Pages

Friday 22 December 2023

दुर्ग जीवधन ३६०

.. एखादा दुर्ग समजावून घ्यायचा कसा, याचा वस्तुपाठ साक्षात शिवछत्रपतींनी ‘दुर्ग रायगड’ची परिक्रमा करुन दिलेला. त्याच धर्तीवर आम्ही ‘दुर्ग जीवधन’ची भटकंती केली - गडाच्या आसमंतातच नाही, तर गडाच्या अंतरंगातही! आसमंतातील ‘घाटवाट-परिक्रमा’ करताना आम्हाला चहूबाजूंनी जीवधनची अफाट रौद्र-देखणी रुपे दिसली. तर, गडाच्या अंतरंगाची ‘दुर्ग-परिक्रमा’ करताना तब्बल ६ कातळखोदीव मानवनिर्मित विवरे (लांब भुयार-वजा गुहा) आढळली. दुर्ग जीवधन असा ३६० अंशात अनुभवण्याच्या आमच्या ट्रेकचा हा वृतांत!
        
.. जीवधनच्या आसमंतात बेसाल्ट कातळातल्या विलक्षण आकाराच्या डोंगर-कडे-सुळक्यांची दाटी जमली आहे. त्यातून गडाची ‘घाटवाट-परिक्रमा’ करण्यासाठी, गडाच्या दक्षिणेला असलेल्या ‘घोडेपाणी नाळे’ची दुर्गम चढाई करणार होतो. गच्च डोंगरझाडीच्या दाटीवाटीतून वाट बनवत फांगूलगव्हाणमार्गे जीवधनच्या पूर्वेला पायथ्याशी घाटघरला पोहोचणार होतो. जुन्नर द्वाराने चढाई करून ‘दुर्ग-परिक्रमा’ करताना गडाच्या अंतरंगातील म्हणजे कातळकड्याच्या पोटातील अल्पपरिचित कातळविवरे धुंडाळायची होती. आणि कल्याण द्वाराने उतराई करुन, पुढे गडाच्या उत्तरेला असलेल्या पुरातन ‘नाणेघाटा’ने उतराई करणार होतो. आम्हाला कल्पनाही नव्हती, की या भटकंतीत प्राचीन वारसास्थळे, दुर्गस्थापत्य, जैववैविध्यता, दमदार डोंगरयात्रा आणि सह्याद्री भूगोलाची अनोखी अनुभूती आम्हांस लाभणार होती...  

मोहफुलांच्या रानातून सह्याद्री पर्वतदर्शन
भल्या पहाटे अंधारातच माळशेज घाटाची वळणे उतरुन गेलो. वैशाखरे गावाशी महामार्ग सोडून गाडी आता सिंगापूर-इस्तेच्या वाडीकडे निघाली. 

लपेटदार वळणापलीकडे अचानक थबकलोच. पानगळीच्या जंगलामध्ये जिकडेतिकडे मोहाची झाडाची फुले बहरलेली. टपोऱ्या आणि रसरशीत मोहफुलांचा मादक घमघमाट दाटलेला. अंगभूत मधाने जड झालेली मोहफुले अलगत तरंगत, गरगर करत रस्त्यावर विखुरत होती. बहुगुणी अशी ही फुलं वेचण्यासाठी कातकरी बांधवांची लगबग चाललेली. 

तर पाठीमागे आभाळात सह्याद्री घाटमाथ्यावर ढगांचे पुंजके विखुरलेले. उगवतीचे आभाळ उजळू लागले आणि सह्याद्री घाटमाथ्याची कड उजळू लागली. ट्रेकर्सनी डोंगर-भूगोलाची उजळणी सुरु केली - तो तिथे ‘नानाचा अंगठा’ सुळका, त्याच्या डावीकडे ‘नाणेघाट’, हा समोर घाटमाथ्यापासून अजून उंच उठवलेला अफाट ‘दुर्ग जीवधन’, आणि ते तिकडे एकदम उजवीकडे ‘ढाकोबा’चे शिखर आणि मधल्या या वेड्यावाकड्या डोंगर-घळीमध्ये ‘घोडेपाणी’, ‘रिठ्याचे दार’ आणि ‘दारा घाट’ अश्या वाटा.. 

‘घोडेपाणी नाळे'मधून जीवधनचे देखणे कातळकडे
सह्याद्री घाटमाथ्याच्या काळ्याकभिन्न कड्यांवर पर्जन्यधारा धडकतात, बरसतात आणि वाहून जाताना बेसाल्टच्या पोटात अवाढव्य ओढ्या-घळी-नाळांची निर्मिती करतात. अश्या ओढ्या-नाळांमधून चढत जात वाट शोधणारे कोणी स्थानिक किंवा कोणी शिकारी या द्रुतगती वाटा रुजवतात. कातळ-नाळेमधून घाटवाटांची चढाई करणे कस पाहणारे, पण सह्याद्रीच्या अंतरंगाचे दर्शनही घडवणारे. जीवधनच्या दक्षिणेला अश्याच एका कातळनाळेमधून - ‘घोडेपाणी नाळे’च्या वाटेने आम्ही चढाई करणार होतो. सामान्यतः घाटवाटांमधून कोकण आणि दरीचे दृश्य असते, मात्र ‘घोडेपाणी नाळे’लगत दरीतून उठवलेली कातळसुळक्यांची भिंत आणि त्यामागे आभाळात झेपावलेल्या जीवधन किल्ल्याचे अनोखे दृश्य मिळते. म्हणूनच, जीवधनच्या आसमंतातील भटकंतीची सुरुवात ‘घोडेपाणी नाळे’पासून करत होतो. 

इस्तेच्या वाडीमध्ये गाडी लावून पाठपिशव्या खांद्यावर चढवल्या, तेव्हा वाजलेले सकाळचे ८. गावाच्या पूर्वेला अनेक बैलगाडी वाटा खाजगी रिसॉर्टच्या दिशांनी विखुरलेल्या. त्यातून नेमकी वाट शोधून घोडेपाणी नाळेच्या ओढ्याच्या पात्राकडे निघालो. उक्षीच्या फुलांच्या झुबक्यांमागे काळाकभिन्न देखणा ‘महाभृंगराज’ पक्षी आपल्या लांब शेपटीची लयकार मिरवत तरंगत गेला. उंबरांच्या डवरलेल्या फांदीमागून जीवधन किल्ला जणू आभाळात घुसलेला. गावापासून अर्ध्या तासात घोडेपाणीच्या मुख्य ओढ्याच्या पात्रात पोहोचलो. दगड-लाकडांचे बांध घालून पात्रातून वाळू-उपसा चालू होता. आता ओढ्यातल्या दगड-धोड्यांमधून तासनतास चढाई करायची होती. सह्याद्री कुशीत पोहोचल्याने उन्हाची किरणे पोहोचायची होती. समोर घोडेपाणीची नाळ, उजवीकडे दक्षिणेकडे रिठ्याच्या दाराची नाळ आणि पल्याड ढाकोबा शिखराच्या ‘दारा घाटाची नाळ’ खुणावत होती.


          
आधी ओढ्यातून चढणाऱ्या वाटेवर चढताना निवांत कातळटप्पे होते. माथ्याकडून उन्हाची किरणं दरीमध्ये झिरपू लागलेली, त्यात कुठलेसे गवताचे तुरे आणि कुठे पाण्याची तळी लकाकू लागलेली. दुतर्फा झाडं-झुडपांची दाटी आणि फुलपाखरांची लगबग. समोर अजस्त्र सह्यकड्यासमोर उठवलेल्या बाहुला-बाहुली नावाच्या सुळकयांची रांग. दरीच्या पोटातला गारवा आणि ट्रेकर्सच्या रंगलेल्या गप्पा असा भन्नाट माहोल. थोडं पुढे धोंडयामधून अडस-धडस करत आणि सोप्या श्रेणीचे कातळारोहण करत निघालो. ओल्या बुळबुळीत खडकांवर घाई न करता काळजीपूर्वक जाणे आवश्यक होते. ओढ्याच्या पात्रासोबत रुजलेले जैववैविध्य वैशिष्ट्यपूर्ण होते. मोठाल्या गोलाकार रांजणखळग्यांमध्ये प्रतिबिंब होते बाहुला-बाहुली सुळक्याचे, निळ्या आभाळाचे, रानात रमलेल्या ट्रेकर्सचे! तर त्या चित्राला जिवंतपणा देत होत्या पाण्यावर तरंगणाऱ्या पाणनिवळ्या. झकास आलं-युक्त चहाचा ब्रेक आणि मस्त विश्रांती मिळाली. वेळ ९:३०.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जात ओढ्यातून चढाई चढणारी वाट आता थोडी खडतर होऊ लागलेली. बाहुला-बाहुली सुळक्याची शृंगे डोक्यावर येऊ लागलेली. चढाई उभी होत आता पसरट आकाराच्या इंग्रजी यू आकाराच्या घळीतून सुरु झाली. अजस्त्र धोंडे चढत आता बाहुला-बाहुली सुळक्याच्या पायथ्याशी आली आणि इथेच उजवीकडे (दक्षिण) ९० अंशात वळून ‘घोडेपाणी नाळे’ची सुरुवात होणार होती. वेळ १०४५. दुतर्फा कातळभिंती आभाळात घुसलेल्या आणि मधून अरुंद नाळेतून चढत जायचं होतं - नजर जाईल तोवर. नाळेतल्या वाटेची छाताडावरची चढाई अगदीच जीवावर येऊ लागली. कातळटप्पे सोप्या श्रेणीचे होते आणि दोर आवश्यक नव्हता, पण सातत्याने कातळकडे आणि ठिसुळ दगडांच्या राशींवरुन चढताना जरा दुर्लक्षही चालणार नव्हते. दक्षिणोत्तर नाळेतून उभी चढाई करताना छातीचा भाता अक्षरश: फुलला होता. एक एक पाऊल उचलून वरच्या खडकावर टाकायचं, स्वतःला पाठपिशवीसकट खेचून घ्यायचं हे करताना विलक्षण दम लागत होता. किती वेळ असली चढाई चालणार कोणास ठाऊक! 

आणि अचानक नाळेमध्ये एखाद्या हेलिकॉप्टरसारखा फडफड असा आवाज सुरु झाला. प्रत्यक्षात तो होता नाळेच्या माथ्यापासून खाली येऊ लागलेला मधमाश्यांचा मोठा समूह - एक मोठा ढग असावा असा. आक्रमक होवू शकणाऱ्या मधमाश्यांपासून बचावासाठी नाळेमध्ये कुठेही लपायला जागा नव्हती. थोडकी सपाटी बघून उपलब्ध सगळे कपडे-पंचा अंगावर लपेटून, तब्बल दहा-पंधरा मिनिटे आवाज न करता पडून राहिलो. मधमाशांचा ढग डावीकडच्या कातळभिंतीतल्या अंतर्वक्र कंगोऱ्यात विसावला आणि मगच आम्ही हुश्श म्हटलं.

आणि अखेरीस आम्ही पोहोचलो घोडेपाणी नाळेतल्या सर्वात रौद्रसुंदर टप्प्यामध्ये. दक्षिणोत्तर नाळेतून समोर बघताना, अलिकडे म्हणजे समोरच उठवलेली बाहुला-बाहुलीच्या सुळक्यांची भिंत आणि त्यामागे उठवलेल्या जीवधनच्या पश्चिम कड्यांचे दृश्य. नेहेमीच्या दरीच्या दृश्यापेक्षा अनोखे निसर्गचित्र! 

जीवधनचा आसमंत समजावून घेण्यासाठी घोडेपाणी नाळेतून दिसणारे दृश्य पाहिलेच पाहिजे. सह्याद्रीप्रेमी ट्रेकर मंडळी भारावून गेलेली आणि कितीतरी वेळ खिळून राहिलेली. घोडेपाणी माथा गाठला तेव्हा वाजलेले दुपारचे १. 

डोंगर-झाडीचे कोडे सोडवत फांगूळगव्हाणमार्गे जीवधनकडे
घोडेपाण्याच्या माथ्यावर वाट-चौक आहे. उजवीकडेची वाट दक्षिणेला ‘रिठ्याच्या दारा’च्या दिशेने निघालेली. समोरची उतारावरची वाट पूर्वेला आंबोली गावाकडे गेलेली. तर डावीकडे उत्तरेला चढणारी पुसट फांगूळगव्हाणमार्गे जीवधनकडे जाता येईल का, हे जोखायचं होतं. आमच्या ऐकण्यात कोणी गावकरी किंवा ट्रेकर्स या वाटेने गेल्याचे ऐकिवात नव्हते, पण आंबोलीमार्गे दूरवर वळसा घालत घाटघरला जाण्यापेक्षा बिकट वाट आणि गर्द जंगल खुणावत होतं. घोडेपाणीच्या खिंडीतून डावीकडे वाट होती शिकाऱ्यांची भेकरा-डुकरांची. घुसाघुशी करत, धापा टाकत माथ्यावरुन पोहोचलो आणि एक क्षण नजरच भिरभिरली. खोल दरीच्या पोटात घोडेपाणी नाळ चढताना  भव्य वाटणारे बाहुला-बाहुली सुळके आता दरीच्या पोटात छोटुसे वाटत होते. उन्हांत तळपत असलेल्या, रौद्रविराट साताठशे मीटर उंच कातळकड्यांच्या कोंदणात जडवलेला हिरा असावा ‘जीवधन’ शोभून दिसत होता. जीवधनच्या मागून डोकावणारा नानाचा अंगठा लक्षवेधी होता. वाजलेले दुपारचे २:३०.  

धारमाथ्यापासून पूर्वेला अंदाजे ५०० मी आडव्या चालीनंतर घसरडी उतरंड चालू झाली. डोंगरमानेवर पोहोचल्यावर डावीकडे झाडीभरल्या दरीत कुठून उतरता कुठे उतरता येईल, याचा अंदाज घेऊ लागलो. 

दरीकडे तिरकी उतरणारी जनावरांची मळलेली वाट घेतली खरं, पण पाचव्या मिनिटाला वाट अफाट जंगलात सपशेल हरवलीच. वाट शोधायचा ध्यास असला, तरी ‘वाट गवसेल की नाही’ असा ताण नव्हता. 
       
मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या निबिड जंगलात आम्ही उतरलो होतो. मंद उताराच्या डोंगरउतारावर ठेवणीतलं अस्पर्शीत करकरीत रान अनुभवत होतो. पायथ्याच्या दगडधोंड्यांवर हिरवेगार शेवाळे-नेचे विसावलेले.

 झुकलेल्या सूर्याची किरणे एकापाठोपाठ एक दाटी केलेल्या झाडांच्या खोडांना, पानांना उजळवत होती. 
     
एकाच हिरव्या रंगाच्या किती किती छटा असाव्यात. हिरव्या रंगाचे विलक्षण कोलाज आम्ही अनुभवत होतो. पाचोळ्यातून चालताना चुबुक-चुबुक आवाज सोडला, तर रानात निखळ शांतता होती. वाट अशी नसणारच होती मुळी. त्यामुळे, मंद उताराचे घनदाट रानाचे टप्पे उतरत, कुठे डोंगरउतारावरून घरंगळत, कुठे ओहोळाचा आसरा घेत तर कुठे रांजणखळगे बाजूला ठेवत उतरत निघालो. तब्बल दोन तासाच्या रानातल्या चालीनंतर अखेरीस आम्ही पोहोचलो फांगूळगव्हाणच्या शेताडीत. जीवधन परिक्रमेत अनवट डोंगररांगांचं आणि जंगलटप्प्यांचं दर्शन झाल्याने ट्रेकर्स तुडुंब खूष! वेळ संध्याकाळचे ५. 

कळमजाईच्या राऊळापाशी जुन्नर-नाणेघाट डांबरी रस्त्यावर पोहोचलो. जीवधनच्या पायथ्याशी घाटघरला जाताना डांबरी रस्त्यावरुन चाल होती, पण माळावर रंगलेली पोरांची क्रिकेट मॅच पाहात, जीपच्या टपावर दाटी करुन गप्पा ठोकणाऱ्या जनतेला सलाम करत, शिवारात लग्नमंडपात किंचाळणाऱ्या डीजेमुळे नाकं मुरडत; पण तितक्यात बहरलेल्या करवंदीच्या मागे उठवलेल्या वऱ्हाडी डोंगराचे दृश्य बघत कसे मुक्कामी पोहोचलो, कळलंच नाही. रात्री स्वप्ने पडत होती – जीवधनच्या आसमंताची, मोहाच्या फुलांची, घोडेपाणीच्या अक्राळविक्राळ नाळेची, घनदाट जंगलाची आणि धम्माल घाट-परिक्रमेची!

जीवधनच्या अंतरंगातली अल्पपरिचित कातळखोदीव विवरे 
जीवधन दुर्ग ट्रेकर्सना सुपरिचित आहेच, पण त्याच्या अंतरंगात दडलेले अल्पपरिचित दुर्गस्थापत्य असलेली ‘कातळकोरीव विवरे’ आम्हाला बघायची होती. जुन्नरच्या रमेश खरमाळे सरांच्या त्रोटक लेखनामध्ये या विवरांचा उल्लेख आलेला. पण ही विवरे नक्की किती आणि कुठे, याची निश्चिती करुन त्यांचे दर्शन घेणे याची आम्हाला उत्सुकता लागलेली.

उन्हं चढायच्या आत गडाकडे कूच केलं. घाटघरच्या शंकराच्या देवळापासचा अर्वाचीन देवनागरी शिलालेख आणि जुनी शिल्पे न्याहाळली आणि पुढे निघालो. कोवळ्या उन्हात जीवधनचा कातळमाथा उजळला होता, तर पिठूर ढगांचे पुंजके आता गडाच्या कातळमाथ्याला धडकू लागलेले, गुरफटून टाकू लागलेले. 

गडाच्या जुन्नर द्वाराची वाट चढू लागलो. वीसेक मिनिटे गडाचा कडा उजवीकडे ठेवत सपाटीवर चाल होती. त्यानंतर ठळक वाट काटकोनात वळून, जीवधनच्या दिशेने उभी चढायला लागली. कारवीतून उभा चढ चढून कातळकड्याच्या पोटात पोहोचलो. जुन्नर द्वाराच्या कातळखोदीव पायऱ्यांची सुरुवात होते, तिथेच एक पाऊलवाटांचा चौक आहे. समोरची वाट जुन्नर द्वाराकडे, तर डावी-उजवीकडच्या वाटा कातळकड्याच्या पोटातून आडव्या जातात – जिथे विवरे सापडायची शक्यता होती. वेळ सकाळचे ८:३०. 

आता शोधमोहिमेचा टप्पा सुरु झाल्याने उत्सुकता दाटलेली. वाट-चौकापासून उजवीकडे (उत्तर) विवरांची शोधाशोध करत निघालो. कातळकड्याला बिलगून जाताना अवघ्या पंधरा फुटांवर पहिलं विवर दृष्टीक्षेपात पडले. विवर म्हणजे असतं तरी काय! विवर म्हणजे कातळातली लांबुळकी गुहा – एखाद्या बोगद्यासारखी खोलवर केलेली मानवनिर्मित खोदाई! विवरात प्रवेश करण्यापूर्वी थोडकी तयारी केली. एकतर, पूर्ण अंग झाकणारे कपडे, डोक्यावरती टोपी आणि हेडलाईट असा अवतार धारण केला. थोडंसं खाऊन पाणी प्यालं, कारण नंतर विवरात प्रवेश केल्यावर अपुऱ्या जागेमुळे आणि कमी ऑक्सिजनमुळे कष्ट पडणार होते. आणि महत्त्वाचे म्हणजे, अश्या गुहांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आत हाकारे मारून, अतिप्रखर विजेरीचा झोत आणि दगड टाकून - साळींदर, डुक्कर किंवा अन्य जनावर लपले नाही ना, याची खातरजमा केली. 

एकावेळी एक ट्रेकरने भेट द्यायची, अश्या पद्धतीने अलगदपणे विवरामध्ये प्रवेश केला. खोदाई केल्यावर निघालेले दगड विवाराच्या मुखापाशी आणि आतील मार्गावर विखुरले होते. आम्ही उभे होतो त्या जमिनीच्या पातळीवर उघडणारे, साधारणतः दोन-अडीच फूट लांबी-रुंदीचे चौकोनी प्रवेशद्वार होते. त्यामुळे, पूर्ण वाकून, दोन पावलांवर बसून आणि प्रसंगी चतुष्पाद होत हळूहळू विवर न्याहाळत निघालो. साधारणत: चौकोनी आणि सुबक छिन्नी-हातोडीचे घाव असलेली खोदाई दिसत होती. पायथ्याशी तळावर बारीक रेतीचा थर (बहुदा वटवाघळांची विष्ठा) होता, त्यामुळे फार स्पर्श न करता हळूहळू अलगद रांगत निघालो. चिंचोळया गुहेत किंचित गुदमरु लागले. तासलेल्या कातळभिंतीवरील कुठे होता अजस्त्र कोळी, कुठेशी एखादी गेको पाल आणि आम्हा आगंतुकांच्या आगमनाने अस्वस्थ फडफडणारे वटवाघूळ! 

         
अतिशय सावधानपणे मार्गस्थ झालेलो. तब्बल पंचवीस-तीस फूट खोलवर केलेली खोदाई आणि शेवटी टोकाला खोदलेली खोली न्याहाळली. शिलालेख, पाणी टाके किंवा कुठली धर्मचिन्हे नाहीत. काय उद्देश असेल या विवर-गुहांचा – दुर्गसंरक्षणासाठी पहाऱ्याचे मेट, की कोण्या साधकांचे ध्यानस्थळ, की नाथपंथीयांच्या गुहा? जीवधन परिसरातील नाणेघाटात २००० वर्षांपूर्वीच्या सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि शिलालेख पाहता, त्या काळात जीवधनवर देखील माणसांचा वावर असू शकेल. त्यांच्यासाठी ही विवरे खोदवली असतील? कोण असतील हे लोक - व्यापारी, संरक्षक, धर्मप्रसारक की कोणी साधक! सह्याद्रीत इतरही अनेक दुर्गांवरती (जसे की राजगड, तोरणा, सिद्धगड, भास्करगड, प्रबळगड वगैरे) अशी गुहाविवरे आहेत, पण त्यांचा हेतू आणि नेमकी कालनिश्चिती करता येत नाही. विचारांच्या आणि विवराच्या अंधारात आणि अडचणीत चाचपडायला झालं होतं. धाप लागलेली, पण जीवधनच्या कातळ-अंतरंगातील एक विलक्षण दृश्य उलगडलेले...

पहिल्या विवरापासून पुढे उजवीकडे (उत्तरेला) ४० फूट आडवी वाटचाल केल्यावर अजून एक विवर नजरेस पडलं.

या विवराचे द्वार जमिनीपासून ६ फूट ऊंचीवर होते. मुखापाशी थोडे मोठे, पण आत चाळीसेक फूट खोल गेलेले. रचना पहिल्या विवरसारखी. 


टॉर्चच्या प्रकाशात खोदाईचे घाव, अधून-मधून बदलणारे खोदाईचे स्तर/चौकटी आणि जीवधनच्या अंतरंगातील कातळ उजळला होता. विवरातून सरपटत बाहेर आलो. समोर घाटघरच्या दरीचे दृश्य आणि मोकळी हवा यामुळे हायसं वाटलं. 

दक्षिण मेटावरील रौद्रविराट दृश्य आणि कातळविवर 
पाठपिशव्या चढवून वाट-चौकात परतलो. गडाच्या जुन्नर द्वाराची वाट चढण्याऐवजी आता पुढच्या विवराच्या शोधात निघालो. 

डावीकडे (दक्षिण) बारीक आडव्या वाटेने जाताना, वाट काही ठिकाणी कातळात खोदून काढलेली दिसली. वाटेशेजारी पण कातळात उंचावर खोदलेली आणि आता बुजलेली ३ पाण्याची टाकी नोंदवली. आडवी वाट जीवधनच्या दक्षिण खांद्यापाशी मोकळ्या सपाटीवर आली आणि भर्राट वाऱ्याच्या झोताने अंगावर शहारा आला. 

अफाट दृश्य उलगडलं – उत्तरेला गडाच्या माथ्याकडे गेलेली कातळधार आणि कातळकडा, पश्चिम टोकाला उंचावलेला वानरलिंगी सुळका, समोर कोकणातल्या दरीचे खोलवर दर्शन आणि दक्षिणेला वळणवेड्या घाटमाथ्यावरील डोंगर-नाळांच्या दाटीपलीकडे उठवलेला ढाकोबा शिखरमाथा! 



        
मॉन्सूनपूर्व ढगांचे पुंजके तरंगत, घाटमाथ्याला लगटत पठाराकडे निसटत होते. जांभळी-अंजनीच्या दाटीतून थरथरत गेलेला ‘स्वर्गीय नर्तक’ पक्षी मोहवून गेला. 

जीवधनच्या दक्षिण खांद्यावरच्या सपाटीवर आम्ही जसे रमलो, तशीच या जागेची भुरळ आपल्या पूर्वजांना पडली असणार. कारण या सपाटीवर घराचे जोते आणि कातळसपाटीत दोन चौकोनी खोदाई आहेत. ही जागा मोक्याची, म्हणून इथे पहाऱ्याचे ठिकाण ‘मेट’ असण्याची शक्यता आहे. 

मेटापाशी कुठेतरी चौथे आणि धारेवर पाचवे विवर असण्याची शक्यता होती. पण, नेमकं कुठे हे गवसेना. धारेवरच्या कातळावर घसाऱ्यामुळे प्रयत्न सोडून दिला. मेटाच्या सपाटीपासून गडाची धार आणि दक्षिणकडा बारीक निरखून पाहिला. मेटापासून गडाच्या धारेकडे नजर टाकल्यानंतर, डावीकडे आडवी वाट कड्याला बिलगून जात थेट वानरलिंगीकडे निघाली होती. या वाटेवर डोकावल्यावर गडाच्या धारेच्या कातळात, डाव्या अंगाला ‘ते’ गवसलं. 

चौथ्या विवराची चौकोनी खोदाई दिसल्यावर ट्रेकर मंडळी बेहद्द खुष झाली. पहिल्या दोन विवरांपेक्षा रचना वेगळी – बारीक चौकोनी द्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आत एक खोली, आणि त्याच्या आत अजून एक खोली दिसली. 

कदाचित पूर्वीचे भुयार-वजा विवर कालांतराने मोठे करुन खोली केलेली असू शकेल. 



गुहेतल्या चौकटीतून बाहेर डोकावलं, तर समोर हजार मीटर खोल दरी आणि दरीमागे उठावलेला ‘ढाकोबा’चा अजस्त्र कडा आणि विखुरलेले ढग असे जबरदस्त दृश्य मोहवून टाकत होते. 

जुन्नर द्वाराच्या कातळमार्गावरील विवर
दक्षिण मेटावरून आडवी वाट चालत वाट-चौकात परतलो. जुन्नर द्वाराची कातळवाट चढाई सुरु केली. शंभरेक पावठ्या चढल्यावर उजवीकडच्या दरडीमध्ये विवर क्रमांक तीन खुणावू लागले. 

वाटेवरून जेमतेम दहा फुटांवर विवर आहे, पण एकदम कड्याच्या टप्प्यावर. सावकाश जाणे भाग होते. 

पहिल्या दोन विवरांप्रमाणे चौकोनी भुयारखोदाई आणि पण तुलनेत कमी खोली. बारकाईने निरीक्षण करुन बाहेर आलो. 

गडाच्या उभ्या पायऱ्या आणि कातळ चढण्यासाठीचे रेलिंग आणि शिड्या वापरून जुन्नर द्वार गाठले. कोण्या सैनिकांनी खोदलेले साधे मारुतीरायाचे शिल्प आणि पुढे मोठे खांबटाके, द्वाराची तुटकी चौकट न्याहाळली. गडफेरी केली. गडावर काही कोरीव शिल्पे विशेष आहेत, ज्यात मुख्यत: धान्यकोठीतील गजलक्ष्मी, चंद्र-सूर्य आणि कमळ; गडाच्या उत्तर टोकाचे महिषासुरमर्दिनी शिल्प, दक्षिणेला बालेकिल्ल्यापाशी जीवाईदेवीचं उघड्यावरचे ठाणे, पूर्वेच्या बुजलेल्या पायऱ्यांची चोरवाट आणि गोमुखी पद्धतीच्या कल्याण द्वारावरील चंद्र-सूर्य शिल्पे लक्ष वेधतात, गडाच्या पुरातनत्वाची साक्ष देतात. 

वानरलिंगी सुळक्याच्या अंतरंगात डोकावणारे विवर 
गारेगार लिंबूसरबताचा आस्वाद घेऊन तरतरीत झालेली तुकडी आता गडाच्या पश्चिमेला ‘कल्याणद्वारा’ने उतराई करू लागली.

नाळेतील अवघड टप्पे रेलिंगमुळे सुगम झालेले. १०० मीटर उतराई झाल्यावर नाळेची वाट संपली. गडाच्या कातळकड्याला डावीकडे ठेवत, आम्ही गडाला बिलगलेल्या ‘वानरलिंगी’ सुळक्याजवळ आलो.


सुळक्याच्या अगदी पोटात जीवधनचे सहावे विवर डोकावत होते. आतापर्यंत बघितलेल्या इतर विवरांच्या मानाने वानरलिंगीच्या पोटातलं विवर मात्र तुलनेत छोटेसे आहे. 



वानरलिंगी चढाई करणारे गिर्यारोहक या विवराचा आसरा घेतात. सुपरिचित जीवधनवरील अल्पपरिचित कातळविवरांची भेट एखाद्या शोधमोहिमेचा आनंद देऊन गेलेली.   

पुरातन नाणेघाटाची उतराई करताना जीवधनचे विराट दर्शन

कल्याणद्वाराची वाट उतरुन पठारावरील सपाटीवर आलो. पाठीमागे गडाकडे पाहिलं आणि स्तब्धच झालो - ४०० मी ऊंचीचा दुर्गमाथा, माथ्याजवळ उभा कातळकडा, पदरातील दाट झाडीचे टप्पे, गडाला बिलगलेला निमुळता वानरलिंगी सुळका आणि वर मेघात अडकलेली सूर्यकिरणे सोडवणारा सूर्य!!! 

पुरातन नाणेघाट माथ्याजवळचा दगडी रांजण न्याहाळला. घासून जीर्ण झालेली घाटाची फरसबंदीची कातळनळी उतरायला लागलो. समोर लेणीविहारात होता अत्यंत मोलाचा शिलालेख आणि शेजारी सातवाहनांच्या भग्न पुतळ्यांचे आता फक्त उरलेले पाय! त्या पायांवरची धूळ माथ्यावरती टेकवली. मराठी भाषेच्या अभिजातकतेच्या त्या वारश्याला मनोमन वंदन केलं. 

घाटाची निवांत वळणे घेत उतरत जाणारी वाट सुरु झाली. उतराईमध्ये कित्येक वळणांवर पाण्याची टाकी खोदलेली होती. प्राचीन काळापासून पश्चिमेचे बंदर ‘कल्याण’ आणि पूर्वेची जुन्नर-पैठणची बाजारपेठ यांच्यातली दळणवळण महत्त्वाची होती. कोकणपट्टीपासून निघून सह्याद्रीचा उत्तुंग घाटमाथा ओलांडणाऱ्या घाटवाटांपैकी ‘नाणेघाट’. तर, नाणेघाटाच्या वाटेवरील व्यापार निर्धोक राहावा म्हणून संरक्षक दुर्ग ‘जीवधन’ महत्त्वाचा. त्यामुळे घाटात आणि शेजारच्या संरक्षक दुर्गावर धर्मकृत्य आणि कातळशिल्पे बनवली असणार!

जीवधनची घाट-परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, मोकळवनात आल्यावर वैशाखरे गावाकडे न जाता दक्षिणेला आडवं निघालो. डोंगरधारेवरुन जाताना विराट पॅनोरमा थक्क करुन गेला – पानझडीच्या रानातून उठावलेले नाणेघाट, नानाचा अंगठा, सह्याद्रीच्या कराल भिंतीमागे उठवलेला जीवधनचा कातळकडा आणि असंख्य ओढ्या-नाळांच्या किचकट दाटीवाटीपल्याड ढाकोबा! 


जीवधनच्या आसमंतात आणि अंतरंगाची भटकंती

सिंगापूरच्या शेताडीत पोहोचलो आणि दोन दिवसात केलेल्या दुर्ग जीवधन परिक्रमेत गडाच्या आसमंताची आणि अंतरंगाची कित्येक रुपे डोळ्यासमोर तरळत होती. किती ओढे-नाले-घळी-कडे पालथे घातलेले. माथ्यावरचे घनदाट सदाहरित जंगल आणि पायथ्याचं पानझडीचे जंगल अनुभवलेले. कधी स्वर्गीय नर्तक, तर कधी महाभृंगराज पक्षी दिसला. कधी मोहाच्या फुलांमध्ये, तर कधी करवंदीच्या जाळीत अडकलो. कधी कातळविवारांच्या पोटात बेसाल्टचं अनोखे विश्व बघितले. दुर्ग-लेणी-विवरे कोणाची हा प्रश्न पडला - ध्यानस्थ साधक, नाथपंथीय ऋषी, सैनिक की कोणी स्वातंत्र्य सैनिक? आज मात्र या विवरांमध्ये दिसले बेसॉल्टच्या पोटात दडलेले कोणी वटवाघुळ, बेडूक, पाल आणि कोळी – आणि, क्वचित भेट देणारे दुर्गवेडे भटके!!!

“जो है देखा वही देखा तो क्या देखा है! देखो वो जो औरो ने ना कभी देखा है!” या उक्तीनुसार दुर्ग जीवधनची ३६० अंशात परिक्रमा करताना, त्याच्या आसमंतात आणि अंतरंगात डोकावण्याची संधी मिळालेली. सह्याद्री आणि दुर्गदर्शनातून मिळणाऱ्या विलक्षण ऊर्जेची अनुभूती आम्हांला मिळाली होती. कृतज्ञ आहे.. 

----------------------------------------------------------------

महत्त्वाच्या नोंदी:

१. लेख प्रकाशन: दिवाळी अंक ‘दुर्ग’ २०२३

२. ट्रेकच्या तारखा: १९-२० मार्च, २०२३

३. छायाचित्रे: मिलिंद लिमये, साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे

४. नकाशा साईप्रकाश बेलसरे

५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना. ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२३. सर्व हक्क सुरक्षित.





No comments:

Post a Comment