Pages

Sunday, 1 January 2023

विहंगम घाट-गमन

डेऱ्याची वाट - सिद्धगड - नारमाता - तवलीघाट (आणि गोरखगडाचे विहंगम दृश्य) - येतोबा - दमदम्या (आणि सिद्धगडाचे विहंगम दृश्य) - गायनाळ - जाखमाता वाट (सिद्धगड परिक्रमा संपूर्ण)

... जुन्या घाटवाटेची दमदार चढाई केल्यावर ऊर धपापत होतं. घाटमाथ्यावर एका मोक्याच्या डोंगरावर पुजलेल्या जागृत देवस्थानासमोर नतमस्तक झालो. धारमाथ्यावरच्या भर्राट वाऱ्याने लवणाऱ्या सोनसळी गवताच्या लाटा आणि कोकणात सुटवलेल्या दुर्गमाथ्याच्या ‘विहंगम’ दृश्याने मंत्रमुग्ध झालो. अर्थातच, असे कसदार अनुभव येण्यासाठी सोबत होती दर्दी सह्याद्रीमित्रांची. उत्तरोत्तर रंगणाऱ्या घाटवाटांच्या भटकंती-मैफिलीची मजा आम्ही कशी लुटली, याचा हा वृत्तांत!!!

          

भीमाशंकर परिसरातील नितांतसुंदर सह्याद्री

... ज्योतिर्लिंग ‘भीमाशंकर’च्या उत्तर आणि दक्षिणेला सह्याद्रीचे नितांतसुंदर रुपडं बघायला मिळते. इथला सह्याद्री माथ्याकडून कोकण-पायथ्याकडे न्याहाळला, तर काही वैशिष्ट्ये ट्रेकर्सना हमखास खुणावतात. माथ्यावर दिसतं भीमाशंकर अभयारण्याचे निबिड रान, त्यानंतर कोकणात उतरणारे ३०० मी कोसळलेले कातळटप्पे आणि करवती डोंगर-कातळधारा, मध्ये डोंगरसपाटी म्हणजेच डोंगराचा ‘पदर’ आणि रानमाणसांनी वसवलेली एखादी वस्ती, पदरातून पुढे कोकणात उतरणाऱ्या डोंगरालादेखील कातळकड्याचे आवरण आणि त्याच्या पायथ्याशी सह्याद्रीला बिलगलेला पण कोकणातून सणसणीत उठवलेला सुळकेवजा देखणा दुर्ग-डोंगर!!! आमच्या घाट भटकंतीत भीमाशंकरच्या या डोंगररांगांचं, दुर्ग-डोंगरांचं, रानाचं दर्शन घडणार होतं, म्हणून उत्कंठा दाटली होती.

                  

मनसुबा 'विहंगम घाट-गमना'चा, दुर्गपरिक्रमेचा

यावेळी मनसुबा होता भीमाशंकर परिसरात 'विहंगम घाट-गमना'चा, म्हणजे परिसरातील घाटवाटांची चढाई-उतराई करताना दुर्ग 'सिद्धगड' आणि 'गोरखगडा'चे विहंगम दर्शन करावे. त्यासाठी, सह्याद्रीच्या कुशीतल्या बोरवाडीतून 'डेऱ्याच्या वाटेने' सिद्धगडवाडी गाठायची. गडाच्या देवराईतील नारमातेचा आशीर्वाद घ्यायचा. पदरातून साखरमाचीपर्यंत आडवं जाऊन 'तवली घाटा'ची उभी चढाई करायची. आहुपे गावचा पाहुणचार घेऊन, दुसऱ्या दिवशी 'येतोबा राऊळा'पाशी गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याचे विहंगम दृश्य मनात साठवायचं. पुढे भट्टीच्या रानातून उठवलेल्या 'दमदम्या' डोंगरावरून 'दुर्ग सिद्धगड'चे विहंगम दर्शन करावे. गायनाळेतून पदरात उतरुन सिद्धगडाच्या दुसऱ्या वाटेने म्हणजे 'जाखमाता वाटे'ने उतरताना अल्पपरिचित दुर्गावशेष न्याहाळावेत. अशी ही भटकंती करताना सिद्धगडाची जणू 'परिक्रमा'च घडणार होती. एकंदर भन्नाट भटकंती मार्ग आखलेला. 


डेऱ्याच्या वाटेने सिद्धगडवाडी चढाई 

पहाटेचा प्रवास करुन, कर्जत-मुरबाड मार्गावरील म्हसा गावातून जांभुर्डे धरणाच्या बाजूने, भीमाशंकर अभयारण्याच्या हद्दीतील 'बोरवाडी'ला पोहोचलो. इथूनच पुढे वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक आहे. बोरवाडीतून सह्यधार आणि सह्यधारेपासून सुटवलेला 'सिद्धगड' दोन थरांत उठवलेला दिसत होता. एखाद्या पाण्याच्या डेऱ्याच्या आकाराचा भासणाऱ्या अजस्त्र डोंगराचा पहिला थर आणि त्याच्यावर उठवलेल्या गडाच्या बालेकिल्याचा दुसरा थर - दोन्ही आता कोवळ्या उन्हात उजळू लागलेले. वेळ सकाळचे ८३०.

     
घाटवाटांची चढाई-उतराई करण्याचे वेड लागलेले आम्ही मुंबई-पुण्याचे ट्रेकर्स जमलेलो. ट्रेकर्सच्या आवडीच्या डोंगरवाटांचे गप्पाष्टक रंगलेले. 

डेऱ्याच्या वाटेने सिद्धगडवाडी चढाई सुरुवात केली. रानाचा टप्पा संपल्यावर कातळकड्याला बिलगून वाट चढू लागली. मागे वळून पाहिल्यावर भीमाशंकर नागफणी, पदरगड आणि तुंगी डोंगर धूसर वातावरणात उठवले होते.  

माथ्याकडून उतरलेल्या कातळटप्प्यांमधून वाट काढली आहे. 

दुर्गमहर्षी गोनीदांनी केलेलं डेऱ्यासारख्या दिसणाऱ्या डोंगराच्या कातळवाटेवरील अवघड चढाईचे वर्णन आठवत होतं. पूर्वी किंचित अडचणीची असलेली वाट आता मात्र निसटत्या जागांवर खोबण्या खणून आणि दगड रचून सुगम केली आहे.   
             
काळा कातळ, तिरकी चिरेबंदीची वाट, सोनेरी गवताचे झुंबडे, कड्यावर रेंगाळलेले आणि झिरपणारे पाणी, दरीत जांभुर्डे धरणाचा जलाशय आणि निळं-सावळं आभाळ अश्या रंगसंगतीने आसमंत सजलेला. त्यामुळे, ट्रेकच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या चढाईचा शीण न येता, डेऱ्याच्या वाटेवरची चढाईचा आम्ही आनंद घेऊ लागलो.

अवचितच, एका फुरश्याने दरडावलं आणि मंडळाने पावलं झपझप उचलली.  

उत्साही ट्रेकर जोडपे सौ आणि श्री योगेश अहिरे यांच्याशी गप्पा मारता मारता डेऱ्याची वाट कधी चढून गेलो, कळलंच नाही. 

कातळ-बेचक्यातून सिद्धगडमाची पठारावर पोहोचण्याआधी झऱ्याचे सुंदर पाणी मिळाले. छोटेखानी विश्रांती घेतली. वेळ सकाळचे १०३०.
पदरातल्या सपाटीवर वाडीतल्या शेळ्या आणि आजा भेटला. सिद्धगडचा बालेकिल्ला माथा तब्बल ३०० मी उठवलेला. 
 
गड उजवीकडे ठेवत आडव्या जाणाऱ्या वाटेवर थोरले वृक्ष न्याहाळले. 

नारमाता राऊळापासून पदरातली आडवी वाट साखरमाचीकडे

पदरातून दिसणारे सह्याद्रीदृश्य उलगडू लागले. उजवीकडून डावीकडे उलगडत जाणाऱ्या या दृश्यात समोर होता  सिद्धगडचा बालेकिल्ला, त्यामागे दमदम्या डोंगर, डावीकडे येतोबाची सह्यधार आणि एखाद्या सोंगटीसारखा दिसणारा गोरखगडचा माथा!    
    

सिद्धगडमाचीवर मी तब्बल २० वर्षांनी आलेलो. २००१ला अभियांत्रिकी शिक्षण चालू असताना केलेल्या 'जुन्नर ते भीमाशंकर' जंबो ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. (भाग १, भाग २). 

माचीवरच्या नारमातेच्या राऊळापाशी विसावलो. भुंगे गुणगुण की भूणभूण करुन हैराण करत होते.  देवळातली अनघड देवता, लाकडी देव्हारा, रंगबेरंगी पताका, दीपमाळा, मूर्ती, असंख्य वीरगळी, तोफा - अश्या विपुल गोष्टी बारकाईने न्याहाळल्या. या मातीवर निश्चितपणे  कोणतेतरी झुंज झाले असणार. वेळ ११:१५. 

भटकंतीच्या पुढच्या टप्प्यातली 'तवली घाटा'ची वाट फारशी वापरात नसल्याने वाटाड्याची गरज होती. मंदिरात आहुपेच्या ‘सूर्यकांत घोडे’ आणि त्याचे साथीदार 'निळ्या' आणि 'बछडया' नावाचे भूभू भेटले. हा आधुनिक वाटाड्या कमरेला विळा लावून आला नव्हता, तर स्मार्टफोनवर इनस्टाग्राम रील्स आणि भावड्यांच्या क्रिकेट मॅचचे लाईव्ह बघत होता. वेळ ११:४५. मंदिरामागे सह्याद्री दृश्य बघताना डावीकडे येतोबा सह्यधार माथा, समोर दमदम्या डोंगर आणि उजवीकडे राजा सुळका खुणावत होता.

तवली घाटाच्या पायथ्याला आहे सिद्धगडच्या उत्तरेच्या पदरातील साखरमाची. तिथे पोहोचण्यासाठी लांबचलांब आडवी वाट होती. कोंढवळला चढणाऱ्या गायनाळेला बाजूला ठेवत ही वाट पुढे जाणार होती. नारमाता देवळातून बाहेर पडल्यावर पाच मिनिटात गडाच्या माचीचे भग्न द्वार आणि त्याला दिलेला लोखंडी आधार दिसला.   

वळणे घेत आता वाट मोकळवनात आली. मागे पाहिल्यावर सिद्धगडचा बालेकिल्ला आणि देवराईतील नारमाता देऊळ उठून दिसत होते. 

गवताळ कातळसपाटीवर जुन्या देवळी-घुमटीमागे सिद्धगडमाथा, झाडीटप्पे आणि उभे कातळकडे उन्हांत चमकत होते. 

दमदम्याच्या माथ्याकडून कोसळलेल्या डोंगरधारांच्या कुशीतून आडव्या जाणाऱ्या वाटेवर अक्षरक्ष: दचकलोच - अफाट झाडोऱ्याने नटलेल्या धारेच्या दृश्याने, रानात घुमणाऱ्या भेकराच्या कर्कश्य कॉल्समुळे आणि पायांखालून सळसळत गेलेल्या दणदणीत 'धामणी'च्या दर्शनाने!!! 


सह्याद्रीच्या पदरातील रम्य चालीचा आम्ही आनंद लुटत होतो. समोर सह्यमाथ्यावरील टिचके 'येतोबा देऊळ' चमकत होते. 

वाटेवर वाहत्या झऱ्याभोवती खोदलेली छोटुश्या पाण्याच्या टाक्याची चौकोनी खोदाई आढळली.

सिद्धगडमाचीकडून निघाल्यावर एकापाठोपाठ येणाऱ्या घळी ओलंडत, क्रमांक तीनची घळीतून चढणारी वाट गायनाळेची! ही वाट आम्ही दुसऱ्या दिवशी उतरणार होतो. वाहत्या झऱ्यापाशी जेवणं, गप्पा आणि योगनिद्रा झाली. गायनाळेची वाट उजवीकडे गेली आणि आम्ही समोर साखरमाचीची आडवी वाट घेतली. मोकळवनातून पाठीमागे गायनाळेची खोबणी निरखली. वेळ २:००.    

गायनाळेच्या फाट्यानंतर वाट थोडी धूसर झालेली आणि गच्च रानव्यातून जात होती.    


मोकळवनातून मागे सुरेख दृश्य होतं. घाटमाथ्याच्या दमदम्या डोंगराच्या धारा, सिद्धगडचा बालेकिल्ला आणि त्याच्यादरम्यान असलेल्या राजा सुळक्यामुळे बनलेला डब्ल्यु आकार! आणि, रम्य वाटेवरील वाटचालीमध्ये ट्रेकर्सच्या गप्पांना उसंत नव्हती. 

ओसाड पडलेली साखरमाची अंतर्मुख करुन गेली. कालाय तस्मै नम:!

तवली घाटातून गोरखगडाचे विहंगम दृश्य

पूर्वी साखरमाचीला लोकांची वस्ती असताना, त्यांना माथ्यावरच्या 'आहुपे'ला जाण्यासाठी जवळची वाट म्हणून 'तवली घाटा'ची वाट प्रचलित होती. साखरमाची उठली आणि तवली घाटाची वाटही बंद पडली. 

येतोबाच्या सह्यधारेच्या डोंगरापासून उतरलेल्या धारेच्या पल्याड घाटाची चढाई असणार होती, पण वाटेचा अंदाज येईना. 

झुडुपी रानातून आडवी वाट चढत निघालो. कोण्या गुरख्याने हाकारे मारुन तवलीने चढू नका, असं सुचवलं. आमच्यासोबत सूर्यकांत वाटाड्या असल्याने आमचा निर्धार पक्का होता. 

मुबलक दगडधोंडयातून कसरत सुरु झाली. 

डावीकडे आडवे चढत जाणारी अडचणीची वाट होती. फारशी वापरात नाहीच. 

झाडोरा कमी होत गेला आणि कातळटप्पे बाजूला ठेवत चढाई सुरु झाली. 

साखरमाचीपासून डोंगरदांडाला डावीकडे वळसा घालत वाट उंचचउंच चढत होती.  

तवलीघाटाच्या मुख्य भूवैविध्याचे (feature) दर्शन झाले. माथ्याच्या डोकावणाऱ्या कातळकड्यापासून एक खडकाळ ओहोळ, त्याच्या डावीकडच्या दांडावर कारवी आणि उजवीकडच्या दांडावर गवत माजलेलं. उभ्या कारवीतून चढून, मग खडकाळ ओहोळ आडवा पार करुन उजवीकडच्या दांडावरील गवतातून चढत अखेरीस कातळमाथ्याच्या पोटातून डावीकडे आडवं जात माथा गाठायचा होता. वेळ ३:३०. 

घाटवाटेची वैशिष्ट्ये समजावून घेताना ट्रेकर्सना भूगोलाची कोडी सुटण्याचा आनंद मिळू लागला. 

कातळटप्पे टाळून, डोंगरउतराईचा कोन (gradient) आणि पाण्याचे ओहोळ यांचा अभ्यास करुन - घाटवाट बनवणाऱ्या पूर्वजांची विचारसरणी समजावून घ्यायचा प्रयत्न केला. 

ढगांमुळे ऊन-सावलीचा आणि रंगांचा खेळ रंगलेला. 

सिद्धगड, साखरमाचीचा पदर आणि गोरखगडचा मोहक पॅनोरमा!  

गोरखगडाला लांबूनच वंदन केलं. ऊन-सावलीमुळे उजळलेला देखणा कातळमाथा! 

कातळओहोळ आडवा पार करुन आता उजवीकडील दांडावरील गवताळ वाटेवरुन चढाई करत निघालो.     

आभाळात ढगांचे पुंजके विस्कटलेले. उभी अजून उभी वाट!  

कुठेशी दोन ठिकाणी कातळात खोदलेल्या जुन्या पावठया.  


प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक वळणावरून बदलणारे गोरखगडाचे रुपडे! 

आणि, अक्षरक्ष: भारावून सिद्धगडाचे रुपडे! फार फार सुंदर!!!

कातळमाथा उजवीकडे ठेवत आडवी वाट. 

कड्या-कपारीत आश्रय घेणाऱ्या माकडांना आम्ही आलेलं आवडलं नसल्याने, त्यांनी आक्रमक गुरगुर सुरु केलेली. 

काही जुन्या पावट्या. 

आणि, अखेरीस पोहोचलो तवली घाटाच्या माथ्यावर. कोसळलेल्या घळीच्या पल्याड दुर्ग गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याचे अक्षरक्ष: विहंगम दृश्य!!! गरम चहाचे घोट घेत आम्ही त्या दृश्याचा आनंद घेतला. वेळ ५:३०. 

आहुपे गावी मुक्कामी पोहोचण्यासाठी तासाभराची चाल बाकी होती. येतोबा मंदिर तवलीघाटाच्या माथ्याजवळ आहे, पण आम्ही ते दुसऱ्या दिवशी भेट द्यायचं ठरवलं. घाटमाथ्याची फुलोऱ्यामधून जाणारी भन्नाट वाट होती. 

काळोख पडू लागलेला. उत्तरेला नाणेघाटाचे नाक, मोरोशी भैरवगड माथा, वऱ्हाडी डोंगर, जीवधन, ढाकोबा, दुर्ग आणि आहुपेचे पठार असा परिसर नजरेसमोर होता. आहुप्यात पोहोचेपर्यंत वाजले ६:३०. पायाची लाकडे झालेली, पण आहुपेच्या ग्रामस्थांच्या आदरातिथ्याने ट्रेकर मंडळी दुसऱ्या दिवशीच्या अजून रम्य भटकंतीसाठी तयार झाली. 

येतोबापाशी भारावून टाकणारे सह्याद्री दर्शन

आहुप्यात सकाळी आभाळात ढग आणि रंगांची उधळण झालेली आणि चक्क इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. रम्य भटकंतीची सुरुवात करण्यासाठी सह्याद्रीने जणू बावटा दाखवला होता. भटकंतीचा पल्ला मोठा होता. आहुपे गावातून 'येतोबा राऊळा'पाशी चढून गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याचे विहंगम दृश्य मनात साठवायचं. पुढे भट्टीच्या रानातून उठवलेल्या 'दमदम्या' डोंगरावरून दुर्ग 'सिद्धगड'चे विहंगम दर्शन करायचं. गायनाळेतून पदरात उतरुन सिद्धगडाच्या दुसऱ्या वाटेने म्हणजे 'जाखमाता' वाटेने उतरताना दुर्गावशेष न्याहाळायचे - असा बेत होता.
आहुपेचा निरोप घ्यायची वेळ झालेली. वेळ ७३०. आहुपेचे पश्चिम कडे उर्फ 'ढग' बघून, दक्षिणेला भीमाशंकर पाऊलवाटेवर निघालो. १०० मी चढाई करुन तासाभरात पोहोचलो येतोबाच्या 'येतोबा राऊळा'पाशी. वेळ ९:३०.  
   
सह्याद्रीतील काही अतिशय देखण्या जागांपैकी एक जागा. छोटेखानी राऊळ, मागे उठवलेला सिद्धगड आणि अफाट ढगांची दाटी! परिसरातील सर्वोच्च जागा असल्याने चोहोबाजूंना मोकळे नजारे बघायला मिळतात. दक्षिणेकडून सुरुवात करुन पश्चिमेकडे नजर फिरवली तर अफाट दूरदर्शन घडत होते. दक्षिणेला भीमाशंकर नागफणी, तुंगी, पदरगड, कोथळीगड, ढाकबहिरी, कळकराई सुळका, राजमाचीची जुळी शिखरे आणि माणिकगड. थोडं उजवीकडे पश्चिमेकडे नजर फिरवली तर माथेरानची अख्खी डोंगररांग – माथेरान, दुर्ग पेब, दुर्ग चंदेरी, ताहुली. तर पश्चिमेला बारवी धरण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आणि वायव्येला दुर्ग माहुली. 

भोळ्या भाविकांना पावणारे अनघड ठिकाण! पहा दृकश्राव्य:

  
ऐन सह्यधारेवर असल्याने अफाट दृश्ये! भटकंती मंडळ बेहद्द खुश! 

सह्यधारेवरील दमदम्या आणि पदरातून उठवलेल्या सिद्धगडाचे रुपडे तर डोळ्यात मावेना. ढगांमधून अलगद उतरलेली किरणे डोंगरउतारांवर विखुरलेली.  

येतोबाचा आशीर्वाद घेऊन पुढे दक्षिणेला वाटचाल सुरु केली. वेळ १०. 
सह्यधारेवरचा दमदम्या डोंगर आणि सह्याद्रीपासून सुटवलेला सिद्धगड सोनेरी गवताळ माथ्यावरुन न्याहाळले.


येतोबापासून दमदम्या डोंगराकडे जाताना, सह्यधारेवरुन उतरणारी  अतिशय रम्य वाटचाल होती. गवताळ सह्यमाथ्यावरील गवताळ उतार, सौम्य उताराची वाट, मोकळे लांब-लांबवरची दृश्ये, ढगांची नक्षी आणि आल्हाददायक हवा होती.  
धारेवरुन कोंढवळच्या भट्टीच्या रानाचे आणि गायनाळेचे विलक्षण रूप - ढगांच्या खेळामुळे रंगलेले. 

सह्यधारेवरचा दमदम्या डोंगर आणि सह्याद्रीपासून सुटवलेला सिद्धगड यांनी एखाद्या चुंबकाप्रमाणे आमची नजर खिळवून ठेवलेली. पहा दृकश्राव्य: 


दरीत ऊन-सावलीचा खेळ रंगलेला. 

पुढे दरीच्या काठावर अरुंद कातळकपारीतून चिमणी पद्धतीने उतराई केली. आधी पाठपिशव्या आणि मग आम्ही. वेळ १०:३०. 
           

यानंतर, वाटेने अर्ध्या तासाच्या अंतरात निसर्गदृश्ये आणि झाडोऱ्याची अत्यंत भिन्न रुपे दाखवली. 

आधी कड्याच्या काठावरची गवताळ माळावरची वाट... 

पुढच्या १० मिनिटात कारवीतून उतरणारी भन्नाट वाट... 

त्यानंतर पुढच्या १० मिनिटात सदाहरित रानाच्या टप्प्यातून सपाटीची वाट... 
कारवीटप्पा संपल्यावर मोकळवनात वाट-चौकात आलो. डावीकडे पूर्वेला भट्टीच्या रानातून वाट कोंढवळ-भीमाशंकरकडे गेलेली. उजवीकडे पश्चिमेला गायनाळ घाट सिद्धगडाकडे - ज्या वाटेने आम्ही थोड्या वेळाने उतराई करणार होतो. आणि समोर दक्षिणेला होता झाडीभरला दमदम्या डोंगर!

दमदम्या डोंगरमाथ्यावरुन सिद्धगडाचे विहंगम दृश्य

दमदम्या डोंगर ना कोणता दुर्ग, ना त्याचे काही ऐतिहासिक महत्त्व. मात्र दाट झाडोऱ्यातून अवश्य वाकडी वाट करुन जावं, असं खास आकर्षण या डोंगरमाथ्यावर दडलंय. 

झऱ्यापल्याड पाठपिशव्या दडवल्या आणि दमदम्या डोंगराकडे निघालो. डावीकडे पूर्वेला उतरलेल्या डोंगरउताराकडून ओहोळाच्या काठाने वाटचाल करावी लागली. वाट फारशी मळलेली नाहीये, त्यामुळे कारवी-झुडुपांमधून घुसाघुशीला पर्याय नाही. वेळ ११.


ओहोळापाशी फुलपाखरांची लगबग चाललेली. कारवीच्या झाडोऱ्यामागून भलं थोरलं 'ब्लु मोरमॉन' फूलपाखरु तरंगत आलं.. झाडीतून घुसत-चढत पोहोचलो दमदम्या डोंगरमाथ्याला. वेळ ११५०. 

दमदम्या डोंगरमाथ्यावरुन  समोर आलं दुर्ग सिद्धगडाचे 'विहंगम' दृश्य! सह्यधारेवरुन सुटवलेला डेऱ्याचा डोंगर, पदरातील झाडोऱ्यातून उठवलेला ३०० मी उंचीचा बालेकिल्ला माथा. ते दृश्य बघत कितीतरी वेळ तिथे बसून राहिलो..  

दक्षिणेला डोंगर-झाडीच्या दुलईमागे भीमाशंकर, पदरगड, तुंगी, कोथळीगड आणि घाटवाटा खुणावत होत्या. आडवाटांच्या ट्रेक्ससाठी 'दम' असणाऱ्या ट्रेकर्ससाठी असलेला आणि नाहीतर 'दम' काढणारा किंवा 'दम्या'ला आमंत्रण देणारा 'दमदम्या', अशी कोटी मारण्यात आली. 

गायनाळेची धोपट उतराई

दमदम्याचं गचपण उतरुन, धसक-फसक करत - पायथ्याच्या येतोबा-कोंढवळ-गायनाळ चौकात परतलो. 


दोन घास जेवण आणि विश्रांती झाली. कोंढवळचे दोन गुराखी गावकरी भेटल्यावर गप्पा रंगल्या. त्यांनी 'रानात बिबट्या नाहीच आणि पट्टेरी वाघ आहेच' असं ठणकावून सांगितलं आणि ट्रेकर्सना खिदळण्यासाठी अजून एक निमित्त मिळालेलं...  

गायनाळेच्या मुखापाशी वाटाड्या सूर्यकांत आणि त्याचे दोन साथीदार भूभू 'निळ्या' आणि 'बछडया' यांना निरोप घ्यायची वेळ झाली. दोन दिवस एकत्र चाल केलेल्या गटाची ताटातूट होताना भूभू गोंधळले आणि केविलवाणा आवाज करू लागले. सूर्यकांत आहुपेकडे निघाल्यावर भूभू मागून निघाले. आणि, आम्ही उतरू लागलो 'गायनाळ' उर्फ 'सिद्धगड घाटा'ची वाट! वेळ १३०.

      
गायनाळेतून दगड-धोंडयामधून आणि झुडुपांमधून उतरणारी फरसबंदीची वळणा-वळणाची वहिवाट होती. 


नाळेची उतराई झाल्यावर सिद्धगडवाडी ते साखरमाची जाणारी पाऊलवाट आडवी आली. याच वाटेने आदल्या दिवशी आम्ही तवली घाटाकडे गेलेलो. आभाळात ढग दाटलेले होतेच आणि अशक्य घामटं निघत होतं. वेळ २४५. 

सिद्धगडवाडीच्या आडव्या वाटेवरून पाठीमागे वळून पाहिलं. पदरातील झाडी, येतोबाचा कडा आणि माथ्यावरचं इतुकंसं 'येतोबा राऊळ' पाहतच राहिलो. इतक्यात दत्तू ओरडला, 'अरे, ती बघ धामण परत'. उन्हात लखाखणारी तब्बल १० फूटी धामण क्षणार्धात गवतात सळसळत गेली सुद्धा!

जाखमातेच्या वाटेवरील अल्पपरिचित दुर्गावशेष

वळण घेणाऱ्या वाटेवरून सिद्धगडमाचीत प्रवेश केला. नारमातेच्या देवळात वंदन केलं आणि क्षणभर टेकलो. सिद्धगडवाडीतून खाली उतरण्यासाठी काल आलेल्या 'डेऱ्याच्या वाटे'ने आम्ही उतरणार नव्हतो, तर 'जाखमातेच्या वाटे'ने उतरणार होतो. सह्यधारेवरचा दमदम्या डोंगर आणि त्याच्या पश्चिमेला सुटवलेला सिद्धगड यांच्या धारेवर 'राजा सुळका' आहे. नारमाता देवळापासून या राजा सुळक्याला डावीकडे ठेवत 'जाखमातेची वाट' खिंडीत चढते आणि मग पलिकडे उतरते. या वाटेवर सिद्धगडाचे अल्पपरिचित दुर्गावशेष आमची वाट बघत होते. 
 
नारमाता देवळापासून राजा सुळका डावीकडे ठेवत खिंडीत चढताना उजवीकडे सिद्धगडाचा बालेकिल्ला आणि कातळकोरीव पावठ्या न्याहाळल्या. जाखमाता खिंडीतून सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जाणारी जुनी वाट असणार - कारण बालेकिल्ल्याच्या कातळात ५० मी ऊंचीवर खोदीव गुहा आणि पायऱ्या जाणवतात. 'जाखमाता खिंडीतून सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जाणे; जुन्या वाटेचा आणि गुहा-खोदाईचा शोध घेणे', हा साहसी गिर्यारोहकांसाठी हा छान उपक्रम होवू शकेल. 

ढगांच्या दाटीमुळे किच्च घामट आणि जंगलातले रंगीबेरंगी डास अशक्य सतावत होते. पण, जाखमाता खिंडीतून पलीकडे भीमाशंकर, पदरगड आणि घाटवाटा दृश्य परत एकदा उलगडले आणि वाटचाल सुसह्य झाली. 

आमच्या पाठीमागे राजा सुळका आणि दमदम्याचे पश्चिम कडे खुणावत होते.   

पत्र्याच्या आच्छादनाखाली राउळात 'जाखमाता' म्हणजेच यक्षिणेची पूजा केलेली. वेळ ३५०.

यक्षिण ही वेशीपाशी पुजिली जाणारी दुय्यम देवता. इथून बालेकिल्ला माथ्याला डावीकडून प्रदक्षिणा मारत, पदारातून सिद्धगडवाडीला जाणारी वाट आहे. आम्ही मात्र दक्षिणेला उतरणाऱ्या वाटेने निघालो.  

समोर आली सिद्धगडमाचीच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराची उध्वस्थ चौकट! फारश्या ट्रेकर्सनी न भेट दिलेली ही गडाची दुर्लक्षित बाजू. 
जाखमातेच्या द्वारापासून ५० मी उतराई केल्यावर, डावीकडच्या दरडीमध्ये खोदाई केलेली पाण्याची दोन टाकी दिसली. उथळ खोदाई आणि गढूळलेलं पाणी. पण, गडावर राबता असताना इथे उपयुक्त पाण्याचा साठा असणार.  

जाखमातेपासून नाळेची वाट उतरुन, बोरवाडी ते हुतात्मा स्मारक रस्त्यावरील पुलावर पोहोचलो. वेळ ४४५. आणि १५ मिनिटांत बोरवाडीत.
    

दमदार ट्रेकची सांगता करायची वेळ झालेली. बोरवाडीत गच्च घामाने आणि मातीने माखलेले कपडे बदलले. बोरवाडीतील आजीने मायेने दिलेला कोरा चहाने तरतरीत झालो. एव्हाना आभाळ गच्च दाटून आलेलं. अवकाळी पावसाचा तडाखा सुरु झालाच. दोन दिवसांच्या अफाट सह्याद्री दर्शनाने आनंदाने आणि ऊर्जेने भारावून गेलेलो. 'विहंगम घाट-गमना'ची अनुभूती घेतलेली. कृतज्ञ आहोत - सह्याद्रीचे आणि आमच्या सह्याद्रीमित्रांचे, केवळ ज्यांच्यामुळे असा कसदार अनुभूती देणारा ट्रेक शक्य झाला... 

---------------------------------------------------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:

१. ट्रेकच्या तारखा: २०-२१ नोव्हेंबर, २०२१ (ब्लॉग लिहायला जरा वेळ लागला)

२. नकाशा आणि फोटो: साईप्रकाश बेलसरे

३. ट्रेकर मंडळ: योगेश अहिरे, अश्विनी अहिरे, जितेंद्र बंकापुरे, साईप्रकाश बेलसरे

४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२२. सर्व हक्क सुरक्षित.


12 comments:

  1. झक्कास...साई ..

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद, नाना! :)

      Delete
  2. अफलातून आणि माहितीपूर्ण लिखाण👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद, ढमढेरेकाका! :)

      Delete
  3. अतिशय नेटक पण तितकेच भुलावणारे लेखन, साई. मस्त वाटले ब्लॉग वाचून

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद, उत्तमराव! :)

      Delete
  4. As always superb blog Sai. We had done this trek in October 2021.But we did Ahupe-Gaydara-Narmata-Sidhagad top-Sakharmachi-Tavli-Yetoba-Ahupe trek.The Derya and jakhmata routes are very interesting and still in use though sparingly. You have covered the entire route and trek so succinctly and captured the sounds, smells and sights on this route beautifully. The view from Yetoba and the Gorakh/Machindra views from Tavli top are breath taking to say the least. The fort remnants on the Jakhmata route are very interesting. Always look forward to new blogs from your side. Take care and best wishes for the new year.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप धन्यवाद, अमित! :) खरंय, हा अफाट रम्य ट्रेकिंग प्रदेश आहे! तुम्हालाही कसदार भटकंतीसाठी खूप शुभेच्छा!

      Delete
  5. खूप छान व माहितीपूर्ण वर्णन.

    ReplyDelete
    Replies
    1. संकल्प - मित्रा, खूप खूप धन्यवाद! :)

      Delete
  6. खूपच छान साई .. एका माहित नसलेल्या परिसराचा ओळख झाली

    ReplyDelete
    Replies
    1. राहुल - मित्रा, खूप खूप धन्यवाद! भीमाशंकरच्या उत्तरेचा हा अफाट देखणा सह्याद्रीप्रदेश आणि गर्दीपासून कोसोदूर आहे :)

      Delete