... एकदा चारचाकी गाडीने थेट गडावर गेलो, गर्दीत हरवलो. गडही जरा रुसलेलाच, काहीच बोलेना!
विनंत्या-विनवण्या केल्या. गड म्हटला, ‘अरे पोरा, जरा ये लाल मातीच्या वाटा तुडवत, चिंब भीज घामाने, लागू दे धाप जरा उराला, खेळ माझ्या अंगा-खांद्यावर!’
‘श्री प्रतापगडा’चं आवताण स्विकारलं. खास ट्रेकर्सनाच साध्य अशी आडवाटेची ‘दुर्ग-परिक्रमा’ केली. गडाचे अनोखे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक घाटवाटा आणि संरक्षकस्थापत्य जोखले. गड अंगात भिजू लागला, आमच्याशी बोलू लागला. गडाच्या इतिहासाने, स्थापत्याने, भूगोलाने आणि त्याच्या जागृत ऊर्जेने थरारून गेलो, भारावून गेलो. प्रतापगडच्या दुर्गपरिक्रमेचा हा वृतांत!
आपल्या संस्कृतीत निसर्गदेवतांची ‘परिक्रमा’ केली जाते, जसं की नर्मदामैय्या किंवा कैलास मानससरोवर. त्याप्रमाणे सह्याद्रीतील मोक्याचा ‘भोरप्या डोंगर’ आणि त्यावर शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या प्रतापगड या शक्तिपीठाची दुर्ग-परिक्रमा करायचा बेत ठरला. दुर्गपरिक्रमा खडतर होती. राना-वनांतून, ओढ्या-घळीमधून, घाटवाटांवरुन, काटे-घसाऱ्यामधून जुन्या बंद पडलेल्या वाटा तुडवायच्या होत्या, दुर्गस्थापत्य अभ्यासायचे होते. एव्हाना ट्रेकर मावळ्यांच्या हंटरशूजचे घोडे खिंकाळू लागलेले. शिध्याची शिदोरी सोबत घेतली. पाठपिशवीचं खोगीर चढवलं. हायकिंग हॅटचं मुंडासं चढवलं आणि कूच केलं दुर्ग प्रतापगडकडे - रोमांचक इतिहासाच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी!
दुर्गम ‘राकीच्या वाटे’वरुन प्रतापगडचा भूगोल आणि स्थापत्य
दुर्गपरिक्रमेचा पहिल्या टप्पा! जिवलग ट्रेकरमित्र मिलिंद लिमये, गप्पिष्ट पण माहीतगार वाटाड्या धोंडूभाऊ आणि अस्मादिक, अशी छोटी पण चपळ तुकडी होती. आंबेनळी घाटरस्त्यावरील सुतारपेढा गावापासून ‘राकीच्या वाटे’ची चढाई सुरु केली. वाजलेले सकाळचे ६:३०. डांबरी रस्त्यालगतचे पाण्याचे ‘बांधीव टाके’ आम्ही ऐतिहासिक पाऊलवाटेवर असल्याची साक्ष देत होते.
एप्रिल महिन्यामुळे डोंगरात रखरखीतपणा आणि हवेत उष्मा होता, त्यामुळे तांबडफुटीच्या आधीच निघालेलो. आभाळात घुसलेला गडाचा कातळकडा आणि डोंगरदांड यातून वाट कशी असेल, याची उत्सुकता दाटलेली. करपलेल्या उघड्या-बोडक्या दांडावरून १५० मी चढाई करताना धाप लागली.
पाऊण तासात डोंगराच्या खोगीरावर (खोलगट सपाटी) पोहोचलो. समोर प्रतापगडाचे सुंदर दुर्मिळ दर्शन घडले. घनगर्द झाडीतून जणू उमललेले दुर्गकातळपुष्प, त्याच्या पाकळ्या म्हणजे गडाच्या ईशान्येचा यशवंत बुरुज, वायव्येला रेडका बुरुज आणि तटबंदी उग्र-रौद्र दिसत होती.
खोगीराच्या डावीकडे/पूर्वेच्या उंचवट्याला गावकरी ‘मेट’ म्हणतात. थोडके रचलेले विखुरलेले दगडी चिरे दिसले, पण स्पष्ट जोती नाहीत. तिथल्या मोकळवनातून उत्तरेला आणि पूर्वेला अजोड सह्याद्री दर्शन झाले.
सह्याद्री-’सागरा’च्या जणू एकापाठोपाठ एक लाटा उसळलेल्या.
त्यात कुठे महाबळेश्वर, कोळेश्वर, रायरेश्वर अशी अजस्त्र पठारे; तर कुठे मंगळगड, मोहनगड, तोरणा, राजगड आणि साक्षात रायगड असे दुर्ग; आणि यामध्ये वसलेली सावित्री, ढवळी आणि कोयनेची खोरी!
या दूरदर्शन दृश्यामुळे आम्हाला लक्षात आले, की प्रतापगडचे भौगोलिक स्थान अनोखे आहे. ‘महाबळेश्वरच्या जटात’ असं ज्याचं वर्णन केलंय, तो हा ‘भोरप्या’ डोंगर (तथा 'रानआडवा गौड’) सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील महाबळेश्वरपासून स्वतंत्र अस्तित्व जपत जबरदस्त उठावलाय. जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावरचं हे अत्यंत मोक्याचं स्थान. जणू काही विश्वनिर्मात्याने भोरप्या डोंगराची उत्पत्ती होताना, पृथ्वीच्या पोटातून उसळणारा लाव्हा रस एखाद्या ‘भिंगरी’सारखा फिरवलाय, आणि वेगळ्याच धाटणीची डोंगर-दऱ्या, नद्यांची खोरी प्रसवली. त्यामुळेच, प्रतापगडजवळ उगम पावणाऱ्या नद्या नेहेमीपेक्षा वेगळी वाट चोखाळतात. म्हणजे, गडाच्या अल्याडची सावित्री नदी पश्चिमेऐवजी काही अंतर उत्तरवाहिनी आहे, तर गडाच्या पल्याडची कोयना नदी पूर्वेला वाहण्याऐवजी दक्षिणवाहिनी आहे. कवी गोविंदांनी या मुलुखाचं वर्णन खरंच अचूक केलंय, "जावळिचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी, भयाण खिंडी बसल्या पसरूनी ‘आ’ रानमोळी"! अश्या या अद्वितीय डोंगराला हेरून महाराजांनी इ.स.१६५६ मध्ये दुर्ग उभारला आणि जेमतेम ३ वर्षात इ.स.१६५९ला स्वराज्यातला अपूर्व शिवप्रतापाचा (अफजल मोहीम व वध) इतिहास या भूगोलाच्या साथीने घडला…
.. दुर्गपरिक्रमा पुढे चालू ठेवली. खोगीरापासून डावीकडे/ पूर्वेला उताराकडे निसटणारी पाऊलवाट ‘वाडा कुंभरोशी’ला जाते, ती आम्ही सोडली. समोर दाट झाडीतून आणि कारवीतून वाट काढत गडाकडे निघालो. या टप्प्यात आधी नोंदवल्या गेलेल्या ‘जुन्या बांधीव पायऱ्या’ आता दरड कोसळल्याने हरवल्या आहेत, ज्या शोधूनही सापडल्या नाहीत.
झाडीतून बाहेर पडत सह्यधारेवर पोहोचलो. समोर होता - बेलाग रेडे बुरुज, रौद्र कातळकडा, त्याला बिलगलेली ‘महुआ’ची पोळी! उभा घसारा चढत गच्च रानातून-कारवीतून-गचपणातून वाट काढायची होती. कुठे होत्या गव्याच्या पाऊलखुणा, कुठे सांबर हरीणाने शिंगे घासलेली झाडाची खोडे, तर कुठे साळीनदराची बिळदे अन काटे!
अखेरीस आम्ही गडाच्या तटबंदीच्या अगदी कुशीत (१० मी खाली) आलो. आता परिक्रमेतील महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला - दुर्गस्थापत्य अनुभवायचा! साधारणत: आपण दुर्गाभ्यास करताना, गडाच्या माथ्यावरुन तटबंदी आणि बुरुज न्याहाळतो. मात्र, आमच्या दुर्गपरिक्रमेत महाराजांच्या दूरदृष्टीतून बनलेले दुर्गस्थापत्य पायथ्याशी उभे राहून, श्रद्धेने आणि अभ्यासू नजरेने आम्ही न्याहाळू लागलो.
पुढच्या तासाभरात गडाची उत्तरेची तटबंदी (रेडे बुरुज, चिणलेली चोरदिंडी ते यशवंत बुरुज), त्यांनंतर पूर्वेची तटबंदी (यशवंत बुरुज ते उगवतीचा/टेहेळणी बुरुज) आणि अखेरीस दक्षिणेची तटबंदी (उगवतीचा बुरुज ते भवानी बुरुज) निरखता आली. कोवळ्या उन्हांत उजळलेली दुर्गसंपदा अनुभवण्याचा आनंद आम्ही दुर्गप्रेमींनी लुटला. तब्बल पावणे-चारशे वर्षांपूर्वी उभारलेले, जावळीतील ऊन-वारा-पाऊस सोसत पण कुठेही जराही न ढळलेले बांधकाम थक्क करणारे! कुठे चोरदिंडी, कुठे दुहेरी तटबंदी तर कुठे पहाऱ्याची जोती असं खणखणीत दुर्गस्थापत्य!!!
राकीच्या वाटेवरुन चढाई करत आता आम्ही पोहोचलो वाहनतळापाशी उगवतीच्या टेहेळणी बुरुजाजवळ. भव्य भगवा ध्वज दिमाखात फडकत होता. वाजलेले सकाळचे ८:३०. राकीच्या वाटेने ४५० मी चढाई केलेली. वाटेच्या पायथ्याचे पाणी टाके, मेट-जोती आणि पदरात नोंदवलेल्या पायऱ्या बघता राकीची दुर्गम वाट पाहऱ्यासाठी वापरत असावेत, मात्र ही वहिवाट नसावीच, असे वाटते.
दुर्ग-शक्तीपीठाची अनुभूती
.. गडाच्या पहिल्या पायरीवरची धूळ मस्तकी लावली. माथ्यावर महिषासुरमर्दिनी रूपातील भवानीमातेसमोर नतमस्तक झालो. गडावर कितीही गर्दी असली, तरी भवानीमाता, केदारेश्वर आणि राजांचं भव्य अश्वारूढ शिवशिल्प नि:संशय शक्तीपीठे आहेत, याची अनुभूती घेतली. राजांच्या वीररसयुक्त पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरलेले शब्द "माझ्या मायभूमीचे रक्षण, हे माझे परम कर्तव्य" ऊरात साठवले.
गडावरून चौफेर दर्शन घडलं, जावळीच्या अथांग सह्याद्रीमंडळाचं - उभ्या घसरड्या डोंगरसोंडा, माथ्यापाशी सलग कातळभिंत, गच्च झाडीवेलींनी नटलेले डोंगरउतार, वळणवेड्या कोयनेचं-सावित्रीचे पात्र, आंबा-फणस-बांबूचा गच्च रानवा, डोंगरउतारांवर विखुरलेल्या शेताडीची नक्षी, फडफड असा विलक्षण मोठ्ठा आवाज करत दरीच्या पोटात खोलवर पल्ला मारत जाणारे धनेश पक्षी (हॉर्नबील्स) आणि आभाळात रेंगाळलेले तुरळक ढग - अश्या चित्ताकर्षक दृश्याने आम्हांला भारावून टाकलेलं. अशक्यप्राय आव्हानांवर मात करणाऱ्या बुद्धी, शक्ती, नीती, युक्तीची शिवप्रतापाची गाथा - या जावळीतील सह्याद्रीमंडळामुळे आपल्या अंगात भिनू लागते.
आदिवरदायिनी राऊळाकडे उतराई
दुर्गपरिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यात, गडावरुन नैऋत्येला उतरत श्रीआदिवरदायिनी राऊळ गाठायचे होते. गडाच्या पहिल्या पायरीपाशीच मस्त मळलेली वाट सुरु झाली. गारेगार गच्च झाडीतून सौम्य उतार झपाट्याने उतरला. माथ्यावर भवानी बुरुज आला आणि धारेवरचा उभा उतार सुरु झाला. पाठीमागे गडाच्या भवानी बुरुजाची भक्कम साथ होती. या धारेवरुन कोकणात उतरु लागणारी ‘चिपेची वाट’ आता कोठेतरी घसाऱ्यात हरवलेली.
पश्चिमेला खोलवर पारघाट-किनेश्वर खोरे, आंबेनळी घाटरस्ता आणि त्यासोबत ढगांच्या सावलीचा खेळ चाललेला. दूध पोहोचवायला गडाकडे निघालेला कोंडोशीचा कोणी आजा चढावर तमाखू मळत बसलेला, तर दुधाची कळशी माथ्यावर वागवणारी त्याची नात मोबाईलवर गाणी ऐकण्यात मग्न - वेगळ्या पिढ्या, वेगळा विरंगुळा!
आदिवरदायिनी मंदिर गाठलं. दर्शन घेतलं. वाजलेले सकाळचे ९:४५. गडापासून ३०० मी उतराई केलेली. भरारा वारं सुटलेलं.
परिसरात जुनी जोती दिसली. मंदिराच्या पूर्वेला ३०० मीटर उतारावर जुने कातळकोरीव पांडवटाके आहे - पारघाटाची वाट ऐतिहासिक असल्याची साक्ष देणारे, चंद्रकोरीच्या आकाराचे. रानटी जनावरे पडू नयेत, म्हणून लोखंडी जाळी बसवली आहे. झुडुपांमधून टाकं शोधावेच लागले. पण त्या चिकाटीबद्दल मिळाला झक्क रानमेवा - तोरणे आणि आंबोळया. असा रानमेवा मिळाल्यावर खादाड ट्रेकर्सची पावलं कितीतरी वेळ निघेचनात...
ऐतिहासिक पारघाट - बंद पडलेल्या वाटेवरून उतराई
दुर्गपरिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यात ऐतिहासिक पारघाटाची उतराई करायची होती. आदिवरदायिनी मंदिरापासून निघाल्यावर मस्त मळलेली, फरसबंदीची वळणावळणाची वाट होती. फुटभर उंचीचे कठडे, पायाखालचे घडीव दगड आणि वळणापाशी रचीव दगडांनी पक्की केलेली उतारवाट न्याहाळली. १५० मी उतराई केल्यावर मात्र वाट सपशेल बंद पडलेली. म्हणजे पूर्वीची फरसबंदी आहेच, पण मजबूत झाडोरा-वेलींच्या-काटयांच्या गुंत्यात वाट हरपली आहे.
अक्षरश: घुसाघुशी करुन वाट काढत जाताना धाप लागली. कितीतरी वेळ झटापट आणि कसरत करत उतरत होतो. वारंही पडलेलं. अखेरीस मोकळवनात आल्यावर हायसं वाटलं. ‘पारघाटाच्या ओठात’ असं ज्याचं वर्णन केलंय, तो संरक्षक दुर्ग प्रतापगड आता उंच-भव्य दिसू लागला. वाजलेले सकाळचे ११:३०. पारघाटाने ५०० मी उतराई केलेली. पारघाटाचा ऐतिहासिक वारसा असलेले गायमुख शिल्प असलेले पाण्याचे टाके, शिवपिंडी आणि कातळकोरीव मारुतीरायाचे दर्शन घेतले. कोण्या कवीमनाच्या भक्ताने टाक्याची रचना अशी केली आहे, की टाक्यात पाणी ओतप्रोत भरले की गोमुखातून बाहेर पडावे. पुरातन पारघाटात इतक्या साऱ्या जुन्या पाऊलखुणा, पण आज व्यावहारिक गरज न उरल्याने, वाट पूर्णपणे निकामी होऊन बंद पडल्याचे कटू सत्य अनुभवले. कालाय तस्मै नम:!!!
वहाळातून रानकडसरीकडे खडतर चढाई
दुर्गपरिक्रमेच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यात - पारघाटातील गायमुख टाक्यापासून निघून, चिरेखिंडीत रानकडसरीपाशी आंबेनळी घाटरस्ता गाठायचा होता. अर्थातच, इथे मळलेली वाट अजिबात नव्हती आणि पूर्णपणे डोंगर-घळीमधून वाट काढायची होती. गायमुख टाक्यापासून पूर्वेला प्रतापगडच्या कड्याकडे निघालो. पारघाटाची वाट सोडली आणि डावीकडे/ उत्तरेला तिरक्या डोंगरउतारांवरून वाट काढत निघालो. प्रतापगडाच्या पश्चिमेचा थोरला वहाळ गाठणे, हे पहिले उद्दिष्ट होते. अडचणीची वाटचाल होती. एका बेचक्यात बसलेली रानकोंबडी दिसली, पण आम्हाला बघूनही हलेचना. तिच्याजवळून पुढे निसटावे लागले. मग लक्षात आले, की दोन अंडी उबवायला बसल्याने ती रानकोंबडी उडत नव्हती. तिला न दुखावता सटकलो आणि अखेरीस थोरल्या वहाळात पोहोचलो. भले मोठे दगड-धोंडे अस्ताव्यस्त पसरलेले. वाजलेले दुपारचा १. कळाकळा तापलेल्या उन्हांत, चिकाटीने दुर्गपरिक्रमा करणाऱ्या ट्रेकर्ससाठी अखेर गडपुरुषानेच जणू पाण्याची सोय केलेली. भर एप्रिलमध्ये वहाळात होतं बारमाही गारेगार वाहतं पाणी, छोट्या कुंडांमधून गरगरा विहरणाऱ्या पाणनिवळ्या आणि आभाळाचं प्रतिबिंब!
आता वहाळाच्या पात्रातून चढाई करत निघालो. शेवटी डावीकडच्या ओढ्यातून, घसाऱ्यातून उभ्या चढाईची कसरत होती. ओढा अंगावर आल्यावर, पलिकडे कारवीतून वाट काढली. एव्हाना गाड्यांचे आवाज घुमू लागलेले, म्हणजे आंबेनळीचा गाडीरस्ता जवळ आलेला. धापा टाकत रस्त्यावर पोहोचलो. वाजलेले दुपारचे १:४५. पारघाटातील गायमुखापासून ३०० मी चढाई केलेली. डांबरी रस्त्यावरून अजूनही २ किमी चाल होती. आमचा ट्रेकर्सचा वेष बघून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधले लोक कौतुकाने हात करत होते. अखेरीस जिथून दुर्गपरिक्रमा सुरू केली, ती सुतारपेढा वाडी गाठायला वाजले दुपारचे २:१५. आभाळात अक्षरश: घुसलेल्या प्रतापगडाचे रुप चित्तवेधक होते.
प्रतापगड दुर्ग-परिक्रमा पूर्ण केली, यावर आम्हाला विश्वास बसत नव्हता. आंबेनळी घाटरस्त्यावरून निघून अल्पपरिचित ‘राकीच्या वाटे’ने दुर्गम चढाई केलेली; उगवतीच्या बुरुजापासून उतरत चिपेच्या वाटेजवळून आदिवरदायिनी राऊळापाशी पोहोचलो; ऐतिहासिक चिरेबंदी ‘पार घाटा’ने उतराई केली आणि अखेरीस पश्चिमेच्या वहाळातून वाट काढत चिरेखिंडीपाशी रानकडसरीची चढाई केली. दणकट भटकंतीमुळे आणि आनंदानेही ऊर धापापले होते. प्रतापगडाची दुर्ग-परिक्रमा फारशी प्रचलित नाही. त्यासाठी ‘प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू फौंडेशन’चे श्री. संजय जाधव आणि श्री. अजित जाधव यांनी आमच्या तुकडीला आपुलकीने मदत केली. स्थानिक वाटाड्या श्री. धोंडू ढेबे यांचीही साथ मिळाली. या डोंगरभाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
परिक्रमा शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांची
गडाने आम्हाला परवानगी दिली दुर्ग-परिक्रमा करायची अन गड अनुभवायची..
गवतालाही भाले फुटतील, अश्या इतिहासाचा प्रतापगड...
वळणवेड्या कोयनेचा, सावित्रीचा अन घनदाट अरण्याचा प्रतापगड...
भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याच्या दूरदृष्टीचा प्रतापगड…
बळकट, बेलाग, अजिंक्य दुर्गस्थापत्याचा प्रतापगड…
श्रीभवानीचा, आदिवरदायिनीचा अन काळभैरवाचा प्रतापगड...
वीरांचा, शौर्याचा आणि स्वामीनिष्ठतेचा प्रतापगड…
निसरड्या भयावह घाटवाटांचा प्रतापगड...
रौद्र सह्याद्रीचा, गनिमी काव्याचा प्रतापगड... शिव-प्रतापाचा प्रतापगड!!!
शिव-प्रतापाच्या उर्जेने उत्तुंग स्वप्नं पाहण्याची अपार उर्जा दिलेली...
दुर्गपरिक्रमा प्रतापगडची करुन आनंदवनभुवनाची अनुभूती दिलेली... कृतज्ञ आहोत...
------------
लेख 'दुर्ग दिवाळी अंक २०२४' मध्ये प्रकाशित आहे. © साईप्रकाश बेलसरे, २०२४
छायाचित्रे आणि नकाशा रेखाटन: साईप्रकाश बेलसरे





















No comments:
Post a Comment