुखापासून टाक्याच्या वरच्या मजल्यावरून अमेय डोकावला. 

माथ्याकडचा कातळ सपाट करण्यासाठी, छिन्नीचे एकसलग, समांतर घाव सुबक दिसत होते. टाक्याच्या वरच्या मजल्यावर गेल्यावर, टाक्याच्या मुखावर झाकणासाठी खाच आणि भिंतीमध्ये आयताकृती कोनाडा दिसला. इतकं सुबक टाके खोदून, समोरची बाजू फोडून निकामी का केलं असेल, हे कळेना. कातळमार्गावरुन पुढच्या लेणीकडे निघालो. गुहेबाहेर व्हरांडा, दोन्ही बाजूला इंग्रजी एल आकाराचे बाक आणि उजवीकडे बुजलेले टाके होते. द्वारातून सभागृह लेणीत डोकावून, पाठीमागचा आणि डावीकडचा विहार आणि भिंतीवरच्या गिलाव्याच्या खुणा निरखल्या. डोकावणाऱ्या कड्याकडे तोंड करून, पुसट पावठ्यांवरून काळजीपूर्वक उतरलो. 
   
कड्यातल्या एकांड्या चौकोनी गुहेपर्यंत पोहोचणं आमच्या क्षमतेबाहेर होतं. 

खालच्या पातळीतील तीन लेणींकडे मोर्चा वळवला. गडावरून फेकलेला कचरा प्रवेशापाशी साठलेला. पडझड झालेल्या व्हरांड्यापासून पहिल्या लेणीत डोकावलो. द्वाराच्या दोन्ही बाजूला असलेले मोठे बाक, आतली प्रशस्त खोली आणि उजवीकडे शेजारच्या लेणीत उघडणारे द्वार न्याहाळले. लगतच्या लेणीतदेखील प्रशस्त खोदाई केलेले सभागृह होते. दगडमातीने बांधलेली आडवी भिंत खोलीला विभागत होती. तिसऱ्या लेणीचा अंदाज घेताना, भिंतीत खोदलेल्या चौकोनी खाचा निरखल्या. 
               
पुढे ५० मी अंतरावर कातळाच्या पोटातलं विशाल खांबटाके नजरेसमोर आलं.

मे महिन्यातही नितळ पाणी असल्याने, टाक्यापासून लोहगडवाडीत सायफनने पाणी नेलं आहे. ढमढेरेकाकांनी 'कोरा कागज सा ये दिल मेरा' असे स्वर आळवला. प्रतिध्वनीमुळे वटवाघुळांची आणि कातळावरच्या मोठ्ठ्या बेडकाची निद्राभंग पावली.

दुर्गम लेणीमध्ये गवसला अप्रकाशित शिलालेख
एव्हाना सगळी लेणी पाहून झाली असावीत, असं वाटू लागलेलं. आमचा मित्र संतोष आलमच्या मते दरडीमध्ये अजून एक गुहा असणार होती. मूळ कड्यापासून किंचित बाहेर आलेल्या दरडीच्या माथ्यावर जुनं खोदीव काम असेल, असं अजिबात वाटलं नव्हतं. इथेच, एक अफाट आश्चर्य गवसणार होतं. किंचित अवघड श्रेणीचं ८ मी कातळारोहण करताना, थोडा उंच आधार मिळाल्यामुळे डावा हात ताणलेला, तर उजव्या पायापाशी बुटांच्या घर्षणाचा निसटता टेकू मिळालेला. 

कसंबसं माथ्याच्या कातळपट्टीवर पोहोचल्यावर, उजवीकडे पटांगण आणि मोठ्ठी लेणी दिसली. लेणीची समोरची बाजू दगड-चिखलाची ओबडधोबड भिंत बांधून बंद केलेली. पटांगणातून लेणीचा तळ मीटरभर खोल होता. माथ्याकडे-भिंतीवरच्या खोदीव खाचा आणि तळाशी कोरलेले वर्तुळ कुतुहलाने पाहिले.

गच्च झाडोऱ्यामागे कललेल्या उन्हांत उजळलेल्या विसापूरचं दृश्य समोर होतं. दिवसाची लेणी भटकंती संपल्यामुळे, तिरप्या कातळावर निवांत पहुडलो. अन एके क्षणी “अरे तिकडे काssय आहे!!!”, अमेय अक्षरश: किंचाळत लेणीच्या उजव्या बाजूकडे पळाला. 

कोरड्या टाक्याच्या माथ्यावर खोदलेला प्राकृत भाषेतला, ब्राम्ही लिपीतला लेख पाहून आम्ही  थक्क झालो. लेखामध्ये ६ ओळी आणि प्रत्येक ओळीत साधारणत: ९ ब्राम्ही अक्षरे अशी सुस्पष्ट आणि रेखीव अक्षरवाटिका आहे. ब्राम्ही लिपीतली अक्षरे असलेल्या शिलालेखावरून अलगद हात फिरवताना, कोण्या पूर्वजांशी जणू थेट संपर्क होतोय असं वाटलं आणि अंगावर शहारा आला. आयुष्यातला एक निखळ आनंदाचा, भारावून टाकणारा क्षण!!! 
                
लोहगड लेणी ब्राम्ही शिलालेख वाचन
शिलालेखाचे वाचन-प्रकाशन करण्यासाठी डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागातील डॉ. श्रीकांत प्रधान यांचे मार्गदर्शन घेतले. पुरातत्व खात्याकडून परवानगी घेऊन शिलालेखाची छायाचित्रे आणि मोजमापे घेण्यात आली आणि निरीक्षणे Ancient Asia Journal मध्ये प्रकाशित करण्यात आली.
 
                
लेखाचे वाचन असे:
नमो अरहंताणं भयं
त इदरखितेन पोढी
[पे][थे][का] पथो दोआसना
[नि] वेयिका च कारापिता 
[स][ह]के ही सह गोसाले  
….…[नि]कतोनं
भावार्थ, अरिहंतांना नमस्कार! भदंत (पूज्य) इदरखित (इंद्र-रक्षित) याने लेणी आणि पाण्याच्या टाकीसाठी दान दिले.

संस्कृतप्रचुर प्राकृत भाषेतील हा मजकूर ब्राम्ही लिपीत खोदला आहे. लेखाची सुरुवात 'नमो अरहंताण' या जैनांच्या मंगलाचरणाने झाली असल्याने, हा प्राचीन जैन लेणी-मठ असावा. आश्चर्याचा भाग म्हणजे, लोहगड आणि मावळ परिसरातील ‘पाले लेणी’तील शिलालेखांमध्ये कमालीची समानता आहे - दोन्ही लेखांची सुरुवात 'नमो अरहंताणं' या जैनांच्या मंगलाचरणाने होते. दोन्ही ठिकाणी एकाच दात्याने - 'इदरखित' (इंद्र-रक्षित) नावाच्या पुजाऱ्याने (भदंत) लेणी-पोढीसाठी (टाके) दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. पाले लेखाची कालनिश्चिती इ.स.पू. पहिल्या शतकातील असल्याने, लोहगड शिलालेखही त्याच काळातील असू शकेल.

१९६९ मध्ये डॉ. शोभना गोखले यांनी पालेचा शिलालेख पश्चिम महाराष्ट्रातील आद्य जैन शिलालेख असल्याचा निष्कर्ष काढताना, “आसपासच्या गुहांमध्ये आणखी जैनलेख मिळू शकतात“ असं भाकित केलेलं. तब्बल ५० वर्षांनी पालेच्या श्रुंखलेतील शिलालेख मावळात आढळल्याने, डॉ. गोखलेंच्या द्रष्टेपणाबद्दल विलक्षण आदर वाटला. लोहगड शिलालेखाच्या रूपाने पाले एकांडा नसून, पश्चिम महाराष्ट्रातील जैन धर्माच्या अस्तित्वाबद्दल महत्त्वाचा दस्तऐवज आढळला आहे. नवीन कोडी अभ्यासकांना खुणावू लागतील, हे नक्की! 
 
संस्कृतीच्या पाऊलखुणा
आज मुंबई-पुणे रस्ता आहे, तिथेच इंद्रायणीकाठी २००० वर्षांपूर्वी कोकण आणि देशप्रांत जोडणारा पुरातन व्यापारी मार्ग होता. परिसरात लष्करी नियंत्रण, धर्मप्रचार आणि एकांत-साधना या हेतूने दुर्ग-लेणी-टाकी-शिलालेख घडवले गेले होते. धर्म-व्यापार-समाज संस्कृतीच्या या पाऊलखुणा नोंदवण्याच्या उपक्रमात, अभ्यासू सह्यमित्रांच्या साथीनं लोहगडची दुर्गम परिक्रमा केलेली. पूर्वजांच्या पाऊलखुणा गुहा-भुयारं-घळी-लेणी यांची साहसी भटकंती केलेली. अप्रकाशित शिलालेख-रुपाने प्रकट होण्यासाठी गडपुरुषाने आमची निवड केली, याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटली. मावळच्या जिग-सॉ कोड्यातील एक तुकडा उलगडला असला, तरी अजून बरंच काही नक्की दडलंय.
      
नोंदी:
१. ट्रेकर मंडळ: विवेक काळे, अमेय जोशी, अजय ढमढेरे, अभिनव कुरकुटे, निनाद बारटक्के, साईप्रकाश बेलसरे
२. सहकार्याबद्दल 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग' यांचे आभार
३. नकाशा, फोटो: साईप्रकाश बेलसरे
४. उन्हाळ्यात लेण्यांना भेट देणे योग्य. सरिसृप-वटवाघळे-श्वापदे यांचा वावर असू शकतो. शरीर पूर्ण झाकतील असे कपडे, मधमाश्या-रोधक टोप्या, ताकदीचे टॉर्च, हेल्मेट, काठी, भरपूर पाणी आवश्यक.



No comments:

Post a Comment