Pages

Monday 25 March 2024

होळीपौर्णिमेचा घाटरानवा

दारा घाट – भीमाशंकर – रानशीळ घाट:: ट्रेकरदोस्तांसाठी संक्षिप्त टिपणे 

     

होळीपौर्णिमेला उन्हाळ्यात सह्याद्री घाटवाटा-जंगल भटकंतीसारखी मौज नाही - अर्थात उन्हापासून बचाव करतंच! 


दुर्ग सिद्धगडची दक्षिण आणि भीमाशंकरची उत्तर या दरम्यान सह्यमाथ्यावरुन चढाई-उतराई करणाऱ्या घाटवाटा अल्पपरिचित, दुय्यम महत्त्वाच्या, खडतर घसाऱ्याच्या-कातळातल्या आणि कमी वापरातल्या. 

आमच्या तुकडीने सिद्धगडच्या दक्षिणेच्या ‘दारा घाटा’च्या ‘निसणी’वरुन, खडकांमधील ‘बोगद्या’तून आणि खोदीव ‘पावठ्यां’वरून चढाई केली. 

मंद उताराच्या वाटेने कोंढवळमार्गे भीमाशंकर गाठण्याच्या ‘द्राविडी प्राणायामा’ऐवजी, सह्यमाथ्यावरुनच घनदाट अरण्यातून दक्षिणेला जात, वाटा शोधत पुढे ‘मचणाच्या वाटे’ने थेट भीमाशंकर गाठलं. श्रीक्षेत्र डाकिन्या भीमाशंकराची आरती-प्रसाद घेतला. 

उतराई करताना घनदाट अरण्यातील ‘रानशीळ घाटा’च्या गारेगार घाटवाटेने नांदगावकडे उतरलो, पण प्लॅस्टिक कचऱ्याने हादरून गेलो. दमदार चढाई-उतराईच्या या ट्रेकचा 'संक्षिप्त' फोटो-ब्लॉग/ टिपणे…

(नोंद घ्यावी, की ढाकोबाचा दाऱ्या-आंबोली घाट वेगळा, आणि हा कोंढवळचा ‘दारा घाट’ वेगळा!)

            

दारा घाट - निसणीचा, कातळबोगद्याचा, खोदीव पावठ्यांचा! 

  • कोकणातले गाव: नांदगांव/ भोमाळवाडी, जिल्हा रायगड
  • घाटमाथ्यावरचे गाव: कोंढवळ, जिल्हा पुणे
  • स्थानवैशिष्ट्य: सिद्धगडच्या दक्षिणेला आणि भीमाशंकरच्या उत्तरेला, उभ्या कड्यातून वाट
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: खोदीव पायऱ्यांची मालिका
  • वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन-तीन महिने मधल्या पदरात नैसर्गिक झऱ्याचे पाणी
  • निवारा: नाही
  • काठिण्य: दोन किंचित अवघड कातळटप्पे. कातळरोहण साहित्य आवश्यक नाही. 
  • चढाई: ८७५ मी
  • वाटाड्या: घेतल्यास बरे. भोमाळवाडीमध्ये चौकशी करणे. 
  • वेळ: ४ तास घाटचढाई
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा:

पहाटे पुण्यातून निघून कर्जत-खांडस मार्गे भीमाशंकरच्या वायव्येला कोकणातील भोमाळवाडी गाठले.

गावातून पूर्वेला कूच केले, तेंव्हा सह्याद्रीची भिंत धूसर आणि गूढ वाटत होती. वेळ सकाळचे ७.

शेताडीतून समोर दाराघाटाने आमच्यासाठी कोणता डोंगरडाव आखला आहे, त्याचे दर्शन झाले. आधी झाडीभरले टेपाड, त्याच्यावरती उठावलेला ३०० मी उंचीचा कातळ, त्यावर पदराची झाडी आणि मागे पुनः उठावलेली ४०० मी सह्याद्रीभिंत. 

टेपाड चढताना पानझडीच्या रानातून जाणारी नागमोडी बारीक वाट, आणि उन्हं चढायच्या आधीचा गारवा सुखावह होता.

कातळकडा जवळ येऊ लागला. आडवी जाणारी मळलेली वाट सोडून, पूर्वेला ओहोळामधून झाडीमधून चढू लागली.  

 

उभ्या चढाईची पण पुसटशी वाट दगडांमधून आणि वाळलेल्या गवतामधून जाणारी. कातळकड्याजवळ जाऊ लागली. 

कातळकड्याच्या पोटात आल्यानंतर उजवीकडे (दक्षिणेला) वीस फुटी दरड. सोपे कातळरोहण.  

माथ्यावरचा शंभर फुटी कातळकडा अगदी डोक्यावरती आलेला. कातळकड्याला बिलगून चाललेलो. कड्यातून वाट कशी काढली असेल, याची उत्सुकता लागलेली. 

कडयाला बिलगून जाणारी, गवतातून झुंबाड्यातून जाणारी अडचणीची वाटचाल. 

आता आली निसण - म्हणजे आधारासाठी खाचा-खळगे नसलेल्या गुळगुळीत कातळावर आरोहणासाठी लावलेले झाडाचे तिरपे खोड. निसण असल्याने ट्रेकर्सच्या बुटांचे खूर शिवशिवू लागले. सोपे कातळरोहण! वेळ सकाळचे ८३०.


निसणीच्या वरती किंचित अवघड ‘चिमणी’ पद्धतीचे कातळरोहण होते. डावीकडच्या कातळाला अजिबात आधारखाचा (होल्डस) नसल्याने, उजवीकडच्या कातळाला पाठ आणि डावीकडे बुटांच्या घर्षणाने आधार मिळवून १२ फूट चढाई होती.

‘चिमणी’ पद्धतीचे कातळारोहण केल्यावर लगेच कातळातल्या बोगद्यातून सरपटत जायचे होते. उजवीकडे वळून दोन्ही हातांच्या जोरावर वरच्या टप्प्यात पोहोचायचे होते. 

पदरातल्या सपाटीत उंबरा खाली झऱ्याचे गार निर्मळ पाणी टिकून होते. वेळ सकाळचे ८४५. 

मोकळवनातून सह्याद्रीकडा बेलाग दिसत होता. वाट कशी काढली असेल त्याचा अंदाज येत नव्हता. मात्र, समोर दारा घाटाची ‘धार’ लक्षवेधक होती.


इंग्रजांनी गॅझेटीयरमध्ये नोंदवलेली ‘घार’ नावाची घाटवाट म्हणजेच ‘धार’ असलेला ‘दारा घाट’ असावा, असा अंदाज बांधला.

झाडीतून, धोंड्यांमधून आडवं जात आता दारा घाटाच्या धारेच्या पायथ्याशी पोहोचलो. 

धारेवरच्या उभ्या चढाईने धाप लागली, पण दूरवरचे दृश्य उलगडू लागले

गवताळ कातळधारेवरची दुर्गम घाटचढाई करताना विश्रांतीचे क्षण आणि डोंगरगप्पा आनंद देणाऱ्या. वेळ सकाळचे ९४५. 

उभ्या डोंगरधारेवरील नागमोडी चढण आता कातळाच्या आणि उजवीकडच्या घळीच्या जवळ आलो. 

धारेची वाट संपली. आता समोर अरुंद नाळ होती, पण त्यातून वाट चढणे अशक्य होते. घाटमाथा तब्बल २०० मी उंचीवर होता.

नाळेची चढाई टाळून वाट आडवी उजवीकडे निघाली. इथून पुढे कातळकड्यामधून नागमोडी वाट कशी असेल त्याची उत्सुकता लागलेली.

आता सुरू झाली कातळात खोदलेल्या पावठ्यांची मालिका! 

अगदी दुर्गच्या ‘खुटेदरा’ या घाटवाटेमधल्या खोदीव पावठ्यांची आठवण यावी अश्या. 


पावठ्या - जेमतेम पाऊल मावेल अश्या ओबढधोबड, पण निश्चितपणे मानवनिर्मित छिन्नी हातोडा घाव असलेल्या.

या पावठ्या अवघड किंवा धोकादायक नाहीत. पण, सावकाश वाटचाल करायची. खाली पदरातलं जंगल खोल खोल गेलेलं दिसतं.


एकापाठोपाठ उभ्या कातळात पावठ्यांचे संच येत राहतात. धाप लागलेली असते, पण घाटनिर्मात्याच्या कौशल्याचे कौतुक दाटून आलेलं असतं. 

माथा आता १०० मी उंचीवर. वाळलेल्या गवतावरून तिरपांड्या कातळावरून उभी नागमोडी वाट चालूच असते. 


आणि अखेरीस पोहोचलो दारा घाटाच्या माथ्यावरती. वाटाड्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा साभार निरोप घेतला.

गारेगार वारं खात भूगोलाष्टक रंगलं. उत्तरेला सिद्धगड समोर दाराघाटाची कराल कातळधार, खाली कोसळलेली दरी आणि कातळातल्या पावठ्या चढत आम्ही घाटमाथ्यावर पोहोचलोय, याच्यावर अक्षरशः विश्वास बसेना. पायथ्यापासून चढाई ८७५ मी, वेळ सकाळचे ११. 

        

दारा घाट माथ्यावरुन थेट भीमाशंकर (मचाणाची वाट): गृहीतक मांडून वाटशोधन

आता आम्हाला भीमाशंकराच्या दर्शनाची आस लागली होती. त्यासाठी पूर्वेला मंद उताराच्या वाटेने कोंढवळ गाव, मग डांबरी रस्त्यावरुन वळसा घालत भीमाशंकर - असा ‘द्राविडी प्राणायाम’ करणे पटेना. 

त्याऐवजी, ‘दारा घाट’ माथ्यामाथ्यानेच दक्षिणेला जात थेट भीमाशंकरला पोहोचता येऊ शकेल, असं गृहीतक मांडलं. आमच्या आधी कोणी ट्रेकर्सनी अशा पद्धतीने वाटचाल केलेली ऐकिवात नव्हतं. वाटशोधनाचे कोडे सोडवायला आम्ही सज्ज झालो.

भीमाशंकर अभयारण्य असे घनदाट झाडीचे टप्पे. वाट अशी नाहीच. 

झाडीभरल्या उतरंडीचे, गचपणीचे टप्पे. वेलींच्या आधाराने खोडांच्या आधाराने पुढे पुढे सरकत होतो. 


गुगल नकाशाच्या आधारे दक्षिणेला मोकळवनात पोहोचायचे होते. 

जंगलातला गारवा आणि शांतता अनुभवत,  पाचोळा चुबुकचुबुक करत कितीतरी वेळ वाट शोधत होतो.

झाडीतून अशक्य ओरबाडून घेत, वाट शोधत अखेर पोचलो मोकळवनात. दाराघाटातून इथे पोहोचायला चालू वाट नाहीच. प्राण्यांच्या सोयीसाठी वनविभागाने खोदलेले चंद्रकोर तळे समोर होते. पाणी आपल्याला पिण्यायोग्य नसले, तरी रानातल्या प्राण्यापक्ष्यांना उन्हाळयात या पाण्याचा किती आधार! वेळ दुपारचे १२३०.

घाटमाथ्यावर असलो, तरी ऊन रटरटत होतेच. दोन घास खाऊन घेणं आणि थोडीशी विश्रांती महत्त्वाची. घरून आणलेली शिदोरी सोडली. रुचकर मसुराची उसळ, पोळी, कांदा आणि दही असा फक्कड बेत. भोजनोत्तर विश्रांती पडी मारुन, दोन वाजता ट्रेकर्स  प्रस्थान करण्यासाठी तयार झाले. 

चंद्रकोर तळ्यापासून दोन वाटा फुटल्या - पूर्वेला कोंढवळ गावाकडे आणि उजवीकडे भीमाशंकरकडे जाणारी. मोकळ्या माळावर वाटा सहज न दिसणाऱ्या, म्हणून वनखात्याने या वाटांच्या दुतर्फा दगडांची सीमा-कड आखलेली. 


गचपणातून मार्गक्रमणाचा त्रास मागे पडलेला. चंद्रतळ्यापासून भीमाशंकरला जाणारी वाट मळलेली आणि घनदाट अरण्यातून जाणारी. 

भीमाशंकर अभयारण्याचे घनदाट झुडुपी टप्पे आणि मागे नागफणी डोंगरटोक खुणावू लागलेले. 

रानात दिसणारी ही बारीक फळे अंजनीची असावीत का  (Memecylon depressum)?

 

सदाहरित जंगलाच्या टप्प्यांमधून तर कधी मोकळ्या गवताळ टप्प्यांमधून जाणारी, नितांतसुंदर आनंददायी अशी, आडवी वाटचाल करत निघालो. वाट नेमकी लक्षात यावी म्हणून दुतर्फा दगडांची कड आखलेली. 

      

वन खात्याच्या मचाणावर पोचलो. कोंढवळमार्गे वळसा घालून येण्यापेक्षा थेट घाटमाथ्यावरुन भीमाशंकर गाठता येईल, हे भूगोलाचे गृहीतक-कोडे आम्ही सिद्ध करु शकलो याचा आनंद वाटला. वेळ दुपारचे २३०.

     

पुढील काही मिनिटात घोडेगाव-भीमाशंकर डांबरी रस्ता लागला. सकाळपासून १० किमी चाल. १००० मी चढाई आणि २०० मी उतराई झालेली. वेळ दुपारचे ३. 

भीमाशंकरला एसटी स्टँडपाशी पोहोचणे, ही आमचे गंतव्य नव्हतं. हनुमान टाक्यापाशी श्रीराम भक्त हनुमानाचे दर्शन आणि पुढे भीमाशंकर चे सर्वोच्च ‘नागफणी टोक’ गाठले.

भाविकांनी कुठलासा नवस म्हणून कुठे दगडाची लगोरी केलेली, तर कुठे झाडाच्या खोडामध्ये खोचलेली नाणी न्याहाळली.

नागफणी टोकावरुन वारं खात बसलो. दिवसभरात उत्तरेला दुर्ग सिद्धगडच्या अलीकडे घाट चढून भीमाशंकरचे संरक्षित रान न्याहाळत कसे आलो, याच्या भूगोलाची उजळणी केली.

रात्री श्री भीमाशंकरची पूजा-शेजारती लाभली. आणि, घरगुती जेवणही! ट्रेकर्सना अजून काय हवे!!!

     

रानशीळ घाट (बैलघाट) - घनदाट रानातला राजमार्ग, पण कचऱ्याच्या कचाट्यात अडकलेला 

  • घाटमाथ्यावरचे गाव: भीमाशंकर, जिल्हा पुणे
  • कोकणातले गाव: नांदगांव, जिल्हा रायगड
  • स्थानवैशिष्ट्य: भीमाशंकरपासून वायव्येला उतरणारी मळलेली वाट 
  • ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: नाहीत 
  • वाटेत पाणी: पावसाळ्यानंतर दोन-तीन महिने पदरात नैसर्गिक झऱ्याचे पाणी मिळू शकेल. 
  • उतराई: ८२५ मी
  • वेळ: ३.५ तास
  • घाटवाटेतल्या ठळक खुणा:

भीमाशंकर घाट-ट्रेकची दुसऱ्या दिवशीची प्रसन्न सकाळ उजाडली. आज आम्ही एका प्रचलित घाटवाटेने आम्ही उतराई करणार होतो. घाटाचे नावंच किती रम्य - ‘रानशीळ घाट’, उर्फ ‘बैलघाट’!

एस टी बसस्थानकापासून उतराई सुरु झाली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात रानशीळ घाटाची ‘रमणीय उतराई’ असं चित्र मनात रंगवणाऱ्या आमच्यासमोर मात्र भयंकर हादरवणारे आणि धक्कादायक दृश्य आलं. भीमाशंकरच्या अभयारण्यातील संरक्षित अभयारण्याला ओरबाडणाऱ्या पर्यटन आणि देवदर्शनाच्या लोंढ्याचा परिणाम असलेल्या कचऱ्याच्या आणि प्लॅस्टिकच्या महापुराने आम्हाला वेढले.  

        

भीमाशंकर मधून निघता निघताच हा कचरा आढळेल असं नाही, तर अख्खा घाट उतरेपर्यंत सर्व टप्प्यांमध्ये मुबलक प्रमाणात कचरा प्लास्टिक साचलेले.

     

घाटवाटेची उतराई आहे ती मंद उताराच्या वाटेवरुन. कातळमाथा आणि कारवी टप्पे संपत आले, आणि वाट रानात शिरू लागली. 

वाट म्हणजे राजमार्ग आहे. ट्रेकर्सपेक्षाही भाविकांच्या वापराची, त्यामुळे ठिकठिकाणी ‘ॐ नम: शिवाय’ दगडांवर कोरलेलं, झाडांवर पाट्या लावलेल्या. 

       

कोवळ्या उन्हात उजळलेले जुन्या सुंदर रानाचे टप्पे सुखावत होते.

पदरातल्या सपाटीवरच्या सदाहरित रानात अजस्त्र उत्तुंग झाडं एकमेकांमध्ये गुंतलेली. रानशीळ घालणारा तांबट पक्षी होताच.  

मोकळ्या आभाळाचे दर्शन क्वचितच. सह्याद्री घाटमाथा आणि आभाळात विखुरलेले ढग. समोर दर्शन घडलं साक्षात सह्याद्रीदेवतेचे प्रतीक असलेले ‘शेकरू’. नकळत दोन्ही हात जुळले.

घळीतल्या गारव्यात, दाट झाडीतून आणि निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर उठवलेला दुर्ग सिद्धगड अत्यंत देखणा दिसत होता. वेळ सकाळचे १०. 

घळीतून डावीकडे माथ्याकडे कातळदांड उठावत गेलेला. कपारीतून सूर मारत कोणी ससाणा घिरट्या घालत होता. 

घळीतून बाहेर पडत आता वाट दांडावर आली. पानझडीच्या निमसदाहरित रानातून उतराई सुरु झाली. 

     

घाटवाट उतरून सपाटीवरती आलो. सह्याद्रीचा कडा आणि रानशीळ घाटाची पूर्ण उतराई डोळ्यासमोर होती. 

 

कोकणातल्या सपाटीवरून नांदगावची मळलेली वाट सोडली. आडवं उत्तरेला जाणारी बारकी वाट भोमळवाडीकडे निघाली. करवंदीच्या जाळीत आता सुगंधी पांढरी फुलं गळून, हिरव्या करवंदे लगडली होती. करवंदीच्या परिसंस्थेत (इकोसिस्टीम) रानातल्या मुंग्यांनी पानाचे घरटे कसे बांधले, हे दृश्य विलोभनीय होतं. 

भोमाळवाडीला पोहोचलो तेंव्हा ७.५ किमी चाल. ८०० मी उतराई झालेली.वेळ सकाळचे १११५. घरगुती भोजन घेतलं. 

गावातल्या माणसांच्या गप्पा, लहानग्यांचे रंगलेले खेळ अश्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद अनुभवला. 

परतीचा प्रवास सुरु झाला, पण मन रुंजी घालत होतं - दाराघाटाच्या थरारक पावठ्यांपाशी, भीमाशंकरच्या रानाच्या घनदाट गारेगार रानव्यात. होळीपौर्णिमेच्या अशा सुंदर घाट-जंगल डोंगरयात्रेचा निखळ आनंद घेऊन तृप्त झालेलो. भीमाशंकरच्या रानाला लागलेलं प्लॅस्टिक कचऱ्याचे ग्रहण मात्र बोचत आहे... 


महत्त्वाच्या नोंदी:

१. घाटवाटा निश्चिती: सिद्धगडच्या दक्षिणेला आणि भीमाशंकरच्या उत्तरेला कोंकणातील नांदगाव/जांभुर्डे ते घाटमाथ्यावरील कोंढवळला जोडणाऱ्या खालील घाटवाटा नोंदवल्या गेल्या आहेत: 

इंग्रजांचे गॅझेटीयर आणि चढाई-उतराई पुस्तक (गुरुवर्य आनंद पाळंदे काका): उंबरा, घार आणि गुणार

ट्रेकर मित्र ‘दिलीप वाटवे’ यांच्या नोंदी: वारसदरा, उंबरा, उंबऱ्याचा घुगुळ, दारा, दाभोळे घाट

ट्रेकर मित्र ‘योगेश अहिरे’ यांच्या नोंदी: उंबरा, दारा, हिरडा 

यातील घार आणि गुणार या नक्की कोणत्या हे कोडेच! इंग्रजांनी गॅझेटीयरमध्ये नोंदवलेली ‘घार’ नावाची घाटवाट म्हणजेच ‘धार’ असलेला ‘दारा घाट’ असावा, असा अंदाज बांधला.

२. कृतज्ञता: मित्रवर्य योगेश अहिरे. दारा घाटाच्या माहिती आणि मार्गदर्शनाबद्दल.

३. ट्रेक मंडळी: मिलिंद लिमये, साकेत गुडी

४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.


ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०२४. सर्व हक्क सुरक्षित.

No comments:

Post a Comment