Pages

Sunday, 27 November 2022

कोळकेवाडी दुर्ग - कोळीराजाच्या स्वातंत्र्य-स्वप्नांची दुर्गलेणी

कोळकेवाडी दुर्ग - कोळीराजाच्या स्वातंत्र्य-स्वप्नांची दुर्गलेणी                   

आमच्या दुर्गप्रेमी मित्रांना ‘कोळकेवाडी दुर्ग’ ऐकून माहिती असतो. मात्र, तिथले दुर्गस्थापत्य आणि इतिहास याची फारशी माहिती उपलब्ध नाही. दुर्गमतेमुळे कोळकेवाडी दुर्गावर फारसं जाणं होत नाही, त्यामुळे गडावरच्या असलेल्या तब्बल २९ कातळ-खोदीव लेणीची माहिती फार कमी लोकांना. गडाच्या इतिहासाची पानेही त्रोटक; त्यामुळे इथल्या मातीवर कोण्या कोळीराजाने बहमनी सत्तेविरुद्ध उभारलेल्या संग्रामात वीरांचे शौर्य आणि काहींच्या वीरमरणानंतर सती गेलेल्या स्त्रियांचे बलिदान असं सगळं सगळं विस्मृतीत गेलेलं. कोळीराजाच्या स्वातंत्र्य-स्वप्नांची दुर्गलेणी अभ्यासण्यासाठी खास मोहीम आखली होती. 

... ट्रेकच्या आदल्या रात्री कुंभारली घाट उतरुन पोफळीला मुक्काम केला. अभ्यासू ट्रेकर आणि ‘सह्याद्री जिओग्राफीक’कार ‘विवेक काळे’सर, आडवाटांचा गुगल आणि आडवाटांवर फिरणाऱ्या सगळ्यांचा मित्र ‘अमेय जोशी’, कुठल्याही डोंगर-कातळावर लीलया घुसून जुने अवशेष शोधणारा ‘मिलिंद लिमये’, सह्याद्रीच्या अनवट दुर्गम डोंगर-घाटवाटांवर मित्रांसोबत रमणारा नादिष्ट ‘जितेंद्र बंकापुरे’, सह्याद्री भूगोल कोळून प्यालेला आणि अव्वल फोटोग्राफर असलेला ‘निनाद बारटक्के’ आणि सह्याद्री घाट-दुर्ग-लेणी यामध्ये रमणारे अस्मादिक असा गट जमलेला! अलभ्य लाभ म्हणजे, या भटकंतीला आम्हाला सोबत होती पोफळीच्या ‘सह्याद्री संवर्धन आणि संशोधन केंद्रा’चे अभ्यासू कार्यकर्ते ‘सदफ कडवकर’ आणि ‘राणी प्रभुलकर’ यांची.

   

उभ्या डोंगरधारेवरुन वनदुर्गाची चढाई

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सह्याद्रीच्या अगदी कुशीत कोळकेवाडी गावात आम्ही आलेलो. सकाळी गावाच्या पूर्वेला घाटमाथा जबरदस्त उठावला होता. कातळ-झाडीचे टप्पे धूसर-गूढ दिसत होते. 

सदफ सांगू लागला, “तो दिसतो का झाडीमागचा काळा डोंगर. इथले गावातले जुने लोकं सांगतात, की तिथे होती कोळीराजाची राजधानी, म्हणून हा ‘कोळीराजाचा दुर्ग’!.” गडाच्या ओढीने पाठपिशव्या चढवल्या आणि कूच केलं. ईशान्येला दांडावरून नागमोडी वाटेवरून चढाई सुरु केली. पश्चिमेला कोळकेवाडी धरणाचे निळेशार पाणी लखलखू लागले. 


नेहेमीप्रमाणे गावाजवळचे डोंगरउतार शेतीसाठी आणि सरपण-चाऱ्यासाठी उघडे-बोडके केलेले. त्यातून अधून-मधून उठवलेले भातखाचरं आणि  शेतात राब जाळण्यासाठी फांद्या तोडून निष्पर्ण केलेल्या झाडांचे बुंधे, अशी मनुष्यकृत्ये डोळ्यात खुपत होती. 


पाऊलवाट आता गर्द रानात शिरली आणि खरा ट्रेक सुरु झाला. झाडाच्या बुंध्यावर कोण्या सांबराने शिंगं घासल्याच्या खुणा, कुठे बिबट्याच्या पायांचे ठसे, कुठे गव्याची विष्ठा तर कुठे गवताळ माळावर रानडुकरांनी लोळून केलेलं गवत अश्या पदोपदी खुणा आढळू लागल्या. समोर घाटमाथ्यावर ‘सह्याद्री व्याघ्रप्रकल्प’ आणि दाट झाडीभरला माथा खुणावू लागला. वाघाच्या-अस्वलांच्या थरार-भयकथा रंगायला निमित्त हवंच होतं.

गावापासून पाऊण तासाच्या चढाई नंतर रानवा संपला आणि टेपावर पोहोचलो. लक्षात आलं, की सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेपासून पश्चिमेला निसटलेल्या डोंगरसोंडेवर आम्ही पोहोचलोय. अरुंद डोंगरधारेवर दिसत होते - कसंबसं तग धरुन राहिलेल्या निष्पर्ण वठलेल्या वृक्षांचे बुंधे, त्यापल्याड काळाठिक्कर उग्र उघडा-बोडका दुर्गमाथा आणि पाठीमागे तिन्ही बाजूंनी वेढलेल्या सह्याद्री घाटमाथ्यापासून कोसळलेल्या असंख्य डोंगरसोंडांच्या करवती धारा! गवतात दडलेले गडाचे अवशेष मोकळे झाल्यावर भेट द्यावी, या हेतूने मार्च महिन्याचा मुहूर्त आम्ही निवडलेला.  

                    

गडपण सिद्ध करणारे संरक्षक खंदक

गडाची वाट उभ्या डोंगरधारेवरुन चढत होती. तळपणारे ऊन, वठलेले वृक्ष, निवडुंगाचे फड, वाळलेले गवत, निसरडी गांडूळमाती आणि दगड-धोंडे यातून ४५ अंशांतली रखरखीत चढाई चालू झाली. साधारणत: गडांवर संरक्षक तटबंदी दिसते. कोळकेवाडीला मात्र शत्रूला अडवायला कातळात खोदलेल्या एकापाठोपाठ एक अश्या तीन खंदकांची (संरक्षक आडोसे) वैशिष्ट्यपूर्ण व्यूहरचना सामोरी आली. 

धारेवरुन अंदाजे १ मीटर खोल खंदक-खाचेत उतरायचं, खोदाईची जेमतेम सफाई न्याहाळायची, मधली सपाटी पार करुन पलिकडे उभ्या कातळातून परत चढाई करायची. 


खंदकांतून कसरत करताना डोक्यावर तळपत होता सूर्य, घशाला कोरड पडलेली आणि आभाळात घिरट्या घालत होता शिक्रा पक्षी! इथे डोंगराला बांधीव तटबंदी नसली, तरी गडमाथा गाठण्यासाठी असलेल्या या एकमेव मार्गावरची खंदकांची संरक्षण-यंत्रणा बघता ‘दुर्ग’ मानलेच पाहिजे, असे वाटले. 

खंदकापासून गडावरच्या २९ लेणी-टाक्यांचे तीन गट बघता येतात. डोंगरधारेच्या डावीकडे (उत्तरेला) लेणी क्रमांक १ ते १६, गडमाथ्यावरून दक्षिणेच्या कड्यात अवघड जागी अल्पपरिचित लेणी क्रमांक १७ ते २७ आणि डोंगरधारेच्या उजवीकडे गेल्यास पाण्याची टाकी २८-२९ बघता येतात. आम्ही प्रथम गडमाथा न्याहाळून, पलिकडे दक्षिण कड्यातल्या अवघड लेण्यांचं कोडं सोडवायचं ठरवलं.

    

गडमाथ्यावरून उलगडले दुर्गाचे भूराजकीय महत्त्व आणि कोळीराजाच्या आठवणी

कोळकेवाडी गावातून निघाल्यापासून दोन तास आणि ५०० मीटर चढाईनंतर चिंचोळा गडमाथा गाठला होता. सह्याद्रीचा विराट पॅनोरमा समोर आला. भ्रमणमंडळातल्या एकेकाने आपापल्या दृष्टीकोनातून गडाची ओळख करुन द्यायला सुरुवात केली. विवेकसरांनी सांगितलं गडाचं भौगोलिक स्थान - “शेकडो वर्षांपासून चिपळूण आणि कराड ही महत्त्वाची व्यापारी केंद्रे. चिपळूण कोकण किनारपट्टीपासून पूर्वेला असले, तरी वाशिष्ठी नदीच्या पात्रातून छोट्या व्यापारी होड्या थेट चिपळूणपर्यंत पोहोचत असंत. तिथून घाटमाथ्यावरील पाटण-कराड या कोयना खोऱ्यातील व्यापारी केंद्रांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटवाटेजवळ, कोळकेवाडी दुर्गलेणीसमुह कोळीराजाने कोरला असावा.”. निनादने परिसरातल्या घाटवाटांची ओळख पटवली, “तो तिकडे उत्तरेला तिवरेघाट आणि त्याचा रक्षक पायथ्याचा ‘बारवाई’ दुर्ग. आपण आहोत त्या कोळकेवाडीवरुन कधीकाळी ‘दुर्गाची सरी’ घाटवाट चढायची – ती आता बंद पडलीये. आणि तिकडे दक्षिणेला पोफळीचा कुंभार्ली घाट आणि त्याचा रक्षक दुर्ग ‘जंगली जयगड’. म्हणून या घाटवाटांचा संरक्षक असणार हा किल्ला”.

       


गडमाथ्यावर जुन्या घरांचे जोते, वीरगळी आणि मातीच्या भांड्यांची खापरे आढळली. साहजिकच मनात आलं की कोणी इथे बांधला असेल हा दुर्ग, काय प्रयोजन असेल; गडाने कोणते झुंज पाहिले असेल; कोणत्या ध्यासाने लढताना वीरमरण आले असेल? इतिहास-बखरींच्या त्रोटक नोंदी कोळकेवाडी आणि बारवाई परिसरात स्वातंत्रस्थापनेचे स्वप्न बघणाऱ्या बारेराव कोळयाची, म्हणजेच कोळीराजाची गोष्ट सांगतात. तेराव्या शतकात बहामनी पातशहाला सलग तीन मोहिमांमध्ये पराभूत करून बारेरावांनी त्रस्त केलेलं. पहिल्या मोहिमेत शेख आकुसखानला बारारावांनी कुंभार्लीघाटात पोफळीला पराभूत केले. दुसऱ्या मोहिमेत भाईखानला दळवटणे येथे पराभूत केले. तिसऱ्या मोहिमेत बहादुरशेख यांना चिपळूणजवळ ठार केले. शेवटी पातशहाने सोमाजी-सिदोजी शिंदे यांना पाठवले. त्यांच्यासोबत तीन लढाया होऊन अखेरीस बारराव कोळी यांचा मृत्यु होऊन हा स्वातंत्र्यसंग्राम संपला. पलिकडच्या बारवाई किल्ल्यावर कोळ्याच्या स्त्रिया सती गेल्या. गडाची मोक्याची जागा, संरक्षक खंदक, शिल्प-देवता-वीरगळ, पाण्याची ठिकाणे आणि निवासाची लेणी अशी लक्षणे बघता, बारेरावांच्या स्वातंत्र्यमोहिमेत कोळकेवाडी दुर्गाने चांगलीच साथ दिली असणार, ही नक्की!

              

गडाच्या दक्षिणेची अल्पपरिचित दुर्गम लेणी

गडमाथ्यावरून दक्षिणेच्या कड्यात अवघड जागी अल्पपरिचित लेणी क्रमांक १७ ते २७ धुंडाळायची होती.

करपलेल्या डोंगरउतारावरून उभं राहून उतरणं शक्य नव्हतं. रेताड जमिनीला बूड टेकवत-घासत ५० फूट कसंबसं उतरलो. 

थेट कोसळलेल्या दरीच्या काठावरून ही डोंबारकसरत करताना आधाराला काहीच नव्हतं. 

अखेरीस सुरक्षादोर लावून पुढील ५० फूट उभ्या कातळावरून उतराई केली. 


पायाला टेकायला पुरेसे आधार असल्याने रॅपलिंग तंत्राची गरज नाही. दोर असल्यावर मानसिक आधार वाटला आणि लेण्यापाशी पोहोचलो.

पहा दृकश्राव्य:: 


तिरक्या डोंगरउतारावर कुठे विहार-सदृश खोदाई, तर कुठे पाण्याचे हौद अश्या ११ खोदाईच्या जागा नोंदवल्या.



 पावसाळ्यात इथे पोहोचणे अशक्यच. 

सच्छिद्र ठिसुळ कातळाची निवड लेणी खोदायला केल्यामुळे बहुतांशी लेणी सामान्य दर्जाची आणि अर्धवट सोडलेली. 

कोठेही धर्माशी निगडीत स्थापत्य किंवा शिलालेख नाही. इतके कष्ट घेऊन खोदाई का केली, खोदाई तंत्र सामान्य का आणि अर्धवट सोडून का दिली – असे प्रश्न अनुत्तरित राहिले. 





दक्षिणेची अल्पपरिचित दुर्गम लेणी पाहून माथ्यावर परतलो. 


उत्तरेची निवासी लेणी 

कोळकेवाडीवरची दुर्गप्रेमींना माहिती असलेली उत्तरेची लेणी बघण्यासाठी निघालो. माथ्यावरून डोंगरधारेवरुन उतरायला सुरुवात केली. तहानेने व्याकूळ झालेलो आणि खडतर शोधमोहिमेमुळे सोबतचे पाणी मर्यादित उरलेले.



आधी डावीकडे (दक्षिणेला) वळून गुहेतल्या पाण्याचा शोध घेतला. मार्चमध्ये गुहेतलं पाणी आटलेलं. आत टोकापाशी एका खळग्यात थोडकं पाणी साठलेलं, ते निनाद्रावांच्या पाणी-शुद्धीकरण बाटलीने शुद्ध केलं. जेवणानंतर गारेगार कोकम सरबत बनवलं आणि ट्रेकर मंडळाला तरतरी आली. 


पाण्याच्या गुहेपासून परत धारेवर आलो आणि उजवीकडे (उत्तरेची) लेणी बघण्यासाठी निघालो. कड्याच्या काठाने पाच-सहा पायऱ्या उतरल्यावर लेणी क्रमांक ४ सामोरी आली. सामान्य खोदाई असलेली लेणी राहण्यासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी असावी. पूर्वेला मोठी लेणी, म्हणजे तीन बाजूला कातळभिंत असलेले उघडे दालन आहे. लेणी क्रमांक ६ ही मोठी लेणी आहे. आत स्तंभांचे अवशेष न्याहाळले. पाण्याची टाकी क्रमांक ७ आणि ८ मातीने बुजली आहेत. 



कोळकेवाडीची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लेणी क्रमांक ९ आहे. दुमजली लेणीला दोन खिडक्या आणि नक्षी कोरली आहे.

(रेखाटन साभार: विवेक काळे)

विवेकसरांनी त्या नक्षीला ‘चार पाकळयांच्या चिरायती फुलांचा संच’ असं अचूक नाव योजलं. 



डावीकडच्या छोट्या दारातून लेणी क्रमांक १२ मध्ये गेलो आणि वटवाघुळांच्या फडफडण्याने चांगलंच दचकलो. 



उत्तर कड्यावरच्या या महत्त्वाच्या लेणीखेरीज दुय्यम खोदाईची टाकी-हौद निरखली. 



अश्या पद्धतीने कोळकेवाडीची २९ लेणी बारकाईने न्याहाळून झाली. 

          


दुर्ग-लेणीस्थापत्य आणि इतिहासाच्या स्मरणांची कवाडे उघडणारा अनुभव

उन्हं कलंडली होती. परतीच्या वाटेवर निघणं भाग होतं. अभ्यासू आणि दणकट तुकडीसोबत दिवसभरातल्या खडतर भटकंतीच्या अनुभवांची मनात उजळणी चालू झाली.. 

.. कधी उभ्या डोंगरधारेवर छाताडावरच्या चढावर धस्सक-फस्सक चढाईने त्रासून गेलेलो; पण करपलेल्या डोंगरमाथ्याला वेढून टाकणाऱ्या सह्याद्रीच्या पश्चिम कड्यांच्या पॅनोरमाने भारावून गेलो.

.. कधी डोंगरधारेवर निष्पर्ण वठलेल्या वृक्षाची नक्षी निरखत असताना, अवचित एके क्षणी आभाळात झेपावणाऱ्या गरुडाच्या दर्शनाने थरारून गेलो.

.. कधी आडवाटेवर घसरड्या उतरंडीवरुन दोराच्या आधाराने उतरत जात इतिहासाच्या हरवलेल्या पाऊलखुणा धुंडाळल्या. आणि, अल्पपरिचित लेणीसमुहाच्या दर्शनाने बुचकळ्यात पडलो.

.. कधी दुर्गाच्या पोटातल्या लेण्यावर कोरलेल्या नक्षी कारागीराची सौंदर्यदृष्टी वाखाणत असताना, अचानक अंधाऱ्या लेणीतून फडफड करत बाहेर आलेल्या वटवाघळांच्या लोंढ्यामुळे दचकलो.

.. कधी दुर्गमाथ्यावर गवताच्या पात्यामधून डोकावणाऱ्या वीरगळी आणि स्मृतीशिळेला वंदन केलं. आणि, कानांत घुमली साताठशे वर्षांपूर्वी कोण्या कोळीराजाने रचलेली स्वातंत्र्यगीते!


अल्पपरिचित वनदुर्ग ‘दुर्ग कोळकेवाडी’ अनुभवताना असे कितीतरी क्षण आमची दुर्गभ्रमंतीला समृद्ध करत होते. अभ्यासू ट्रेकरमित्रांबरोबर अडचणीच्या दुर्गम चढाई-उतराईचे कष्ट घेतल्यावर, या दुर्गाने त्याच्या स्थापत्याची आणि इतिहासाच्या स्मरणांची कवाडे आमच्यासाठी उघडली होती. ते सगळे अनुभव तुम्हां सह्यमित्रांशी शेयर करण्यासाठी हा लेखनप्रपंच! कोळीराजाच्या स्वातंत्र्य-स्वप्नांची दुर्गलेणी अनुभवण्यासाठी ‘कोळकेवाडी दुर्गा’ला भेट देणार ना मंडळी!!!

------------------

महत्त्वाच्या नोंदी:

१. फोटो आणि नकाशा रेखाटन: साईप्रकाश बेलसरे

२. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

३. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

४. पूर्वप्रकाशित: दिवाळी अंक 'दुर्ग', २०२२ 

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२२. सर्व हक्क सुरक्षित.

No comments:

Post a Comment